नरेशचा अभ्यासविषय इतरांना त्यातील गुंतागुंतीच्या गणितामुळे आणि अन्य कारणांनी तसा अगम्य वाटणारा. गुरुत्वाकर्षण, रिलेटिव्हिटी वगैरे. ती मंडळी तो विषय प्रकाशवेगाने जाणाऱ्या वस्तूच्या काल्पनिक गोष्टी सांगून गळी उतरवण्याचा प्रयत्न करायची. पण व्यर्थ. तत्त्वज्ञानासारख्या विषयातील लोकांना खास कुतूहल वाटे. कारण काल व अवकाश (time and space) यांच्यातील नात्याबद्दल या शास्त्रात केली जाणारी मांडणी.
जुलै 1966 म्हणजे जवळपास 60 वर्षांपूर्वी पुणे विद्यापीठाच्या देखण्या टुमदार परिसरात दोन तरुण एकमेकांना भेटले. दोघेही तसे दबलेले होते. विद्यापीठाचे मोठे नाव, प्रत्येक विषयाची आपापली देखणी, आटोपशीर इमारत, कॅम्पस म्हणजे एक संपूर्ण वसाहत. विद्यार्थ्यांची वसतिगृहे, शिक्षकांची घरे, गेटवर (म्हणजे चतुःशृंगी देवळाच्या पायथ्याशी) टपऱ्या, त्यातून गरजेच्या वस्तू घ्यायच्या वगैरे. सगळ्यांच गोष्टी नवीन. त्यातच जागतिक कीर्ती असलेल्या शिक्षकांचा वाटणारा दरारा. अशा समान धर्मीयांची गट्टी जुळणं अगदी स्वाभाविक.
या दोघांपैकी एक मी, आणि दुसरा नरेश कुमार दधीच. पुढे साठ वर्षे फक्त नरेश.
माझे शिक्षक म्हणजे वसंत शंकर हुजूर बाजार. केंब्रिज विद्यापीठातून संख्याशास्त्रात डॉक्टरेट मिळवून आलेले आणि भारतभर दबदबा असलेले. विभाग प्रमुख. मी एमएस्सीचा विद्यार्थी. नरेशचे शिक्षक म्हणजे विष्णू वासुदेव नारळीकर (जयंत हा त्यांचा पुत्र) आणि विभाग प्रमुख हुजूर बाजार यांचे मेहुणे. वयाने ज्येष्ठ. केंब्रिजमधून गणिताचे रँग्लर होऊन आलेले. रँग्लर म्हणजे गणिताच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवणारे. आनंद मोहन बोस हे 1874 मध्ये पहिले भारतीय रँग्लर झाले. र. पु. परांजपे हे पहिले सीनिअर रँग्लर. (सर्वोत्तम गुण मिळवणारे - 1899 मध्ये.) व्ही. व्ही. नारळीकर 1930 साली रँग्लर झाले. त्यांना न्यूटन स्टुडन्टशिप आणि रॅले प्राइझ मिळाले. त्यांनी विख्यात शास्त्रज्ञ आर्थर एडिंग्टन यांच्या हाताखाली पुढील संशोधन केले. भारतात परतून अल्यावर 1960 पर्यंत ते बनारस हिंदू विद्यापीठात गणित विभाग प्रमुख होते. पुढील सहा वर्षे राजस्थान पब्लिक सर्व्हिस कमिशनचे अध्यक्ष होते. नंतर त्यांना लोकमान्य टिळक अध्यासनाचे सन्माननीय प्राध्यापक म्हणून पुणे विद्यापीठात आमंत्रण देण्यात आले होते.
आम्ही त्यांचा उल्लेख 'थोरले नारळीकर' असा करायचो. त्यांची करारी मुद्रा, कडक शिस्त यांचा नरेशला सामना करावा लागे. ते विभागात असतील तेव्हा कधी आत बोलावतील, प्रगती विचारतील याचा धाक असे. पण फायदा म्हणजे सहजपणे भारतातील विविध संशोधक, संशोधन संस्था यांच्याशी नरेशचा परिचय झाला. इंडियन अॅकॅडमी ऑफ सायन्समध्ये काय चालते, 'करंट सायन्स' या साप्ताहिकाचे काय महत्त्व आहे, अशा अनेक गोष्टी नरेशकडून ऐकायला मिळत. मी त्या चकित नजरेने श्रद्धेने श्रवण करीत असे.
यथाकाल, डॉक्टरेट पदवी मिळवून, एक-दोन वर्षे अन्य ठिकाणी काम करून, अखेर नरेश पुण्याला म्हणजे त्याच्या अॅकॅडमिक माहेरी परतला. तो शेवटपर्यंत पुणे विद्यापीठाच्या गणित विभागात शिकवण्याचे काम त्याने 17 वर्षे केले.
जयंत नारळीकरांच्या नेतृत्वाखाली अॅस्ट्रॉनॉमी / अॅस्ट्रोफिज़िक्स या विषयांसाठी संशोधन संस्था पुण्याला स्थापन करण्याचे ठरल्यावर तिच्या स्थापनेच्या तयारीत नरेशने स्वतःला पूर्ण झोकून टाकले. संस्था निर्माण होताच तो तिच्यात दाखल झाला. जयंत नारळीकरांच्या सेवानिवृत्तीनंतर तिथला संचालक झाला. त्याची वैज्ञानिक म्हणून कारकिर्द, त्याचे संशोधन, विविध देशांतील वैज्ञानिकांशी सहयोगी कार्य यांबद्दल अनेकांनी लिहिले आहे. विकिपीडियामध्येसुद्धा आहे. तो अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिला, याचे सर्वांना कौतुक वाटणे स्वाभाविक आहे.
माझ्यासाठी मात्र तो दोन वर्षे पुढे असलेला, पण अगम्य विषयात संशोधन करणारा मित्र या रूपात होता. आमचे एकत्र उद्योग अर्थात वेगळेच होते. एक तर होस्टेलमधल्या जेवणाला शिव्या देणे. खिशात पैसे असतील तर सिटीत (म्हणजे बसने डेक्कन जिमखाना, मग पुढे चालत) जाऊन त्याच्या पसंतीच्या एखाद्या ठिकाणी जेवणे. 'खाने पर क्या है?' या त्याच्या प्रश्नाला उत्तर म्हणजे भाज्यांची यादी. रोटी तर गृहीतच. त्याच्या मते, रोटीचे महत्त्व म्हणजे चमचमीत भाजी खाण्यासाठी चमचा. मला हे नवीन होते. मी मुंबईला शिकलो होतो. बम्बईया हिंदी बोलत असे. नरेशच्या तोंडी सोयीनुसार शुद्ध खडी बोली किंवा उर्दूची फोडणी असे कानी पडे. मग मी अपरिचित शब्दांचा अर्थ विचारी. 'नियामत म्हणजे काय रे?' 'म्हणजे देणगी. कुदरत की नियामत. निसर्गाचे दान. आमचं हिंदी वांड्मयाचं ज्ञान दोन नावांत. शाळेत ऐकलेलं नाव मुंशी प्रेमचंद. आवडता हिरो अमिताभ बच्चन याच्यामुळे ठाऊक झालेले नाव हरिवंशराय बच्चन. नरेशला हिंदी लेखक व कवी यांच्याबद्दल खूप प्रेम होते. नाटककारांबद्दलही. त्यामुळे मी 'चरणदास चोर' नावाचे छत्तीसगढी लोकांचे नाटक पाहिले आणि हरखून गेलो. त्याच्या मित्रांचा एक तलत मेहमूद फॅन क्लब होता. वैशाली, रूपाली येथे कॉफी पिता पिता त्या गाण्यांवर गप्पा होत. एकदा नरेशने मला तेथे कॉफी पिण्याला नेले. कोणी मला विचारले की, 'तुझे आवडते तलतचे गीत कोणते.' माझी पंचाईत झाली.
पण मी अंदाजपंचे 'ये हवा ये रात ये चांदनी' असे ठोकून दिले. अब्रू वाचली.
कुमार सप्तर्षी आणि अनिल अवचट यांच्यामुळे नरेश आणि मी विद्यार्थी चळवळीत अंशतः शिरलो. तेथे तहेत-हेच्या मुलामुलींशी ओळखी झाल्या. सुनंदा सोहनी, अनिल अवचट, साधना साने अशी नावे ऐकून वाटले की, नावात अनुप्रास किती छान वाटतो. अनिल आणि सुनंदा त्यांची गट्टी सर्वांना ठाऊक होती. मार आणि उर्मिला सराफ ही आणखी एक सर्वश्रुत जोडी. साधना ही मुलगी रूपवान, छान गाणारी राष्ट्र सेवा दलाच्या पथकात भाग घेतलेली, आकर्षक व्यक्तिमत्त्वाची तरुणी. सगळ्या तरुण मुलांचे तिच्यावर लक्ष. हिचे सारेच अनवट. शिकते काय, तर फिजिओथेरपी. वडील काय करतात, तर कामगारांची वकिली. शिक्षण संपल्यावर हिने नोकरी कसली घेतली? तर चक्क सैन्य दलात. पोस्टिंग झाशीला. मुझे बाकी इच्छुकांची पंचाईत. नरेशला राजस्थानात जायचेच असे. तो वाट वाकडी करून झाशीला जाणार अशी आमची खात्री पटली. अखेर दोघांनी लग्नाचा बेत जाहीर केला.
या वेळी 'मार्मिक' हे साप्ताहिक लोकप्रिय होते आणि बाळ ठाकरे हा नवा नेता उदयाला येत होता. मार्मिकचा भर 'यंडु गुंडू' (म्हणजे दक्षिण भारतीय लोक) महाराष्ट्रातल्या नोकऱ्या लाटतात, यावर असे. त्यातून स्फूर्ती घेऊन आमच्यापैकी कोणीतरी राग व्यक्त केला की, उत्तरेचे लोक येऊन आमच्या देखण्या पोरी लाटतात. असो.
नरेशचा अभ्यासविषय इतरांना त्यातील गुंतागुंतीच्या गणितामुळे आणि अन्य कारणांनी तसा अगम्य वाटणारा. गुरुत्वाकर्षण, रिलेटिव्हिटी वगैरे. ती मंडळी तो विषय प्रकाशवेगाने जाणाऱ्या वस्तूच्या काल्पनिक गोष्टी सांगून गळी उतरवण्याचा प्रयत्न करायची. पण व्यर्थ. तत्त्वज्ञानासारख्या विषयातील लोकांना खास कुतूहल वाटे. कारण काल व अवकाश (time and space) यांच्यातील नात्याबद्दल या शास्त्रात केली जाणारी मांडणी.
पुण्यात प्रभाकर पाध्ये हे एक चर्चागट चालवीत असत. त्यानी नरेशला आमंत्रण दिले. आमच्या गटासमोर space-time यांच्यातील नात्याबद्दल तुमच्या शास्त्राने दिलेल्या कल्पना सांगा. आम्हाला हेवा वाटला. आमच्या संख्याशास्त्राबद्दल असे कुतूहल का बरे दिसत नाही? मी ते व्याख्यान ऐकले. तरी फारशी प्रगती झाली नाही. पुढे जयंत नारळीकरांनी मात्र आपल्या विषयाचे रसाळ निरूपण करून दाखवले. विषय कितपत कळला कोण जाणे! पण जयंत नारळीकर वक्ते म्हणून लोकांना पटले.
पुणे विद्यापीठातील इतर विज्ञान विभागात चालणाऱ्या संशोधनाबद्दल नरेशचे मत फारसे अनुकूल नव्हते. तेथे शिकलेल्या विद्यार्थ्यांनाच तेथे शिक्षक म्हणून नेमतात. हे विद्यार्थी त्याच पिटुकल्या विषयावर क्लोरीन-ब्रोमीन-आयोडीन (म्हणजे अल्प-स्वल्प फरकाने तेच) असे काम करत राहतात. तोच प्रश्न, तसेच प्रयोग, तीच जर्नल्स, तसूभर फरक करायचा.
जगात इतरत्र काय चालले आहे, याचा पत्ता नाही. औद्योगिक जग व अन्य व्यवसायांशी संबंध नाही. यांच्या संशोधनाचा त्यांना उपयोग नाही. त्यांच्या अडचणींची यांना ओळख नाही. इतर विभागांशीसुद्धा संबंध नाही.
(पुढे सोहन मोडक, सीताराम, श्रीधर गद्रे अशा मंडळींमुळे यात फरक झाला).
आणीबाणी आली आणि गेली. विधानसभेच्या निवडणुका आल्या. नरेश आणि मी कुमारचा प्रचार करायला अहमदनगरला गेलो. कोपऱ्याकोपऱ्यांवर सभा घ्यायच्या. व्याख्याने द्यायची. नरेश हिंदीत आणि मी मराठीत. श्रोते असले नसले तरी. त्याचा परिणाम बहुधा उलटाच झाला असावा. कुमारला मते फार कमी मिळाली. पण प्रतिस्पर्ध्याला त्याहूनही कमी. कुमार विजयी झाला.
जनता पक्षाचे सरकार केंद्रात आणि राज्यात ज्याप्रकारे वागले, आपसांत भांडत राहिले, अखेर पक्ष फुटला, सत्ता गमावली, ते पाहून आम्ही उदास झालो. भ्रमनिरास झाला. यापेक्षा NGOमध्ये काम करणे बरे.
साधना लष्करी नोकरी सोडून घरी परत आली आणि स्वयंसेवी सामाजिक कामात बुडून गेली. भीमाशंकर परिसरातील छोट्या गावांसाठी तिने खूप काम केले. या सगळ्या काळात नरेशने दोन मुलांचा संसार निष्ठेने सांभाळला.
आम्हा दोघांची शिकवणे, संशोधन ही कामे उत्तम चालली होती. हळूहळू राजकीय पक्ष, निवडणुका असे विषय गप्पांपुरतेच उरले. त्यांची जागा मुलांच्या अवखळपणाने घेतली. त्याची जुई आणि गुंडू ही जोडी, तर आमची रमा या तिघांसकट पक्षी निरीक्षण आणि अन्य सहली सुरू झाल्या. मुरुडला किनाऱ्यावर राहिलो तेव्हा गुंडूचा मावस भाऊ निखिल आला होता. आणि गुंडू या जोडीला चिमणराव आणि गुंड्याभाऊ अशी त्या वेळच्या दूरदर्शनवरील मालिकेतील नावे आम्ही चिकटवली. हा चिमणराव पुढे मोठा कमर्शिअल टीव्ही निर्माता झाला.
म्हणजे मुले कधी मोठी झाली, हे कळलेच नाही. जुई माझी विद्यार्थिनी झाली. पुढे तिने प्रथम एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी केली. नंतर ती सोडून स्वतंत्र व्यवसाय केला. उत्तम करिअर केले. साधनाच्या मते गुंडूला त्याच्या आवडीचे क्षेत्र सापडायला वेळ लागला. तो चित्रपट व्यवस्थापन क्षेत्रात शिरला. स्थिरावला. रमा आईच्या उत्तेजनाने तिच्यासारखीच इंजिनिअर झाली. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीत नोकरी करू लागली. एका सहकाऱ्याच्या प्रेमात पडून चतुर्भुज झाली आणि कम्प्यूटर क्षेत्रातील नोकरीच्या निमित्ताने परदेशी निघून गेली. नरेश आणि मी, दोघांची घरटी रिकामी झाली.
मुले मोठी झाली तशी आई-बाबांकडे चिकित्सक नजरेने पाहू लागली. आमच्या चौघांमध्ये अनवट जगणारी एकटी साधना. तिला मुले विचारीत की, 'एवढे कष्ट करून काय साधले ? खूप धडपडून एखाद्या गावासाठी काही ग्रँट मिळवली की, ती वापरायच्या वेळी गावकरी तुला दूर ठेवतात.' साधना ते मान्य करी. आणि म्हणे- 'मला जगण्याची दुसरी कुठलीच रीत ठाऊक नव्हती.' नरेशचेही तेच.
म्हणून त्याच्याबद्दलची बातमी ऐकल्यावर रमा म्हणाली, "जंटलमन सायंटिस्ट गेला."
81 वर्षांचे आयुष्य लाभलेले भौतिकशास्त्रज्ञ नरेश दधीच यांचे 6 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झाले. त्यानिमित्ताने, त्यांचे मित्र व सहकारी राहिलेले संख्याशास्त्रज्ञ अनिल गोरे यांनी लिहिलेला हा लेख आहे.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या