डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मराठी ग्रंथ मुद्रण, विक्री, प्रकाशन, वितरणव्यवहार सध्या वाढत्या अडचणींना तोंड देत तगून आहे. महाराष्ट्र शासनाने ग्रंथ खरेदी योजनेचे पुनरुज्जीवन करण्याची ही योग्य वेळ आहे. त्यातून मराठी ग्रंथव्यवहारास ऊर्जितावस्था येऊ शकेल. राज्याचे ग्रंथालय संचालनालय आहे. त्यामार्फत सार्वजनिक ग्रंथालये चालवली जातात. त्यांचे अनुदान आक्रसत आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालयांच्या ग्रंथालयांना गेल्या साठ वर्षांत बहर यायला हवा होता. वाचक चळवळीचा ‘ग्रंथाली’चा उपक्रम एव्हाना साखळी बनायला हवा होता. खासगी प्रकाशकांशिवाय ‘समकालीन’सारखी एखादी संस्था काही प्रयत्न करत राहते. मराठी नियतकालिके वाढताना दिसत नाहीत. साप्ताहिके, पाक्षिके, मासिके यांमुळे फिरती ग्रंथालये होती, ती काळाच्या पडद्याआड गेलीत.

दि. 1 मे 1960 रोजी भाषावार प्रांतरचना धोरणाचा भाग म्हणून स्वतंत्र ‘महाराष्ट्र राज्य’ स्थापन झाले. दि. 1 मे 2020 रोजी महाराष्ट्र राज्यस्थापनेचा हीरकमहोत्सव साजरा करणार आहोत. या पार्श्वभूमीवर असे नाही, पण योगायोगाने आज मी एक भाषण वाचतो आहे. भाषण आहे भारताचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचे. प्रसंग आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनाचा. सन 2003 मध्ये कराड येथे संपन्न झालेल्या 76 व्या संमेलनाच्या उद्‌घाटनपर भाषणात त्यांनी मराठी भाषा आणि साहित्याबद्दल काही निरीक्षणे नोंदवली आहेत. पी. व्ही. नरसिंह राव तेलुगू मातृभाषी असले, तरी त्यांना मराठी चांगले येत असे. ते किती चांगले, तर वि. स. खांडेकरांच्या ‘ययाति’ कादंबरीचा तेलुगू अनुवाद त्यांनी  केला आहे. मराठीला पहिले भारतीय ज्ञानपीठ पारितोषिक देण्यात त्यांचे योगदान आहे, हे त्यांचे मराठीप्रेम कळावे म्हणून नमूद केले. आपल्या या भाषणात त्यांनी ते पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असतानाच्या काळात मित्रास लिहिलेल्या पत्रात मराठी भाषेबद्दल एक वाक्य लिहिलं होतं, ते त्यांचं व्यासंगपूर्ण निरीक्षण होतं- ‘मराठी इज द मोस्ट अँग्लिसाइझ्ड लँग्वेज इन इंडिया.’

आपण मराठीचं स्वतंत्र राज्य मिळवलं, ते मराठी भाषा विकासासाठी. हे राज्य सहज अस्तित्वात आलं नाही. त्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीने सन 1956 पासून सतत लढा दिला. 106 सत्याग्रही हुतात्मे झाले. द्विभाषी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना ग. त्र्यं. माडखोलकर यांनी ‘‘नवा महाराष्ट्र ‘मराठी’चा की ‘मराठ्यांचा’?...’’ प्रश्न केल्यावर यशवंतराव चव्हाण विकल होऊन म्हणाले होते ‘‘नवे राज्य मराठीचेच होणार, हे काय सांगायला हवे?’’

गेल्या साठ वर्षांच्या प्रवासात मराठीसाठी शासन व समाजाने काहीच केले नाही, असे नाही. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळामार्फत शेकडों पुस्तके प्रकाशित, भाषांतरित करून मराठीस ज्ञानभाषा बनविण्याचा प्रयत्न केला नि करतो आहोत. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामार्फत मराठी विश्वकोश प्रकल्प पूर्ण केला असून त्याचे 21 खंड आपल्या हाती आहेत. मराठीतून शिक्षण देणाऱ्या शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे यांची संख्या आपल्या व्यापक मराठीप्रेम, प्रसाराचे लक्षण होय. मराठी साहित्य, नियतकालिके, वृत्तपत्रे, माध्यमे इत्यादींद्वारे गेल्या सहा दशकांत मराठी वृद्धिंगत होत आली होती, तिला खीळ बसते की काय, अशी स्थिती मात्र समोर उभी आहे.

आजचीच वृत्तपत्रे माझ्यासमोर आहेत- त्यात मराठी शब्द उपलब्ध असताना सर्रास वापरण्यात येणारे इंग्रजी शब्द आहेत- हॉटस्पॉट, निगेटिव्ह, व्हायरस, व्हायरल, पॅनल, स्वॅब, फ्लॅट, लॅब, हायटेक, सोशल डिस्टन्सिंग, पॉझिटिव्ह, नो एंट्री, किट, ज्यांना धोकादायक, निर्दोष, विषाणू, पसरलेले, समिती, नमुने, सदनिका, प्रयोगशाळा, उच्च तंत्रज्ञान, विलग, बाधित, प्रवेश बंद, संच असे प्रचलित शब्द मला सहज आठवले. भाषेचा साधा नियम आहे- ती वापरली की विकसित होत जाते, न वापरली की मरते. सन 2011 मध्ये आपली जनगणना झाली, त्याबरोबर भाषिक सर्वेक्षणही झाले. लक्षात काय आले? गेल्या पन्नास वर्षांत भारतातल्या अनेक भाषा मृतप्राय झाल्या, नष्ट झाल्या. हे सारं येतं कशातून? तर आपले दैनंदिन विचार, व्यवहारातून. कुसुमाग्रजांनी लिहून ठेवलं आहे-

भाषा मरता देशही मरतो

 संस्कृतीचा मग दिवा विझे!

छत्रपती शिवाजीमहाराजांपासून अनेक राजांनी, सर्व संत, समाजसुधारक, साहित्यिक, राजकारणी यांनी महाराष्ट्राचे जे स्वप्न पाहिले, त्याचे गेल्या साठ वर्षांत काय झाले- याचा नको का विचार व्हायला? माध्यम म्हणून मराठीस लागलेली ओहोटी चिंताजनक आहे. जागतिकीकरणामुळे निर्माण झालेल्या संपर्क नि संवाद साधन विकासांमुळे जगभर स्थानिक भाषांपुढे अस्तित्वाचे प्रश्न उभे आहेत. पण जगभराच्या नि भारतातल्या तमिळ, मल्याळम, बंगालीसारख्या भारतीय भाषा भाषिक संसाधन विकासाद्वारे भाषा जगवण्या-टिकवण्याचे जे प्रयत्न करत आहेत, त्या तुलनेने मराठीत प्रयत्न होताना दिसत नाहीत. जे होतात, ते अत्यंत तोकडे. सध्याच्या संदर्भात बोलायचे, तर मराठीपुढे कोरोना मृत्युभय आहे नि आपणाकडे साधी मुस्कीपण (मास्क) नाही. लस ही फार पुढची गोष्ट होय. प्रश्न साधनांच्या कमेतरतेचा नाही; तो आहे प्राधान्याचा आणि अस्मिता, अस्तित्व, अभिमानाबरोबर स्थानिक भाषेचं महत्त्व कळण्याचा.

स्थानिक भाषा लोकभाषा असते. जगात डॉलरची चलती आहे खरे, पण रुपया बंदा राहिला तर डॉलरची स्पर्धा करणार ना? आपला सारा भाषिक व्यवहार एका अर्थाने मराठीसंदर्भात रुपयाला डॉलर बनवणारा आहे. घराघरांतून मराठी तुटते आहे. नवी पिढी मोठ्या प्रमाणात इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वळत आहे. दोष पालकांचा नाही. भाषा हे जोवर रोजगाराचे साधन बनत नाही, तोवर तिचा व्यवहार वाढत नाही. नव्या पिढीची भाषिक स्थिती ‘धोबी का कुत्ता न घर का, न घाट का’ अशी झाली आहे. मातृभाषा मराठी, शिक्षण भाषा इंग्रजी, माध्यम भाषा हिंदी तिन्ही भाषा आज प्रदूषित झाल्यात. नव्या पिढीची हुकूमत कोणा भाषेवर नाही नि इंग्रजी, हिंदीचा प्रभुत्वाइतका वापर नाही. घरी मराठी शब्दांचे अर्थ-पर्याय इंग्रजी-हिंदीत देण्याचे प्रसंग हरघडी येत आहेत. पिंक म्हणल्याशिवाय गुलाबी रंग कळत नाही नि पप्पा म्हटल्याशिवाय बाप होता येत नाही.

मराठीतील शासनव्यवहार रोज आखडत निघाला आहे. भारतात संगणकीय वापराची सशक्त लिपी म्हणून आपण युनिकोडची कास धरली. महाराष्ट्र शासन व्यवहारात युनिकोड टंक (फाँट) अनिवार्य असला, तरी वापरला जात नाही. त्या वापराचे इतके फायदे आहेत की -भाषांतर, संपादन, लिप्यंतर, बोललेले लिहिले जाणे, लिहिलेले वाचणे, ऐकणे, पाहणे या गोष्टी आपण क्षणात करण्याइतके सुलभ झाले; पण महाराष्ट्र शासनाचे तिकडे लक्ष नाही. महाराष्ट्र ज्ञान मंडळाने (एम्‌केसीएल) मराठी संगणकाद्वारे जितके  व्यवहार रूढ केले आहेत, तितके शासनाने नाही. मराठी राजभाषा संस्था अधिक सक्षम, साधनसंपन्न व्हायला हवी. मराठी सक्तीचा कायदा करून भाषा प्रचार-प्रसाराचे प्रश्न सुटत नसतात. त्यासाठी बहुआयामी वापर धोरणच कारणी येते. सर्व परिपत्रके मराठीत काढणे, मराठी फलक अनिवार्य करणे, देवनागरी- युनिकोड सक्तीचा करणे, मराठी प्रकाशन व ग्रंथालय विकासास प्राधान्य देणे, जिल्हा न्यायालयाचे सर्व निकाल (अधीन न्यायालयांसह) मराठीत उपलब्ध करणे, माध्यमभाषांवर नियंत्रण (अकारण इंग्रजी शब्द वापरास बंदी)- असे प्रयत्न व व्यवहारातून मराठी भाषा व देवनागरी लिपी सुरक्षित राहील आणि भविष्यात त्यांचा विकास होईल.

मराठीने भारतास जोडून घेण्याची परंपरा जुनी आहे. त्यासाठी महाराष्ट्राच्या सीमावर्ती राज्यांशी आपला भाषिक व्यवहार सौहार्द्राचा, सहकार्याचा व देवाण-घेवाणीचा ठेवला पाहिजे. साने गुरुजींचे ‘आंतरभारती’चे स्वप्न म्हणून मराठीने भारतीय घटनेच्या आठव्या परिशिष्टातील बावीस भाषांशी असा व्यवहार ठेवणे, ही आपली घटनात्मक जबाबदारी आहे. आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मैथिली, नेपाळी, उडिया, पंजाबी, संथाळी, संस्कृत, सिंधी, तमिळ, तेलुगू, उर्दू या ज्या मराठीतर भाषा आहेत; त्यांचा भाषा, साहित्य, लिपी असा त्रिमित व्यवहार ठेवून आपले आंतरभारतीयत्व जपायला हवे. त्याची सुरुवात वा पहिले पाऊल म्हणून महाराष्ट्राची सीमावर्ती राज्ये असलेल्या गोवा, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, दीव-दमण (केंद्रशासित) हे प्रदेश नि त्यांच्या भाषासाहित्य लिपींशी अनुबंध जोडणारा सांस्कृतिक सेतू विकसित करता येईल का, या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. अशासाठी की- या राज्यातील गुजराती, कोकणी, तेलुगू, हिंदी, कन्नड, उर्दू बोलणारी मोठी लोकसंख्या महाराष्ट्रात स्थायिक आहे.

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून राज्याचे मुखपत्र ‘लोकराज्य’ प्रकाशित होत आहे. ते पूर्वी पाक्षिक होते, आता मासिक झाले आहे. हा भाषाविकास संकुचित करणारा आपला निर्णय व व्यवहार आहे. खरे तर त्याचे साप्ताहिक, दैनिक होणे म्हणजे राजभाषा मराठी ही लोकभाषा करणे होय. ‘लोकराज्य’ जेव्हा पाक्षिक होते, तेव्हा ते मराठीशिवाय हिंदी, इंग्रजी, उर्दू, सिंधी, गुजरातीमध्ये निघायचे. सध्या ते सिंधीत निघायचे बंद झाले. का, ते कळायला मार्ग नाही. महाराष्ट्रात असा एकही जिल्हा नाही, जिथे सिंधी बांधव नाहीत. महाराष्ट्र- स्थापनेनंतर आपण राज्यांच्या विविध अकादमी सुरू केल्याने हिंदी, गुजराती, सिंधी, उर्दू अकादमी कार्यरत आहेत. पंजाबी अकादमी सुरू करण्याचा प्रस्ताव गेले कित्येक दिवस भिजत घोंगडे बनून राहिला आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाकडे वाढते दुर्लक्ष म्हणजे ज्ञानव्यवस्थेकडे व ज्ञानभाषा विकासप्रक्रियेकडे दुर्लक्ष हे आपणास केव्हा कळणार? मराठी राजभाषा संस्था, पु. ल. देशपांडे कला अकादमी, बालभारती, बालचित्रवाणी यांच्या संकोचाबद्दलही यापेक्षा वेगळे चित्र दिसत नाही.

मराठी ग्रंथ मुद्रण, विक्री, प्रकाशन, वितरणव्यवहार सध्या वाढत्या अडचणींना तोंड देत तगून आहे. महाराष्ट्र शासनाने ग्रंथ खरेदी योजनेचे पुनरुज्जीवन करण्याची ही योग्य वेळ आहे. त्यातून मराठी ग्रंथव्यवहारास ऊर्जितावस्था येऊ शकेल. राज्याचे ग्रंथालय संचालनालय आहे. त्यामार्फत सार्वजनिक ग्रंथालये चालवली जातात. त्यांचे अनुदान आक्रसत आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालयांच्या ग्रंथालयांना गेल्या साठ वर्षांत बहर यायला हवा होता. वाचक चळवळीचा ‘ग्रंथाली’चा उपक्रम एव्हाना साखळी बनायला हवा होता. खासगी प्रकाशकांशिवाय ‘समकालीन’सारखी एखादी संस्था काही प्रयत्न करत राहते. मराठी नियतकालिके वाढताना दिसत नाहीत. साप्ताहिके, पाक्षिके, मासिके यांमुळे फिरती ग्रंथालये होती, ती काळाच्या पडद्याआड गेलीत. व्याख्यानमालांना श्रोते पूर्वी तिकिटे असून उपस्थित राहत. वसंत व्याख्यानमाला, पसंत व्याख्यानमाला, उपासना व्याख्यान-मालांमधून माझी व्याख्याने तिकीट काढून श्रोत्यांनी ऐकली होती, हे आज स्वप्न वाटावे- असा आपला मराठी भाषी कायिक, वाचिक, लिखित, श्रवण, पठण व्यवहार किती बदलावा, बंद पडावा! कीर्तने, प्रवचने, पारायणे इत्यादी तत्कालीन भाषिक-सांस्कृतिक उपक्रम होते. नाटके पाहणे हा कौटुंबिक उपक्रम होता. मंगळागौर, हादगा, नागपंचमी गीतगायनाचा सांस्कृतिक उत्सव असायचा. बंगाल, गुजरात, पंजाब काही अंशाने हे सर्व टिकवून ठेवत आहेत. महाराष्ट्रात मराठी भाषा, लिपी, साहित्य, संस्कृती, माध्यमांना आलेली मरगळ अस्वस्थ करणारी आहे.

पी. व्ही. नरसिंह राव यांनी आपल्या भाषणात मराठीवरील इंग्रजी प्रभावाचे वर्णन करताना सांगितलेली आणखी एक गोष्ट महत्त्वाची होती. ती म्हणजे- इंग्रजी प्रभावी अनेक शब्द मराठीत तयार झाले. मधुचंद्र (हनीमून), उच्चभ्रू (हाय ब्रो) सारखी उदाहरणे त्यांनी दिली होती. हल्ली मी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचं साहित्य काही निमित्ताने वाचतो आहे. मला असं दिसतं की, त्यांची पिढी मराठी भाषा समृद्ध व्हावी म्हणून रोजच्या व्यवहारात किती सजग होती! तर्कतीर्थ वर्ड्‌स्वर्थबद्दल बोलत होते, ‘त्यांनी ज्ञानाचे विमलतर चैतन्य निर्माण केले’ असं सहज बोलून गेले. ‘फायनल स्पिरिट ऑफ नॉलेज’चे ते भाषांतर होते, हे वाचकाच्या लगेच लक्षात येते. आपण मात्र घड्याळाचे काटे उलटे फिरवण्यात गुंग होऊन स्वनामधन्य होत आहोत.

Tags: सुनीलकुमार लवटे मराठी महाराष्ट्र दिन maharashtra din marathi sunilkumar lawate weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुनीलकुमार लवटे,  कोल्हापूर, महाराष्ट्र

माजी प्राध्यापक, प्राचार्य, लेखक, हिंदी भाषा प्रचारक, समाजसेवक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके