डिजिटल अर्काईव्ह

नितीश कुमार यांचे (व्यक्त न झालेले) मनोगत

 मागील 40 वर्षे मी निवडणुकीच्या पक्षीय राजकारणात आहे. सुरुवातीची दहा वर्षे जनता दलात. नंतरची तीस वर्षे प्रामुख्याने भाजपसोबत. पण काय गंमत आहे पहा, या तीन दशकांत सर्व पक्षांना मी जवळचा वाटत आलो. काहीसा अपवाद कम्युनिस्टांचा, पण ते आहेत तरी किती ! अनेक लहान-मोठे पुरोगामी पक्ष-संघटना तर मला सतत भावी पंतप्रधान म्हणून रंगवत राहिले. 'मुंगेरीलाल के हसीन सपने' याशिवाय त्याला काही अर्थ नव्हता. इतका प्रदीर्घ काळ मी भाजपसोबत राहूनही कोणालाही हिंदुत्ववादी वाटलो नाही, ना भाजपला ना अन्य पक्षांना. ते माझे सर्वांत मोठे वैचारिक यश म्हणावे का? काही वेळा मी माझ्या भूमिका ठाम, पण सौम्य शब्दांत मांडल्या, काही वेळा गप्प बसलो. जिथे बिहारचे नुकसान होईल असे वाटले, तिथे मात्र बोललो. तेव्हा भाजप, संघ यांनीही ते सहन केले. त्यांच्या अनेक लहान-मोठ्या वाईट उक्तीकडे, कृतीकडे मी दुर्लक्ष केले. कारण या संपूर्ण प्रवासात बिहारची जनता हाच माझ्या प्रेमाचा, समर्पणाचा, अभिमानाचा आणि आनंदाचा विषय राहिला. प्राप्त परिस्थितीत सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न मी बिहारसाठी केला. त्याला संमिश्र यश मिळाले. देशाच्या स्तरावर भाजपच्या विरोधात मी बोलायचे नाही आणि भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी माझ्या विरोधात बिहारमध्ये बोलायचे नाही, असा आमचा समझोता होता.

 

आता मी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ दहाव्यांदा घेतली. आणखी पाच वर्षे मिळतील, तेव्हा मी 80 वर्षांचा असेन. अलीकडे माझ्या तब्येतीविषयी माध्यमांकडून बोलले गेले, भाजप नेत्यांकडूनही. पण पुढील पाच वर्षे मी पूर्ण करणार, विधात्याने हस्तक्षेप केला नाही तर. मी मुख्यमंत्रिपदाची शपथ 2000 मध्ये पहिल्यांदा घेतली, पण सात दिवसांनंतरच ते सरकार गडगडले.. त्यानंतर 2005 मध्ये मी खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री झालो आणि सलग आठ वर्षे राहिलो. तेव्हा भाजपमध्ये वाजपेयी अडवाणी यांचे पर्व होते. त्यामुळे, बिहारचा घसरलेला गाडा मी भाजपच्या साथीने रुळावर आणू शकलो. पण 2013 च्या मध्याला भाजपने नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केले. तेव्हा मी माझ्या पक्षाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर काढले. अनेक ज्येष्ठ सहकारी तसे करायला इच्छुक नव्हते; पण मी आग्रही राहिलो. माझा तो राग केवळ व्यक्तिगत नव्हता. दोन-तीन कारणे होती. एक, वाजपेयींच्या काळात किमान समान कार्यक्रमावर आधारित राष्ट्रीय लोकशाही आघाडी बनली होती, त्यांच्यानंतर अडवाणी यांनीही त्यात बदल केला नव्हता. वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेवायचे हे त्या 'किसका' मधील महत्त्वाचे कलम होते. आणि तरीही, भाजपने कमालीचा वादग्रस्त नेता पंतप्रधानपदाचा उमेदवार केला याचा तो राग होता. दुसरे कारण, बिहारमध्ये मुस्लीम मतदार मोठ्या प्रमाणात आहेत, तो समाजघटक माझ्या पक्षाचा महत्त्वाचा जनाधार आहे, त्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान होईल असे मला वाटत होते. तिसरे कारण, तेव्हा माझ्या पक्षाला विधानसभेत बहुमताच्या जवळ जाणाऱ्या जागा होत्या. त्यामुळे भाजपाला बाहेर काढूनही काँग्रेस व डाव्यांच्या पाठिंब्यावर माझे सरकार टिकून राहू शकणार होते. तेव्हा मी तडाखेबंद भाषण विधानसभेत केले. माझी व्यथा, वेदना आणि भूमिका मांडली.

त्यानंतर वर्षभराने, मे 2014 मध्ये देशात सार्वत्रिक लोकसभा निवडणुका झाल्या. एकट्या भाजपला बहुमताइतक्या जागा मिळाल्या, मोदी पंतप्रधान झाले. याउलट, त्या निवडणुकीत माझ्या पक्षाला केवळ दोन जागा मिळाल्या. मी घेतलेली भूमिका जनतेने स्वीकारली नाही, असा त्याचा अर्थ होता. पक्षातील अनेक नेत्यांचा विरोध डावलून 'रालोआ'तून बाहेर पडण्याचा निर्णय माझा होता. म्हणून त्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, जितनराम मांझी यांना मुख्यमंत्री केले. ते माझ्याशी एकनिष्ठ आणि दलित समाजातून आलेले होते. पण पूर्वी महाराष्ट्रात जे घडले त्याची पुनरावृत्ती बिहारमध्ये झाली. शरद पवारांशी सुधाकरराव नाईक जसे वागले, अगदी तसेच जितनराम माझ्याशी वागले. साहजिकच, आठ-नऊ महिन्यांनी मी त्यांना हटवून पुन्हा मुख्यमंत्री झालो. तेव्हा बिहार विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या होत्या. दरम्यानच्या वर्षभरात मोदींचा करिश्मा देशभर चर्चेत होता. भाजप एकेक राज्य काबीज करीत चालला होता. त्यामुळे, 2015 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत माझ्या पक्षाचा निभाव लागणार नव्हता. जितनराम मांझी यांना मुख्यमंत्री ठेवून तर निश्चितच नाही. त्यामुळे लालूप्रसाद यांच्या पक्षाला व काँग्रेसला बरोबर घेऊन ती निवडणूक लढवली आणि जिंकलो. मी पुन्हा मुख्यमंत्री झालो. वस्तुतः त्या निवडणुकीत लालूबरोबर युती / आघाडी करावी लागणे हा माझा खूप मोठा पराभव होता. कारण पंधरा वर्षांचे 'लालूराज' संपवून तर 2005 मध्ये मी मुख्यमंत्री झालो होतो. पण बराच काळ उलटला होता आणि अन्य पर्याय नव्हता.

पुढील वर्ष-दीड वर्षात लालूपुत्र तेजस्वीला उपमुख्यमंत्री करून मी सरकार चालवले, आघाडी चालवली. पण लालूजींचे कार्यकर्ते आणि गुंड यांनी पुन्हा आपले रंग दाखवायला सुरुवात केली. ते मलाही जुमानीत नाहीत, असे चित्र दिसू लागले. आमच्यातील त्या कुरबुरी पाहून, मोदी-शहा यांनी जाळे फेकले. वस्तुतः भाजपपासून मी तुटलो त्याला तेव्हा जेमतेम अडीच वर्षे उलटली होती. त्यामुळे ना मोदी-शहा यांचा माझ्यावरचा राग कमी झाला होता, ना माझा त्यांच्यावरचा. मात्र, लालूजींच्या पक्षासोबत राहणे मला दिवसेंदिवस कठीण होत चालले होते. म्हणून मोदी व शहा नेतृत्व करीत असलेल्या रालोआमध्ये पुन्हा सामील झालो, भाजपसोबत सरकार बनवले. अर्थातच, माझे मुख्यमंत्रिपद टिकविले. तोही कटू निर्णयच होता. पण इलाज नव्हता. त्याचे एक कारण राज्यात मला त्रासदायक होईल असा भाजप नेता नव्हता आणि केंद्रीय सत्ता सोबत असेल तर राज्याचे अर्थकारण जुळवता येणे सोपे जाणार होते.

तर, राजद व काँग्रेस यांना सोडून मी 2017 मध्ये पुन्हा भाजपसोबत गेलो. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुका झाल्या. राज्यात माझ्या पक्षालाही चांगल्या जागा आल्या, केंद्रात मंत्रिपदेही मिळाली. त्यानंतर वर्षभराने आलेली बिहार विधानसभा निवडणूक आम्ही जिंकलो, मी पुन्हा मुख्यमंत्री झालो. परंतु त्यानंतर दोन-अडीच वर्षांत असे लक्षात आले की, भाजपच्या महत्त्वाकांक्षा अतिच स्वैर झाल्यात. महाराष्ट्रात त्यांनी पाव शतक साथीदार असलेल्या शिवसेनेत फूट पाडली. तसाच प्रयोग ते बिहारमध्ये माझ्या पक्षात करीत होते. म्हणजे मी पाच वर्षे मोदी व शहा यांच्यासोबत राहिल्यावरही माझ्यावरचा सूड उगवण्याची त्यांची इच्छा संपलेली नव्हती. ते लक्षात आल्यावर मी 2022 मध्ये अगदी अचानक पुन्हा राजद व काँग्रेस यांच्यासोबत गेलो. तेजस्वीला पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणून घेतले. मोदी व शहा यांना तो झटका खूपच अनपेक्षित होता. माझ्यासाठीही तो कडू घोट होता, पण मोदी व शहा यांना धडा शिकवला. मी असे काही करेल याची त्यांना कल्पना नसावी. ते हात चोळत बसले. तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे सांगितले, 'तुम्ही माझा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला तर मी काय करायला हवे होते ?'

दुसऱ्यांदा लालूजी व काँग्रेस यांच्यासोबत आलो, तेव्हा 2024 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले होते. भाजपविरोधात देशव्यापी आघाडी उघडण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. दोन डझन पक्ष एकत्र येऊन 'इंडिया आघाडी' अस्तित्वात आली. अशी आघाडी म्हटले की, माझे नाव त्यात आघाडीवर राहते. तेव्हा मला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करणे काहींनी सुरू केले. मुख्यतः माध्यमांनी आणि ज्यांना निवडणुकीच्या राजकारणात काहीही स्थान नाही अशा चिमुकल्या पक्ष-संघटनांनी; पण मला कळते ना, माझा पक्ष एका राज्यापुरता मर्यादित आणि लोकसभेत मिळून मिळून किती जागा मिळतील तर वीस-पंचवीस. तेवढ्या खासदारांच्या बळावर पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहायला मी काही खुळा नाही. पण लोक घेतात आपले नाव तर घेऊ द्या, त्यात नुकसान काही नाही, म्हणून मी त्याबद्दल काही बोलत नव्हतो. तेव्हा इंडिया आघाडीच्या बाबतीत माझा हेतू मर्यादित होता. भाजप कमजोर होत असेल तर हवाच आहे; किंबहुना आवश्यक आहे आणि काँग्रेस व अन्य पक्षांचे सरकार केंद्रात आले तर आपले बिघडणार काहीच नाही, सत्तेतील वाटा वाढेल, आपली बार्गेनिंग पॉवर वाढेल इतकाच.

पण इंडिया आघाडी झाल्यावर काँग्रेसचा नतद्रष्टपणा पुन्हा पुन्हा दिसत होता, अन्य पक्षांची सौदेबाजी चालूच होती, काहींचे 'तळ्यात मळ्यात' चालू होते. गोंधळ वाढीस लागत होता. मग राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार देणे असो, वा त्या त्या राज्यातील विधानसभा निवडणुकांचे जागावाटप कसे करायचे, याची चर्चा असो. राहुल आणि ज्येष्ठ काँग्रेसनेते यांच्यातील बेबनाव चालूच होता. राहुल 'मसिहा' म्हणून नव्याने उदयाला आले होते, पण काँग्रेस पक्ष-संघटना प्राण हरवलेली. मात्र, त्याच वेळी मोदी व शहा यांना भीती वाटू लागली होती, 2024 ची लोकसभा निवडणूक जिंकणे त्यांच्यासाठी जीवन-मरणाचाच प्रश्न झाला होता. त्यांचा आत्मविश्वास डळमळला होता. त्यामुळे त्यांनी माझ्याकडे गळ टाकायला सुरुवात केली. 'पूर्वी झाले ते विसरून जा, पुन्हा तसे घडणार नाही', असे आर्जव केले. मला पूर्ण आश्वस्त केले. तेव्हा मला हे कळत होते की, मी भाजपकडे गेलो तर इंडिया आघाडी बरीच कमजोर होईल. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाची शक्यता वाढेल. पण इंडिया आघाडीसोबत थांबलो तर काय ? भाजपची केंद्रीय सत्ता जाईलच असे नाही आणि गेली तरी त्यानंतर वर्षभराने येणारी बिहार विधानसभा मला जिंकता येईल का ? मोठी लाट आली तरी लोकसभेत माझ्या पक्षाला जास्तीतजास्त वीस जागा जिंकता येतील, कारण जागावाटपात राजद व काँग्रेस यांच्या वाट्याला निम्म्या जागा जातील. तेवढ्या बळावर कोण कशाला मला पंतप्रधान करेल. आणि अगदीच चमत्कार झाला तर माझा 'देवेगौडा' होईल. 'तुम्हाला 'ज्योती बसू' व्हायचे की 'देवेगौडा'?' असा प्रश्न विचारला जातो तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता 'देवेगौडा नको' म्हणणारे लोक असतात, मी त्यातला आहे. त्यामुळे, मी भाजपचे आमंत्रण स्वीकारले आणि इंडिया आघाडीतून 2024 उजाडत असताना बाहेर पडलो. मोदी व
शहा यांची अत्यंत महत्त्वाच्या वेळी तातडीची गरज मी भागवली, त्यामुळे त्यांनी मला माझ्या पूर्वीच्या वर्तनाबद्दल माफ केले असावे. त्यातून मी बिहारला व स्वतःला आश्वस्त केले.

त्यानंतर, लोकसभा निवडणूक झाली आणि केंद्रात मोदी-शहा राजवट पुन्हा आली; पण 240 जागांसह. म्हणजे पूर्ण बहुमतापासून बऱ्यापैकी दूर. त्यामुळे सर्वाधिक आनंद मला झाला. कारण आता ते सरकार अल्पमतात आहे, तर त्यांना रालोआतील सर्वच घटकपक्षांची गरज राहणार. त्यामुळे आताची बिहार विधानसभा निवडणूक आम्ही एकजुटीने व अधिक ताकदीने लढवली. साम-दाम-दंड-भेद ही कूटनीती वापरण्यात भाजपवाले पूर्वी कधी नव्हे इतके तरबेज झाले आहेत. मी ती नीती अनीती चालवून घेतली आणि बिहार विधानसभा निवडणुकित अभूतपूर्व बहुमत आम्हाला मिळाले. माझ्या पक्षाला जवळपास भाजपइतक्याच जागा मिळाल्या आणि मी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 2029 ची लोकसभा मोदी व शहा यांना आणखी अवघड जाणार आणि आताही लोकसभेत भाजपला बहुमत नाही, म्हणजे आणखी चार वर्षे तरी त्यांना केंद्रातील सत्तेसाठी माझ्या पक्षाचे खासदार हवेत. साहजिकच, आणखी चार वर्षे ते माझे मुख्यमंत्रिपद गपगुमान मान्य करतील. त्यांना त्यांच्या केंद्रातील सत्तेची चिंता आहे, बिहारची नाही. मला बिहारची चिंता आहे, केंद्राची फारशी नाही. केंद्राची चिंता मी 2013 मध्ये केली, त्याचे परिणाम भोगावे लागले. 2029 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीनंतर वर्षभराने बिहार विधानसभा निवडणुका येतील, तेव्हा भाजप स्वबळावर लढेल की माझ्यासह, या प्रश्नाचा विचार आता कशाला? तर मुद्दा असा की, पुढची पाच वर्षे सुखासुखी निभावली तर 2005 ते 2030 अशी सलग 25 वर्षे बिहारच्या सत्तेवर राहिलेला माणूस मी असेन. मधले आठ-नऊ महिने मांझीचा कालखंड सोडता संपूर्ण काळ म्हणजे दोन तप मुख्यमंत्री राहिलेला 'बिहारी' मी असेन.

मागील वीस वर्षांत माझ्या नेतृत्वाखाली बिहारने वाटचाल केली. यातील आधीच्या दहा वर्षांत तिकडे मोदींचे 'गुजरात मॉडेल' होते विकासाचे, आणि इकडे 'बिहार मॉडेल' होते नीतिशच्या सुशासनाचे. अलीकडच्या दहा वर्षांत मात्र माझ्या नावाने ते मॉडेल ओळखले जात नाही. कारण या दशकात दोन वेळा लालू यादवांचा पक्ष सोबतीला घेतला होता आणि त्याशिवाय काँग्रेस. मग कशाचे मॉडेल आणि काय? पण पुढील चार-पाच वर्षांत मला पुन्हा एकदा 'सुशासक नीतिश बाबू' अशी ओळख निर्माण करायची आहे. 2005 पूर्वीची वीस वर्षेही मला या क्षणी आठवतात. 1985 मध्ये मी पहिल्यांदा आमदार झालो, जनता दलातून. 1989 मध्ये मी व्ही. पी. सिंह मंत्रिमंडळात राज्यमंत्री झालो, आठ-नऊ महिनेच ते सरकार टिकले, पण शिकायला खूप मिळाले त्या काळात. तेव्हा लालूजी, शरद यादव, रामविलास पासवान आणि मी, अशी बिहारी चौकडी होती जनता दलात. पुढे लालूजींनी पक्षाचा कब्जा मिळवला, पासवान तळ्यात मळ्यात राहिले. शरद यादव आणि मी समता पार्टी केली, जॉर्ज फर्नांडिस आमचे मेंटॉर होते. दरम्यानच्या काळात बिहारमध्ये लालूंचे गुंडाराज अधिकाधिक पसरत गेले, असह्य होत गेले. आमची कुचंबणा वाढत होती, तिसऱ्या आघाडीचे काही खरे नाही, असे लक्षात आले. काँग्रेसची जोरदार घसरण सुरू झाली होती. भाजप मात्र सत्तेच्या निकट आला होता. वाजपेयींचे उदारमतवादी आणि सर्वसमावेशक नेतृत्व त्यांनी पुढे केले होते. किमान समान कार्यक्रमाच्या नावाखाली वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेवायलाही भाजप तयार होता. ते बाजूला ठेवणे तत्कालिक आहे, हे आम्हालाही कळत होते. पण दीर्घकालीनच्या नावाखाली तत्कालीनचे महत्त्व दुय्यम मानणे राजकारणात परवडत नाही. शिवाय, स्थानिक पातळीवर आम्हाला लालूंशी टक्कर घ्यायची होती. त्यामुळे भाजप आम्हाला 'दगडापेक्षा वीट मऊ' असा वाटला. आणखी एक कारण, बिहार राज्यात भाजपाला तेवढे मोठे स्थान नव्हते आणि एकटे लढू एवढे बळ आमच्यात नव्हते. त्यामुळे केंद्र व राज्य, असा दुहेरी विचार करून आम्ही भाजपसोबत जाणे अपरिहार्य होते.

1995 ते 2005 या दशकात मी प्रामुख्याने केंद्रात होतो. तेव्हा वाजपेयी मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री राहिलो, कृषिमंत्री राहिलो. मी रेल्वेमंत्री असताना मोठा अपघात झाला, म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा किती कौतुक वाट्याला आले, अनेकांनी लाल बहादूर शास्त्री यांच्याशी तुलना केली. केंद्रात कृषिमंत्री असताना 2000 च्या दरम्यान बिहार विधानसभा जिंकून मुख्यमंत्री होण्यासाठी मला पाठवले गेले. पण ते मुख्यमंत्रिपद आठवडाभरात आटोपले. त्यानंतर पुन्हा केंद्रात जाऊन कृषिमंत्री झालो. माझी लोकसभेतील ललितरम्य भाषणे लोकांना आवडत होती. उत्तम वक्ता म्हणून ख्याती झाली होती. वाजपेयींचा आवडता व कार्यक्षम मंत्री म्हणून प्रशस्ती मिळत होती. तेव्हाही काही जण माझा उल्लेख 'भावी पंतप्रधान' असा करायचे, आतून बरे वाटायचे.

असो.. तर मागील 40 वर्षे मी निवडणुकीच्या पक्षीय राजकारणात आहे. सुरुवातीची दहा वर्षे जनता दलात. नंतरची तीस वर्षे प्रामुख्याने भाजपसोबत. पण काय गंमत आहे पहा, या तीन दशकांत सर्व पक्षांना मी जवळचा वाटत आलो. काहीसा अपवाद कम्युनिस्टांचा, पण ते आहेत तरी किती ! अनेक लहान-मोठे पुरोगामी पक्ष-संघटना तर मला सतत भावी पंतप्रधान म्हणून रंगवत राहिले. 'मुंगेरीलाल के हसीन सपने' याशिवाय त्याला काही अर्थ नव्हता. इतका प्रदीर्घ काळ मी भाजपसोबत राहूनही कोणालाही हिंदुत्ववादी वाटलो नाही, ना भाजपला ना अन्य पक्षांना. ते माझे सर्वांत मोठे वैचारिक यश म्हणावे का? काही वेळा मी माझ्या भूमिका ठाम, पण सौम्य शब्दांत मांडल्या, काही वेळा गप्प बसलो. जिथे बिहारचे नुकसान होईल असे वाटले, तिथे मात्र बोललो. तेव्हा भाजप, संघ यांनीही ते सहन केले. त्यांच्या अनेक लहान-मोठ्या वाईट उक्तीकडे, कृतीकडे मी दुर्लक्ष केले. कारण या संपूर्ण प्रवासात बिहारची जनता हाच माझ्या प्रेमाचा, समर्पणाचा, अभिमानाचा आणि आनंदाचा विषय राहिला. प्राप्त परिस्थितीत सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न मी बिहारसाठी केला. त्याला संमिश्र यश मिळाले. देशाच्या स्तरावर भाजपच्या विरोधात मी बोलायचे नाही आणि भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी माझ्या विरोधात बिहारमध्ये बोलायचे नाही, असा आमचा समझोता होता.

बिहारमध्ये लालूंचे 'जंगलराज' 15 वर्षे चालले, मी वीस वर्षे माझ्या पद्धतीने राज्य चालवले. लालू संपले, लालूपुत्र तेजस्वी उदयाला आला. पुढे कधीतरी त्याला मुख्यमंत्रिपद मिळेल. रामविलासजींचा पुत्र चिराग, तोही तरुण आहे. त्यालाही काही प्रमाणात संधी मिळू शकेल. लालू व रामविलास माझे एके काळचे सहकारी, मित्र. त्यांचे वारस पुढे जातील, माझा पुत्र राजकारणात नाही. माझ्या पक्षाचे भविष्य काय असेल? येईल उदयाला कोणीतरी, मी नसेल तेव्हा. कदाचित, माझ्या पक्षात फूट पडेल. काही जण भाजपसोबत जातील, काही जण चिराग व तेजस्वी यांच्यासोबत. भविष्यात जे काय व्हायचे असेल ते होईल. पण पुढील पाच वर्षे मी संधी घेणार. मी इतकी वर्षे भाजपसोबत राहिलो, पण राज्यात हिंदुत्वाची लाट येऊ दिली नाही, किंबहुना थोपवली. हे माझे मोठे यश नाही का? आणि तसे नसते तर सर्व पुरोगामी, मध्यम मार्गी पक्षांनी मला पसंत केले असते का? अलीकडच्या दहा वर्षांत मला 'पलटूराम' म्हटले गेले. पण मला स्वबळावर सत्ता मिळणारच नव्हती. मग भाजप की लालू, असे दोनच पर्याय बिहारी जनतेला मिळाले असते. त्यांच्यापेक्षा मी निश्चितच चांगला पर्याय दिला, असा निर्वाळा इतिहासाला करावा लागेल. बिहारचे हित साधण्यासाठी मी अलीकडच्या दशकात 'पलटूराम' झालो, असेही म्हणायला माझी हरकत नाही.

कदाचित, माझा हा मुखमंत्रिपदाचा शेवटचा कालखंड ठरेल. माझ्या आतापर्यंतच्या सर्व उलाढालींत मला मनापासून कोणाचे आभार मानायचे आहेत? माझ्या 20-25 वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत सर्वांत महत्त्वाची भूमिका कोणी निभावली? मला मुख्यमंत्रिपद इतका दीर्घ काळ मिळत राहिले ते कोणामुळे? मी एकाच व्यक्तीचे नाव सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्या व्यक्तीचे नाव आहे लालूप्रसाद यादव. होय, या संपूर्ण काळात लालूप्रसाद यांनी भाजपला विरोध करण्यात कमालीचे सातत्य दाखवले आहे. त्यांनी वाटेल ती पातके केली, पण भाजपशी जुळून घेतले नाही. त्यांनी तुरुंगवास पत्करला, मोठी मानहानी पत्करली, पण भाजपसमोर ते झुकले नाहीत. त्यांनी ठरवले असते तर 2005 नंतरच्या कुठल्याही टप्प्यावर ते भाजपशी हातमिळवणी करू शकत होते. भाजप त्यासाठी एका पायावर तयार झाला असता. 2014 नंतर तर लालू केंद्रात मंत्री होऊ शकले असते, लालूपुत्र बिहारमध्ये मुख्यमंत्री होऊ शकले असते. आणि मग मला बाहेर हात चोळत बसावे लागले असते. कदाचित, मला मुख्यमंत्रिपदाची एखाद-दुसरी टर्म मिळाली असती; पण तीही अर्धीमुर्धी.. म्हणजे मागील दोन दशकांत मी भाजपला माझ्या अटीवर झुकवत राहिलो, याचे कारण लालू भाजपपुढे झुकले नाहीत म्हणून ! याउलट माझ्या पक्षाशी मात्र त्यांनी दोनदा आघाडी केली. ती का, तर ते म्हणाले, 'नितीश हमारा भाई है'. तर अशा या आडमुठ्या आणि गावरान वाटणाऱ्या लालू यादवांची वैचारिक निष्ठा खूपच पक्की आहे. त्यांनी केलेल्या त्यागाच्या बळावरच माझे मुख्यमंत्रिपद विक्रमी ठरले आहे. मुख्यमंत्रिपदावर राहून मी इतर कोणाहीपेक्षा बिहारचे भले जास्त करू शकलो. त्यामुळे लालूंनी माझ्या हातून बिहारचे भले केले असेही म्हणायला हरकत नाही. तुम्ही माझ्या कार्यनिष्ठेला सलाम कराल, मी लालूजींच्या विचारनिष्ठेला सलाम करतो !


 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी