Diwali_4 जैतापूर प्रकल्प : खरंच गरज आहे का?
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

कोकणामध्ये येऊ घातलेल्या वरील प्रकल्पाबाबत गेले कित्येक महिने सर्वच माध्यमांधून छापून येत आहे. पण त्यातून एकाच बाजूची माहिती लोकांसमोर येत आहे. विजेची समस्या, रोजगार हमी योजनेअंतर्गत जर असे प्रकल्प कोकणात येत असतील तर कोकणची दैन्यावस्था व्हायला वेळ लागणार नाही. हा प्रकल्प हानिकारक कसा ठरू शकतो, हे दर्शवणारे काही मुद्दे खालीलप्रमाणे...

1. हे क्षेत्र भूकंपप्रमाणता क्षेत्र 4 व 5 (अति भूकंप प्रमाणता)मध्ये येत आहे. शासनातर्फे हे क्षेत्र 1/2 असे चुकीचेच सांगितले जात आहे. या भागात आधीही भूकंपाचे धक्के बसले आहेत, शिवाय समुद्र जवळ असल्याने त्सुनामीचाही धोका आहेच.

2. अणुशक्तीपासून वीज ही दीर्घ व गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यास अणुइंधन चक्र म्हणतात. यातील प्रत्येक टप्प्यावर कोळसा, तेल, वायू ही खनिजे मोठ्या प्रमाणावर जाळली जातात. यात पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या कार्बन-डाय ऑक्साईड या वायूचे उत्सर्जन होत असते. शिवाय आजही अणुऊर्जा फक्त 4120 मेगावॅट इतका म्हणजे देशातील वीज उत्पादनांच्या 3 टक्के पेक्षा कमी वाटा उचलते. त्याच वेळी नूतनीकरणक्षम, अपारंपरिक, अकार्बनी ऊर्जास्रोताचे योगदान 13,242 मेगावॅट एवढे आहे. गोपनीयतेखाली हा सुरक्षिततेचा आभास तयार केला जात आहे.

3. जैतापूर येथे 6 अणुभट्‌ट्या उभारण्याचे ठरत आहे. येथील प्रत्येक अणुभट्टी 1650 मेगावॅट इतक्या क्षमतेची आहे. समजा चर्नेबिल अणुभट्टी सारखी दुर्घटना जैतापुरात घडली तर त्याचे घातक दुष्परिणाम कर्नाटकापर्यंत जाणवू शकतात. (चर्नेबिलची क्षमता 1200 मेगावॅट एवढी होती.) जैतापूरला अणुभट्‌ट्या पुरवणाऱ्या ‘अरेवा’ या फ्रेंच कंपनीची याच प्रकारची फिनलँडला पुरवलेली अणुभट्टी ‘अल्किलुओटो-3’ ही आहे. ‘युरोपियन प्रेशराइज्ड रिॲक्टर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भट्टीबाबत सुरक्षित, विश्वसनीय, स्वस्त व जलद बांधणीचा दावा केला जातो. परंतु फिनलँडसाठी हे एक दु:स्वप्न ठरले आहे. अणुकचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा खर्च, फक्त दुर्घटनेचा विमा व छुपे खर्च तर अणुवीज खूप महाग पर्याय ठरू शकतो.

4. या भट्‌ट्यांमध्ये निर्माण झालेली उष्णता कमी करण्यासाठी लागणारे पाणी हे समुद्राकडून घेतले जाते व नंतर हेच पाणी पुन्हा समुद्रात सोडले जाते. यामध्ये समुद्रातील जीवसृष्टीच नष्ट होण्याची भीती आहे. ‘मासेारी’ हा व्यवसायच नष्ट होण्याची भीती आहे.

5. ज्या जमिनीवर हा प्रकल्प आकार घेणार आहे, ती जमीन ‘सुपीक’ आहे हे लक्षात घ्या. फेब्रुवारी 1975 मध्ये प.जर्मनीतील व्हाईल या द्राक्ष उत्पादकांच्या छोट्या गावाने तेथे येऊ घातलेल्या 1350 मेगावॅट क्षमतेच्या अणुकेंद्राविरुद्ध 90,000 स्वाक्षऱ्यांसह विरोधाचा अर्ज सरकारकडे सादर केला. या आंदोलनामुळे युरोप व अमेरिकेत अणुऊर्जा हा राष्ट्रीय वादाचा विषय झाला. अणूच्या धोक्याला रोखणारी वाटचाल चालू झाली. इथे एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते की, हा विरोधासाठी विरोध आहे असे कोणी समजू नये, पण ते हानिकारक ठरू नयेत ही अपेक्षा!  

Tags: अणुउर्जा केंद्र कोकण जैतापूर प्रकल्प निरुता भाटवडेकर nuclear energy centre kokan jaitapur project niruta bahtvadekar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात