डिजिटल अर्काईव्ह

अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. अनपेक्षित आणि धक्कादायक असा हा मृत्यू सर्वांना हळहळ वाटायला लावणारा आहे. अजितदादांचे अवगुण व एकाधिकारशाही वृत्ती, भ्रष्टाचाराचे आरोप हे बाजूला ठेवून त्यांची धडाडी व कर्तबगारी यांचे गुणगान करायला लावणारा हा मृत्यू आहे. पण मूलतः ही एक शोकांतिका आहे. एका मोठ्या कुटुंबाची, एका राजकीय पक्षाची आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचीही !

आचार्य अत्रे म्हणायचे, "मृत्युलेख ही पत्रकाराची सर्वांत मोठी कसोटी असते." त्यांच्या त्या विधानाची प्रचिती काही प्रसंगी अधिकच तीव्रतेने येते. अजित पवारांच्या मृत्यूनंतर अनेक लहान-थोर पत्रकारांना तसे वाटले असेल. त्याचे एक कारण, अजित पवारांना पूर्णतः काळ्या रंगात रंगवता येत नाही आणि अनेक बाबतीत क्लीनचीट देता येत नाही; नसलेले गुण चिकटवता येत नाहीत, असलेल्या गुणांची जास्त भलामण करता येत नाही. दुसरे कारण, त्यांचे राजकारण शरद पवारांच्या राजकारणापासून वेगळे करता येत नाही, जरी त्यांनी शरद पवारांचे सर्व गुण-अवगुण घेतलेले नसतील तरी. तिसरे कारण, त्यांचे राजकारण म्हणजे निव्वळ देवाण-घेवाण; ती देवाणघेवाण मतांची, पैशांची, पदांची, परवान्यांची, पाठिंब्याची !

हे खरे की राजकारण हा मूलतः हितसंबंधांचा खेळ आहे, आणि त्यात प्राप्त परिस्थिती व उपलब्ध पर्याय यांचे महत्त्व खूपच जास्त असते. विशेषतः निवडणुकीचे व सत्तेचे राजकारण करायचे असेल तर! पण अजित पवारांच्या राजकारणात निवडणुका आणि सत्ता हे केवळ केंद्रस्थानी येतात असे नव्हे, तर तेच आणि त्यासाठीच राजकारण ही धारणा त्यांच्या मनात पक्की होती. निवडणुका कशासाठी तर सत्ता मिळवण्यासाठी आणि सत्ता कशासाठी तर त्या माध्यमातून येणारे अधिकार व पैसा यांचा वापर करण्यासाठी. अर्थातच तो वापर स्वतःचे साम्राज्य विस्तारण्यासाठी, नंतर आपल्या आप्तस्वकीयांना वाढवण्यासाठी, त्यानंतर आपल्या समर्थकांना खुश करण्यासाठी, मग आपला पक्ष बळकट करण्यासाठी. आणि मग आपल्या विरोधकांना बाजूला वळवण्यासाठी किंवा त्यांची धार बोथट करण्यासाठी किंवा त्यांना उपकृत करून ठेवण्यासाठी. या सर्व प्रक्रियेतून जे काही होईल ते समाजासाठी. अर्थातच हे सर्व करताना कायदे व नियम यांच्या चौकटीत सर्व काही व्यवस्थित होईल असे पाहायचे. ती चौकट गरजेनुसार मोठी करता येते, लवचिकही करता येते. ती चौकट मोडण्याचे प्रयत्न करायचे नाही, तिच्यातून सुटका करून घेण्याचे प्रयत्न करायचे. तरीही नाहीच जमले तर हट्ट धरायचा नाही, अडून राहायचे नाही, पुढे पुढे चालायचे. कारण चालत राहिलात तर नव्या नव्या संधी मिळतच राहतात, हे विसरायचे नाही. अर्थातच, सारे काही त्याच चौकटीतून मिळवायची आकांक्षा धरायची नाही, त्या चौकटीचा वापर करून सत्ताबाह्य घटकांकडून खूप काही मिळवता येते. म्हणून नेटवर्क वाढवायचे..! तीच तहान भूक, तीच आकांक्षा आणि त्या धडपडीतच आत्मिक आनंद !

अजित पवार यांचे विमान अपघातात 28 जानेवारी 2026 रोजी, बारामतीमध्ये निधन झाले. तेव्हा ते 66 वर्षांचे होते. ते महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर 1991 मध्ये अवतरले आणि लोकसभेत खासदार झाले. पण नेमके त्याच वेळी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सोडून संरक्षणमंत्री होण्यासाठी दिल्लीत गेले, तेव्हा त्यांना लोकसभेवर निवडून जाणे आवश्यक होते. म्हणून नुकतेच खासदार झालेल्या अजित पवारांना खासदारकीचा राजीनामा द्यायला सांगून, त्यांनी स्वतः विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. नंतरच्या पोटनिवडणुकीत काका-पुतण्यांनी अदलाबदल केली. तेव्हा आमदार झालेल्या अजितदादांना लगेच राज्यमंत्रीही केले. त्यानंतरची 35 वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात अजितदादा क्रमाक्रमाने मध्यवर्ती येत गेले, अधिकाधिक मोठे होत गेले.

1995 मध्ये शिवसेना-भाजप युती राज्याच्या सत्तेवर आली, त्यामुळे अजितदादांचे ते मंत्रिपद साडेतीन वर्षेच टिकले. नंतरची साडेचार वर्षे युतीची राजवट होती. मग 1999 मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी सत्तेवर आले, तेव्हा अजित पवार कॅबिनेट मंत्री झाले. पुढील पंधरा वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादी राज्याच्या सत्तेवर राहिले, तेव्हा अजित पवार कायम मंत्रिमंडळात राहिले. अखेरच्या काळात भ्रष्टाचाराचे आरोप झाले तेव्हा राजीनामा देऊन काही महिने मंत्रिमंडळाच्या बाहेर गेले, तो अपवाद. त्या पंधरा वर्षांत कृषी, ऊर्जा, फलोत्पादन, पाटबंधारे, जलसंपदा, ग्रामविकास, अर्थ इत्यादी खाती त्यांनी सांभाळली. त्या दीड दशकांतील सुरुवातीची पाच वर्षे केंद्रात अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असलेले भाजप आघाडीचे सरकार होते, तेव्हा शरद पवार महाराष्ट्रात सक्रिय होते, पण केंद्रातील आघाड्यांच्या राजकारणात स्वतःसाठी सर्वोच्च संधी शोधत होते. तेव्हा राज्याच्या राष्ट्रवादीमध्ये अनेक शिलेदारांच्यापैकी एक असे अजित पवारांचे स्थान होते.

2004 नंतरच्या दहा वर्षांत केंद्रात मनमोहन सिंग पंतप्रधान असलेल्या काँग्रेस आघाडीचे सरकार होते. तेव्हा शरद पवार कृषिमंत्री म्हणून कर्तबगारी दाखवत होते, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डात कारभारी होऊन देशभर परिचित होऊ पाहत होते आणि आघाडीच्या राजकारणात स्वतःचे महत्त्व वाढते राहील अशा प्रयत्नात तर होतेच. शिवाय, त्याच काळात कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर मात करण्यासाठी लढत होते. साहजिकच, त्या दहा वर्षांच्या काळात, आपल्याला हवे ते घडवून आणण्यासाठी अजित पवारांना केंद्रात व राज्यात पूर्ण अनुकूलता होती. तेव्हा बारामती, पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र ही त्रिस्तरीय जहागीर सांभाळण्याचे काम अजित पवारांकडे येत गेले. त्यांच्याकडे कामाचा झपाटा तर होताच. त्यामुळे, त्यांनी सार्वजनिक हिताचे घोळ घालत बसण्यापेक्षा आणि तात्विक काथ्याकूट करण्यापेक्षा हितसंबंधांचे जाळे विस्तारण्यास व पक्के करण्यास महत्त्व दिले. त्यासाठी सर्व वेळ, ऊर्जा, पैसा, श्रम खर्ची घातले. त्यांची कार्यशैली शरद पवारांच्यापेक्षा वेगळी होती, तडकाफडकी निकाल लावण्याची होती, 'अरे ला का रे'ने उत्तर देण्याची होती. त्यामुळे पक्षातील काही नेते नाराज होणे, जिल्ह्यातील काही नेते-कार्यकर्ते दुखावले जाणे हे घडत होते. पण शरद पवारांचा वचक असल्याने अजित पवारांच्यावर नियंत्रण आहे असे दिसत होते. मात्र तेव्हाच अजित पवारांच्या आकांक्षा शरद पवारांच्या नियंत्रणात राहिलेल्या नव्हत्या.

त्या दोघांमध्ये दुराव्याची मोठी ठिणगी पडायला 2004 ची विधानसभा निवडणूक कारणीभूत ठरली असावी. त्या निवडणुकीत काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला दोन-चार जागा जास्त मिळाल्या. ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री, हे सूत्र तेव्हा जवळपास सर्वमान्य होते. त्यामुळे राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळू शकत होते. शिवाय तेव्हा केंद्रात काँग्रेस आघाडीचे दुर्बल सरकार होते. त्यामुळे शरद पवार यांनी हट्ट धरला असता तर मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आले असते, किमान अडीच वर्षांचा सौदा निश्चितच मान्य केला गेला असता. परंतु शरद पवारांनी तसे करण्याऐवजी एक-दोन जास्तीची मंत्रीपदे व महत्त्वाची खाती स्वपक्षाच्या पदरात पाडून घेण्याचा सौदा पसंत केला. त्याचे एक कारण उघड होते; त्यापूर्वी सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री करून त्यांनी स्वतःचे हात आणि तोंड पोळून घेतले होते, त्याची पुनरावृत्ती त्यांना नको होती. दुसरे कारण, राष्ट्रवादीमध्ये मुख्यमंत्रीपदाचे अर्धा डझन तरी दावेदार होते, त्यात छगन भुजबळ व अजित पवार हे प्रमुख दावेदार होते. पण तिसरे कारण अधिक खरे होते, शरद पवारांचा त्या दोघांच्यावरचा विश्वास उडत चालला होता, ते दोघेही डोईजड झाले होते. सहाजिकच, आपली मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली याची चुटपुट त्या दोघांनाही लागली. अर्थातच, शरद पवारांच्या त्या वर्तनाची नोंद त्या दोघांनी घेतली. पण पुढील पाच वर्षे केंद्रात व राज्यातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी असल्यामुळे, फार कुरबुरी झाल्या नाहीत.

2014 मध्ये, केंद्रातील व राज्यातीलही सत्ता गेल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भयानक रितेपण आले. 'सत्तेच्या माध्यमातून राजकारण' एवढीच सवय सर्वांच्या हाडीमासी रुळलेली होती. पाण्याविना मासा अशी स्थिती झाली होती. पण 2014 नंतरची पाच वर्षे शरद पवारही मोकळे होते. त्यामुळे त्यांनी बऱ्याच कसरती चालू ठेवल्या. केंद्रात व राज्यात भाजपा असल्याने आणि पुढील पाच वर्षांत दोन्हीकडे अधिकाधिक बळकट होत गेल्याने, राष्ट्रवादीचे लहान-थोर शिलेदार व सरदार अस्वस्थ होत जाणे साहजिक होते. त्याच काळात भाजपने भुजबळ यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगवास घडवला आणि अजितदादांच्या भोवती फासे टाकायला सुरुवात केली. पण शरद पवारांनी त्या पाच वर्षांत केलेल्या कसरतीचा मुख्य भाग केंद्रातील भाजपशी उत्तम संबंध ठेवायचे प्रयत्न. त्यासाठी 2014 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका काँग्रेसबरोबरची युती तोडून स्वतंत्र लढवल्या, निकालानंतर शिवसेनेला कमजोर करून भाजपला सरकार बनवण्यासाठी (न मागता) बाहेरून पाठिंबा दिला. आणि स्वतःच्या पक्षातील अस्वस्थ लोकांना आश्वस्त केले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर लगेचच त्यांची बारामती भेट घडवून आणली, स्वतःला पद्मविभूषण पदरात पाडून घेतले. म्हणजे 2014 ते 19 या काळात केंद्रीय राजवटीशी गणिती संबंध ठेवून शरद पवारांनी दोन्ही आघाड्या सांभाळल्या. एक स्वतःच्या पक्षाची गळती थांबवली, दुसरी राज्यातील भाजप सरकार दबावाखाली राहील असे पाहिले आणि ते सरकार आपल्या शिलेदारांना अनिच्छेने का होईना मदत करील असेही पाहिले. अर्थातच, याच काळात काँग्रेसशी संबंध टिकवून ठेवले आणि भाजपाशी आतून संधान बांधत असल्याची लालूच राष्ट्रवादीच्या नेत्यांना दाखवत राहिले. प्रत्यक्षात त्यांना भाजपच्या सोबत जायचे नव्हते.

2019 महाराष्ट्र विधानसभा निवडणुका झाल्यावर शरद पवारांनी आधीच्या पाच वर्षांपेक्षा पूर्ण उलटी चाल खेळली. आधीच्या पाच वर्षांत कमजोर झालेल्या शिवसेनेला सोबत घेऊन व काँग्रेसला अपरिहार्यता पटवून देऊन, महाविकास आघाडीची स्थापना केली. वस्तुतः, त्या निवडणुकीत भाजप-सेना एकत्र लढले होते, पूर्ण बहुमत त्यांना मिळाले होते. त्यामुळे राज्याच्या सत्तेवर येण्याचा त्यांनाच अधिकार होता. परंतु शरद पवारांनी महाविकास आघाडीचे महाकारस्थान रचले. त्याचा सुगावा लागल्यावर भाजपने अपुऱ्या तयारीनिशी अजित पवारांना सोबत घेऊन पहाटेचा शपथविधी घडवला. शरद पवार तेव्हा सावध होते आणि अशा कटकारस्थानांचा पूर्वानुभव त्यांना जास्त होता, त्यामुळे त्यांनी भाजपचा तो डाव उधळून लावला. त्या कटकारस्थानानंतर अजित पवार आणि भाजप खलनायक ठरले, त्यामुळेच ते अधिक जवळ आले. त्यानंतर महाविकास आघाडी सत्तेवर आली खरी, पण राष्ट्रवादीच्या मोठ्या गटाला ते पसंत नव्हते, अजित पवारांना तर अजिबातच नाही. कारण केंद्रात भाजपची खुनशी राजवट असताना महाविकास आघाडीत राहून होणारा फायदा नगण्य, उलट टांगती तलवार राहणार. महाविकास आघाडी वर्ष दोन वर्षांतच गडगडणार हेही उघडच होते (आणि झालेही तसेच, केवळ कोरोना आला म्हणून ते सरकार अडीच वर्षे चालले.) अजित पवारांचे शरद पवारांशी पूर्णतः बिनसले ते तिथे ! आणि शरद पवारांचा प्रतिशोध घेण्याचे राज्यातील व केंद्रातील भाजपने ठरवले तेही तिथेच !

महाविकास आघाडीची अडीच वर्षे अजित पवार व शरद पवार यांच्यातील नाते अविश्वासाचेच होते. आणि मग अजित पवारांनी पक्ष पळवला. त्यानंतरची अडीच वर्षे तर मोठ्याच कटुतेची ठरली. परस्परविरोधी निवडणुका, प्रचार आणि आरोप यांची राळ उडाली. त्यातील सर्वाधिक कटू प्रसंग म्हणजे सुप्रिया विरुद्ध सुनेत्रा ही 2024 ची लोकसभा निवडणूक. त्यापेक्षा मोठी चूक नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित यांच्याविरुद्ध योगेंद्रला उभे करून शरद पवारांनी केली. त्या विधानसभेत शरद पवारांच्या पक्षाचे बारामती आणि राज्यातही पानिपत झाले. आणि अगदी अलीकडे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत तर शरद पवारांच्या पक्षाचे अस्तित्वही नगण्य झाले. बाजूला वय राहिलेले नाही, सगळे शिलेदार शिदोरीसह अजित पवारांच्या तंबूत गेलेत, जे सोबत आहेत ते गर्भगळीत झालेत, अशी अवस्था शरद पवारांची मागील वर्षभरात झाली. गेल्या काही महिन्यांत जयंत पाटलांसकट शरद पवारांचे बहुतांश शिलेदार अजित पवारांच्या पक्षात विलिनीकरण होण्यासाठी केविलवाणी धडपड करताना दिसले. आणि तिकडे अजित पवारांनाही भाजपकडून नव्याचे नऊ दिवस संपल्यावर मिळते तशी वागणूक अनुभवास येऊ लागली.

अशा पार्श्वभूमीवर, अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. अनपेक्षित आणि धक्कादायक असा हा मृत्यू सर्वांना हळहळ वाटायला लावणारा आहे. अजितदादांचे अवगुण व एकाधिकारशाही वृत्ती, भ्रष्टाचाराचे आरोप हे बाजूला ठेवून त्यांची धडाडी व कर्तबगारी यांचे गुणगान करायला लावणारा हा मृत्यू आहे. पण मूलतः ही एक शोकांतिका आहे. एका मोठ्या कुटुंबाची, एका राजकीय पक्षाची आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचीही ! या शोकांतिकेचे नायक शरद पवार आहेत. त्यांनी आपल्या तारुण्यात विजय तेंडुलकरांचे "मी जिंकलो मी हरलो" हे नाटक पाहिले असेल, नसेल पाहिले तरी त्यांना त्याबाबतची माहिती थोडी बहुत निश्चित असेल. त्या नाटकातील नायकाच्या मनात आप्तेष्टांमधील बाह्य द्वंद्वापेक्षा स्वतःच्या मनातील आंतरद्वंद्व अधिक लक्षणीय आहे. शरद पवारांना त्या नाटकाची आठवण येत असेल ? अजित पवारांच्या मनातही शेवटच्या काळातील भावना तशीच असणार. आणि त्या दोघांच्या विस्तारित कुटुंबातील लहान-थोर जाणत्यांनाही तसेच वाटत असणार; पवार जिंकले पवार हरले... पवार जिंकले पवार हरले !

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी