डिजिटल अर्काईव्ह

नियोगी हे अस्सल विचारवंत होते; पण त्यांचं एकंदर जगणं इतक्या कामांनी व्यापलं होतं की, त्यांना क्वचितच स्वतःचे विचार कागदावर मांडण्यासाठी वेळ मिळत असे. त्यांनी लिहिलेल्या मोजक्या दीर्घ लेखांपैकी एक लेख 'हमारा पर्यावरण' अशा मथळ्याचा होता. रजनी बक्षी यांनी या लेखाचं संवेदनशीलता राखत इंग्रजी भाषांतर केलं आहे. त्याचं मराठीकरण असं 'आपल्या पूर्वजांनी याच हवेत श्वासोच्छ्‌वास घेतला आणि त्यांची तहान याच नितळ पाण्याने भागवली. ही हवा आणि हे पाणी उद्ध्वस्त करण्याचा अधिकार आपल्याला नाही. ही नदी, इथली हवा, इथला डोंगर, इथलं जंगल, इथले किलबिलाट करणारे पक्षी ही आपली भूमी आहे. आम्ही आमचं जग पुढे नेण्यासाठी विज्ञानाची मदत घेऊ; पण नद्या स्वच्छ राहतील आणि मुक्तपणे वाहतील, तसंच हवा शुद्ध आणि निखळ राहील याचीही आम्ही काळजी घेऊ. आमच्या पूर्वजांना निसर्गासोबत एकतान राखण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या पक्ष्यांच्या सुरावटी कायम ऐकू येणं, ही आमची गरज आहे'.

स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रमुख राजकीय व्यक्तिमत्त्वांचा मृत्यू हिंसक रीतीने झाल्याचे अनेक प्रसंग आहेत. इंदिरा गांधी वयाच्या सत्तरीजवळ येत असताना त्यांची हत्या झाली, राजीव गांधी पन्नाशीच्या जवळ असताना त्यांची हत्या झाली, तर प्रमोद महाजन यांची हत्या झाली तेव्हा ते साठीच्या जवळ आले होते. याव्यतिरिक्त विमान अपघातात किंवा रस्ते अपघातात अकाली मृत्यू ओढवलेल्या नेत्यांचीही गणना करता येईल. संजय गांधी, राजेश पायलट, माधवराव सिंधिया, वाय. एस. राजशेखर रेड्डी, अशी नावं इथे आठवतात. या व्यक्ती आणखी वीसेक वर्षं जगल्या असत्या तर त्यांची पुढील राजकीय कारकिर्द कशी राहिली असती?

माझ्या मते, आधीच्या परिच्छेदात नोंदवलेल्या कोणत्याही राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या मृत्यूपेक्षा कामगार नेते व विलक्षण विचारवंत असणाऱ्या शंकर गुहा नियोगी यांच्या अकाली निधनाने बहुधा भारताची सर्वांत मोठी हानी केली. नियोगींच्या मृत्यूमुळे भारतातील नागरी समुदायाच्या चळवळीला भयंकर मोठा फटका बसला, आणि अजूनही हा देश त्या धक्क्यातून सावरलेला नाही. शंकर गुहा नियोगी यांची 1991 मध्ये हत्या करण्यात आली, तेव्हा ते वयाच्या पन्नाशीजवळ आले होते. त्यांनी कामगारांना स्वाभिमान मिळवून दिला आणि आपणही या देशात समान नागरिक म्हणून जगू शकतो असा विश्वास दिला, त्यामुळे नियोर्गीच्या विरोधात गेलेल्या भांडवलदारांच्या भाडोत्री गुंडांनी त्यांची हत्या केली.

मी नियोगींविषयी काही आठवणी नोंदवणारा लेख पूर्वी लिहिला होता (पहा- https://kartavyasadhana.in/view-article/Ramchandra-Guha-On-Roy-and-Niyogi). आता मला पुन्हा त्यांच्याविषयी लिहावं वाटत आहे. या वेळी अधिक विश्लेषणात्मक दृष्टीने लिहिणार आहे. शंकर गुहा नियोगी यांच्या जीवनाचा आणि कार्याचा उत्कृष्ट वेध घेणारं समाजवैज्ञानिक राधिका कृष्णन यांचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं, हे या लेखाचं निमित्त झालं. 'शंकर गुहा नियोगी अ पॉलिटिक्स इन रेड अँड ग्रीन' अशा शीर्षकाच्या या पुस्तकासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात व्यक्तिगत मुलाखतींचा, तसंच हिंदीमधील काही तात्कालिक स्रोतांचा आधार घेतला आहे.

नियोगींचा जन्म 1943 मध्ये एका बंगाली कुटुंबात झाला. एकोणीस वर्षांचे असताना ते नोकरीनिमित्त भिलाई स्टील प्लान्टमध्ये आले. भारताच्या आधुनिकतेच्या वाटेवरची एक ठळक खूण म्हणून या पोलादप्रकल्पाकडे पाहिलं जात होतं. नियोगींनी लवकरच पगारी नोकरी सोडून देत पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून जगायला सुरुवात केली. त्यांनी एका आदिवासी महिलेशी लग्न केलं आणि ते खाणकामगारांना संघटित करू लागले. पर्यावरणविषयक न्यायाच्या प्रश्नांमध्येही त्यांनी रस घेतला. पाणी व वनं यासंदर्भातील सरकारी धोरणं संकुचितपणे व्यापारी व औद्योगिक हितसंबंधांना अनुकूल असतात, त्याऐवजी ती स्थानिक शेतकरी व आदिवासी समुदायांचा अधिक विचार करून ठरवली जावीत, यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

नियोगींनी 1977 मध्ये 'छत्तीसगढ माइन्स श्रमिक संघ' स्थापन करण्यामध्ये सहभाग घेतला. ही संघटना मुख्यत्वे खाणकागारांच्या हक्कांबाबत काम करत होती. दोन वर्षांनी त्यांनी अधिक व्यापक स्तरावरील 'छत्तीसगढ मुक्ती मोर्चा' या संघटनेच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला. छत्तीसगढ मुक्ती मोर्चाशी संलग्न कामगार संघटनेव्यतिरिक्त महिला संघ, युवा संघ व सांस्कृतिक संघ अशाही शाखा होत्या. खाणकामगारांच्या निधीपुरवठ्यावर चालणारं रुग्णालयही मुक्ती मोर्चाने स्थापन केलं. त्यानंतर नियोगींची हत्या होईपर्यंत छत्तीसगढ माइन्स श्रमिक संघ व छत्तीसगढ मुक्ती मोर्चा या दोन्ही संघटना कामगारांच्या हक्कांसाठी, समाजसुधारणांसाठी आणि पर्यावरणीय शाश्वततेसाठी अथकपणे कार्यरत राहिल्या. अनेक आदर्शवादी मध्यम वर्गीय भारतीय तरुण-तरुणींनी सुखासीन व्यावसायिक कारकिर्दीच्या शक्यतांवर पाणी सोडत नियोगींच्या कार्यात सहभाग घेतला. यात वेल्लूरच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजातून पदवीधर झालेले विनायक सेन आणि कानपूरमधील प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतून पदवीधर झालेल्या सुधा भारद्वाज यांचा समावेश होतो.

नियोगी आणि छत्तीसगढ मुक्ती मोर्चा यांचं काम पारंपरिक कामगार संघटनेच्या पलीकडे जाणारं होतं. न्याय्य वेतन, कार्यपरिस्थितीमधील सुधारणा, पुरेशा रजांची तरतूद आणि निर्वाहनिधीची सुविधा, तसंच कामादरम्यान आरोग्य व सुरक्षितता, यासंबंधींच्या मागण्या त्यांनी केल्याच; पण त्यापुढे जाऊन त्यांनी सामाजिक भान असलेल्या वैज्ञानिकांची व अभियंत्यांची मदत घेत एक प्रयोगशाळा स्थापन केली. या प्रयोगशाळेत कामाच्या ठिकाणी असलेल्या प्रदूषणाचं मोजमाप केलं जात असे आणि सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबतही काम होत असे.

नियोगी हे अस्सल विचारवंत होते; पण त्यांचं एकंदर जगणं इतक्या कामांनी व्यापलं होतं की, त्यांना क्वचितच स्वतःचे विचार कागदावर मांडण्यासाठी वेळ मिळत असे. त्यांनी लिहिलेल्या मोजक्या दीर्घ लेखांपैकी एक लेख 'हमारा पर्यावरण' अशा मथळ्याचा होता. रजनी बक्षी यांनी या लेखाचं संवेदनशीलता राखत इंग्रजी भाषांतर केलं आहे. त्याचं मराठीकरण असं 'आपल्या पूर्वजांनी याच हवेत श्वासोच्छ्वास घेतला आणि त्यांची तहान याच नितळ पाण्याने भागवली. ही हवा आणि हे पाणी उद्ध्वस्त करण्याचा अधिकार आपल्याला नाही. ही नदी, इथली हवा, इथला डोंगर, इथलं जंगल, इथले किलबिलाट करणारे पक्षी ही आपली भूमी आहे. आम्ही आमचं जग पुढे नेण्यासाठी विज्ञानाची मदत घेऊ; पण नद्या स्वच्छ राहतील आणि मुक्तपणे वाहतील, तसंच हवा शुद्ध आणि निखळ राहील याचीही आम्ही काळजी घेऊ. आमच्या पूर्वजांना निसर्गासोबत एकतान राखण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या पक्ष्यांच्या सुरावटी कायम ऐकू येणं, ही आमची गरज आहे'.

जलप्रदूषण व हवाप्रदूषण, मातीची धूप आणि अवाजवी नफा कमवू पाहणाऱ्या बड्या उद्योगांनी चालवलेली नैसर्गिक संसाधनांची लूट, यातून मानवी जीवनाचं व उपजीविकेच्या साधनांचं कसं नुकसान होतं, याकडे छत्तीसगढ मुक्ती मोर्चाच्या धोरणविषयक दस्तऐवजांमध्ये बरंच लक्ष पुरवण्यात आल्याचं कृष्णन यांनी पुस्तकात नोंदवलं आहे. सरकारी व खाजगी कारखान्यांनी पर्यावरणाचा हानिकारक वापर करत शेतकऱ्यांना, मजुरांना, स्त्रियांना व लहान मुलांना त्यासाठीची किंमत मोजायला लावली.

भारतीय परिस्थितीशी अधिक सुसंगत असणाऱ्या उत्पादन तंत्रांमध्ये नियोगींनी उत्सुकतेने रस घेतला. युरोप व उत्तर अमेरिका इथली मोठमोठी यंत्रणा अविचारीपणे आयात केल्यामुळे भारतीय समाजाचं वर्गीय व लिंगभावात्मक पातळींवर अधिक ध्रुवीकरण होईल, हे त्यांना जाणवलं. कृष्णन लिहितात, 'यांत्रिकीकरणाची झळ अपरिहार्यपणे स्त्रियांना बसते, हे छत्तीसगढ मुक्ती मोर्चाला अनुभवातून लक्षात आलं. डल्ली इथल्या हाती काम करावं लागणाऱ्या खाणींमध्ये अर्ध्या महिला कामगार होत्या आणि पूर्ण यांत्रिकीकरण झालेल्या खाणींमध्ये मात्र त्यांना 'अकुशल' गणलं जात असे, त्यामुळे तिथे रोजगारासाठी त्या पात्र ठरत नसत. रोजगार व आर्थिक स्वातंत्र्य अशा रीतीने गमवावं लागल्यामुळे स्त्रियांच्या प्रतिष्ठेवर व्यवस्थेच्या पातळीवरच घाला घातला जातो, असं छत्तीसगढ मुक्ती मोर्चाचं म्हणणं होतं'. नियोगी आणि त्यांची संघटना उत्पादनाचं पर्यायी प्रारूप निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील होते. यामध्ये उपजीविकेच्या साधनांचं रक्षण करणं, श्रमशक्तीला आर्थिक लाभ मिळवून देणं आणि भरभराटीला येणारी अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी कामगारांची क्रयशक्ती वृद्धिंगत करणं, यांवर भर दिला जाणार होता'.

"चिपको आंदोलनामुळे आमच्यात उत्साह निर्माण झाला आणि आम्ही ते एक क्रांतिकारी आंदोलन असल्याचं मानत होतो, असं नियोगी म्हणाल्याचंही कृष्णन यांनी नोंदवलं आहे. त्यांचं पुस्तक वाचत असताना मला शंकर गुहा नियोगी आणि 'चिपको आंदोलना'तील थोर नेते चंडीप्रसाद भट्ट यांच्यातल्या साधर्म्याने चकित व्हायला झालं. नियोगी हे पर्यावरणवादी मार्क्सवादी होते, तर आजही आपल्यासोबत असणारे भट्ट हे डाव्या विचारांचे गांधीवादी आहेत. पर्यावरण व समता यांच्यात संयोग साधणं, हे दोघांनीही जीवितकार्य मानलं. दोघंही तळपातळीवर काम करणारे अस्सल बुद्धिजीवी राहिले, दोघेही कामगारांच्या व शेतकऱ्यांच्या जगण्यात मिसळून गेले, त्याच वेळी देशासाठी व जगासाठी व्यापक दृष्टियोजना मांडण्याचं कामही करत आले.

कृष्णन यांनी छत्तीसगढ मुक्ती मोर्चाचं एक मूळ छत्तीसगढी गाणंही उद्धृत केलं आहे, ते इंग्रजी भाषांतरातही प्रभावी वाटतं. त्याचं मराठीकरण असं :

'दरएक सुकल्या गळ्याची तहान भागवणारं पाणी असावं,
दरएक शेताला पाणी मिळून ते हिरवंगार व्हावं, 
प्रत्येकाच्या हाताला काम मिळावं, 
प्रत्येक शेतकऱ्याच्या पिकाला वाजवी दाम मिळावं, 
प्रत्येक गावात हॉस्पिटल असावं, 
प्रत्येक मुलाला चांगलं शिक्षण मिळावं, 
कोणीच जमिनीपासून नि घरापासून वंचित नसावं,
गरिबी, शोषण नि भांडवलशाहीच्या सर्व खुणांना दूर सारावं,
असं छत्तीसगढ कधी होईल ओ ? 
शेतकरी नि कामगारांचं राज्य कधी येईल ओ!'

नियोगींची हत्या तीस वर्षांपूर्वी झाली; पण त्यांच्या जीवनकार्यातून समोर येणारे किमान पाच मुद्दे आजच्या भारतातही लागू होणारे आहेत :

एक, असंघटित कामगारांच्या दयनीय अवस्थेवर त्यांनी प्रकाश टाकला (आता विशेषतः बांधकाम क्षेत्रात व कंत्राटी अर्थव्यवस्थेमध्ये हे अधिक दृश्यमान झालं आहे).

दोन, लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी स्वतंत्र नागरी समुदाय संघटनांची भूमिका किती मौलिक असते, हे त्यांनी अधोरेखित केलं. आज भारतामध्ये भारतीय जनता पक्ष त्यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीला अनुकूल नसलेल्या नागरी समुदाय संस्थांना धमकावतो आहे, त्यांचा छळ करतो आहे, अशा वेळी स्वतंत्र नागरी समुदायाची गरज अधिकच भासते आहे.

तीन, पर्यावरणीय शाश्वततेची विकासप्रक्रियेशी सांगड घालणं किती महत्त्वाचं आहे, हेही यातून दिसून येतं. आपल्या शहरांमधील हवाप्रदूषणाची धोकादायक पातळी, हवा शुद्ध करणाऱ्या स्रोतांमध्ये झालेली घट, नद्यांचं प्रदूषण, तसंच सत्ताधाऱ्यांच्या निकटवर्तीयांत पायाभूत बांधकाम कंपन्यांकडून व खाणकाम कंपन्यांकडून हिमालयावर, पश्चिम घाट प्रदेशावर आणि अरावली पर्वतरांगांवर होत असलेले निघृण हल्ले, हे सगळं लक्षात घेतलं तर शंकर गुहा नियोगींनी (आणि चंडीप्रसाद भट्ट यांनीही) दिलेले इशारे दुर्लक्षित ठेवणं सध्याच्या व भविष्यातल्या पिढ्यांना किती महागात पडेल, हे कळतं.

चार, नियोगींच्या कार्यातून छत्तीसगड, झारखंड व उत्तराखंड यांसारख्या लहान, संसाधनसंपन्न राज्यांसाठी कमी शोषणकारी, कमी विध्वंसक आणि अधिक अर्थपूर्ण विकासाचं प्रारूप उभं राहतं.

पाच, 'अद्ययावत' तंत्रज्ञानाच्या दीर्घकालीन परिमामांबाबत अवाजवी आशावादी राहू नये, असा इशारा नियोगींच्या जीवनकार्यातून मिळतो. स्वयंचलित तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, इत्यादींमुळे लाखो भारतीय बेरोजगार होऊ शकतात, मग रिकामे पुरुष त्यांच्या हातातील स्मार्टफोनवर पॉर्न बघण्याकडे किंवा द्वेषमूलक व्हिडिओ बघण्याकडे वळू शकतात. सिलिकॉन व्हॅली किंवा बंगळुरू यांची पाठराखण करणाऱ्यांपेक्षा नियोगींना झालेली जाणीव महत्त्वाची होती. नवतंत्रज्ञान एकीकडे खाजगी कंपन्यांची उत्पादकता व नफा वाढवेल, तर दुसरीकडे समाजावर आणि निसर्गावर त्याचे धोकादायक विभाजनकारी व हानिकारक परिणाम होतील, हे त्यांनी सूचित केलं होतं.

हा लेख भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या आसपास प्रसिद्ध होईल. हा काही अपघात नाही. आपल्या प्रजासत्ताक राज्याच्या इतिहासात मोजक्याच भारतीयांनी शंकर गुहा नियोगींइतक्या निष्ठेने स्वातंत्र्य, समता व (विशेषतः) सहभाव या मूल्यांना प्रत्यक्षात आणून दाखवलं, त्यामुळे नियोगींची आठवण प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ठेवणं आवश्यक वाटतं.

भाषांतर - प्रभाकर पानवलकर

 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामचंद्र गुहा,  बंगळुरू, कर्नाटक ( 285 लेख )

भारतीय इतिहासकार व लेखक. समकालीन सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक विषयांवर तसेच पर्यावरणावर आणि क्रिकेटच्या इतिहासावर लेखन. 




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी