शिक्षकांचे अस्तित्व या विषयावर लिहीत असताना मला माझ्या अनेक शिक्षकांच्या आठवणी येत होत्या. शैक्षणिक आयुष्यातील या प्रदीर्घ प्रवासात मागे वळून पाहतो, तेव्हा मला तीव्र जाणीव होते की माझ्यावर अनेक शिक्षकांचे ऋण आहे. परंतु, माझ्यावर विविध प्रकारे उत्तम संस्कार करणाऱ्या शिक्षकांमध्ये राम बापट सरांचे स्थान अद्वितीय आहे. रामचंद्र महादेव बापट (1931-2012) हे महाराष्ट्रातील एक प्रख्यात सामाजिक विचारवंत होते आणि त्यांचा अनेक प्रकारच्या सामाजिक चळवळींशी जवळचा संबंध होता.
राम बापट यांच्यासारख्या विचारवंतापुढे समाज परिवर्तनासाठी सक्रिय लढे देताना अनेक संघटनात्मक अथवा वैचारिक आव्हाने आली असतील, परंतु त्यांची मला पुरेशी कल्पना नाही. त्यामुळे एक शिक्षक आणि व्यक्ती म्हणून ते कसे होते आणि त्यांचा माझ्या आयुष्यावर नेमका कसा वैचारिक प्रभाव होता या संदर्भातच मी चर्चा करणार आहे.
सन 1969 मध्ये मी पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात एम.ए. चा विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला; जिथे बापट सर शिकवत असत. एक शिक्षक आणि व्यक्ती म्हणून ते माझ्या मनावर एक अमीट छाप सोडून गेले. आमचे अनेक दशकांचे मधुर संबंध मोजक्या शब्दांत व्यक्त करणे खरोखर कठीण आहे. तरीही, कृतज्ञतेच्या भावनेने मी बापट सरांवर लिहिण्याचे धाडस करत आहे. येथे 'कृतज्ञता' म्हणजे सरांचा उगाच गौरव करणे नव्हे, तर जे घडले ते वाचकांपुढे मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
'एम.ए.'चे पहिले वर्ष आठवते, तेव्हा पुणे विद्यापीठाचा पावसामुळे बहरलेला हिरवागार परिसर मनःचक्षूसमोर उभा राहतो. अशा प्रसन्न वातावरणात अभ्यास करण्याची पर्वणी मिळणे, हे आम्हा विद्यार्थ्यांचे मोठे भाग्यच होते. त्या वर्षी मी बापट सरांचा 'India in World Affairs' हा ऐच्छिक विषय घेतला होता. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे मीही सरांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होतो. थोड्याच वेळात, आपले केस मागे सारत, अगदी हसतमुख चेहऱ्याने सर वर्गात आले आणि त्यांनी शिकवायला सुरुवात केली.
ते आपल्या अभ्यासक्रमाचे स्वरूप आणि त्याची व्याप्ती यावर अतिशय उत्साहाने आणि अस्खलितपणे बोलत होते. त्यांची बोलण्याची शैली एखाद्या मुक्त प्रवाहासारखी होती. एखादे धरण फुटावे आणि त्यातून पाणी अविरत वाहत राहावे, तसा त्यांच्या विचारांचा आणि कल्पनांचा पूर सतत वाहत होता, आणि आम्ही तो समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. आपल्याला काय वाचावे लागणार आहे, या संदर्भात बोलताना ते म्हणाले, 'या अभ्यासक्रमासाठी कोणतेही एक ठरावीक पाठ्यपुस्तक नाही. तुम्हाला अनेक पुस्तके आणि शोधनिबंधांचे अध्ययन करावे लागेल.' त्यांच्या या बोलण्यामुळे आम्हाला आता खरोखरच एम.ए.च्या वर्गात आलो आहोत, या वास्तवाची तीव्र जाणीव झाली.
दिवस पुढे जात होते तसे तसे अध्यापन करताना बापट सर नवनवीन विषय हाताळू लागले. एकदा तर सरांनी अवघ्या चार तासांत, म्हणजेच एका आठवड्याच्या कालावधीत, भारताच्या परराष्ट्रीय धोरणाची ऐतिहासिक, राजकीय आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी सविस्तर समजावून सांगितली. पुढे भारताचे भौगोलिक स्थान स्पष्ट करताना, हिंदी महासागर आणि हिमालयाच्या पर्वतरांगा यांनी मिळून हा देश कसा कवेत घेतला गेला आहे, यावर भाष्य केले.
प्रख्यात इतिहासकार आणि मुत्सद्दी, के. एम. पणिक्कर यांच्या भू-राजकीय ग्रंथाचा संदर्भ देत सर म्हणाले की, 'भारताचे भौगोलिक स्थान त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण एकाकीपणामुळे एखाद्या किल्ल्यासारखे सुरक्षित राहिले आहे; ज्याला हिमालयाचे छप्पर आणि सभोवताली समुद्राचे कुंपण लाभले आहे.' अर्थात, हिंदी महासागरात सध्या वाढणाऱ्या महासत्तांच्या सत्ता स्पर्धेमुळे हे वर्णन तितकेसे समर्पक वाटत नाही.
भौगोलिक स्थानासंदर्भात बापट सरांनी मांडलेला महत्त्वाचा विचार आजही तितकाच समर्पक वाटतो. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा वेध घेताना ते सांगत की, भौगोलिकदृष्ट्या भारताला तीन बाजूंनी मुस्लीम बहुसंख्य राष्ट्रांनी वेढलेले आहे; ज्यामध्ये पश्चिम, मध्य आणि आग्नेय आशियातील देशांचा समावेश होतो. यासोबतच, भारतातही मुस्लीम समाज मोठ्या संख्येने राहतो आणि खनिज तेल आपण प्रामुख्याने याच पश्चिम आशियाई देशांतून आयात करतो. त्यामुळे या संपूर्ण क्षेत्राशी नेहमीच सलोख्याचे आणि समतोलाचे संबंध राखणे भारताच्या दीर्घकालीन हिताचे आहे, हे त्यांनी अचूक ओळखले होते. वर्गात सरांची अशी अभ्यासपूर्ण व्याख्याने अखंड सुरू असायची. शिकवताना ते नवनवीन पुस्तके आणि संशोधनपर निबंधांच्या याद्याही देत. विशेष म्हणजे, या याद्या ते छोट्या 'इंडेक्स कार्ड्सवर' लिहून आणत असत. सरांच्या या पद्धतीमुळे मला नियमित वाचनाची आणि टिपणे काढण्याची अशी उत्तम सवय लागली की, मी स्वतः इंडेक्स कार्ड्स (लहान आणि मोठ्या आकारांची) वापरू लागलो. सरांनी लावलेल्या या शिस्तीने माझ्या पुढील संपूर्ण आयुष्याला आणि संशोधनाला समृद्ध केले.
थोड्याच दिवसांत बापट सर मला एखाद्या मित्रासारखे वाटू लागले आणि आमच्यात तासंतास गप्पा रंगू लागल्या. नेहरूंनी लिहिलेली किंवा नेहरूंवर लिहिलेली पुस्तके वाचण्याची आम्हा दोघांनाही प्रचंड आवड होती. मी एकदा रफिक झाकारिया यांचे 'A Study of Nehru (1959) हे पुस्तक वाचले होते. बापट सरांच्या मते, या पुस्तकात नेहरूंचा केवळ गौरवच केला गेला होता. त्यामुळे त्यांनी मला अ.भि. शाह यांनी संपादित केलेले 'Jawaharlal Nehru: A Critical Tribute' (1965) हे पुस्तक मुद्दाम वाचायला दिले. या पुस्तकात नेहरूंच्या धोरणांचे आणि निर्णयांचे अत्यंत चिकित्सक मूल्यमापन केले होते. त्या पुस्तकामुळे मला संतुलित, चिकित्सक आणि शास्त्रशुद्ध लेखनाची उत्तम दृष्टी मिळाली.
एम.ए.च्या पहिल्या वर्षात असताना, काही महिन्यांतच आमचे प्राध्यापक डॉ.दि.का. गर्दे हे कला विद्याशाखेचे अधिष्ठाता (Dean of Arts Faculty) झाले. त्यामुळे त्यांचा 'Modern Western Political Thought' (आधुनिक पाश्चात्त्य राजकीय विचार) हा विषय शिकवण्याची अतिरिक्त जबाबदारी बापट सरांवर आली. हा विषय अत्यंत क्लिष्ट आणि आव्हानात्मक होता; अर्थात, तो अवघड अभ्यासक्रमही त्यांनी अतिशय समर्थपणे आणि प्रभावीपणे शिकवला. एकंदरीतच, त्यांच्या रूपाने आम्हाला अभ्यासाची नवनवीन क्षितिजे दाखवणारे एक अत्यंत स्फूर्तिदायी शिक्षक लाभले होते.
पाहता पाहता नियमित वर्गाबाहेरही आमच्यात संवादाच्या मैफली जमू लागल्या. आम्हा दोघांनाही जागतिक साहित्यातील काव्याची विशेष गोडी होती. सरांना तर कुसुमाग्रजांचा संपूर्ण 'विशाखा' काव्यसंग्रह तोंडपाठ होता. मलाही अनेक कविता मुखोद्रत असल्याने आमच्या गप्पांचा रोख बऱ्याचदा कवितेकडे वळायचा. बापट सरांचे नव्या दमाच्या कवींचेही भरपूर वाचन असायचे. त्यांनीच मला ना.धों. महानोर यांचा 'रानातल्या कविता' हा संग्रह आणि कवी ग्रेस यांच्या गूढ कविता वाचण्याचा मोलाचा सल्ला दिला. निसर्गाचे वरदान लाभलेल्या आणि कृषी संस्कृतीत रुजलेल्या ग्रामीण जीवनाची खरी ओळख मला महानोरांच्या शब्दांनी करून दिली; तर वय वाढत गेले तशी ग्रेस यांच्या संधिप्रकाशातील व्याकूळ करणाऱ्या 'संध्याकाळच्या कविता' माझ्या मनाला अधिक भावू लागल्या.
बापट सरांचे वाचन अफाट होते आणि त्यांना विविध विषयांमध्ये मनापासून रस होता. विशेष म्हणजे, चित्रे कशी बघायची आणि ती कशी 'वाचायची', हे मी त्यांच्याकडूनच शिकलो. त्यांनी क्लोद मोने (Claude Monet) च्या 'इम्प्रेशन, सनराईज' या प्रसिद्ध चित्राचा माझ्यासाठी लावलेला अन्वयार्थ मी कधीच विसरू शकणार नाही. तसे पाहिले तर ते एका बंदरावरील सूर्योदयाचे साधे चित्र आहे, पण त्यातूनच पुढे चित्रकलेच्या दुनियेत 'इम्प्रेशनिझम'च्या एका नव्या युगाची सुरुवात झाली. या घटनेनंतर दोन वर्षांनी, मी ज्याँ पॉल सार्त्र यांचे 'What is Literature?' हे पुस्तक वाचले; तेव्हा चित्रे काढणे हासुद्धा कसा 'लिहिण्याचाच' एक प्रकार असू शकतो, हे सात्र यांच्या विधानाच्या संदर्भाने समजून घेण्याचा मी प्रयत्न केला.
पुढे एम.ए.च्या दुसऱ्या वर्षात बापट सरांनी 'आंतरराष्ट्रीय संबंधांचा इतिहास' आणि 'सिद्धान्त' हे दोन विषय इतक्या मनापासून आणि उत्कृष्टपणे शिकवले की, मला या अभ्यासाचे कायमचे वेड लागले. सरांची वैशिष्ट्यपूर्ण अध्यापन शैली, अफाट वाचन आणि कोणत्याही सिद्धान्ताला जागतिक वास्तवाच्या कसोटीवर पडताळण्याची दृष्टी आजही माझ्या वैचारिक प्रवासात दिशा दाखवते. सरांचे व्यक्तिमत्त्व इतर प्राध्यापकांपेक्षा वेगळे आणि एखाद्या अवलियासारखे होते. अनेकदा ग्रंथालयातील पुस्तकांच्या दुनियेत ते इतके हरवून जायचे की, त्यांना वेळेचे आणि वर्गाचे भानच राहायचे नाही. मात्र, एकदा का वर्गात पाऊल टाकले की त्यांच्यातील तो ओसंडून वाहणारा जिवंतपणा, शब्दांवरील विलक्षण प्रभुत्व आणि निरागस स्वभाव यामुळे संपूर्ण वातावरण एका क्षणात चैतन्यमय होऊन जायचे.
एम.ए.च्या त्या दुसऱ्या वर्षात बापट सरांशी असणारी माझी मैत्री अधिकच घट्ट होत गेली. एकदा आम्ही काही मित्रांनी सरांसोबत 'Anne of the Thousand Days' हा चित्रपट पाहिला. इंग्लंडचा राजा आठवा हेन्री (Henry VIII) वारस म्हणून मुलगा नाही या चिंतेत असतो आणि तो अॅन बोलिन (Anne Boleyn) हिच्या प्रेमात पडतो. परंतु, तिला केवळ त्याची रखेली म्हणून राहणे मान्य नसते. शेवटी राजा तिच्याशी लग्न करतो आणि त्यासाठी तो थेट कॅथॉलिक चर्चमधून बाहेर पडून स्वतंत्र 'चर्च ऑफ इंग्लंड'ची स्थापना करतो. मात्र, या लग्नातूनही राजाच्या पदरी मुलगा पडत नाही; अॅन एका मुलीला जन्म देते, जी पुढे जाऊन पहिली राणी एलिझाबेथ बनते. पुढे राजाचे तिच्यावरील प्रेम ओसरू लागते, तिचे शत्रू वाढतात आणि शेवटी तिला मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते. हा चित्रपट पाहिल्यानंतर इंग्लंडमध्ये घटनात्मक राजेशाही कशी रुजत गेली, याबद्दल आमच्यात दीर्घ चर्चा झाली. विशेषतः, संविधानिक पद्धतीने राणीचे धड शिरापासून वेगळे करण्याचा क्रूर प्रकार लग्नाच्या हजार दिवसांनंतर त्या वेळी कसा केला गेला, या भीषण वास्तवाची आम्हाला जाणीव झाली.
एम.ए.ची दोन वर्षे कशी संपली, हे कळलेच नाही. पुढे बापट सरांच्याच मोलाच्या सल्लल्यामुळे मी जे.एन.यु. च्या 'स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज'मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, सर स्वतः 1960 ते 1963 दरम्यान याच संस्थेत (जी आधी 'इंडियन स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज' म्हणून ओळखली जायची) पीएच.डी.चे विद्यार्थी होते. दिल्लीला गेल्यावर बापट सर आणि प्रा. सिरसीकर यांचा विद्यार्थी म्हणून तेथील प्राध्यापकांनी माझे अतिशय आदराने स्वागत केले. पुढे तिथल्या अनेक शिक्षकांशी माझे घनिष्ट संबंध आले. अर्थात, या सगळ्यात बापट सरांशी असलेले माझे नाते पूर्वीसारखेच घट्ट राहिले. मी दिल्लीहून पुण्यात यायचो, तेव्हा त्यांना आवर्जून भेटायचो आणि आमच्या वैचारिक गप्पांच्या मैफली पूर्वीप्रमाणेच अखंड रंगत असत.
दिल्लीतील आपले जुने मित्र-मैत्रिणी कसे आहेत, याची बापट सर नेहमी आवर्जून चौकशी करत. या भेटींमध्ये माझी राजकारणावरील बदलती मते आणि मार्क्सवादाकडे वाढू लागलेले आकर्षण यावरही आमच्यात गप्पा होत. ज्येष्ठ लेखक गो.पु. देशपांडे (गोपुदा) हे बापट सरांचे जिवलग मित्र होते, त्यांच्याशीही माझी दिल्लीत छान मैत्री जमली. त्याच काळात त्यांनी आपले पहिले नाटक 'उद्ध्वस्त धर्मशाळा' लिहून पूर्ण केले होते. तेव्हा दिल्लीत फारसे मराठी साहित्यिक वातावरण नसल्याने, गोपुदांनी ते नाटक जयश्री देशपांडे, अंकुश सावंत आणि मला मुद्दाम वाचून दाखवले. पुढे पुण्याला आल्यावर मी बापट सरांशी या नाटकावर सविस्तर चर्चा केली. नंतरच्या काळात हे नाटक मराठी नाट्यसृष्टीत खूप गाजले आणि मैलाचा दगड ठरले.
दिल्लीतील एम. फिल. चा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर मला फ्रेंच सरकारची शिष्यवृत्ती मिळाली. 1973 मध्ये पॅरिसला जाण्यापूर्वी मी आठ दिवसांसाठी पुण्याला आलो होतो. तेव्हा बापट सर मला निरोप देण्यासाठी आवर्जून घरी आले. त्या वेळी माझे मन प्रकर्षाने भरून आले होते. पुढे पॅरिसहून परतल्यावर आमची भेट झाली, तेव्हा सरांनी तिथल्या विद्वानांविषयी आणि विशेषतः अल्थुसर (Louis Althusser) यांच्या 'स्ट्रक्चरल मार्क्सवादावर' (Structural Marxism) खूप दीर्घ चर्चा केली. पारंपरिक मार्क्सवादाला विरोध करून अल्थुसर यांनी असे प्रतिपादन केले होते की, समाज हा केवळ आर्थिक घटकांवर आधारित नसून तो राजकीय आणि वैचारिक रचनांनी बनलेला असतो.
त्यानंतर काही महिन्यांतच सर दिल्लीला आले होते. त्यांनी मला आणि माझी भावी पत्नी गीता गौरी हिला एका हॉटेलमध्ये जेवणाचे आमंत्रण दिले. आम्हा उभयतांना सरांना भेटून अतिशय आनंद झाला. या भेटीनंतर ते आमचे कौटुंबिक मित्रच बनले.
वेगवेगळे विषय समजून घेण्यासाठी निरंतर वाचन आणि चिंतन करणे हा बापट सरांचा मूळ स्वभावच होता. 1970 च्या दशकात हैदराबादला व्याख्याता म्हणून रुजू झाल्यावर, मी एकदा त्यांना पुण्याला भेटायला आलो, तेव्हा सरांनी 'फिनॉमिनॉलॉजी'वर (Phenomenology) अथांग अभ्यास केला होता. सोप्या शब्दांत सांगायचे तर, फिनॉमिनॉलॉजी म्हणजे मानवी जाणिवेच्या किंवा चेतनेच्या संरचनेचा, व्यक्तीच्या स्वतःच्या दृष्टीकोनातून केलेला तत्त्वज्ञानात्मक अभ्यास होय. त्या काळात सामाजिक आणि मानवी शास्त्रांचे आकलन करून घेताना या सिद्धान्तांचा खूप मोठा उपयोग होत असे. समाजशास्त्रातील बदलत्या वैचारिक प्रवाहांचे सातत्याने आणि तितक्याच उत्सुकतेने अध्ययन करण्यासाठी लागणारी विलक्षण ज्ञानलालसा बापट सरांकडे शेवटपर्यंत उपजतच होती.
पुढे 1985 मध्ये, पुण्यातील एका परिसंवादात मला बापट सरांचे व्याख्यान ऐकण्याचा पुन्हा योग आला. विषय लोकशाहीच्या संदर्भातील होता. लोकशाही ही विचारधारा विविध आणि परस्परविरोधी मतांना नेहमीच सामावून घेते आणि 'असहमती' हाच लोकशाहीचा खरा पाया आहे, या सूत्राभोवती ती चर्चा सुरू होती.
बापट सरांनी त्या वेळी मराठी संत साहित्याचा संदर्भदेत काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. आपल्या अभंगांतून आणि काव्यातून संतांनी त्या काळातील प्रस्थापित विचारांवर कसा प्रहार केला आणि वंचित समाजाची गाऱ्हाणी कशी मांडली, हा विचार त्यांनी प्रभावीपणे मांडला. मतभिन्नतेचा हा सूर भारतीय संस्कृतीत कसा पूर्वापार रुजलेला आहे आणि भारत लोकशाहीची मूल्ये आपल्याच मातीच्या परंपरेतून कशी चालवत आहे, याचे त्यांनी अनेक सुंदर दाखले दिले.
1980 च्या दशकात, बापट सर आपल्या 'फिनॉमिनॉलॉजी'च्या आवडीमुळे मार्क्सवादातील 'फ्रैंकफर्ट स्कूल 'कडे आकर्षित झाले. या विचारसरणीच्या दोन्ही पिढ्यांचा अभ्यास त्यांनी जणू स्वतःमध्ये पूर्णपणे मुरवला होता. त्या दिवसांत माणूस, समाज, भांडवलशाही व्यवस्था आणि त्यातून व्यक्ती व समाजाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या विविध शक्यतांवर त्यांचे अविरत चिंतन सुरू असायचे. थोडक्यात सांगायचे तर, फ्रैंकफर्ट स्कूलच्या योगदानाचा मुख्य गाभा म्हणजे 'क्रिटिकल थिअरी' (समीक्षात्मक सिद्धान्त) होय. बापट सर नेहमी आग्रहाने सांगत की, हे एक असे तत्त्वज्ञान आहे जे समाजाचे केवळ वरवरचे आकलन करून घेण्याऐवजी, त्याचे सखोल परीक्षण करते, त्याची समीक्षा करते आणि त्यात सकारात्मक बदल घडवून आणू इच्छिते. आधुनिक भांडवलशाहीचा टीकात्मक अभ्यास करणाऱ्या हेबरमास यांच्यासारख्या तत्त्ववेत्त्यांनी या संदर्भात एक नवी अंतर्दृष्टी दिली असून, मानवी स्वातंत्र्याचा जणू एक नवा मार्गच दाखविला दिला आहे, असे सरांचे मत होते.
त्याचप्रमाणे ज्ञानशास्त्रावरही (Epistemology) बापट सर त्या काळात सातत्याने अभ्यास करत होते. त्यांनी फुको (Michel Foucault) या विचारवंताचे तत्त्वज्ञान अनेक अर्थांनी आत्मसात केले होते. त्यामुळे ज्ञाननिर्मिती आणि सत्ता यांचा परस्परसंबंध कसा असतो, साम्राज्यवादामुळे युरोपीय किंवा युरो-अटलांटिक देशांना ज्ञाननिर्मिती करून ते अविकसित देशांवर लादण्याची कशी संधी मिळाली, आणि अशा ज्ञाननिर्मितीच्या मागे कशी वर्चस्ववादी प्रवृत्ती (Hegemonising Tendency) दडलेली असते, अशा अनेक मुद्द्यांवर ते खूप परखडपणे बोलत असत.
विशेषतः फुकोच्या 'मॅडनेस अँड सिव्हिलायझेशन' (Madness and Civilisation 1961) या पुस्तकाची तर त्यांनी जणू पारायणेच केली होती. सोप्या शब्दांत सांगायचे तर, फुकोचा मध्यवर्ती सिद्धान्त असा आहे की, कोणतीही संस्कृती स्वतःला परिभाषित करण्यासाठी 'वेडेपणा' (Madness) निर्माण करते; म्हणजेच कोण 'वेडा' आहे आणि कोण शहाणा, हे ती आपल्या तर्कानुसार आणि सोयीनुसार ठरवते. थोडक्यात वेडेपणाची संकल्पना ही सामाजिकदृष्ट्या तयार केलेली असते. त्यामुळे राज्याला किंवा तथाकथित सुसंस्कृत समाजाला लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे पाळत ठेवून नियंत्रण मिळवणे सोपे जाते. याशिवाय बापट सरांचा सार्त्र, काम्यू आणि जेने यांसारख्या अस्तित्ववादी विचारवंतांचा अभ्यासही स्तिमित करणारा होता. प्रत्येक पुणे भेटीत सरांना भेटल्यामुळे माझ्या विचारविश्वाला नेहमीच एक नवी दिशा आणि चालना मिळत असे.
1988 मध्ये, वयाच्या अवघ्या 39 व्या वर्षी माझी हैदराबादच्या केंद्रीय विद्यापीठात राज्यशास्त्राचा प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. हे ऐकून बापट सरांना खूपच आनंद झाला होता. पुढे जानेवारी 1989 मध्ये पुण्याला 'साम्राज्यवाद आणि दक्षिण आफ्रिका' या विषयावर व्याख्यान देण्यासाठी मला आमंत्रित करण्यात आले. या भाषणाचे अध्यक्षस्थान स्वतः बापट सरांनी भूषवले होते. इतक्या कमी वयात प्राध्यापक झाल्याबद्दल त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात माझा अत्यंत गौरवाने उल्लेख केला. ते स्वतः त्या काळात सहयोगी प्राध्यापक (रीडर) असले, तरी आपल्या शिष्याची ही मोठी भरारी पाहून त्यांचे मन अभिमानाने भरून आले होते. त्यांनी ते कौतुक जाहीरपणे आणि प्रांजळपणे व्यक्त केले; कारण ते मनाने अतिशय मोठे होते. दुसऱ्याच्या आनंदात अगदी मनापासून आणि उत्स्फूर्तपणे सहभागी होणारी त्यांची वृत्ती खरोखर एखाद्या संतासारखी होती. त्यांनी पाठीवर टाकलेल्या त्या कौतुकाच्या थापेने मला कृतार्थ झाल्यासारखे वाटले. त्या दिवशी माझे भाषण खूप उत्तम झाले असे उपस्थित श्रोते म्हणत होते आणि पुढे वर्तमानपत्रांतही त्याची दखल घेतली गेली. त्याच मुक्कामात एका संध्याकाळी बापट सरांनी मला भोजनाचे आमंत्रण दिले आणि नेहमीप्रमाणेच आमची ती सायंकाळही वैचारिक गप्पांनी रंगली.
एकदा बापट सर हैदराबादला आले, तेव्हा माझ्या घरीच उतरले होते. त्या मुक्कामात त्यांच्या त्या वेळच्या अभ्यासाच्या विषयांवर आमच्यात गप्पा रंगल्या. त्यांनी पंडिता रमाबाई यांच्यावर बोलण्यास सुरुवात केली. सर पंडिता रमाबाईंना 'धार्मिक क्रांतिकारी' मानत असत. आपल्या विचारांत आणि आचारात त्यांनी चिकित्सक तर्कबुद्धी व श्रद्धा या दोन्हींचा समन्वय साधण्याचा कसा जाणीवपूर्वक प्रयत्न केला, हे अनेक उदाहरणांसह समजावून सांगितले. अर्थात, त्या पश्चिम आणि पूर्वेतील विचारप्रवाहांच्या सावलीत स्वतःला घडवत होत्या. रमाबाईंनी बालविवाहासारख्या जुनाट, जाचक प्रथांना कडाडून विरोध केला होता. त्यांचे हे विचार तत्कालीन सनातनी हिंदूंना पटणारे नव्हते. पुढे 1883 मध्ये त्यांनी इंग्लंडमध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारला, तेव्हाही त्या पाश्चात्त्य संस्कृतीला शरण गेल्या नाहीत, हे सरांनी अधोरेखित केले. त्यांच्या दृष्टीने रमाबाईंचे धर्मांतर हा स्वतःला जुन्या रूढी-परंपरांपासून मुक्त करण्याचा एक प्रामाणिक शोध होता. रमाबाईंनी अँग्लिकन चर्चच्या पोथीनिष्ठ विचारांनाही नेहमी विरोध केला. हिब्रू आणि ग्रीक भाषा शिकून त्यांनी मूळ बायबलचा स्वतः अन्वयार्थ लावला आणि त्याचा मराठीत अनुवाद केला. पुढे रमाबाईंवरील हेच अभ्यासपूर्ण विचार बापट सरांनी आपल्या लेखांच्या माध्यमातूनही प्रसिद्ध केले होते.
परंतु, बापट सरांचे लिहिण्याच्या प्रक्रियेशी तसे वावडेच होते. ते प्रामुख्याने मौखिक विद्वान होते आणि कदाचित आपल्या समृद्ध मौखिक परंपरेशीच अधिक जोडले गेले होते. नंतरच्या काळात मी त्यांची काही भाषणे ऐकली. त्या काळात माझीसुद्धा बौद्धिक आणि वैचारिक वाढ अधिक झालेली होती आणि मी सातत्याने लिहीत होतो त्यामुळे माझ्या अंगात लिहिण्याची शिस्त येत होती. नुसते बोलण्यापेक्षा आपले विचार शब्दांत नेमके आणि तर्कशुद्ध लिहिणे जास्त कठीण असते. त्यामुळे बापट सरांची व्याख्याने ऐकताना त्यात मला कधीकधी मांडणीची किंवा विचारांची पारंपरिक शिस्त दिसली नाही; पण त्यांची वेगळा विचार करण्याची अफाट प्रतिभा मात्र नेहमीच प्रकर्षाने जाणवत असे. बापट सरांच्या आठवणींबद्दल आणि प्रदीर्घ संवादांवर मी असाच लिहीत गेलो, तर हा लेख कधीच संपणे शक्य नाही. म्हणूनच, काही महत्त्वाच्या घटनांचा अगदी थोडक्यात उल्लेख करतो.
पुढे 2005 मध्ये अलाहाबाद केंद्रीय विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून माझी नियुक्ती झाली. हे ऐकून बापट सरांना अतिशय आनंद झाला होता. त्या काळात तिथल्या गुंडगिरीविरुद्ध पीस मार्च (शांतता यात्रा) काढून मी कसा लढा देत होतो, हे वर्तमानपत्रांतून वाचून त्यांना माझे खूप कौतुक वाटले. अलाहाबादच्या त्या पाच वर्षांच्या कार्यकाळामुळे 2010 पर्यंत आमची भेट होणे अशक्य झाले होते. त्यानंतर मी हैदराबादला परतलो खरा, पण कामाच्या व्यापांमुळे मला पुण्याला जाणे जमलेच नाही. बापट सर आजारी असल्याचे मला ठाऊक होते, पण तरीही मी त्यांची भेट घेऊ शकलो नाही, ही रुखरुख मनात कायम राहिली. अखेर, 2012 मध्ये त्यांच्या निधनाची ती चटका लावणारी बातमी मला फोनवर समजली.
ती बातमी ऐकून माझे मन सुन्न झाले होते. माझ्या आयुष्यातील एक अमूल्य व्यक्ती, एक प्रेरणादायी शिक्षक, एक ज्येष्ठ स्नेही आणि माझे खरे हितचिंतक मार्गदर्शक मला कायमचे सोडून गेले होते. पृथ्वीतलावरील आपला पार्थिव देह त्यांनी सोडला, तरी माझ्या वैचारिक विश्वात आणि मनात त्यांचे स्थान नेहमीच अढळ राहील. आपल्या विद्यार्थ्यांना अतिशय उत्साहाने प्रोत्साहन देण्याची त्यांचीच समृद्ध परंपरा मी पुढे चालवली. मी त्यांच्यासारखा अष्टपैलू नसलो, तरी त्यांच्यामुळे माझी ज्ञानलालसा अविरत वाढतच राहिली. आमच्यातील वैचारिक, शैक्षणिक आणि व्यक्तिगत संबंधांची ती प्रवाहधारा आज माझ्या असंख्य विद्यार्थ्यांना सोबत घेऊन अखंड वाहत आहे. ते आज प्रत्यक्ष सोबत नसले, तरी त्यांचे विचार माझ्यासोबत अविरत प्रवास करत आहेत; ज्यामुळे माझा जीवनप्रवास अधिक अर्थपूर्ण झाला आहे. मी स्वतःला कायम एक विद्यार्थी मानले आणि माझ्या विद्यार्थ्यांसाठी समर्पित भावनेने काम केले, यातच सरांनी दिलेल्या शिकवणीचे खरे सार होते !
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या