डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

सात पापकर्मांमुळेच सात आव्हाने कठीण !

आता या सात-आठ सामाजिक पातकांवर नजर टाकली आणि कोणते यातील सर्वाधिक नुकसान करणारे आहे,  असा प्रश्न विचारला तर कोणाही व्यापक व सखोल विचार करणाऱ्या माणसाला पटकन्‌ उत्तर देता येणे अवघड जाईल. कारण ती परस्परांशी इतकी निगडित आहेत,  की त्यांना अलग-अलग करताच येणार नाही. ती पूर्णत: एकजिनसी आहेत  वा अविभाज्य आहेत असेही म्हणता येईल.  मात्र या सात सामाजिक पातकांची स्पष्टीकरणे वेगवेगळ्या क्षेत्रांतील अनेक लहान-थोरांनी देण्याचा प्रयत्न केलेला  आहे.

गेल्या आठवड्यात, प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने ‘सत्तर वर्षांनंतरही सात आव्हाने कायम!’ या शीर्षकाचा संपादकीय लेख लिहिला होता. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमधील आठ शब्द,  देशासमोरील आठ आव्हाने  अधोरेखित करतात असे त्यातील मध्यवर्ती प्रतिपादन आहे. सार्वभौम, समाजवाद, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, न्याय, स्वातंत्र्य,  समानता,  बंधुता हेच ते आठ शब्द. त्यातील सार्वभौमत्व राखण्याचे आव्हान आपण बऱ्यापैकी परतावून लावले आहे;  त्याबाबतचा धोका संपुष्टात आलेला नसला तरी, संपूर्ण देश पुन्हा एकदा साम्राज्यवादी शक्तींच्या अधिपत्याखाली जाईल अशी शक्यता आता नाही असा त्याचा अर्थ. मात्र उर्वरित सात आव्हानांबाबत आपण समाधानकारक स्थितीत  अद्यापही आलेलो नाहीत. सत्तर वर्षांचा कालखंड कोणत्याही (विशेषत: भारतासारख्या सर्व दृष्टींनी अवाढव्य व  गुंतागुंतीच्या) राष्ट्रासाठी फार मोठा नाही,  तरीही ती सात आव्हाने सुसह्य होताना दिसत नाहीत ही चिंतेची बाब निश्चितच आहे. त्यामुळे पुढचा प्रश्न असा निर्माण होतो की,  ही आव्हाने इतकी कठीण का भासतात?  याचे उत्तर महात्मा गांधी यांनी  ठासून सांगितली त्या सात सामाजिक पातकांमध्ये दडलेली आहेत असे म्हणता येईल. गांधीजींनी त्यांच्या ‘यंग इंडिया’ या साप्ताहिकात 22 ऑक्टोबर 1925 च्या अंकात ही सात सामाजिक पातके (sevan social sins)  पहिल्यांदा लिहिली. या सात पातकांची यादी पूर्वीही ब्रिटनमध्ये या ना त्या छोट्या बदलांसह मांडली गेली होती,  मात्र भारतात आणि नंतर  जगातही ही सात सामाजिक पातके चर्चिली गेली ती गांधीजींमुळेच! 

ही सात सामाजिक पातके कोणती?  चारित्र्याविना शिक्षण,  कष्टाविना संपत्ती,  तत्त्वहीन राजकारण, नीतीमत्तारहित  व्यापार,  मानवतेविना विज्ञान,  विवेकहीन सुखोपभोग, त्यागरहित भक्ती. विशेष म्हणजे या सात सामाजिक पातकांची यादी  ‘यंग इंडिया’मध्ये प्रसिध्द केल्यानंतर,  त्याबाबतचे काहीही स्पष्टीकरण गांधीजींनी त्या अंकात दिले नाही आणि नंतरही  त्याचा अधिक विस्ताराने ऊहापोह केल्याचे पुरावे आढळत नाहीत. मात्र ती यादी प्रसिध्द करताना गांधीजींनी एका वाक्यात  भाष्य केले होते ते असे की, ‘‘ही पातके समजून घेणे पुरेसे नसून, ती हृदयात पाझरली पाहिजेत.’’  या वाक्यातील भाष्य  नीट समजून घेतले तर लक्षात येईल,  गांधीजींनी त्या सात सामाजिक पातकांचे अधिक स्पष्टीकरण का दिले नसावे! एवढेच  नाही तर,  ते याकडे किती गांभीर्याने आणि व्यापक व सखोल अर्थाने पाहात होते याचा पुरावा म्हणजे ते एक वाक्य ! त्यानंतर 22 वर्षांच्या हयातीत गांधीजींनी ती यादी जशीच्या तशी अनेक लोकांना दिली,  अनेक प्रार्थना सभांमधून  वाचायला सांगितली. त्यातही एक प्रसंग तर अधिक संस्मरणीय म्हणावा असा त्यांच्या नातवाने (अरुण गांधी यांनी) सांगितला आहे. गांधीजी भारतात कायमचे वास्तव्य करायला 1915 मध्ये आल्यानंतर त्यांचे दक्षिण आफ्रिकेतील काम चालू ठेवण्यासाठी चिरंजीव मणिलाल कुटुंबीयांसह तिथेच थांबले होते. त्यांचे चिरंजीव अरुण गांधी हे वयाच्या बाराव्या वर्षी जवळपास वर्षभर (1946-47) गांधीजींसोबत भारतात राहिले होते. अकरा वर्षे वयाचा छोटा अरुण दक्षिण  आफ्रिकेतील गोऱ्या व काळ्या मुलांकडून होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात ज्या प्रकारचे आक्रमक रूप धारण करीत होता  ते पाहता तो हाताबाहेर जाईल की काय, अशी भीती त्याच्या आई-वडिलांना वाटत होती आणि म्हणून त्यांनी बापूंच्या सहवासात राहण्यासाठी त्याला वर्षभरासाठी भारतात पाठवले होते. हा छोटा अरुण वर्षभरानंतर दक्षिण आफ्रिकेला परत  जाण्यासाठी निघाला तेव्हा शेवटच्या क्षणी त्याच्या हातात बापूंनी जी चिठ्ठी सरकवली, तिच्यात याच सात सामाजिक  पातकांची यादी होती.  त्या वर्षभरात बापूंच्या सहवासात राहून दक्षिण आफ्रिकेत परतलेला अरुण अंतर्बाह्य बदलून गेला होता. नंतर तिथेच  पुढील दहा वर्षे वास्तव्य करून, तरुण अवस्थेतील अरुण भारतात आला. 

पुढील तीन दशके त्यांनी ‘द टाइम्स ऑफ  इंडिया’मध्ये पत्रकारिता केली. त्यानंतर ते अमेरिकेत स्थायिक झाले. गांधीजींची मूलतत्त्वे प्रसारित करण्यासाठी त्यानंतर  ते कार्यरत राहिले. सर्वाधिक तळाच्या घटकांसाठी किंवा ज्यांचे कोणी नाही त्यांच्यासाठी ते काम करीत आहेत,  यात सर्व काही आले. त्या एक वर्षांच्या वास्तव्याचा नेमका काय परिणाम त्यांच्यावर झाला,  याची झलक दाखवणारी दोन  छोटी इंग्रजी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. ‘लीगसी ऑफ लव्ह’ आणि ‘गिफ्ट ऑफ अँगर.’  यातील पहिल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद साधना प्रकाशनाकडून गेल्या वर्षी ‘वारसा प्रेमाचा’ या नावाने आला आहे,  त्याचे प्रकाशन अरुण गांधी  यांच्याच हस्ते कोल्हापुरात केले. दुसऱ्या पुस्तकाचा अनुवाद येत्या 2 ऑक्टोबरला येत आहे. (दोन्ही पुस्तकांचे अनुवाद  सोनाली नवांगुळ.)  बापूंचा वारसा सांगणाऱ्या अरुण गांधी यांना ती सात सामाजिक पातके सर्व समस्यांच्या मुळाशी आहेत असे आजही  वाटते. एवढेच नाही तर,  त्यात त्यांनी स्वत:च्या अनुभवानंतर आठव्या पातकाची भर त्या यादीत टाकली आहे.  जबाबदारीशिवाय अधिकार (rights without responsibilities) हेच ते आठवे पातक. त्यांच्या मतानुसार हे पातक  आजच्या काळात म्हणजे एकविसाव्या शतकाच्या पहिल्या-दुसऱ्या दशकात कधी नव्हे इतके वाढले आहे. अर्थातच, म.गांधींनी जसे सात पातकांचे स्पष्टीकरण देणे टाळले आहे,  तसेच अरुण गांधी यांनीही आठव्या पातकाचे अधिक स्पष्टीकरण दिलेले नाही. याचा अर्थ हे आठवे पातकही केवळ विचाराच्या पातळीवर समजून घेणे पुरेसे नसून, तेसुध्दा  हृदयात पाझरले पाहिजे !

आता या सात-आठ सामाजिक पातकांवर नजर टाकली आणि कोणते यातील सर्वाधिक नुकसान करणारे आहे,  असा प्रश्न विचारला तर कोणाही व्यापक व सखोल विचार करणाऱ्या माणसाला पटकन्‌ उत्तर देता येणे अवघड जाईल. कारण ती परस्परांशी इतकी निगडित आहेत,  की त्यांना अलग-अलग करताच येणार नाही. ती पूर्णत: एकजिनसी आहेत  वा अविभाज्य आहेत असेही म्हणता येईल.  मात्र या सात सामाजिक पातकांची स्पष्टीकरणे वेगवेगळ्या क्षेत्रांतील अनेक लहान-थोरांनी देण्याचा प्रयत्न केलेला  आहे. त्यातील एक मोठे उदाहरण म्हणजे 1990 मध्ये आलेल्या स्टिफन कोवे यांच्या ‘सेव्हन हॅबिट्‌स ऑफ हायली  इफेक्टिव्ह पीपल’  या पुस्तकातील सातवे प्रकरण. त्यात त्यांनी व्यक्तिगत व सार्वजनिक,  नैसर्गिक की राजकीय- सामाजिक या मुद्यांना स्पर्श केलेला आहे. अलीकडच्या काळात विजय ग्रोवर या प्राध्यापकाने लिहिलेल्या निबंधात  (पेपर) असे मांडण्याचा प्रयत्न केला आहे की, या सातपैकी चारित्र्याविना शिक्षण/ज्ञान (knowledge or education without character) हे पातक जास्त नुकसान करणारे आहे.  एवढेच नाही तर,  हे पातक कमी करता आले तरच उर्वरित  सहा पातके कमी करण्याच्या दिशेने प्रगती करता येईल, असेही त्यांचे मध्यवर्ती प्रतिपादन आहे. अर्थातच, यावर बरीच  मतमतांतरे व्यक्त होतील. मात्र त्या दिशेने अधिक काम करणे गरजेचे आहे, ते काम तुलनेने सोपे आहे,  तसे करणे हा  त्यातल्या त्यात जवळचा मार्ग ठरू शकतो याबाबत सर्वसाधारण सहमती होऊ शकेल.  

मागील वर्षभर गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त अनेक प्रकारचे कार्यक्रम व उपक्रम देशभर विविध संस्था व  संघटना यांच्याकडून झाले आहेत. त्यामध्ये उत्सवप्रियता आणि अधिक मुळाशी जाण्याचा प्रयत्न कमी दिसला तरी  त्यामुळे वातावरणनिर्मितीला चांगलाच उपयोग झाला. मात्र त्या सर्व प्रक्रियेत गांधीजींचा शिक्षणविषयक विचार फार कुठे  प्रकर्षाने अधोरेखित झालेला नाही. शिक्षणाबाबत गांधीजींनी अधिक सविस्तर मांडणी केल्याचे दिसत नसले तरी,  प्रत्यक्ष  कामातून सिध्दांत विकसित करणे आणि सिध्दांतांमधून प्रत्यक्ष कामातील कौशल्य विकसित करणे,  हा गाभाघटक मात्र  पुढे घेऊन जाण्याची गरज पूर्वी कधी नव्हे इतकी आज जाणवते आहे. त्या गाभाघटकाला हात घातला,  तर आणि तरच  बेरोजगारीच्या समस्येला भिडता येईल. मग चारित्र्याविना शिक्षण/ज्ञान हे पापकर्म कमी होण्याच्या दिशेने पावले टाकता  येतील. आणि मग उर्वरित सहा (अरुण गांधींनी सांगितलेले गृहित धरले तर सात) पापकर्मे कमी होऊ लागतील. गांधी 150 नंतर आलेल्या 30 जानेवारीच्या निमित्ताने संदेश घ्यायचा आहे तो हाच ! 
 

Tags: संपादकीय sampadkiy editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात