सध्याच्या साधना प्रकाशनाकडे 250 पुस्तके आहेत. या पुस्तकांची सूची साधना प्रकाशनाच्या वेबसाईटवर आहे आणि या सूचीची हार्ड कॉपी साधना कार्यालयातून विनामूल्य मागवता येते. या सूचीमधील जवळपास दोनशे पुस्तके गेल्या वीस वर्षांतील आहेत, साहजिकच या पुस्तकांच्या संदर्भात अधिक फीडबॅक येईल. मात्र साधना प्रकाशनाची आता उपलब्ध नसणारी पुस्तके वाचणारे काही वाचक आहेत, त्यांनी पूर्वीच्या पुस्तकांविषयीही काही फीडबॅक दिला तरी चालणार आहे.
प्रिय वाचकहो,
2023 च्या डिसेंबर महिन्यात आम्ही साधना साप्ताहिकाच्या वाचकांचा फीडबॅक सर्व्हे घेतला होता, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला; त्या फीडबॅकचे विवेचन विश्लेषण करणारे विस्तृत टिपण साधनाच्या 30 डिसेंबर 2023 च्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्यानंतर 2024 च्या डिसेंबर महिन्यात साधनाच्या बालकुमार व युवा दिवाळी अंकांचा फीडबॅक सव्र्व्हे घेतला होता, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला; त्या फीडबॅकचे विवेचन विश्लेषण करणारे विस्तृत टिपण साधनाच्या 8 फेब्रुवारी 2025 च्या अंकात प्रसिद्ध केले होते. आणि आता 2025 च्या डिसेंबरमध्ये साधना प्रकाशनाच्या वाचकांचा फीडबॅक सर्व्हे घेण्यासाठी एक फॉर्म वाचकांना पाठवत आहोत. या फीडबॅकचे विवेचन विश्लेषण करणारे विस्तृत टीपण 27 डिसेंबर 2025 च्या साधना अंकात प्रसिद्ध करणार आहोत. मागील दोन वर्षांप्रमाणेच यावर्षीचा सर्व्हेही अक्षय जोशी या तज्ञ तरुणामार्फत करीत आहोत. पूर्वीप्रमाणेच यावर्षीही संपादकाच्या विस्तृत टिपणासोबत अक्षय जोशी यांनी लिहिलेले टिपण व फीडबॅकमधून तयार केलेले ग्राफिक्सही त्यात असेल.
साधना साप्ताहिकाची स्थापना साने गुरुजींनी 1948 मध्ये केली, त्याचवेळी साधना प्रकाशानाची सुरुवात झाली. त्यानंतरच्या पाऊण शतकात साधनाकडून लहान-मोठी साडेसातशे पुस्तके तरी प्रकाशित झाली असावीत. त्यातील अनेक पुस्तके प्रासंगिक होती, काही पुस्तके नंतर अन्य प्रकाशनांकडून आली आणि काही पुस्तके अद्यापही आऊट ऑफ प्रिंट आहेत. सध्याच्या साधना प्रकाशनाकडे 250 पुस्तके आहेत. या पुस्तकांची सूची साधना प्रकाशनाच्या वेबसाईटवर आहे आणि या सूचीची हार्ड कॉपी साधना कार्यालयातून विनामूल्य मागवता येते. या सूचीमधील जवळपास दोनशे पुस्तके गेल्या वीस वर्षांतील आहेत, साहजिकच या पुस्तकांच्या संदर्भात अधिक फीडबॅक येईल. मात्र साधना प्रकाशनाची आता उपलब्ध नसणारी पुस्तके वाचणारे काही वाचक आहेत, त्यांनी पूर्वीच्या पुस्तकांविषयीही काही फीडबॅक दिला तरी चालणार आहे.
या सर्व पुस्तकांचे संपादन, निर्मिती, वितरण, व्यवस्थापन या संदर्भात आम्हाला वाचकांकडून फीडबॅक हवा आहे. अर्थातच, असलेल्या चुका टाळण्यासाठी व त्रुटी कमी करण्यासाठी आणि प्रकाशनाचा एकूणच दर्जा उंचावण्यासाठी. त्यासाठी 24 प्रश्न असलेला एक फीडबॅक फॉर्म तयार केला आहे. त्यातील सुरुवातीचे प्रश्न या सव्र्व्हेत सहभागी होणाऱ्या वाचकांची प्राथमिक माहिती घेणारे आहेत, नंतरचे प्रश्न वितरण व व्यवस्थापन या संदर्भात आहेत, त्यानंतरचे प्रश्न संपादन व पुस्तकांचा दर्जा या संदर्भातील आहेत, अखेरचे प्रश्न वाचकांकडून सूचना तक्रारी अपेक्षा मागवणारे आहेत. हा फीडबॅक फॉर्म साधना प्रकाशनाच्या वेबसाईटवर खुला आहे. याशिवाय, साधना प्रकाशन, साधना साप्ताहिक आणि कर्तव्य साधना या तिन्हीच्या e id वरून पाठवणार आहोत. या तिन्हीच्या व्हाट्सअॅपद्वारे ब्रॉडकास्ट करणार आहोत. यापैकी कोणत्यातरी मार्गाने आपल्यापर्यंत फीडबॅक फॉर्म येईलच, पण नाहीच आला किंवा त्या मार्गाने फॉर्म भरता आला नाही तर, प्रस्तुत साधना अंकाच्या प्रारंभी दोन पाने फीडबॅक फॉर्म दिलेला आहे, तो भरून साधना कार्यालयात पोस्टाने पाठवू शकता. किंवा भरलेल्या फॉर्मची दोन पाने स्कॅन करून साधना कार्यालयाच्या व्हाट्सअप नंबरवर पाठवू शकता किंवा त्या फॉर्मवर असलेला क्यूआर कोड स्कॅन करून येणाऱ्या लिंकद्वारे हा फॉर्म भरू शकता.
ज्यांना कोणाला या फॉर्मच्या व्यतिरिक्त काही फीडबॅक द्यायचा असेल किंवा काही सूचना, तक्रारी, अपेक्षा व्यक्त करायच्या असतील त्यांनी त्या स्वतंत्र कागदावर लिहून साधना कार्यालयाच्या पत्त्यावर किंवा ईमेल / व्हॉट्स अॅपद्वारे जरूर पाठवाव्यात. कठोर व टीकात्मक अभिप्रायांचेही स्वागतच आहे !
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या