डिजिटल अर्काईव्ह

खांडेकरांचे लघुनिबंध हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यांनी स्वतः या अंकातील मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, मी स्वतः खऱ्या अर्थाने व जास्त चांगल्या प्रकारे कुठे व्यक्त झालो, तर लघु निबंधांमध्ये व्यक्त झालो. पुढे त्यांनी असेही म्हटले आहे की, 'लघुनिबंध हा प्रकार वाचकांना फुटकळ वाटतो, व्यावसायिक दृष्टीने तो यशस्वी नसतो, त्याला अनेक वाचकांच्या दृष्टीने मोल नाही; मात्र त्याचे सर्वाधिक मोल मला वाटते.' 1940 नंतरच्या चार दशकांत महाराष्ट्रामध्ये आणि एकूणच भारतामध्ये मध्यमवर्ग होता, त्याचे प्रतिबिंब लघुनिबंधांत दिसते. आता मात्र कनिष्ठ मध्यम वर्ग, मध्यम मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग, नव मध्यम वर्ग असे स्तरीकरण झाले आहे.

अडीच वर्षांपूर्वी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या संदर्भात सुनीलकुमार लवटे यांची दोन तासांची व्हिडिओ मुलाखत आम्ही साधनाच्या 'ऐवज' या व्हिडिओ मालिकेत घेतली होती. त्यांनी मागील पाच वर्षे अभ्यास-संशोधन करून तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी समग्र वाङ्गय प्रकल्प पूर्ण केला, त्या निमित्ताने ती मुलाखत होती. तब्बल दहा हजार पानांचा ऐवज त्यांनी संपादित करून 18 खंडांमध्ये आणला आहे आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडून प्रकाशित केला आहे. त्या खंडांच्या प्रकाशनापूर्वी लवटे सरांची घेतलेली ती मुलाखत दोन भागांत आहे. पहिला भाग 'तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री होते तरी कोण?' आणि दुसरा भाग 'तर्कतीर्थांचे समग्र वाङ्गय संपादित करताना'. त्या दोन्ही मुलाखती शब्दांकन करून साधना साप्ताहिकात मार्च 2024 मध्ये प्रसिद्ध केल्या आहेत. (त्याच अंकात 'अंतर्नाद' मासिकाचे संपादक भानू काळे यांच्या दोन दीर्घ मुलाखती प्रसिद्ध केल्या आहेत.) तेव्हाच सुनीलकुमार लवटे यांनी वि.स. खांडेकरांच्या पुस्तकांचे दोन बॉक्स साधनाकडे पाठवले होते, त्यामध्ये खांडेकरांची नव्याने प्रकाशित झालेली व त्यांनी स्वतः संपादित केलेली दोन डझन पुस्तके होती. त्याशिवाय खांडेकरांची अन्य तीन डझन पुस्तके होती. खांडेकरांच्या संदर्भात साधनाने काहीतरी करण्याची गरज आहे, अशी त्यांची ती सूचना होती. अर्थातच, आपण काहीतरी वेगळे निश्चित करू, असे त्यांना सांगितले होते. आणि तेव्हापासून तो विषय मनात होता, परंतु त्याला चांगले निमित्त मिळत नव्हते.

मात्र तसे एक निमित्त सहा महिन्यांपूर्वी मिळाले. जानेवारी 2026 मध्ये, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाने अनंत व लता लाभसेटवार यांच्या सहकार्याने चालवलेल्या एका उपक्रमात, वि.स. खांडेकर स्मृती व्याख्यानासाठी प्रस्तुत संपादकाला बोलावले होते. त्यावेळी, 22 जानेवारीला सकाळी व्याख्यानापूर्वी शिवाजी विद्यापीठातील वि.स. खांडेकर स्मृतीसंग्रहालय पाहण्याचा योग आला. व्याख्यानमालेचे संयोजक प्राध्यापक रणधीर शिंदे यांनी ते संग्रहालय दाखवताना, त्याची पार्श्वभूमी सांगितली व त्यातली अनेक सौंदर्यस्थळे सांगितली, ते संग्रहालय उभारण्याच्या प्रक्रियेत लवटे सरच संचालक होते, त्याबाबतचे काही रोचक तपशील सांगितले. तेव्हाच खांडेकरांवर एक विशेषांक करायचा विचार मनात डोकावला. ते संग्रहालय पाहून प्रत्यक्ष व्याख्यानाला गेल्यावर आणि तिथे श्रोत्यांमध्ये वीस ते पंचवीस या वयोगटातील तरुण-तरुणी पाहिल्यावर, नियोजित भाषणाचा विषय तोच ठेवला, पण ऐनवेळी फोकस बदलला. व्याख्यानाचा विषय होता 'खांडेकरांचा ध्येयवाद पराभूत झाला आहे का?' ते व्याख्यान रेकॉर्ड करण्यात आले होते, त्यामुळे त्याचे शब्दांकन करून साधना साप्ताहिकात 7 मार्च 2026 च्या अंकात प्रसिद्ध करण्यात आले. 'ध्येयवाद' हे खांडेकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे, विचाराचे व लेखन कार्याचे व्यवच्छेदक लक्षण होते, त्यामुळे ते व्याख्यान त्याभोवती गुंफलेले होते. त्यात, त्या काळाचा पट समोर ठेवला होता, खांडेकराचा ध्येयवाद कोणत्या प्रकारचा होता आणि त्याबाबत ते स्वतः गैरसमजात नव्हते हे त्यातून अधोरेखित केले होते. ध्येयवाद हा त्यागी, सुशिक्षित, उच्चवर्णीय किंवा श्रीमंत लोकांची मक्तेदारी नसून, अनेक सर्वसामान्य माणसंही आपल्या दैनंदिन आयुष्यात ध्येयवादाने जगत असतात, हा मुद्दा त्यातून अधोरेखित केला होता. मात्र ध्येयवादी लोकांची संख्या केव्हाही अल्प असणार आणि व्यावहारिक यश व अपयश हे खांडेकरांच्या ध्येयवादात बसत नाही, हेही त्यात स्पष्ट केले होते. आजच्या काळापेक्षा खांडेकरांचा काळ अधिक कठीण व कसोटीचा होता, त्या काळातही खांडेकर त्या ध्येयवादाला चिकटून राहिले होते. त्या ध्येयवादाच्या आधारे अनेक लहान-थोरांनी आपल्या आयुष्याच्या दिशा ठरवल्या किंवा वाटचाल केली. हे सर्व त्या व्याख्यानाच्या मध्यवर्ती होते.

त्या व्याख्यानावर अनेक लहान-थोरांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया येणे साहजिक होते. काहींना त्यातील काही मुद्दे चकित करणारे वाटले, काहींना विशिष्ट बाबतीत पुनर्विचार करणे गरजेचे आहे असे वाटले, काहींना नवीन दालने खुली करणारे मुद्दे त्यात दिसले. त्यातल्या पाच प्रतिक्रिया आम्हाला विशेष विचार करायला लावणाऱ्या वाटल्या. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती (हेमंत गोखले), नामवंत प्रकाशक (दिलीप माजगावकर), वैज्ञानिक व लेखक (दत्तप्रसाद दाभोळकर), अर्थतज्ज्ञ (अभय टिळक) आणि संपादक (राजीव खांडेकर). या पाच जणांच्या एक-दोन वाक्यांच्याच पण नेमक्या प्रतिक्रिया आल्या, तेव्हाच ठरवले खांडेकरांच्या पन्नासाव्या स्मृतिदिनाला साधनाचा एक विशेषांक करायचा. त्याप्रमाणे हा अंक आणला आहे.

खांडेकर स्मृती विशेषांक करायचे ठरल्यावर त्यात प्रसिद्ध करण्यासाठी लेखन मिळवण्याचे पर्याय अनेक होते. खांडेकरांच्या पुस्तकांवर विविध व्यक्तींकडून लेख लिहून घेणे सहज शक्य होते. तशी अनेक माणसे उपलब्ध झाली असती. परंतु पुस्तक परिचय किंवा परीक्षण या पलीकडे ते लेखन जाणार नाही, असे वाटले. कारण समग्र खांडेकर कवेत घेतलेले आहेत, अशी माणसे आता फार उपलब्ध नसणार, हे उघड होते. मात्र सुनीलकुमार लवटे यांनी तब्बल पन्नास वर्षे खांडेकरांच्या पुस्तकांचे वाचन केले आहे, गेली 25 वर्षे अभ्यास संशोधन करत राहून खांडेकरांच्या असंग्रहित व अप्रकाशित लेखनाचे संपादन केले आहे, त्यातून तीन डझन पुस्तके आली आहेत. शिवाय, त्यांना 12 वर्षे खांडेकरांचा सहवास लाभला आहे. त्यामुळे त्यांच्याच दोन दीर्घ मुलाखती करायचे ठरवले. तसा प्रस्ताव दिल्यावर त्यांनी मेहता प्रकाशनाकडून आलेल्या सर्व पुस्तकांचा संच पाठवला. त्या संचातील सव्वाशे पुस्तके पूर्ण पसारा करून टेबलवर मांडून ठेवली. तेव्हा कथा, कादंबऱ्या, रूपक कथा, भाषण संग्रह, मुलाखत संग्रह, व्यक्तिचित्रण संग्रह, कविता, नाटक, समीक्षा, संपादन असे वर्गीकरण केले. आणि मग एकेक पुस्तक चाळायला, हाताळायला सुरुवात केली. पुस्तकाचे शीर्षक, ब्लर्ब, अनुक्रम, विषय-आशय हा विचार एका बाजूला आणि त्या पुस्तकांचा काळ व त्यांचे अन्य पुस्तकांशी व विषयांशी असलेले धागे हा विचार दुसऱ्या बाजूला चालू राहिला. त्यातून, सुनीलकुमार लवटे यांच्या दोन मुलाखती मनात आकाराला आल्या.

पहिली मुलाखत 'वि.स. खांडेकर होते तरी कोण' या विषयावर, त्यातून खांडेकरांच्या व्यक्तिमत्त्वावर दृष्टिक्षेप टाकता येणार होता. आणि दुसरी मुलाखत 'खांडेकरांच्या पुस्तकांचे वाचन व संपादन करताना', यातून खांडेकरांच्या साहित्यावर दृष्टिक्षेप टाकता येणार होता. 5 ऑगस्ट 2026 रोजी, त्या व्हिडिओ मुलाखती साधना कार्यालयात शूट करण्यात आल्या, दोन्ही मुलाखती प्रत्येकी सव्वा तासांच्या झाल्या. हाताशी संदर्भासाठी कागदाचा एकही तुकडा न ठेवता सुनीलकुमार लवटे यांनी उत्स्फूर्तपणे पूर्ण अडीच तास सर्व प्रश्नांना सहजतेने व नेमकी उत्तरे दिली. एखादा दुसरा अपवाद वगळता तपशिलात चूक झाली नाही. त्या दोन मुलाखतींचे शब्दांकन करण्यात आले, थोडेसे संपादन करण्यात आले. त्यातून तब्बल वीस पानांचा ऐवज तयार झाला. त्यामुळे, त्याला पूरक असा सोळा पानांचा विभाग करावा आणि त्यात खांडेकरांचे स्वतःचे लेखन प्रसिद्ध करावे, हे ओघाने आले. मात्र त्यासाठीही बरेच पर्याय उपलब्ध असताना लवटे यांच्या दोन मुलाखतींना पूरक ठरणारा व पुढे घेऊन जाणारा ऐवज निवडणे आवश्यक वाटले. त्यातून खांडेकरांचा एक दीर्घ लेख (माझ्या जीवननिष्ठा) आणि त्यांची एक दीर्घ मुलाखत (मराठी कादंबरीतील (माझा) प्रवाह) या अंकामध्ये पुनर्भेट म्हणून सादर करायचे ठरवले. तो लेख आजपासून पन्नास वर्षांपूर्वी लिहिलेला आहे आणि ती मुलाखत आजपासून पाऊणशे वर्षांपूर्वी व. दि. कुलकर्णी यांनी आकाशवाणीसाठी घेतलेली आहे.

तर लवटे यांच्या दोन दीर्घ मुलाखती आणि खांडेकरांची एक मुलाखत व एक लेख असा हा अंक तयार करण्यात आला आहे. आम्हाला खात्री आहे, हा संपूर्ण अंक कोणत्याही चांगल्या वाचकाकडून दोन बैठकीत वाचून होईल. वि.स. खांडेकर वाचलेले असतील तर पुनर्मूल्यांकन करावेसे वाटेल, नसेल वाचले तर काही प्रमाणात तरी वाचावेसे वाटेल, मनात काही अढी असेल तर ती कमी होईल, किमान सार्वजनिक चर्चाविश्वात खांडेकरांच्या संदर्भात सवंग विधान करणे टाळले जाईल. गेली शंभर वर्षे एक लेखक महाराष्ट्रातील तरुण मराठी वाचकाला खुणावत राहतो, प्रत्येक नव्या पिढीला या ना त्या प्रकारे प्रेरित करतो, ही गोष्ट सामान्य नाही. 2025 अखेर या माणसाची दीडशे पुस्तके उपलब्ध राहतात, विकली जातात, वाचली जातात, ही चकित करणारी बाब आहे. खांडेकरांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी अनेक तपशील व अनेक उद्गार या अंकामध्ये दाखवता येतील. मात्र उदाहरणादाखल तीन-चार उल्लेख करतो.

आजपासून 90 वर्षांपूर्वी म्हणजे 1936 मध्ये प्रेमचंद यांनी त्यांच्या 'हंस' मासिकासाठी भारतातील विविध भाषांमधून त्या-त्या भाषेचा विभाग सांभाळण्यासाठी वेगवेगळ्या संपादकांची निवड केली होती, तेव्हा मराठीसाठी चाळिशीच्या आतल्या खांडेकरांची निवड केली होती, ही बाब विशेष महत्त्वाची आहे. दुसरे, तामिळनाडूच्या राजकारणात सिनेमातील लोकांचा (पटकथा लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री) प्रभाव देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून राहिला आहे. त्या सिनेमातील लोकांवर आणि तेथील तत्कालीन नेत्यांवर खांडेकरांचा कसा व किती प्रभाव होता, याचा ओझरता उल्लेख लवटे सरांनी या मुलाखतीत केला आहे, त्यावर अधिक अभ्यास संशोधन होणे गरजेचे आहे. तमिळ भाषेमध्ये खांडेकरांची पुस्तके कोणी अनुवादित केली, त्यांचा प्रभाव तिथे कसा पडला, हे समजून घेता येईल. 1936 नंतरच्या दोन दशकांत खांडेकरांच्या पटकथा असलेले 12 सिनेमे मराठीमध्ये आले आणि त्यांचे भाषांतर किंवा रूपांतर होऊन अन्य भाषांमध्ये 16 सिनेमे आले. कालच्या, आजच्या आणि उद्याच्याही पिढीला सिनेमा हे माध्यम चकित करणारे वाटते. या पार्श्वभूमीवर ते 28 सिनेमे मिळवता आले तर त्यातून खांडेकरांच्या मनोभूमिकेवर वेगळा प्रकाश पडेल.

स्वातंत्र्यपूर्व पाव शतक आणि स्वातंत्र्योत्तर पाव शतक असा 50 वर्षांचा काळ हा खांडेकराचा लेखन काळ आहे. त्यांच्या मृत्यूला आता पन्नास वर्षे झाली आहेत, असा हा शतकाचा लेखक आहे. खांडेकरांची सर्व पुस्तके आजही उपलब्ध आहेत. पूर्वीपासून 110 पुस्तके आहेत, 32 पुस्तके लवटे सरांनी अलीकडच्या पाव शतकात संपादित केली आहेत, लवकरच आणखी आठ पुस्तके येतील. म्हणजे खांडेकरांची दीडशे पुस्तके अभ्यासक, वाचक, संशोधक, लेखक यांना खुली आहेत. आव्हान पेलवण्यासाठी त्यामध्ये भरपूर वाव आहे. उदाहरणार्थ, खांडेकरांच्या दीडडझन कादंबऱ्या, दोनशे कथा आणि बारा पटकथा यांचा विचार केला, तर एक हजारपेक्षा अधिक व्यक्तिरेखा खांडेकरांनी रंगवलेल्या आहेत. त्यात सर्वसामान्य माणसे आहेत, बुद्धिजीवी आहेत, गरीब आहेत, श्रीमंत आहेत, भोगी आहेत, त्यागी आहेत, नायक आहेत, खलनायक आहेत. त्या सर्व व्यक्तिरेखांचा नीट अभ्यास केला तर खांडेकर हे मध्यम वर्गाचे लेखक होते, या धारणेला छेद दिला जाईल. आणि खांडेकर नेमके कोण होते, याचा शोध नव्याने घेता येईल. त्याचप्रमाणे खांडेकरांनी खलील जिब्रानच्या रूपक कथांचे केलेले अनुवाद आणि स्वतंत्र लिहिलेल्या रूपक कथा यांचे आठ-दहा संग्रह आहेत. म्हणजे शंभरपेक्षा अधिक रूपक कथा आहेत. हा लेखन प्रकार आता कालबाह्य झालेला वाटत असला, तरी त्याचे पुनरुज्जीवन करता येईल. कारण आताचा काळ डिजिटल माध्यमांचा काळ - रूपक कथांसाठी पूर्वी कधी नव्हे इतका अनुकूल आहे.

खांडेकरांचे लघुनिबंध हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यांनी स्वतः या अंकातील मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, मी स्वतः खऱ्या अर्थाने व जास्त चांगल्या प्रकारे कुठे व्यक्त झालो, तर लघु निबंधांमध्ये व्यक्त झालो. पुढे त्यांनी असेही म्हटले आहे की, 'लघुनिबंध हा प्रकार वाचकांना फुटकळ वाटतो, व्यावसायिक दृष्टीने तो यशस्वी नसतो, त्याला अनेक वाचकांच्या दृष्टीने मोल नाही; मात्र त्याचे सर्वाधिक मोल मला वाटते.' 1940 नंतरच्या चार दशकांत महाराष्ट्रामध्ये आणि एकूणच भारतामध्ये मध्यमवर्ग होता, त्याचे प्रतिबिंब लघुनिबंधांत दिसते. आता मात्र कनिष्ठ मध्यम वर्ग, मध्यम मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग, नव मध्यम वर्ग असे स्तरीकरण झाले आहे. पूर्वीच्या मध्यम वर्गाचे एक प्रतिबिंब खांडेकरांच्या लघुनिबंधांमध्ये (डझनभर पुस्तके म्हणजे शंभराहून अधिक लघुनिबंध) दिसते, अर्थातच एक प्रतिबिंब ना. सी. फडके यांच्या लघुनिबंधांमध्ये दिसते. तिसरे प्रतिबिंब अनंत काणेकर यांच्या लघुनिबंधांमध्ये दिसते. त्याव्यतिरिक्त गो.रा. दोडके, म.ना. अदवंत, ना.मा. संत यांच्या लघुनिबंधांमध्ये एक प्रतिबिंब दिसते. याशिवाय, दुर्गाबाई भागवत, मंगेश पाडगांवकर, विंदा करंदीकर यांचेही प्रत्येकी एक-दोन लघुनिबंध संग्रह आहेत. या सर्व लघुनिबंधांचे अभ्यास-संशोधन केले तर 1980 पूर्वीचा व नंतरचा मध्यमवर्ग यांचे तुलनात्मक चित्रण सादर करता येईल. झालेले बदल कशामुळे आणि का, यावर काही एक भाष्य करता येईल. सारांश, पूर्वीचे लघुनिबंध वाचणे म्हणजे त्या काळातील सुशिक्षित मध्यमवर्गाला आरशात पाहणे. आणि खांडेकरांचे कोणतेही लेखन वाचणे म्हणजे ध्येयवादाला आरशात पाहणे !

ताजा कलम : वरील सर्व विवेचन-विश्लेषण संपादकाने स्वतःच्या शैलीत केले आहे, मात्र या लेखाचे शीर्षक खांडेकरांच्या शैलीत दिले आहे; त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन !

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके