श्री. न. वि. गाडगीळ यांनी वीजविषयक कायदा संसदेत सादर करताना केलेले प्रास्तविक
1910 सालच्या कायद्यानुसार सध्याच्या वीज व्यवसायाचे नियंत्रण केले जाते, गेल्या दहा वर्षांत ह्या कायद्यातील अपुरेपणा वाढत्या प्रमाणात नजरेस आला आहे. ह्या परिस्थितीची सरकारला जाणीव नव्हती असे नाही. तेव्हाच्या मजूर खात्याने युद्धकालीन अडचणींना न जुमानता ह्या कायद्यातील अपुरेपणा काढून टाकण्यासाठी एक बिल तयार करण्याच्या दृष्टीने चांगले लक्ष पुरवले. भारतातील विद्युत पुरवठ्यासंबंधीचे कायदेकानू जगातील इतर देशात यशस्वी विद्युत कायदेकानूंच्या तोडीचे किंवा त्याहीपेक्षा प्रगतीपर असा हा प्रयत्न होता.
ह्या प्रश्नाचा सर्व बाजूंनी अभ्यास केल्यावर 1945 मध्ये असे ठरविण्यात आले की या देशातील विद्युत विषयक गरजा चांगल्या रीतीने भागवण्यासाठी प्रांता-प्रांतातून पुरेसे अधिकार असलेल्या स्वायत्त किंवा अर्धस्वायत्त अशा कायदेशीर मंडळांची स्थापना करावी आणि त्यांना राज्यभर योग्य विद्युत पुरवठा करण्यासाठी अधिकार द्यावेत. हा निर्णय घेण्यापूर्वी सरकारने 1940 मध्ये पं. जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या राष्ट्रीय नियोजन समितीच्या वीज आणि इंधन समितीने केलेल्या शिफारशी ध्यानात घेतल्या होत्या, ह्या समितीने मंजूर केलेल्या एका ठरावात असे म्हटले आहे की राष्ट्रीय धोरण अमलात आणण्यासाठी राज्य वीजमंडळ आणि केंद्रीय वीजमंडळ यांची स्थापना करणे आवश्यक ठरेल.
हे बिल करण्यामागे वीजेचा पुरवठा आणि वाटप यामध्ये सुव्यवस्थितपणा यावा आणि विकासाचे नियोजन व्हावे अशी दृष्टी होती. हया नियोजनाचे उद्दिष्ट हेच होते की ह्या देशातील प्रत्येक खेड्यात वीज खेळावी आणि घराघरात रेडिओ असावा. आणि मला असे वाटते की दहा वर्षांच्या कालावधीत हे घडून येईल. मात्र त्यासाठी मंडळाचे काम लवकर सुरू होऊन चांगले चालले पाहिजे, मोठमोठ्या जलविद्युत योजना पूर्णपणे प्रत्यक्षात उतरल्या पाहिजेत. आणि असे जेव्हा घडेल तेव्हा देशाची अपेक्षा पूर्ण केल्याचे समाधान मिळेल.
थोडक्यात सांगायचे म्हणजे ह्या वीजनिर्मिती ती धंद्याचा भक्कम आणि सुरक्षित पायावर लवकर आणि विस्तृत विकास करणे हा या बिलाचा उद्देश आहे. ह्या देशाची अशी महत्त्वाकांक्षा आहे की आहे त्या साधनांनी प्रत्येक खेडोपाडी वीज गेली पाहिजे आणि घराघरात रेडिओ वाजला पाहिजे, ह्या क्रांतीचे भौतिक आणि नैतिक फळ काय याचा अनुभव काही काळाने कळेल.
Tags: power supply demand day Kakasaheb Gadgil power supply Pune power supply power policy Pune power problem Electricity shortage पुणे वीज पुरवठा वीज धोरण पुणे वीज प्रश्न वीज टंचाई केंद्रीय वीजमंडळ न. वि. गाडगीळ weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या