'बॅरिस्टर' रंगभूमीवर आलं तेव्हा केशवपनासारख्या जीर्ण परंपरांचं केव्हाच उच्चाटन झालं होतं. पण, एक-दोन बुरसटलेल्या परंपरा नष्ट होऊन भागत नाही. भारतीय समाजाकडे बुरसटलेल्या प्रथांचा बेसुमार साठा आहे. त्याचं काय करणार हा खरा प्रश्न आहे. नि हाच दळवींचा मुख्य मुद्दा आहे. आधी स्वातंत्र्य नि नंतर सामाजिक सुधारणा असं मानणाऱ्यांना भारतीय समाजाच्या आतड्यात एक झुरळीय चिवटपणा दडून बसलाय हे लक्षात आलं नाही. दळवी हे बेसिकली आगरकर परंपरेतले. समाजात काहीतरी चांगलं घडलं पाहिजे ही ओढ त्यांना कायमची लागलेली होती. ते मूळचे राष्ट्र सेवा दलवाले. 1942 च्या लढ्यात ओढले गेले. जयप्रकाशजी, डॉ. लोहिया, एसेम, नाथ पै यांच्या प्रभावात लहानाचे मोठे झाले.
वर्ष : 1974.
दळवीकाकांचं नाटक स्टेजवर येऊ घातलं होतं. माझ्या आईला छोटीशी भूमिका मिळाली. 'सभ्य गृहस्थ हो'च्या तालमी सुरू झाल्या. दिग्दर्शक होते दामूकाका (केंकरे). स्वतः दामूकाका, रमाकांत देशपांडे (पु.लं.चे भाऊ), अविनाश मसुरेकर, मंदाकिनी भडभडे (रीमा लागूंची आई), लता जूकर, विठ्ठल पणदूरकर, अजय वढावकर, वचना अशी छान टीम होती.
हे जयवंत दळवींचं दुसरं नाटक. पहिल्या नाटकावर ते सादर होण्यापूर्वीच पडदा पडला. त्याची मजेशीर गोष्ट दळवींनी 'आत्मचरित्राऐवजी' या पुस्तकात सांगितलीय.
मी न चुकता 'सभ्य'च्या तालमीला जायचो. एक कोपरा धरून बसायचो. काय काय नि कसं कसं घडतंय ते पाहायचं. नाटकाच्या प्रयोगापेक्षा ते कसं बांधलं गेलं हे पाहण्यात मजा असते. त्या काळात बऱ्याच नाटकांच्या तालमी पाहायला मिळाल्या. 'अखेरचा सवाल', 'अजब न्याय वर्तुळाचा', 'संगीत स्वयंवर', 'लहानपण देगा देवा', 'आपलं बुवा असं आहे', इ.
अधूनमधून दळवी तालमीला यायचे. गोबरे नि गुबगुबीत, गोरेपान, घारे डोळे, तीक्ष्ण नजर. एक शब्द बोलत नसत. आपण निर्मिलेली पात्रं पाहताना त्यांना काय वाटत असेल असा प्रश्न मला तेव्हा पडायचा. मी तो त्यांना विचारला; पण फार नंतर. त्यांच्या बोरीवलीच्या घरी येणं-जाणं सुरू झालं, तेव्हा.
दळवी माझ्या आईला बारीकसे ओळखायचे. फार मागे त्यांनी आईचं 'माझ्या कलेसाठी' (लेखक : मामा वरेरकर) पाहिलं होतं. एकदा तालीम संपल्यावर आईनं दळवींना माझ्याविषयी सांगितलं. दळवींनी माझी जुजबी माहिती विचारली. बी.ए. ला इंग्रजी आणि मानसशास्त्र असे दोन विषय घेतलेत हे कळल्यावर त्यांनी 'अभ्यासक्रमाला पुस्तकं कोणती आहेत?' असं विचारलं.
शेक्सपिअरचं 'ऑथेल्लो' आणि 'किंग लियर' आहे म्हटल्यावर ते हसले. नि म्हणाले, "किंग लियर'मध्ये जास्त फोर्स आहे; वृद्धापकाळ कंठणाऱ्या जोडप्यावर मी एक नाटक लिहिलंय. तेही लवकरच रंगभूमीवर येणारेय." ते दुसरं नाटक म्हणजे 'संध्याछाया'.
'सभ्य गृहस्थ हो' आधी झळकलं. महिन्याभरात 'संध्याछाया' आलं. 'सभ्य'चा एक अख्खा प्रयोग दळवींनी विंगेत उभ्या उभ्या पाहिला ते लख्ख आठवतंय. मध्ये मध्ये हसत होते. अगदी सौम्य. त्यांची नजर पात्रांच्या हालचालींवर खिळलेली. प्रयोग छानच व्हायचा. परंतु, 'सभ्य'ला फार यश नाही मिळालं. आंबटशोकी चाळ रहिवाशी, एक मादक चटकचांदणी आणि दळवींचा खुसखुशीत विनोद असा खास सण्डे चिकन मसाला असूनही 'सभ्य'चे फार प्रयोग झाले नाहीत. 'संध्याछाया' मात्र खूप चाललं.
वर्ष-दोन वर्षांत 'बॅरिस्टर' आलं आणि मराठी रंगभूमीला एक समर्थ नाटककार मिळाला. शिरवाडकर, पु. ल., कानेटकर, तेंडुलकर यांच्या तोडीचा. दळवी आणि महेश एलकुंचवार 1980 च्या दशकात झपाट्यानं पुढे आले. समाजाचा घास घेणाऱ्या मूल्यपडझडीचा दोघांना बऱ्यापैकी अंदाज आला होता हे 'संध्याछाया' आणि 'वाडा चिरेबंदी' वाचल्यावर लक्षात येतं. एका अर्थी दोघे द्रष्टे नाटककार.
दळवींनी नाटकं लिहिली. त्यांच्या पुस्तकांवर सिनेमे झाले; परंतु ते ग्लॅमरजर्जर जगात अजिबात रमले नाहीत. ते पक्के कोकणी राहिले. करकरीत, तिरकस नि मायाळू.
कथाकार, कादंबरीकार म्हणून दळवींचं नाव होतं. पुन्हा 'ठणठणपाळ'मुळे स्वतंत्र ओळख होतीच : अक्राळविक्राळ, मिशाळ पैलवान. अंगात नुसता लंगोट नि हातात हातोडा हे 'ठणठणपाळ'चं बोधचिन्ह (वसंत सरवटेंचं मास्टरपीस) त्या काळी खूप गाजलं. 'ठणठणपाळ' मध्ये आपल्यावर चार ओळी छापून याव्यात म्हणून मराठी लेखक अधीर असायचे. दळवींची फटकेबाजी मस्त होती, कारण त्यांचा विनोद निर्विष होता.
तर 'बॅरिस्टर 'बद्दल सांगत होतो.
'अंधाराच्या पारंब्या' या दळवींच्या कादंबरीच्या आधारानं 'बॅरिस्टर' उभं आहे. परवा 'अंधाराच्या पारंब्या' पुन्हा वाचलं. कादंबरी भारी आहे. लहानथोर अशा सगळ्या व्यक्तिरेखांची एक उत्तम सिम्फनी. केशवपन हे कादंबरीचं मुख्य सूत्र. स्त्रीच्या मनाचा भुगा करणाऱ्या निघृण परंपरेची काळीकुट्ट सावली कादंबरीवर फिरतेय. पण, दळवी कुठंही प्रचाराचा आक्रस्ताळी किंवा समाजसुधारणेचा बाळबोध सूर लावत नाहीत. त्यामुळे केशवपनाची दाहकता जास्त टोकदारपणे जाणवते.
दुसरं असं की, 'अंधाराच्या पारंब्या'ला दळवींनी एकोणिसाव्या शतकाचा व्यापक सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ दिलाय. त्यामुळे कादंबरी मोठ्या कॅनव्हासवर घडते.
ब्रिटिशांच्या वसाहतवादी राजकारणामुळे भारताचं अतोनात नुकसान झालं हे खरंच; परंतु दुसरीकडे दळणवळणाची साधनं, छपाईकला, शिक्षण, प्रशासन वगैरे सुधारणाही घडत होत्या हेही खरं.
आधुनिकतेचा परामर्ष घेताना थोर व्यासंगी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी 'वैदिक संस्कृतीचा विकास' या ग्रंथात म्हणतात :
'आधुनिक विद्या आणि कला यांच्यावर उभारलेल्या पाश्चात्त्य संस्कृतीची मूल्ये आणि भारतीयांच्या परंपरागत संस्कृतींची मूल्ये यांची मौलिक संघटनाच अत्यंत भिन्न आहे. पाश्चात्त्य संस्कृती आणि भारतीय संस्कृती या मानसिकदृष्ट्या जणू काय आकाशस्थ भिन्न ताऱ्यांवर वसणाऱ्या संस्कृतींप्रमाणे एकमेकींपासून दूर होत्या. पाश्चात्त्य संस्कृतीच्या संसर्गाने व संघर्षाने भारतीयांच्या मानसिक संस्कृतिमूल्यात परिवर्तन घडले. आधुनिक विद्या, कला व पाश्चात्त्य वाङ्मय, यांच्या शिक्षणाचा लाभ काही हिंदी लोकांना झाल्यामुळे एकदम विद्युतसंचार होऊन यंत्र थरारावे त्याप्रमाणे येथील लोकांची मने या नवविचारांनी थरारू लागली.'
आधुनिक विचारांनी थरारलेला बॅरिस्टर विरुद्ध जुन्यापुराण्या विचारांची मावशी, असा थेट सामना दळवींनी रंगवला असता तर ते सोप्पं, सोप्पं झालं असतं; परंतु कादंबरी फसली असती. केशवपन हा रिवाज अघोरी आहे हे बॅरिस्टरला ठाऊक आहे नि मावशीलासुद्धा आणि वाचकांना / प्रेक्षकांनासुद्धा. कादंबरी (किंवा 'बॅरिस्टर' नाटक) वाचून (किंवा पाहून) वाचकांना (किंवा प्रेक्षकांना) पात्रांविषयी करुणा वाटते नि ते अस्वस्थ होतात हे दळवींचं यश आहे.
'बॅरिस्टर' रंगभूमीवर आलं तेव्हा केशवपनासारख्या जीर्ण परंपरांचं केव्हाच उच्चाटन झालं होतं. पण, एक-दोन बुरसटलेल्या परंपरा नष्ट होऊन भागत नाही. भारतीय समाजाकडे बुरसटलेल्या प्रथांचा बेसुमार साठा आहे. त्याचं काय करणार हा खरा प्रश्न आहे. नि हाच दळवींचा मुख्य मुद्दा आहे. आधी स्वातंत्र्य नि नंतर सामाजिक सुधारणा असं मानणाऱ्यांना भारतीय समाजाच्या आतड्यात एक झुरळीय चिवटपणा दडून बसलाय हे लक्षात आलं नाही.
दळवी हे बेसिकली आगरकर परंपरेतले. समाजात काहीतरी चांगलं घडलं पाहिजे ही ओढ त्यांना कायमची लागलेली होती. ते मूळचे राष्ट्र सेवा दलवाले. 1942च्या लढ्यात ओढले गेले. जयप्रकाशजी, डॉ. लोहिया, एसेम, नाथ पै यांच्या प्रभावात लहानाचे मोठे झाले. 'साने गुरुजी हे त्या काळी आमचं दैवत होतं', असं दळवींनी 'बेचाळीसनंतर' या लेखात म्हटलंय.
राष्ट्र सेवा दलाचे दिवस निरागस नि भारलेले होते. पुढे सगळ्यांचाच भ्रमनिरास झाला. 'चलो सुहाना भरम तो टूटा जाना के इश्क क्या है' असा चमत्कारिक पेच काळ तयार करत असतोच. 'उत्साह नि भाबडेपणाचा पहिला भर ओसरल्यावर आपण 'सिनिकल' झालो', असं दळवींनी लेखात पुढे म्हटलंय; परंतु समाजाचं आपण काहीतरी देऊ लागतो हा समाजवादी चळवळीचा मूळ विचार विझला नाही. लेखन, रंगभूमी ह्या प्रभावी आयुधांचा मोठ्या कौशल्यानं उपयोग करून दळवींनी तो विचार सर्वदूर पोहोचवला.
एक आठवण सांगतो.
चंद्रशेखर यांनी 1981 मध्ये 'भारत-यात्रा' सुरू केली. मी कोल्हापूरला गेलो आणि यात्रेबरोबर मुंबईला आलो. मुंबईत यात्रेकरूंचा मुक्काम साने गुरुजी विद्यालयात होता. दुसऱ्या दिवशी चंद्रशेखर मुंबईत तीन-चार ठिकाणी सभा घेणार होते. मी सकाळी नऊला साने गुरुजी विद्यालयात पोहोचलो. दळवी एका कोपऱ्यात सगळा 'माहौल' निहाळत शांत उभे होते.
मी नमस्कार केला. दळवी हसले. नि म्हणाले, "या माणसात (चंद्रशेखर) थोडा दम दिसतोय. म्हणून आलो. चार पावलं चालणारेय." सिनिक माणूस असं म्हणत नसतो. दळवी त्या दिवशी बरंच चालले.
दळवी दादर सोडून बोरीवलीला राहायला गेल्याचे पु.लं.नी सांगितलं. "तू बोरीवलीचा ना? त्यांच्याकडे येत-जात रहा. ते दोघे एकटेच राहतात. गिरीश परदेशी असतो." माझ्याकडे दळवींचा पत्ता नव्हता. भाईकाका म्हणाले, "बोरीवलीच्या मासळी बाजारात तुला रविवारी सकाळी हमखास भेटतील."
तसंच झालं.
एकदा रविवारचा मासळी बाजारात गेलो. तर बाहेर दळवी उभे होते. म्हणाले, "व्वा! हे तुम्ही चांगलं काम करताय."
"चला आत जाऊ."
दळवी म्हणाले, "नाही. डॉक्टरांनी मटण मासळीवर बंदी लावलीय. इथं थोडा वेळ थांबतो, मच्छीचा वास नाकात भरून घेतो आणि घरी जाऊन वरण-भात खातो".
पंधराएक मिनिटांत मी बाहेर आलो. "काय घेतलंत?" दळवींनी विचारलं.
"सुरमई आणि तिसऱ्या."
"छान. सुरमई खरपूस तळा नि खा", असं म्हणून दळवी गर्दीतून वाट काढत रिक्शात बसले नि दिसेनासे झाले. माझ्या पिशवीतले मासे खिन्न झाले.
अधूनमधून दळवीकाकांकडे जाणं व्हायचं. माझं घर आणि रॉयल कॉम्प्लेक्स हे अंतर पाच-सहा मिनिटांचं. दळवी बैठकीच्या खोलीत खुर्चीत बसलेले असायचे. गुबगुबीत. उमाकाकी सैंपाकघरात कामं उरकत असायच्या. शांत लयीत.
दळवी फार कमी बोलायचे. खालच्या पट्टीत. आजूबाजूच्या घटनांविषयी विचारायचे. समजा, त्या आठवड्यात खुनाची मोठी केस झाली असेल किंवा आत्महत्या. तर तपशील विचारायचे. 'काय झालं नि कसं झालं?' मध्येच जादूगाराच्या पेटाऱ्यातून अचानक ससा बाहेर यावा तसा एक झगझगीत किस्सा. हा ऐका :
दळवींची पहिलीच परदेशवारी. बहुधा अमेरिका. विमान पंचवीस हजार फुटांवर छान तरंगत होतं. नि अचानक turbulence सुरू झाला. विमान हेलकावे खाऊ लागलं. खाली अवाढव्य समुद्र. प्रवाशांची पाचावर धारण बसली.
दळवी म्हणाले, "मी मनोमनी आमच्या वेतोबाचं स्मरण केलं; आमच्या गावाचा राखणदार. दुसऱ्या मिनिटाला विमानाच्या पंखावर वेतोबा उभा होता. भास म्हणा, काहीही म्हणा. मला तो खरा वाटला. कंबरेला आखूड धोतर, अंगावर घोंगडी, हातात काठी आणि पायात कुरकुरू वाजणाऱ्या वहाणा. 'जयवंता, काळजी करू नकोस, तुला साखसुरत घेऊन जातंय," असं म्हणाला. मी निश्चिंत झालो. हळूहळू विमान सुरळीत चालू लागलं".
दळवींचं कोकणप्रेम डोळस होतं. माझ्या जिल्ह्यापुढे महाराष्ट्र (किंवा भारत) म्हणजे पालापाचोळा असा वेडेपणा त्यांनी केला नाही. अमेरिकन सरकारच्या माहिती खात्यात मोठ्या पदावर तीस वर्षं काम केलं. अमेरिकन अधिकाऱ्यांचा विश्वास मिळवला.
दळवींना माणूस नावाच्या प्राण्यात इंटरेस्ट होता. हर प्रकारची, मापाची नि आकाराची माणसं. खोटी-खरी, सुष्ट-दुष्ट, दुर्दैवी नि देवाची लाडकी, शहाणी नि बेरकी. जग उफराटं नि अर्थहीन आहे; पण जगणं सुंदर असू शकतं असा कयास बांधून दळवी आयुष्याचं प्रमेय मांडत असावेत.
शिवाय, त्यांची निरीक्षणशक्ती जबरदस्त होती. नजर शोधक होती. चेहरा सौम्य. समोर बसलेल्या माणसाचं ते व्यवस्थित ऐकून घेत. त्यावर आपला अभिप्राय दिलाच पाहिजे असं नाही. काळाचा क्रम त्यांनी विनातक्रार स्वीकारला होता. 'नाव आहे चाललेली, कालही अन् आजही.'
मध्येच काहीतरी तिरकस बोलायचे, की समोरचा गारद.
एकदा रॉयल कॉम्प्लेक्सला गेलो तर दळवींचे एक खास मित्र बसले होते. दळवी मला 'बसा' म्हणाले. त्या मित्राशी ओळख करून दिली. गप्पांच्या ओघांत दळवी म्हणाले, "हल्ली मला जरा कमी ऐकू येतं रे".
मित्रानं एका नव्या श्रवणयंत्राची जोरदार शिफारस केली. 'कानाच्या मागच्या बाजूला एकदम फिट्ट बसतं. तार इतकी पातळ की कुणाला कळत नाही. आणि एकदम पॉवरफुल, जयवंता. समोरच्या बाल्कनीत बघ एक बाई कपडे वाळवत्येय. तिचं बोलणं तुला इथं ऐकू येईल'.
"ती सुंदर गुजराती बाई होय? अरे, ती नुसतं स्वतःशी पुटपुटली ना तरीही इथं बसल्या बसल्या मला सहज ऐकू येतं नि तेदेखील यंत्राविना," दळवी शांतपणे म्हणाले.
दळवी पंचाहत्तरचे झाले. अरुण आठल्यांनी मोठा सोहळा केला. पु.ल., मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष प्रभृती बोरीवलीला आले. दळवींची तब्येत नाजूक होती; पण वाचक नि रसिकांच्या प्रेमामुळे ते भारावून गेले. दहा-बारा लंगोटबंद मल्लांनी 'ठणठणपाळ'ला मानाचा मुजरा केला. गोखले महाविद्यालयाचं सभागार तुडुंब भरलेलं.
मी 'टाइम्स'मध्ये लेख लिहिला. घसघशीत सहा कॉलम, मोठा फोटो. लेख छापून आला नि मी सकाळी दळवींकडे गेलो. खूश होते.
म्हणाले, "अंबरीश, मराठी लेखकाच्या दोन इच्छा असतात. एक, 'मौजे'नं आपलं पुस्तक छापावं आणि 'टाइम्स ऑफ इण्डिया'त आपल्यावर चार ओळी छापून याव्यात. मी मनानं 'मौज' कुटुंबातला, पण श्री.पुं.नी माझं एकही पुस्तक छापलं नाही. माझी दुसरी इच्छा मात्र तुम्ही पूर्ण केली. मोठा लेख छापलाय आज तुम्ही".
आमचं बोलणं सुरू असताना दळवींना श्री.पुं.चा फोन आला. लेखाबद्दल त्यांनी दळवींचं अभिनंदन केलं. नंतर मी श्री.पुं.शी बोललो. ते म्हणाले, ""टाइम्स' पेपर मराठी लेखकांवर मोठा लेख छापतंय हे बरं आहे".
रॉयल कॉम्प्लेक्सवरून जाताना आजही नजर वर जाते. तीच बाल्कनी, तीच खिडकी नि तीच इमारत. पण, खुर्चीत बसलेला गुबगुबीत चेहऱ्याचा माणूस दिसत नाही. समोरच्या बाल्कनीत कपडे वाळत घालणारी सुंदर गुजराती बाई कदाचित म्हातारपणाच्या वठलेल्या झाडाखाली उभी असेल.
दळवी 1994 मध्ये गेले. पण, नजरेआड झाले नाहीयेत.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या