सेनापती बापट यांचे चरित्र अनेक रोमहर्षक आणि अद्भुत घटनांनी भरलेले आहे. चित्रपट निर्मितीसाठी लागणारा सर्व मालमसाला त्यात आहे. पण आतापर्यंत कुणीही तसा प्रयत्न केलेला दिसत नाही. त्याचे कारण काय असावे? त्याचे एक कारण, सेनापतींनी कधीही स्वतःकडे अव्वलपण घेतले नाही. अव्वल असणारा माणूस स्वतःकडे अव्वलपण घेत नसला, तरी इतरांनी त्याला ते द्यायला हवे. चित्रपटसृष्टीने त्यांना नायक केलं नाही, याचे मुख कारण ही सृष्टी पैसावसूल नायकांची असते. पण इथं काही कलात्मक आणि सामाजिक जाणिवांची माणसंही असतात. त्यांचंही लक्ष सेनापतींकडे जाऊ नये, याचं आश्चर्य वाटतं.
|5। स्त्री-पुरुष समता ।
बंगाल बॉम्बस्फोटाच्या निमित्ताने अज्ञातवासात असताना, हा अज्ञातवास किती काळाचा असेल आणि तो संपला तरी पुन्हा तुरुंगवास किती काळाचा असेल, याविषयी काहीच खात्री नव्हती. आपल्या राष्ट्रकार्याच्या व्यग्रतेमुळे इथून पुढे आपण संसारासाठी उपलब्ध होऊ शकणार नाही, आपल्या पत्नीचे सर्व तारुण्य असेच जाईल, तेव्हा, 'तू दुसरा विवाह कर', असं आपल्या पत्नीला सांगणारे बापट, मला स्त्रीपुरुष समतेचा परमोच्च आदर्श वाटतात. परंपरेने आपल्या स्त्रीला किती दुय्यम दर्जा देऊन वागवलं ते आता सर्वविदित आहे. इथं ते सगळं सांगत बसण्याची मुळीच गरज नाही. जात्यावरच्या ओवीत आई म्हणायची,
'लेकीचा जलम जसा गाजराचा वाफा
येड्या तुम्ही मायबापा जन्मा घालून काय नफा
लेकीचा जलम कोण्या घातला येड्यानं
परायाच्या घरी बैल राबतो भाड्यानं'
इतकं परावलंबी जीवन जगणाऱ्या बायऱ्यांना विधवा झाल्यावर कुठेच आधार नसायचा. तरी आपण जर आधी मेलो, तर ती आपल्या पुरुषाला दुसरा विवाह करण्याची विनंती करते. आपल्यासाठी झुरत बसू नये, असं ती एका ओळीत म्हणते,
'गेला मव्हा जीव पुरुष रडतो चोरून
सांगते रामराया नांदा दुसरी करून'
खरं तर त्या काळात प्रत्येक स्त्रीला आपण पुरुषाच्या आधी मरावं असं वाटायचं. सगळ्याच स्त्रियांना अहेव मरणाची आस असायची. अहेव म्हणजे भरल्या कपाळानं मरण यावं, असं त्यांना वाटायचं. कारण पुरुष मेल्यानंतर आपले जे हाल होणार आहेत ते वाट्याला येऊ नयेत, म्हणून हे पुरुषाआधीचं मरण त्या अनेक गीतांतून मागायच्या. असं कवितेत म्हणणारा पुरुष पुढे नारायण सुर्वेच्या रूपात जन्माला आला. त्यांच्या कवितेतला कामगार म्हणतो, 'आयुष्याच्या या लढाईत मी आधी गेलो तर मला स्मरून तू दुसरं घर कर. मला स्मरून हे करणं तुला शक्य नसेल तर मला विस्मरून तू ते घर कर'. पण नारायण सुर्वे यांच्याही आधी सेनापतींनी ही कृती साक्षात केली होती, हे मला माहीत नव्हतं. यानिमित्तानं त्यांचं चरित्र वाचताना ही गोष्ट माझ्या लक्षात आली आणि सेनापतींचा हा विचार वाचून मी रोमांचित झालो. वयाच्या 24व्या वर्षी विलायतेला अभियांत्रिकी शिक्षणासाठी गेलेले सेनापती बॉम्ब बनवण्याचे शिक्षण घेऊन स्वदेशात आले. तेव्हा घरी न जाता, सावरकरांच्या सांगण्यानुसार त्यांनी थेट बंगालात जाऊन तिथल्या क्रांतिकारकांना बॉम्ब बनवण्याचे अणि स्फोट करण्याचे शिक्षण दिले. देशाच्या कानाकोपऱ्यांत एकाच वेळी स्फोट करण्याची सावरकरांची योजना बंगालच्या क्रांतिकारकांनी अमान्य केल्यामुळे दुःखी होऊन, आजारी पडून सेनापती घरी परतले. पण इंग्रजांनी पकडलेल्या बंगालातल्या नरेंद्र गोस्वामी या क्रांतिकारकाने माफीचा साक्षीदार म्हणून, आपणाला बापटांनी हे सगळं शिकवलं, अशी साक्ष दिली. देशातल्या सर्व वृत्तपत्रांनी त्याचे ठळक मथळे पहिल्या पानावर छापले. घरी नीट बस्थानही बसले नाही, तेवढ्यात या बातम्या येऊन धडकल्या. सेनापती भूमिगत झाले आणि वर्षानुवर्षे अनेक नावे घेऊन, अनेक व्यवसाय करत भटकत राहिले. त्यात त्यांनी संभाजीनगरच्या खाणावळीतला स्वयंपाकी ते काशी विश्वनाथाच्या मंदिरातला उपाध्याय, इथपर्यंत सगळी कामं केली.
याच काळात त्यांच्या लक्षात आले की, आता आपण घरी कधी जाऊ हे निश्चित नाही. सापडू तर जन्मठेप किंवा फाशी निश्चित. म्हणून त्यांनी पत्नीला सविस्तर पत्र लिहून तिच्यासमोर दुसऱ्या विवाहाचा प्रस्ताव ठेवला. तिच्याशी दुसरा विवाह कोण करणार? असे लक्षात आल्यावर, आपल्याच एका अविवाहित मित्राला सेनापतींनी गळ घातली की, तू तिच्याशी विवाह कर. पत्नीने हा प्रस्ताव नाकारला, हा भाग निराळा. पण असे क्रांतिकारी विचार सेनापतींच्या डोक्यात येणं, हीच मोठी गोष्ट आहे. स्त्रीविषयीचा परमोच्च समभाव असल्याशिवाय हे सुचू शकत नाही.
महात्मा फुले यांनी सावित्रीबाईंना मूलबाळ होत नाही म्हटल्यावर, नातेवाइकांनी आग्रह करूनही, दुसरा विवाह केला नाही. महात्मा फुले यांचा स्त्रीविषयीचा हा परमोच्च समभाव सेनापतींमध्येही होता, हे वाचून फार बरे वाटले. बापटांनी हे सर्व केले तेव्हा त्यांचे वय केवळ 30 वर्षे होते. याच अज्ञातवासाच्या काळात सीताबाई नावाच्या एका विधवेस, अज्ञातवासात बापट ज्यांच्या घरी आश्रयाला राहिले होते, त्या देवळालीकर यांच्या अनैतिक संबंधांतून एक मुलगी झाली. देवळालीकर त्या मुलीला ठेवून घेण्यास तयार नव्हते. म्हणून त्या विधवेने सहानुभूती दाखवणाऱ्या एका तानीबाई नावाच्या बाईजवळ आपली ही मालती नावाची मुलगी ठेवली. काही दिवसांनी ती बाई वाईट चालीची असून, आपल्या मुलीलाही वेश्या व्यवसायास लावील, असे वाटल्यावर मालतीच्या आई सीताबाई अस्वस्थ झाल्या. हे सगळे सेनापतींना समजले. त्या मुलीची केस कोर्टात जिंकून, तिला आपल्या ताब्यात घेतले. पुढे त्या मुलीला आयुष्यभर आपल्या मुलीसारखे सांभाळले. परमोच्च माणुसकी आणि स्त्रीविषयी अतीव आदर असल्याशिवाय हातून अशी कृती घडत नसते. नंतरच्या काळात पारनेरच्या वास्तव्यात त्यांनी तिथल्या दलित वस्त्यांतून केलेले घाणसफाईचे आणि सवर्ण वस्तीतून केलेले मनसफाईचे कामही, महात्मा फुले यांची आठवण करून देते. फुले-सेनापती यांच्या आयुष्यातील या अनुबंधाचा कुणीतरी सविस्तर अभ्यास करायला हवा. फुले आणि सेनापतींच्या काळात अर्धशतकाचे अंतर आहे. फुले यांच्यासारखेच एकाच वेळी सेनापती धर्मकारण, राजकारण आणि समाजकारण समरसून करत होते.
अष्टाक्षरी अभंग छंदात लिहिलेली सेनापतींची 'कन्या' नावाची एक कविताही याच विषयाला पूरक आहे. स्त्री-पुरुष समतेचा त्यांचा विचार त्यांनी याही कवितेत मांडलेला आहे. सेनापतींचा काळ, तेव्हाची सामाजिक, वैचारिक स्थिती पाहता, कवितेत असे काही येणे दुर्मीळ होते. आपल्या या कवितेत सेनापती लिहितात,
'जन्मा लेकरू जे आले, त्याचे करावे हो भले
असो कन्या असो पुत्र, परब्रह्म हे सर्वत्र
जैसे कौतुक पुत्राचे, तसे करावे कन्येचे
विद्या दोघांशी शिकवा, विद्या मोक्ष देई जीवा
सासूघरीच्या साजणी, आठवा ओ चक्रपाणी
छळ तुमचा जो झाला, करा अर्पण देवाला
नका घेऊ हो बदला, नका छळू त्या सुनेला
जसा पुत्र तशी सून, दोघा विद्या द्या झटून
प्रेम पुत्राशी सुनेशी, प्रेम द्यावे हो दोघांशी
सासू घर माता घर, नको प्रेमात अंतर
प्रेम दोन्ही घरी मिळो, विद्या दोन्ही घरी मिळो
पुत्रा सुनेचे कल्याण, तेचि करा सर्व जण
विद्यादान प्रेमदान, हेची करील कल्याण
छळण्याने नव्हे बरे, महापापी छळणारे
महापापी होऊ नका, घ्या घ्या प्रेमाची पताका
प्रेम राहो घरोघर, प्रेमे होईल उद्धार
सुने वैधव्य जे आले, प्रेमे करा तिचे भले
वय तरुण सुनेचे, पतीविन ते जायाचे
असे कठीण कठीण, पहा अंतरी शोधून'
फक्त मुलगीच नव्हे तर सुनेलाही समतेची वागणूक द्या, फक्त प्रेमच नव्हे तर सोबत विद्याही द्या, असे सेनापती आग्रहाने सांगतात.
|6। सेनापतींच्या कवितेचे प्रयोजन ।
सेनापतींचे बहुतेक लेखन तुरुंगात असताना झालेले आहे. बाहेर असताना प्रत्यक्ष काम आणि तुरुंगात असताना, काम करता येत नाही म्हणून तेच काम करणारे लेखन, असे सेनापतींच्या लेखनाचे स्वरूप आहे. सेनापतींचे संपूर्ण लेखन हे केवळ राष्ट्रभक्तीचे काम, म्हणून झालेले आहे. तुरुंगात लेखनसाहित्य उपलब्ध नाही म्हणून, गद्यालाच त्यांनी पद्मरूप देऊन, स्मरणात ठेवून, पत्रात लिहून बाहेर पाठवले. कविता ही राष्ट्रकार्याच्या उपयोगासाठी वापरणे हीच त्यांची वाङ्गयीन भूमिका. याव्यतिरिक्त काव्यलेखनाचा त्यांच्यासमोर दुसरा कुठलाही उद्देश नाही. त्यामुळे वृत्तछंदातही त्यांनी फारसे प्रयोग केले नाहीत. कवितेतला रस महत्त्वाचा. तो रस कुठल्या नक्षीच्या भांड्यात दिला, ते त्यांना महत्त्वाचे वाटत नाही. त्यांचा रसदेखील देशभक्ती हाच आहे. त्यामुळे त्यांचे लेखन मराठी वाङ्गयविश्वाने फारसे गांभीर्याने घेतले नाही. सेनापतींनी शेकडो कविता लिहिलेल्या आहेत, हे आजच्या कवींना माहीतही नाही. फार पूर्वी त्यांच्या एक-दोन कविता पाठ्यपुस्तकात होत्या. तेवढ्याच जुन्या पिढीच्या ओठांवर आहेत. नवीन पिढीला त्याही माहीत नाहीत. कारण नव्या पाठ्यपुस्तकात सेनापती बापटांच्या कवितेला जागा नाही.
कुणीतरी कवी यशवंत यांचा 'यशोधन' हा कवितासंग्रह त्यांना तुरुंगात नेऊन दिला. 'अशा नव्या चालीत कविता लिहून दाखवा', असे दुसरा कोणीतरी त्यांना म्हणाला. त्यावर त्यांनी लीलया तशा तीस-चाळीस कविता लिहून दाखवल्या. म्हणजे त्यांना प्रयत्न केला तर सर्व येत होते, कळत होते. पण रंजन म्हणून कवितेला कुठलाही लेप लावायचा नाही, फक्त आशयाला म्हणजे आपल्या म्हणण्याला प्राधान्य द्यायचे, हे त्यांनी जाणून बुजून ठरवलेले होते. लोकांची मने देशभक्तीच्या भावनेने प्रेरित करण्यासाठी सेनापतींनी शेकडो देशभक्तिपर कविता लिहिल्या. तेव्हा वेळोवेळी प्रभातफेऱ्या निघायच्या. त्या वेळी म्हणण्यासाठी त्यांनी अनेक गीते लिहिली. तुरुंगात असताना आपल्या मुलांचे लाडकोड पुरवण्यासाठी, त्यांनी मागणी केली म्हणून, पत्रातून त्यांना काही कविता लिहून पाठवल्या. त्यांची स्मरणशक्ती अफाट होती. त्यामुळे त्यांना स्वतःच्या शेकडो कविता पाठ होत्या. शिवाय, वेळोवेळी होणारे सत्याग्रह, आंदोलने, मोर्चे, सभा यांना संबोधित करण्यासाठीही त्यांनी शेकडो कविता लिहिल्या आहेत. सेनापतींनी कविता हे आपल्या विहित कार्यासाठी साधन म्हणून वापरली. ते लोकांना कळवळून म्हणायचे,
'देशाचा संसार। माझे शिरावरी
ऐसे थोडे तरी। वाटू द्या हो
वाटू द्या हो थोडे। तरी प्रत्येकाशी
माझी कासाविशी। याचसाठी
याचसाठी तुम्हा। हात जोडीतसे
कोणी म्हणतसे। वेडा झाला
वेडा झालो देश। माउलीचेसाठी
होते पुण्य गाठी। हेची खरे
धर्म तत्त्व ज्यांनी। आपुलेसे केले
त्याशी बोलाविले। देशसेवे
देशसेवेसाठी। राबावे काहीसे
हेची मज पिसे। सत्य सत्य
यावे यावे अशी। हाक दे लोकांशी
ऐसे मजपाशी। हरी बोले
वाढीतसे हरी। मोक्षाचे वाढणे
ज्याशी ज्याशी येणे। त्याने यावे'
या कवितेने त्या काळात लोकांच्या मनात देशसेवेची भावना रुजवण्याचे मोठे काम केलेले आहे. त्या काळातले देशभक्त त्यांच्या भाषणातून नेहमी ही कविता म्हणत असत. त्यांच्या त्या कविता म्हणण्याचा प्रभावही पडत असे. खरे तर, ही कविता जशाला तशी अजूनही म्हणायला हवी. आज पुन्हा एकदा देशप्रेम आणि देशसेवा शेकडो योजने मागे पडलेली आहे. अगदी सेनापती बापट जसे आपल्या काळाने खूप मागे ठेवलेले आहेत, तसेच. म्हणूनच आज देशात अराजकता निर्माण झालेली आहे. सेनापतींच्या अशा सर्व कवितांची शब्दरचना साधी, सोपी, आवाहक, हृदयस्पर्शी आहे. या कविता सहज कळतात आणि ऐकणाराच्या मनावर प्रभाव पाडून जातात. देशसेवा आणि समाजसेवा यांव्यतिरिक्त त्यांनी दुसऱ्या विषयावर कविता लिहिल्या नाहीत. तरी त्या कविता कंटाळवाण्या वाटत नाहीत.
जसे सेनापतींच्या कवितेत विषयाचे वैविध्य नाही. तसेच त्यांच्या कवितेत रचनाबंधांचे वैविध्यही नाही. त्यांच्या काळात प्रचलित असलेले प्रमुख छंद आणि वृत्ते ते वापरतात. अभंग, ओवी, आर्या, श्लोक हे तर त्यांचे प्रमुख आवडते रचनाप्रकार. शिवाय, काही जुनी वृत्तेही त्यांनी वापरलेली आहेत. सर्वच रचना सहज, साध्या, सरळ आहेत. देशसेवा, समाजसेवा यांसोबतच त्यांनी अध्यात्म हा विषयही हाताळलेला आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि सोनोपंत दांडेकर यांनाही सेनापतींची ही आध्यात्मिक स्वरूपाची कविता महत्त्वाची वाटलेली आहे. सेनापतींनी अनेक देशी-विदेशी तत्त्वज्ञ अभ्यासले होते. योगी अरविंद यांच्या तत्त्वज्ञानाचाही त्यांचा सखोल अभ्यास होता. योगी अरविंद यांच्या समग्र वाङ्गयाचे त्यांनी मराठीत अनुवादही केले. या सर्व तत्त्वज्ञानांच्या अभ्यासातून त्यांनी आपल्या कवितेत स्वतःचे स्वतंत्र तत्त्वज्ञान मांडलेले आहे, असे निरीक्षण तर्कतीर्थांनी नोंदविलेले आहे. मामासाहेब दांडेकरांनी तर म्हटले आहे की, 'सेनापतींच्या काव्याला संतवाङ्गयात स्थान द्यायला हरकत नाही, इतके सखोल धर्मज्ञान, तत्त्वज्ञान त्यात आहे. शिवाय, सर्व संतांप्रमाणे शब्द खरा करण्याची, अनुभवाची व आचरणाची जोडही त्यांच्या काव्याला आहे'.
आपण कविता लिहितो म्हणजे काय करतो? ते सांगताना सेनापती लिहितात, 'भरी वृत्तात वृत्तान्त, वदे जे अंतरी हरी' सेनापती जरी असं म्हणत असले तरी ते निव्वळ वृत्तात वृत्तान्त भरत नव्हते, तर त्यात रसही भरत होते. म्हणून त्यांची कविता रसाळ उतरलेली आहे. अनुष्टुभ छंदात 287 श्लोकांत त्यांनी लिहिलेलं आत्मचरित्र त्यामुळेच अत्यंत वाचनीय झालेलं आहे. त्यात ते आपल्या आयुष्याचा नुसता वृत्तान्त सांगत नाहीत, तर आपल्या अनुभवाला चिंतनाची जोड देतात. त्या निमित्ताने आपल्या अनुभवाचे विश्लेषण करून, त्याचे तात्त्विक सार काढून दाखवतात.
आपल्या मराठीतल्या सर्व कवींना ते विनवणी करतात की, आपली प्रतिभा आणि आपली वाणी देशसेवेच्या कारणी लावा. 'कवीस विनवणी' नावाच्या एक नव्हे, तर अनेक कविता सेनापतींनी लिहिलेल्या आहेत आणि कवीला त्यांनी पुन्हा पुन्हा विनवणी केलेली
आहे की, आपली लेखणी देशकारणी लावा.
बंगाल बॉम्बस्फोटात त्यांचे नाव पुढे आल्यावर सेनापती भूमिगत झाले. चार वर्षे ते अज्ञातवासात होते. त्या काळात त्यांनी पुष्कळ कविता लिहिल्या. पण आपण त्या नष्टही केल्या, असं त्यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवलेलं आहे. कदाचित, त्यामागे सुरक्षेची भावना असेल. सेनापती आपले भाव कुठलाही आडपडदा न ठेवता प्रामाणिकपणे कवितेत मांडीत असत. कदाचित, आपल्या क्रांतिकार्याची सर्व कैफियत त्यांनी काव्यात उतरवली असणार. त्यामुळे कदाचित आपण अडचणीत येऊ, असे वाटल्यामुळे त्यांनी ती सगळी कविता नष्ट केली असणार. पण त्यात त्यांनी काय लिहिलं असावं, याची मला आजही प्रचंड उत्सुकता आहे. आपली कविताविषयक भूमिका त्यांनी काही कवितांतूनच मांडलेली आहे. त्यातील ही काही उदाहरणे,
1.देवा तू मजलागी जी पुरविली चैतन्य पाणी दवा
ती मी आजवरी कशीतरी दिली प्रेमे बहु बांधवा
नानारंगी कुप्यांत आज भरी मी ती काही भाईस्तव
कोणी की मज बोलला रुचतसे आम्हा 'कुपीवैभव'
2. वीणा सतारी मृदु नाद सारा
नको आज माते तया आवरी
भेरी तुतारी महानाद व्हावा
करी देवी तो या जना सावरी
टाकी तरुच्छत्र टाकी क्षणी या
शिलेचे तसे भव्य सिंहासन
टाकी मरुद्रान त्या हंसलीला
करी पालथे दुष्ट दुःशासन
3 मी पद्यकार कवी मी न कवित्व सार्थ
लाभो मला जणू शक्ती जनसेवनार्थ
भावुनिया मनि असे शुभ भाव काही
बांधून छंदी मुरलीधरपाई वाही
4.करा देशसेवा करा लोकसेवा
तुम्हाला जरी तो हवा मोक्षमेवा
जना ज्ञान द्या हा हरीचा निरोप
जना ज्ञान द्या टाकुनी दुष्ट झोप
5. आईवरी विपत्ती आम्ही मुले कशाला
बंदीत मायभू ही आम्ही मुले कशाला
रक्ताळले शरीर भडका जीवात झाला
आईस सोडवाया येणार कोण बोला
6. गीतेचा मी भक्त पुरातन श्रीहरीचा प्यारा
गीता गायक नायक माझ्या विचार आचारा
सेनापतींच्या कवितेविषयी आपले मत व्यक्त करताना साने गुरुजी म्हणतात, "जनसेवेसाठी ते कवी झाले. देशभक्तीने काव्य लिहू लागले. स्वतःच्या मुलांना कवितारूप खाऊ देता यावा, मुलांची करमणूक व्हावी म्हणूनही ते कविता लिहू लागले. परंतु थोरांची करमणूकसुद्धा जीवनाला थोर करणारी असते. सेनापती भाषेकडे, वृत्तांकडे फारसे लक्ष देत नाहीत. चैतन्याला मिठी मारणारा मातीकडे कसे लक्ष देईल? परंतु त्यांनी मनात आणले तर ते सर्व वृत्तांतून सुंदर कविता लिहू शकतात. वामन पंडितांप्रमाणे अनुप्रास करण्याचीही त्यांना आवड आहे. त्यांचा नवनीताचा अभ्यास पुष्कळ ठिकाणी दिसून येतो."
'महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले
मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले
खरा वीर वैरी पराधीनतेचा
महाराष्ट्र आधार या भारताचा'
महाराष्ट्राचे मोठेपण सांगताना जुन्या काळी पुष्कळ लोक सेनापतींच्या या चार ओळींचा नेहमी उल्लेख करत आणि महाराष्ट्राशिवाय राष्ट्राच्या गाडा चालणारच नाही, असा निष्कर्ष काढत. भारतात महाराष्ट्र हा सर्वश्रेष्ठ आहे, असेही म्हणत. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी सेनापतींनी ज्या अनेक कविता लिहिल्या, त्यांतल्याच एका कवितेतल्या या चार ओळी आहेत. सर्वत्र त्या चारच ओळी लोक म्हणत असतात. संपूर्ण कविता कोणाला माहीत नसते. बऱ्याचदा या चार ओळी टिळकांना उद्देशून आहेत, असं बऱ्याच लोकांना वाटतं. 1962 मध्ये यशवंतराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद सोडून केंद्रात संरक्षणमंत्री झाले तेव्हा लोक यशवंतरावांसाठीही याच ओळी उद्धृत करीत असत.
टिळक आणि यशवंतरावांना त्या ओळी चपखल लागूही पडतात. पण त्यामुळे उगाच देशातील इतर राज्यांना कमी लेखण्याची नकळत चूक आपल्या हातून होते. आज तर ही कविता आपणाला लागूही होत नाही. आज 'गुजरात्याविना राष्ट्रगाडा न चाले' अशा ओळी लिहाव्या लागतील. पण सेनापतींच्या कवितेतील त्या पुढच्या चार ओळी वाचल्या की सगळे भ्रम आणि संभ्रम दूर होतील, याची मला खात्री आहे. त्या पुढच्या चार ओळी अशा,
'महाराष्ट्र जैसा तसे प्रांत सारे
असे वीरतेचे जगी सर्व वारे
असे भारताधार प्रत्येक थोडा
न चाले कुणाहीविना राष्ट्रगाडा'
देशसेवेसाठी महाराष्ट्र एके काळी सर्वांत पुढे असायचा. छत्रपती शिवाजी महाराजांपासून लोकमान्य टिळकांपर्यंत ही परंपरा महाराष्ट्रात होती. ती लक्षात घेऊन महाराष्ट्राने आजही देशसेवेसाठी सर्वांत पुढे असावे, असे पारतंत्र्याच्या काळात सेनापतींना वाटे. त्यासाठी त्यांनी आपल्या एका कवितेत लिहिले होते,
'हिंदुराष्ट्र हे सत्वर व्हावे खरे खरे राष्ट्र
राष्ट्रकारणी पुढे असावा थोर महाराष्ट्र
मनी वांछितो गोड गोष्टी या सर्व जिवेभावे
मनोराज्य हे जनी कशाने मूर्तरूप व्हावे'
सेनापतींचे समकालीन महत्त्वाचे मराठी कवी काय लिहीत होते, कोणते प्रयोग करीत होते, त्यांची काव्य प्रयोजने काय होती, याच्याशी सेनापतींना काहीही देणेघेणे नव्हते. त्यांनी कवितेकडे कला म्हणून पाहिलेच नाही. आपले अपेक्षित ध्येय साध्य करण्याचे एक साधन म्हणूनच त्यांनी कवितेकडे पाहिले. संतांचे तरी काय होते? म्हणूनच मामासाहेब दांडेकर सेनापतींना संतकवींच्या मालिकेत टाकायला तयार होते.
|7। सेनापतींवर चित्रपट का नाही?।
खरे तर, सेनापती बापट यांचे चरित्र अनेक रोमहर्षक आणि अद्भुत घटनांनी भरलेले आहे. चित्रपट निर्मितीसाठी लागणारा सर्व मालमसाला त्यात आहे. पण आतापर्यंत कुणीही तसा प्रयत्न केलेला दिसत नाही. त्याचे कारण काय असावे? त्याचे एक कारण, सेनापतींनी कधीही स्वतःकडे अव्वलपण घेतले नाही. अव्वल असणारा माणूस स्वतःकडे अव्वलपण घेत नसला, तरी इतरांनी त्याला ते द्यायला हवे. स्वतःकडे अव्वलपण घेऊन आपली नायकप्रतिमा उजळीत नेणं त्यांना कधी जमलं नाही. किंबहुना, त्यांनी ते जाणूनबुजून केलं नाही. कुठला गट, कुठला तट, कुठली संस्था, कुठल्या संघटनेशी त्यांनी कधी बांधून घेतलं नाही. चित्रपटसृष्टीने त्यांना नायक केलं नाही, कारण ही सृष्टी पैसावसूल नायकांची असते. पण इथं काही कलात्मक आणि सामाजिक जाणिवांची माणसंही असतात. त्यांचंही लक्ष सेनापतींकडे जाऊ नये, याचं आश्चर्य वाटतं.
ते देशाचे प्रमुख नेते नव्हते. पण सर्व राष्ट्रीय नेत्यांचे ते प्रमुख पाठीराखे होते. स्वतःकडे दुय्यमपण घेऊन राष्ट्रगाडा पुढे नेण्याचं मोठेपण त्यांच्यात होतं.
लोकमान्य टिळकांपासून महात्मा गांधींपर्यंत आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून नेताजी सुभाष बाबूंपर्यंत, त्यांचा परीघ विशाल होता. ते महात्मा गांधींच्या काँग्रेसचेही महाराष्ट्र प्रांताध्यक्ष होते आणि सुभाष बाबूंच्या फॉरवर्ड ब्लॉकचेही प्रांताध्यक्ष होते. ते एके काळी क्रांतिकारक सावरकरांचे सोबती होते, तर पुढे हिंदुत्ववादी सावरकरांचे विरोधकही होते. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे पुरस्कर्ते होते. सावरकरांनी गांधींच्या काँग्रेससोबत राहावं असाही त्यांनी प्रयत्न करून पाहिला. पण दोघांच्या वाटा पूर्णपणे भिन्न झाल्यामुळे तो यशस्वी झाला नाही.
|8|... आणि शेवटी ।
माझ्या या भाषणाचा शेवट मी साने गुरुजींच्या एक-दोन परिच्छेदाने करणार आहे. साने गुरुजींचा हा परिच्छेद 75 वर्षांपूर्वीचा असला, तरी तो आजही जशाला तसा लागू पडतो. म्हणून तो मी इथे शेवटी देत आहे. कारण मला जे म्हणायचे होते, ते साने गुरुजींनी आधीच लिहून ठेवलेले आहे, म्हणून मी तेच इथे देत आहे. सेनापतींच्या समग्र वाङ्ख्याच्या खंडांना प्रस्तावना लिहिताना साने गुरुजी लिहितात, 'सेनापतींची महाराष्ट्राला अद्याप व्हावी तशी ओळख झालेली नाही. त्यांचा महान आत्मा फारच थोड्यांना समजला असेल. फुलाहून कोमल आणि वज्राहून कठोर असा हा पुण्यप्रतापी पुरुष आहे. त्यांच्या ठिकाणी वीरांची वीरता अधिक आहे की संन्याशाची संन्यस्तता अधिक आहे, ते मी काय सांगू ?
वीर पुरुषच संन्यासी होऊ शकतो. सेनापती जणू आज निसर्गाप्रमाणे बनले आहेत. क्षणात रडतील, हसतील. येथे जातील क्षणात तेथे. सूर्यप्रकाशाने कुठेही जावे, जेथे जाईल तेथे तो फुलविल. तेथील मलिनता दूर करील. ही भूमिका सामान्य जणांना झेपण्यासारखी नाही. सामान्य लोक गट करून, कंपू करून राहतात. कोणाचे लहान कंपू, कोणाचे मोठे. सेनापतींना आज कंपू नाही. त्यांना कुठे जाण्यास संकोच वाटत नाही. ते देवाचा निर्मळ वारा आहेत.
सेनापती म्हणजे मला शिवाजी, रामदास व तुकाराम यांची त्रिमूर्ती वाटते. सेनापती म्हणजे लोकमान्य, महात्माजी व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अपूर्व असे मधुर मिश्रण आहे. भक्ती, ज्ञान व सेवा यांची ही त्रिपदा गायत्री आहे. अहंकार त्यांनी नष्ट केला आहे. त्यांचे हसणे किती गोड व मोकळे असते ! मुक्त पुरुषाचे ते हसू असते. कृत्रिमतेला त्यांच्या जीवनात स्थानच उरले नाही. त्यांच्या बोलण्या-चालण्यात केवळ सहजता भरून राहिली आहे. मुक्त पुरुष मुलांप्रमाणे असतात, हे त्यांना पाहून पटते. असे हे परम मंगल, परम पावन, परम तेजस्वी, परम मधुर जीवन शेवटची आहुती म्हणून राष्ट्रास द्यावयास ते अधीर झालेले आहेत.'
साहित्यातल्या कोणत्याही गटातटांशिवाय राहणाऱ्या आणि सर्वत्र संचार करणाऱ्या, पण सत्त्व न सोडणाऱ्या माझ्यासारख्याला सेनापती बापट यांचा साने गुरुजींनी सांगितलेला जीवनसंदेश आजही मोठा आधाराचा वाटतो. माझ्या हाताशी हा एक भक्कम आधार दिल्याबद्दल मी आत्मनिर्धार फाउंडेशनचा खूप खूप आभारी आहे. आपण सर्वांनी माझे दीर्घ मनोगत ऐकून घेतले त्याबद्दल आपणा सर्वांचाही मी खूप खूप आभारी आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सहयोगाने आत्मनिर्धार फाउंडेशनने अहिल्यानगर (अहमदनगर) येथे सेनापती बापट साहित्य संमेलन आयोजित केले होते. दि. 8 व 9 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या त्या संमेलनाचे अध्यक्ष होते इंद्रजित भालेराव. त्यांचे अध्यक्षीय भाषण पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन भागांत प्रसिद्ध करीत आहोत. - संपादक
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या