नवऱ्याच्या पावलावर पावले टाकत त्याच्या मागे चालणारी, त्यात धन्यता मानणारी स्त्री, पुरुषी मानसिकतेला आजही भावते. 'दुर्गा' आणि 'काली' अशा उग्र मातृदेवता पुजणाऱ्या समाजात आदर्श मात्र याच पारंपरिक स्त्रिया ठरवल्या जातात, तेव्हा नातेसंबंधाचा एकूणच सामाजिक पोत खालावतो आणि राजकीय संस्कृतीची घसरण होत जाते, याची उदाहरणं आज पावलोपावली ठिकठिकाणी दिसतात. आजची राजकीय संस्कृती स्वतः बुवा-बाबांच्या भजनी लागलेली दिसते. किमान तर्काचासुद्धा तिच्यात अभाव दिसतो. अंधश्रद्धांमधून येणाऱ्या प्रथा-परंपरा अट्टाहासाने राबवणाऱ्यांना सत्ताधारीच अभय देताना दिसतात.
साधनाताई-बाबा आमटे स्मृती सहजीवनगौरव पुरस्कार आम्हाला जाहीर झाला तेव्हा आम्ही दोघेही संकोचून गेलो. साहित्य क्षेत्रात काम करत असताना काही सामाजिक उपक्रमांना थोडाफार हातभार लावणे आणि अशा क्षेत्रात काम करणाऱ्यांबद्दल आदरभाव बाळगणे एवढं सोडलं, तर आम्ही या संदर्भात काही काम केलेलं नाही. त्यामुळे आम्ही साधना सेवाभावी संस्थेचे सचिव आणि इतरही संस्थांमध्ये कार्यरत असणारे श्री. दगडू लोमटे यांच्याशी चर्चा करून, आमच्या भावना त्यांच्या कानावर घातल्या. पण त्यावर त्यांनी सांगितलेली कारणं नवी, वेगळी होती. बाबा आमटे यांची साहित्यसंपदा, ते करीत असलेल्या अनेक कामांत थोडी मागे राहून गेल्याची खंत या संस्थेला होती. त्यामुळे विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या साथींना, 'साधनाताई आणि बाबा आमटे सहजीवन पुरस्कारा'ने सन्मानित करण्याची त्यांची इच्छा होती. या पुरस्काराची सुरुवात ते आमच्यापासून करत आहेत आणि निवड समितीने आम्हा दोघांची शिफारस केल्याचे त्यांनी सांगितले.
हा कार्यक्रम आनंदवनात होणार आहे हे कळाल्याने आनंद झाला. खूपदा आपल्या मनात काही स्थळांना एक वेगळी जागा असते. कधीतरी आपण तिथे जरूर जाऊ असं स्वतःलाच आपण सांगत राहतो. माझ्या मनातही अशा काही जागा दीर्घकाळापासून आहेत. ज्यांच्याबद्दल माझ्या मनात कुतूहल, आदर, प्रेम आणि सन्मानाची भावना आहे. त्यातल्या दोन ठिकाणी मी जाऊन आले आहे. 'सेवाग्राम' ही जागा घडून गेलेल्या नव्हे घडवलेल्या इतिहासाचे स्मृतिस्थळ आहे. आजही हजारो लोकांना हे स्थळ प्रेरणा देते. तुमचा विवेक आणि विचार जागा असेल तर तुम्ही तिथे आपोआप नम्र होता. कसल्या तरी हुरहुरीने बेचैन होता, निदान मी झाले. मूकपणाने तो सर्व परिसर मी पाहत फिरले आणि त्या महामानवाची पावलं इथे उमटली होती या कल्पनेने भारावून गेले. तो महामानव आज आमच्या सत्ताधीशांसाठी उपेक्षेचा विषय ठरला आहे.
कधीतरी मी शांतीनिकेतनालाही जाईन असं अनेक वर्षांपासून ठरवत होते. तिथेपण एकदा जाणं झालं आणि त्या आनंदाने मन भरून गेलं. बंगाली लोकांनी रवींद्रनाथांना एका अलौकिक उंचीवर नेऊन ठेवलं आहे. त्यांचे वाङ्गयीन आणि सांस्कृतिक कार्यक्रम रवींद्रनाथांच्या नावाशिवाय सुरू होत नाहीत. आमच्या भाषेतही अशी मोठी नावं आहेत, त्यांचं काम आहे. पण ती उपेक्षित राहिली आहेत. मुख्य म्हणजे आमच्या शासनाला आणि लोकांना, अगदी साहित्यिकांनाही विस्मरणाचा मोठाच आजार असल्याने, अशा आघाड्यांवर सामसूम आहे. अलीकडे आमचं शासन विश्व संमेलन नावाची जत्रा भरवत असतं. त्यात साहित्यिक, म्हणजे गंभीर, दर्जेदार लेखकांचा संपूर्ण अभाव असतो आणि गांभीर्य काय असतं हे शासनाला माहीतही नसतं. दिवसेंदिवस अशा सर्वच गोष्टी सुमाराहून सुमार होत जाताना आपण पाहतो आहोत.
'आनंदवन' ही माझ्यासाठी आणखी एक मनातली जागा होती, जिथं जाण्यासाठी मी उत्सुक होते पण ते जमत नव्हतं. आज मी आनंदवनात त्यांच्या नावाचा पुरस्कार घेण्यासाठी उभी आहे, ही माझ्यासाठी अतिशय सन्मानाची गोष्ट आहे.
मात्र आदरणीय बाबा आमटे यांच्या साहित्याची मला पुरेशी ओळख नाही. मी वाचलेलं त्यांचं पहिलं पुस्तक म्हणजे, 'ज्वाला आणि फुले' हा कवितासंग्रह. मी नुकतीच लिहायला लागले होते आणि अनेक गोष्टींनी प्रभावित व्हायचं ते वय होतं. हा संग्रह, त्यातली भाषा, आशय माझ्या समजेच्या पलीकडे होता. पण तो मी पुन्हा पुन्हा वाचला. एखाद्या वादळात सापडावं तसा तो अनुभव होता. दीर्घकाळ तो माझ्या लक्षात राहिला. त्यातली 'मी जवाहरलाल' ही कविता तर मला आजही आठवते. हे सर्व आठवताना आज मन खिन्न होतं. बाबांच्या आणि आपल्याही आदराच्या अनेक नावांना आज कसर लागली आहे आणि केवळ उपेक्षाच नव्हे तर या महनीय व्यक्तींभोवती ते देशद्रोही होते असे वातावरण निर्माण केले जाते आहे. बिचाऱ्या नेहरूंचे अपराध तर संपताना दिसतच नाहीत. आता फक्त 'दुष्काळ' किंवा 'अतिवृष्टी' हीसुद्धा नेहरूंच्या पापाची फळं आहेत एवढंच ऐकू येणं बाकी राहिलं आहे.
आपण बघतो की, देशभरात अनेक सामाजिक संस्था दीर्घकाळापासून काम करतात. वेगवेगळे उपक्रम राबवतात. अशा संस्थांचं प्रमाण कमी असेल पण त्या सामाजिक कामं करताना दिसतात. 'आनंदवना' पासून स्फूर्ती घेऊनही ठिकठिकाणी बऱ्याच संस्था स्थापन झाल्या आहेत, स्थापन होत आहेत. 'आनंदवन', 'हेमलकसा', 'लोकबिरादरी' यांना आजही तोड नाही. मुळात बाबांचा कुष्ठरोग्यांसाठी काम करण्याचा वसा हेच एक अद्भुत कर्म होतं. जात, पात, धर्म या समाजाच्या मनात ठाण मांडून असलेल्या गोष्टींपासून त्यांनी स्वतःला नेहमी दूर ठेवलं. कुष्ठरोग्यांना भिकारी म्हणून जेवायला घालणाऱ्यांच्या पंक्तीत बाबा स्वतः जाऊन बसले. समाजाने उकिरड्यावर फेकलेल्यांना माया दिली, प्रेम दिलं. मुख्य म्हणजे स्वावलंबन शिकवलं. त्यांचा आत्मसन्मान जागवला. 'जमीनदार घराणे' आणि 'ब्राह्मण्य' या दोन्ही दंभांचा त्यांनी स्वतःला संसर्ग होऊ दिला नाही. प्रसंगी कुष्ठरोगाची लस टोचून घेण्याची तयारी दाखवली. काळाच्या पटावर पाहता ही गोष्ट अशक्यप्राय वाटावी अशी होती. त्यांनी सुखासीन आयुष्याचा आणि उच्चवर्णीय व्यवस्थेचा त्याग केला आणि फिरून तिकडे पाहिले नाही. महात्मा गांधी, विनोबाजी, साने गुरुजी, येशू ख्रिस्त हे त्यांचे आदर्श होते. त्यामुळे आपला धर्म, आपली जात, आपली प्रतिष्ठा आणि आपली मालगुजारी त्यांनी मनाबाहेर व अंगाबाहेर टाकली. ज्याला घरात पाणी द्यायलाही नोकरचाकर होते, त्याने अपरिमित कष्ट उपसले आणि कुष्ठरोग्यांच्या जखमा साफ केल्या. विचार केला तर आपली मती गुंग होते.
या पार्श्वभूमीवर मला आठवण होतेय ती धोंडो केशव कर्वे यांनी काढलेल्या विधवा व परित्यक्त्या स्त्रियांच्या अनाथ आश्रमाची. विधवा ब्राह्मण स्त्रियांसाठी तो आश्रम चालवला जाई. या बाबतीतला विठ्ठल रामजी शिंदे यांनी नोंदवलेला एक प्रसंग कर्वे यांच्या मानसिकतेवर तर प्रकाश टाकतोच, पण बाबा आमटेंसारख्या माणसाचे मोठेपणही लखलखीतपणे अधोरेखित करतो. आपल्या विधवा बहिणीला, जनाक्काला त्या आश्रमात ठेवून घेण्याची विनंती महर्षी शिंदे यांनी कर्वे यांना केली होती. परंतु कर्वे यांनी तिला ठेवून घ्यायला नकार दिला होता. तो नुसता नकार नव्हता, त्या नकारात एक वेगळी मानसिकता होती. ते म्हणाले होते की, 'ब्राह्मण स्त्रिया काय कमी आहेत म्हणून तुमच्या बहिणीला मी इथे ठेवून घेऊ?' हे वाचून पहिल्यांदा मला वाईट वाटले होते, पण विचार केल्यावर लक्षात आले की, मोठ्या माणसांचे पायही खूपदा मातीचेच असतात. त्यात आपल्याला काही करता येत नाही. पण त्यांचं 'खुजेपण' या ना त्या कारणाने आपल्याला खुपत राहतं एवढंच. अर्थात त्यामुळे त्यांनी केलेल्या कामाचं महत्त्व कमी होत नाही हेपण तितकंच खरं आहे.
बाबांनीही असाच वसा घेतला. एक ध्यासच घेतला. 'आनंदवन' नाव देऊन खडकाळ कोरड्या मातीत हिरवाई आणली. हजारो हात त्यासाठी आणि स्वतःसाठीही राबले. पण बाबा एवढ्यावर थांबणार नव्हतेच. त्यांनी काही काळाने 'हेमलकसा' इथेही काम करण्याचा निर्णय घेतला. हे आनंदवनापेक्षाही मोठं आव्हान होतं. घनदाट जंगल, प्रचंड पाऊस, रोजच्या जगापासून काही शतकं मागे असलेले आणि आपल्या चालीरितींबाबत हट्टी, चिवट असलेले आदिवासी यांच्याशी व डास, साप, विंचू आणि हिंस्र प्राणी यांच्याशी सामना करायचा होता. पदोपदी जीव तळहातावर घेऊन काम करायचे होते. खडतर वातावरणात मोठ्या झालेल्या बाबांच्या मुलाने शिकून सवरून तोच वारसा पुढे चालवला. आनंदवनाचे काम विकास आमट्यांनी पुढे नेले, आणि हेमलकसा, लोकबिरादरी डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदा आमटे आणि त्यांचे मूठभर जिद्दी सहकारी यांनी हा वसा घेतला. त्यांचे 'प्रकाश वाटा' हे पुस्तक वाचताना डोळे ओलावतात. आदिवासींनी बदलास नकार तर दिलाच होता, पण 'आम्ही आमच्यासाठी तुम्हाला बोलावलं नव्हतं' असं स्वच्छ सांगितलं होतं. प्रकाश म्हणतात की, "ते खरंच बोलत होते. आम्हीच स्वतःहून आलो होतो आणि आम्हाला अनेक गोष्टी शिकाव्या लागणार होत्या." आदिवासींनी आपल्याला 'निरपेक्षता' शिकवली असं ते गौरवाने सांगतात. परवा त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार घेताना पाहून अशा अनेक गोष्टी आठवल्या.
बाबा बाहेर पडले आणि त्यांनी डॉ. विकास आमटे यांच्याकडे आनंदवनाची सर्व सूत्रे सोपवली. डॉ. विकास हे आधीपासूनच तिथे काम करीत होते. तेव्हा आनंदवनाची ओळख जरी निर्माण झालेली असली तरी, त्यांच्यापुढची आव्हानं कमी नव्हती. आनंदवन काही नुसतं कुष्ठरोग्यांसाठीच चालवलं जात नव्हतं. डॉ. विकास आमटे आणि डॉ. भारती आमटे यांनी शेती, पर्यावरण, शिक्षण, रोजगार अशा अनेक क्षेत्रांत नवे नवे प्रयोग केले. बाबांच्या स्वप्नांना त्यांनी प्रत्यक्षात उतरवलं. ह्या दोन्ही भावांनी बाबांबरोबर आणि त्यांच्या माघारी केलेलं हे डोंगराएवढं काम ही उभ्या देशाला प्रेरणा देणारी गोष्ट आहे. विकास आमटे म्हणतात तसं, 'उपेक्षितांना अंधारातून उजेडाकडे आणणं आणि नव्या नव्या अंधाऱ्या कोपऱ्यांचा शोध घेत राहणं' ही प्रेरणा ह्या सर्व कामांमध्ये आहे.
स्वस्थता माहीत नसलेले बाबा एक दिवस अचानक आनंदवन, हेमलकसा, लोकबिरादरी, सोमनाथ या प्रकल्पांच्या कामातून बाहेर पडले आणि नर्मदा आंदोलनात सामील झाले. मात्र या आंदोलनाकडे आणि धरणामुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांकडे केंद्र आणि राज्य सरकारांनी साफ दुर्लक्ष केले. मला वाटतं, जनआंदोलनांकडे उपेक्षेने पाहण्याची आणि ते दडपण्याची सुरुवात एक प्रकारे नर्मदा आंदोलनानंतर तीव्रतर होत गेली आहे. इतक्या संवेदनशील जनआंदोलनाला बाबांनी उतारवयातली दहा वर्षे दिली. त्यांची ती एकाकी साधना आपल्याला गलबलून टाकते. मात्र आपल्या मुला-नातवंडांनी आपलं काम पुढे नेताना त्यांना पाहता आलं, ही खूप समाधानाची गोष्ट.
आज या निमित्तानं साधनाताईंवर बोलायचं तर थोडंथोडकं नव्हे तर शंभर-दीडशे वर्षे मागे जावं लागेल. अतिशय पारंपरिक आणि टोकाच्या पुरुषप्रधान समाजात जगणाऱ्या इथल्या स्त्रियांनी, वेगवेगळ्या क्षेत्रांत जो इतिहास घडवला, तो थक्क करून टाकणारा आहे. म. ज्योतीराव फुले यांनी सावित्रीबाईंना शिकवून सामाजिक लढ्यात उतरवले. ताराबाई शिंदे यांनी त्या काळात 'स्त्री-पुरुष तुलना' करत अनेक अर्थांनी पुरुषप्रधान सत्तेला आव्हान दिले. तर 'मला हे लग्न मान्य नाही' असे म्हणत रखमाबाई राऊत यांनी बालवयात आपल्या मर्जीविरुद्ध झालेले लग्न मोडण्यासाठी पार इंग्लंडपर्यंत लढा दिला. त्यासाठी कारावास भोगला. डॉ. आनंदीबाई जोशी, लक्ष्मीबाई टिळक, कस्तुरबा गांधी, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, र. धों. कर्वे यांच्या पत्नी मालतीबाई अशी अनेक नावं आहेत, ज्यांनी परंपरेविरुद्ध लढा दिला. साधनाताई आमटे यांना मी याच रांगेत अग्रक्रमाने बसवेन. कस्तुरबा गांधी, लक्ष्मीबाई टिळक आणि साधनाताई यांचा संघर्ष थोडा वेगळा होता. समाजसेवा, राजकारण, अस्पृश्यता निवारण, धर्मपरिवर्तन अशा अनेक आघाड्यांवर त्यांच्या पतींचा लढा सुरू होता. जगावेगळ्या पतीच्या पावलांवर पाऊल ठेवून चालणं, त्याने निवडलेलं जग आपलंसं करणं, ते उन्नत करणं हे डोंगराएवढं काम त्यांनी केलं. या तिन्ही स्त्रिया आपल्या नवऱ्याच्या भूमिकेतून स्वतःकडे पाहायला शिकल्या आणि अनेकदा त्यांच्याही पुढे निघून गेल्या. समाजाने दिलेले व्यवहारज्ञान, निसर्गाने मूलतःच दिलेली समज आणि बाई म्हणून अंगभूतच असलेली स्वीकारशीलता आपल्या जगण्यात त्यांनी कामी आणली. नवऱ्याच्या स्वप्नांना बळ दिले आणि खांद्याला खांदा लावून वाटचाल केली. या वाटचालीत राग-लोभ, समज-गैरसमज होते. प्रसंगी विरोध होता. एखादी न पटलेली गोष्ट नाकारण्याचा ठामपणा होता. पण मुख्य म्हणजे समजूत होती, स्त्री-पुरुष नात्यामधला विश्वास होता. पतीच्या पावलावर पाऊल टाकत चालणं, त्याच्याबरोबर वनवास स्वीकारणं ही रीत भारतीय परंपरेत नवी नाही. मात्र या तिन्ही स्त्रिया समर्पणभावाने नवऱ्यामागे उभ्या राहिल्या तरी त्यांचं समर्पण डोळस होतं. आपल्या पुरुषाच्या मागे अंधारातली सावली होऊन राहताना ह्या स्त्रिया, स्मरणशील नसलेल्या इथल्या समाजाच्या जाणिवेनेणिवेतून पुसूनही गेल्या असत्या. पण आपल्या स्वयंभू तेजाने त्यांनी आसमंत भरून टाकला आहे.
वेदविद्यासंपन्न पण सनातन, कर्मठ आचारविचार पाळणाऱ्या सुखवस्तू घरातून साधनाताई बाबांच्या आयुष्यात आल्या. घरचा विरोध असताना त्यांनी हे नातं स्वीकारलं आणि निष्ठेने आयुष्यभर निभावलं. आपल्या जमीनदार घराण्याचा वारसा बाजूला ठेवून बाबा काहीतरी वेगळं करू पाहत होते. ते अनेक गोष्टींनी भारलेले होते. त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी काम करायचं ठरवलं तेव्हाची साधनाताईंची मनःस्थिती आणि विचार त्यांच्या आत्मचरित्रात नोंदवलेले नाहीत. मात्र अशा सुखवस्तू घरातून आलेल्या मुलीसाठी बाबांचा तो निर्णय तिचं आयुष्य बदलून टाकणारा होता. त्यांचं तिथून पुढचं सर्व आयुष्य अनेक अर्थांनी विलक्षण होतं. मात्र त्यांनी नुसतं निष्ठेनं नव्हे तर पूर्ण मनापासून बाबांना साथ दिली. अनेक अभावातून वाट काढताना त्यांना आपल्या मुलांसाठी थोडी खंत वाटली तेवढीच. पण अतिशय शांतपणाने आणि निरपेक्षपणाने हे व्रत त्यांनी पार पाडलेलं आपण पाहिलं, वाचलेलं आहे. नतमस्तक व्हावं, नम्र व्हावं असाच हा प्रवास आहे.
बाबांनी कुष्ठरोग्यांसाठी 'आनंदवन' ही सेवाभावी संस्था स्थापन केली. त्यासोबतच मूक, बधिर, अंध, दिव्यांग आणि आदिवासी समाजातल्या बेदखल लोकांना जवळ केले. आरोग्य, शिक्षण प्रशिक्षण, पुनर्वसन आणि रोजगार अशा अनेक पातळ्यांवर काम केले. या सर्व कामांत साधनाताई त्यांच्या सोबत होत्या. समाजाने वाळीत टाकलेल्या वंचितांसाठी दोघांनी आयुष्य खर्च केले. स्वप्नांची, आत्मसन्मानाची फुलपाखरं त्यांच्या अंगाखांद्यावर बसवली.
मित्रांनो, मोठी माणसं इतिहास बदलतात आणि घडवतातसुद्धा. मी इथं जे बोलते आहे, त्या गोष्टी सगळ्यांनाच माहीत आहेत, याची मला नम्र जाणीव आहे. पण माझं बोलणं हे कदाचित त्या घडलेल्या इतिहासाचं, त्यात झोकून दिलेल्या मनांचं, अपार कष्टांचं, एक प्रकारे पुनर्वाचन आहे एवढंच मी म्हणेन.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं एक वेगळं वैशिष्ट्य होतं. पुरुषांच्या सहचरी म्हणून स्त्रिया प्रगल्भ साथ कशा देतील याचा विचार राजकीय व सामाजिक विचारांच्या जोडीने झाला. स्त्रियांची साथ सहजीवनाला समृद्ध कशी करेल याचा विचार करणारे विचारवंत इथे झाले. म.फुले, आगरकर, महर्षी कर्वे, महर्षी शिंदे, गांधीजी, आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता या मूल्यांच्या जोडीने स्त्रियांना एक व्यक्ती म्हणून स्थान प्राप्त व्हावं असाही विचार केला. त्यामुळे वेळप्रसंगी नवऱ्यांना प्रश्न विचारणाऱ्या, विरोध करणाऱ्या, स्वतःच्या विचारांनी कृतीशील होणाऱ्या स्त्रियाही त्या काळात दिसून येतात आणि त्यांची चिकित्सक साथ स्वीकारणारे नवरेही दिसतात. मात्र समाजात या गोष्टी आजही अपवाद म्हणूनच आहेत. नवऱ्याच्या पावलावर पावले टाकत त्याच्या मागे चालणारी, त्यात धन्यता मानणारी स्त्री, पुरुषी मानसिकतेला आजही भावते. 'दुर्गा' आणि 'काली' अशा उग्र मातृदेवता पुजणाऱ्या समाजात आदर्श मात्र याच पारंपरिक स्त्रिया ठरवल्या जातात, तेव्हा नातेसंबंधाचा एकूणच सामाजिक पोत खालावतो आणि राजकीय संस्कृतीची घसरण होत जाते, याची उदाहरणं आज पावलोपावली ठिकठिकाणी दिसतात. आजची राजकीय संस्कृती स्वतः बुवा-बाबांच्या भजनी लागलेली दिसते. किमान तर्काचासुद्धा तिच्यात अभाव दिसतो. अंधश्रद्धांमधून येणाऱ्या प्रथा-परंपरांना, त्या प्रथा-परंपरा अट्टाहासाने राबवणाऱ्यांना सत्ताधारीच अभय देताना दिसतात. विज्ञाननिष्ठा, सारासार विचार आणि त्यातून कृती करण्याची मानसिकता नसल्यामुळे स्त्री-पुरुष टोकाचे साचेबद्ध आणि विवेकहीन होत जातात. सगळा समाजच अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकतो. यातही पुन्हा स्त्रियाच मोठ्या प्रमाणात बळी जातात, हे आसाराम बापू, रामरहीम किंवा अशोक खरात यांच्यासारख्या अनेकांनी घडवलेल्या घटनांमधून अधोरेखित होत राहते. अशा भोंदू लोकांच्या भक्तामध्ये राजकारणी लोकांपासून डॉक्टर, इंजिनिअर, वकील, प्राध्यापक अशी समाजातली वरच्या स्तरावर काम करणारी माणसंही असतात. हे पाहून येणारा मनस्ताप आणि खंत सांगता येत नाही एवढी मोठी असते.
थोडं आत्मपरीक्षण केलं आणि आपला भोवताल नीट पाहिला, तर या सर्व गोष्टी आजच्या बदलत्या वास्तवात खऱ्या वाटणार नाहीत अशा आहेत. एकीकडे अर्धाकच्चा आधुनिक जगण्याचा सोस आणि दुसरीकडे मध्ययुगात सामावून जातील अशा जगण्याच्या प्रेरणा, आपण कुठे आहोत याचं भान नाहीसं करतात. टोकाचा आत्मकेंद्रित, स्वार्थी विचार आणि कृतींमुळे आदर्शाच्या, समाजभानाच्या व्याख्याही बदलल्या आहेत. काही एक मूल्यभान ठेवून विवेकाने, विचाराने जगणारी माणसंही दिसेनाशी झाली आहेत. त्या जोडीला सामुदायिक शहाणिवेची जी व्यापक जाणीव समाजमनाला असायला हवी, ती या पाच-पंधरा वर्षांत अनेक कारणांनी नष्ट झालेली आहे. त्याची जागा उन्मादी धर्मांधता, तीव्र जातिवाद, द्वेष आणि टोकाची संकुचित कट्टर विचारधारा यांनी घेतलेली आहे. 'बुलडोझर' संस्कृती देशभर झपाट्याने पसरते आहे.
लोकशाहीचे फायदे घेऊन सत्तेत आलेली आणि लोकशाहीसह अनेक गोष्टी मोडीत काढून अदृश्य हुकूमशाही राबवणारी आजची राजसत्ता सामान्य माणसाचं जगणं नुसतं अवघडच करत नाही; तर नष्ट करतेय. विश्वास ठेवावा असं राजकारण, समाजकारण, संस्थात्मक कार्य, माध्यमं, न्यायालये ह्या व अशा ठिकाणी सामान्य माणसाला कुठेही पाय टेकावा एवढीही जागा दिसत नाही/उपलब्ध होत नाही. विश्वासाच्या, भरवशाच्या, खात्रीच्या जागा, ठिकाणं नष्ट होताना दिसताहेत. एक काल्पनिक शत्रू निर्माण करायचा, द्वेषाला, उन्मादाला, धार्मिक भावनेला खतपाणी घालायचं, त्याचा निःपात करण्याची भडक भाषा वापरायची आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या कुठल्याच परिस्थितीची जबाबदारी मात्र घ्यायची नाही. असंस्कृत, असभ्य, राऊडी असण्याचा दिमाख दाखवायचा, हे सर्व संस्कृती रक्षणासाठीच केले जात आहे अशी शेखी मिरवायची, एवढंच चित्र सगळीकडे दिसतं. निवडणूक काळात रेवड्या वाटून झाल्या की, पंतप्रधान देशभर निरनिराळ्या आश्वासनांचे 'बुड्ढी के बाल' वाटत फिरतात. आपण फकीर आदमी आहोत, झोळी उचलून कधीही इथून चालू लागू अशी भावनात्मक साखरपेरणी करतात. त्यांचे विचारहीन भक्त पुन्हा पुन्हा गलबलून भक्तिभावाने त्यांचे गोडवे गात राहतात.
आज देशभरात सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, आर्थिक विषमता, बेरोजगारी, पर्यावरणाचा ऱ्हास अशा कुठल्याही गोष्टींवर पुरेशी चर्चा होत नाही, किंबहुना अशा गोष्टींवर किंवा संबंधित लोकांवर बोलणं हे देशद्रोही असल्याचं लक्षण मानलं जातं. सर्व प्रकारची माध्यमं, माणसं महत्त्वाच्या प्रश्नांपासून दूर कशी राहतील आणि निरर्थक गोष्टी महत्त्वाच्या कशा ठरतील याची काळजी घेतली जाते. सर्वांत भीतिदायक गोष्ट म्हणजे न्यायच पांगळा झालाय. पोलिसांची भूमिका तर नेहमीच सत्ताधार्जिणी असते. सामान्य माणसं न्यायावर, न्यायालयांवर विश्वास ठेवतात. पण लोकशाहीचा हा खांब आतून पोखरला गेला आहे. आपल्या कक्षेबाहेर जाऊन न्यायालये सामान्यांची पर्वा न करता संशयास्पद निकाल देतात, तशी थेट विधानं करतात. मागच्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी केलेलं विधान सर्वसामान्यांच्या आणि बेरोजगार युवकांच्या आत्मसन्मानाला मातीत मिळवणारं होतं. ज्या व्यवस्थेनं आणि सत्तेनं त्या बेरोजगारांवर, विस्थापितांवर ही वेळ आणली आहे त्याबद्दलही ते काही बोलले असते तर ती टिप्पणी किमान सत्याच्या जवळ गेली असती.
मला तीन-चार वर्षांपूर्वीची एक घटना आठवतेय. कुणावर तरी बलात्काराचा आरोप करणाऱ्या एका महिलेला 'मंगळाचा दोष' आहे का हे तपासण्याचा आदेश अलाहाबाद हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी लखनऊ विद्यापीठाच्या 'ज्योतिष शास्त्र' विभागाच्या प्रमुखांना दिला होता. या आदेशाला स्थगिती दिली गेली खरी, पण त्यासोबतच बुद्धी, भावना, विचार, सामाजिक न्याय या सगळ्याच गोष्टींना स्थगिती दिली गेली असं मला तीव्रतेने वाटत राहिलं. 'अल्पवयीन मुलीचे स्तन धरणे, तिच्या सलवारीची नाडी सोडणे या गोष्टी विनयभंगाच्या असल्या तरी त्यांतून बलात्काराचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद किंवा सिद्ध होत नाही' अशी अत्यंत शरमेची कॉमेंट अलाहाबादच्याच न्यायालयाने केलेली आठवते. किमान संवेदनशीलता आणि सर्व सामाजिक भान या ठिकाणी कोळून पिलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे व उच्च न्यायालयाचे निकाल म्हणजे एक प्रकारे कायदाच असतो. तो तसा बंधनकारकच असतो. निदान सामान्यांचा तसा समज असतो. पण बलात्काराच्या संबंधित कायद्याचे विश्लेषण करताना बलात्काऱ्यांना पाठीशी घालण्याचे महान काम आपण आपल्या या पद्धतीच्या 'कॉमेंट'ने करतो आहोत याचं कणभरही भान या महाशयांना नव्हतं. पोलीस गुन्हा नोंदवून घेत नव्हते म्हणून त्या मुलीची आई कोर्टात गेली होती. तेव्हा पोलीस काय, न्यायालये काय, कुठेही न्याय मिळतो असं कोणी म्हणत असेल तर त्यावर कसा विश्वास ठेवता यईल ? न्यायव्यवस्थेची सगळ्याच पातळ्यांवरची घसरण थांबवणे ही आज अत्यंत महत्त्वाची गोष्ट झाली आहे, ती तुम्हा-आम्हा सर्वांच्या हाताबाहेर आहे. 'सब का साथ सब का विकास' नावाचा 'ऑक्टोपस' येणाऱ्या पिढ्यांचा भविष्यकाळ गिळंकृत करताना दिसतो. तो पाहात राहण्यापलीकडे आपल्या हातात काहीही राहिलेले नाही, इतके आपण अगतिक आहोत.
मधल्या काळात श्री. धनंजय चंद्रचूड हे सरन्यायाधीश झाले आणि निदान महाराष्ट्रात तरी काही अपेक्षांना अंकुर फुटले. पण तिथून बसलेला फटका सामान्यांपासून ते बुद्धिवादी, विचारवंत ह्या सर्वांनाच जिव्हारी लागणारा होता. रामशास्त्री प्रभुण्यांची परंपरा सांगणारी आमची न्यायदेवता खरोखरच मुकी, आंधळी आणि बहिरी असल्याचे सर्वांनी अनुभवले. पेशवाईच्या अत्यंत अराजकाच्या काळातही प्रत्यक्ष राघोबा दादा यांना नारायण पेशवे यांच्या हत्येसाठी रामशास्त्री प्रभुणे यांनी, 'देहान्त प्रायश्चित हीच शिक्षा' असे अतिशय निर्भीडपणाने सुनावले होते.
महाराष्ट्राने दुसऱ्यांदा आशेने पाहिले ते श्री. भूषण गवई सरन्यायाधीश झाले तेव्हा. पण त्यांच्या बाबतीतही वेगळं काही घडलं नाही. निदान काही राजकीय आणि त्यामुळेच सामाजिक अशा काही प्रकरणांत त्यांच्याकडून निर्भीड व स्पष्ट निकालाची अपेक्षा होती. डॉ. आंबेडकरांचा लखलखता वारसा पाठीशी असणारे गवई नंतर गेले ते थेट बदनाम बागेश्वर शास्त्री यांच्या चरणी नम्र व्हायला ! कोणत्याही व्यक्तीला त्याचं खाजगी आयुष्य आणि श्रद्धा असाव्यातच, पण घटनात्मक पदांवर काम करणाऱ्या व्यक्तींनी सामाजिक भान ठेवून अशा बाबतीत सार्वजनिक होणं टाळलं पाहिजे. कारण त्यांच्या वागण्यातून जाणारा संदेश समाजाचं अतिशय नुकसान करणारा असतो.
आज घटनात्मक मूल्यांचा ऱ्हास कसा रोखावा एवढाच प्रश्न नाही. मानवी मूल्यंही तुडवली जाताहेत. मणीपूरसारख्या घटना देशभर या ना त्या कारणांनी घडताहेत, घडवल्या जाताहेत आणि घटनात्मक पदावर बसलेली माणसं, तिथला हिंसाचार निर्विकारपणानं पाहताहेत. आपण कुठे जातोय, काय करतोय, काय घडणार आहे याचा विचार थरकाप उडवणारा आहे.
आजच्या अशा हवालदिल करणाऱ्या काळात मी पाहिलेला एक प्रसंग सांगते आणि माझं भाषण संपवते. दीड वर्षापूर्वी दिल्ली येथे झालेल्या संमेलनाच्या काळात मी राजघाटावर गेले होते. त्या जवळजवळ निर्मनुष्य वातावरणात, रिकाम्या मनाने, खिन्न होऊन उन्हात उभी होते. थोड्या वेळाने चार-पाच वर्षांच्या मुलाला खांद्यावर घेऊन एक माणूस आला. अगदी साधा, गरीब दिसणारा. मुलाला खांद्यावरून उतरवून त्याने गांधीजींच्या समाधीला साष्टांग नमस्कार घातला. मग मुलाला जवळ घेतलं. त्याला काही सांगितलं. लेकराने बापासारखाच नमस्कार घातला आणि बापाचं बोट धरून तो उभा राहिला. ते दोघेही मूकपणे समाधीकडे पाहत होते आणि मी त्यांच्याकडे. काळोखात एखादा क्षीण प्रकाश किरण चमकावा तसं काहीसं मला वाटलं आणि माझे डोळे ओलावले. बाप-लेक काय बोलले ते कळालं नव्हतं, पण जाणवलं होतं. आपल्याला माहीत नसलेले असे असंख्य चेहराहीन, अभावग्रस्त लोक ठिकठिकाणी जोडले जावोत अशी मूक प्रार्थना मी केली. आणि अशाच लाखोंमधले आपणही एक आहोत याचं कणभर समाधान सोबत घेऊन मी परत फिरले. आजही राजघाटावरचा तो क्षण आठवतो तेव्हा मला भारून टाकतो. तुमच्या माझ्या जगात असेच लोक दिसू देत एवढंच मी म्हणते आणि तुम्हा सर्वांचे आभार मानून थांबते.
गुरुवार, 9 जुलै 2026 रोजी वरोडा, आनंदवन येथे 'साधनाताई - बाबा आमटे सहजीवन पुरस्कार' स्वीकारल्यानंतर अनुराधा पाटील यांनी केलेले भाषण
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या