वन्यजीव संरक्षणात तसेच होत आहे. जेथे जुने धोरण कामास आले, जीवांची संख्या वाढली, तेथे संख्या नियंत्रणाचे पाऊल टाकावेच लागते. याचे एक धडधडीत उदाहरण म्हणजे रानडुकरे. यांची संख्या अफाट वाढली आहे. आता ती माणसावरसुद्धा हल्ला करू लागली आहेत. केरळ राज्यात 50 हून अधिक आमदारांच्या मतदारसंघामध्ये रानडुकरांविरुद्ध मोठा असंतोष आहे. रानडुकरांच्या नासधुशीला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी टॅपिओका आणि अननसाची शेते सोडून दिली. रबराची कोवळी नवी रोपेसुद्धा डुकरांनी खाऊन टाकली. म्हणून रबराच्या मळ्यांमध्ये नवीन लागवड थांबली आहे.
अमेरिकन लोक म्हणजे जरा हेच आहेत. घरात प्राणी पाळायची फार हौस. ते ठीक आहे. लाखो मांजरे आणि कुत्री अमेरिकन माणसांच्या घरात सुखाने नांदतात. पण अजगर ? का पाळायचे त्याला ? आपण कुत्र्या-मांजरांबरोबर जवळीक करतो. त्यांना कुरवाळतो. तीसुद्धा आपणाशी खुणा, आवाज, कृती यांतून संवाद साधतात. यातून नाते, जिव्हाळा निर्माण होतो. अजगराबाबत काय? आपल्याकडचे साप पाळणारे लोक सापांशी प्रेमाने संवाद करताना दिसत नाहीत.
काही का असेना, सुमारे 50 वर्षांपूर्वी काही अमेरिकनांनी अजगराची पिले पाळली. ती मोठी झाली (20 फुटांहून लांब). आता मालकांची तंतरली. या राक्षसी सापांचे काय करावे? त्यांना जंगलात सोडून दिले. काही आपण होऊनच पळून गेले.
फ्लोरिडा प्रांतातील जंगलात या अजगरांना अनुकूल परिस्थिती भेटली. सौम्य उबदार हवामान. पाणथळ भूमी. शत्रू म्हणावा असा कोणी नाही. यांनी शिकार करावी अशा प्राण्यांचा मुबलक पुरवठा. मुख्यतः हरणे आणि पाणमांजरे. निसर्गनियम असा की, अनुकूल परिस्थिती असेल तर संख्येचा स्फोट होतो. तशी ही पाहुणी अजगरे बघता बघता फ्लोरिडाच्या जंगलात अत्र तत्र सर्वत्र पसरली. त्यांनी सगळी हरणे आणि पाणमांजरे खाऊन संपवली. आता सुसरीसुद्धा त्यांचे भक्षक बनल्या. उतले मातले अजगर जंगल सोडून वस्तीत पोहोचले. माणसांना धोका वाढला.
आता अजगरांची संख्या नियंत्रित करणे अपरिहार्य झाले.
फ्लोरिडाच्या सरकारने त्यांच्या शिकारीला उत्तेजन दिले. बक्षीस देऊ केले. किती पैसे द्यायचे ? अजगराच्या लांबीवरून ठरवावे. पहिल्या पाच फुटांपर्यंत $50. त्यानंतर $25 दर फुटाला. अजगराचे वारूळ तोडणाऱ्याला $200 बक्षीस. वर्षातून एकदा अजगर शिकार स्पर्धा ठेवली. एकूण $25,000ची बक्षिसे वाटणे. यंदा पाच फुटांहून कमी उंचीच्या एका तरुणीने स्पर्धेच्या आठवड्यात 60 अजगरांना मारले.
तात्पर्य काय ?
निसर्गात अनुकूल परिस्थिती असली तर जीवजातींची संख्या अमर्याद वाढते. समतोल राखणे असेल तर अवाजवी वाढलेल्या संख्येवर मर्यादा ठेवणे अपरिहार्य आहे.
50 वर्षांपूर्वी भारतात वन्य पशुपक्ष्यांच्या घटत्या संख्येबद्दल चिंता वाढू लागली. ते योग्यच होते. त्यामुळेच वन्यजीव रक्षण कायदा वगैरे पावले पडली. फारच छान. परिणामस्वरूप, अनेक प्राण्यांची संख्या वाढली. त्यातून नवे प्रश्न निर्माण झाले. पण धोरणे लवचीक ठेवणे आपल्याला जमत नाही.
1955 मध्ये सोविएत रशियाचे अनुकरण करून आपण नियोजित अर्थव्यवस्थेचा डाव मांडला. त्यातून पुढे 'लायसन्स परमिट राज' नावाचा राक्षस निर्माण झाला. कित्येक क्षेत्रांत आपली घसरण झाली. इतर पुढे गेले.
दक्षिण कोरियासारखा गरीब देश जगातील सर्वांत श्रीमंत देशांत सामील झाला. आपण स्वनिर्मित खोड्यात अडकून राहिलो. अखेर, 1991 मध्ये परिस्थितीच्या दडपणामुळे आपणास बदलावे लागले.
वन्यजीव संरक्षणात तसेच होत आहे. जेथे जुने धोरण कामास आले, जीवांची संख्या वाढली, तेथे संख्या नियंत्रणाचे पाऊल टाकावेच लागते. याचे एक धडधडीत उदाहरण म्हणजे रानडुकरे. यांची संख्या अफाट वाढली आहे. आता ती माणसावरसुद्धा हल्ला करू लागली आहेत. केरळ राज्यात 50 हून अधिक आमदारांच्या मतदारसंघामध्ये रानडुकरांविरुद्ध मोठा असंतोष आहे. रानडुकरांच्या नासधुशीला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी टॅपिओका आणि अननसाची शेते सोडून दिली. रबराची कोवळी नवी रोपेसुद्धा डुकरांनी खाऊन टाकली. म्हणून रबराच्या मळ्यांमध्ये नवीन लागवड थांबली आहे.
डुकरांना असलेले संरक्षण काढून घ्या, अशी मागणी परिसर तज्ज्ञ करीत आहेत; पण केंद्र सरकार मानत नाही. अखेर, केरळ सरकारने काही शिकाऱ्यांना डुकरे मारण्याची परवानगी दिली. गेली तीन वर्षे दरवर्षी सरासरी 2000 डुकरांची शिकार झाली आहे. तरीसुद्धा डुकरे हटत नाहीत. महाराष्ट्रात उसाची उभी पिके डुकरांचे आश्रयस्थान झाली आहेत. त्या पिकांमध्ये डुकरांना अन्न, पाणी, निवारा सर्व मिळते. या ठिकाणीसुद्धा डुकरांच्या संख्येचे नियंत्रण करण्याची वेळ आली आहे.
एक भीती अशी की, डुकरांची शिकार खुली केली तर लोक डुकरांपर्यंत थांबतील की अन्य प्राण्यांचीसुद्धा बेसुमार शिकार करतील? यावर उपाय म्हणजे प्रथम तत्त्वतः डुकरांचा प्रश्न खरा आहे हे मान्य करणे आणि प्रायोगिक पाऊल टाकणे मी पुढील पाऊल सुचवतो.
आपल्याकडे चतुर्मासाच्या सुरुवातीच्या आधी शेवटचा मांसाहार करून घेतात. नंतर चार महिने मांसाहार बंदी. गटारी अमावास्येला टनावारी कोंबड्या आणि मटण फस्त होते. आपण आषाढ महिन्याचा
शेवटचा आठवडा डुकरांच्या शिकारीसाठी खुला करू या. डुकराचे मांस बहुतेकांना (मुस्लीम वगळून) रुचकर वाटते. या खास आठवड्यात करू दे सगळ्यांना डुकराच्या मांसाची मेजवानी. नंतर पुन्हा बंदी सुरू. विचार करा.
आता कबुतर
वन्यपक्षी म्हटलं की, भारतात सर्वांना आठवतात ते ऋषितुल्य महापंडित डॉ. सलीम अली. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही संस्था गोऱ्या साहेबांनी स्थापन केली. सलीम अली यांनी तिचे आयुष्यभर लालनपालन केले. 'फॉल ऑफ अ स्पॅरो' या शीर्षकाचे सलीम अलींचे आत्मचरित्र अवश्य वाचावे. मुद्दाम शिफारस करतो.
या प्रास्ताविकाचा उद्देश असा की, वरील संस्थेच्या दृष्टीकोनाबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. त्यांच्या धोरणात वन्य जीवांचे कल्याण हेच अग्रभागी आहे. ती मंडळी कबुतरांबद्दल काय सांगतात ?
त्यांचे 'हॉर्नबिल' नावाचे त्रैमासिक आहे. या नियतकालिकामध्ये सामान्य वाचकासाठी उपयुक्त मजकूर असतो. त्यांच्या एप्रिल ते जून 2025 या अंकांत कबुतरांवर एक लेख आहे. लेखक किशोर रिखे. हे सध्याचे संस्थेचे संचालक आहेत. लेखाचे शीर्षक 'Pigeon menace in urban India'.
कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे शहरांना धोका आहे असे रिखे यांना का वाटते? कबुतरांपासून रोगराईचा प्रसार होऊ शकतो. जसे बर्ड फ्लू. कबुतरांची विष्ठा सुकते. तिची पूड वाऱ्यावर उडते. हवेतून छातीत जाते आणि फंगस इन्फेक्शन होते. ते मेंदूपर्यंत जाऊ शकते. न्युमोनियासदृश आजार होऊ शकतो. मुंबईमध्ये शेकडो लोकांना श्वासांचे दुर्धर आजार होत आहेत. त्याचे प्रमाण गेल्या 10 वर्षांत पाच पट झाले आहे.
तात्पर्य : ही प्रजाती संपण्याची काळजी मुळीच नको. त्यांना खायला घालून पुण्य मिळवणे हा आतबट्ट्याचा व्यवहार आहे. जनतेच्या तक्रारींवरून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने मुंबई शहरातील कबुतरखाने बंद करण्याचे ठरविले. या निर्णयाविरुद्ध बराच राडा झाला. खरे म्हणजे 2016 मध्येच हायकोर्टाने स्पष्ट सांगितले आहे की, जनतेला त्रास होणाऱ्या गोष्टी 'पक्षीप्रेम' या नावाखाली चालू देता येणार नाही. बॉम्ब नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सांगणे असे की,
'प्राण्यांबद्दलचा जिव्हाळा असा की, कबुतरांना पोत्यांनी धान्य चारून दाखवू नका. देशी वृक्षांची जोपासना करा. पाखरांची सोय आपोआपच होईल.' कबुतरखाने बंद करण्याच्या निर्णयाविरुद्ध जैन बांधवांनी मोठा आक्रोश केला आहे. त्यांना एक आवाहन करून हा मुद्दा संपवतो.
मंडळी, आपण अहिंसेचे पुरस्कर्ते आहात. या गोष्टीचा आम्ही आदर करतो. आपण पक्षी-रक्षणासाठी पदरमोड करता. हे अनुकरणीय आहे. मी स्वतः जैन इतिहासाचा शिकाऊ अभ्यासक आहे. पंच नमोक्कारांचे पठण करतो. माझ्या मते, आपले निसर्गरक्षणासाठीचे योगदान फार मोलाचे आहे; परंतु ज्या जीवांची अवस्था दारुण आहे त्यांच्यासाठी आपण हा खर्च करावा.
भारतातील गिधाडांपैकी 99 टक्के मेली आहेत. आपल्याला लाखो गिधाडांची गरज आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे लोक गिधाड संरक्षण आणि संवर्धन यांसाठी धडपडतात. त्यांना मदत करा. आपल्याकडे दरवर्षी हिवाळ्यात उत्तर ध्रुवाकडून हजारो-लाखो पक्षी, पाहुणे म्हणून येतात. त्यांचे यजमानपद स्वीकारा. आपल्याला सगळेच पक्षी हवेत. फक्त कबुतर नव्हे. सुजाण व्हा. उघड्या डोळ्यांनी अहिंसा पाळा. कुठेतरी जाऊन पोतेभर धान्य पसरून देणे ही आळशी अहिंसा नको. डोळसपणाने योग्य जागी मदत करा.
अशा प्रकारच्या प्रसिद्ध कामाचे एक उदाहरण म्हणजे राजस्थानातील थार वाळवंटातील खिचन हे गाव. येथे जैन शेतकऱ्यांची वस्ती आहे. वर्षानुवर्षे हे गावकरी थंडीच्या मोसमात सायबेरियाहून येणाऱ्या कांड्या करकोचाचे स्वागत करतात. याला धान्य खाऊ घालतात. थंडीच्या काळात एका वेळी येथे 15,000 कांड्या करकोचे जेवायला असतात. या पाहुणचारामुळे हे जैन गाव जगप्रसिद्ध झाले आहे. आपण या गावाची माहिती यूट्यूब कार्यक्रमातून घेऊ शकता. Bing, com/videos त्याचे अनुकरण सर्वांनी करावे.
शेवटचा मुद्दा कुत्री
भारतात सगळीकडे भुरटी कुत्री फार झाली आहेत. कारण उघड आहे. भोजन मुबलक, भक्षक नाहीत. संख्या अफाट वाढणे अपरिहार्य आहे. उपाय काय ?
मनेका गांधी म्हणतात की, संख्या नियंत्रणासाठी उपाय सौम्य हवेत. शस्त्रक्रिया करा. त्यांनी कधी खर्चाचे अंकगणित करून बघितले नसावे. आज भारतात अंदाजे 6,00,00,000 (सहा कोटी) कुत्री आहेत. पैकी अर्ध्या माद्या. एका कुत्रीचे स्टरीलायझेशन करायला ₹6000 खर्च येईल. म्हणजे एकूण 18,000 कोटी खर्च झाला. मग पशुवैद्यकीय तज्ज्ञांना गायी, म्हशी, शेळ्या, बकऱ्या यांच्याकडे लक्ष देण्याला पुरेसा वेळ उरणार नाही.
एवढा खर्च का करायचा? दया म्हणून? मग लाखो बकऱ्या, कोंबड्या कापतो त्याचे काय? मच्छीमारांना धंदा बंद करायला सांगावा काय? त्यांनी पोट कसे भरावे ?
भावनेला महत्त्व आहे. ती माणसाला प्रत्यक्ष कृती करण्यास उद्युक्त करते; पण व्यवहारालासुद्धा तितकेच महत्त्व आहे. तो कृतीला दिशा देतो. भावनेविना व्यवहार वांझोटा. आणि व्यवहाराविना भावना म्हणजे सुकाणूविना गलबत.
भटक्या कुत्र्यांची संख्या मर्यादित ठेवलीच पाहिजे. आधीच भारतात श्वानदंश ही मोठी समस्या झाली आई. जे जे श्वान माणसांवर आक्रमण करतील त्यांचा खात्मा केलाच पाहिजे.
शेवटी साररूपाने बोलायचे तर, कोणत्याही जीवाची संख्या परिस्थिती अनुकूल मिळाली तर अफाट वाढते. आपली शक्ती विनाशाकडे चाललेल्या जीवांसाठी वापरावी. डुकरे, कुत्री आणि कबुतरे यांचा विचार उंदीर, झुरळे आणि डास यांच्यासारखाच केला पाहिजे.
कोणत्याही जीवाचा उपयोग हा त्रासापेक्षा अधिक असला पाहिजे. अन्यथा, त्यांची संख्या घटवणे आवश्यक ठरते.
लेखक, संख्याशास्त्रज्ञ आहेत. त्यांचे मागील सहा महिन्यांत आठ लेख साधनात प्रसिद्ध झाले आहेत. ते सर्व लेख www. weeklysadhana.in वर वाचता येतील.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या