डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

स्पर्धेत हरले, देशाला जिंकले

या प्रसंगानंतर ॲलिस्टरचं कौतुक जगभरात झालं. अनेक वाहिन्यांवर त्याच्या मुलाखती घेण्यात आल्या. ‘द गार्डियन’, ‘न्यूयॉर्क टाइम्स’ अशा अनेक नावाजलेल्या वृत्तपत्रांमध्ये या घटनेचं महत्त्व मांडणारे लेख प्रकाशित झाले. सोशल मीडियाद्वारे सर्वसामान्य लोकही आपल्या प्रतिक्रिया देऊ लागले. सर्व खेळाडूंसाठी ॲलिस्टरने एक नवा आदर्श घालून दिला होता. ब्रेक्झिटच्या पार्श्वभूमीवर देशातील जनतेला संबोधून केलेल्या भाषणात पंतप्रधान थेरेसा मे यांनी याच स्पर्धेसंदर्भात ब्राउनली ब्रदर्सचा उल्लेख केला. इंग्रजी अस्मितेसाठी हा प्रसंग भूषणावह आहे, असं त्या म्हणाल्या.

जागतिक पटलावरील या दशकातील सर्वांत महत्त्वाच्या घटनांपैकी एक म्हणजे ‘ब्रेक्झिट’. दि. २३ जून २०१६ रोजी एका जनमत चाचणीद्वारे युरोपीय संघातून इंग्लंडने बाहेर पडून स्वतंत्र वाटचाल करावी, असा निर्णय घेतला गेला. या निर्णयामुळे बरंच मोठं राजकीय आणि सामाजिक वादळ निर्माण झालं. या निर्णयाशी सहमत असलेला आणि विरोधात असलेला अशा दोन गटांत देश विभागला गेला. त्यातच पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी राजीनामा देऊन नव्या नेतृत्वासाठी मार्ग मोकळा केला.

स्वतंत्रपणे देशाची वाटचाल कशी असेल, देशातील नव्या पिढीचं भवितव्य काय असेल असे अनेक प्रश्न जनतेसमोर होते. या पार्श्वभूमीवर थेरेसा मे यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. कित्येक वर्षे जगभर आपली सत्ता गाजवणाऱ्या इंग्लंडवर आपल्याच नागरिकांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करण्याची परिस्थिती ओढवली होती. जनतेपुढे आपला दृष्टिकोन आणि पुढील वाटचालीचा कार्यक्रम मांडण्याच्या उद्देशाने देशातील जनतेला थेरेसा मे संबोधित करत होत्या. जनतेमध्ये नवचैतन्य आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी इंग्लंड या देशाचे नागरिक म्हणून आपली ओळख-अस्मिता काय आहे, याविषयी त्या बोलत होत्या.

इतिहासातील अनेक गौरवर्णीय उदाहरणे त्यांनी दिली, त्यातील एक ॲलिस्टर आणि जॉनी ब्राउनली यांच्या एका स्पर्धेचं होतं. विशेष म्हणजे, ते दोघेही ही स्पर्धा जिंकू शकले नव्हते. पण स्पर्धेदरम्यान त्यांनी दाखवलेल्या मानवी मूल्यांचं दर्शन सर्वांची मने जिंकून गेले. त्याचं वर्णन करताना पंतप्रधान म्हणाल्या, ‘‘ब्राउनली बंधूंची ती स्पर्धा नेहमी माझ्या स्मरणात राहील. कोणताही खेळाडू अथक परिश्रम आणि कठोर तयारीनंतर विजय हातातून सहज जाऊ देत नाही. परंतु जेव्हा आपल्यातील कुणी तरी अडखळतं, स्पर्धेतून बाजूला पडतं; तेव्हा आपल्यातील सर्वांत मूलभूत मानवी प्रेरणा म्हणजे स्वार्थ बाजूला ठेवून अशांना अंतिम रेषेपार नेण्यास मदत करणे, हीच असते.

व्यक्तिवाद आणि स्वार्थ यापलीकडेही आयुष्य आहे. आपली इतरांप्रति काही जबाबदारी असते. ब्राऊनली बंधूंनी तीच भावना अधिक उजळ केली आहे.’’ ब्रेक्झिटसारख्या प्रसंगी पंतप्रधानांनी एका स्पर्धेचा या अर्थाने उल्लेख करावा म्हणजे विशेषच. ती स्पर्धा नेमकी काय होती...? कोण हे ब्राउनली ब्रदर्स...? त्यांनी असं केलं तरी काय...?  

ब्राऊनली ब्रदर्स

ॲलिस्टर आणि जोनाथन (जॉनी) ब्राउनली ही भावंडं इंग्लंडमधील सर्वांत यशस्वी ट्रायथलिट (ट्रायथलॉन खेळाडू) आहेत. खरं हे तीन भाऊ आहेत. सर्वांत मोठा ॲलिस्टर, मधला जॉनी आणि एडवर्ड हा सर्वांत लहान भाऊ. एडवर्डला खेळांमध्ये फार रुची नव्हती. इंग्लंडमधील वेस्ट यॉर्कशायर प्रांतातील ब्रॅमहोप शहरात ब्राउनली कुटुंब राहतं. हा प्रदेश अतिशय नयनरम्य आहे. उंच घनदाट डोंगराळ प्रदेश, फारशी वर्दळ नसलेले रस्ते आणि थंड वातावरणात सायकलवर लांबवर फेरफटका मारून येण्याचा छंदच जणू एलिस्टर व जॉनीला लहानपणापासून जडला होता. दोघेही एका खासगी शाळेत शिकायचे. तिथे खेळाची उत्तम व्यवस्था होती. शाळेत त्यांनी पोहण्याचं प्राथमिक प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे त्यांची आई कॅथी. ती स्वतः एक उत्तम जलतरणपटू होती. मुलांनी पोहणं शिकावं, हा तिचा आग्रह होता. तसंच त्यांचे वडील कीथ हे एक धावपटू होते. त्यामुळे ते धावण्याच्या सरावासाठी निघाले की, मुलांना सोबत घेत. धावताना शरीराचा बांधा कसा असावा, श्वास कसा नियंत्रित करावा- असं बरंच काही शिकवत मुलांमध्ये त्यांनी पळण्याची गोडी निर्माण केली.

सुरुवातीला ते क्रॉस-कंट्री धावण्याच्या स्पर्धेत भाग घेत असत. या स्पर्धेत खेळाडूंना खुल्या मैदानात साधारण चार ते बारा किलोमीटर धावून शर्यत पूर्ण करायची असते. हा रस्ता कधी उंच-सखल, कधी गवताळ-मैदानी, तर कधी खडकाळ असू शकतो. बहुतेक वेळा मुसळधार पाऊस, हिमवर्षाव अशा कठीण वातावरणात ही रेस आयोजित केली जाते. म्हणजे केवळ धावण्याच्या वेगाचीच नाही, तर एकंदरीत कणखर यष्टी आणि मनाची ही परीक्षा असते. स्पर्धेत भाग घ्यायचा म्हणजे जिंकायचंच, असं त्यांचं मत होतं. त्यासाठी ते जोमाने मेहनत करायचे. सकाळ-दुपार-संध्याकाळ मिळेल त्या वेळेत पळायचे. सरावाने येणारा थकवा त्यांना एक वेगळंच समाधान देई. पुढे त्यांनी बऱ्याच जुनिअर आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या.

ट्रायथलॉन

ॲलिस्टर आठ-नऊ वर्षांचा असताना त्याचे काका ट्रायथलॉन स्पर्धेसाठी तयारी करत होते. त्यांनीच या खेळाकडे त्यांचं मन वळवलं. ट्रायथलॉन स्पर्धेत मुख्यत्वे तीन खेळांचा समावेश होतो- धावणे, पोहणे आणि सायकल चालवणे. योगायोगाने ॲलिस्टर आणि जॉनी दोघेही हे खेळ सुरुवातीपासूनच खेळत होते. या तीनही प्रकारांमध्ये सलग सहभागी होणं, ही सहनशक्तीची कठीण परीक्षाच असते.

या क्रीडाप्रकाराची सुरुवात १९२० दरम्यान फ्रान्समध्ये झाली, असं मानलं जातं. तिथे ‘ल- ट्रॉई-स्पोटर्‌स’ म्हणजेच ‘तीन खेळ’ नावाची एक रेस आयोजित केली जायची. त्यात ‘मार्न’ कालवा पोहून जाणे, त्यानंतर १२ किलोमीटर अंतर सायकलने पार करणे आणि शेवटी तीन किलोमीटर अंतर पळणे- अशा कठीण आव्हानांचा समावेश होता. पहिली आधुनिक ट्रायथलॉन स्पर्धा २५ सप्टेंबर १९७४ रोजी अमेरिकेतील मिशन बे, सॅन दिएगो इथे आयोजित करण्यात आली होती. पुढे २००० मध्ये या क्रीडाप्रकाराचा काही बदलांसह ऑलिम्पिक स्पर्धेत समावेश करण्यात आला. ऑलिम्पिक ट्रायथलॉन स्पर्धेत १५०० मीटर पोहणे, ४० किलोमीटर सायकल चालवणे आणि १० किलोमीटर धावणे असे आव्हान असते.

ट्रायथलॉन करिअरची सुरुवात

सुरुवातीला ब्राउनली बंधूंचा ट्रायथलॉनमध्ये करिअर वगैरे करायचा मुळीच मानस नव्हता. जॉनीला तर या खेळांपेक्षा फुटबॉल अधिक आवडायचा. इंग्लिश प्रिमियर लीग स्पर्धेतील मँचेस्टर युनायटेड या संघाचं आपण प्रतिनिधित्व करावं, असं त्याचं स्वप्न होतं. दरम्यान ॲलिस्टरने वैद्यकीय क्षेत्रात करिअर बनवण्याच्या उद्देशाने केम्ब्रिजमधील गर्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. ॲलिस्टरने २००६ मध्ये जागतिक कनिष्ठ स्पर्धेत भाग घेतला होता. स्पर्धा म्हटलं की जिंकायचंच, या उद्देशाने तो सर्व शक्ती पणाला लावून सरावासाठी मैदानात उतरायचा. त्याच निश्चयाने तो स्पर्धेतही सहभागी झाला. अखेर ही स्पर्धा तो जिंकला आणि जुनिअर वर्ल्ड चॅम्पियन बनला.

या विजयानंतर ट्रायथलॉनकडे दोघाही भावंडांचा कल वाढू लागला. सहा महिन्यांतच ॲलिस्टरने गर्टन महाविद्यालय सोडलं. त्याने क्रीडाविज्ञान आणि मानसशास्त्र विषयाच्या पदवीशिक्षणासाठी लीड्‌स विद्यापीठात प्रवेश घेतला. खेळाप्रतीचं त्यांचं समर्पण बघून त्यांचे प्रशिक्षक म्हणतात, ‘‘त्यांचं मैदानी सरावाप्रति प्रेम बघून मला खरंच आश्चर्य वाटलं.

एक दिवस ते असेच सरावासाठी आलेले असताना मी त्यांना विचारलं की, ‘आज तुम्ही काय-काय केलंत?’ तर ते म्हणाले, ‘सर, आम्ही सकाळी सायकल पळवत शाळेत गेलो. मग तिथे पोहण्याचा सराव केला. जेवणाच्या सुटीत धावायला गेलो आणि शाळा सुटताच सरावासाठी थेट तुमच्याकडे आलोय.’ कठोर परिश्रमांतून त्यांना जो आनंद मिळायचा तो अवर्णनीयच!’’ दृढनिश्चय हीच जणू त्यांची ओळख बनली होती. कित्येकदा दिवसाला ते अनेक रेसमध्ये भाग घ्यायचे. सकाळी सराव आणि संध्याकाळी रेस, असं त्याचं विचित्र वेळापत्रक होतं. अशाच मेहनतीमुळे दोघेही जुनिअर वर्ल्ड चॅम्पियन बनले. विजयाची ही घोडदौड पुढे अशीच सुरू होती. ॲलिस्टर आणि जॉनी दोघांनीही ऑलिम्पिक स्पर्धा, कॉमनवेल्थ गेम्स, आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन चॅम्पियनशिप तसंच युरोपीय ट्रायथलॉन चॅम्पियनशिप अशा सर्वच महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवलं.

न जिंकलेल्या शर्यतीचं पारितोषिक

ऑगस्ट २०१६ मध्ये रिओ-डी-जेनिरो (ब्राझील) मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात ॲलिस्टरला ट्रायथलॉनचं सुवर्ण, तर जॉनीला रौप्यपदक मिळालं होतं.

काही दिवसांतच मेक्सिकोमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप होती. उष्ण हवामानामुळे मेक्सिकोमधील रेस नेहमीच फार कठीण असते. त्यामुळे प्रत्येक बाबीचं योग्य नियोजन अत्यावश्यक असतं. दि.१८ सप्टेंबर, रविवारी ती रेस होती. अंतिम सामना पाहण्यासाठी बरीच गर्दी जमली होती. तापमानाचा पारा तिशी ओलांडत होता. अशा परिस्थितीत रेस सुरू झाली. जॉनीने अगदी सहज आघाडी मिळवली. दुसऱ्या क्रमांकावर स्पेनचा मारिओ मोला हा खेळाडू होता, त्याच्यापाठोपाठ होता ॲलिस्टर. सायकल आणि पोहण्याची स्पर्धा अग्रक्रमाने पार पाडत जॉनी शेवटच्या १० किलोमीटर धावण्याच्या शर्यतीत पोचला. उन्हामुळे खूप थकवा जाणवत होता, तरीही स्नायूंमधील सर्व शक्ती एकवटून तो पळत होता. ही रेस जॉनीच जिंकेल, हे अगदी स्पष्ट होतं. रेस संपायला अगदी थोडंच अंतर उरलं होतं आणि मोला अद्याप बराच पिछाडीवर होता. तेवढ्यात अचानक उष्माघातामुळे जॉनी पूर्णपणे गळून गेला. एवढं अंतर वेगाने पार करणाऱ्या जॉनीला विजय डोळ्यांदेखत दिसत असतानाही एकेक पाऊल टाकणं कठीण झालं होतं. तो तसाच तोल जात काही अंतर चालला आणि अचानक थांबला.

आतापर्यंत जल्लोष करणारे दर्शक हे अकल्पित घडताना बघून निःशब्द झाले. दरम्यान, मारिओ मोला जॉनीला मागे टाकत अंतिम रेषेकडे वेगाने निघून गेला. हे दृश्य त्याच्यामागून येणाऱ्या ॲलिस्टरला दिसलं. २०१० मध्ये ॲलिस्टरबाबत असंच काहीसं घडलं होतं. त्यामुळे अशा उष्माघाताचं गांभीर्य त्याला माहिती होतं. ॲलिस्टर लगेच जॉनीकडे गेला. आपल्या खांद्याचा आधार देत त्याला अंतिम रेषेकडे शक्य तेवढ्या वेगाने घेऊन जाऊ लागला. ट्रायथलॉन रेस त्यांनी कधीच सोडली होती. ही नवी रेस होती जीवन आणि मृत्यूमधली.

उष्माघात आणि शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्याने मृत्यूसुद्धा येऊ शकतो, हे ॲलिस्टरला पुरतं ठाऊक होतं आणि वैद्यकीय मदत तर अंतिम रेषेजवळच उपलब्ध होती. त्यामुळे जॉनीला तिथे ताबडतोब नेणे अत्यावश्यक होते. त्यामुळे आपला थकवा विसरून ॲलिस्टरने जॉनीला अंतिम रेषेपर्यंत पोचवलं आणि काही पावलांवर तोही कोसळला. जॉनीला लगेच वैद्यकीय मदत मिळाली आणि तो या संकटातून सुखरूप बाहेर आला.

त्या आठवणीबद्दल ॲलिस्टर म्हणतो, ‘‘जॉनी मृत्यूच्या दारातून परतला होता. त्या वेळी तिथे जॉनीच नाही, इतर कुणीही असता तरी मी तेच केलं असतं. कुठलीही स्पर्धा किंवा विजय यापेक्षा महत्त्वाचा असूच शकत नाही.’’ वर्ल्ड चॅम्पियनशिप तर ते दोघंही हरले होते; पण जॉनी आयुष्याची रेस जिंकला, तर ॲलिस्टर माणुसकीच्या परीक्षेत उत्तीर्ण ठरला.

या प्रसंगानंतर ॲलिस्टरचं कौतुक जगभरात झालं. अनेक वाहिन्यांवर त्याच्या मुलाखती घेण्यात आल्या. ‘द गार्डियन’, ‘न्यूयॉर्क टाइम्स’ अशा अनेक नावाजलेल्या वृत्तपत्रांमध्ये या घटनेचं महत्त्व मांडणारे लेख प्रकाशित झाले. प्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू पॉल गॅसोल, हेप्ट्यॅथलिट जेसिका हिल अशा अनेक दिग्गजांनी टि्वटरच्या माध्यमातून या प्रसंगाबद्दल आपली मते मांडली. सोशल मीडियाद्वारे सर्वसामान्य लोकांनीही प्रतिक्रिया दिल्या. सर्व खेळाडूंसाठी ॲलिस्टरने एक नवा आदर्श घालून दिला होता.

ब्रेक्झिटच्या पार्श्वभूमीवर देशातील जनतेला संबोधून केलेल्या भाषणात पंतप्रधान थेरेसा मे यांनी याच प्रसंगासंदर्भात ब्राउनली ब्रदर्सचा उल्लेख केला. इंग्रजी अस्मितेसाठी हा प्रसंग भूषणावह आहे, असं त्या म्हणाल्या. (या भाषणाचा अनुवाद २०१६ च्या साधना मुख्य दिवाळी अंकात आला आहे.)

न जिंकलेल्या शर्यतीचं हे अमूल्य पारितोषिकंच म्हणायला हवं. युद्धाच्या मैदानावर खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या सैनिकांचं वर्णन ‘ब्रदर्स इन आर्म्स’ असं केलं जातं. ॲलिस्टर आणि जॉनीने तर या वाक्प्रचाराला एक वेगळाच अर्थ प्राप्त करून दिला आहे. खेळांकडून यशापयशापेक्षा अधिक काही तरी नेहमीच अपेक्षित असतं. ‘एव्हरिथिंग इज फेअर...’ असं युद्धाच्या अनुषंगाने म्हटलं जातं. पण खेळांच्या बाबतीत मूल्यांचं पारडं विजयापेक्षाही जड असतं. म्हणूनच कदाचित स्पोर्ट्समन स्पिरिट म्हणजेच खिलाडूवृत्ती हा शब्द खेळांच्या दुनियेत एवढा महत्त्वाचा असावा. आयुष्यात नजर नक्कीच विजयाकडे असावी, पण त्याबरोबरच मानवी मूल्यांचा ओलावा मनात सदैव असावा, अशी प्रेरणा ब्राउनली बंधूंच्या या खऱ्याखुऱ्या गोष्टीतून घ्यायला हवी.

Tags: प्रेरणादायी नीलेश मोडक युवा दिवाळी अंक २०१८ ट्रायथलॉन ट्रायथलिट जोनाथन (जॉनी) ब्राउनली ॲलिस्टर ब्राउनली ओलिंपिक ऑलिम्पिक neelesh modak 2018 yuwa Diwali ank preranadayi youth inspirational story athelet triathlon jonny brownlee alistair brownlee alister braunali Olympic weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नीलेश मोडक
neeleshmodak@gmail.com

लेखक 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके