ता. 5 मे पासून आचार्य जावडेकरांची ही लेखमाला साधनेत येत आहे. येती सार्वत्रिक निवडणूक म्हणजे भारतीय लोकशाही वृत्तीची एक परीक्षाच आहे. भारतात लोकशाही किती यशस्वी ठरते यावर जागतिक लोकशाहीचे भवितव्य अवलंबून आहे. आचार्य जावडेकरांनी वेगवेगळ्या पक्षाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील धोरणाचा उकल या लेखमालेत करून दाखविला असून तरुण मतदारांनी आपली मते ठरविताना कोणत्या कसोट्या लावाव्या याचे दिग्दर्शन केले आहे. या नवव्या लेखात त्यांनी स्वतःचे मत काय व ते कसे बनले, हे सांगितले आहे. ही लेखमाला आता पूर्ण झाली आहे.
तरुण मतदार बंधु-भगिनींनो, आपल्या देशात ज्या सार्वत्रिक निवडणुकी लवकरच होणार आहेत. त्या निवडणुकीत जे निरनिराळे पक्ष मतदारापुढे मताची याचना करणार आहेत, त्या पक्षाची सामान्य विचारसरणी कशा प्रकारची आहे, यासंबंधी विवेचन करणारे आठ लेखांक आतापर्यंत या लेखमालेत यापूर्वी येऊन गेले. आता या निरनिराळ्या पक्षापैकी कोणत्या पक्षास मत देण्याचे मी ठरविले आहे, ते सांगून त्याची कारणे थोडक्यात सांगावयाची आहेत. आतापर्यंतचे लेख ज्यांनी वाचले असतील त्यांच्या लक्षात आहेच असेल की, मी माझे स्वतःचे मत या सार्वत्रिक निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या उमेदवारास देण्याने ठरविले आहे. हा निर्णय घेताना मी कोणत्या विचारसरणीचा अवलंब केला आहे त्याचे विवेचन या लेखात करणार आहे.
मी कोणाला मत देणार?
लोकशाही राज्यपद्धतीत जेव्हा निरनिराळे राजकीय पक्ष आपल्या पक्षाला मते मिळविण्यासाठी प्रचार करीत असतात, तेव्हा सामान्य मतदारांना त्यापैकी कोणत्या पक्षाचे म्हणणे खरे आणि कोणत्या पक्षाला आपले मत द्यावे, याबद्दल एकप्रकारचा घोटाळा पडत असतो. अशा वेळी ज्यांनी निरनिराळ्या पक्षांची मते प्रथमपासून समजून घेऊन आपले मत कोणत्या पक्षास द्यावे याचा विचारपूर्वक निर्णय केलेला असतो, त्यांच्या मनात निवडणुकीच्या वेळी आपापल्या पक्षाच्या प्रचारासाठी जे बरे वाईट मार्ग निरनिराळ्या पक्षाचे प्रचारक अवलंबित असतात त्यांच्यामुळे कोणताही घोटाळा किंवा संभ्रम निर्माण होण्याचे कारण नसते. म्हणून आपल्या देशात निवडणुकींना उभे राहाणारे कोणकोणते पक्ष आहेत व त्यांचे विचार काय आहेत प्रत्येक सुशिक्षित मतदाराने समजून घेतले पाहिजे. आणि आपल्या मताचा निर्णय झाल्यानंतर तो निर्णय आपण का केला, यासंबंधी इतरांशी चर्चा करून आपला निर्णय बरोबर आहे किंवा नाही ते पारखले पाहिजे, आपला निर्णय बरोबर आहे, अशी आपली पक्की खात्री झाली असेल तर आपले मत इतर मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याच दृष्टीने मी माझे मत समाजवादी पक्षास देण्याचे का ठरविले आहे त्याचे स्पष्टीकरण तरुण मतदारांपुढे करण्याचे योजिले आहे. प्रथमतः आपल्या देशात जे निरनिराळे पक्ष निवडणुकींना उभे राहण्याचा संभव आहे. त्यांच्या मतासंबंधी मला काय वाटते ते आतापर्यंत मी मांडले. आता या विषयाचा अधिक काथ्याकूट न करता माझे मत मी समाजवादी पक्षास देण्याचे का योजिले आहे ते वाचकापुढे मांडून ही लेखमाला पुरी करीत आहे.
पक्षनिष्ठ आणि स्वतंत्र उमेदवार
निवडणुकीत आपले मत देण्यासाठी जाणाऱ्या प्रत्येक मतदाराने आपल्या मनाशी प्रथम हा निर्णय केला पाहिजे की आपले मत पक्षनिष्ठ उमेदवारास द्यावयाचे की ते कोणत्याही पक्षाच्या शिस्तीच बंधन न पाळणाऱ्या स्वतंत्र उमेदवाराला यावयाचे. या बाबतीत माझ्यापुरता माझा निर्णय असा आहे की, माझे मत मी स्वतंत्र उमेदवाराला न देता पक्षनिष्ठ उमेदवारालाच देईन. याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी प्रमुख कारण असे आहे की, आपण जे उमेदवार निवडून देऊ ते आमच्या देशातील लोकसभेचे पार्लमेंटचे किंवा प्रांतिक निवडणुकी असल्यास प्रांतिक विधिमंडळाचे सभासद व्हावयाचे आहेत आणि आपली मंत्रिमंडळे या लोकसभांना जबाबदार राहणार आहेत. म्हणजे ज्या पक्षाचे बहुमत या लोकसभात होईल त्या पक्षाच्या हाती कारभार जाणार. मंत्रिमंडळाचे सर्व सभासद कोणत्या तरी एका पक्षाचे असल्यावाचून त्यांच्या एकंदर कारभारात कोणतीही शिस्त राहात नाही. याचा अनुभव आपणास गेल्या चार वर्षात पुष्कळच आलेला आहे. आपल्या देशातील मध्य सरकार हा देश स्वतंत्र झाल्यापासून पं. नेहरू यांच्या मंत्रिमंडळाच्या हातात आहे, असे आपण म्हणतो; पण पं. नेहरू यांच्या या मंत्रिमंडळात जे सभासद आहेत, ते सर्व एकाच पक्षाचे सभासद नाहीत. पं. नेहरू स्वत: काँग्रेस पक्षाचे सभासद व नेते आहेत. परंतु त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री काँग्रेसपक्षाचे सभासद नसल्यामुळे त्या मंत्रिमंडळाच्या धोरणात सुसंगती राखणे पं. नेहरू यांना शक्य होत नाही. कायदेशीर दृष्टीने सर्व मंत्रिमंडळाच्या कृत्यांची व धोरणाची जबाबदारी पं. नेहरू यांच्यावर आहे व ती घेण्यास ते तयारही असतात. पण यामुळे या मंत्रिमंडळाच्या धोरणात खरी सुसंगती व शिस्त राहू शकत नाही. शिवाय पं. नेहरू हे स्वतः ज्या पक्षाचे पुढारी बनले आहेत त्या पक्षाचे राजकीय तत्त्वज्ञान आणि पं. नेहरू यांचे स्वतःचे राजकीय तत्त्वज्ञान यातही सुसंगती नाही.
पं. नेहरू राजकीय तत्त्वज्ञान लोकशाही समाजवादाचे आहे आणि म. गांधींच्या अनुयायीत्वामुळे त्यांनी सत्याग्रहाचे सत्यही सामान्य व्यवहारापुरते मान्य आहे. तथापि त्यांना इष्ट वाटणारे राजकीय तत्त्वज्ञान व त्यांनी म. गांधींच्या सहवासात आत्मसात केलेले सत्याग्रही विचाराचे त्यांच्या मनामध्ये विशिष्ट रसायन बनले आहे, त्याचे स्पष्ट स्वरूप त्यांनी अद्यापि पुढे मांडलेले नाही किंवा आपले विशिष्ट राजकीय विचार व त्यांना आधारभूत असणारे तत्त्व व धोरण काँग्रेस पक्षाला पटवून दिलेले नाही. याला अनेक ऐतिहासिक कारणे आहेत. पण ती असली तरी त्यामुळे जे काँग्रेस पक्षाचे सभासद आहेत अशा मंत्र्यांच्या धोरणातही एकसूत्रता व सुसंगती दिसून येत नाही हे स्पष्ट आहे. यामुळे पं. नेहरूच्या वैयक्तीक मतावरून काँग्रेस पक्षाचे राजकीय धोरण ठरविता येणे अशक्य झाले आहे. किंबहुना मंत्र्यांनाही आपल्या पक्षाचे निश्चित धोरण काय आहे, याचा स्पष्ट उलगडा झालेला नाही. यामुळे काँग्रेस पक्ष हा विशिष्ट राजकीय तत्त्वज्ञानावर उभारलेला पक्ष अद्यापि बनलेलाच नाही. पं. नेहरू हे समाजवादी विचाराचे असले तरी त्या दृष्टीने कोणतेही महत्त्वाचे पाऊल निदान आठ-दहा वर्षे तरी टाकण्याचे कारण नाही, असा निर्णय त्यांच्या पक्षाने घेतला असून तो त्यांनी मान्य केलेला आहे. आपल्या पक्षाला कोणत्याही विशिष्ट तत्त्वज्ञानाची किंवा ‘इझमची’ गरजच नाही असाच प्रचार ते प्रायः आपल्या भाषणातून करीत असतात.
शिस्तबद्ध व संघटित पक्ष हवा
माझे स्वतःचे मत असे आहे की, ज्यांना आपल्या देशातील राज्यकारभार करावयाचा असेल त्यांनी आपला ‘इझम’ काय आहे हे प्रथमतः लोकापुढे मांडलेच पाहिजे. आपल्या देशातील राज्ययंत्र आज समाजवादी पक्षाच्या हाती गेले पाहिजे असे मला वाटते. याचे कारण समाजवाद हाच आपल्या समाजापुढे जे दैनंदिन जीवनाचे प्रश्न उभे आहेत ते सोडवून दाखविण्यास समर्थ आहे, असा माझ्या बुद्धीचा ठाम निर्णय झालेला आहे. असा निर्णय ज्यांचा झाला असेल त्यांनी समाजवादी पक्षासच आपली मते दिली पाहिजेत. जर एखादा मनुष्य समाजवादी पक्षाचा सभासद नसताना असे म्हणू लागला की, ‘मी स्वतः समाजवादी मताचा आहे पण मी त्या पक्षाचा सभासद नाही. मी जर प्रामाणिक असेन व काम करण्यास लायक असेन तर तुम्ही मला आपले मत का देऊ नये?’ तर अशा उमेदवारास मी असे सांगेन की तू कितीही लायक असलास आणि कितीही प्रामाणिक असलास तरी तू निवडून येण्याने माझ्या देशात समाजवादाची संस्थापना तू कशी करू शकशील? तुला जर खरोखर आपल्या देशात समाजवादाची संस्थापना व्हावी असे वाटत असेल तर तुला ते ध्येय मान्य करणारा व त्यास अनुसरून आपले धोरण व कार्यक्रम आखून घेणारा एक अखिल भारतीय पक्ष तयार करावाच लागेल. असा पक्ष आपल्या देशात यापूर्वीच निदान पंधरा सोळा वर्षे स्थापन झालेला आहे. त्या पक्षात जाऊन तू त्या पक्षाला आपली लायकी आणि आपला प्रामाणिकपणा पटवून दे, आणि त्यांना पटले व त्या पक्षाची शिस्त तू पाळशील अशी खात्री झाली म्हणजे मी तुला माझे मत देईन.
मी जरी स्वतः समाजवादी पक्षाचा सभासद नाही, तरी आपल्या देशाची आर्थिक घटना समाजवादी व्हावी, अशी माझी इच्छा आहे. ही इच्छा सफल होण्याच्या दृष्टीन तुझ्यासारखा एखादा प्रामाणिक व लायक मनुष्य लोकसभेत निवडून येऊन काहीही कार्य होणार नाही. तुला त्या पक्षाची शिस्त मान्य नसेल आणि केवळ समाजवादी तत्त्वज्ञानाचा प्रचार करावयाचा असेल तर ते कार्य तू निवडणुकीस उभे न राहाता इतर मार्गांनी अधिक परिणामकारक रीतीने करू शकशील. आपल्या देशात समाजवादाची संस्थापना करावयाची म्हणजे एक सामाजिक व आर्थिक क्रांती घडवून आणावयाची आहे. ही क्रांती घडवून आणण्याच्या काम लोकांना अनेक प्रकारची कामे करावी लागतील. त्या सर्वच कामात पक्षनिष्ठेची अथवा शिस्तीची गरज लागते असे नाही. अशी कामे तू लोकसभांच्या व मंत्रिमंडळाच्या बाहेर राहून करू शकशील. पण समाजवादाच्या संस्थापनेसाठी लोकसभेत जाऊन व मंत्रिमंडळात शिरून जे कार्य करावयाचे ते एकट्या-दुकट्याने होण्यासारखे नाही.
एक शिस्तबद्ध संघटित पक्षच त्यासाठी पाहिजे. म्हणून मी कोणत्याही पक्षाची शिस्त पाळण्याचे बंधन न स्वीकारलेल्या तुझ्यासारख्या प्रामाणिक, लायक व्यक्तीलाही मत देणार नाही. केवळ प्रामाणिकपणा किंवा वैयक्तीक लायकी या दृष्टीने मी पंडित नेहरू यांना फार मोठे मानतो व ते समाजवादी आहेत असेही मानतो. ते स्वतः माझ्याकडे मत मागावयास जरी आले तरी मी त्यांना देणार नाही. कारण त्यांच्या पाठीमागे समाजवादी निष्ठेचा शिस्तबद्ध पक्ष आज नाही. तात्पर्य आपले मत कोणत्याही स्वतंत्र उमेदवारास न देता ते कोणत्यातरी पक्षाच्या उमेदवारास देणे हेच योग्य आहे व असा पक्ष समाजवादी मताचा व निष्टेचा असावा असे माझे या निवडणुकीसंबंधीचे धोरण आहे.
पक्षाचा उमेदवार नालायक असेल तर?
आता येथे असा दुसरा एक प्रश्न उपस्थित होतो की जर आपणास अभिप्रेत असणाऱ्या पक्षाने आपल्या मतदार संघात जो उमेदवार उभा केला असेल, तो नालायक असेल तर काय करावे? या संबंधीही प्रत्येकाने आपला निर्णय आधीच ठरविला पाहिजे. या बाबतीत उमेदवाराची लायकी कशी ठरवावी आणि त्याच्याकडून किती अपेक्षा करावी याचाही विचार केला पाहिजे. त्यापूर्वी प्रथमच एक गोष्ट सांगता येईल की, ज्या पक्षाला मी माझे मत देण्याचे ठरविले त्या पक्षाने उभा केलेला उमेदवार अगदीच नालायक अथवा अप्रामाणिक असेल तर त्याला मात्र मी मत देणार नाही. पण या परिस्थितीत मी आपले मत दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारास देईन असा मात्र याचा अर्थ होऊ शकणार नाही, अशा परिस्थितीत या पक्षाला मत द्यावे असे नाट त्या पक्षाने आपला उमेदवार निवडताना घोडचूक केली आहे, असे समजून मी आपले मत कोणासच देणार नाही.
उमेदवारांच्या लायकीचा विचार
जेव्हा एकाद्या मतदार संघांतील उमेदवारांच्या वैयक्तीक लायकीचा विचार आपण करीत असतो तेव्हा तो उमेदवार कोणत्या तरी एकाया पक्षातर्फे उभा राहिला आहे किंवा स्वतंत्र उमेदवार म्हणून उभा राहिला आहे, ते प्रथम पाहिले पाहिजे. एखाद्या पक्षाच्या वतीने उभा राहिलेल्या उमेदवाराची लायकी नालायकी ठरविण्याची कसोटी आणि कोणत्याही पक्षाचे बंधन न स्वीकारता उभा राहिलेल्या उमेदवाराची लायकी ठरविण्याची कसोटी या दोन भिन्न असल्या पाहिजेत. प्रथमतः निरनिराळ्या पक्षाच्या वतीने जे उमेदवार उभे राहातात त्यांच्या लायकी-नालायकीचा विचार कसा करता येईल हे पाहू. जेव्हा एखादा पक्ष सार्वत्रिक निवडणुकींना आपल्यातर्फे उमेदवार उभे करण्याचे ठरवितो तेव्हा आपणास एकंदर किती उमेदवार उमे करावयाचे ठरवितो, मग जितके उमेदवार उभे करावयाचे ठरविले असेल त्यांची निरनिराळ्या मतदार संघात विभागणी करण्यात येते. असे अनेक उमेदवार मिळून त्यांचा पक्ष होत असतो.
समजा, महाराष्ट्रात प्रत्येक पक्षाने शंभर उमेदवार उभे करण्याचे ठरविले तर त्या प्रत्येक पास शंभर उमेदवार सारख्याच लायकीचे मिळणे शक्य नाही व तशी गरज नसते. प्रत्येक पक्षात अव्वल दर्जाचे लायक असे उमेदवार काही थोडेच मिळतात. इतर उमेदवार सर्वसा मान्य लायकीचे परंतु पक्षाच्या शिस्तीने बांधलेले पक्षनिष्ठ असे असतात. या पक्षास अव्वल दर्जाचे उमेदवार अधिकात अधिक मिळतील त्या पक्षाचे कार्य अधिक सुव्यवस्थित व परिणामकारक पडेल हे उघड आहे. परंतु सर्वच उमेदवार अव्वल दर्जाचे मिळणे शक्य नाही हे लक्षात घेऊन प्रत्येक पक्षास सर्वसामान्य लायकी असणारे किंवा कामचलाऊ उमेदवार उभे करून आपल्या पक्षाने कार्य करावेच लागते. तेव्हा पक्षनिष्ठ उमेदवारांच्या लायकी-नालायकीचा विचार करताना केवळ आपल्या विशिष्ट मतदार संघात त्या पक्षाने जो उमेदवार उभा केला असेल त्या उमेदवाराचीच वैयक्तीक लायकी विचारात घेऊन त्याची दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारांच्या लायकीशी तुलना करणे बरोबर होणार नाही. वर त्या पक्षाच्या वतीने सर्व प्रांतात मिळून जे शंभर उमेदवार उभे राहिले अती या शंभर उमेदवारीत अव्वल दर्जाचे कार्यकर्ते किती आहेत आणि इतर पक्षाचे ने उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारांच्या एकूण संतदर्जाचे कार्यकर्ते किती आहेत, याचा विचार करून प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांच्या एकूण लायकी नालायकीचा विचार प्रथम करावा लागेल.
कित्येक वेळा आपण ज्या विशिष्ट मतदार संघात मत देणार असू त्या मतदार संघात आपणास इष्ट वाटणाऱ्या पक्षाचा उमेदवार जितका लायक असेल त्याहून दुसऱ्या पक्षाचा उमेदवार अधिक लायक असेल. पण याचा अर्थ त्या पक्षाचे सर्व उमेदवार आपणास इष्ट असणाऱ्या पक्षाच्या सर्व उमेदवारापेक्षा अधिक लायक असतील अता करता येत नाही, सर्व-सामान्यतः असे म्हणता येईल की प्रत्येक पक्षाची कार्यक्षमता त्याने उभे केलेल्या एकूण उमेदवारांच्या लायकीवर व शिस्तीवर अवलंबून राहील.
पक्षनिष्ठा आणि शिस्त
पक्षातील उमेदवाराची लायकी विचारात घेताना त्या उमेदवाराची बुद्धिमत्ता व कार्यक्षमता हे गुण जसे लक्षात घ्यावे लागतात तशीच त्या उमेदवाराची शिस्तप्रियता व पक्षनिष्ठा दे गुणही लक्षात प्यावे लागतात. काही व्यक्ती अधिक बुद्धिमान व कार्यक्षम असल्या तरी त्यांच्या अंगी शिस्त व पक्षनिष्ठा हे गुण कमी असतात. अशा उमेदवारांना आपल्या पक्षात सामावून घ्यावे किंवा नाही याचा निर्णय अखेरीस त्या पक्षाचे नेतेच करू शकतात. या बाबतीत सर्व उमेदवारांना एकच न्याय लावता येणार नाही. ज्यांच्या अंगी असामान्य बुद्धिमत्ता व कार्यक्षमता आहे पण पक्षनिष्ठा व शिस्त हे गुण तितकेसे नाहीत अशा काही उमेदवारांना आपल्या पक्षाच्या वतीने अथवा आपल्या पक्षाच्या नैतिक पाठिंब्याने स्वतंत्र म्हणून निवडून आणण्याचे प्रयत्न करण्याची प्रथा आपल्या देशातील प्रत्येक पक्षाने पाडली तर ती प्रथा एकंदर राष्ट्राच्या प्रगतीस घोषक व उपकारकही ठरेल. पण पक्षाने शिस्त व पक्षनिष्ठा हे गुण कमी असणाऱ्या किती लोकांना केवळ कार्यक्षमतेच्या व बुद्धिमत्तेच्या दृष्टीने आपल्या पक्षाच्या नैतिक पाठिंब्याची ही संधी द्यावी याचा निर्णय अखेरीस प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनीच ठरविला पाहिजे. शिवाय अशी सवलत फारच थोड्या व अपवादभूत व्यक्तींनाच देणे परिणामी हितावह होणार आहे. हे अपवाद वगळल्यास सर्वसामान्य उमेदवारांच्या निवडीचा विचार जेव्हा एखादा पक्ष करतो तेव्हा त्याच्या शिस्तप्रियता आणि पक्षनिष्ठा या गुणांना पहिले स्थान देण्यात येते. आमच्या एकंदर सार्वजनिक जीवनात व राजकीय व्यवहारात शिस्तीचा अभाव निदान आजतरी दिसत असल्यामुळे असे अपवाद फारसे कोणी करू नयेत व अपेक्षू नयेत असेच सर्व सामान्यतः म्हणावे लागते. या दृष्टीने विचार केल्यास कोणत्याही पक्षाची कार्यक्षमता व लायकी नालायकी त्या पक्षाच्या अव्वल दर्जाच्या पुढाऱ्यांवरूनच आपणात अंदाजावी लागेल.
स्वतंत्र उमेदवाराना केव्हा मत द्यावे?
पक्षाने आपल्या प्रांतात एकंदर जे उमेदवार उभे केले असतील त्यांचा सामर्थ्याने विचार करून आपणास त्या पक्षाची लायकी ठरविता येईल. केवळ आपण ज्या मतदार संघात मत देणार त्या मतदार संघात त्या पक्षाने जो उमेदवार उभा केला असेल त्याच्या वैयक्तीक लायकी नालायकीवरून आपण त्या पक्षाची लायकी नालायकी ठरविणे बरोबर होणार नाही. मात्र या बाबतीत प्रथमच सांगितल्याप्रमाणे आपण असे ठरवावयास हवे की, आपल्या मतदार संघातून जो उमेदवार निवडून द्यावयाचा त्याच्या अंगी विशिष्ट प्रमाणात प्रत्येक उमेदवारास अवश्य असणारी किमान लायकी तरी असली पाहिजे. ही किमान लायकी म्हणजे त्याच्या सार्वजनिक व्यवहारातील प्रामाणिकपणा किंवा चोखपणा आणि ज्या पक्षाच्या वतीने तो उभा राहिला असेल त्या पक्षाच्या तत्त्वावरील त्याची निष्ठा या बाबतीत जर एखादा उमेदवार आपण ठरविलेल्या किमान छायकीच्या खालच्या पातळीवर असेल तर केवळ तो ज्या पक्षाच्या वतीने उभा राहिला आहे तो पक्ष आपणास प्रिय आहे म्हणून त्या उमेदवारास आपण आपले मत देता कामा नये. पण याचा अर्थ आपण दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारास आपले मत द्यावे असा मात्र करता येणार नाही. मात्र अशा परिस्थितीत कोणत्याही पक्षाचे बंधन न स्वीकारता स्वतंत्र म्हणून जे उमेदवार उभे असतील त्यांचा विचार आपणास करता येईल. जर हे उमेदवार आपल्या मताशी बऱ्याच बाबतीत जुळणारी मते धारण करणारे असून त्यांची वैयक्तीक लायकी नैतिक व बौद्धिक, दोन्ही ही श्रेष्ठ असेल तर त्यांना आपले मत देण्यास हरकत नाही. कारण कोणत्याही पक्षास ते बांधलेले नसल्यामुळे त्यांच्या लायकी-नालायकीचा प्रश्न विचारात घेताना त्या एकट्या व्यक्तीवाचून इतरांच्या लायकी नालायकीचा प्रश्नच उपस्थितच होत नाही. मात्र असे स्वतंत्र म्हणून उभे रहाणारे उमेदवार फारच असामान्य लायकीचे असावे लागतील, नाहीतर सामान्यतः कोणत्याही पक्षाचे बंधन न स्वीकारण्यात त्यांचा हेतू स्वार्थ साधण्याचा व लोकवंचनेचा असण्याचाच धोका अधिक आहे.
एकदा निवडून गेल्यानंतर त्यांना कोणाचेच बंधन उरणार नसल्याने ते जनतेची वंचना करून आपला स्वार्थ साधण्याचा मार्ग अवलंबतील असा धोका आहे. या धोक्यापासून सावध राहूनच पूर्ण विचारांती त्यांना आपले मत द्यावे किंवा न द्यावे याचा निर्णय करावा लागेल. जे उमेदवार कोणत्या तरी विशिष्ट पक्षाच्या शिस्तीने घेतलेले असतील त्यांनी लोकहिताचा घात करून स्वार्थसाधन करण्याचा मार्ग स्वीकारला तर त्यांच्या पक्षाच्या मार्फत त्याच्यावर आपणास काहीतरी बंधन पाळता येईल किंवा दडपण आणता येईल, परंतु जे अशा रीतीने कोणत्याही पक्षाच्या शिस्तीला बांधलेले नाहीत त्यांना एकदा निवडून दिल्यानंतर मुळीच आवरता येणार नाही. म्हणून स्वतंत्र म्हणून उभे राहाणारे लोक जसे बुद्धिमत्तेने श्रेष्ठ असावे लागतील तसेच ते शील व चारित्र्य या दृष्टीनेही अधिक श्रेष्ठ असावे लागतील. शील दृष्टीने जे हीन आहेत ते बुद्धी दृष्टीने कितीही श्रेष्ठ असले तरी लोकाचा घात केल्यावाचून राहात नाहीत. शीलभ्रष्ट मनुष्याची बुद्धी जितकी श्रेष्ठ तितका तो लोकहिताच्या दृष्टीने अधिकच भयंकर ठरण्याचा संभव असतो. म्हणून सामान्य उमेदवार हा कोणत्यातरी पक्षाच्या शिस्तीने बांधलेला असणे हेच एकंदरीत हितावह समजले पाहिजे.
पक्षनिष्ठा आणि सत्यनिष्ठा
आपल्या देशात आपणात सत्याग्रही संस्कृती मूल करावयाची आहे. या दृष्टीने विचार केल्यास आमच्या प्रत्येक व्यवहारात संस्थेत व पक्षात सत्यनिष्ठेला सर्वश्रेष्ठ स्थान दिलेच पाहिजे, अर्थात् पक्षनिष्ठेहून सत्यनिष्ठा ही अधिक श्रेष्ठ वस्तु समजली पाहिजे. याचा अर्थ या प्रश्नापुरता असा करता येईल की, जेव्हा आपण आपण स्वीकारलेला पक्ष त्याने जाहीर केलेल्या तत्त्वज्ञानापासून भ्रष्ट होत आहे अशी आपली खात्री होईल तेव्हा त्या पक्षाविरुद्ध जाऊन सुद्धा आपकी सत्यनिष्ठा जागृत ठेवणे आपले कर्तव्य आहे याची आणीय पक्षाच्या सभासदांनी नेहमी ठेवावयास हवी. कारण पक्ष हा तत्त्वासाठी आहे पण तत्त्व पक्षसाठी नव्हे. आपल्या तत्त्वापासून भ्रष्ट होऊन कार्य करण्याचा इक्क कोणत्याही पक्षाला नाही. अशा वृत्तीने सर्व पक्षाचे कार्य चालू लागेल तर पक्षसंस्था ही लोकशाहीला तारक होईल, याच्या उलट कोणत्याही पक्षाच्या सभासदांत तत्त्वनिष्ठेपेक्षा पक्षनिष्ठेचे स्तोम अधिक माजू लागेल तर तितक्या प्रमाणात त्या पक्षापासून आपल्या देशातील लोकशाहीला व आपल्या सत्याग्रही संस्कृतीला धोका येणार आहे. याची जाणीव या राष्ट्रातील सर्व लोकांनी व पक्षांनी ठेवलीच पाहिजे. त्याचप्रमाणे सत्यनिष्ठा आणि विशिष्ट तत्त्वावरील निष्ठा यात सूक्ष्म भेद आहे तो दृष्टीआड करता कामा नये. आपली अंतिम निष्ठा कोणत्याही मनुष्याने विशिष्ट तत्त्वाशी कायमची निगडित न करता ती त्याच निगडित केली पाहिजे.
तत्त्वनिष्ठेच्या रूपाने आपण सत्यनिष्ठेची उपासना करीत आहोत हे विसरता कामा नये. आपण जे तत्त्व स्वीकारले आहे ते सत्य आहे म्हणून स्वीकारले आहे. ज्या वेळी असत्य आहे अशी खात्री होईल त्या वेळी सत्याचे जे स्वरूप प्रतीत होईल त्या स्वरूपाची उपासना करू लागावे. त्या दुसऱ्या तत्त्वाला आपली निष्ठा अर्पण करावी. ही वृत्ती सदैव जागृत राहिली पाहिजे, तरच आपण सत्याग्रही संस्कृतीचे आहो असे आपण म्हणता येईल. या दृष्टीने विशिष्ट मताचा, किंवा विशिष्ट तत्त्वाचा आग्रह हा ते मत अथवा तत्त्व सत्य आहे अशी आपली निष्ठा आहेतच धरावयाचा असतो. ज्या वेळी ते तत्त्व असत्य असल्याचा अनुभव येईल अथवा तसे आपल्या बुद्धीला पटेल त्या वेळी सत्याग्रहीने त्या मताचा किंवा त्या तत्त्वाचा त्याग करूनच आपला सत्याग्रही बाणा जिवंत ठेवला पाहिजे.
ही आपली आधुनिक भारताची संस्कृती असून तिच्या अधिष्ठानावरच आपणास या राष्ट्राची इमारत उठवावयाची आहे. अर्थात् आमची पक्षनिष्ठा, आमची तत्त्वनिष्ठा अथवा आमची मतनिष्ठा या सर्वांहून आमची सत्यनिष्ठा ही अधिक प्रज्ज्वलित व प्रभावी असली पाहिजे. कोणत्याही लोभाने, भीतीने अगर मोहाने जर आपण या सत्याग्रही निपासून ढळलो नाही तर आपल्या राष्ट्रात आपण अशी एक संस्कृती निर्माण करू की जी संस्कृती आधुनिक मानवाला आदर्शभूत पाटेल. या आदर्श सत्याग्रही संस्कृतीचा पाया आगामी सार्वत्रिक निवडणुकीत आम्ही किती प्रमाणात घालू शकू यावरच आमच्या राष्ट्राचे पुढील सर्व भवितव्य अवलंबून आहे.
राज्य संस्था आणि पक्षसंस्था
आज आपण जी राज्यसंस्था आपल्या देशात स्थापन केली आहे, ती लोकशाही पद्धतीची आहे. आज आपणाना त्या संस्था माहीत आहेत या सर्वांमध्ये लोकशाहीची राज्यसंस्था अधिक हितप्रद आहे, म्हणूनच आपण तिचा स्वीकार केला आहे. या लोकशाही राज्यसंस्थेतही अनेक दोष आहेत, पण ते दोष नाहीसे करण्यास सत्याग्रह हे समर्थ साधन आहे. म्हणून सत्याग्रहाच्या अधिष्ठानावर आपल्या लोकशाहीची उभारणी आपणास करावयाची आहे. सत्याग्रहाच्या अधिष्ठानावर लोकशाहीची उभारणी केली तरी लोकशाही राज्य चालविण्यास पक्षसंस्था व अनेक पक्षाचे अस्तित्व या गोडी आज अपरिहार्य आहेत. म्हणून राज्यसंस्थेप्रमाणे पक्षसंस्थाही सदोष असली तरी तिचा आपणास आज स्वीकार केल्यावाचून गत्यंतर नाही. हे खरे असले तरी या पक्षसंस्थेचे दोष नष्ट करण्यासाठी एकंदर समाजात पक्षातीत सत्यनिष्ठा आणि सेवावृत्ती यांचा प्रसार व आचार जितका अधिक वाढेल तितका आपण करीत राहिले पाहिजे तसेच ज्यांनी शुद्ध सत्याग्रही आपली जीवननिष्ठा बनवून लोकसेवेचे व्रत स्वीकारले आहे त्यांनी कोणत्याही राज्यसंस्थेत जाऊन सत्ता घेण्याची इच्छा धरू नये. आणि सत्ताधारी अथवा सत्ताकांक्षी अशा कोणत्याही राजकीय पक्षात सभासद म्हणून राहू नये.
सत्याग्रहीचे कार्य
कोणताही पक्ष अधिकारावर आला तरी तो लोकशाही राज्यपद्धतीला व सत्याग्रही संस्कतीला विघातक असे कृत्य करू लागल्यास त्या पासून त्याला परावृत करण्याचे प्रयत्न अनत्याचारी वृत्तीने करीत राहाणे एवढेच लोकशाही मान्य करणाऱ्या सर्व पक्षाना अभिप्रेत असणारे राजकारण सत्याग्रही लोकसेवकांनी करावे, असे मला वाटते. समाजात समाजवादी क्रांती घडविणे आज अवश्य झाले आहे. त्या क्रांतीला अवश्य असणारी समाजवादी निष्ठा निर्माण करायची आणि आजच्या वर्गसंस्थेने दुभंगलेल्या समाजात भडकणारा वर्गकलह शांततेच्या मार्गाने कसा चालवावा हे शिक्षण दलित जनतेच प्रत्यक्ष नेतृत्व करून व तिच्या अंतःकरणातील आत्मबल जागृत करून तिला देत रहावे. समाजवादी क्रांतीला सत्याग्रही स्वरूप द्यावयाचे तर अशा सत्तापराङ्मुख, असंग्रही, सेवापरायण लोकसेवकाकडूनच देता येईल खरे असले तरी ही क्रांती घडत असताना जो पक्ष आपल्या समाजातील राज्यावर आरूढ झालेला असेल तो समाजवादी निष्ठेचा व लोकशाही पद्धतीचा पुरस्कर्ता असाच असला पाहिजे.
मी या आगामी निवडणुकीकडे या अशा दृष्टिकोनातून पाहतो. योग्य असा पक्ष मला निदान आज तरी हिंदी समाजवादी पक्षच दिसतो; व म्हणूनच त्या पक्षाचा सभासद नसताना व पुढे होण्याची इच्छा नसताना मी आपले मत त्या पक्षास देण्याने ठरविले आहे. इतर जे पक्ष निवडणुकीला उभे आहेत त्यांच्याकडून आज अपरिहार्य झालेले क्रांतीचे कार्य होणार नाही आणि ते न झाल्याने आमच्या पोटा-पाण्याचा किंवा अन्नवस्त्राचा किंवा घराचा प्रश्न सुद्धा सुटणार नाही. त्याचप्रमाणे हे प्रश्न सुटून या प्रकारची लोकशाही समाजरचना व सत्याग्रही संस्कृती या राष्ट्रात बद्धमूल व्हावी व तिचा सर्व जगभर फैलाव व्हावा, असे मला वाटते. त्यापैकी कोणतीही गोष्ट घडून येणार नाही. ज्याप्रमाणे राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आपला कोणताही प्रश्न ते स्वातंत्र्य मिळेपर्यंत सुटणार नाही असे वाटत होते त्याच प्रमाणे आपला कोणताही प्रश्न आजच्या लोकशाही राज्यात ती लोकशाही जिवंत ठेवून समाजवादी क्रांती घडवून आणल्यावाचून सुटणार नाही याबद्दल आपल्या बुद्धीचा निर्णय निश्चित झाला पाहिजे, असे होईल तरच आपणास चांगले दिवस प्राप्त होतील, नाहीतर हल्ली सर्वत्र पसरू लागलेला निराशेचा अंधार अधिक दाट बनून त्यामुळे आमचे राष्ट्रीय स्वातंत्र्यही नष्ट झाल्यावाचून राहणार नाही. हीच गोष्ट या लेखमालेतील निरनिराळ्या लेखांत निरनिराळ्या शब्दांत मांडलेली वाचकास दिसून येईल.
Tags: Acharya Javadekar Democratic Socialism Samajwadi Party First Election Samajwadi Kranti आचार्य जावडेकर लोकशाही समाजवाद समाजवादी पक्ष पहिली निवडणूक समाजवादी क्रांती weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या