सन 1955 मध्ये मराठी कादंबरीस केंद्र करून 'आधुनिक मराठी कादंबरीतील प्रवाह' या विषयावर आधारित ज्येष्ठ समीक्षक व. दि. कुलकर्णी यांनी मुंबई आकाशवाणीवरून घेतलेली वि. स. खांडेकर यांची प्रदीर्घ मुलाखत. यातून वि. स. खांडेकरांच्या कादंबरीलेखनाचा पट अलगद उलगडतो. ही मुलाखत मेहता प्रकाशनाकडून 2008 मध्ये आलेल्या 'ऋतु न्याहाळणारं पान' या पुस्तकात आहे, खांडेकरांच्या 22 मुलाखती या पुस्तकात आहेत, त्याचे संपादन सुनीलकुमार लवटे यांनी केले आहे.
प्रश्न : मला पहिला प्रश्न असा विचारावासा वाटतो की, लेखन करावं असं तुम्हाला केव्हापासून वाटू लागलं ?
- वयाच्या आठव्या-नवव्या वर्षापासून माझी लेखक होण्याची इच्छा मला आठवत आलेली आहे. ह्या आठव्या-नवव्या वर्षी माझे वडील आजारी पडले होते. मी शनिमहात्म्याची पोथी वाचीत असे, त्यांना बरं वाटावं म्हणून. आणि शेवटी मला असं वाटायला लागलं की, त्या कथेवर आपणच एखादं नाटक लिहिलं तर ते मोठं मनोरंजक होईल. ते नाटक मी लिहून पाहिलं. अर्थात ते कोणाला दाखविलं नाही आणि त्यामुळेच खरोखर मी बचावलेलो आहे आतापर्यंत.
प्रश्न : म्हणजे तुमचा पहिला प्रयत्न नाट्यलेखनाचा.
- हो. पहिला नाट्यलेखनाचा प्रयत्न करण्याचे कारण मी सांगलीत सबंध नाटकाच्या वातावरणात वाढलेलो. तिथून मी लिहीत राहिलो, लिहिण्याचे प्रयत्न करीत राहिलो असं म्हणणं अधिक बरोबर होईल. कधी कविता कर, कधी गोष्ट लिही, कधी अन्य काही तरी कर, परंतु हे करीत होतो. दाखवीत मात्र नव्हतो कोणाला. कॉलेजमध्ये येईपर्यंत हे माझे उद्योग चाललेले होते. कॉलेजमध्ये आल्यानंतर राम गणेश गडकऱ्यांशी ओळख झाली. त्यांना मी माझ्या काही कविता वाचून दाखविल्या. त्यांनी त्या जाळून टाकायला सांगितल्या. मग मी पुन्हा असा विचार केला की, माझी अजून काही तयारी झालेली नाही. गडकरींसारख्या मनुष्याला जर असं वाटतंय की मी अद्याप प्रकाशित करू नये, तर काही करू नये. त्यामुळे 1919 पर्यंत माझं प्रकाशित असं काही झालेलं नाही. परंतु, वयाच्या अवघ्या आठव्या-नवव्या वर्षापासून 1919 पर्यंत मी सतत लिहीत होतोच.
प्रश्न : आपलं पहिलं प्रकाशन केव्हा झालं ?
- 1919 मध्ये 'उद्यान,' 'नवयुग' या मासिकांतून माझे विनोदी लेख, विनोदी कविता वगैरे प्रसिद्ध होऊ लागल्या.
प्रश्न : बरं, या तुमच्या साहित्यामागे ज्या प्रेरणा होत्या, त्या वैयक्तिक होत्या की सामाजिक, राजकीय, धार्मिक ? त्या नेमक्या कोणत्या स्वरूपाच्या होत्या?
- मुख्यतः दोनच प्रकारच्या प्रेरणा म्हणता येतील. एक, वैयक्तिक की आपल्याला काही एक कल्पना सुचलेली आहे, ती मोठ्या सुंदर रितीने सांगावी ही एक मनातली इच्छा. आणि दुसरी अशी की, आपण भोवतालचा समाज पाहतो त्यातल्या ज्या गोष्टींची प्रतिबिंबं आपल्या मनात पडतात, जी सुख-दुःखं आपल्याला जाणवतात, याविषयी काही तरी सांगण्याचा प्रयत्न करावा. माझं विनोदी लेखन सुरू झालं आरंभाला, ते सगळं सामाजिक टीकेच्या स्वरूपाचं होतं. माझी कविता प्रसिद्ध होऊ लागली, तिच्यामध्येही पुष्कळ वेळा केशवसुतांच्या 'तुतारी' सारख्याच कल्पना असायच्या अर्थात.
प्रश्न : या ज्या प्रेरणा तुम्हाला झाल्या किंवा हे सामाजिक किंवा वैयक्तिक विचार आले, त्यांना वाङ्गयीन आविष्कार देण्यासाठी तुमच्यापुढे काही वाङ्गयीन आदर्श असतील त्या वेळचे, ते नेमके कोणते होते ?
- हे अगदी लहानपणापासून होते. पाचव्या-सहाव्या वर्षापासून श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांची नाटकं पाहणं, त्यांची नाटकं वाचणं हा एक माझा उद्योग होता. त्यामुळे प्रथमपासूनच मला कोल्हटकरांची शैली आवडत आली. त्यामुळे लिहावं ते कोल्हटकरांसारखं, 'सुदाम्याच्या पोह्यां' सारखं, 'मूकनायक' नाटकासारखं, ही माझी लहानपणापासूनची प्रवृत्ती होती. त्यामुळे मी जेव्हा काही व्यक्त करायला लागलो उदाहरणार्थ, 'उद्याना'त जे काही माझे विनोदी लेख प्रसिद्ध व्हायला लागले, त्यावर उघड उघड कोल्हटकरांची छाप आहे. त्यानंतर हरिभाऊ आपटेंचा परिणाम माझ्या मनावर झाला, तो मधल्या वयामध्ये. म्हणजे मी कॉलेजला येण्याच्या सुमाराला. त्या वेळेला एक गोष्ट माझ्या लक्षात आली की, श्रीपाद कृष्णांची चमत्कृती कितीही प्रिय असली तरी हरिभाऊंची अनुभूती ही त्याच्यापेक्षाही काहीतरी सखोल व तीव्र आहे. आणि वाङ्ख्याचे काही कार्य असेल तर ते अनुभूती व्यक्त करणे हे आहे. त्यामुळे हरिभाऊंसारखं काहीतरी लिहावं ही इच्छा माझ्या मनात उत्पन्न झाली, त्यामुळे 1919 मध्येच मी कथा लिहिली - 'घर कुणाचे?' परंतु, ती कथा अद्याप माझ्या कुठल्याच संग्रहात प्रसिद्ध झालेली नाही. (ती आता 'भाऊबीज' मध्ये संग्रहित आहे. संपादक) मी सावंतवाडीतील एक अत्यंत दुःखदायक कहाणी ऐकली आणि त्या सबंध रात्री झोप न आल्यानं मी ती लिहिली. मला वाटलं, ही गोष्ट काही बरी लिहिलेली नाही, म्हणून मी ती दडवून ठेवली. त्या काळात 'महाराष्ट्र साहित्य' नावाचं मासिक निघत असे. चार वर्षांनी त्याला देण्याकरिता माझ्याकडे एकही कविता नाही, एकही लेख नाही, एकही टीका नाही असं झालं, त्या वेळेला मी ती त्यांच्याकडे पाठविली. आणि ती गोष्ट छापून आल्यावर कोल्हटकरांनी मला पत्र पाठविलं की, 'ती गोष्ट मी एका बैठकीत तीनदा वाचलेली आहे. तुम्ही कथालेखक बनण्याकरिता जन्माला आलेले आहात, तेव्हा तुम्ही हे बाकीचं सगळं सोडून द्या आणि कथा लिहायला लागा.'
प्रश्न : इथे एक शंका माझ्या मनात येते. आविष्काराच्या दृष्टीने तुमच्या मनावर कोल्हटकरांचा पगडा आणि अनुभूतीच्या दृष्टीनं हरिभाऊंचा पगडा. हे दोन भिन्न संप्रदाय आहेत. हा संकर तुम्हाला झेपला कसा ?
- 'झेपला' म्हणजे यशस्वी रितीनं झेपला की अयशस्वी रितीनं हे तुम्ही ठरवायचं आहे; पण संकर झाला खरा हे मी तुम्हाला सांगू शकतो. ह्या दोन्ही व्यक्ती मला किती प्रिय होऊन राहिलेल्या आहेत, याची कल्पना तुम्हाला 'ययाति'च्या अर्पणपत्रिकेवरून येऊ शकेल. तेव्हा सदैव मला वाटत आलं होतं की, ह्या दोन्ही गोष्टी मी एकत्रित नांदवू शकेन. त्यामुळे मी कोल्हटकरांच्या शैलीचा त्याग सर्वस्वी असा कधीच केला नाही. अद्यापिही नाही. 'ययाति'ची शैली ही मुख्यतः कुणाची आहे? असं विचारलं तर ती कोल्हटकर संप्रदायाची शैली आहे; परंतु त्याबरोबरच असं म्हणता येईल की, 'अश्रू' कादंबरीमध्ये सगळा आशय हरिभाऊंच्या कादंबरी पद्धतीचा आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी मला सतत प्रिय राहिलेल्या आहेत. त्याला मी यशस्वी रितीने एकत्रित करू शकलो की नाही, हे तुम्ही ठरवायचं आहे.
प्रश्न : तुम्ही जे वेगवेगळ्या प्रकारचं वाङ्गय लेखन केलंत, त्यामध्ये कादंबरीलेखन हेच तुम्ही आविष्काराचे उत्तम साधन मानता का? का इतर कोणतं आहे?
- नाही. मला असं वाटतं की, कादंबरीपेक्षा लघुनिबंधामध्ये माझा स्वतःचा आत्माविष्कार जास्त चांगल्या रितीने व्यक्त झालेला आहे. तिथं मला थोडंसं अधिक मोकळेपण लाभतं. लघुकथेमध्ये, कादंबरीमध्ये, चित्रपटकथेमध्ये निरनिराळ्या दृष्टींनी कित्येक वेळा बाह्य कारणांनी, तर कित्येक वेळेला अंतर्कारणांनी मनुष्य बांधला जातो. लघुनिबंधामध्ये मात्र मला कधीही, कुणीही बांधून टाकलेलं नाही.
प्रश्न : तेव्हा तुमच्या भावना आणि विचार त्यामध्ये अधिक प्रसन्नपणे व्यक्त होतात ?
- होय. जास्त प्रसन्नपणे व्यक्त होतात. मी कादंबरी लिहायला लागलो, त्याचे कारण लघुकथेद्वारा वा लघुनिबंधाद्वारे व्यक्त करता येणार नाही आणि व्यक्त करायचं झालं तर नाटक हेच एक दुसरं माध्यम मिळू शकेल, असे मला वाटू लागले. मी शिरोड्याला एका बाजूला असल्यामुळे आणि मराठी रंगभूमीही तेव्हा, चांगल्या परिस्थितीत नसल्यामुळे मी नाटकांकडे वळलो नाही. जरी मी नाटककार मुळापासून होणार म्हणून म्हणत होतो ना, तरी अर्थात झालो नाही.
प्रश्न : कादंबरीकार अखेर झालात?
- हो. आणि पुढे चित्रपटकथा हाताशी आल्यामुळे नाटककार होण्याची फारशी गरजही राहिली नाही.
प्रश्न: बरं, मग या कादंबऱ्यांमध्ये गेल्या तीस वर्षांमध्ये काही विकासाचे टप्पे असे दिसतात का? एक 'उल्के 'पर्यंत दिसतो, नंतर 'क्रौंचवध 'पर्यंत दिसतो आणि त्यानंतर आजचा असे टप्पे पडण्याची काही विशेष कारणं आहेत का?
- आहेत. पहिल्यांदा मी लिहायला लागलो तेव्हा कादंबरी लिहू शकेन की नाही याबद्दल साशंक होतो. म्हणजे तो माझा अगदी उमेदवारीचा काळ, तुम्हाला तो मानावा लागेल.
प्रश्न : 'हृदयाची हाक...'
- हो. 'हृदयाची हाक' आणि 'कांचनमृग' ह्या दोन कादंबऱ्या. जवळजवळ उमेदवारीच्या काळातील आहेत. गडकरी म्हणत असत की, शेवटच्या ओळीतच खरा कवी सापडतो, त्याप्रमाणं 'हृदयाच्या हाके'त जे थोडंसं माझं असेल ते तुम्हाला शोधूनच काढावं लागेल. मी जे वाचलं होतं आणि जे काही कादंबरीत असावं असं मला वाटत होतं, ते सगळं त्या कादंबरीत आलेलं आहे. 'कांचनमृगा'मधील विषय खरोखर माझा आवडता, अनुभवलेला असा आहे. तथापि, त्यास मी फारसं सुंदर स्वरूप देऊ शकलो नाही, ही माझी मला जाणीव झाली. ही कादंबरी फार लोकप्रिय होती, पण मी फार असंतुष्ट होतो. म्हणून पुढे तीन वर्षे गप्प बसलो. चांगली कादंबरी लिहिता यायला पाहिजे म्हणून. आणि 'उल्के 'कडे मी आलो तेव्हा स्वच्छ रितीनं मला असं वाटलं की हा माझा मार्ग आहे. इथं हरिभाऊ आपटे नाहीत, वामनराव जोशी नाहीत, फडके नाहीत, कोणी नाहीत. मी माझ्या मार्गानं पुढे जातोय. आणि त्यामुळे 'उल्के'पासून मी खरा कादंबरीकार झालो, असं सदैव म्हणत आलोय आणि 'उल्के 'लाच मी माझी प्रिय कन्यका मानीत आलोय.
प्रश्न : म्हणजे हे 1934?
- हो. ती 1934 मध्ये प्रसिद्ध झाली.
प्रश्न : क्रौंचवध 1942 मध्ये ?
- हो.
प्रश्न : म्हणजे यांच्यामध्ये काही विकासाचा मार्ग दिसतो का ?
- आहे. ही दहा वर्षे खरोखर एका अर्थाने माझ्या जीवनातील बहराची वर्षे होती, निरनिराळ्या दृष्टींनी. त्याचबरोबर मी कादंबरीलेखनाचे जे प्रयत्न करीत होतो, त्यांच्यात निरनिराळ्या प्रकारचे विभाग पडलेले आहेत. उदाहरणार्थ, 'उल्का' आणि 'दोन ध्रुव' हे माझे पहिले अनुभव होते. शिरोडा, त्याच्यातील पंचक्रोशी आणि त्याच्यातील दलितवर्ग असे त्यांचं दुःख व्यक्त करण्याची एक प्रामाणिक तळमळ मला लागलेली होती. त्या तळमळीचे स्वरूप त्यांच्यात व्यक्त झालेलं आहे. ते शक्य तितक्या कलात्मक रितीनं व्हावं ही धडपड त्यात आलेली आहे. त्यानंतर 'हिरवा चाफा' आणि 'दोन मनं' ह्या दोन कादंबऱ्या मी लिहिल्या, त्यांमध्ये मला स्वतःला असं वाटलं की, अधिक मनोरंजक रितीने ह्या कादंबऱ्या आपल्याला मांडता येतात की नाही हे पाहावं. इथं आपणाला असं आढळून येईल की, माझ्या कुठल्याही कादंबऱ्यांचं फडकेंशी थोडंसं नातं असेल तर ते या दोन कादंबऱ्यांमध्ये आहे. त्यानंतर मध्यमवर्गीय कुटुंबांविषयी विचार करता करता मला असं वाटलं की, कौटुंबिक जीवनाची हरिभाऊंच्या काळापेक्षा काहीतरी निराळ्या प्रकारची स्थिती आता प्राप्त झालेली आहे. ते चित्रण आपण करून बघावं. मग 'रिकामा देव्हारा' आणि 'सुखाचा शोध' लिहिल्या. 'सुखाचा शोध' ही कादंबरी तुम्हाला त्या वेळच्या एकंदर जीवनाच्या दृष्टीनं नवीन वाटू शकेल; आणि त्यानंतर मी 'पहिलं प्रेम' आणि 'जळलेला मोहोर' या दोन कादंबऱ्या लिहिल्या. त्या काळचे लेखक ज्यांची उपेक्षा करीत असत अशा विषयांवर (कामभावना, कामवासना, तिची विविध स्वरूपं) त्या दोन कादंबऱ्या लिहिल्या. पुन्हा 'पांढरे ढग' आणि 'क्रौंचवध' मध्ये त्या एका दशकामध्ये आपल्या समाजामध्ये जी काही परिवर्तने झालेली होती (गांधीवाद, समाजवाद, भोवतालच्या गोष्टी, सुख-दुःख), त्यांचं चित्रण करण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटलं की, या दशकातला माझा प्रवास व्यवस्थित झाला आहे.
प्रश्न : पण मग 'क्रौंचवधा'नंतर पुन्हा तुम्ही दहा वर्षे थांबला, हे कादंबरी लेखन सहेतुकपणे थांबविलं होतंत का ?
- हो. कादंबरीलेखन मी सहेतुकपणे थांबविलं होतं. मी कादंबऱ्या लिहायला घेतलेल्या होत्या. विषयही सुचले होते, मनामध्ये काही तयारीही झालेली होती; परंतु 1942 नंतर पूर्वीच्या पद्धतीने मला कादंबरी नीट लिहिता येईना, हे याचं खरं कारण आहे. पूर्वी काय होत असे की, कादंबरी माझ्या मनामध्ये फुलून येत असे. फुलल्यानंतर ती अर्थात चटकन कागदावर उतरली जात असे. ती फुलेनाशी झाली. कारणं अनेक असू शकतील. कदाचित माझ्या वयाची पंचेचाळिशी तिथं आली होती, हे एक कारण असू शकेल. देशातील परिस्थिती, बेचाळीसमधील भूमिगत चळवळ मी पाहिलेली होती आणि तिच्याविषयी चिंतन करताना माझ्या मनामध्ये नाना त-हेच्या शंकाकुशंका निर्माण झालेल्या होत्या. दुर्दैवाने नंतरच्या काळात त्या खऱ्याही ठरलेल्या आहेत. तिथून माझ्या चिंतनाला निराळं वळण लागलं. पूर्वी ज्या दृष्टीनं मी सामाजिक गोष्टींकडे किंवा सुधारणांकडे पाहत होतो, त्यापेक्षा निराळ्या दृष्टीनं त्यांच्याकडे मी पाहू लागलो.
प्रश्न : दुसऱ्या महायुद्धाचा परिणाम तुमच्या विचारांवर पुष्कळ झालेला दिसतो आहे ?
- हो. त्या वेळेला अतिशय झाला. त्यामुळे कोणतीही कलाकृती पूर्ण करण्याला लागणारं जे मानसिक स्वास्थ्य पाहिजे होतं, ते मला कधीही त्या काळात मिळालेलं नाही. कौटुंबिक गोष्टी किंवा इतर गोष्टी मी दुय्यम मानतो. जर मानसिक स्वास्थ्य पूर्ण असेल तर आठ-पंधरा दिवसांतसुद्धा मनुष्य एखादी चांगली कादंबरी, एक लहान कादंबरी लिहून पूर्ण करू शकेल. त्यानंतर दहा वर्षे मी मुद्दाम गप्प बसलो. आणि असा गप्प बसल्यानंतर मला आढळून आलं की, जी भीती वा शंका माझ्या मनात निर्माण झालेली होती ती खरी ठरली. पूर्वी आमची अशी समजूत होती की, आपलं राष्ट्रीय चारित्र्य भारतीय संस्कृतीमधून निर्माण झालेलं आहे. स्वातंत्र्य प्राप्त झाल्याबरोबर ते विकसित होत जाणार आहे. प्रत्यक्षात अधः पतित होत आहे याची जाणीव मला तीव्रतेने झाली. त्या अधःपतित राष्ट्रीय चारित्र्यांमध्ये गांधीजींपासून, टिळकांपासून ध्येयवाद घेऊन आलेल्या माणसांची कुतरओढ होणार आहे याचं जे स्वप्न मला पडलं, त्याचं वर्णन 'अश्रू'मध्ये मी चित्रित केलेलं आहे, अर्थात -
प्रश्न : 'अश्रू 'नंतर 'ययाति' कादंबरी लिहिताना तिथं तुम्हाला समाजमनच प्रकट करायचं होतं, पण मग पौराणिक कथेचा आधार का घ्यावासा वाटला ?
-'अश्रू'च्या पुढं जाण्याची माझी इच्छा होती. सामाजिक पद्धतीनं जी शोकांतिका लिहायला पाहिजे, त्यासाठी लागणारी सर्व शक्ती माझ्यापाशी नाही, असं माझं मलाच वाटायला लागलं. कदाचित लेखकाची प्रतिभा क्षीण होऊ लागल्यानंसुद्धा तसं झालं असेल, पण मला तसं वाटायला लागलं ही गोष्ट खरी आहे. मला वाटलं की, 'क्रौंचवध', 'अश्रू' या पद्धतीनं मी गेलो आणि माझ्या भोवतालचं उद्ध्वस्त होऊ घातलेलं जीवन चित्रित केलं, तर ते मला पुरेपणे व कलात्मकतेनं चित्रित करता येणार नाही. मग अशा स्थितीत विचार करीत असताना मला असं आढळून आलं की, हे दुसऱ्या एका मार्गानं करता येईल. खाडिलकरांनी ज्याप्रमाणे आपल्या सगळ्या राजकीय कथा नाटकाच्या द्वारानं, पौराणिक कथांच्या द्वारानं सांगितल्या, त्याप्रमाणेच माझी व्यथा पौराणिक कादंबरीच्या द्वारानं सांगता येईल असं मला वाटायला लागलं. लहानपणापासूनच मला पुराणाची आवडही होती. मध्यंतरी चित्रपटांच्या काळात दिग्दर्शक विनायकांकरिता 'मत्स्यगंधा' मी लिहिलेली होती आणि अन्य काही चित्रपट लिहिलेले होते, त्यामुळे स्वाभाविकपणेच ही 'ययाति'ची कथा माझ्या हाताला आली.
प्रश्न : याच्या अगोदर मात्र पौराणिक कथांसंबंधी तुम्ही काही लिहिल्याचं लोकांना माहीत नव्हतं; म्हणून लोकांना एकदम नवीन वाटलं.
- नवीन वाटलं ही गोष्ट खरी आहे; परंतु 'सागरागस्ती आला' ही रूपककथा मी गांधीजींच्या दांडी यात्रेच्या वेळेला लिहिली, हे लोकांच्या लक्षात यायला पाहिजे होते. तेव्हा 'क्रौंचवध', 'कांचनमृग' घेता आलं असतं. मला वाटतं हे सरळ आहे, सोपं आहे अगदी.
प्रश्न : बरं, मग आपली सर्वांत आवडती कादंबरी कोणती ?
- तशी कोणतीही नाही. तीन-चार कादंबऱ्या मला आवडतात. त्यांत 'उल्का' ही मला का आवडती हे मी सांगितलं आहे. अर्थातच 'अश्रू' ही 'क्रौंचवधा' नंतर 10 वर्षे गेल्यानंतर मी लिहू शकलो; यामुळे मला खरोखर ती आवडली. कारण मला ती कादंबरी ज्या स्वरूपाची व्हायला पाहिजे होती, तशी ती झालेली आहे. ती कादंबरी वाचवत नाही लोकांना. एका अर्थानं ते कादंबरीकाराला मिळालेलं शिफारसपत्रच आहे असे मी मानतो. आणि 'ययाति' ही कादंबरी अर्थात मला पद्यात्मक आणि ज्या तऱ्हेची शैली पाहिजे होती काव्यात्मक शैलीचा विलास त्या दृष्टीनं आवडली; पण 'ययाति'पेक्षा अधिक चांगली कादंबरी मला अजून लिहायची आहे.
प्रश्न : तशी योजना आहे आपली ?
- आहे.
प्रश्न : आणखी एक प्रश्न असा उपस्थित होतो की, कादंबरी लिहून झाल्यानंतर त्याला एक प्रस्तावना लिहायला पाहिजे किंवा पार्श्वभूमी लिहायला पाहिजे असं तुम्हाला का वाटतं ?
- प्रथमतः अशा प्रस्तावना मी लिहीत नव्हतो. 'पांढरे ढग'च्या वेळेला ही प्रस्तावना लिहावयाला लागलो. कारणं अशी झाली की, कादंबरीवर जी टीका होत असे त्यामध्ये मुख्यतः कादंबरीचा विषय किंवा लेखकाची भूमिका ह्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असे. 'जळलेला मोहोर' या कादंबरीचा विषय फार विचित्र होता आणि या विचित्र विषयाचा परामर्श उत्तम रितीने फक्त डॉ. चिटणीस यांच्याव्यतिरिक्त कोणीही घेऊ शकलं नाही. तेव्हा मला वाटलं की, आपण जे प्रयोग करतोय - विषयांचे, कथानकाचे किंवा नव्या गोष्टींचे त्याविषयी आपली भूमिका काय आहे हे वाचकांना स्पष्टपणाने कळलं, तर ते अधिक चांगल्या तन्हेनं रसग्रहण करू शकतील. ह्या भूमिकेतून मी प्रस्तावना लिहावयाला सुरुवात केली. त्या लोकांना आवडायला लागल्या, त्यामुळे मी त्या सतत लिहीत गेलो.
प्रश्न : प्रस्तावनेमुळे वाचकांची एक प्रकारची बंदिस्त अशी दृष्टी होते, कादंबरीच्या रसग्रहणास ते उपकारकच ठरेल, अशी तुम्हाला खात्री वाटते ?
- नाही. मी प्रथमतः प्रस्तावना पुस्तकाच्या आरंभी छापत होतो; परंतु मला अनुभव असा आला, त्यामुळे मी ती पुस्तकाच्या शेवटी छापू लागलो. आता जर तो वाचक पार्श्वभूमीसाठी कादंबरीच्या आधी प्रस्तावना वाचू लागला तर मी काहीही करू शकत नाही.
प्रश्न : या प्रस्तावनांमधूनच प्रश्न येतो तो असा की, 'जीवनासाठी कला' अशी जी भूमिका तुम्ही मांडली, ती खरोखरीच तुम्ही मनापासून मांडली का आणि आजही तशीच मांडाल का? ती अलगदपणे मांडता येते का?
- त्याविषयी मी थोडंसं सविस्तरपणे सांगतो. 'अभिषेक' या पुस्तकाच्या पार्श्वभूमीमध्ये मी लिहिलेलं आहे; पण त्याशिवायसुद्धा पुष्कळ सांगता येण्यासारखं आहे. 'जीवनासाठी कला' ही भूमिका मी कधीही अट्टाहासाने घेतलेली नव्हती. माझी सगळी भाषणं, अध्यक्षीय भाषणं तुम्ही वाचलीत तरी त्यांत (सामाजिक जाणिवेचा प्रचार असला किंवा संस्कारवादी कलेचा प्रचार असला किंवा त्याविषयी मी अनुकूल बोललो असलो) 'जीवनाकरिता कला' ह्या संकुचित शब्दप्रयोगाने जे सूचित होते ते मी कधी केलेलं नाही. परंतु, त्या काळांत घडलं असं की, 'कलेकरिता कला' असा फडकेंनी उच्चार केला. तेव्हा फडके आणि खांडेकर हे दोनच कादंबरीकार लोकांपुढे उभे होते आणि त्या दोघांच्या पद्धती भिन्न होत्या. त्यामुळे लोकांनी असं गृहीत धरलं की, ज्या अर्थी 'कलेकरिता कला' या पक्षाला फडके आहेत, त्या अर्थी 'जीवनासाठी कला' या पक्षाला खांडेकर आहेत.
प्रश्न : म्हणजे हे तुमच्यावरती लादलं गेलं ?
- आणि माझ्या पक्षात अत्रे असूनसुद्धा त्याचं पुढारीपण शेवटी माझ्याच वाट्याला आलं. परंतु, त्याला माझा इलाज नव्हता. मात्र, मी जीवनासाठी कला हा शब्दप्रयोग कुठंही वापरलेला नाही. क्वचित एखाद्या ठिकाणी आला असेल, पण तुम्ही माझी सर्व भाषणं पाहिलीत तर असं आढळून येईल की, संस्कारांच्या सामर्थ्यावर मी सतत जोर देत गेलो आहे.
प्रश्न : याबद्दल कोणीच वाद करणार नाहीत ?
- माझी भूमिका ही हरिभाऊंपेक्षा फारशी भिन्न नाही. शुद्धबोधवादी वाङ्गय हे कलावादी वाङ्गय होणार नाही केव्हाही, परंतु बोधवादी आणि कलावादी या वाङ्गयामध्ये संस्कारवादी वाङ्गय उभं राहतं. आणि मला असं पुनःपुन्हा वाटतं की, हरिभाऊंच्या वाङ्ख्यामध्ये बोध हा शब्द आपण टाकून देऊ; पण संस्कार आणि कला एकत्रित आलेल्या आहेत, तसं ज्या वाङ्गयात होऊ शकेल ते कलावादी किंवा संस्कारवादी किंवा प्रचारवादी किंवा बोधवादी वाङ्गयापेक्षा केव्हाही श्रेष्ठ मानलं पाहिजे.
प्रश्न : हे स्पष्टीकरण फार चांगलं मिळालं. आणिक एक मुद्दा असा आहे की, कादंबरीलेखनामध्ये रचनेचे आणि आविष्कारांचे वेगवेगळे प्रयोग आपण केलेत, त्यांच्या पाठीमागची तुमची भूमिका काय होती?
- भूमिका खरं सांगायचं म्हणजे फार मोठी अशी काही नव्हती. मी इंग्रजी कादंबऱ्या बऱ्याच वाचल्या असल्या, तरी लघुकथेमध्ये मी काही वेळेला हौसेने प्रयोग केलेले आहेत तसे कादंबरीमध्ये फार केलेले नाहीत. परंतु आविष्काराकरिता ज्या प्रकारचा प्रयोग मला इष्ट वाटला तो मी सतत करीत गेलो. उदाहरणार्थ, 'उल्का 'मध्ये उल्केचं आत्मनिवेदन आवश्यक आहे असं मला ज्या क्षणी वाटलं, त्या क्षणी मी ते आत्मनिवेदन करायला सुरुवात केली. माझ्या लगेच लक्षात आलं की, 'पण लक्षात कोण घेतो'चं आपण अनुकरण करतोय; बाकी काही करीत नाही. त्यानंतर मला असं वाटायला लागलं की, आत्मनिवेदन एका ठरावीक पद्धतीनंच करीत राहणं हे पुष्कळदा वाचकांना कंटाळवाणं होण्याचा संभव आहे. ह्याच्यापेक्षाही अधिक चांगली पद्धत म्हणजे अनेक पात्रांनी आत्मनिवेदन केलं तर निवेदनातला रुक्षपणा किंवा बोजडपणा जाऊ शकेल आणि एका पात्राच्या आत्मनिवेदनामध्ये जो कंटाळवाणेपणा असतो तोही जाऊ शकेल. आणि मग सर्व पात्रं एकमेकांवर प्रकाश टाकू शकतील; म्हणून या पद्धतीचा अंगीकार मी चार कादंबऱ्यांत केलेला आहे. माझी सर्वांत आवडती पद्धती कोणती म्हणून मला विचारलीत तर सर्व पात्रांनी आत्मनिवेदन ही आहे. 'क्रौंचवधा 'मध्ये याच पद्धतीचं उलटसुलट मिश्रण केलेलं आहे.
प्रश्न : भाषाशैलीसंबंधीसुद्धा एक विकास झालेला दिसतो. प्रारंभीची तुमची भाषा अधिक अलंकारिक वाटते; पण उत्तरोत्तर ती सुबोध होत गेलेली दिसते. याच्या पाठीमागची कारणं वैयक्तिक आहेत की लोकांची वाङ्गयीन अभिरुची बदलली किंवा लोक सूचकता ग्रहण करू शकले, वगैरे नेमकी कशात आहे?
- ही सर्वच कारणं खरी असतील. मी लिहू लागलो त्या वेळी अर्थात गडकरींनी जे नाटकात केलं ते आपण कथेत, कादंबरीत करायचं ही माझी प्राथमिक भूमिका. 1925-26 च्या माझ्या अगदी लोकप्रिय 'आंधळ्याची भाऊबीज' वाचल्या, तर असं आढळून येईल की, भाषाशैली या कथांना न कथा पेलणारी आहे. कथेतला भाववृत्तीचा आविष्कार होण्याला त्याच्या योगाने मदत होण्याऐवजी अडथळा झालेला आहे आणि याची जाणीव मला 1925-26 मध्येच व्हायला लागली. त्यामुळे माझ्या 1927 च्या कथा पाहिल्यात, तर त्या 26 सालापेक्षा अधिक सुगम, अधिक प्रसादपूर्ण अशा झालेल्या आढळतील. परंतु अशा रितीने मी अशा शैलीकडे येत असलो तरी मला फार मोठी जाणीव पहिल्यापासून होती की, हरिभाऊ आपटे फार मोठे कादंबरीकार असून हरिभाऊ आपट्यांच्या अनेक कादंबऱ्या चांगल्या कादंबऱ्या अर्थात - काव्यात्मकतेच्या अभावी दुबळ्या वाटतात. काही सपक वाटतात. काही ठिकाणी तर हरिभाऊंना काव्यात्मकतेची जोड असती तर त्यांनी ज्या तन्हेने कादंबऱ्या उभ्या केल्या असत्या, त्या त-हेने कादंबरी उभी करणं मराठीत आवश्यक आहे, असं मला वाटतं. त्यामुळे ह्या शैलीचा त्याग करायचा नाही, परंतु शैली कादंबरीला जेवढी लवचीक करता येईल तेवढी करून घ्यावयाची ही माझी दृष्टी पुढे 'उल्के 'पासून सतत राहिली आणि अर्थात लिहीत राहिल्यानं पुढं स्वाभाविकपणे हळूहळू त्याला अधिक प्रसन्नपणा, सोपेपणा येत गेला.
प्रश्न : प्रतीक योजना मात्र पहिल्यापासून दिसते ?
- होय.
प्रश्न : ती जास्त चांगली झाल्याचे 'क्रौंचवधा 'मध्ये जाणवते.
- ती 'कांचनमृगा 'मध्ये होती, पण ती बोजड होती. ती 'क्रौंचवधा'मध्ये तुम्हाला -
प्रश्न : पहिल्यांदा ती राबविली गेल्यासारखी वाटत होती, ती 'क्रौंचवधा 'मध्ये आपोआप आल्यासारखी वाटते.
- आणि मी रूपककथा लिहीत असल्यामुळे प्रतीक योजना मला सुचणे किंवा येणे हे अगदी स्वाभाविक आहे. 'सागरागस्ती'मध्ये जे आहे तेच इथं लक्षात येईल.
प्रश्न : तुमची कविता थांबली आणि तिचं रूपककथेत रूपांतर झालं ?
- हो, असं मला वाटतं.
प्रश्न : रूपककथांच्या विस्ताराची परिणती कादंबरीत झाली असं तुम्हाला म्हणायचं आहे ?
- होय. असं म्हणता येईल.
प्रश्न : मग इथंच असा एक प्रश्न येतो की, तुमचे पुष्कळ वाङ्गयप्रकार खंडित राहिले. नाट्यलेखन किंवा स्वतंत्र विनोदी लेखन. वास्तविक पाहता, कोल्हटकरांच्या गादीचे वारस म्हणून तुमची ओळख गडकरींनी करून दिली, तेव्हा स्वतंत्र विनोदी लेखन तुम्हाला सहज शक्य होतं आणि ते चांगलं झालेलं आहे. ते खंडित का राहिलं ?
- त्याची कारणं एवढीच सांगता येतील की, मी अनेक क्षेत्रांत शिरलो. मला स्वतःला असं वाटत आलेलं आहे की, माझं वाङ्गयीन कार्य जेवढं व्हायचं तेवढं चांगलं झालं नसेल, तर त्याचं कारण एवढंच आहे की, वाङ्ग्याच्या प्रत्येक क्षेत्रात लुडबूड करण्याचा मी प्रयत्न केला. मी स्वतः केला असं म्हणत नाही. कारण स्वभावानं मी लुडबूड करणारा नाही. मला ओढून नेण्यात आलं. प्रत्येक ठिकाणी. मला कादंबरी लिहावयाला लावली. मला चित्रपटात मुद्दाम नेण्यात आलं आणि अंगावर घेतलेलं काम मनःपूर्वक आपण एकदा करायला लागलो म्हणजे त्याच्यामध्ये आपला सबंध वेळ जातो, शक्ती खर्च होते. तर ज्या वेळेला मी लघुकथाकार झालो, त्या वेळेला मला वाटत होतं की, कथा तेवढी चांगली लिहायची आपलं काम. एके दिवशी असं घडलं की, आमच्या शाळेत क्रिकेट मॅच होती. तिचा मी अंपायर होतो आणि मला तो निकाल काही व्यवस्थित देता येईना. 'हाऊ इज देंट!' म्हटल्यानंतर मला काहीच कळेना; कारण माझं लक्षच नव्हतं. मी गडबडून जाऊन घरी आलो, त्या वेळेला मला असं वाटलं की, माझी ही मनःस्थिती मला कशी सांगता येईल? कथेने मला सांगता येईना, म्हणून एक लेख लिहिला.
प्रश्न : 'निकाल द्या.'
- 'निकाल द्या' म्हणून जो लेख मी लिहिला तो लघुनिबंध ठरला शेवटी. काय होतंय हे मला ठाऊकच नव्हतं; पण 'वैनतेय 'सारख्या सामान्य साप्ताहिकात प्रसिद्ध झाल्यानंतरसुद्धा लोकांना ते इतकं आवडलं की, त्या पद्धतीनं मला ज्या कल्पना यायच्या त्या मी लिहायला लागलो. लघुकथेत गेलो. लघुनिबंधात गेलो. कादंबरीत गेलो. चित्रपटात गेलो. तर या सर्वांमध्ये माझ्या या पहिल्या सोबतिणी होत्या. सगळ्या कवितेसारख्या. त्या मागं पडल्या.
प्रश्न : मग या सगळ्या वाङ्गयप्रकारांनी तुम्हाला कसकसा आनंद दिला?
- ते सांगता येण्यासारखं आहे. अर्थातच माझं जे प्राथमिक लेखन कविता, विनोदी लेख किंवा टीकालेखन होतं ते याच्यामध्ये. मला पुष्कळदा वाटतं की, लेखक या नात्यानं माझी जी पूर्वतयारी व्हायला पाहिजे होती ती पुष्कळशी त्याच्यात झालेली आहे. नंतर लघुकथा, लघुनिबंध, रूपककथा, कादंबरी, चित्रपटकथा या निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये मी सतत वावरत राहिलो. त्यातल्या रूपककथा आणि लघुनिबंध मी खरोखर केवळ माझ्या आवडीसाठी लिहिलेले आहेत. आपण वाङ्ख्याच्या बाजारात गेलो तर असं आढळून येईल की, ह्यांना तिथं तसा मोठा भावही नाही. लोकांच्या दृष्टीनं त्यांचं व्यावहारिक मूल्यंही नाही, परंतु मी मात्र हौसेने सतत लिहीत राहिलो.
प्रश्न : वैयक्तिक आनंद...
- अगदी वैयक्तिक कारणानं. इथं मी शुद्ध कलावादी आहे असं म्हटलं तरी माझी त्याला काहीही हरकत नाही. प्रथमतः मी लघुकथा लिहिली, त्या वेळी ती कलावादी दृष्टीनंच लिहिण्याचा प्रयत्न केला. परंतु सामाजिक जाणिवेचा जो पगडा माझ्या मनावर होता, तो फारसा दूर न झाल्यामुळे त्या पहिल्या लघुकथा शुद्ध कलात्मक अशा नाहीत. त्यांच्यानंतर 'दोन टोके', 'खून', 'तिचे डोळे' वगैरे ज्या गोष्टी आल्या, तिथे मी पुन्हा लघुनिबंधात जे अनुभवत होतो ते अनुभवण्याचा प्रयत्न केला. कादंबरीकडे मात्र शुद्ध कलावादी दृष्टीनं मी पाहिलं नाही आणि तसं पाहता येईल असं मला वाटतही नाही. कारण कादंबरी हीच सर्वांमध्ये अधिक मानवी जीवनामध्ये भोवतालच्या सगळ्या गोष्टी घेऊन येणारी असते. काव्य जेवढं शुद्ध राहतं, तेवढी लघुकथा राहत नाही. लघुकथा जेवढी शुद्ध राहते, तेवढी कादंबरी राहणार नाही. आणि चित्रपटकथेविषयी तर बोलायलाच नको; कारण खरं सांगायचं तर त्यात कला थोडी आणि कारागिरी पुष्कळ असते.
प्रश्न : आता सामर्थ्यानं तुमच्या साहित्यनिर्मितीकडे पाहता, तेव्हा त्यासंबंधी व्यक्तिशः आणि मराठी साहित्याचे समालोचक म्हणून तुमच्या मनात कोणती भावना दाटते ?
- एक सामान्य लेखक या नात्यानं मी सरस्वतीच्या मंदिरात चाळीस वर्षे उभा राहू शकलो, याचा एक भला मोठा आनंद मला आहे. या सरस्वती मंदिरात मी कधी टीकाकार म्हणून झाडलोट केली असेन, कधी ललित कथाकार म्हणून इकडली-तिकडली फुलं आणून त्या प्रतिमेला वाहिली असतील, कधी रूपक कथाकार होऊन एखादी वीणा वाजवीत बसलो असेन, आणखी काही तरी केलं असेन मी; ते किती चांगलं, किती वाईट हे सांगता येत नाही. परंतु माझ्या आयुष्याला साहित्यामुळे साहित्य लिहिण्यामुळे, साहित्य वाचण्यामुळे वेगळा अर्थ प्राप्त झाला. वस्तुतः, लिहिण्यापेक्षा मला वाचण्यात मोठा आनंद आहे आणि मी एखादा मोठा लेखक वाचतो तेव्हा मला असं वाटतं की, आपण लिहितो कशाला, आपण वाचतच राहावं. माझ्या विशेषतः आजाराशी टक्कर देणाऱ्या य जीवनाला फार मोठा आधार, दिलासा वगैरे लेखनाने दिलेला आहे; परंतु ह्या वैयक्तिक गोष्टी होतात. म्हणून मला असं वाटतं की, साहित्याच्या प्रांतात गेल्या चाळीस वर्षांत अंशतः प्रतिनिधित्व करणारा, एका बाजूनं कला आणि दुसऱ्या बाजूनं सामाजिक आशय यांची दोन्ही बाजूंनी कदर बाळगणारा, हरिभाऊ आपटे आणि श्रीपाद कृष्ण कोल्हटकर या मागच्या पिढीच्या दोन वेगवेगळ्या संप्रदायांच्या व्यक्तींचं मीलन घडवून आणण्याचा प्रयत्न करणारा एक लेखक, या नात्यानं माझं कुठं तरी स्थान आहे.
प्रश्न : बरं आहे भाऊसाहेब. तुम्ही स्वतः आपल्या कलानिर्मितीचं रहस्य, त्याला मिळणारी वेगवेगळी वळणं, त्याच्या पाठीमागच्या प्रेरणा हे सगळं सांगितलंत, हे फार बरं वाटलं आम्हाला. अगदी मनमोकळेपणाने आपण जे आत्मनिवेदन केलंत, त्यामुळे तुमच्या वाङ्गयाकडे फार डोळसपणाने पाहता येईल. आम्ही आपले फार आभारी आहोत.
संवादक : व. दि. कुलकर्णी
सुनीलकुमार लवटे यांनी संपादित केलेल्या, मेहता प्रकाशनाकडून आलेल्या 'ऋतु न्याहाळणारं पान' या पुस्तकातून.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या