काही दिवसानंतर आजी गेल्या. रात्री झोपेतच त्यांचा मृत्यू झाला होता. सकाळी आजींचे भाऊ व त्यांचे इतर नातेवाईक आजींचा मृतदेह ताब्यात घ्यायला आले. आम्ही सर्व जण कर्तव्य भावनेने आपापली जबाबदारी पार पाडत होतो. दरवेळी एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेत असताना, नातेवाइकांची होत असलेली घालमेल मी अनुभवीत आलो आहे. या वेळी मात्र ती उणीव मला अस्वस्थ करत होती. मला महान कवी ओवेन यांच्या काव्यपंक्ती आठवल्या. 'एक दुसरे से प्रेम करो या खत्म हो जाओ.'
आपण कथा-कादंबऱ्यांत वाचतो किंवा नाटक-सिनेमात पाहतो, तसं माणसाला आपल्या मृत्यूची चाहूल लागल्यानंतर त्याच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आमूलाग्र बदल होतो वगैरे असे काही फारसे आढळत नाही. बहुतांश वेळा तो ज्याप्रकारे आपले आयुष्य जगलेला असतो त्याच प्रकारे आपल्या मृत्यूलाही सामोरे जातो. निर्मला आजींचा मृत्यू पाहिल्यानंतर माझा हा निष्कर्ष अधिक दृढ झाला आहे. आपल्या हट्टी आणि हेकेखोर स्वभावामुळे आपण इतरांच्या प्रेमाला पारखे झालो आहे, या गोष्टीची जाणीव झाल्यानंतरही त्यांनी आपले अलिप्तपण सोडले नाही. ज्या कोरडेपणाने त्या आयुष्यभर जगल्या होत्या, जवळपास त्याच तटस्थपणे आपल्या मृत्यूलाही सामोरे गेल्या. आपल्या विक्षिप्त वागण्यामुळे इतरांची अडचण आणि गैरसोय होते आहे, याची त्यांनी कधीच फिकीर केली नाही. त्यांच्या या वागण्यामुळे आमचीही एकदा चांगलीच फजिती झाली होती.
एके दिवशी सकाळी अकराच्या सुमारास दोन पोलीस अचानक रिसेप्शनिस्टला न जुमानता केबिनचा दरवाजा ढकलत आत आले. त्यांची ही अरेरावी पाहून मी गोंधळून गेलो.
"इथे निर्मला मॅडम कोण आहेत?" दोघांपैकी एका पोलिसांनी मला खडसावल्या स्वरात विचारले.
"कोण निर्मला मॅडम? नक्की काय प्रकार आहे? कृपया तुम्ही अगोदर खुर्चीत बसून शांतपणे सांगाल का?" मी अस्वस्थपणे म्हणालो.
"बाहेर गाडीत साहेब बसले आहेत. आम्हाला 112 नंबरवर कॉल आला होता. निर्मला मॅडम बोलते आहे, म्हणाल्या. त्यांचे दागिने चोरले आहेत, अशी त्यांची तक्रार आहे."
"हे अंथरुणावर खिळलेल्या वृद्धांचे नर्सिंग सेंटर आहे. इथे भरती असलेल्या वृद्धांपैकी कोणाकडे दागिने असण्याचा प्रश्नच येत नाही." मी पोलिसांना समजावीत म्हणालो.
"अहो डॉक्टर, आम्हाला इथूनच फोन आला आहे. तुमच्याकडे निर्मला नावाची कोणी ज्येष्ठ नागरिक भरती आहे का? आम्हाला वर तत्काळ माहिती कळवावी लागते." पोलीस घाई करत म्हणाले.
मी त्या वेळी ड्युटीवर असणाऱ्या सिस्टरना केबिनमध्ये बोलावले.
"आपल्याकडे भरती असलेल्या आर्जीपैकी निर्मला नाव कोणाचे आहे का?"
"होय सर, परवा भारती हॉस्पिटलमधून भरती झालेल्या आजींचे नाव निर्मला आहे."
ते ऐकताच पोलीस आमची परवानगी न घेताच 'त्या कुठे आहेत?' म्हणत आत सेंटरमध्ये निघाले. मी निमूटपणे त्यांच्यासोबत जाऊन त्यांना आजींची रूम दाखवली.
"आजी, तुम्ही 112 नंबरवर पोलिसांना मदतीसाठी फोन केला होता का?" दोघांपैकी एका पोलिसाने आजींना विचारले.
"होय, मीच फोन केला होता. माझी तक्रार आहे. माझ्या भावाने माझे दागिने चोरले आहेत." आजी रागाच्या स्वरात म्हणाल्या. ते ऐकून मी अवाक् झालो. गेल्या आठवड्यात आजींच्या भावाने त्यांना आमच्याकडे भरती केले होते. काल सायंकाळीच ते येऊन आजींना भेटूनही गेले होते. आजींची मानसिक स्थितीही चांगली होती. मग आजींनी असे का केले असावे ?
"ते कुठे राहतात?" पोलिसांनी माझ्याकडे पाहत विचारले.
"येथे जवळच, विश्रामबागमध्ये राहतात. मी त्यांना फोन करून ताबडतोब बोलवून घेतो." मी पोलिसांना आज्ञाधारकपणे सांगितले.
त्यांपैकी एक पोलीस आजींची तक्रार नोंद करून घेऊ लागला. दुसरा पोलीस बाहेर गाडीत बसलेल्या साहेबांना रिपोर्ट करायला गेला.
मी आजींच्या भावाला फोन लावला.
"आजींनी तुमच्याविरुद्ध दागिने चोरल्याची तक्रार केली आहे. इथे पोलीस आले आहेत. तुम्ही ताबडतोब इकडे या."
इतक्यात गाडीत बसलेले साहेबही आत आले. मी नमस्कार केला. समोरच्या खुर्चीत बसण्याबाबत विनंती केली.
"ज्येष्ठ नागरिकांनी 112 नंबर वर कॉल केल्यास पोलिसांना त्याची ताबडतोब दखल घेऊन एसपींना व शासनाकडे ऑनलाइन रिपोर्ट करावा लागतो." ते मला समजावीत म्हणाले.
"आम्ही वृद्धांना आमच्याकडे भरती करून घेताना पैसे, मौल्यवान वस्तू वगैरे सर्व गोष्टी नातेवाइकांना घेऊन जायला सांगतो." मी साहेबांना माहिती दिली.
"आजी, तुम्हाला तुमच्या भावानेच इथे अॅडमिट केले आहे ना? तरीही तुम्ही त्यांच्याविरुद्ध कशी काय तक्रार केली आहे?" मी आजींना विचारले.
"मला इथे राहायचे नाही. मला माझ्या फ्लॅटवर राहायचे आहे. मी त्याला काल सायंकाळी तसे बजावून सांगितले होते. आज सकाळी दहा वाजता तो येतो म्हणाला होता. पण अजून आला नाही. त्याने आणि त्याच्या बायकोने माझे सर्व दागिनेही आपल्याकडे ठेवून घेतले आहेत." आजी चिडलेल्या स्वरात म्हणाल्या.
आजींना इथे राहायचे नसल्यामुळे त्यांनी ही शक्कल लढवली असल्याचे माझ्या लक्षात आले.
थोड्या वेळात आजींचा भाऊ व त्याची बायको 'संवेदना'मध्ये आले. आम्ही सर्व जण त्यांची वाटच पाहत होतो. त्यांनी आल्याबरोबर दागिन्यांचा डबा आणि फ्लॅटची चावी आजींच्या हातात दिली.
"गेले पंधरा दिवस ही भारती हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होती. ही घरी एकटीच राहते. हिला कोणी मूलबाळ नाही. सध्या मदतीशिवाय हिला हिंडता-फिरता येत नाही. म्हणून थोड्या दिवसांसाठी आम्ही हिला इथे भरती केले होते. हिचे दागिने व फ्लॅटची चावी माझ्याकडे ठेवली होती. गेले तीन आठवडे आम्ही हिच्यासाठी खस्ता खातो आहे. हिच्या भल्यासाठीच आम्ही येथे अॅडमिट केले होते. पण हिला इथे राहायचे नसेल तर मी हिच्या प्लॅटवर परत सोडतो. हिचे दागिने तुमच्यासमोरच हिला परत दिले आहेत. आता परत आम्ही हिची विचारपूसही करायला जाणार नाही. हिने आम्हाला चांगली अद्दल घडवली." आजींचा भाऊ उद्वेगाने म्हणाला.
"मी काही तुला तुझ्या घरी घेऊन चल म्हणून आग्रह केला नाही. मला कोणाचे काही उपकार नको आहेत. माझी मी एकटी राहायला समर्थ आहे. माझ्या मदतीसाठी माझ्याकडे कामवाली मावशी येते. तू मला फक्त माझ्या प्लॅटवर नेऊन सोड." आजी त्रागा व्यक्त करत म्हणाल्या.
पोलिसांनी दागिने परत मिळाल्याचा व भावाबद्दल काही तक्रार नसल्याचा आजींचा जबाब नोंदवून घेतला. पोलीस निघून गेल्यावर मी सिस्टरना आजींचे साहित्य पॅक करायला सांगितले व त्यांना डिस्चार्ज दिला. सिस्टर व मावशींनी मिळून आजींना व्हीलचेअरवरून रिक्षात बसवले. आजींच्या भावाने माझ्याकडे दिलगिरी व्यक्त केली व ते सर्व जण निघून गेले.
दुपारी घरी आल्यावर ही सर्व हकिकत मी माझी पत्नी डॉ. नीलमला सांगितली.
"आजी आपल्या भावाशी असे का वागल्या असतील? ते बिचारे तर मला प्रामाणिक वाटले." मी आजींच्या वागण्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत म्हणालो, "आजींनी संस्कृतमध्ये पीएच. डी. केली आहे. त्या एका महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होत्या. त्यांचे लग्न झाले होते. परंतु नवऱ्याशी पटले नाही. त्यामुळे त्या एकट्याच राहत होत्या. त्यांची काही पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. आजवर आपण कसे ताठ कण्याने जगलो आहे आणि नातेवाइकांना आपली कशी कदर नाही, वगैरे अनेक गोष्टी त्या सिस्टरना सांगत होत्या." मी नीलमला आजींबद्दल थोडक्यात माहिती दिली.
"आजी किंवा आजोबांना आपल्याकडे भरती करून घेताना त्यांच्यासोबत शक्यतो फोन देऊ नका, असे आपण नातेवाइकांना सांगायला हवे. विचारपूस करण्यासाठी त्यांना संस्थेच्या फोनचा वापर करायला सांगितले तर आपले लक्ष राहील." नीलम उपाय सुचवीत म्हणाली. त्याप्रमाणे इथून पुढे आम्ही दक्षता घ्यायची ठरवले.
पुढे काही दिवसानंतर त्या आजींचे भाऊ मला पुन्हा भेटायला आले. या वेळी त्यांच्यासोबत त्यांचे दुसरे भाऊ व त्यांचा मुलगाही होता.
"इथून गेल्यानंतर तीन-चार दिवसांनी बहीण बाथरूममध्ये पाय घसरून पडली. खुब्याचे हाड मोडले आहे. आम्ही पुन्हा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले होते. पण फिटनेस नसल्यामुळे ऑपरेशन करता येणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. बरेच वर्ष तिला डायबिटीस आहे. किडनीचाही त्रास आहे. त्यामुळे केवळ बेडरेस्ट सांगितली आहे व औषध दिली आहेत. तुम्ही तिला परत तुमच्याकडे भरती करून घ्याल का?" त्यांनी विनंतीच्या स्वरात विचारले, "तिच्यामुळे तुम्हाला अगोदरच त्रास झाला आहे. तिचा स्वभाव पूर्वीपासूनच हट्टी आहे. आम्ही सर्व भावंडेही तिच्या वागण्याने वैतागलो आहे. पण अशा अवस्थेत तिच्याकडे दुर्लक्ष करणेही योग्य नाही. ती आता बरी होऊन हिंडू-फिरू शकणार नाही, याची आम्हाला कल्पना आहे. फक्त तिचे जेवढे काही दिवस राहिले असतील तेवढे तिची आबाळ होऊ नये, एवढीच आमची इच्छा आहे."
"ठीक आहे, घेऊन या." मी त्यांना संमती दर्शवीत म्हणालो, "पण याबाबत तुम्ही आजींशी स्पष्टपणे बोलला आहात का?"
"होय, तिला कल्पना दिली आहे. तिच्यासमोर आता दुसरा काही पर्यायच नाही. आयुष्यभर ती सर्वांशी असेच तिरसटपणे वागत आली आहे. त्या दिवशी मी तिला किती समजावून सांगत होतो. पण माझे ऐकले नाही." आजींचे भाऊ हळहळ व्यक्त करत म्हणाले.
सायंकाळी ते लोक अॅम्बुलन्समधून आजींना घेऊन आले. सिस्टरनी स्ट्रेचरवरून आजींना बेडवर घेतले. अॅडमिशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नातेवाईक निघून गेले. मी आजींना भेटायला त्यांच्या रूममध्ये गेलो. त्या खूप उदास आणि मलूल झाल्या होत्या.
"माझा शेवटचा श्वास तुमच्या इथेच सोडणे माझ्या नशिबी लिहिले आहे." त्या खिन्नपणे हसत हसत मला म्हणाल्या.
"असे काय बोलताय आजी, काही दिवस बेडरेस्ट घेतल्यानंतर तुम्ही प्रयत्न केले तर वॉकरच्या मदतीने हिंडू-फिरूही शकाल." मी आजींना धीर देत म्हणालो.
"माझे भविष्य मी जाणले आहे डॉक्टर. आता केवळ दिवस मोजणे, एवढेच माझ्या हातात आहे. त्या दिवशी तुम्हा सर्वांना माझ्यामुळे त्रास झाला." आजी खजील होऊन म्हणाल्या.
"तुमची मनःस्थिती मी समजू शकतो. आम्ही सर्व जण प्रेमाने तुमची देखभाल व शुश्रूषा करू. झाले गेले विसरून जा. वेळेवर औषध घ्या आणि लवकर बऱ्या व्हा." मी त्यांना आपुलकीच्या स्वरात म्हणालो.
"आता बरे होऊन आणखी कशासाठी जगायचे? हे खरे आहे की, माझ्या वागण्याने मी आयुष्यात अनेकांना दुखावले आहे. पण मी आयुष्यात काय भोगले आहे आणि त्यातून पुन्हा कशी उभी राहिली आहे, याची तुम्हाला कल्पनाही करता येणार."
"तुम्ही रागावणार नसेल तर एक गोष्ट बोलू का ? तुमच्या बाबतीत मला असे जाणवते आहे की, तुमचे इतरांवर प्रेम करायचे राहून गेले आहे. मी तुमच्या मुलासारखा आहे. माझ्यावर प्रेम करा. इथल्या सिस्टर व मावश्यांवर प्रेम करा. म्हणजे तुम्हाला बरे वाटेल." मी आजींना मध्येच अडवीत म्हणालो.
"प्रत्येकाचे आपापल्या आयुष्यातले भोग असतात. ते ज्याचे त्यालाच भोगावे लागतात. एकदा मिळालेलं आयुष्य पसंत नाही म्हणून कोणाकडे बदलून मागता येत नाही." आजी उदासपणे म्हणाल्या, "आई हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होती तेव्हा माझा एक महत्त्वाचा प्रोजेक्ट सुरू होता. तिने भावाकडून निरोप पाठवला होता. पण मलाच पोहोचायला उशीर झाला. शेवटी तिची माझी भेट झालीच नाही." हे सांगताना आजींना हुंदका दाटून आला होता. पण त्यांनी आपल्या डोळ्यातले अश्रू सफाईदारपणे रोखले. आपल्यावर कोणीच प्रेम करत नाही, या जाणिवेने त्या कासावीस झाल्या होत्या. परंतु त्याही परिस्थितीत त्यांनी स्वतःला अगतिक आणि केविलवाणे होऊ दिले नाही.
पुढे त्या आजी अनेक दिवस आमच्याकडे भरती होत्या. आम्ही सर्व जण प्रयत्न करूनही त्यांच्या मनामध्ये ओलावा निर्माण करू शकलो नाही. अधून-मधून त्यांचे भाऊ व इतर नातेवाईक त्यांना भेटायला यायचे. पण त्या त्यांच्याशीही फारसे मोकळेपणाने बोलायच्या नाहीत. एकदा मात्र त्यांच्याकडे संस्कृत शिकलेला एक विद्यार्थी त्यांना भेटायला आला. त्या त्याच्याशी तेवढे मोकळेपणाने बोलल्या.
काही दिवसानंतर आजी गेल्या. रात्री झोपेतच त्यांचा मृत्यू झाला होता. सकाळी आजींचे भाऊ व त्यांचे इतर नातेवाईक आजींचा मृतदेह ताब्यात घ्यायला आले. आम्ही सर्व जण कर्तव्य भावनेने आपापली जबाबदारी पार पाडत होतो. दरवेळी एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेत असताना, नातेवाइकांची होत असलेली घालमेल मी अनुभवीत आलो आहे. या वेळी मात्र ती उणीव मला अस्वस्थ करत होती. मला महान कवी ओवेन यांच्या काव्यपंक्ती आठवल्या. 'एक दुसरे से प्रेम करो या खत्म हो जाओ.'
खरं तर या आजी खूप विद्वान होत्या. प्रेम हे सर्वाधिक महत्त्वाचे मानवी मूल्य असून ते याचक नव्हे तर दाता झाल्यावरच लाभते, हे त्यांना का उमगले नसावे ?
रात्री जेवणानंतर शतपावली करताना मी नीलमशी याबाबत चर्चा केली.
"आजींच्या वागण्यामध्ये हा तुसडेपणा पूर्वीपासूनच असावा की त्यांचे आपल्या नवऱ्याशी पटेनासे झाल्यापासून आला असावा?" मी नीलमला तिचे मत विचारले.
"तसे निश्चित सांगता येणार नाही. कदाचित त्यांच्या स्वभावामुळेही त्यांचे आपल्या नवऱ्याशी पटले नसेल." नीलम अंदाज व्यक्त करत म्हणाली.
"पूर्वीच्या काळी प्रेम किंवा नातं म्हणजे दैवी देणगी आहे. ते शब्दात व्यक्त करता येत नाही. एखाद्याच्या नशिबात असेल तरच लाभते किंवा लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात वगैरे असे त्याचे भावनिक उदात्तीकरण केले जात असे. हल्लीची पिढी मात्र या गोष्टींकडे वास्तववादी दृष्टीकोनातून पाहते. आपला आनंद केवळ एका व्यक्तीवर किंवा घटनेवर अवलंबून असू शकत नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीशी पटले नाही म्हणून आयुष्यभर देवदास बनून जगण्यात अर्थ नाही, याची त्यांना जाणीव झाली आहे." मी माझे मत नीलमला सांगितले.
"पती-पत्नी नात्यांमध्ये जसा मोकळेपणा महत्त्वाचा आहे, तितकीच बांधिलकीही महत्त्वाची आहे. हल्ली मोकळेपणा वाढतो आहे. परंतु बांधिलकी मात्र काही प्रमाणात कमी होत चालली आहे. शेवटी नात्याची जपणूक करण्यासाठी काही तडजोड प्रत्येक पिढीला करावीच लागणार आहे. फार तर तडजोडीचे स्वरूप वेळोवेळी बदलत राहील. म्हणून दोघांनीही केवळ स्वतःच्याच नव्हे तर एकमेकांच्या मतांचा आणि आनंदाचा विचार करणेही महत्त्वाचे आहे." नीलम आपले मत व्यक्त करत म्हणाली.
"आपल्या बाबतीत मात्र वृद्धांच्या सेवेचे समाधान लाभते आहे, हे खरे आहे. तरीही मी आजपर्यंत माझ्या मतांचा आणि आनंदाचा अधिक विचार केला, असे मला वाटते आहे." मी कबुलीच्या स्वरात म्हणालो.
"ते तुम्ही एकटे कसे काय ठरवताय?" नीलम हसत म्हणाली. पण तो तिच्या मनाचा मोठेपणा होता.
(डॉ. दिलीप शिंदे यांनी गेल्या दशकात साधना साप्ताहिकातून 'रुग्णानुबंध' आणि 'चिखलाचे पाय' या दोन लेखमाला लिहिल्या, नंतर त्यांची पुस्तकेही आली. त्याच काळात त्यांच्या मनात 'संवेदना शुश्रूषा केंद्र' सुरू करण्याचे बीज पडले आणि 2016 मध्ये ते सांगली येथे सुरू झाले. त्या केंद्राला आता दहा वर्षे झाली आहेत आणि ते उत्तम प्रकारे चालू आहे. या दहा वर्षांतील अनुभवांवर आधारित पुस्तक 'मावळतीचे आकाश' या नावाने साधना प्रकाशनाकडून येत आहे. 1 जुलै (डॉक्टर्स डे) 2026 रोजी, ते प्रकाशित होणार आहे. त्या पुस्तकातील दोन प्रकरणे गेल्या महिन्यात साधनातून प्रसिद्ध केली आहेत, आणखी एक प्रकरण या अंकात.)
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या