डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

समाजात असे विरोधाभास असतातही; पण ज्या संस्कृतीविषयी प्रेक्षकांनाही फार माहिती नाही, त्याबद्दलची गोष्ट सांगताना हे बारकावे दिसायला हवेत. नात्यांमधले पदर लक्षात यायला हवेत. पण सिनेमा पाहताना मुळात दिग्दर्शकानेच फार खोलात जायचा प्रयत्न केला नसावा, असं वाटत राहतं. ‘किती बिचाऱ्या ना...’ अशा भूमिकेतून हा सिनेमा बनवला गेलाय की काय, असा विचार मनात येत राहतो. म्हणजे, माझ्या मनात येत होता. पण बेल्जियमची सारा आणि नॉर्वेची क्रिस्टिन या दोघींनाही हा सिनेमा आवडला. त्यांच्या विकसित देशांतल्या पाश्चात्त्य जाणिवांना या सिनेमाने ‘काही तरी एक्झॉटिक’ दाखवलं होतं. सिनेमाच्या फ्रेम्स अप्रतिम होत्या, यात शंकाच नाही. वाळवंटातली माती आणि त्या पार्श्वभूमीवर विविध रंगांमधल्या ओढण्या लक्ष वेधून घेणाऱ्या होत्या. पण फक्त सुरेख दृश्यं म्हणजे काही सिनेमा नव्हे. या सिनेमामध्ये आत्मा, प्रामाणिकपणा नव्हता- असं मला वाटलं. वेरिदाचं दु:ख कदाचित म्हणूनच मला समजलं, पण भावलं नाही.

कारा इथे झालेल्या 22 व्या महिलांच्या फ्लाइंग ब्रूम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये दाखवण्यात आलेल्या तीन डॉक्युमेंटरींबद्दल मागील अंकात वाचलं. आज या महोत्सवामध्ये महिला दिग्दर्शकांनी सांगितलेल्या गोष्टींविषयी- 

अंकाराच्या फ्लाइंग ब्रूम चित्रपट महोत्सवासाठी जाताना मनात एक उत्सुकता होती. महिला दिग्दर्शकांनी केलेले सिनेमे इथे दाखवण्यात येणार होते. या वर्षी महोत्सवाच्या आयोजन समितीकडे तब्बल 1721 एन्ट्रीज आलेल्या होत्या. त्यातून निवडलेले 140 सिनेमे दाखवले गेले. जगभरातल्या बायकांना कोणत्या गोष्टी सांगायच्या आहेत याची झलक आपल्याला पाहायला मिळेल, असा विचार मनात होता. अर्थात, हे सगळे सिनेमे पाहणं शक्यच नव्हतं. शिवाय, फीप्रेसी या चित्रपट समीक्षकांच्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने ज्युरी म्हणून गेल्याने स्पर्धेसाठी जे सिनेमे होते, ते पाहणं आवश्यक होतंच. त्यात अनेक डॉक्युमेंटरीज होत्या. त्यामुळे खूप जास्त फीचर फिल्म्स पाहता आल्या नाहीत. ज्या बघितल्या, त्यांतल्या काहींची ओळख इथे करून द्यावी, असं वाटलं.

महिलांच्या सक्षमीकरणाच्या चळवळीला पाठबळ मिळावं, सिनेमाच्या माध्यमातून त्याविषयी जागरूकता  निर्माण व्हावी- अशा उद्देशाने स्थापन झालेल्या चित्रपट महोत्सवामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या सिनेमांमधून महिलांच्या व्यक्तिरेखा मध्यवर्ती असणार, हे स्पष्ट होतं. पण म्हणून हे सिनेमे काही प्रचारकी नव्हते. केवळ कलात्मक दर्जाचा विचार केला तर ते महान होते, असं नाही; पण या महिला-दिग्दर्शकांना बायकांच्या वेगवेगळ्या गोष्टी सांगण्यात रस होता. आपल्या नायिकांची तळमळ, त्यांची द्विधा मन:स्थिती, त्यांचं हताश होणं, कधी बंड करून ठामपणे उभं राहणं इथे पाहायला मिळालं.

.....

‘जर्नी टु अ मदर्स रूम’मध्ये आई आणि मुलीची गोष्ट आपण पाहतो. कधी आईच्या दृष्टिकोनातून, तर कधी मुलीच्या. नवऱ्याच्या मृत्यूनंतर एस्त्रेला एकटी पडलीये आणि या एकटेपणाच्या भीतीतून ती आपल्या मुलीमध्ये आधार शोधतेय. तिच्यासाठी खायला करणं, कपडे शिवणं, तिचं सगळं हवं-नको बघणं- हेच आता एस्त्रेलाचं आयुष्य झालंय. लिओनोरचंही आपल्या आईवर खूप प्रेम आहे. तिच्या एकटेपणाची जाणीव लिओनोरला आहे. अनेकदा मित्र-मैत्रिणींबरोबर पबमध्ये मजा करण्याऐवजी ती आईबरोबर घरी बसून टीव्हीवर मालिका बघणं पसंत करते. पण तिची स्वत:चीही काही स्वप्नं आहेत. स्पेनमधल्या एका छोट्याशा शहरात तिला आपलं आयुष्य घालवायचं नाहीये. लंडनला जाऊन करिअर करण्याचे वेध तिला लागलेत.

दिग्दर्शक सेलिया रिको क्लॅव्हेलिनोने आई आणि मुलीमधला हा संघर्ष, त्यातून त्यांनी काढलेला मार्ग, आईने आपल्या आयुष्याचा शोधलेला अर्थ हे एका साध्या-सरळ गोष्टीतून मांडलंय. या सिनेमात असामान्य काहीच नाही, पण तरीही एक गोडवा आहे. एक प्रामाणिकपणा आहे, तो मनाला भिडतो- एवढं नक्की.

माझ्याबरोबर ज्युरी असणाऱ्या बेल्जियमच्या साराला ही गोष्ट फारशी भावली नाही. वयात आल्यावर मुलांनी घराबाहेर पडायचं यात संघर्ष कुठे आहे, असं तिला वाटत होतं. आणि सोळा-सतरा वर्षांच्या मुलीने आईच्या कुशीत झोपणंही तिला खटकलं. मला या दोन्ही गोष्टी समजू शकत होत्या. सिनेमा आपल्याला का आणि कसा भावतो, हे संस्कृतींमध्ये असलेल्या फरकावरही अवलंबून असतंच.

.....

‘फ्लेश आऊट’ हा सिनेमा पाहिल्यानंतरही नेमकं हेच घडलं. इटलीची दिग्दर्शक मिकेला ओचिपिन्तीने मॉरिटानिआ नावाच्या देशातल्या रिवाजावर केलेला हा सिनेमा. मॉरिटानिआ हा आफ्रिका खंडात वायव्येला असलेला इस्लामी देश. इथे लग्नाअगोदर वधू चांगली तंदुरुस्त असावी म्हणून तिला खायला घातलं जातं, तिचं वजन वाढावं म्हणून प्रयत्न केले जातात. मिकेलाच्या सिनेमामध्ये अशाच एका मुलीची गोष्ट सांगितलेली आहे. भिन्न संस्कृतींमुळे सिनेमाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात कसा बदल होतो, हे सांगण्याआधी या सिनेमाबद्दल सांगते. खऱ्या-खुऱ्या घटनांवर हा सिनेमा आधारलेला आहे.

वेरिदा या तरुण मुलीचं लग्न ठरतं. तीन महिन्यांनी लग्न आहे आणि समाजातल्या रिवाजानुसार सुंदर दिसायचं तर या काळात तिचं वजन किमान दहा किलोनी वाढणं गरजेचं आहे. सिनेमाची सुरुवातच मुळी काजळ घातलेले दोन विषण्ण डोळे आणि त्या खाली एक भलं मोठं दुधाने भरलेलं मातीचं पातेलं दाखवून होते. मग वेरिदाची आई रोज तिला दिवसभरात दहा वेळा बळजबरीने कशी खायला घालत असते, हे आपण पाहतो. तिची धाकटी बहीण बिर्याणी मागते तेव्हा, ‘तुझं लग्न ठरेल तेव्हा तुलाही हे सगळं मिळेल,’ असं सांगितलं जातं. वेरिदाला हे सहन होत नाही. रोज तिच्यासाठी वजनाचा काटा घेऊन येणारा मुलगा तिला आवडलाय, पण ती ते सांगू शकत नाही, मैत्रिणीकडे मन मोकळं केलं, तरी प्रत्यक्ष आयुष्य बदलण्यासाठी त्याचा काहीच उपयोग नसतो. मात्र वेरिदाची ही कथा अस्वस्थ करत नाही.

बहुधा पाश्चात्त्य देशातल्या एका स्त्रीने काठावर राहून आपल्यापेक्षा वेगळ्या संस्कृतीचं केलेलं हे चित्रण असल्यामुळे असेल, पण दिग्दर्शक आपल्याला वेरिदाच्या आयुष्यात सहभागी करून घेण्यात अयशस्वी ठरते. तिचं काठावर असणं पदोपदी जाणवत राहतं. त्यात कुठे तरी, ‘बघा ना या मुली किती बिचाऱ्या आहेत,’ अशी भावना आहे की काय, अशी शंका येत राहते. बळी देण्याआधी बकऱ्याला धष्टपुष्ट करणं आणि बाईला खायला घालून नवऱ्यासाठी तयार करणं सारखंच आहे, हे एकदा प्रस्थापित झाल्यानंतर दिग्दर्शक नवं काहीच सांगत नाही. या देशातल्या बायका अशा शरण जाणाऱ्या आहेत, हे एका बाजूला दाखवताना; दुसऱ्या बाजूला एकत्र जमल्यानंतर या बायका ‘माझ्या दुसऱ्या नवऱ्याला मी सोडून दिलंय, आता मी नवा पुरुष शोधतेय’, अशा गप्पा मारताना दिसतात. समाजात असे विरोधाभास असतातही; पण ज्या संस्कृतीविषयी प्रेक्षकांनाही फार माहिती नाही, त्याबद्दलची गोष्ट सांगताना हे बारकावे  दिसायला हवेत. नात्यांमधले पदर लक्षात यायला हवेत.

पण सिनेमा पाहताना मुळात दिग्दर्शकानेच फार खोलात जायचा प्रयत्न केला नसावा, असं वाटत राहतं. ‘किती बिचाऱ्या ना...’ अशा भूमिकेतून हा सिनेमा बनवला गेलाय की काय, असा विचार मनात येत राहतो. म्हणजे, माझ्या मनात येत होता. पण बेल्जियमची सारा आणि नॉर्वेची क्रिस्टिन या दोघींनाही हा सिनेमा आवडला. त्यांच्या विकसित देशांतल्या पाश्चात्त्य जाणिवांना या सिनेमाने ‘काही तरी एक्झॉटिक’ दाखवलं होतं.

सिनेमाच्या फ्रेम्स अप्रतिम होत्या, यात शंकाच नाही. वाळवंटातली माती आणि त्या पार्श्वभूमीवर विविध रंगांमधल्या ओढण्या लक्ष वेधून घेणाऱ्या होत्या. पण फक्त सुरेख दृश्यं म्हणजे काही सिनेमा नव्हे. या सिनेमामध्ये आत्मा नव्हता, प्रामाणिकपणा नव्हता- असं मला वाटलं. वेरिदाचं दु:ख कदाचित म्हणूनच मला समजलं, पण भावलं नाही.

....

‘सिस्टिम क्रॅशर’ हीसुद्धा एका नऊ वर्षांच्या मुलीची शोकांतिका आहे- जर्मनीच्या नोरा फिंगशेड्‌टने सांगितलेली. सगळे नियम मोडणाऱ्या लहान मुलांचं वर्णन सिस्टिम क्रॅशर म्हणून केलं जातं. अशा मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा असते. पण तिचा उपयोग नेमका कसा करावा, हे त्यांना कळत नाही. भावनिक दृष्ट्या ती अतिशय हळवी असतात. छोट्या-छोट्या गोष्टींनी त्यांना राग येतो आणि तो इतका पराकोटीचा असतो की, ती हिंसक बनतात. मग आपल्यासमोर लहान मूल आहे, याचंही भान त्यांना राहत नाही. समाजाने आखून दिलेल्या नियमांचं पालन त्यांना करायचं नसतं. त्यावर वेळीच योग्य उपाय झाले नाहीत, तर अशा विध्वंसक वृत्तीच्या मुलांची शोकांतिका होऊ शकते.

बर्नाडेटचंही तेच होतं. तिचे मानसोपचारतज्ज्ञ, वेगळ्या मुलांसाठी असलेल्या शाळेतले तिचे शिक्षक, ती बरी व्हावी म्हणून अनेक धोके पत्करणारा तिच्या आश्रमातला तरुण, तिला आपल्या घरी राहायला नेणारी तिची केअरटेकर- असे अनेक जण बर्नाडेटला माणसांत आणायचा प्रयत्न करतात. पण आपल्या आईजवळ राहावं, लहान भावंडांबरोबर मोठं व्हावं- ही तिची लहानशी इच्छाही पूर्ण होत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून ती अधिकाधिक हिंसक बनू लागते. तिला घरी नेलं तर ती लहान भावंडांशी कधी कशी वागेल, याची आईच्या मनात सतत भीती असल्याने तिला तर बर्नाडेटला घरी न्यायचंच नाहीये. जेमतेम पैसे देणारी नोकरी आणि घर सांभाळता-सांभाळता तिला आपलंच आयुष्य मार्गी लावता येत नाहीये; तर अशा मानसिक  आजार असलेल्या मुलीची काळजी ती कशी घेणार? मुलीवर प्रेम नाही असं नाही, पण परिस्थितीपुढे ती हतबल आहे.

हा सिनेमा पाहताना आईची आणि त्या लहानग्या मुलीचीही हतबलता आपल्यापर्यंत तितक्याच तीव्रतेने पोचते. आईची चूक नाही, हे जाणवतं; पण तरीही बर्नाडेटच्या शोकांतिकेला ती मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे, हेही लक्षात येतं. तिच्या आजूबाजूच्यांचे प्रयत्न निष्फळ होताना दिसतात, तेव्हा आपणही त्यांच्याबरोबर हळहळतो. त्यांची पोटतिडीक आपणही अनुभवतो.

सिनेमा संपतो तेव्हा एक वेगळीच गोष्ट पाहायला मिळाल्याची जाणीव असते. दोन तास आपण बर्नाडेटच्या जगात वावरतो. मात्र ‘सिस्टिम क्रॅशर’ प्रामुख्याने लक्षात राहतो तो बर्नाडेटची भूमिका करणाऱ्या हेलेना झेन्गल या मुलीच्या अप्रतिम अभिनयामुळे. वर्गातल्या मुलांना मारामारी करून जखमी करणारी जंगली मुलगी, शहरापासून दूर निसर्गाच्या सहवासात मुक्तपणे वावरायला मिळाल्यावर थोडीफार शहाणी झालेली, फोनवर कबूल केलंय म्हणजे आई आपल्याला घरी न्यायला नक्की येईल या विश्वासावर जगणारी आणि ती येणार नाही हे कळल्यावर मोडून गेलेली, तिच्यासाठी जिवाचं रान करणाऱ्या पुरुषामध्ये आपला बाप शोधणारी... अशा विविध मनोवस्था या छोट्या मुलीने इतक्या परिणामकारकतेने साकारल्या आहेत की, थक्क व्हायला होतं. या वर्षीच्या बर्लिनालेमध्ये स्पर्धेसाठी या सिनेमाची निवड करण्यात आलेली होती.

.....

गेल्या वर्षीच्या लोकार्नो इथल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये फीप्रेसीचं पारितोषिक पटकावणारा ‘सिबेल’ हा सिनेमा मला सगळ्यात प्रभावी वाटला. चागला झेनसिरसी आणि ग्वालोम जिओव्हॅनेटी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. 25 वर्षांची सिबेल बोलू शकत नाही. वडील आणि धाकट्या बहिणीबरोबर टर्कीच्या डोंगराळ भागातल्या एका गावात ती राहतेय. बोलता येत नसलं तरी गावातली पूर्वापार चालत आलेली शिट्ट्यांची भाषा ती शिकलीये. एरवी कामाला वाघ असलेली ही मुलगी ‘बायको’ होण्याच्या लायकीची नाही, असं गावाने ठरवून टाकलंय. तिच्या लहान बहिणीसाठी मुलगे सांगून येताहेत, पण सिबेलचं नावही कुणाच्या ध्यानी येत नाही. सिबेल तशी जात्याच बंडखोर आहे. डोंगरावरच्या जंगलात एकटीच फिरत असताना ती सिगारेट ओढते. डोक्यावरची ओढणी काढून ठेवते. बूट घालून, बंदूक घेऊन गावकऱ्यांना त्रास देणाऱ्या लांडग्याचा शोध घेते.

एक दिवस जंगलात सिबेलला भेटतो एक बंडखोर. पोलिसांची नजर चुकवून जखमी अवस्थेत तो डोंगरातल्या गर्द झाडीत लपलाय. सिबेल त्याची काळजी घेते. त्याला बरं करते. हा पुरुष आपल्याकडे बिचारी मुकी मुलगी म्हणून बघत नाही, तो आपल्याशी बोलताना नॉर्मल माणसाशी बोलावं तसा बोलतो- हे तिला जाणवू लागतं आणि ती त्याच्या प्रेमात पडते. आपलं लग्न कधीच होणार नाही, हे माहीत असल्यामुळे त्याच्याबरोबर सेक्स करताना तिच्या मनात कोणतीही अपराधी भावना नसते. त्याच्याविषयी कोणालाही काही कळू देत नाही.

पण अशा गोष्टी लपून राहू शकत नाहीत. गावातल्या लोकांमध्ये कुजबूज सुरू होते. पोलिसांच्या कानांवर गोष्टी पडतात. ते जंगलात शोध घेतात, पण तोवर हा पुरुष पळून गेलेला असतो. तो परत येणार नाही याची खात्री सिबेलला असते, तिची तशी अपेक्षाही नसते. मात्र, तिच्या या वागण्याचा परिणाम तिच्या बहिणीला भोगावा लागतो. बहिणीचं लग्न मोडतं आणि सगळा दोष सिबेलवर येतो. आजवर तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे तिचे वडीलही तिला माफ करत नाहीत. पण यामुळे मोडून पडणारी सिबेल नसतेच. गावाच्या आणि वडिलांच्या विरोधात जाऊन ती बहिणीला शहरात जाऊन शिक्षण घ्यायला तयार करते.

सिनेमाच्या शेवटी बसमध्ये खाली मान घालून बसलेली बहीण आपल्याला दिसते. रस्त्यावर उभी असलेली सिबेल तिच्या जवळ जाते. हळुवार हाताने तिची मान सरळ करते आणि बसमधून बाहेर पडते. बहिणीच्या चेहऱ्यावर एक पुसटसं हसू येतं आणि सिनेमा संपतो.

नंतरचा बराच काळ सिबेल आपल्याबरोबर रेंगाळत राहते, मनाला उभारी देते. सिनेमा बघायला आलेल्या अंकारामधल्या तरुण मुलींनी केलेल्या टाळ्यांच्या कडकडाटामधून मला तरी असंच वाटलं. 

Tags: मीना कर्णिक Sibel Flesh out System Crasher A journey to a mother's room Woman Director Meena Karnik weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके