...
लोकमान्यांच्या निधनानंतर मध्यम परिस्थितीतल्या काही मंडळींनी पार्ल्यात दोन प्रकारच्या कार्याची शपथ घेतली. एका समुदायाने लोकमान्यांचे स्मरण जिवंत ठेवण्यासाठी टिळक मंदिराची स्थापना करून समाजशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली तर विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी टिळकची स्थापना केली. लोकमान्यांनी वह्यी चेतवला होता तो तेवत ठेवण्याचे कार्य या साध्यासुध्या मंडळींनी स्वीकारले. टिळक विद्यालयाने राष्ट्रीय शिक्षा कंकण बांधले. सरकारी सासुरवास नको म्हणून परकीय सरकारचं अनुदान न घेता शिक्षणाचे कार्य करायचा संकल्प सोडला. कार्य करण्यासाठी निष्ठेची माणसे हवी होती. संस्थेच्या आणि पर्यायाने पार्ल्यातील विद्यार्थ्याच्या आणि पालकांच्या सुदैवाने एक तेजस्वी शिक्षकांची तुकडीच्या तुकडी शाळेला लाभली. पेंढारकर मास्तर हे ह्या शिक्षकांपैकी एक.
वास्तविक ही सर्व मंडळी जवळ-जवळ समवयस्क, परंतु त्यात आपल्या गंभीर व्यक्तिमत्वाने आणि समतोल विचार करण्याच्या स्वभावामुळे पेंढारकर मास्तरांकडे साहजिकच शिक्षक मंडळीचे नेतृत्व आले. विद्यार्थ्यामध्येही पेंढारकर मास्तर हे आदराचे स्थान ठरले. हा आदर कोणत्याही भीतीपोटी निघाला नव्हता. विद्यार्थी पेंढारकर मास्तरांना कधीही भ्याले नाहीत. परंतु त्यांच्या वर्गात गेल्या तीस वर्षांत कधीही दंगा झाला नाही. त्यांना छड़ी कधी वापरावी लागली नाही.
सामान्य विद्यार्थ्यांच्याही संस्कृत हा अत्यंत भीतीदायक विषय. पण पेंढारकर मास्तरांनी अत्यंत धीमेपणाने विद्यार्थ्यांना तो शिकवला. संस्कृतला घाई मंजूर नाही. हा उरकून टाकण्याचा विषयच नव्हे. कृदन्त तुवन्त, धातुसाधित, सेटवेटअनिट प्रत्य वगैरे घनदाट अरण्यातून वाट काढीत जायची. पेंढारकर मास्तरांच्या बोटाला धरून मुले गेली आणि या भयानक प्रवासातून सुखरूप बाहेर पडली. आज इतक्या वर्षांनंतर देखील मास्तरांची ती मोठ्या टापटीपीने संस्कृत शिकवण्याची पद्धत आणि त्यांची ती स्वच्छ आणि सरळ वाणी आठवते. कुठे खळखळ नाही. एखाद्या खोल डोहासारखे व्यक्तिमत्व! ते गंभीरपणाने येणे आणि तितक्याच गंभीरपणाने तास संपल्यावर निघून जाणे. संस्कृतच्या व्यासंगाने शब्दयोजनेला एक विलक्षण नेमकेपणा आलेला.. वर्गात कधी फारसे मोकळे झाले नाहीत.. आणि कधीही अवघडले-अडले नाहीत. तयारीशिवाय शिकवले नाही. प्रत्येक क्रियेमागे योजना असे.
पुष्कळ वेळा असे वाटते पेंढारकर मास्तरांना सांगावे, “मास्तर पुन्हा एकदा रघुवंश शिकवा!” मला खात्री आहे की आजही मास्तरांनी एकदा आपल्या त्या शांत स्वरात, ‘क्व सूर्यप्रवो वंश: क्व चाल्पाविषयी मति:’ सुरू केले की आयुष्याचे घडयाळ सर्रकन सत्तावीस-अठ्ठावीस वर्षे मागे जाईल आणि कालिदासाच्या त्या यक्षसृष्टीत मी मास्तरांचे बोट धरून चालायला लागेन.
(गुरुवर्य मा. सी. पेंढारकर गौरवग्रंथांतून)
Tags: Tilak Vidyalaya Pul Deshpande M. C. Pendharkar टिळक विद्यालय पुल देशपांडे मा. सी. पेंढारकर weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या