कर्मवीर शिंदे यांची विभागणी स्पष्ट आहे. ती केवळ वर्णावर आधारलेली नाही. केवळ जातीवर आधारलेली नाही. ती 'विद्याबळ, द्रव्यबळ आणि अधिकारबळ' यांवर आधारलेली आहे. मागासलेल्या जातींना यातील कोणतेच बळ नसते हे स्पष्टच आहे. परंतु मागासलेल्या म्हणून ज्यांना समजले जात नाही किंवा ज्यांना पुढारलेल्या जाती असे समजण्यात येते त्या जातींतही विद्याबळ नसलेले, द्रव्यबळ नसलेले आणि अधिकारबळ नसलेले असतात, आणि तेसुद्धा कर्मवीर शिंदे यांच्या 'बहुजन' या संकल्पनेत येतात हे महत्त्वाचे आहे.
जात हा घटक, सामाजिक मागासलेपणा हे एकत्रित येण्यासाठीचे समान वास्तव, पुढारलेल्यांना विरोध, राजकीय सत्तेत वाटा मिळविणे हे ध्येय, जातीची अस्मिता जागवून कार्यप्रवणता निर्माण करणे हा मार्ग इत्यादी आणि आनुषंगिक बाबींच्या आधारे राजकारण आपल्या देशात बराच काळ सुरू आहे. या राजकारणाला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळतो आहे. असे राजकारण करणाऱ्यांचे निवडणुकांमधील बळ मधूनमधून आणि कुठे कुठे वाढतानाही दिसते आहे. मागासलेल्या अनेक जातींनी एकत्र येऊन मुख्यतः भावनेच्या आधारे निवडणुका लढवणे आणि काही काळानंतर पुन्हा जातीच्याच आधारे त्यांची फाटाफूट होऊन या राजकारणाचे तुकडे पडणे, हा क्रमही सुरू आहे. पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न आणि पुन्हा तुकडे पडणे सुरू आहे. एकत्र येण्यासाठी जात जाणीवे आधारे ज्या अस्मितेला आवाहन करण्यात येते त्याच जात-जाणीवे आधारे तुकडे पडताना दिसतात. एकत्र येण्यासाठीचा घटक जसा जात तसा फाटाफुटीसाठीसुद्धा जात किंवा पोटजात हाच घटक निर्णायक ठरतो. महाराष्ट्रातील रिपब्लिकन पक्षाचे तुकडे पडण्यालासुद्धा महार या जातीतील पोटजातींचा आधार सांगितला जातो. विदर्भातील भंडारा लोकसभा मतदारसंघात डॉ.आंबेडकरांचा पराभव व्हायला त्यांची व मतदारांची वेगळी पोटजात हे एक कारण सांगितले जाते.
इतिहास
कोणतीही संकल्पना नीट समजावून घेऊन काही रास्त निष्कर्ष काढावयाचे असतील तर त्या संकल्पनेचा इतिहास समजावून घेतला पाहिजे. होत आलेले बदल लक्षात घेतले पाहिजेत. या बदलाची कारणे समजावून घेतली पाहिजेत.या कारणांपैकी परिस्थितीजन्य कारणे अलग केली पाहिजेत; व्यक्तिनिष्ठ कारणे अलग केली पाहिजेत. इष्ट अनिष्ट समजावून घेतले पाहिजे आणि पुढील वाटचालीचे सूचन केले पाहिजे. या पद्धतीने जाऊ पाहता बहुजनवादाच्या संकल्पनेच्या रास्त समजासाठी किमान म.फुल्यांपर्यंत मागे गेले पाहिजे. बहुजनात कुणाकुणाचा समावेश, कुणाकुणाला विरोध, अशा व्याप्ती व विरोध एवढ्याच बाजूने पाहिले तरी काही उलगडा होतो. शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया ही म.फुल्यांची व्याप्ती दिसते. 'शेटजी आणि भटजी' यांना विरोध दिसतो. म. फुल्यांनी ज्यांना एकत्र करावयाचे, त्यांच्याच भाषेत बोलायचे व लिहायचे असे केले असल्याने त्यांच्या भाषेचा अर्थ तशाच रीतीने लावला पाहिजे. अलीकडील भाषेतील समान अर्थी शब्द योजून तुलना केली पाहिजे. लोकराजा शाहू छत्रपती यांची व्याप्तीची संकल्पना त्यांच्या 1902च्या संस्थानच्या नोकरीत मागास जातीसाठी 50% राखीव जागांच्या हुकूमात दिसते. या हुकूमात त्यांनी 'ब्राह्मण, परभू, शेणवी' सोडून असलेले सर्व मागासलेले अशी व्याख्या केली आहे. म.फुल्यांचे अनुयायित्व सांगणाऱ्यांनी महाराष्ट्रात 'ब्राह्मणेतर' पक्ष काढला आणि 'ब्राह्मणेतरांना' संघटित करण्याचा प्रयत्न केला. यात शाहू महाराजांचे पुढारीपण होते. ब्राह्मण जातीला विरोध आणि इतर सर्व जातींची एकजूट अशी ती रचना होती. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांचा 'ब्राह्मण ब्राह्मणेतर' अशा विभागणीला विरोध होता. त्यांची संकल्पना थोड्याशा विस्ताराने पाहायला हवी.
डॉ.आंबेडकरांनी वेगवेगळ्या हेतूने वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे राजकीय पक्ष स्थापन केले होते. या पक्षांच्या नावावरूनच व्याप्ती व विरोध या बाबी स्पष्ट होतात. 'स्वतंत्र मजूर पक्ष', 'शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन' आणि 'रिपब्लिकन पक्ष' अशी ती नावे आहेत. 1938 साली मनमाड येथे जी.आय.पी. रेल्वे कामगारांच्या सभेत भाषण करताना ते म्हणाले होते. 'ब्राह्मण्यशाही' व 'भांडवलशाही' हे आपले दोन शत्रू आहेत. म. फुले यांनी योजलेले 'भटजी' व 'शेटजी' या शब्दांची येथे आठवण व्हावी. डॉ. आंबेडकरांनी 'ब्राह्मण' असा शब्द न वापरता 'ब्राह्मण्य' असा शब्द वापरला. म.फुले यांच्या 'शेटजी' या शब्दाने 'शेटगिरी' (सावकारी) करणे हा व्यवसाय सूचित होतो आणि 'भटजी' (ब्राह्मण नव्हे) या शब्दाने 'पौरोहित्य' हा व्यवसाय सूचित होतो. दलित पँथरच्या पहिल्या जाहीरनाम्यात डॉ.आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाच्या संकल्पनेचे आणि 1938 च्या भाषणातील 'ब्राह्मण्यशाही' आणि 'भांडवलशाही' या संकल्पनांचे अधिक स्पष्ट व अधिक पुढे नेणारे स्पष्टीकरण जाणवते. कांशीराम-मायावती यांची व्याप्ती व विरोध त्यांचा बहुजन पक्ष या राजकीय पक्षाच्या अगोदरच्या संघटनेतील एका घोषणेवरून स्पष्ट होतो.
'बामन बनिया-ठाकूर चोर, बाकी सब डी.एस.फोर'. डी.एस.फोर म्हणजे दलित-शोषित समाज संघर्ष समिती डी.एस.एस.एस.एस. म्हणजेच डी.एस.फोर. या नावात 'शोषित' अशी शब्दयोजना आहे. परंतु त्यांच्या घोषणेचा अर्थ सरळ आहे. बामन-बनिया ठाकूर या जातीत शोषित नाहीत आणि असलेच तर त्यांच्या शोषणाशी आम्हांला काही कर्तव्य नाही, असा तो अर्थ आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या वर्णातल्या सर्व जातीतील सर्वजण शोषक आहेत. त्यात कुणी शोषित नाहीत. असेलच तर त्यांच्याशी आम्हांला काही कर्तव्य नाही, अशी ही भूमिका आहे. बी.सी., ओ.बी.सी. यांची जूट आणि उरलेल्यांना विरोध अशा व्यूहरचनेतून कार्य केल्यानंतर 14 एप्रिल 1984 रोजी कांशीराम यांनी 'बहुजन समाज पक्ष' या राजकीय पक्षाची स्थापना केली. भारतीय राजकारणात विशेषतः आणि मुख्यतः निवडणूक राजकारणातब.स.प. हा एक बहुचर्चित आणि दखलपात्र राजकीय पक्ष आहे. 'बहुजन' शब्द योजून व्याप्ती वाढविण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसतो. काँग्रेस पक्ष, समाजवादी आणि कम्युनिस्ट हे व इतर पक्षही दलितांचे व शोषितांचे राजकारण सांगत आले आहेत. त्यांचे प्रश्न मांडीत आले आहेत. त्यांसाठी भांडत आले आहेत. परंतु तो अलग प्रश्न आहे. हे पक्ष 'जात' हा समान घटक धरून आणि केवळ मागास जातींचे प्रश्न मांडण्याचे राजकारण करीत आलेले नाहीत. म्हणून त्यांच्या यासंबंधीच्या संकल्पना या ठिकाणी विचारात घेण्याचे कारण नाही.
कर्मवीर शिंदे यांची संकल्पना
1 सप्टेंबर 1920 रोजी कर्मवीर शिंदे यांनी 'बहुजन समाज पक्ष' या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्या जाहीरनाम्यात त्यांनी मुद्देसूदपणे, रेखीवपणे या पक्षांची व्याप्ती, कार्यपद्धती, हितसंबंध, उद्देश या बाबी स्पष्ट केल्या आहेत. या पक्षाच्या स्थापनेची पार्श्वभूमी थोडक्यात समजावून घेतली पाहिजे. मर्यादित मतदारांनी मर्यादित अधिकार असलेल्या प्रांतिक कायदे मंडळाच्या निवडणुका घेण्याची चर्चा व कार्यक्रम सुरू होता. या निवडणुकांत सर्वसाधारण आणि राखीव जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. या राखीव जागांत 'मराठा व तत्सम जाती' असा एक गट करण्यात आला होता. त्यासाठी मुंबई इलाख्यात 7 जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. इतरही राखीव जागा होत्या. नोव्हेंबर 1920 मध्ये निवडणुका होणार असे जाहीर झाल्यानंतर पुणे येथे 'जेधे मॅन्शन 'मध्ये मराठा समाजातील विविध गटांची व नेत्यांची सभा भरली. या सभेत 'मी राखीव जागेवर उभा राहणार नाही. त्यातील जातिवाचकत्वाच्या मी विरुद्ध आहे' असे विठ्ठल रामजी शिंदे यांनी ठामपणे सांगितले आणि मराठा जातीसाठी राखीव असलेल्या जागेवर उभे राहण्यास नकार दिला. तेव्हाची एक मजेशीर विचारमांडणी उद्बोधक आहे. कर्मवीर शिंदे जन्माने 'मराठा' होते. मराठा समाज राष्ट्रीय प्रवाहापासून अलग राहू नये म्हणून त्यांनी राष्ट्रीय मराठा संघ स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता. परंतु त्यांनी 'मराठा' जातीसाठी राखीव असलेल्या जागेवर निवडणूक लढविण्यास विरोध केला. दुसरीकडे श्री.नरसिंहराव चिंतामण केळकर हे जन्माने ब्राह्मण होते. तेव्हा ते 'मराठा' या नावाच्या नियतकालिकाचे संपादक होते. ते म्हणाले, मी मराठा आहे. कारण मी 'मराठा' वर्तमानपत्र चालवितो. म्हणून मला निवडून द्या. निवडून यावे म्हणून काय काय तर्क सांगितले जातात, याचा हा अस्सल पुणेरी नमुना.
या संदर्भातील राजर्षी शाहूंनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया खास कोल्हापुरी आहे. त्यांनी कर्मवीर शिंदे यांना पत्र पाठविले होते. त्यात ते म्हणतात, 'नरसिंह चिंतामण केळकर म्हणतात मी मराठा आहे; म्हणून मला निवडून द्यावे. कारण मी 'मराठा' वर्तमानपत्र चालवतो. त्यावर मी (राजर्षी शाहू) म्हणतो की, माझ्या बैलाचे नाव (ब्रिटानिया) ठेवले, माझ्या आवडत्या घोड्याचे नाव 'टर्किश फ्लॅग'ठेवले; माझ्या गायीचे नाव जपानिका ठेवले म्हणून की मी जपानी अगर टर्की लोकांचा पुढारी होणे योग्य होईल? वि.रा.शिंदे मराठे वर्गापैकी आहेत.' इत्यादी असो. कर्मवीर शिंदे राखीव जागेवर उभे राहिले नाहीत. शाहू महाराजांची इच्छा आग्रह असताना उभे राहिले नाहीत. सर्वसाधारण जागेवर उभे राहिले आणि पराभूत झाले.राजर्षी शाहू यांनी दुसरे उमेदवार गुप्ते यांना पाठिंबा देऊन निवडून आणले. कर्मवीर शिंदे यांच्या या महत्त्वाच्या कृतीमधून त्यांची 'बहुजनांची' संकल्पना स्पष्ट होते. अर्थात त्यांनी काळजीपूर्वक बहुजन पक्षाचा जाहीरनामा लिहिलेला आहे. त्यामुळे तर्क करण्याची गरज नाही. संदिग्धता उरत नाही. व निवडणुकांच्या या पार्श्वभूमीवर कर्मवीर शिंदे यांनी बहुजन पक्ष स्थापन केला. या जाहीरनाम्यातच त्यांनी नमूद केले आहे की, 'राजकारण हे व्यवहारशास्त्र आहे.' बहुजन पक्ष हा पक्ष त्यांनी नंतर पुढे चालविला असे दिसत नाही. नंतर ते काँग्रेस पक्षातच होते.
व्याप्ती आणि विरोध यांचा विचार करताना या जाहीरनाम्यात 'हितसंबंधांची' मांडणी आहे. जाती-पोटजातींवर आजवर उभारलेले पक्ष आणि संघटना मुख्यतः भावनेच्या आधारे व्यवहार करतात. हितसंबंधांच्या आधारे व्यवहार करताना दिसत नाहीत. या पक्षांनी एकत्रित केलेल्या 'जाती 'मध्ये वेगवेगळे 'हितसंबंध' असतात.तरी ते जात म्हणून एकत्र येतात. या जातीबाहेरच्या जातींतसुद्धा त्यांच्याशी समान हितसंबंधांचे विभाग असतात. परंतु जातीबाहेरील या समान हितसंबंधांच्या विभागांना एकत्रित करण्याची त्यांची दिशा नसते; आपल्या एका किंवा अनेक जातींबाहेरसुद्धा मागासलेले असतात; परंतु आपल्या जातीतील मागासलेले आणि आपल्या जातीबाहेरचे मागासलेले यांना एकत्र करण्याकडे ते दुर्लक्ष करतात. म्हणून कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांची हितसंबंधांची मांडणी आणि त्या समान हितसंबंधांच्या विभागांना एकत्र करण्याची कल्पना आणि व्यवहार नीट लक्षात घेतला पाहिजे. 1 सप्टेंबर 1920च्या बहुजन पक्षाच्या जाहीरनाम्यात ते लिहितात, "कारण ह्या पक्षाच्या (बहुजन पक्षाच्या) पायाखाली केवळ पोकळ मनोभावना नसून भरीव हितसंबंध आहेत. त्यांची राखण आणि पुरस्कार करण्याचे निस्पृह काम या पक्षाला आपल्याच पायावर उभे राहून व आपल्याच हातांनी करावयाचे आहे. आमचे सरकारी ब्राह्मण असोत, ब्राह्मणेतर असोत, मवाळ असोत, जहाल असोत, किंवा स्वकीय असोत की परकीय असोत, त्यांनी कोणतीही नावे, रूपे किंवा मते स्वीकारलेली असोत; फारतर काय, त्यांचा पूर्वेतिहास कसाही असो, जोपर्यंत आपल्या हितसंबंधांचा पुरस्कार प्रामाणिकपणे आणि जोराने त्यांच्या हातून होईल अशी आमची खातरजमा कायम राहील, तोपर्यंत आम्ही त्यांच्याशी व तेवढ्यापुरते सहकार्य करावयास मोकळे राहू.
एरवी त्यांना आमचा रामराम." हा पक्ष ज्यांना संघटित करू पाहतो त्यांची व्याप्ती त्यांनी स्पष्टपणे नमूद केली आहे. ते लिहितात, "हिंदुस्थानातील एकंदर लोकसंख्येचे केवळ राजकीयदृष्ट्या दोन मुख्य व स्पष्ट भाग पडत आहेत. ते हे की, एक विद्याबळ, द्रव्यबळ किंवा अधिकारबलाने पुढारलेला वर्ग आणि दुसरा ह्यांतील कोणतेच बळ अंगी नसल्यामुळे नाईलाजामुळे मागासलेला वर्ग किंवा बहुजन समाज." कर्मवीर शिंदे यांची विभागणी स्पष्ट आहे. ती केवळ वर्णावर आधारलेली नाही. केवळ जातीवर आधारलेली नाही. ती 'विद्याबळ, द्रव्यबळ आणि अधिकारबळ' यांवर आधारलेली आहे. मागासलेल्या जातींना यातील कोणतेच बळ नसते हे स्पष्टच आहे. परंतु मागासलेल्या म्हणून ज्यांना समजले जात नाही किंवा ज्यांना पुढारलेल्या जाती असे समजण्यात येते त्या जातींतही विद्याबळ नसलेले, द्रव्यबळ नसलेले आणि अधिकारबळ नसलेले असतात, आणि तेसुद्धा कर्मवीर शिंदे यांच्या 'बहुजन' या संकल्पनेत येतात हे महत्त्वाचे आहे. तेव्हा व आता मागासलेल्या समजत असलेल्या जातीतही विद्याबळ, द्रव्यबळ आणि अधिकारबळ येत आहे. कमी-जास्त प्रमाणात आले आहे. असे बळ प्राप्त झालेले विभाग कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या बहुजन संकल्पनेत येत नाहीत, हे नीट लक्षात घ्यावे. याच कारणांनी त्यांनी 'ब्राह्मणेतर' असे नाव घेण्यास स्पष्ट विरोध केला. महाराष्ट्रात पुन्हा एकदा 'ब्राह्मणेतर', 'मराठेतर' अशा संकल्पना मांडल्या जात आहेत. 'मराठा तितुका मेळवावा' हे पुन्हा एकदा महाराष्ट्रात सांगितले व आचरले जात आहे आणि यातील 'मराठा' व 'ब्राह्मण' हे शब्द जन्माने निश्चित केलेल्या व अपघाताने मिळालेल्या जातीच्या अर्थानेच वापरले जात आहेत.
भारतीय राज्य घटनेतील आणि कायदेशीर तरतुदींमधील अडचणींमुळे पक्षांच्या नावात 'जातवाचक' शब्द योजणे अडचणीचे ठरते, म्हणून फसवी नावे धारण केली जातात. परंतु एक वास्तव आहे की, महाराष्ट्रात लहान सहान जातवार पक्ष संघटित होत आहेत. जरी ते गोंडस फसव्या नावांच्या बुरख्याखाली असले तरी जरा निरखून पाहिले की आतली जात स्पष्ट दिसते. 'मांग' जातीच्या पक्ष संघटना, धनगर जातीच्या पक्ष संघटना, माळी जातीची पक्ष-संघटना, मराठा जातीच्या पक्षसंघटना, ब्राह्मण जातीच्या पक्ष संघटना, लिंगायत जैनांची पक्ष संघटना इत्यादी संघटित होत आहेत. त्या त्या पक्षाच्या नेत्यांच्या बौद्धिक कुवतीनुसार व क्षमतेनुसार गोंडस फसवी नावे धारण केली जातात. वेगवेगळे बुरखे पांघरले जातात. जरा निरखून पाहिले की, आतली जात स्पष्ट दिसते. विठ्ठल रामजी शिंदे यांनी त्यांच्या बहुजन पक्षाची व्याप्ती सविस्तरपणे व स्पष्टपणे नमूद केलेली आहे. त्यात त्यांनी एकूण 8 वर्ग सांगितले आहेत. वर्ग हा शब्दही त्यांचाच. ते असे-
1. शेतकरीवर्ग - मात्र यात 'जमीनदार' आणि 'जहागीरदार' यांचा समावेश 'मुळीच' नाही.
2. शिपाई वर्ग - ह्यात 'सरदारांची गणना' मुळीच नाही.
3. शिक्षक वर्ग - ह्यात सोवळे शास्त्री, हक्कदार पुरोहित किंवा बलुते जोशी किंवा इतर ऐतखाऊंची गणना करता येत नाही.
4. उद्यमी - यात सुतार, सोनार, साळी, शिंपी, गवळी, माळी, तेली, तांबोळी, नाटकवाले, गोंधळी,शकून सांगणारे जोशी, पोवाडे गाणारे शाहीर, वैदू आणि तत्सम 'उद्यमी' समाज विभागाचा समावेश केला जातो.
5. दुकानदार - ह्यात व्याज देऊन दुसऱ्याचे भांडवल वळवून आणून त्यावर गब्बर होणारे पेढीवाले वर्ज्य आहेत.
6. मजूरवर्ग - ह्या विभागात 'अंगमेहनत' करणाऱ्या विभागाबरोबरच 'बुद्धिचातुर्य' वाढविणारे वकील, डॉक्टर यांचाही समावेश आहे. परंतु ते विद्याबळामुळे आणि द्रव्यबळामुळे बहुजन समाजाचेही पुढारीपण करतात. त्यामुळे ते तत्त्वतः मजूर असले तरी ते मागासलेले नसतात, म्हणून त्यांच्या हितसंबंधांचे रक्षण त्यांचे त्यांनी करावे असे शिंदे नमूद करतात. तथापि ते शोषक नाहीत; आणि बहुजनांचे विरोधक नाहीत, हे स्पष्टपणे सुचवितात.
7. अस्पृश्यता - कर्मवीर लिहितात, 'धर्माची, परंपरेची, रूढीची, अगर दुसरी कोणतीही खरी-खोटी कारणे सांगत न बसता या वर्गाची अस्पृश्यता व असहायता पूर्णपणे नष्ट करून त्यांना अगदी समान दर्जाचे बहुजन समाजात एकजीव करणे हे या पक्षाचे केवळ पवित्र काम आहे.' मराठ्यांचे संघटन करण्याचे प्रयत्न करणाऱ्या आजच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी व विचारवंतांनी जन्माने मराठा असलेल्या कर्मवीर शिंदे यांचा या शब्दांमधून व्यक्त होणारा अंतरीचा कळवळा लक्षात घ्यावा. ब्राह्मणांच्या विरोधात लढण्यासाठीचे संख्यासामर्थ्य म्हणून अस्पृश्य वर्गाकडे पाहू नये.
8. स्त्रीवर्ग - म.फुल्यांनी 'शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया' अशी एकत्र शब्दयोजना सातत्याने केली होती. तोच विचार कर्मवीरांचा दिसतो. ते लिहितात, 'स्त्रीवर्ग म्हणजे तर आमचा पाळणा. त्यांची हयगय करू तर पाळण्यातच आमचे थडगे डोलू लागेल. हे आम्ही पूर्ण जाणून आहोत.' अशा रीतीने व्याप्तीचे 8 विभाग सांगून आणि त्यांतील जमीनदार, जहागीरदार, सरदार, सोवळेशास्त्री, हक्कदार पुरोहित, व्याजावर गब्बर पेढीवाले यांच्यासारखे हितसंबंधांमुळे बजा केलेले विभाग स्पष्टपणे सांगितले आहेत.
आज काय?
आजही बहुजन पक्ष, ब्राह्मणेतर, मराठेतर यांच्याबरोबरच जातीनिहाय. पक्ष, जातीनिहाय संघटना उभ्या राहत आहेत आणि जुन्या जात जाणीवांच्या आधारे निवडणुकांत बळ व्यक्त करीत आहेत. हितसंबंधांच्या आधारे समाजाची विभागणी करण्याऐवजी जात व धर्माच्या आधारे समाज विभागीत आहेत आणि म.फुल्यांचे नाव घेत आहेत. डॉ.आंबेडकरांचे नाव घेत आहेत. त्यांनी कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांची बहुजन संकल्पना विचारात घ्याची. त्यांची संकल्पना योग्य वाटत नसेल तर ती नाकारावी. विचाराने नाकारावी. अनुभवा आधारे नाकारता येत असेल तर नाकारावी. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्याकडे दुर्लक्ष करून किंवा अनुल्लेखाने व्यवहार करू नये. ते बहुजनांच्या हिताचे ठरणार नाही. कित्येक जाणकार फुले-शाहू-आंबेडकर या नामावलीत शिंद्यांचा. समावेश करीत नाहीत, हा त्यांच्यावर अन्याय आहे. आजच्या संदर्भात कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांची बहुजनवादाची संकल्पना अधिकच उपयुक्त आणि मार्गदर्शक होईल.
Tags: बहुजन समाज शिक्षण बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज महात्मा फुले गोविंद पानसरे विठ्ठल रामजी शिंदे Bahujan Samaj Education Babasaheb Ambedkar Rajarshi Shahu Maharaj Mahatma Phule Govind Pansare Vitthal Ramji Shinde weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या