डिजिटल अर्काईव्ह

लीलाताईंचा वारसा चालवणाऱ्या सुचिता पडळकर

शाळा बघत असतानाच शिट्टी वाजली. सर्वत्र शांतता पसरली. सुचिताताईंनी हातानेच खूण केली. आम्ही शांत उभे राहिलो. नंतर त्या म्हणाल्या, 'शाळेत शांततेची वेळ असते. शिट्टी वाजताच मुलं, ताई, दादा हातातलं काम थांबवून, डोळे मिटून शांत बसतात. हा दोन ते तीन मिनिटांचा कालावधी मनाला शांतता अनुभवायला शिकवतो. म्हणूनच चौथीच्या वर्गाचा 'मार्ग प्रकल्प' मार्गाचे विविध प्रकार समजून घेता घेता शांततेच्या मार्गावर येतो. गौतम बुद्धांपासून गांधीजी समजून घेत 'युद्ध नको शांतता हवी' इथपर्यंत मुलं पोहोचतात.

 

'सृजन आनंद विद्यालय' ही लीलाताई पाटील यांनी स्थापन केलेली शाळा. 2026 मध्ये विद्यालयाला भेट दिल्यावर मला मल्हारची आठवण झाली. मल्हार हा सुचिताताईंचा विद्यार्थी. लीलाताईंच्या स्मृती जागवण्यासाठी सुचिताताई आणि इतर शिक्षकांनी वर्षभर शाळेत उपक्रम घेतले होते. नोव्हेंबर 2020 मध्ये मुलांनी स्वतःच्या गोष्टींचं पुस्तक तयार करून ते लीलाताईंना अर्पण करायचा उपक्रम घेतला. मुलांनी लीलाताईंसारखं लेखक व्हावं म्हणून ही कल्पना. 80 मुलांची 80 पुस्तकं तयार झाली. त्यातील निवडक पुस्तकांचं वाचन करून शाळेतच मूळ स्वरूपात प्रकाशन केलं. त्यामध्ये मल्हारचं चित्र आणि गोष्ट असलेलं पुस्तक होतं. आम्ही सृजन प्रकाशनामार्फत 'मल्हारच्या गोष्टी' या नावानं ते पुस्तक प्रकाशित केलं. या निमित्ताने सुचिताताईंचा स्नेह अधिक दृढ झाला.

सुचिताताई सांगत होत्या, 'शिक्षण प्रवासाचा आरंभबिंदू म्हणजे कुतूहल. समाज आणि निसर्ग यांच्या ओळखीतून अनुभवजन्य ज्ञान मिळतं. प्रश्नांची मार्गदर्शी उत्तरं शोधण्याची क्षमता शिक्षणातून विकसित करता येते. शोधाचे मूळ माणसाच्या 'कल्पनेत' आहे. कला व वृत्तीचा विकास, नागरिक म्हणून हक्क आणि जबाबदाऱ्यांची जाणीव, मुलांच्या व्यक्तिमत्त्वात ज्ञानासोबत आनंद, प्रेम, शांती, करुणा आणि क्षमाशीलतेची पेरणी, डोळसपणे समतेची शिकवण देत संविधानाला अभिप्रेत असलेल्या लोकशाहीसाठी नागरिक घडवणे, हे हेतू सतत डोळ्यासमोर असतात.'

या वर्षी चौथीच्या वर्गाला, 'शाहू महाराजांमुळे कोल्हापूरमध्ये औद्योगिक प्रगती झाली, कारखाने आणि फाउंड्री उभी केली', हे सांगितलं गेलं. ते सांगताना 'सर्व धातू वितळतात' हे वाक्य आलं. धातू कसे वितळतात हे दाखवण्यासाठी मुलांना फाउंड्री दाखवली. मुलांना धातूमध्ये रस निर्माण झाला. त्यांनी प्रश्न विचारले. प्रश्न विचारण्यासाठी अनुभव घ्यावा लागतो. मग कुतूहल निर्माण होतं. मुलांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं शिक्षकांना येत नव्हती. म्हणून कोल्हापूरमधील पहिल्या मेट्रोलॉजिस्ट नलिनी नेणे यांना शाळेत बोलावलं. त्यांनी मुलांच्या प्रश्नांची उत्तरं दिली.

तिसरीच्या वर्गातील मुलांनी त्यांनी केलेल्या भात प्रकल्पाविषयी सांगितलं. लीलाताईंच्या गच्चीवर भाताची रोपं लावली होती. रोपं लावण्यापासून ते तांदूळ शिजवून खाण्यापर्यंतचा अनुभव मुलांनी घेतला. खत घालणं, रोपाची उंची मोजणं, निरीक्षणांच्या नोंदी करत मुलं परिसर, भूगोल, विज्ञान, गणित, भाषा नकळत शिकली. तेही आनंद घेत. शेवटी 'भात पिठलं करून खाल्लं हे सांगताना मुलांचा आनंद ओसंडून वाहत होता.

इथली मुलं गोष्टींप्रमाणे कविताही करतात. र ला र किंवाटलाट जुळवून केलेली ही मांडणी नसते. मुलांनी विषयाला सूत्रात बांधून, योग्य शब्दांची योजना करून, अर्थपूर्ण, लयबद्ध कविता केल्या आहेत. दरवर्षी प्रत्येक वर्गाचा असा प्रकल्प असतो. प्रकल्पांच्या अभ्यासात विषयांच्या भिंती पाडलेल्या असतात. प्रकल्पाच्या सर्व अंगांना स्पर्श करत भाषा, गणित, विज्ञान हे विषय शिकले जातात. विद्यार्थी कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेतात. कौशल्यं, विविध कृती, खेळ यांद्वारे प्रकल्प पुढे जातो. त्यामुळे त्यातील नावीन्य टिकून राहतं. शिकण्यासाठी सगळ्या ज्ञानेंद्रियांना कामाला लावलं जातं. रंग, वास, चव, स्पर्श, आवाज हे सगळं आतमध्ये घ्यायला मुलं शिकतात. जसं आत घेतलं जातं तसंच विविध प्रकारच्या अभिव्यक्तींनी ते बाहेर काढलं जातं. ज्याची पेरणी होते ते उगवतं.

'वासाची दुनिया' या प्रकल्पामध्ये मुलांनी विविध प्रकारचे वास घेतले. वासाच्या तांदळाची गोष्ट निघाली, तेव्हा भाज्यांचा पुलाव तयार केला. अशा विविध अनुभवांमुळे मुलांना भाषिक अनुभवही मिळतात. भाषा समृद्ध होते आणि शिकणं सोपं होतं. याची साक्ष मुलांच्या कविता आणि गोष्टी देतात.

निसर्गासारखा दुसरा मोठा गुरू नाही. मुलांना निसर्गाची ओढ असतेच. म्हणूनच ते क्षेत्रभेटीला जाण्याची आठवण करून देतात.

शाळा बघत असतानाच शिट्टी वाजली. सर्वत्र शांतता पसरली. सुचिताताईंनी हातानेच खूण केली. आम्ही शांत उभे राहिलो. नंतर त्या म्हणाल्या, 'शाळेत शांततेची वेळ असते. शिट्टी वाजताच मुलं, ताई, दादा हातातलं काम थांबवून, डोळे मिटून शांत बसतात. हा दोन ते तीन मिनिटांचा कालावधी मनाला शांतता अनुभवायला शिकवतो. म्हणूनच चौथीच्या वर्गाचा 'मार्ग प्रकल्प' मार्गांचे विविध प्रकार समजून घेता घेता शांततेच्या मार्गावर येतो. गौतम बुद्धांपासून गांधीजी समजून घेत 'युद्ध नको शांतता हवी' इथपर्यंत मुलं पोहोचतात. या प्रकल्पावर तयार केलेल्या पुस्तकाचं नाव होतं, 'मार्ग : पाऊलवाटा ते गांधीजींचा अहिंसक मार्ग.'

सुचिताताईंनी सामुदायिक वाढदिवसाची वेगळीच गोष्ट सांगितली. 'सामुदायिक वाढदिवस म्हणजे, सगळ्यांनीच मनानं मोठं व्हायचं, मनाची दारं समाजासाठी प्रशस्त करायची.' या निमित्तानं इतर समूहातील आपल्याच वयाची मुलं कशी राहतात, कशी शिकतात, त्यांचा आनंद, सुख-दुःख, परिस्थितीशी झगडणं हे समजून घेतलं जातं. त्यांच्यासाठी मैत्रीचा हात पुढे केला जातो, ही मोठी अचंबा वाटणारी गोष्ट आहे. चिपळूणच्या 'मोर मित्राच्या' शाळेतील कातकरी समाजाची मुलं सृजन आनंद विद्यालयात येतात. इथल्या मुलांच्या घरचा पाहुणचार घेतात. निमाताईंनी रचलेलं गाणं गातात,

कोल्हापूरची काय आणि पाड्यावरची काय 
कधी अशी कधी तशी शेवटी आम्ही मुले 

ही मुलं एकमेकांचे मित्र होण्यापूर्वी फळ्यावर दोन्ही शाळांमधल्या मुलांची नावे लिहून जोड्या लावून ठेवलेल्या होत्या. नाव वाचून मुलांनी आपापला मित्र शोधायचा होता. मग एकच धमाल उडाली. मुलं आपल्या मित्राच्या नावानं हाका मारत एकमेकांना शोधू लागली. हातात हात घेऊन, गळ्यात गळे घालून त्यांची मौजमस्ती सुरू झाली. मुलं खूप निर्मळ असतात. वेगवेगळी पुटं चढवतो ती आपण मोठी माणसं. वाढदिवस साजरा करताना मुलं, बाहेरून येणाऱ्या मुलांचं स्वागत कसं करायचं याची खूप चर्चा करतात. त्यातून कायमस्वरूपी परिणाम करणारं खूप काही घडत असतं.

"ऊसतोडणी कामगारांच्या मुलांबरोबर सामुदायिक वाढदिवस साजरा करण्यासाठी मुलांना घेऊन पालावरती गेलो. या कामगारांची मुलं खूप लांबून बैलगाडीतून येतात. काही वेळा तर अनवाणी चालत येतात. शाळेतल्या मुलांनी त्यांच्या पायावर कोमट पाणी घालून त्यांचं स्वागत केलं." हे सांगताना ताईंचा गळा दाटून आला, डोळ्यातून पाणी वाहू लागलं. माझ्यासोबत कृष्णात पाटोळे होते. आमचेही डोळे पाणावले. ताईंमध्ये विनोबा आणि गांधीजींचे विचार आहेत. त्यांच्या प्रेम भरलेल्या हृदयातून संस्कार पाझरत राहतात.

सुचिताताईंची अशी जडणघडण होण्यासाठी त्यांना खतपाणीही तसंच मिळालंय. त्यांचे आजोबा वर्ध्याला गांधीजींच्या आश्रमामध्ये संगीत शिक्षक म्हणून काम करत होते. त्यांचं बालपण तिथेच गेलंय. नंतर लग्न होऊन त्या कोल्हापूरच्या झाल्या. त्यांच्या नोंदणी पद्धतीच्या लग्नाला एस.एम. जोशी आणि ना.ग. गोरे साक्षीदार होते. कोल्हापूरमध्ये सुरू झालेल्या अशासकीय महिला दक्षता समितीच्या त्या पहिल्या सचिव होत्या. लीलाताई या समितीमध्ये यायच्या. त्या समाजवादी कार्यकर्ते सुरेश शिरपूरकरांना म्हणाल्या, 'ही मुलगी तेवढी मला द्या.' लीलाताईंनी सुचिताताईंना पदरात घेतलं होतं. लीलाताई स्वतः स्वातंत्र्यसैनिक असल्याने त्यांना सुचिताताईंविषयी जिव्हाळा, भरोसा वाटणं साहजिक होतं. सुचिताताईंचा किशोरवयीन काळ राष्ट्र सेवा दलात गेला आहे आणि त्यांना एस.एम. जोशी यांचा सहवासही लाभला आहे. याचं प्रतिबिंब त्यांच्या जगण्या-वागण्यात, समाजाशी जोडून घेण्यात, आणि शिक्षणातून समता निर्माण करण्याच्या तळमळीत दिसतं.

मणिपूरची दहा मुलं शाळेत आली होती, त्या वेळी त्यांचा प्रवासखर्च तिसरीतल्या मुलांच्या पालकांनी केला होता. रमजानचा महिना होता म्हणून खीर केली. कोणाच्या घरून पोळ्या, तर कोणाच्या घरून भात असं नियोजन केलं. प्रत्येक जण आपापल्या घरून ताट-वाटी घेऊन आला. सर्वांनी एकत्र वाटून खाल्लं. भाषेची अडचण असतानाही मुलांनी एकमेकांशी संवाद साधला.

हे सगळं विद्यार्थी, शिक्षक, आणि पालकांना एकत्रित अनुभवायला मिळतं. त्यामुळे मुलांबरोबर पालकही विचारी आणि संवेदनशील नागरिक झाले तर त्यात नवल ते काय ! साने गुरुजींच्या आंतरभारतीचं कार्य इथे सुरू आहे.

संवेदनशीलतेबरोबरच पर्यावरण आणि इतर गोष्टींविषयीही शाळा जागृत आहे. साधेपणा हे इथलं वैशिष्ट्य. कुठे चकचकाट नाही की डामडौल नाही. मुलं शाळा स्वच्छ ठेवतात. कोणतंही काम कमीपणाचं किंवा विशिष्ट समाजाचं आहे असं मुलांना वाटू नये, यातून गांधीजींच्या विचाराचा अंश जपला जातो, असं सुचिताताईंना वाटतं.

सार्वजनिक व्यवस्था जनतेच्या सोयीसाठी असतात. तो आपला हक्क आहे, हे कळण्यासाठी सुचिताताई काही उपक्रम राबवतात. यातून पर्यावरण, विज्ञान, भाषा इत्यार्दीचे शिक्षण होतेच, शिवाय चांगला नागरिक घडण्याची ही सुरुवात ठरू शकते. विद्यालयात आवश्यकतेनुसार न्यायसभा घेतली जाते. शाळेची आचारसंहिता तयार करण्यात मुलांचा पुढाकार असतो. शिक्षकांशी मुलांची आदर ठेवून मैत्री असते.

इथे पुस्तकाला सोबत घेत पुस्तकापलीकडचं शिकवलं जातं. प्रत्येक विषयासाठी घेतल्या जाणाऱ्या खेळांचा उपयोग संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आणि उजळणीसाठी होतो. अशा कितीतरी खेळांच्या नोंदी शाळेने जतन करून ठेवल्या आहेत. शिकत असताना मुलांनी केलेल्या कामाच्या नोंदींमध्ये त्यांच्या हस्ताक्षराचे नमुने बघायला मिळतात.

इतिहास शिकवताना कोल्हापुरातील शाहू महाराजांच्या ऐतिहासिक स्थळांना, तसेच रेल्वे स्टेशन, मार्केट यार्ड, वाड्यांना भेटी दिल्या जातात. इथे मुलांचं इतिहास शिकणं सुरू होतं. शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये वर्षभर केलेले प्रकल्प, उपक्रम, गाणी, नाटिका इत्यादींद्वारे रंगमंचीय सादरीकरण होतं. त्याची संहिता विद्यार्थी आणि शिक्षक मिळून लिहितात. परिसरात घडणाऱ्या घटनांविषयीही कार्यक्रम असतात. कला, क्रीडा या विषयांचा इतर विषयांशी मेळ घातला जातो.

या वर्षीचं स्नेहसंमेलन 'शिवाजी आमचा राजा' हा विषय घेऊन केलं गेलं. शिवाजी महाराज न्यायी, स्त्री-दाक्षिण्य दाखवणारे, सर्वसामान्यांशी मैत्री करणारे, शेतकऱ्यांचे राजे आहेत. शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र मुलांनी सादर केलं. या नाटकात आठ शिवाजी महाराज होते. प्रत्येक शिवाजी महाराज ही व्यक्ती नसून ते एक मूल्य आहे. यातून मुलं जे शिकली ते आयुष्यभर शिकली नसती.

सांस्कृतिक कार्यक्रम नेहमी शाळेच्या गणवेशामध्ये होतात. अगदीच आवश्यक असल्यास पालक-विद्यार्थी कागदाच्या वस्तू (उदा. टोप्या) बनवतात. वेशभूषेत केलेलं हे पहिलंच नाटक. शाळेतच कपडे, जिरेटोप इत्यादी ड्रेपरी तयार केली. एकच अट होती -कोणीही ड्रेपरी विकत किंवा भाड्याने आणायची नाही. काही कपडे विकत घ्यावे लागले, तरी ते नंतर घरात वापरता आले पाहिजेत.

सुचिताताई एकदा चौथीच्या वर्गात म्हणाल्या होत्या, 'शिवाजी महाराजांच्या सैन्यांमध्ये खूप मुस्लीम लोक होते. पूर्वी लोक कोणत्याही राजाच्या पदरी नोकरी करायचे. आपल्यालाही नाटकात मुस्लीम सैनिक व्हावं लागेल.' पण मुलं मुस्लीम व्हायला तयार होत नव्हती. ताई म्हणाल्या, 'असं कसं चालेल ! राजा सगळ्यांचा आहे, तर सगळी रयत नको का नाटकामध्ये ?' मग हिंदू मुलांनी मुस्लीम भूमिका केल्या आणि मुस्लीम मुलांनी हिंदूंच्या भूमिका केल्या. हे पोहोचवायला वेळ लागला. आजच्या काळात सगळ्या गोष्टी सोप्या नाहीत. हे आम्ही पालकांवरही बिंबवलं. मावळ्याच्या भूमिकेतील मुस्लीम मुलांना टिळा लावताना पालक म्हणाले, 'लावा टिळा. तो हिंदू आहे की मुस्लीम हे महत्त्वाचं नाही. आता तो मावळा आहे.' या नाटकात पालकांनीही भूमिका केल्या होत्या.

असं शिकवण्यासाठी शिक्षकही तितकेच अनुभवसंपन्न, प्रगमनशील, विद्यार्थ्यांना सर्जनशील बनवणारे आहेत. त्यांचा वकूब वाढवण्यावर सुचिताताईंचा कटाक्ष असतो. एखादा पाठ शिकवण्यासाठी खूप तयारी केली जाते. पाठ किती काळ चालणार आहे, त्यामध्ये कोणकोणत्या कृती घेणार आहोत याचं नियोजन केलेलं असतं. पूरक माहिती, संदर्भ ग्रंथांचा वापर केला जातो. फक्त पाठ्यपुस्तकात असलेल्या भागापुरतं शिकणं मर्यादित ठेवलं जात नाही. त्याच्या अवतीभवतीचं मुलांना माहिती करून दिलं जातं. शिवाय मूळ पुस्तक वाचण्याची ओढ निर्माण होण्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न असतो.

ताईंनी सांगितलेलं हे ऐकलं की वाटतं, एका ओळीचं टाचण काढण्याचा कंटाळा करणाऱ्या आम्हाला यातून खूप शिकण्यासारखं आहे.

पहिली-दुसरीला विज्ञान विषय नसल्यामुळे भाषेच्या पुस्तकातूनच विज्ञान शिकवावं अशी अपेक्षा आहे. निरीक्षण, वर्गीकरण, कार्यकारणभाव, अंदाज, तर्क, निष्कर्ष हे भाषेत नसतं. यासाठी स्वतंत्र नियोजन करून पहिलीपासूनच मुलांची वैज्ञानिक दृष्टीकोनाची तयारी केली जाते. चौथीला परिसर अभ्यासामध्ये 'छोटे आजार घरगुती उपचार' हा पाठ शिकवताना लहान मुलांचे कोणकोणते अपघात होऊ शकतात याची मुलांकडूनच यादी तयार केली. मुलांनी पुस्तकात नसणाऱ्या 19 गोष्टी काढल्या. अपघात कुठेही घडू शकतात. त्यासाठी खबरदारी काय घ्यायची? त्या वेळी कसं वागायचं आणि अपघात झाल्यानंतर कसं वागायचं? हे त्या पाठासाठी केलेलं पूरक काम. काही वेळा दीर्घकाळ चालणारे प्रकल्प असतात. काही वेळा पाठाशी संबंधित व्यक्तींना बोलावलं जातं. आयुकाचे शास्त्रज्ञ मुलांशी संवाद साधतात. विज्ञान दिनाच्या शुभेच्छा देताना त्यांनी सांगितलं, 'विज्ञानात अंतिम काहीही नसतं. सतत नवे शोध लागत असतात. कशावरही सत्य गवसल्याचा विश्वास ठेवू नका. प्रत्येकाबाबत शंका उपस्थित करा. वैज्ञानिक दृष्टी म्हणजे का? कसं? कधी? काय? याची कास धरणं असतं.' असं बाळकडू प्रत्येक शाळेत मिळालं तर शिकले-सवरलेले लोक बुवाबाबांच्या नादी लागणार नाहीत. शिकूनही शहाणपण न आलेले लोक दिसणार नाहीत. मुलांची भावनिर्मलता टिकून राहावी, ती विकसित व्हावी यासाठी विद्यालय सातत्याने प्रयत्न करतं. त्यासाठी कृतीयुक्त अनुभव दिला जातो.

शिक्षक, सोबती आणि इतरांना आडनावाने न बोलावता नावाने बोलावतात. त्यांना ताई, दादा म्हणून बोलावणं हा त्यांचा सहजभाव होतो. प्रत्येक कृतीतून काही ना काही साध्य करून घेण्याचं नियोजन असतं.

पालक स्वयंसेवकांच्या भूमिकेतून काम करतात. तसेच मानद शिक्षक म्हणून आठवड्यातून दोन दिवस काम करतात. आजपर्यंत जवळपास 45 लोकांनी शाळेला मानदसेवा दिली आहे. शिकण्याच्या संधी मिळवून देण्यासाठी, उपक्रमात, स्नेहसंमेलनात रंगमंचावरील व पाठीमागील सहभाग, प्रकल्पात सहभाग व सहकार्य, क्रीडा स्पर्धेत पंच, सहलींचे नियोजन व सहभाग असा विविध प्रकारे पालकांचा सहभाग घेतला जातो. एखाद्या विषयात तज्ज्ञ असलेले पालक तो विषय चांगल्या रितीने शिकवतात. विविध पदांवर कार्यरत असलेले माजी विद्यार्थी शाळेशी नातं ठेवून आहेत. ते मुलांना विविध क्षेत्रांची ओळख करून देण्यासाठी तत्पर आहेत.

समाजातील तज्ज्ञही मुलांसाठी पुढाकार घेतात. यामध्ये पालक असलेले 'इस्रो'चे गजानन देशिंगकर, एव्हरेस्टवीर उमेश झिरपे, पर्यावरण शास्त्राचे अभ्यासक, आयुकाचे शास्त्रज्ञ संजित मित्र आहेत. ट्रॅफिक पोलीस, अग्निशामक दलाचे जवान, कष्टकरी माणसं, सायकल दुरुस्त करणारे हेसुद्धा मुलांच्या शिकण्याच्या कामात आपला सहभाग देतात. त्यांना अवगत कला शिकवतात. पोलिसांबद्दलची भीती नष्ट व्हावी म्हणून मुलांनी पोलीस स्टेशनला भेट दिली आहे. पोलीस आपले मित्र आहेत, त्यांच्याकडे मदत मागता आली पाहिजे. आपण हरवलो, तर त्यांची मदत घ्यायची, हे मुलं आता शिकली आहेत.

शाळेत खेळ, कला, बौद्धिक या तीन प्रकारच्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेला उतरण्याची मानसिकता तयार व्हावी म्हणून. बक्षिसं वस्तुरूपात नसतात. क्रीडा महोत्सवातील बक्षीसपात्र मुलांना एनसीसीचा कॅम्प दाखवायला नेलं होतं. तिथली शिस्त, देशप्रेम आणि इतर गोष्टी बघणं, त्यातून शिकणं हेच त्यांचं बक्षीस. बौद्धिक कामात अव्वल असलेल्या मुलांनी संपादक सुधाकर काशीद यांच्याशी दैनिक 'सकाळ'च्या कार्यालयात गप्पा मारल्या. जास्त पुस्तकं वाचणाऱ्या मुलांना ताईंनी पुस्तक खरेदीसाठी नेलं.

स्वतः इंजिनियर असलेल्या गायत्रीताईंची भाषा तमिळ आहे. त्या इंग्रजी शिकवतात. पहिलीतल्या मुलींना इंग्रजी उच्चार ऐकण्याचा सराव होण्यासाठी जास्तीत जास्त इंग्रजी विशेषतः गोष्टी ऐकवल्या जातात. श्रवणानंतर बोलणे आणि वाचनाकडे लक्ष दिले जाते. कृतीवर भर दिला जातो. विविध कृतींचा वापर करून एखादी गोष्ट अधिक पक्की केली जाते. हर्षदाताई पहिली-दुसरीला इंग्रजी शिकवतात. त्या वस्तूंच्या प्रदर्शनातून मुलांना इंग्रजी शब्द शिकवतात.

दर शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर दोन तास शिक्षक सभा होते. त्यामध्ये केलेल्या कामाचा आढावा, चांगल्या बाबी, येणाऱ्या अडचणी, मुलांच्या वर्तनातील अडचणी, त्यावरच्या उपाययोजना, अभ्यासक्रम आणि त्याला अनुसरून घ्यावयाच्या कृती, उपक्रम, पुढील नियोजन यांवर चर्चा होते.

या शाळेत समूहात काम होतं. हे काम व्यक्तीचं नसून विचारांचं आहे. 'लोकसहभागावर चालणारी शाळा समाज परिवर्तनाचं एक साधन आहे', असं लीलाताईंना वाटत होतं. 'आपल्या विद्यालयाने अशा लोकशाहीसाठी समाज घडवावा', असं त्यांचं स्वप्न होतं. त्यांचे विचार सुचिताताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जपले आहेत.

सुचिताताई सांगतात, 'गांधीवादी कुटुंबामध्ये बालपण गेल्यामुळे अंगात समाजवादी विचार भिनले आणि हे काम टिकवता आलं. लीलाताई आणि माझे विचार एक असल्यामुळे त्यांचं काम आपोआपच पुढे गेलं.' लीलाताईंनंतर शाळेत झालेल्या कार्याविषयी 'घाट : शिकण्या शिकवण्याचा' हे पुस्तक सुचिताताई आणि इंद्रजीत दादांनी संपादित केलंय.

एम.ए. राज्यशास्त्र असलेल्या सुचिताताई मानद शिक्षक म्हणून काम करतात. सध्या त्या भूगोल विषय शिकवतात. यापूर्वी त्यांनी इंग्रजी सोडून सर्व विषय शिकवले आहेत. 67 वर्षे वय असलेल्या ताईंचा उत्साह आजही कालपरवा शाळेत हजर झाल्यासारखा आहे.

आपल्याला हवे तसे प्रयोग करता यावेत म्हणून लीलाताईंनी शाळेला शासनाचं अनुदान घेतलं नव्हतं. हे महाराष्ट्रातील कदाचित एकमेव उदाहरण असेल. आंतरभारती शिक्षण मंडळ, कोल्हापूर ही समाजवादी विचारांच्या लोकांची संस्था. या संस्थेमार्फत अल्पशी फी घेऊन ही शाळा चालवली जाते. त्यासाठी किती प्रयास करावे लागत असतील याचा विचार करावा. 'आता अनुदान घेतले नाही तर पुन्हा कधीच अनुदान दिले जाणार नाही', असे शाळेला सांगण्यात आले होते. सध्याच्या बिकट स्थितीत शिक्षकांना योग्य पगार मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे. आता शाळेला अनुदान घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. नियमित अनुदान मिळणे हा शाळेचा हक्कच आहे. शिवाय अशा शाळांना कोणत्याही गोष्टीचा विचार न करता, कोणतेही निकष न लावता, विशेष अनुदान द्यायला हवे. संशोधन केंद्राला शासन जशी मदत करतं, त्या दृष्टीने या शाळेकडे बघायला पाहिजे. गेल्या 40 वर्षांत या शाळेने केलेल्या डोंगराएवढ्या मोठ्या कामाचा अभ्यास व्हायला हवा. हे मॉडेल शिक्षकांसमोर ठेवून प्रशिक्षण दिल्यास आणि त्याची अंमलबजावणी केल्यास महाराष्ट्रातील शालेय शिक्षणास उर्जित अवस्था येऊ शकते.

सुचिता पडळकर, कोल्हापूर 
Mob. 9420324713

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नामदेव माळी,  सांगली, महाराष्ट्र ( 34 लेख )
namdeosmali@gmail.com

शिक्षण क्षेत्रात वर्ग दोनचे अधिकारी, कादंबरीकार व शैक्षणिक लेखक.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके