माझ्या मनात दृढमूल झालेल्या जीवननिष्ठांना हादरे बसत गेले, नाही असं नाही, पण आजही जेव्हा मी विचार करू लागतो, तेव्हा त्या निष्ठांचं महत्त्व अणूभरही कमी झालेलं नाही, असंच मला वाटतं. स्वातंत्र्यापूर्वीचा काळ विशिष्ट जीवननिष्ठांना पोषक होता. निरनिराळ्या कारणांनी वर्तमानकाळ तसा राहिलेला नाही. पण काळ अनुकूल असो वा प्रतिकूल असो, माणसाला माणूस म्हणून जगायचं असेल तर ज्यांचा त्यानं सांभाळ करणं आवश्यक आहे आणि माझ्यातली माणुसकीची ठिणगी विझू न देण्याच्या कामी ज्यांची मला मदत झाली आहे, अशा निष्ठांविषयी आता सूत्ररूपानं लिहितो.
'माझ्या जीवननिष्ठा' या विषयावर मी चार शब्द लिहायला बसलोय खरा ! पण खरं सांगायचं तर या विषयाला स्पर्श करताना मनात जे विचारतरंग निर्माण होतात, ते सारे शब्दबद्ध करणं फार कठीण आहे. 'जीवननिष्ठा' या शब्दाचं धर्म, अध्यात्म, तत्त्वज्ञान इत्यादी गहन गोष्टींशी अतिशय जवळचं नातं आहे असं मला वाटतं. माझ्यासारखा सामान्य मनुष्य आपल्या वाट्याला आलेल्या आयुष्याच्या पाऊलवाटेनं प्रसंगी थोडं रमत गमत चालत असतो. धर्म, अध्यात्म, तत्त्वज्ञान इत्यादिकांच्या वाटा या पाऊलवाटेपासून बऱ्याच दूर आणि फार निराळ्या असतात. अद्भुत कल्पनांच्या आणि तात्त्विक सिद्धान्तांच्या अरण्यातून त्या एका दुर्गम गिरिशिखराकडे जात असतात. या वाटांकडं उभ्या आयुष्यात मी कधी वळलो नाही, त्यामुळे 'माझ्या जीवननिष्ठा' या विषयावर काही लिहायचं म्हणजे गीतारहस्य, नीतिशास्त्रप्रवेश, सॉक्रेटिसाचे संवाद यांच्या प्रांतांत आपण प्रवेश करीत आहोत की काय असं वाटू लागतं. 'न द्यावा तिथे पाय हा मी दिला' अशी एक भीतीची भावना मनात नकळत निर्माण होते. मनुष्य हा आत्मपूजक - इतकंच नव्हे, तर आत्मवंचक प्राणी आहे! आरशात पाहणाऱ्या कुरूप मनुष्याला आपल्या सौंदर्यहीनतेची जाणीव सहसा होत नाही! यामुळेच या विषयावर लिहिताना आपल्या हातून असाच काही प्रमाद घडणार नाही ना, या कल्पनेनं मन गोंधळतं. 'माझ्या जीवननिष्ठा' या दोन शब्दांचा दबदबाच तसा आहे, तथापि बिलकूल गाता येत नसलं आणि गळा मुळीच गोड नसला तरी जात्यावर बसल्यावर ओवी म्हणावीच लागते. तेच काम मी करणार आहे.
माणसाच्या बालपणी काही निष्ठा निर्माण होतात. अनेक श्रद्धास्थानं त्याला आकषून घेतात, नकळत तो काही कौटुंबिक आणि सामाजिक मूल्यं पाळू लागतो, क्वचित मनोमन तो एखाद्या मूल्याची पूजाही करीत असतो, पण हे सारं अजाणतेपणी घडतं. ज्या ज्या धर्मात, देशात, समाजात, (भारतापुरतं बोलायचं तर जातीतही), कुटुंबात आणि आर्थिक स्तरात तो माणूस जन्माला येतो, त्याचे संस्कार त्याच्या मनावर घडतात. या सर्वांच्या चौकटीत त्याची जीवनयात्रा सुरू होते. आईच्या दुधाबरोबरच अनेक निष्ठा आणि अनेक संस्कार त्याच्या रक्तात भिनून जातात. हे असं का, हा प्रश्न बालपणी फारसा सुचत नाही. सुचला तरी त्याचं समाधानकारक उत्तर गुरुजनांकडून किंवा वडील माणसांकडून बहुधा मिळत नाही. देव आभाळात असतो ना! मग तिथं चालताना एखादवेळी पाय घसरून तो खाली कसा पडत नाही, असं काहीतरी एखाद्या लहान मुलानं विचारलं, तर त्याचं उत्तर त्याच्या गालालाच मिळण्याचा संभव अधिक. माझ्या लहानपणी म्हणजे 60-65 वर्षांपूर्वी ही शक्यता आजच्यापेक्षा फार मोठ्या प्रमाणात होती. कोटी कोटी लोकांची मनं जिथं पिढ्यान्पिढ्या एका चाकोरीतून जात होती, तिथं बालकांच्या स्वैर जिज्ञासेचं समाधान कोण करणार? श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातली सीमारेषा कोण दाखवणार?
माझी पहिली दहा वर्षं गेली ती अशा अनेक आंधळ्या श्रद्धांचं जू मुकाट्याने मानेवर घेऊन. डोक्यावरल्या शेंडीपासून गळ्यातल्या जानव्यापर्यंत सर्व गोष्टी प्रचलित संकेतानुसार नसल्या तर माणसाला पाप लागतं, या पापाबद्दल मरणानंतर त्याला नरकात जावं लागतं, असल्या कल्पनांच्या सावटाखाली ! माझे वडील अर्धांगवायूनं आजारी पडले तेव्हा त्यांचे स्नेही डॉ. देव यांचे औषधोपचार सुरू असूनही, माझ्या मनानं त्यांच्या आजारावर तोडगा शोधून काढला तो शनिमाहात्म्य नियमाने वाचण्याचा! सांगलीतल्या गणपतीपासून मारुतीपर्यंत आणि एकाच गल्लीत राहून विरुद्ध दिशांना तोंड असलेल्या दत्ताच्या देवालयापासून बालाजीच्या देवळापर्यंत सर्वांचे उंबरठे त्या वेळी मी झिजविले. पुराणात जरी देवांची संख्या तेहतीस कोटी असली तरी त्यांतल्या बत्तीस कोटी नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार देवांच्या नावांचा आणि त्यांच्या देवळांचा मला पत्ता नव्हता म्हणून बरं! नाही तर देवळांचे उंबरठे झिजवता झिजवता माझे पायच झिजून गेले असते !
या किर्रर्र काळोखातून मला प्रकाशाची पहिली रेखा दिसली ती रामायणाच्या रूपानं. वडिलांचं आजारपण, कुटुंबाची दुःस्थिती, आप्तेष्टांची उदासीनता इत्यादी अनपेक्षित अनुभवांमुळे मी गोंधळून गेलो होतो. कशाचा कशाला मेळ बसत नव्हता. जगण्याचा अर्थ कळत नव्हता. माणसाचं जगणं हे भयंकर सुसरींनी भरलेल्या नदीच्या खोल डोहासारखं आहे, असं काही तरी मला वाटू लागलं. दहा वर्षं वयाच्या पोरकट बुद्धीनं मला टोचणाऱ्या साऱ्या काट्याकुट्यांचा उगम मी शोधीत होतो. अशा स्थितीत संपूर्ण रामायणाचं मराठी भाषांतर माझ्या हाताला लागलं, मी अधाशीपणानं ते वाचलं. त्या कथेनं मला जसा आनंद तसाच धीर दिला. ही कथा माणसाच्या जगण्याचा अर्थ समजावून सांगत आहे, असा माझ्या कुमार मनाला भास झाला. माणसं कितीही श्रेष्ठ असोत, त्यांच्या वाट्याला येणारी सुख-दुःखं अटळ आहेत, याची पूर्ण जाणीव मला झाली. प्रभुरामचंद्रालासुद्धा वनवास चुकला नाही! दुःखाला धीरानं तोंड देणं आणि कितीही त्याग करावा लागला तरी आपलं कर्तव्य पार पाडणं ही माणसाच्या जीवनाची दोन मुख्य सूत्रं आहेत, या विचारानं मला मोठा दिलासा दिला. ज्याच्या त्याच्यावर शिंगे उगारून जाणाऱ्या वांड खोंडाला दाव्यानं बांधून टाकावं त्याप्रमाणे माझ्यातल्या साऱ्या बालिश अवखळपणाला रामायणानं मर्यादा घातली. मी थोडासा व्रात्य व बराच हट्टी होतो, पण रामायण वाचल्यानंतर वडिलांच्या सेवेत माझं मन रमू लागलं.
अधाशी वाचनाचं ते वय होतं. रामायणापाठोपाठ खूप खूप मराठी पुस्तकं मी वाचून काढली. किंबहुना शाळेतल्या अभ्यासाच्या पुस्तकांपेक्षा नाटकं -कादंबऱ्यांसारख्या कल्पनारम्य सृष्टीत नेणाऱ्या पुस्तकांचं आकर्षण माझ्या मनाला शतपटींनी अधिक वाटू लागलं. या सृष्टीतले अनुभव स्वप्नाळू होते, मात्र हे त्या वेळी मला कळत नव्हतं. एक गोष्ट खरी ! त्या स्वप्नाळूपणातही वास्तवाच्या जाणिवेचा कवडसा कुठून तरी पडे. 'शारदा', सुदाम्याचे पोहे', 'पण लक्षात कोण घेतो?' आणि पुढे आगरकरांचे निबंध यांनी मला नुसता आनंद दिला नाही, विचार करायलाही शिकवलं.
माणूस कशासाठी जगतो, त्याचं इतर माणसांशी कोणत्या प्रकारचं नातं असतं, ते कसं असावं, इत्यादी गोष्टींचा अशा कवडशांच्या प्रकाशात मी शोध घेऊ लागलो. माणसाचे आपल्या कुटुंबाशी, समाजाशी, धर्माशी, देशाशी आणि देवाशी कोणत्या प्रकारचे संबंध असतात, याविषयी उलटसुलट विचार अंधूकपणे मनात तरळू लागले. या विचारांनी उत्पन्न झालेली बेचैनी मी नव्या नव्या पुस्तकांच्या वाचनात बुडवून टाकण्याचा प्रयत्न करी, पण भेंडाचे लाकूड पाण्यात कितीही बुडवलं तरी हात सोडताच चटकन वर येतं, तसं पुस्तकं बाजूला पडली की, मन या विचारांच्या चित्रविचित्र सावल्यांचा पाठशिवणीचा खेळ पाहत राही. या वेड्यावाकड्या सावल्यांची कधी कधी विलक्षण भीती वाटे, कधी कधी त्या उन्हाळ्यात वाटसरूला गारवा देणाऱ्या वृक्षाच्या सावल्यांसारख्या वाटत !
दहाव्या वर्षानंतरच्या माझ्या स्वैर आणि विपुल वाचनानं मला एक गोष्ट उमजली. आपल्या भोवताली पसरलेल्या जगात दुःख पुष्कळ आहे, त्याचे प्रकारही अनेक आहेत, पण या दुःखांतली अनेक दुःखं माणूसच निर्माण करीत असतो. केशवसुतांची 'नरेचि केला हीन किती नर !' ही ओळ जेव्हा माझ्या वाचनात आली, तेव्हा मी भोगत असलेल्या आणि भोवताली पाहत असलेल्या अनेक दुःखांचं कोडं उलगडल्याचा भास मला झाला.
देशाच्या पारतंत्र्याच्या जाणिवेनं नेमस्तांपासून क्रांतिकारकांपर्यंत भिन्न भिन्न प्रकृतीचे देशभक्त ज्या चळवळी करीत होते, त्याचं विराट जनसमूहाप्रमाणे मलाही आकर्षण होतं. खुदीराम बोस हातात गीता घेऊन फाशी जाण्याकरिता सिद्ध झाला आहे, असं एक चित्र कुठूनतरी मी पैदा केलं होतं. ते बरेच दिवस माझ्या संग्रही होतं. ते चित्र पाहिलं की, एका अद्भुत भावनेनं मन उचंबळून येई. असं काही तरी आपण करू शकू का, असा प्रश्न दत्त म्हणून उभा राही, मग मृत्यूच्या भयानं मन गांगरून जाई. भक्ती आणि भीती या विरोधी भावना परस्परांत मिसळून जात, पण देशभक्तीविषयी वाटणाऱ्या या आकर्षणाला भावनेशिवाय कुठलाही आधार नव्हता. एका विशाल सामुदायिक भावनेचा तो अस्पष्ट प्रतिध्वनी होता. सर्कशीतल्या वाघ-सिंहांच्या खेळात आईचा हात घट्ट धरून बालकानं बिनधास्तपणे रमून जावं तसा हा प्रकार होता! पण देवलांच्या शारदेपासून आगरकरांच्या निबंधापर्यंतच्या वाचनानं मनात जागृत केलेली अस्वस्थता केवळ भावनामूलक नव्हती. त्या भावनेला विचारांची जोड होती. स्वतःची आणि आपल्या भोवतालच्या माणसांची दुःखं त्यातून तीव्रपणे जाणवत होती. धर्माच्या नावाखाली माणसं आंधळेपणानं निघृण रूढीचे पालन कसं करीत आहेत आणि कळत-नकळत इतरांवर किती अन्याय करीत आहेत, याची अंधूक कल्पना या वाचनानं मला करून दिली. बापजाद्यांच्या विहिरीतील खारं पाणी पीत राहणाऱ्या वेडगळ माणसाप्रमाणे आपला समाज वागत आहे, त्याला टोचून टोचून जागं केलं पाहिजे, डोळसपणानं विचार करायला शिकवलं पाहिजे, या जाणिवेनं माझ्या मनात मूळ धरलं. लेखन-वाचनाची लहानपणापासून असलेली आवड या विचाराने अधिकच बळावली. साहित्याच्या शक्तीवर मनात श्रद्धा निर्माण झाली.
सामाजिक सुधारणेनं अशा रितीनं माझ्या कुमार मनात प्रवेश केला खरा, पण या सुधारणेच्या कल्पनांचं क्षेत्र माझ्या वयाच्या अठराव्या वर्षांपर्यत संकुचितच राहिलं. मी पांढरपेशा वर्गात जन्माला आलो. पांढरपेशा समाजातच वाढलो. पंख न फुटलेल्या पिलाची दृष्टी घरट्याबाहेर डोकावण्यापलीकडे जाऊ नये, तशी माझी सामाजिक सुधारणेविषयीची कल्पनाही पांढरपेशा वर्गापुरतीच मर्यादित राहिली. स्त्री-शिक्षण, केशवपन, विधवेचा पुनर्विवाह असल्या विषयांभोवतीच ती घोटाळत होती. गरिबीचे चटके मला बसत होते, पण ती गरिबी किती झालं तरी पांढरपेशाची होती. दुपारच्या वेळी पोटात भडकलेली आग पाण्याने विझविण्याची पाळी माझ्यावर कधी आली नाही; जगाच्या बाजारात फिरताना लाज राखण्यासाठी लक्तरांचा आश्रय मला कधी करावा लागला नाही! एक मोठं स्वप्न मला सारखं खुणावीत होतं, गरिबीचे चटके सुसह्य करीत होतं. आपण खूप खूप शिकू, मग आपल्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. समाजातल्या सुखवस्तू लोकांप्रमाणे आपल्यालाही राहता येईल आणि मग आपण सामाजिक सुधारणेच्या कार्याला सहज हातभार लावू शकू, अशा स्वप्नजालात मी गुरफटलो होतो.
सुंदर वेलबुट्टी असलेल्या काचेच्या नाजूक पेल्याला चुकून कुणाचा तरी हात लागावा, तो पेला मेजावरून खळकन् खाली पडावा आणि त्याचे तुकडे तुकडे होऊन जावेत, तशी माझ्या या स्वप्नाची स्थिती आयुष्यातल्या एका योगायोगानं केली. अठराव्या वर्षी कोकणात मला दत्तक देण्यात आलं. मी एका सर्वस्वी निराळ्या जगात जाऊन पडलो. माझे दत्तक वडील जमीनदार व सावकार होते. (अठराविश्वे दारिद्र्यानं गांजलेल्या कोकणातले !) नाणेली या सावंतवाडीपासून सात-आठ मैल दूर असलेल्या आणि त्या काळी भयानक हिवतापाने ग्रस्त झालेल्या खेड्यातले ते जमीनदार होते. एखाद्या सासुरवाशिणीप्रमाणे मी त्या खेड्यात राहायला गेलो. दुसरा काही उद्योग नव्हता, म्हणून भोवतालचे नवे जग पाहू लागलो.
सावकार-जमीनदारांची भर करण्याकरिता, पिढ्यान्पिढ्या अर्धपोटी-छे! प्रसंगी पाव पोटी राबणाऱ्या, जवळ जवळ भाकड जनावराचं जिणं जगणाऱ्या माणसांच्या दर्शनानं माझ्या मनात कालवाकालव सुरू झाली. माझी संवेदना मला स्वस्थ बसू देईना! ती सारी माणसं माझ्यासारखीच होती. दोन हात, दोन पाय असलेली. ह्या हाता-पायांनी शक्य तेवढे कष्ट करून आपल्या कुटुंबातल्या पोटांची खळगी भरण्याचा ती प्रयत्न करीत होती. पण त्यांना ज्ञानाचे दरवाजे उघडे नव्हते, आपली दुःस्थिती सुधारण्याची कुठलीही संधी नव्हती. अशा माणसांचे सुकलेले चेहरे आणि भिजलेले डोळे पाहून माझं मन विलक्षण बेचैन होऊन गेलं. एक नवं विचारचक्र सुरू झालं. कौटुंबिक संघर्षानं त्याची गती वाढवली. हळूहळू त्या विचारचक्राला वादळाचं स्वरूप आलं. अर्थशून्य रूढींच्या चिखलात रुतलेल्या, अज्ञानाच्या काळोखात चाचपडणाऱ्या आणि दारिद्र्याच्या शापानं दग्ध झालेल्या लोकांशी आपलं निकटचं नातं आहे, या विचारानं माझं मन भारून टाकलं. त्याचा शेवट शिरोड्यासारख्या खेड्यात एक शिक्षक म्हणून मी जाण्यात झाला. तिथे पुढील अठरा वर्षे जमेल ती धडपड मी करीत राहिलो.
तो काळ आता खूप मागं पडला असला तरी वर वर्णन केलेल्या ज्या जीवननिष्ठा माझ्या मनात दृढमूल झाल्या, त्या आजही कायम आहेत. सामाजिक सुधारकांच्या परंपरेत मी वाढलो, त्यामुळं व्यक्तिस्वातंत्र्य हे आधुनिक जीवनातलं एक महत्त्वाचं मूल्य आहे, अशी माझी आजही श्रद्धा आहे; तरीही व्यक्तिस्वातंत्र्यानं सभोवतालच्या आर्थिक आणि सामाजिक संदर्भाच्या मर्यादांतच वावरलं पाहिजे याचा विसर मला सहसा पडत नाही. प्रत्येक सामान्य संसारी मनुष्यावर समाजाचे थोडेफार ऋण असतेच. ते यथाशक्ती फेडणं हा माणसानं स्वधर्म मानला पाहिजे, असं आजही मी आग्रहाने म्हणेन.
शिरोडे गाव सोडल्यानंतरच्या गेल्या अडीच-तीन तपांत मला जीवनातले अनेक कडू-गोड अनुभव चाखावे लागले. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंतच्या काळात सारा भारतीय समाज एका स्वप्नाच्या धुंदीत वावरत होता. बाह्यतः एकरूप झाला होता. ती धुंदी गांधीजींसारख्या लोकविलक्षण नेत्यामुळे निर्माण झाली होती. मी मूळचा स्वप्नाळू वृत्तीचा. जगरहाटीप्रमाणं मी दैनंदिन व्यवहारात वावरलो खरा, पण व्यवहाराच्या खोल पाण्यात मी कधी शिरलो नाही. माझं जग होतं मुख्यतः पुस्तकांचं, म्हणजे एका दृष्टीने काल्पनिकच ! त्यामुळे माझ्या मनावरही त्या काळाची धुंदी होती, हिवाळ्यातल्या दाट धुक्यासारखी.
स्वातंत्र्य आलं आणि भारतीय जीवन झपाट्याने अंतर्बाह्य बदलू लागलं. विज्ञान, यंत्रयुग आणि औद्योगिक संस्कृती यांच्या दिशेनं देश वाटचाल करू लागला. पण ही वाट चोखाळताना त्यानं जुनी श्रद्धास्थानं मोडीत काढली. नव्या पूजास्थानांत सत्ता आणि संपत्ती या अक्राळविक्राळ देवतांना भलतंच महत्त्व आलं. भारतीय संस्कृतीनं जनमनावर ठसवलेली आणि दीड शतकातल्या राजकीय व सामाजिक नेत्यांनी असंख्यांच्या अंतःकरणात रुजविलेली नैतिक मूल्यांची जुनी-नवी रोपटी या वादळवाऱ्यामुळे उन्मळून पडली. दांभिकता हा मनुष्यस्वभावाचा एक सनातन भाग आहे हे खरं; पण गेल्या पंचवीस वर्षांत जुन्या-नव्या ढोंगासोंगांचं आक्रमण व्यक्तीमनावर आणि सामाजिक जीवनावर विलक्षण वेगाने वाढत गेलं. माणसांचे मुखवटे शतपटीने वृद्धिंगत झाले. 1947 पूर्वी कधीही कल्पनेलासुद्धा न जाणवलेला, भौतिकानं हा हा म्हणता केलेला नैतिकाचा पराभव ठायी ठायी दिसू लागला.
हे सारं पाहिल्यावर आणि थोडंफार अनुभवल्यावर माझ्या मनात दृढमूल झालेल्या जीवननिष्ठांना हादरे बसत गेले, नाही असं नाही. पण आजही मी विचार करू लागतो, तेव्हा त्या निष्ठांचं महत्त्व अणूभरही कमी झालेलं नाही असंच मला वाटतं. स्वातंत्र्यापूर्वीचा काळ विशिष्ट जीवननिष्ठांना पोषक होता. निरनिराळ्या कारणांनी वर्तमानकाळ तसा राहिलेला नाही. पण काळ अनुकूल असो वा प्रतिकूल असो, माणसाला माणूस म्हणून जगायचं असेल तर ज्यांचा त्यानं सांभाळ करणं आवश्यक आहे आणि माझ्यातली माणुसकीची ठिणगी विझू न देण्याच्या कामी ज्यांची मला मदत झाली आहे, अशा निष्ठांविषयी आता सूत्ररूपानं लिहितो.
1) जन्मापूर्वीचा काळोख आणि मृत्यूनंतरचा काळोख यांच्यावर प्रकाश टाकण्याच्या धडपडीत मानवी बुद्धीनं गुंतून राहण्यात फारसा फायदा नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंतचे जे ऐहिक जीवन माणसाच्या वाट्याला येतं आणि जे त्याला स्पर्धा व सहकार्य यांचा मेळ घालून जगावं लागतं, ते स्वतःप्रमाणे इतरांनाही अधिक सुसह्य कसं होईल आणि या जीवनातला नाना प्रकारचा काळोख कसा उजळविता येईल, याचा विचार मनुष्याच्या बुद्धीनं प्रथम केला पाहिजे.
2) मानव हा शारीरिक जीवनक्रमाच्या बाबतीत इतर प्राण्यांपेक्षा फारसा भिन्न नसला तरी इतरांना न मिळालेली बुद्धीची मोठी देणगी त्याला लाभली आहे, म्हणून ऐहिक जीवनाच्या सर्व अंगांचा विचार त्याने बुद्धिवादी भूमिका स्वीकारूनच केला पाहिजे. या बुद्धिवादाची समाजात सर्वत्र उपासना कशी होईल याची चिंता सर्व क्षेत्रांतल्या असामान्य व्यक्तींनी वाहिली पाहिजे, आणि सामान्यांनी बुद्धिवादाच्या प्रखर प्रकाशाला दिपून जाऊन त्याच्याकडे पाठ फिरवता कामा नये.
3) मात्र मानवी जीवनाची बुद्धिवादाच्या बैठकीवर उभारणी होणं अत्यंत आवश्यक असलं तरी, याचा अर्थ त्यानं निष्ठा, श्रद्धा किंवा भावना यांना पारखं व्हावं असा नाही. विकसनशील भावना ही बुद्धीइतकीच त्याला मिळालेली दुर्मीळ देणगी आहे, मात्र ती केव्हाही आंधळी असता कामा नये. बदलत्या काळाबरोबर आणि मूल्यांबरोबर भावनांनाही नवं रूप प्राप्त करून देणं आवश्यक असतं. बुद्धी व भावना यांच्या संगमातूनच मानवी जीवनाचा विकास आतापर्यंत घडत आला आहे. पुढंही तो होत राहण्यासाठी अनेक दृष्टींनी परस्परांहून भिन्न असलेल्या या दोन अद्भुत शक्तींचा सतत मेळ घालत जाणे आवश्यक आहे.
4) मनुष्यप्राणी हा जसा मनुष्य आहे, तसा तो प्राणीही आहे, स्वतःच्या संरक्षणाची आटोकाट धडपड आणि शरीराच्या सर्व भुका यथेच्छ भागविण्यासाठी चाललेली तडफड या प्राणिमात्रांत आढळून येणाऱ्या गोष्टी त्याच्यातही प्रकर्षानं प्रगट होणं स्वाभाविक आहे, पण आजचा मनुष्य इतर प्राण्यांप्रमाणे केवळ प्रकृतिधर्माच्या पातळीवर वावरू शकत नाही. प्रकृतीप्रमाणं संस्कृतीचीही दुसरी पातळी त्याला स्वीकारावीच लागते. या दोन्ही पातळ्यांमध्ये निरनिराळ्या कारणांमुळे पडणारं विलक्षण अंतर हा मानवी जीवनातला अत्यंत गुंतागुंतीचा भाग आहे. बहुसंख्य लोक प्राकृतिक प्रेरणांच्या आहारी जात असलेले दिसतात, हे अमान्य करता येणार नाही, तथापि त्याला अपवाद असणाऱ्या व्यक्ती प्रत्येक पिढीला सर्वत्र निर्माण होत असतात. या संख्येनं अल्प असलेल्या व्यक्तीच संस्कृतीची पातळी उंचावत नेण्याचा प्रयत्न करतात. मग या संस्कृतीचा काही भाग प्रकृतिधर्माच्या आहारी जाणाऱ्या सामान्य मनुष्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून जातो. म्हणूनच संस्कृतीच्या उपासनेत धर्म, कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश होतो, हा मानवी जीवनाचा अभेद्य भाग आहे हे केव्हाही विसरता कामा नये.
5) हे सारं खरं असलं तरी मनुष्याची स्वार्थबुद्धी सतत प्रबळ होत असल्याची आणि ती त्याला आंधळ्या प्रकृतीच्या आहारी नेत असल्याची जाणीव दैनंदिन व्यवहारात पावलोपावली होते. या स्वार्थबुद्धीला एकेकाळी ईश्वरश्रद्धेनी पाप-पुण्याच्या आणि स्वर्ग-नरकाच्या कल्पनांनी किंवा अशाच इतर गोष्टींनी थोडंफार नियंत्रित केलं असेल, पण विज्ञानाच्या प्रगतीमुळे मानव ज्या ठिकाणी येऊन उभा राहिला आहे तिथं या स्वार्थबुद्धीला तो आवरू शकत नाही. या स्वार्थबुद्धीवर नव्या सामाजिक धर्मबुद्धीचं नियंत्रण आलं नाही तर विज्ञानाचा वरदहस्त लाभला असूनही, अठराविश्वे दारिद्र्यापासून अठरा अक्षौहिणींचा संहार करणाऱ्या युद्धापर्यंतचे अनर्थ मानवता टाळू शकणार नाही. मार्क्सवाद व गांधीवाद हे दोन्ही या सामाजिक धर्मबुद्धीचेच आविष्कार आहेत.
6) मानवी जीवनातली अनेक दुःखं अटळ आहेत. विज्ञानानं मानवाला अनेक व्याधींपासून मुक्त केलं असलं तरी वृद्धत्व, व्याधिग्रस्तता आणि देहावसान यांच्या तडाख्यातून कोणीही अंती सुटू शकणार नाही. बुद्धाला उपरती झाली ती ही तीन मूर्तिमंत दुःखे पाहूनच. या उपरतीमुळे एक श्रेष्ठ विभूती जगाला मिळाली असली तरी या दुःखावरला तोडगा आतापर्यंत कुणालाच सापडलेला नाही. पुढेही सापडण्याचा संभव नाही, कारण मानवाने निसर्गावर कितीही विजय मिळवले, तरी मूलतः तो निसर्गाचाच एक भाग आहे, मात्र अशी काही दुःखं अटळ असली तरी जगातली अनेक लहान-मोठी दुःखं माणसाच्या काम-क्रोधादी अनावर मनोविकारांतूनच निर्माण होत असतात. हे सारे मनोविकार मर्यादेत असतात, तोपर्यंतच माणसाचे मित्र ठरतात. त्यांनी मर्यादा ओलांडली म्हणजे थंडीकरता पेटवलेल्या शेकोटीतल्या ठिणगीनं जवळच्या झोपडीला आग लागून ती जळून खाक व्हावी तसं घडतं. प्राचीन काळी काम हा या मनोविकारांचा राजा मानला जात होता आता लोभानं त्याची ही जागा घेतली आहे. अमर्याद सत्ता आणि संपत्ती यांनी माणूस सदैव धुंद होण्याचा मोठा धोका असतो. या धुंदीत तो असंख्य दुःखांना जन्म देतो. धर्म, वर्ण, जाती, सत्ता, संपत्ती इत्यादिकांना दिलेल्या वर्चस्वामुळे काही वर्गांना अथवा व्यक्तींना जे हक्क मिळालेले असतात, त्यांच्या बळावर इतरांच्यावर अनियंत्रित प्रभुत्व गाजविण्याचा मोह त्यांना अनावर होतो. या वर्गांनी आणि व्यक्तींनी नव्या काळाचं आवाहन स्वीकारून आपले सारे खास हक्क सोडून देण्याची मानसिक तयारी केली पाहिजे.
7) शरीर भाकरीवर जगत असलं तरी त्याच्यातलं चैतन्य स्वप्नावर जगत असतं. माणसाची आत्मशक्ती जेवढी मोठी, तेवढी त्याची स्वप्नं अधिक भव्य ! बुद्ध, ख्रिस्त, मार्क्स, गांधी हे अशीच भव्य-दिव्य स्वप्नं पाहत आले. त्यांची काही स्वप्नं अल्प प्रमाणातच साकार झाली असतील, पण त्यांच्या या भव्य-दिव्य स्वप्नांनीच माणसातल्या पशुत्वाला आवर घातला आहे, त्याच्यातल्या माणुसकीच्या दिव्यलीला करणारी काळजी झाडून टाकली आहे. आपल्या चिमुकल्या जगातली अशी काळजी यथाशक्ती झाडून टाकण्याचं व्रत सामान्य मनुष्यानं अंगीकारलं पाहिजे. असं झालं तरच सुखी व समृद्ध मानवतेच्या दिशेनं जग वाटचाल करू शकेल. एरव्ही ते अशक्य आहे.
8) सामान्य मनुष्याच्या जीवनक्रमाला नेहमीच नाना प्रकारच्या मर्यादा पडतात. पाच-पन्नासांत केवळ गोड शब्दासाठी हपापलेली, साध्या धीरासाठी आसुसलेली, क्षणभर कुणी हाताचा आधार दिला तरी तेवढ्यावर पुढं पाऊल टाकण्याची धडपड करणारी अनेक माणसं असतात. या साऱ्या गोष्टी पडत्या ढगांच्या सावल्यांसारख्या असतील, पण संसाराच्या प्रखर उन्हाळ्यातून धापा टाकीत चालणाऱ्या माणसाला या सावलीचा क्षणैक गारवा हवाहवासा वाटतो. यासाठी गोड शब्दापासून तो अल्प प्रमाणातल्या प्रत्यक्ष साहाय्यापर्यंत प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्याच्या उपयोगी पडता येतं, त्याचं दुःख हलकं करता येतं. आर्थिक मदत ही दृश्य स्वरूपाची असल्यामुळे ती डोळ्यांत भरते, पण ती मदत करता आली नाही तरी भावनिक दृष्टीनी आपल्या कक्षेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तोल सांभाळणं कुणालाही अशक्य होऊ नये. ज्या भावना आजपर्यंत सामान्यतः कौटुंबिक मर्यादा ओलांडून जात नसत, त्यांना नव्या जाणिवांच्या आधारे सामाजिक स्वरूप देणं ही भविष्यकाळाची निकडीची मागणी आहे.
9) जीवनातल्या नानाविध सुख-दुःखांचा कार्यकारणभाव लावणं अशक्य आहे. सुखान्त नाटक-कादंबऱ्यांत सज्जनांना विजय मिळत असला तरी प्रत्यक्ष व्यवहारात त्यांचा होणारा पराजय आपण पाहतो, त्यामुळे सर्व श्रद्धा डळमळीत होऊ लागतात. जीवन असे व्यस्त असले तरी ते कोणत्याही दृष्टीने स्वस्त नाही, आणि ते सुस्त असून चालणार नाही. मानसशास्त्र मृत्यूच्या गूढ आकर्षणाविषयी (Death wish) सतत उल्लेख करीत असले तरी, माणसाची जीवनाविषयीची ओढ त्या आकर्षणापेक्षा सहस्रपटीने प्रबळ आहे. मात्र त्याला अत्यंत प्रिय वाटणाऱ्या या जीवनावर काही वेळा आनंदानं पाणी सोडायला तो तयार होतो. स्वदेशाच्या रक्षणाकरिता धारातीर्थी पडणाऱ्या वीरापासून महारोग्याच्या सेवेसाठी आपले जीवन धोक्यात घालणाऱ्या मानव सेवकांपर्यंतची सारी उदाहरणे या तत्त्वाचीच द्योतक आहेत. याचा अर्थ उघड आहे. प्राणापेक्षाही अधिक प्रिय असलेली मूल्ये हेसुद्धा जीवनाचं एक आवश्यक अंग आहे. या मूल्यांपैकी काही सांकेतिक किंवा कालमर्यादित असतात, युगधर्माप्रमाणं ती बदलत जातात. पण त्याग, सेवा, मैत्री, प्रीती, करुणा, न्यायबुद्धी इत्यादी मूल्यं चिरंतन आहेत. माणसातल्या केवळ पशुत्वाचंच नव्हे तर राक्षसत्वाचंही दर्शन घडविणारी भयानक महायुद्धेसुद्धा ही मूल्ये समूळ उखडून टाकू शकत नाहीत. मानवाचं चैतन्य आणि आत्मशक्ती यांतूनच ती प्रगट होतात. या सनातन मूल्याची जपणूक हे सामान्यांचे आणि मूल्यांचा विकास हे असामान्यांचे ध्येय असले पाहिजे.
10) शरीर आणि आत्मा, धर्म आणि व्यवहार अशा अनेक द्वंद्वांची घटपटादी पद्धतीने मानव जातीनं दीर्घकाळ चर्चा केली आहे. अशा द्वंद्वांतल्या दोन घटकांमध्ये छत्तिसाचा आकडा आहे, हे यापुढे आपण सर्वांनी विसरून जाणं इष्ट. शरीर व आत्मा, धर्म व व्यवहार यांचा मेळ कसा घालायचा ही विसाव्या शतकातल्या मानवापुढे सर्वांत मोठी समस्या आहे. या द्वंद्वातली आत्मा किंवा धर्म ही गोष्ट अस्तित्वातच नाही, असं गृहीत धरून या द्वंद्वांचं निरसन करता येणार नाही. प्रत्येक युगाची काही आव्हानं आणि आवाहनं असतात. समता हे चालू युगाचे आव्हान आहे. या आव्हानापोटीच लोकशाही आणि समाजवाद यांच्यासारखी नवी मूल्यं निर्माण झाली आहेत. पण या मूल्यांची ढोंगीपणानं शाब्दिक पूजा करीत राहून आर्थिक आणि सामाजिक क्रांतीसाठी मानवी मनातही एक नवी क्रांती घडून येणं आवश्यक आहे. सामाजिक क्रांतीच्या बाह्य प्रयत्नांना मानवातल्या आंतरिक क्रांतीची जोड जेव्हा मिळेल, तेव्हाच आजच्या जगातलं दैन्य आणि दुःख कमी होण्याच्या मार्गाला लागतील. या द्विविध क्रांतीच्या स्वागताकरिता मानवी मनाची मशागत करीत राहणं हे आधुनिक काळातलं एक महत्त्वाचं श्रद्धास्थान आहे.
वर उल्लेखिलेल्या जीवननिष्ठांचं आकर्षण मला वाटत असलं तरी त्यांचं चिंतन आणि संशोधन यांच्याशी माझं नातं आहे ते एका मठ्ठ शिष्याचं. या श्रद्धा किंवा निष्ठा ज्यांनी आपल्या जीवनातून साकार केल्या आणि आपल्या चिंतनातून त्या पिढ्यान्पिढ्यांपर्यंत पोहोचविल्या त्या सर्व पूर्वसुरीचं हे ऋण आहे. 'मी तो हमाल। भार वाही' ही या बाबतीतली माझी भूमिका आहे.
ज्या निष्ठा मला वेळोवेळी जाणवल्या आणि अजूनही जाणवत आहेत, त्या शब्दबद्ध करण्याचा हा वेडावाकडा प्रयत्न आहे. अशा निष्ठा थोड्याफार असिधारा व्रतासारख्या असतात. उत्कट आत्मिक बळ असलेली माणसंच त्या पेलू शकतात. ह्या निष्ठांपैकी काहींचं परिपालन माझ्या हातून क्वचित घडलं असेल तर ते अत्यंत अल्प प्रमाणात. जिथं आभाळ गाठायचं असतं, तिथं गरुडाचेच पंख असावे लागतात. तसले पंख मला लाभलेले नाहीत, याची जाणीव माझ्या मनात सदैव जागी आहे. मला मिळालेले पंख चिमणीचे आहेत. या चिमणीच्या पंखांनी थोडीशी फडफड करण्यापलीकडे मी आयुष्यात अधिक काही केलेलं नाही. मात्र सूर्यफुलाला पृथ्वीप्रमाणे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालता येत नसली तरी त्याच्या प्रकाशाकडे टक लावून पाहण्याचा आनंद त्याला घेता येतो. मला आकृष्ट करणाऱ्या या निष्ठा सूर्यासारख्या आहेत. त्यांच्याविषयी मला वाटणारी ओढ अजूनही कमी झालेली नाही, म्हणूनच हा सारा शब्द-प्रपंच मी केला आहे. 'न द्यावा तिथे पाय हा मी दिला' ही जाणीव मनाला सारखी टोचत असूनही !
'अनुराधा' मासिकाच्या मार्च 1973 च्या अंकात हा लेख प्रसिद्ध झाला होता. मेहता प्रकाशनाकडून 2007 मध्ये आलेल्या 'सशाचे सिंहावलोकन' या पुस्तकात हा लेख आहे. या पुस्तकात खांडेकरांचे आत्मपर असे 14 लेख आहेत. याचे संपादन सुनीलकुमार लवटे यांनी केले आहे.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
Ashok Shelhalkar- 25 Sep 2026
I want to subscribe and be member
save