डिजिटल अर्काईव्ह

कुलगुरू विजय फुलारी यांची मुलाखत - विषय : उच्च शिक्षणातील शिक्षक गुणवत्ता

गेल्या काही वर्षांत उच्च शिक्षण व्यवस्थेत शिक्षक गुणवत्तेबाबत अनेक मूलभूत प्रश्न उपस्थित झाले आहेत. शिक्षक भरती प्रक्रिया खरोखर गुणवत्ताधारित आहे का, की ती केवळ नियमपूर्ततेपुरती मर्यादित राहिली आहे? NET-SET किंवा Ph.D. या पात्रता पुरेशा आहेत का ? भरतीनंतर शिक्षकांच्या प्रशिक्षणाकडे दुर्लक्ष का होते? संशोधनाच्या आकड्यांच्या मागे लागलेल्या व्यवस्थेत अध्यापनाची गुणवत्ता दुय्यम ठरत नाही का? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, शिक्षकांचे उत्तरदायित्व नेमके कसे आणि कोणत्या निकषांवर ठरवले जावे? या सर्व प्रश्नांच्या छेदनबिंदूवर उभी राहणारी ही मुलाखत.

 

छत्रपती संभाजीनगर येथील 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' (BAMU) हे केवळ एक शैक्षणिक केंद्र नसून, तो या प्रदेशाच्या अस्मितेचा आणि प्रगतीचा केंद्रबिंदू आहे. 23 ऑगस्ट 1958 रोजी स्थापन झालेल्या या विद्यापीठाने मराठवाड्याच्या सामाजिक जडणघडणीत ऐतिहासिक भूमिका बजावली आहे. आज या विद्यापीठांतर्गत छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव या चार जिल्ह्यांतील 487 संलग्न महाविद्यालये आणि विद्यापीठ परिसरातील 45 पदव्युत्तर विभाग कार्यरत आहेत. कॅम्पसवर 85 अभ्यासक्रम असून, त्यापैकी 15 व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत. 725 एकर परिसराच्या कॅम्पसवर 1140 विद्यार्थी आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये सुमारे साडेचार लाख विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या या विद्यापीठाच्या नेतृत्वाची धुरा सध्या प्रा.डॉ. विजय फुलारी यांच्याकडे आहे.

डॉ. फुलारी यांना 38 वर्षे अध्यापन आणि 32 वर्षे संशोधन क्षेत्रातील अनुभव आहे. भौतिकशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षणानंतर 'पातळ थरांच्या भौतिकशास्त्रात' (Thin Film Physics) केलेल्या संशोधनामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात प्रोफेसर, विभागप्रमुख, डीन आणि विविध समित्यांमध्ये काम करताना त्यांनी NAAC, DST-FIST, UGC-DSA सारख्या प्रकल्पांचे नेतृत्व केले. 213 शोधनिबंध, 30 विद्यार्थ्यांना पीएच.डी., 04 पेटंट, 5600 सायटेशन्स यांमुळे ते केवळ शास्त्रज्ञ नाहीत, तर प्रशासक आणि धोरणकर्तेही आहेत. तीन पुस्तके, 28 राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदा आणि 50 आमंत्रित व्याख्याने यांतून त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व दिसते.

शिक्षक गुणवत्तेच्या व्यवस्थापनापासून ते प्रशिक्षण, मूल्यांकन आणि उत्तरदायित्वापर्यंतच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारी ही मुलाखत, शिक्षण क्षेत्रातील धोरणकर्ते, शिक्षक आणि अभ्यासक यांना विचार करायला लावणारी आहे.

प्रश्न - कुलगुरू पदापर्यंतचा तुमचा प्रवास पाहता, शिक्षक गुणवत्तेच्या व्यवस्थापनाबाबत तुम्हाला घडवणारा निर्णायक अनुभव कोणता होता ?

- शिक्षण आणि शिक्षकाचे महत्त्व लहानपणापासूनच माझ्या मनात घट्ट बसले. गावातून सात किलोमीटर चालत शाळेत जाण्याचा तो काळ होता. त्या काळात साधने कमी होती, पण शिक्षकांची तयारी, समर्पण आणि विद्यार्थ्यांशी असलेले नाते खूप मजबूत होते. मी पंढरपूरला बी.एससी आणि कोल्हापूरला एम.एससी केले.

माझ्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात काही शिक्षकांनी विषय समजावून सांगण्याची जी पद्धत वापरली, ती आजही माझ्या मनावर कोरलेली आहे. त्यांनी केवळ माहिती दिली नाही, तर विचार करण्याची सवय लावली. पुढे संशोधन आणि विद्यापीठीय जीवनात प्रवेश केल्यानंतर मला जाणवले की, शिक्षकाची खरी गुणवत्ता विद्यार्थ्यांवर होणाऱ्या परिणामात असते.

शिवाजी विद्यापीठात काम करताना आम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत संशोधन आणि अध्यापन करत असू. त्या 'वर्क कल्चर'ने मला घडवले. आमचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी मला विविध समित्यांवर काम करण्याची संधी दिली. तिथेच मला समजले की, शिक्षक गुणवत्ता ही केवळ पदव्यांवर अवलंबून नसते, तर ती तुमच्या 'काम करण्याच्या पद्धतीवर' (Work Ethics) अवलंबून असते. तोच अनुभव मी आज प्रशासनात वापरत आहे.

प्रश्न -  शिक्षक ही केवळ 'नोकरी' न राहता 'संस्थात्मक जबाबदारी' ठरावी, यासाठी कुलगुरूची भूमिका किती निर्णायक असते ?

-  ही भूमिका अत्यंत निर्णायक असते. कारण संस्थेचे वातावरण नेतृत्वावर अवलंबून असते. कुलगुरू किंवा प्रशासन केवळ औपचारिक भूमिका निभावत असेल, तर शिक्षकही त्याच पद्धतीने काम करतात. पण प्रशासनाने जर स्पष्ट संदेश दिला की, 'काम करावेच लागेल', तर वातावरण बदलते.

मी विद्यापीठात आलो तेव्हा काही कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली नव्हती. म्हणून सेवा ज्येष्ठता यादी तयार केली, हरकती घेतल्या, सुनावण्या घेतल्या आणि एका वर्षाच्या आत पदोन्नती सुरू केली. आता कोणतीही व्यक्ती निवृत्त झाल्यावर लगेच पुढच्या व्यक्तीला पदोन्नती मिळते. शिक्षकांना सांगितले, 'मी कुलगुरू झालो आहे. तुम्हाला विद्यापीठाचे भले व्हावे असे वाटत असेल तर काम करा.' मी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतदेखील सांगितले की, 'निकोप चर्चा होईल, मला योग्य वाटत असेल तर मी निर्णय घेईल, अन्यथा घेणार नाही.' कुठलीही गोष्ट चांगली व्हावी ही तळमळ मला आहे. प्राधिकरणे, प्राध्यापक, कर्मचारी सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय गुणवत्ता सुधारत नाही. त्यामुळे सर्वप्रथम शिस्त आणण्याचा प्रयत्न केला. बैठका वेळेवर सुरू होणे, शिक्षक वेळेवर येणे, कामकाजात पारदर्शकता ठेवणे, या साध्या गोष्टींनी मोठा बदल घडवला. अचानक विभागांना भेट देणे, शिक्षकांशी संवाद साधणे यांमुळे त्यांच्यात जबाबदारीची जाणीव निर्माण झाली.

प्रश्न  - संशोधक, अध्यापक आणि प्रशासक या तिन्ही भूमिका अनुभवल्यानंतर 'चांगला शिक्षक' याची तुमची व्याख्या काय ?

-  चांगला शिक्षक हा केवळ विषयात तज्ज्ञ नसतो, तर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणारा असतो. त्याच्याकडे विषयाचे सखोल ज्ञान असावे, पण त्याचबरोबर ते प्रभावीपणे मांडण्याची क्षमता असावी. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संवेदनशीलता. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे. केवळ माहिती देणे हा अध्यापनाचा उद्देश नाही; विद्यार्थ्यांना विचार करायला लावणे हा खरा उद्देश आहे. 'चांगला शिक्षक' तोच जो आयुष्यभर 'विद्यार्थी' राहतो. ज्याने स्वतःचे वाचन आणि संशोधन थांबवले, त्याचा शिक्षक म्हणून मृत्यू झाला, असे मी समजतो. आज अनेक शिक्षक 'एकदा भरती म्हणजे सुरक्षितता' या मानसिकतेत अडकले आहेत.

प्रश्न - तुम्ही कुलगुरूपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर, शिक्षक व्यवस्थापनात सर्वात आधी बदल करावा, असे कुठे वाटले? 'माहिती देणारा शिक्षक' आणि 'ज्ञान प्रेरित करणारा शिक्षक' यातील सीमारेषा धूसर होत आहे का?

- मला सर्वात आधी बदलावेसे वाटले ते शिक्षकांचे समाजाशी आणि उद्योगांशी असलेले अलिप्तपण. आमचे शिक्षक त्यांच्या विभागाच्या भिंतींच्या आत खूप चांगले काम करतात, पण त्याचा समाजाला काय उपयोग होतो? हे मी तपासले. शिक्षक हा 'ज्ञान प्रवृत्त' करणारा हवा, म्हणजे त्याने विद्यार्थ्याला प्रश्न विचारायला प्रवृत्त केले पाहिजे. अनेक शिक्षक पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन तयार करून वर्षानुवर्षे तेच वापरतात. विद्यार्थ्यांना ते समजले की नाही, याची खातरजमा करत नाहीत. ही मानसिकता बदलण्याचे मोठे आव्हान माझ्यासमोर आहे.

प्रश्न -  शिक्षक गुणवत्तेच्या दृष्टीने तुमच्या विद्यापीठाची सद्यःस्थिती काय? आणि गेल्या दोन वर्षांत तुम्ही कोणते बदल घडवले ?

काही शिक्षक अत्यंत चांगले काम करतात स्वतः शिकतात, संशोधन करतात आणि विद्यार्थ्यांना घडवतात. काही शिक्षक केवळ औपचारिक काम करतात. 99 टक्के शिक्षक वेळेत येतात, काम करतात. 'NEP-2020' ची अंमलबजावणी करताना शिक्षकांच्या प्रशिक्षणावर भर दिला आहे. 'इंडस्ट्री-अकॅडेमिया कनेक्ट' वाढवण्यासाठी विशेष सेल सुरू केला आहे. संशोधनाचा दर्जा सुधारण्यासाठी 'रिसोर्स शेअरिंग' आणि 'इंटरडिसिप्लिनरी रिसर्च'ला प्रोत्साहन देणारे प्रकल्प हाती घेतले आहेत.

प्रश्न - शिक्षकांची संख्या, अभ्यासक्रम आणि संशोधन यांवर व्यवस्थापनाचा कसा परिणाम होतो ?

- शिक्षकांची संख्या अपुरी असेल, तर कोणतीही व्यवस्था नीट चालत नाही, अभ्यासक्रम वेळेवर पूर्ण होत नाहीत, संशोधनावर परिणाम होतो आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होते. आमच्या विद्यापीठात शिक्षकांची कमतरता आहे. 'पीएम उषा' अंतर्गत संशोधनासाठी आणि पायाभूत सुविधांसाठी शंभर कोटींचा निधी मिळाला आहे. ज्या विभागांमध्ये शिक्षक गुणवत्ता चांगली आहे, तिथे संशोधनाचा दर्जा आणि विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट हे दोन्ही उत्तम असल्याचे दिसून आले आहे.

प्रश्न - महाराष्ट्रातील उच्च शिक्षणव्यवस्थेत शिक्षक गुणवत्ता व्यवस्थापनाचे सर्वात मोठे सामर्थ्य कोणते आणि कमतरता कोणती आहे ?

-  सामर्थ्य म्हणजे शिक्षकांची क्षमता. आपल्याकडे 90 टक्के शिक्षक गुणवत्तापूर्ण आहेत. मात्र त्यांचा योग्य वापर होत नाही. कमतरता म्हणजे पदभरतीची प्रक्रिया आणि 60 पदे रिक्त. त्यामुळे गुणवत्ता घसरते. ग्रामीण भागांत दर्जेदार शिक्षक येत नाहीत.

प्रश्न  - आजची शिक्षक भरती प्रक्रिया खरंच गुणवत्ताधारित आहे का, की ती केवळ नियमपूर्ततेपुरती मर्यादित राहिली आहे ?

- कायद्याच्या चौकटीत पाहिले तर ती गुणवत्ताधारित आहे. विद्यापीठ कायद्यानुसार महाविद्यालयात शिक्षकांच्या मुलाखतीसाठी निवड समिती दिली जाते. त्यामध्ये कुलगुरू प्रतिनिधी, विषय तज्ज्ञ, सरकार व मागासवर्गीय यांचे प्रतिनिधी असतात. संस्थेचे अध्यक्ष आणि प्राचार्यदेखील मुलाखतीच्या पॅनलमध्ये असतात. एवढी समिती असताना तिच्याद्वारे निवड झालेला शिक्षक गुणवत्तेचा नाही असे आपण कायदेशीरदृष्ट्या म्हणू शकत नाही. पण प्रत्यक्षात काही मर्यादा आहेत. 15-20 मिनिटांच्या मुलाखतीत एखाद्या उमेदवाराची पूर्ण क्षमता मोजणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही कंत्राटी शिक्षकांसाठी परीक्षा घेतली, बाहेरचे विषय तज्ज्ञ घेतले. गुणवत्तेला प्राधान्य दिले.

प्रश्न - पात्रता (Eligibility) असूनही अनेकदा 'गुणवत्ता' (Quality) का दिसत नाही? निवडीच्या प्रक्रियेत काही दोष आहेत की नियुक्तीनंतरच्या वातावरणात ?

- पात्रता म्हणजे केवळ पदव्यांचा संच. नेट/सेट किंवा पीएच.डी. असणे म्हणजे तुम्ही चांगले शिक्षक असालच असे नाही. त्यामुळे निवडीच्या प्रक्रियेत आम्ही केवळ गुणांवर न जाता, उमेदवाराची 'शिकवण्याची पद्धत' आणि त्याची 'संवेदनशीलता' तपासण्यावर भर देत आहोत. पण खरा प्रश्न नियुक्तीनंतरचा आहे. कायमस्वरूपी नोकरी मिळाली की अनेक शिक्षक सुस्त होतात. 'इन-ब्रीडिंग' मुळेदेखील गुणवत्तेला फटका बसतो.

प्रश्न - 'इन-ब्रीडिंग' (Inbreeding) म्हणजे नेमके काय आणि त्याचे तोटे काय आहेत ?

- सोप्या भाषेत सांगायचे तर, एकाच विद्यापीठाचे विद्यार्थी तिथेच शिक्षक बनणे. नवीन दृष्टी, वेगळ्या विद्यापीठाचे अनुभव तिथे येत नाहीत. मग बौद्धिक साचलेपण येते. मी शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी होतो आणि तिथेच शिक्षक झालो, पण बाहेरच्या जगाशी आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी संबंध जोडून मी ते साचलेपण तोडले.

प्रश्न - संशोधन क्षमता, अध्यापन कौशल्य आणि सामाजिक जाणीव या तीन बाबींचे संतुलन भरती प्रक्रियेत कसे साधले जावे ?

- केवळ संशोधन करणारा शिक्षक चांगला शिक्षक असेलच असे नाही. पण चांगला शिक्षक चांगला संशोधक होऊ शकतो. त्यामुळे भरती आणि प्रशिक्षण प्रक्रियेत या तिन्ही गोष्टींचा विचार केला पाहिजे.

प्रश्न - 'नेट-सेट' किंवा 'पीएच.डी.' म्हणजे शिक्षक होण्यासाठीची केवळ पात्रता आहे की गुणवत्ता? पदव्या असूनही वर्गात प्रभावीपणे उभे राहता न येणारे शिक्षक ही सध्याची मोठी समस्या आहे का? खरा 'अकॅडमिक परफॉर्मन्स' तपासण्याची काही नवीन पद्धत विद्यापीठ विकसित करत आहे का ?

- नेट/सेट, पीएच.डी. ही पात्रता आहे. गुणवत्ता नाही. कागदोपत्री निकष हे केवळ प्रवेशद्वार आहेत. खरा परफॉर्मन्स हा वर्गात आणि प्रयोगशाळेत दिसतो. अनेकांकडे पदव्या आहेत, पण अध्यापनाची क्षमता असेलच असे नाही. ही गंभीर समस्या आहे. आम्ही आता 'विद्यार्थी फीडबॅक' आणि 'पीअर रिव्ह्यू' (सहकाऱ्यांनी केलेले मूल्यमापन) याकडे गांभीर्याने पाहत आहोत. तसेच, शिक्षकांनी वर्षाकाठी किती नवीन प्रोजेक्ट्स आणले आणि किती विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये प्लेस केले, हे निकष आम्ही लावत आहोत.

प्रश्न - कंत्राटी आणि तात्पुरत्या शिक्षकांचा परिणाम काय होतोय ?

- दीर्घकालीन दृष्टीने नकारात्मक परिणाम होतो. कारण त्यांच्याकडे स्थैर्य नसते. तरीही काही शिक्षक उत्कृष्ट काम करतात.

प्रश्न - महाराष्ट्र शासन शिक्षक भरतीसाठी नवी नियमावली तयार करत आहे. या बदलांकडे तुम्ही संधी म्हणून पाहता, की काही अडचणी येऊ शकतात? नवी नियमावली लागू झाल्यास प्रादेशिक गरजा, विषयवैविध्य आणि स्थानिक वास्तव यांचा पुरेसा विचार होईल का?

- शासन आदेश काढत असते, त्या पद्धतीची अंमलबजावणी विद्यापीठ करत असते. आता शिक्षक भरतीसाठी केलेल्या नवीन नियमात 60 टक्के गुण उमेदवाराच्या शैक्षणिक गुणवत्तेला दिले जाणार आहेत. एका जागेसाठी किती उमेदवारांना बोलवायचे याबाबतचे प्रमाण अद्याप ठरायचे आहे. एमपीएससी, यूपीएससी ला एकास तीन अथवा एकास पाच उमेदवार बोलवले जातात. शिक्षक भरतीबाबत शासनाने अध्यादेश काढला असल्यामुळे त्याबद्दल आता कोणत्याही प्रकारचे भाष्य करता येणार नाही.

प्रश्न - भरती प्रक्रियेतील राजकीय आणि प्रशासकीय हस्तक्षेप गुणवत्तेचा बळी घेतात का? कुलगुरू म्हणून तुम्ही हा दबाव कसा हाताळता ?

- दबाव हा प्रत्येक मोठ्या पदावर असतोच. पण कुलगुरूची खुर्ची ही न्यायाधीशासारखी आहे. मी गुणवत्तेशी तडजोड केली, तर पुढच्या पिढीचे नुकसान करीन. म्हणून पारदर्शकतेला प्राधान्य देतो. निवड समित्यांमध्ये तज्ज्ञ लोक असतात. आणि सर्व प्रक्रिया ऑन कॅमेरा किंवा रेकॉर्डेड असते.

प्रश्न - भरतीनंतर शिक्षक प्रशिक्षण का दुर्लक्षित राहते ?

- आपण 'निवड झाली म्हणजे शिक्षक तयार झाला' असा समज ठेवतो. प्रत्यक्षात प्रशिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे.

प्रश्न - कायमस्वरूपी नोकरीची सुरक्षा (Job Security) गुणवत्तेच्या आड येते का? परदेशातील विद्यापीठांप्रमाणे 'टेन्युअर ट्रॅक' (Tenure Track) भारतात येणे गरजेचे आहे का ?

- हो, हे कटू सत्य आहे. 'कायमस्वरूपी' हे बिरुद लागल्यावर वाचन-लेखन थांबवणारे अनेक शिक्षक आहेत. शिक्षकाने स्वतःला सतत अद्ययावत ठेवले पाहिजे. परदेशात दर पाच-दहा वर्षांनी तुमच्या कामाचे ऑडिट होते आणि कॉन्ट्रॅक्टचे नूतनीकरण केले जाते. भारतातही आता 'परफॉर्मन्स लिंक्ड' प्रमोशन असणे गरजेचे आहे.

प्रश्न - संशोधनाकडे कल असलेला शिक्षक चांगला शिकवू शकतो की अध्यापनावर लक्ष देणारा शिक्षक चांगला संशोधन करू शकतो ?

- उत्तम संशोधक हा चांगला शिक्षक असेलच असे नाही, पण जो उत्तम शिक्षक असतो तो चांगला संशोधक होऊ शकतो. दोन्हीचा समतोल साधता आला पाहिजे.

प्रश्न - महाराष्ट्रातील उच्च शिक्षणात शिक्षक प्रशिक्षणाची गरज अकॅडेमिकपेक्षा मानसशास्त्रीय (जसे मेंटल हेल्थ ट्रेनिंग) अधिक आहे का?

- असे वाटत नाही. कारण मुळात विद्यापीठातील शिक्षक हा नकळत गर्विष्ठ झालेला असतो. मी विद्यापीठात आहे आणि महाविद्यालयातील शिक्षकांपेक्षा जास्त हुशार आहे असे त्याला वाटू लागते. पूर्वीचे आमचे कुलगुरू म्हणायचे की, विद्यापीठात येण्यापूर्वी त्या शिक्षकाने महाविद्यालयात दहा वर्षे नोकरी केलेली असली पाहिजे, तरच त्याला विद्यार्थ्यांच्या अडचणी समजतात. मला सगळे माहीत आहे असे त्याला वाटत राहते, त्यामुळे मेंटल हेल्थ ट्रेनिंग दिले तरी त्याचा काही परिणाम होईल असे वाटत नाही.

प्रश्न - API, CAS, PBAS या मूल्यमापन पद्धती खरंच शिक्षक गुणवत्तेचे मोजमाप करतात का ?

- त्या काही प्रमाणात प्रभावी आहेत, पण त्या पूर्ण चित्र दाखवत नाहीत. संशोधन पत्रिका संख्येपेक्षा दर्जा महत्त्वाचा आहे.

प्रश्न - शिक्षकांचे उत्तरदायित्व (Accountability) केवळ 'बायोमेट्रिक' हजेरीने सिद्ध होऊ शकते का? विद्यार्थ्यांचे 'लर्निंग आउटकम' हे शिक्षकाच्या गुणवत्तेचे परिमाण का मानले जाऊ नये? विद्यार्थ्यांचा फीडबॅक शिक्षक मूल्यमापनात कितपत ग्राह्य धरावा ?

- बायोमेट्रिक पुरेसे नाही. तो शासकीय निर्णय आहे. विद्यार्थ्यांचा फीडबॅक आणि लर्निंग आउटकम हवा.

प्रश्न - ज्या शिक्षकांची कामगिरी (Performance) सलग काही वर्षे सुमार आहे, त्यांना व्यवस्थेतून बाहेर काढण्याची किंवा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची तरतूद आपल्या शिक्षण व्यवस्थेत असावी का?

- असावी की नसावी यापेक्षादेखील शिक्षकाची नैतिक जबाबदारी आहे की, मी तयारी करून शिकवले पाहिजे. विद्यार्थ्यांना समजेपर्यंत तो विषय सातत्याने शिकवला पाहिजे. विद्यार्थ्यांवर सर्व काही सोडून देणे हे शिक्षकाचे नैतिक अधःपतन असते.

प्रश्न - प्रशासनाने शिक्षकांच्या गुणवत्तेबाबत कठोर भूमिका घेतल्यास संघर्ष अटळ ठरतो का?

- याबाबत मी प्रथम शिक्षक, कर्मचारी यांना विश्वासात घेतले. त्यामुळे संघर्ष कमी झाला.

प्रश्न - शिक्षक संघटना या गुणवत्तेच्या रक्षक आहेत की प्रशासकीय अडथळा ?

- संघटनांनी शिक्षकांच्या हक्कासाठी लढणे योग्यच आहे. पण गुणवत्ता आणि शिस्तीचा प्रश्न येतो तेव्हा संघटनांनी प्रशासनाच्या मागे उभे राहायला हवे. दुर्दैवाने, अनेकदा संघटनांचा वापर चुकीच्या गोष्टींचे समर्थन करण्यासाठी किंवा कुलगुरूंवर दबाव आणण्यासाठी केला जातो. सिनेटमध्ये किंवा इतर व्यासपीठांवर राजकारण शिरते, तेव्हा शैक्षणिक गुणवत्तेचा बळी जातो.

प्रश्न - उच्च शिक्षणातील शिक्षकांचा मोठा समूह मध्यमवर्गीय मानसिकतेतून येतो, तर विद्यार्थी वंचित वर्गातील आहेत. ही सांस्कृतिक दरी (Cultural Gap) कशी सांधता येईल ?

- ही दरी सांधणे हीच खरी शिक्षक गुणवत्ता आहे. केवळ विषयाचे ज्ञान असून चालत नाही, तर विद्यार्थ्याची पार्श्वभूमी समजून घेण्याची संवेदनशीलता शिक्षकात हवी. विशेषतः मराठवाड्यात, जिथे ग्रामीण भागातून विद्यार्थी येतात, तिथे शिक्षकाने केवळ शिक्षक न राहता त्यांचा 'पालक' आणि 'मार्गदर्शक' होणे गरजेचे आहे. भाषिक अभिजातपणा (Elitism) सोडून विद्यार्थ्यांच्या भाषेत संवाद साधणे आवश्यक आहे.

प्रश्न - सध्याचे शिक्षकांचेप्रशिक्षण (Orientation /Refresher) हे केवळ 'प्रमाणपत्रा'साठी उरले आहे का? प्रशिक्षणाचे मॉडेल बदलण्याची गरज आहे का?

- सध्याची प्रशिक्षण पद्धत खूपच जुनी झाली आहे. अनेक शिक्षक केवळ ऑनलाइन लॉगिन करून ठेवतात. हे थांबले पाहिजे. प्रशिक्षणात आता 'हँड्स-ऑन ट्रेनिंग' आणि 'डिजिटल टूल्स'चा वापर वाढवला पाहिजे. प्रशिक्षण हे केवळ थिअरीमध्ये न राहता ते प्रत्यक्ष वर्गात कसे राबवायचे, याचे डेमो तिथे व्हायला हवेत.

प्रश्न - ए.आय. (AI) आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स शिक्षकांना पर्याय ठरतील का? की शिक्षकांनी स्वतःला 'डिजिटल मेंटॉर' म्हणून विकसित करावे ?

- तंत्रज्ञान कधीही शिक्षकाची जागा घेऊ शकत नाही, पण जे शिक्षक तंत्रज्ञान वापरत नाहीत, त्यांची जागा तंत्रज्ञान वापरणारे शिक्षक नक्कीच घेतील. ए.आय. हे एक साधन आहे. शिक्षकांनी स्वतःला 'डिजिटल मेंटॉर' म्हणून घडवले पाहिजे. गुगल माहिती देईल, पण ती कशी वापरायची आणि तिचे ज्ञानात रूपांतर कसे करायचे, हे फक्त शिक्षकच सांगू शकतो.

प्रश्न - संशोधनाचा दर्जा घसरला आहे. 'वाङ्गय चौर्य' (Plagiarism) आणि सशुल्क शोधनिबंध (Paid Journals) यावर विद्यापीठ काय कारवाई करत आहे ?

- आम्ही 'उरकुंड' सारखी सॉफ्टवेअर्स वापरून प्लेगरिझम तपासत आहोत. पेड जर्नल्समधील पेपर्स आता आम्ही गुणदानासाठी ग्राह्य धरत नाही. पण कायद्याच्या काही मर्यादा आहेत. नियमांच्या चौकटीत राहून आम्ही अशा गोष्टींना आळा घालण्याचा प्रयत्न करत आहोत. शिक्षकांनी स्वतःची नैतिकता जपली, तरच संशोधनाचा दर्जा सुधारेल.

प्रश्न - इंडस्ट्री कनेक्ट असणाऱ्या शिक्षकांची कमतरता का आहे? 'प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस' ही संकल्पना आपल्या विद्यापीठात कितपत यशस्वी होईल ?

- आपल्याकडे शिक्षकांनी स्वतःला केवळ अकॅडमिक्समध्ये अडकवून घेतले आहे. पण 'NEP' मुळे 'प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस' ही संकल्पना येत आहे. ज्यांनी इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे, असे लोक आता विद्यापीठात येऊन शिकवतील. यामुळे विद्यार्थ्यांना अनुभवाचे शिक्षण मिळेल आणि पारंपरिक शिक्षकांनाही स्वतःमध्ये बदल करावा लागेल.

प्रश्न - राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) शिक्षक गुणवत्तेला खरोखरच संजीवनी देईल की ते केवळ कागदी घोडे ठरेल ?

-  'NEP' हे खूप चांगले धोरण आहे. यात 'ऑन जॉब ट्रेनिंग' (OJT) आणि 'मल्टिडिसिप्लिनरी' दृष्टीकोन आहे. हे धोरण यशस्वी करायचे असेल तर 'शिक्षकांची मानसिकता' बदलणे ही पूर्वअट आहे. शिक्षकांनी मनापासून हे धोरण स्वीकारले, तर उच्च शिक्षणाचा चेहरामोहरा बदलेल.

प्रश्न - शिक्षकांच्या उत्तरदायित्वाचे (Accountability) सामाजिक निकष काय असावेत ? केवळ निकाल लावणे पुरेसे आहे का?

- परीक्षेचे निकाल लावणे हे प्राथमिक काम आहे. उत्तरदायित्व म्हणजे तुमच्या हाताखालून निघालेला विद्यार्थी समाजात कसा वागतो? तो रोजगारक्षम आहे का? शिक्षकाने स्वतःला विचारले पाहिजे, 'माझ्या शिकवण्यामुळे किती विद्यार्थ्यांच्या आयुष्यात बदल झाला?'

प्रश्न - आजचा विद्यार्थी शिक्षकांचा पुरेसा आदर करत नाही. हा दोष विद्यार्थ्यांचा आहे की शिक्षकांचा.

- आदर हा मागून मिळत नाही, तो मिळवावा लागतो. आपल्या विषयावर हुकूमत असेल आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन शिक्षक प्रभावीपणे शिकवत असेल, तर विद्यार्थी त्यांचा आदर करतात. शिक्षक केवळ पगार आणि सुट्ट्यांचा विचार करतात, तेव्हा आदर कमी होतो.

प्रश्न - पुढील दहा वर्षांत कोणत्या प्रकारच्या शिक्षकांची गरज असेल ?

- शिक्षकांची! जे संशोधन करतील, अध्यापन करतील आणि विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवतील...

 

संवादक : सुनील पाटील

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके