डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

असे काही चित्रपट असतात की त्यांचा एकच एक अर्थ काढता येत नाही. ‘अमेरिकन ब्यूटी’मध्ये असाच एक गुंतागुंतीचा कॅलिडोस्कोप लेखक दिग्दर्शकाने आपल्या समोर ठेवलाय. अमेरिकेतल्या निरर्थक भौतिक जगण्याखाली दडलेले सौंदर्य आणि मुळात सौंदर्यशोधाचीच निरर्थकता अशी उफराटी तात्पर्ये आपल्या ओंजळीत टाकून हा चित्रपट कोड्यात टाकतो.

निखळ, नितळ सौन्दर्याचा आणि सुंदर जगण्याचा शोध हे कलेचेच नव्हे तर जगण्याचेही एक उद्दिष्ट असतेच. जगणे काय आणि कला काय, ते अधिकाधिक मौलिक आणि अर्थपूर्ण करता करताच कित्येक वेळा त्यातले सौंदर्य बोटांच्या फटीतून निसटत जाते. भौतिक समृद्धी आणि वेगवान जीवनशैली हेच स्थायीभाव असणाऱ्या अमेरिकन संस्कृतीत तर हे प्रश्न अधिकच गुंतागुंतीचे होतात, ऐरणीवर येतात. त्यात पुन्हा आडपडदा न ठेवता थेट आणि पारदर्शक पद्धतीने अनुभव घ्यायची आणि मांडण्याची त्यांची शैली आहे. या सगळ्याचा अनुभव देणारा सॅम मेंडिस या ऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाचा ‘अमेरिकन ब्यूटी’ हा एक महत्त्वाचा चित्रपट आहे. 2000 साली सर्वोत्तम चित्रपट, सर्वोत्तम दिग्दर्शक, सर्वोत्तम लेखन, सर्वोत्तम अभिनेता आणि सर्वोत्तम सिनेमँटोग्राफी अशी महत्त्वाची पाच ऑस्कर्स जिंकणारा शतकांच्या सीमारेषेवरचा हा चित्रपट. भौतिकता, भोगवाद आणि समृद्धीबरोबरच विकृतीचे दान देणारे हे शतक संपताना बनवलेला हा चित्रपट याच पार्श्वभूमीवर सौंदर्याचा शोध घेतो. अमेरिकन मानसिकतेच्या परिप्रेक्ष्यात, भौतिकतेच्या पार्श्वभूमीवर, पुरुषाच्या मिडल लाइफ क्रायसिसच्या पृष्ठभूमीवर घेतलेला हा सौंदर्याचा शोध जबरदस्त गुंतागुंतीची अनुभूती देतो.

मुळात ॲलन बॉल या ‘ट्रू ब्लड’, ‘सिक्स फीट अंडर’ यांसारख्या गाजलेल्या टीव्ही सीरियल्सच्या लेखक दिग्दर्शकानं 90 च्या दशकाच्या सुरूवातीला या कल्पनेवर नाटक लिहायला घेतलं, पण हा विषय नाटकात मावत नसल्यानं त्यानं सोडून दिला. दरम्यान त्यानं टीव्हीसाठी खूप काही लिहिलं. पुढे 1997 साली त्यानं या कल्पनेवर चित्रपटाची पटकथा लिहिली आणि सॅम मेंडिस या दिग्दर्शकानं या चित्रपटाच्या रूपात पहिल्यांदाच चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. म्हणजे दोघांचा हा पहिलाच चित्रपट. दोघांनाही ऑस्कर मिळवून देऊन ‘अमेरिकन ब्यूटी’नं इतिहास घडवला. (अलीकडेच आलेला आणि विलक्षण लोकप्रिय झालेला ‘स्कायफॉल’ हा जेम्स बाँडपट सॅम मेंडिस याच दिग्दर्शकाचा आहे.) 1995 साली ‘द यूज्वल सस्पेक्टर्स’साठी ऑस्कर मिळवलेल्या केविन स्पेसीनं यातली मध्यवर्ती भूमिका वठवली आणि ‘अमेरिकन ब्यूटी’साठी स्पेसीला दुसरं ऑस्कर मिळालं. एकूण 10 ऑस्कर नॉमिनेशन्स आणि तीन ऑस्कर पुरस्कार मिळवणाऱ्या सिनेमँटोग्राफर कॉनरॅड हॉलला देखील या चित्रपटासाठी ऑस्कर मिळालं. आणि अर्थात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं देखील. अशी पाच ऑस्कर्स मिळवणाऱ्या ‘अमेरिकन ब्यूटी’ला तब्बल 89 इतर आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि 74 नॉमिनेशन्स मिळाली होती. शिवाय 15 मिलियन डॉलर्स खर्चून केलेल्या या चित्रपटानं एकूण 350 मिलियन डॉलर्सचा धंदाही केला. रसिकांबरोबरच समीक्षकांनीही हा चित्रपट एकमुखानं गौरविला. तात्पर्य पुरस्कार, पैसा आणि प्रशंसा अशा तीन्ही अंगांनी हा चित्रपट जबरदस्त यशस्वी झाला.

‘अमेरिकन ब्यूटी’ची कथा गुंतागुंतीची आहे, आणि त्यापेक्षाही गुंतागुंत त्याच्या गाभ्याचा जो आशय आहे त्यात आहे. अनेक चित्रपटतज्ज्ञ आणि जाणकारांनी या विषयावर लिहिले आहे. मध्यमवयीन पुरुषाची मानसिकता, एकूणच पौरुषाचे अर्थ आणि अन्वयार्थ, निखळ सौंदर्याचा शोध, भौतिक जगण्यातली पोकळी अशा अनेक अंगांनी या चित्रपटाकडे पाहिले गेले आहे. या चित्रपटाची सिनेमँटोग्राफी हा तर निराळ्या लेखाचा विषय व्हावा इतकी अचाट प्रयोगशीलता हॉलने दाखवली आहे. चित्रपटातली भलतीच ‘मोकळीढाकळी’ आणि लैंगिक संदर्भानी भरलेली भाषा आणि काही अर्धनग्नदृष्ये आपल्याकडच्या प्रेक्षकांना धक्का देतील अशी आहेत. समलिंगी संबंध आणि जवळच्या नात्यातल्या लैंगिकतेचे सूचन विवादास्पद आहे. पाश्चात्य समाजातले पूर्णपणे मोडकळीस आलेल्या कुटुंबव्यवस्थेचे चित्रण धक्कादायक आणि भयप्रद आहे.  नायकाचा आणि इतर पात्रांचा सौंदर्यशोध धूसर आणि प्रतीकात्मक आहे. आणि तरीही हा चित्रपट एक उच्च कोटीची कलात्म अनुभूती देतो हे मात्र निखळ सत्य आहे. छे! शब्दांच्या चिमटीत हे सारे पकडणे अवघडच आहे, पण प्रत्येक रसिक प्रौढ प्रेक्षकाने अगदी आवर्जून बघावा असाच हा चित्रपट आहे.

ही कथा आहे लेस्टर बर्नहॅम या मध्यमवयीन पुरुषाच्या कुटुंबाची. नोकरीत वैतागलेला, संसारात वैफल्यग्रस्त झालेला आणि बायको आणि मुलगी या दोघींच्या नजरेत निरुपयोगी असलेला हा चाळिशीतला पुरुष ‘मिडल लाइफ क्रायसिस’चे मूर्तीमंत उदाहरण आहे. त्याची बायको कॅरोलिनला केवळ भौतिक सुखसमृद्धीचा सोस आहे. त्यांची मुलगी जेन आपल्या आईबापाचा तिरस्कार तर करतेच शिवाय विविधतापूर्ण आणि समृद्ध लैंगिक जीवनाच्या गप्पा ऐकवणाऱ्या अँजेला या मैत्रिणीमुळे न्यूनगंडाने पछाडलेली आहे. या मायलेकीतले नाते दाखवणारा हा चिमुकला संवाद पहा...

आई : Are you trying to look unattractive?

मुलगी : Yes.

आई : Well, congratulations. You've succeeded admirably  

आत्मीयता, प्रेम, जिव्हाळा यासारखे काही उरलेले नाही असे हे कुटुंब आहे. यांच्या शेजारचे कुटुंब आहे फ्रँक फिट्‌स या निवृत्त कर्नलचे. लष्करी शिस्त आणि आयुष्याला ‘स्ट्रक्चर’ असणे याला सर्वोच्च महत्त्व देणाऱ्या कर्नल फिट्‌सचा मुलगा रिकी ड्रग्जच्या आहारी गेलेला एक मनस्वी तरुण आहे. बापाच्या शिस्तीमुळे वैफल्यग्रस्त झालेल्या रिकीनं काही काळ मिलिटरी ॲकॅडमीत काढलाय तर काही काळ मनोरुग्णांच्या इस्पितळात. आणि त्याने मार्ग शोधलाय ड्रग्ज, संगीत आणि आपल्या छोट्या कॅमेऱ्यावर आजूबाजूच्या जगाच्या घटना शूट करून त्या टेप्स साठवण्यात. चित्रपटातल्या सुरूवातीच्या महत्त्वाच्या घटना म्हणजे पोकळ आयुष्याला वैतागलेला लेस्टर आपल्या लेकीच्या मैत्रिणीच्या, म्हणजे अँजेलाच्या प्रेमात पडतो आणि आधी चोरून आपले शूटिंग करतो म्हणून ज्याच्यावर ती वैतागलेली होती (आणि तो वैताग शिवीगाळ करून अन अमेरिकन पद्धतीने त्याला मधले बोट उंचावून दाखवणारी) ती जेन शेवटी त्याच्याच म्हणजे रिकीच्याच प्रेमात पडते. तर इकडे इस्टेट एजंट असलेली कॅरोलिन आपला प्रतिस्पर्धी बडी केनच्या बेडरूममध्ये सुख शोधत राहते. लेस्टर असंख्य लाल गुलाबांतल्या नग्न अँजेलाशी प्रणयाचे स्वप्नरंजन करत राहतो आणि नव्याने शरीर पिळदार करायच्या मागे लागतो. रिकी लेस्टरला ड्रग्ज पुरवतो तर फ्रँकला त्याचे आणि लेस्टरचे समलिंगी संबंध असल्याचा संशय येतो. त्याचा जाब विचारायला तो लेस्टरकडे येतो तर स्वत:च लेस्टरच्या गळ्यात पडतो आणि लेस्टरने झिडकारताच पराभूत मनाने परततो. लैंगिक करामतींच्या गप्पा मारणारी अँजेला प्रत्यक्ष लेस्टरशी संग करायची वेळ येताच आपली खरे तर ही पहिलीच वेळ असल्याची कबुली देऊन टाकते आणि लेस्टरचा तिच्यातला लैंगिक रसच जातो. रिकीला त्याचा बाप घराबाहेर काढतो तर तो जेनलाच आपल्याबरोबर पळून येणार का असं विचारतो, त्याला जेन आनंदाने संमती देते. एकीकडे बडीने देखील झिडकारलेली कॅरोलिन आपल्या आयुष्याच्या सर्वनाशाला नवराच जबाबदार आहे असे समजते तर दुसरीकडे फ्रँक फिट्‌स देखील आपल्या अंतिम भ्रमनिरासाला लेस्टरच जबाबदार आहे असे मानतो. शेवटी फ्रँकच लेस्टरचा डोक्यात गोळी घालून खून करतो असे सूचन आहे आणि तेव्हा लेस्टरच्या डोळ्यासमोरून त्याच्या आयुष्यातल्या सुंदर घटनांचा पट सरकत असतो. आपलेआयुष्य सुंदरच होते असे म्हणत लेस्टर मरून जातो. आपापल्या जगण्यात फ्रस्ट्रेट झालेली ही पात्रे एकामेकांच्या आयुष्यात येतात आणि आयुष्याची पोकळी अधिकच शोकान्त करतात.

आयुष्य निरनिराळ्या प्रकारे अर्थपूर्ण करता करताच त्यातले साधे सहज सौंदर्य कसे निसटत जाते त्याची ही शोकात्म कहाणी आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने जगण्यातल्या सौंदर्याचा शोध घेतो पण भौतिकतेचे आक्रमण आणि नात्यातल्या अपेक्षांची गुंतागुंत प्रत्येकालाच अंतिमत: विफल, विकल करते. त्यातून आपल्या मनावर अमिट परिणाम करते रिकीनं शूट केलेली एक फिल्म. त्यात एक प्लॅस्टिकची रिकामी पिशवी वाऱ्यावर निरुद्देशपणे इकडेतिकडे लहरत असते. अगदी सहजपणे. जगणे असे सहज लयदार आणि डौलदार हवे. त्यात अपेक्षा, यश, स्पर्धा आणि भौतिक परिमाणे लावून आपणच त्याची सहजता नष्ट करतो. लेस्टरच्या रूपात जगण्याच्या चाकोरीत बंदिवान झालेल्या मानवाची कहाणी येते. दिग्दर्शकाने त्याचे नोकरीतले प्रसंग देखील करड्या रंगाच्या पार्श्वभूमीत घेतले आहेत. त्यातून मुक्तीचे लेस्टरचे स्वप्न आहे. लेस्टर जेव्हा आपल्या पौरुषाचे अन्वयार्थ स्वप्नरंजनातून शोधतो तेव्हा त्या स्वप्नदृष्यात असंख्य लाल गुलाबीत विवस्त्र अँजेलाला पाहतो आणि गुलाबाच्या एकेक पाकळ्या (त्या प्लॅस्टिकच्या पिशवी-सारख्याच) लयदार गिरक्या घेतात.

यात दिग्दर्शकाने कॅरोलिनचे भौतिकतेविषयीचे प्रेम एकाच प्रसंगात फार सुरेख दाखवले आहे. एकदा हॉलमध्येच कोचावर लेस्टर तिला कवेत घेऊन चुंबन घेणार तेवढ्यात त्याच्या  हातातल्या टिनमधली बीअर चार हजार डॉलरच्या कोचावर पडून इटालियन सिल्कचे सोफा कव्हर खराब होईल याचीच तिला काळजी वाटते आणि ती त्याला मध्येच थांबवते. अशा बारीकसारीक प्रसंगातून सॅम मेंडिसने प्रत्येक पात्राला जिवंत केले आहे. सुरवातीलाच लेस्टरला बाथरूममध्ये अंघोळ करताना शॉवरखाली हस्तमैथुन करताना दाखवून त्याच्या लैंगिक आयुष्यावर दिग्दर्शकाने नेमके भाष्य केले आहे तर दुसरीकडे आपला मुलगा रिकी पुन्हा एकदा ड्रग्जच्या विळख्यात सापडेल या चिंतेत असणारा फ्रँक फिट्‌स नेमाने आपल्या मुलाची वैद्यकीय तपासणी करतो तेव्हा रिकी दर वेळी दुसऱ्याच लहान मुलाची लघवी देऊन फसवणूक करताना दाखवून बापलेकांतले संबंध दाखवले आहेत. ही पात्रे जगण्यातले, नात्यांमधले सौंदर्य शोधण्यासाठी एकामेकांला जोडून घ्यायचा आटोकाट प्रयत्न तर करतात, पण तरीही एकेकटी राहतात.

लेस्टरची अनेक कंगोरे असलेली अवघड भूमिका केव्हिन स्पेसीने अप्रतिम साकारली आहे. त्याच्या भूमिकेतला मिस्किलपणा, उपरोध आणि तरीही उत्कटतेने क्षणभंगुर सुखाचे क्षण पकडायची आस त्याने जिवंत केली आहे. ॲनेट बेनिंग या गुणी अभिनेत्रीने निखळ भौतिकतेत अडकलेली कॅरोलिन उत्तम साकारली आहे तर मनस्वी, ड्रगिस्ट मनोरुग्ण तरुण रिकी वेस बेन्टलेने उभा केलाय. त्याचे मनस्वी शहाणपण, आपल्या विचारावरची ठाम श्रद्धा आणि तरल भावुकता बेन्टलेच्या डोळ्यात दिसते. यात विशेष कौतुक करायला हवे ते सिनेमँटोग्राफर कॉनरॅड हॉलचे. लेस्टरची स्वप्नदृष्ये, रिकीने बनवलेल्या फिल्म्स आणि चित्रपटभर वापरलेली शांत मंद रंगसंगती हे सारेच विशेष दाद द्यावे असे आहे. कारण या रंगसंगतीच्या पार्श्वभूमीवर चित्रपटातल्या अचाट घटना उठून दिसतात. शिवाय ‘द गेस हू’ या कॅनेडियन बॅण्डने लोकप्रिय केलेले ‘अमेरिकन वूमन’ आणि 1960च्या दशकात लोकप्रिय असलेल्या ‘फनी गर्ल’ सिनेमातले प्रसिद्ध गाणे ‘डोन्ट रेन ऑन माय परेड’ सारखी गाणी अगदी चपखलपणे वापरली आहेत सॅम मेंडिसने.

असे काही चित्रपट असतात की त्यांचा एकच एक अर्थ काढता येत नाही. ‘अमेरिकन ब्यूटी’मध्ये असाच एक गुंतागुंतीचा कॅलिडोस्कोप लेखक दिग्दर्शकाने आपल्या समोर ठेवलाय. अमेरिकेतल्या निरर्थक भौतिक जगण्याखाली दडलेले सौंदर्य आणि मुळात सौंदर्यशोधाचीच निरर्थकता अशी उफराटी तात्पर्ये आपल्या ओंजळीत टाकून हा चित्रपट कोड्यात टाकतो. जगण्यातले सौंदर्य चाकोरीत आहे का चाकोरी तोडण्यात आहे? मृत्यूत सगळेच संपणार आहे तर त्याआधीच्या प्रत्येक क्षणाला आपल्या भवतालात सौंदर्य शोधायला हवे. त्यासाठी भौतिक अर्थपूर्णतेपेक्षा सौंदर्यलक्ष्यी सहज निरर्थकता हवी आणि मग त्यासाठी चाकोरीचे बंधन तोडणे क्रमप्राप्त आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, विशेषत: तारुण्य ओसरल्यावर अधिकच उत्कटपणे जगण्यावर प्रेम करता यायला हवे, अशी अनेक प्रतिपादने हा चित्रपट करतो. एकदा पाहून विसरता येईल असा हा चित्रपट नव्हे. पडद्यावर संपला तरी मनात दीर्घकाळ चालू राहणारा असा हा जबरदस्त चित्रपट आहे.


साधी सोपी एकरेषीय कहाणी असणारे सुंदर सिनेमे पाहावेत तसेच जगण्याची गुंतागुंत मांडणारे ‘अमेरिकन ब्यूटी’सारखे सिनेमे देखील आवर्जून पाहायला हवेत. त्यामुळे आपलीही जगण्याची जाण वाढते. असे सिनेमे बघताना जमेल तितकी जाणकारांची मदतही घ्यावी. ज्यांना इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे त्यांनी एक गोष्ट जरूर करावी. IMDB.com सारख्या साइटवर जाऊन अशा चित्रपटाची अधिकाधिक माहिती तर घ्यावीच, शिवाय गूगल मध्ये 'american beauty interpretations' असा सर्च देऊन अधिकाधिक जाणकारांची मते वाचावीत. त्यामुळे उत्तमोत्तम चित्रपट बघण्याची आपली जाण नक्कीच वाढते. उदा. http://en.wikipedia.org/wiki American_ Beauty_(film) या साइटवर जरूर जा. तिथे या चित्रपटाचा सर्वांगाने केलेला अभ्यास आहे. चित्रपटाचे ‘सीन बाय सीन’ विश्लेषण आहे. चित्रपटाच्या अन्वयार्थाविषयी मौलिक भाष्य आहे. शिवाय चित्रपटाबद्दल संपूर्ण माहिती विकिपीडियावर म्हणजे http://en.wikipedia.org/wiki/ American_Beauty_(film) या साइटवर मिळेल. कोणत्याही चित्रपटाचा अधिक जाणकारीने आस्वाद घेतला तर आनंद शतपटीने वाढतो. अमेरिकन ब्यूटी हा चित्रपट अतिशय लोकप्रिय असल्याने कोणत्याही व्हीडिओ सीडीच्या दुकानात किंवा फ्लिपकार्टवर सहज मिळतो.   

Tags: सिनेमा संजय जोशी भोगवाद लैंगिकता सॅम मेंडिस अमेरिकन ब्युटी मनोरुग्ण अमेरिकन वूमन films cinema Manorugan Bhogwad Laigikta Sam Mendis American Beauty Funny Girl American Woman Sanjay Joshi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संजय भास्कर जोशी,  पौड रोड, पुणे
swaraart_swapne@yahoo.com

लेखक, अनुवादक, समीक्षक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात