डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

शहामृगी आत्मचिंतनाकडून उदारमतवादी बहुभाषिकतेकडे

‘बंगालबाहेर द्वैभाषिक बुद्धिजीवी तुरळक आहेत’ हे रामचंद्र गुहांचे विधान तर परिस्थितीचा विपर्यासच होय. म्हणून ते वास्तवाशी प्रतारणा करणारे शहामृगी आत्मचिंतन ठरते. लेखातील या नि अशा अनेक विधानांचा परामर्श घेता येईल, पण त्यापेक्षा मला या संदर्भाने भारतीय वर्तमान भाषिक विश्व आपणासमोर मांडावेसे वाटते. भारत प्रारंभापासून द्वैभाषिकच नव्हे तर बहुभाषी, बहुसांस्कृतिक राहिला आहे. भारत ही बहुभाषी बुद्धिजीवींची खाणच आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. आजचे भारतीय भाषिक विश्व साक्षरतेकडून सुशिक्षिततेकडे अग्रेसर होत आहे. भाषिक उदय-ऱ्हासाचा विचार बौद्धिकतेपेक्षा वापर-व्यवहार या अंगाने व्हायला हवा. बुद्धिजीवी सर्वच काळात अपवाद आणि अल्पसंख्याक राहत आले आहेत. त्यांच्यामुळे समाज पुरोगामी, आधुनिक, वैज्ञानिक, विवेकी बनतो हे खरे आहे; पण बुद्धिजीवी भाषाऱ्हास वा संवर्धनात काय भूमिका बजावतात, ते अधिक महत्त्वाचे.

‘साप्ताहिक साधना’च्या शनिवार, दि. 1 जून 2019 च्या अंकातील ‘द्वैभाषिक बुद्धिजीवींचा उदय आणि ऱ्हास’ हा लेख वाचला. मुळात हे 15 मे 2009 रोजी ग्रंथपाल बी.के. केशवन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त इंडिया इंटरनॅशनल सेंटर, नवी दिल्ली येथे दिलेले रामचंद्र गुहांचे भाषण होय. या भाषणाचा मजकूर ‘इकॉनॉमिक ॲण्ड पोलिटिकल वीकली’मध्ये प्रकाशित झाला होता. तो प्रसिद्ध झाल्यावर त्यावर लिखित स्वरूपात अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यांचा समावेश करून तयार झालेला मजकूर म्हणजे हा लेख. तो ‘साप्ताहिक साधना’त संपादित करून प्रकाशित करण्यात आल्याचे मूळ लेख वाचल्यावर लक्षात येते. तो मूळ लेख ‘देशभक्त आणि अंधभक्त’ शीर्षकाच्या भाषांतरित ग्रंथात वाचावयास मिळतो. ‘द्वैभाषिक बुद्धिजीवी’ हा शब्द रामचंद्र गुहांनी दोन भाषांचे जाणकार बुद्धिजीवी या अर्थाने न वापरता, इंग्रजी येणारे अन्य भाषी या अर्थाने वापरला आहे. 

संपूर्ण लेखातील विवेचन, उदाहरणे समजून घेत असताना ते सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट होते. रामचंद्र गुहा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकले. त्यांचे सर्व लेखन इंग्रजीच आहे. ते तमिळ मातृभाषी. त्या अर्थाने इंग्रजी-तमिळ असे द्वैभाषिक बुद्धिजीवी. पण व्यवहाराने एकभाषिकच. त्यांचे  उपरोक्त भाषण वा हा लेख मूळ इंग्रजीतला. लोकमान्य टिळक, राजा राममोहन राय, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, सर सय्यद अहमद खान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, वि.दा. सावरकर, डॉ.राम मनोहर लोहिया, यू.आर. अनंतमूर्ती, हरिवंशराय बच्चन, निर्मल वर्मा, फिराक गोरखपुरी इत्यादी मान्यवरांची जी उदाहरणे या लेखात येतात, ते सर्व इंग्रजी शिक्षित भारतीय. यातले अनेक बॅरिस्टर, वकील, साहित्यिक, भाषांतरकार, संशोधक वा शिक्षक. यांच्यातही इंग्रजी सर्वांत समान. त्यांच्या अन्य भाषा मराठी, बंगाली, गुजराती, कन्नड, उर्दू, हिंदी म्हणूनही ते इंग्रजी येणारे अन्य भाषी बुद्धिजीवी होत. 

हा सारा लेख एका चुकीच्या भाषिक प्रमेयावर उभा आहे. इंग्रजी येणारे म्हणून ते बुद्धिजीवी असा या लेखाचा रोख दिसतो. बुद्धीचा संबंध भाषेशी असत नाही. बुद्धीचा संबंध विचार, आकलन, विश्लेषण, संकल्पनाविस्ताराशी आहे. तत्त्वज्ञ, चिंतक, विचारवंत कोणत्याही भाषेतील असू शकतात. मध्यंतरी काही तरी निमित्ताने मी बौद्धिक संपदा कायदा (इंटलेक्चुअल प्रॉपर्टी ॲक्ट) शोधून वाचताना, या कायद्याच्या उगमाचा शोध घेत होतो. तेव्हा लक्षात आले की, बौद्धिक एकाधिकाराचा (इंटलेक्चुअल मोनोपॉली) उगम इसवी सनपूर्व सातव्या शतकात ग्रीकमध्ये झाला. गंमतीची गोष्ट अशी की, ही कल्पना आचाऱ्याच्या (आचार्यांच्या नव्हे!) पाकप्रक्रियेच्या एकाधिकारातून जन्मली. यातूनही बुद्धिमत्ता आणि भाषा यांच्या समन्वयातून बुद्धिजीवित्व जन्मत नसते, तर ती एक बौद्धिक क्षमता आहे. भाषा तिथे साधक, वाहक आहे. 

या लेखात सर्वत्र अव्यक्तपणे इंग्रजीच्या असाधारण महत्त्वाचे बीजारोपण करण्याची खटपट आहे. ही खटपट इंग्रजीच्या दुष्प्रभावाची वा अतिरिक्त महत्त्व अधोरेखित करणारी आहे. इंग्रजी शिक्षणाच्या या बाधेला महात्मा गांधींचा विरोध होता. भारतीयांचे पुनरुज्जीवन करायचे असेल, तर ते इंग्रजी शिक्षणाने होणार नाही, यावर महात्मा गांधी ठाम होते. ‘‘स्वातंत्र्याची संकल्पना बिंबवणे आणि काटेकोर विचार करण्याची क्षमता रुजवणे यासाठी इंग्रजी भाषा अनिवार्य आहे, ही भारतातील सर्वांत मोठी अंधश्रद्धा आहे. इंग्रजी शिक्षणपद्धतीच्या परिणामी भारतीय शरीर, मन आणि आत्मा खुजे लेखण्याची प्रवृत्ती वाढली आहे.’’ हे महात्मा गांधींचे म्हणणे स्वातंत्र्याला सात दशके उलटली तरी समाजमानसातून पुसले गेले नाही, याचे वाईट वाटते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्वभाषेची उपेक्षा हा गांधींचा चिंता नि चिंतनाचा विषय होता. हिंदीची स्वतंत्र भारतातील उपेक्षा व विरोध पाहून महात्मा गांधी म्हणाले होते की, ‘राष्ट्रभाषा के बिना मेरा देश गूँगा (मुका) है।’ साने गुरुजी, वि.स. खांडेकर, प्रेमचंद प्रभृती साहित्यकार द्वैभाषिक बुद्धिजीवी नाहीत का? इंग्रजीत ज्यांना लिहिता येत नाही, त्यांना बुद्धिजीवी न मानणे हा इंग्रजी येण्याचा अहंकार जसा आहे, तसा न येणाऱ्यांचा उपमर्द नि उपहासही! वरील साऱ्या वा तत्सम अनेकांना इंग्रजी येते व अन्य अनेक भाषाही येत. साने गुरुजींना इंग्रजी येत असल्याचा पुरावा म्हणजे त्यांचे ‘कला म्हणजे काय?’ हे टॉलस्टॉयचे भाषांतर. शिवाय ‘पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची कहाणी’ हा विल ड्युरांटचा ग्रंथ. वि.स. खांडेकरांनी अर्नस्ट टोलरच्या पत्रांचा केलेला अनुवाद ‘तुरुंगातील पत्रे.’. 

डॉ.सदानंद मोरे यांचा केलेला उल्लेख या संदर्भात आक्षेपार्ह ठरतो. ते इंग्रजी लिहीत नसले, तरी इंग्रजी छान वाचतात. एकदा ते आयन रँडची ‘द फाऊंटनहेड’ कादंबरी वाचत होते नि मी भेटण्यास गेलो होतो. त्याची त्यांनी केलेली समीक्षा त्यांना द्वैभाषिक बुद्धिजीवी ठरवते. डॉ.सदानंद मोरेंनी नंतर स्वाक्षरी करून भेट म्हणून पाठवलेली ती कादंबरी अजून माझ्या ठेवणीत आहे. इंग्रजी न लिहिणारा बुद्धिजीवी नव्हे, अशी ही दूरान्वयी मांडणी म्हणून आक्षेपार्ह ठरते. आचार्य विनोबा भावे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना बुद्धिजीवी म्हणायचे की नाही? ते द्वैभाषिकच का तर बहुभाषीही होते. बहुभाषी ज्ञानपीठ विजेते साहित्यिक जे उत्तर-मध्य भारतीय, ते बुद्धिजीवी कसे नाहीत? केवळ यू.आर. अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, के.व्ही. पुटप्पा, आर.के. नारायण प्रभृतींची भलामण त्यांना इंग्रजी येते, ते इंग्रजीत लिहितात म्हणूनच नाही का झाली? की दक्षिण भारतीय म्हणून? 
‘साधारणत: 1920 च्या दशकापासून 1970 च्या दशकापर्यंतच्या काळात भारतीय बौद्धिक विश्व हे द्वैभाषिक होते’ हे विधान तर अधिकच वादग्रस्त व आक्षेपार्ह ठरते; ते अशा सिद्धांतामुळे की, आता द्वैभाषिक बुद्धिजीवींचा ऱ्हास झाला आहे. शिवाय ‘आता भारतातील बौद्धिक आणि सर्जनशील विश्वाचे एकाभाषिक ध्रुवीकरण झाले आहे’, फक्त पश्चिम बंगालमध्येच हे ध्रुवीकरण रोखण्यात  यश आले आहे. सुप्रिया चौधरी, सुकांत चौधरी, पार्थ चटर्जी, स्वपन चक्रवर्ती प्रभृतींमुळे (कारण ते इंग्रजीबरोबर बंगालीत लिहितात) हे ध्रुवीकरण रोखण्यात यश आले. इंग्रजीत न लिहिणारे द्वैभाषिक (हिंदी-मराठी, मराठी- कन्नड, गुजराती-मराठी) साहित्यिक, पत्रकार, संपादक कित्येक आहेत. ते सर्व भारतीय भाषांत आजही लिहितात. अशोक वाजपेयी, गिरीश कुबेर हे द्वैभाषिक बुद्धिजीवी नव्हेत का? त्यांनी नाही का ध्रुवीकरण रोखले? 

‘बंगालबाहेर द्वैभाषिक बुद्धिजीवी तुरळक आहेत’ हे रामचंद्र गुहांचे विधान तर परिस्थितीचा विपर्यासच होय. म्हणून ते वास्तवाशी प्रतारणा करणारे शहामृगी आत्मचिंतन ठरते. लेखातील या नि अशा अनेक विधानांचा परामर्श घेता येईल, पण त्यापेक्षा मला या संदर्भाने भारतीय वर्तमान भाषिक विश्व आपणासमोर मांडावेसे वाटते. भारत प्रारंभापासून द्वैभाषिकच नव्हे तर बहुभाषी, बहुसांस्कृतिक राहिला आहे. भारत ही बहुभाषी बुद्धिजीवींची खाणच आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. आजचे भारतीय भाषिक विश्व साक्षरतेकडून सुशिक्षिततेकडे अग्रेसर होत आहे. भाषिक उदय-ऱ्हासाचा विचार बौद्धिकतेपेक्षा वापर-व्यवहार या अंगाने व्हायला हवा. बुद्धिजीवी सर्वच काळात अपवाद आणि अल्पसंख्याक राहत आले आहेत. त्यांच्यामुळे समाज पुरोगामी, आधुनिक, वैज्ञानिक, विवेकी बनतो हे खरे आहे; पण बुद्धिजीवी भाषाऱ्हास वा संवर्धनात काय भूमिका बजावतात, ते अधिक महत्त्वाचे. 

विसाव्या शतकाच्या प्रारंभी सन 1907 मध्ये मॉरिस विंटरनित्सनी ‘ए हिस्ट्री ऑफ इंडियन लिटरेचर’ लिहून भारतीय भाषेच्या विधिवत्‌ अभ्यासाचा अध्याय आरंभला. सन 1927 मध्ये सर जॉर्ज अब्राहम ग्रियर्सन यांनी ‘लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया’ हा ग्रंथ 20 खंडांत प्रकाशित करून, भारतीय भाषांची वस्तुस्थिती प्रकाशात आणली. तिथून भारतीय भाषा सर्वेक्षण नियमित होत आले आहे. अगदी अलीकडे सन 2011 ला संपन्न भारतीय जनगणनेची भाषिक सांख्यिकी माहिती प्रसिद्ध झाली आहे. शिवाय गणेश देवींच्या नेतृत्वाखाली ‘भारतीय भाषा लोक सर्वेक्षण’ संपन्न झाले असून, त्याचे त्रैभाषिक पन्नास खंड प्रकाशित होऊ लागले असून, त्यांपैकी वीस खंड प्रकाशित झाले आहेत. यातील ‘मराठी खंड’ मराठीत उपलब्ध आहे. तो अरुण जाखडेंनी संपादिला असून, पद्मगंधा प्रकाशनाने तो प्रसिद्ध केला आहे. 

ऑफिस ऑफ द रजिस्ट्रार जनरल, इंडिया आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर रिसर्च ऑन बायलिंग्विलिझम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘द रिटन लँग्वेजेस ऑफ वर्ल्ड’ या मालिकेत ‘भारत खंड’ प्रकाशित असून (1989) त्यात भारतीय लोकसंख्येचा विविध क्षेत्रीय भाषावापरावर आधारित अभ्यास करण्यात आला आहे. त्यात द्वैभाषिक भारतीय लोकसंख्येवर क्ष-किरण टाकला आहे. 

अलीकडे सन 2017 मध्ये गुगल आणि केपीएमजी इंटरनॅशनलच्या संयुक्त सहकार्याने संगणक, इंटरनेट वापरकर्त्यांचे भाषिक सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्या सर्वांचा ऐतिहासिक व वैकासिक अभ्यास करताना लक्षात येणारी गोष्ट अशी की, भारत हा पूर्वापार एकभाषिकतेकडून बहुभाषिकतेकडे अग्रेसर होणारा देश आहे. जगाचे भाषिक चित्रही थोड्याफार फरकाने असेच आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात (विसाव्या शतकाचा पूर्वार्ध) इंग्रजी शिक्षणामुळे शिक्षित वर्ग द्वैभाषिक होत गेला, तरी एकूण लोकसंख्येच्या तुलनेत तो अल्पसंख्याकच होता. स्वातंत्र्यानंतर आपण भाषावार प्रांतरचनेचे धोरण अंगीकारले. घटनेने राज्यकारभारासाठी द्वैभाषिक धोरण (हिंदी/इंग्रजी) स्वीकारले, तरी घटनेच्या आठव्या परिशिष्टानुसार राज्यांना आपली राज्यभाषा (स्टेट लँग्वेज) ठरविण्याचा अधिकार दिला. आज बावीस राज्यभाषा आणि तेरा लिप्यांध्ये भारताचा भाषिक व्यवहार होतो. 

सन 1948 मध्ये युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशनने सर्वप्रथम राष्ट्रीय एकात्मतेचा विचार करून ‘त्रिभाषा सूत्र’ विद्यापीठीय शिक्षणात अंगीकारले. पुढे 1968 मध्ये शालेय शिक्षणात ते अमलात आणले. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर भारतीय जनता जन्मत: द्वैभाषिक-त्रैभाषिक अशी विकसित होत राहिली. आजची संगणकीय नवी पिढी इंग्रजी माध्यमात शिकतवाढ त असली, तरी ती उपजत त्रैभाषिक आहे. घरची मातृभाषा, समाजभाषा/ माध्यमांची भाषा हिंदी (टीव्ही, सिनेा, मोबाईल्स इ.) व शिक्षणभाषा इंग्रजी. समाजाच्या वाढत्या बहुभाषिकत्वामुळे इंग्रजी बुद्धिजीवींचा समाजावरील प्रभाव नगण्य होतो आहे. उदाहरण द्यायचे झाले, तर नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणूक निकालात बुद्धिजीवीं (इंग्रजी) पेक्षा प्रादेशिक भाषांतील बुद्धिजीवींचे समाज-आकलन अधिक वास्तवदर्शी ठरले. त्याचे कारण वर्तमान  समाजाचा वैचारिक व्यवहार स्थानिक भाषाप्रभावी असला, तरी तो प्रादेशिकतेकडून राष्ट्रीय मनोवृत्तीकडे अग्रेसर होताना दिसतो. 

भारताची ज्ञानभाषा इंग्रजी राहिली, तरी व्यवहार-भाषा हिंदी होणार, हे उघड आहे. त्यामुळे नजीकच्या काळातील भारतीय भाषाविश्व युरोपसदृश होणार, हेही स्पष्ट होत आहे. इंग्रजीसह स्वभाषेचा वाढता वापर हे उद्याच्या भाषिक अस्मिता व अस्तित्वाचे मानचित्र होणार. यात प्रशासकीय भाषा, न्याय भाषा, वैधानिक भाषा, व्यापार, उद्योग, बाजार, मंडई वापराची भाषा, संपर्क भाषा यांचे योगदान भविष्यकाळात वाढते राहणार आहे. आभासी संपर्क- प्रभावाचे वाढते प्रस्थ बुद्धिजीवींच्या हस्तिदंती मनोऱ्यातील शहामृगी आत्मचिंतनास शह देत राहणार. त्यामुळे समाजमत व समाजमनावर बुद्धीपेक्षा व्यवहाराचा अमल व अंमल वाढता आलेख दाखवत राहणार. त्याचा आधार मनुष्य समुदायाचे वाढते स्थित्यंतर-देशांतर जसे राहणार आहे, तसे माणसाचे वाढते प्रवासी, पर्यटक होणे, अनिवासी नागरिक (नॉन-रेसिडेंशियल सिटिझन) बनणेही महत्त्वाचे ठरणार आहे. भाषेचा जिज्ञासू निरीक्षक (बुद्धिजीवी नव्हे!) म्हणून जे वास्तव प्रत्ययास येते, ते मात्र इंग्रजीभाषी बुद्धिजीवींच्या भाष्यापेक्षा विपरीत राहणार, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. 

कसबाई वस्तीचे महानगरीय स्थलांतर केवळ औद्योगिकीकरण, शहरीकरण म्हणून पाहून चालणार नाही. त्याबरोबर आकारणारा बहुसांस्कृतिक समाज आंतरजातीय, आंतरधर्मीय, आंतरप्रांतीय राहणार असल्याने त्यांचे भाषिक ‘आंतरभारती’ होणे आणि पुढे ‘विेशभारती’ होत साहित्याचे ‘विश्वसाहित्य’ रूप अवतरणे हा प्रवास साने गुरुजी, रवींद्रनाथ टागोर, गटे असाच राहणार. यांचा स्वभाषेचा पाझर, उद्‌गार हा बौद्धिकतेपेक्षा भावनिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या अधिक जवळचा होता, हे कोण नाकारेल? 

"Come O Aryn's, Come non-Aryan's. Hindus and MussalmansCome Today, O Englishmen, Come O come Christans Join hands with all." - Raveendranath Tagore 

समाजाच्या वैचारिक घडणीत भाषिक व्यवहाराचे बदलते स्वरूप हे परिणामकारकपणे पुढे येत आहे. माहिती व तंत्रज्ञान युगामुळे एकीकडे माहितीचा महापूर महाजालावर पाहावयास मिळतो आहे, तर दुसरीकडे इंग्रजीचे ज्ञानभाषा म्हणून असणारे एकाधिकारी महत्त्व लोप पावत चालले आहे. संगणकीय व्यवहार महाजालाद्वारे जागतिक बनतो आहे. संगणकीय संसाधनांचा (सॉफ्टवेअर्स) भाषिक क्षेत्रातील विकास व वापर यामुळे प्रत्येक भाषा ज्ञानभाषा होऊ लागली आहे. भाषांतर, लिप्यंतर, संपादन, टंकन इत्यादी क्रिया आता मौखिक आज्ञावलीनुसार होणे शक्य झाले आहे. तुम्हाला कोणती भाषा येते, यापेक्षा तुम्हाला भाषिक संसाधने वापरायचे कौशल्य आहे का- ते महत्त्वाचे ठरत आहे. लिपी न येताही संसाधनांद्वारे लिप्यंतरण जसे शक्य, तसे भाषांतरही! गुगल इंग्रजी, हिंदी, मराठी, बंगाली, कन्नड, मल्याळम, तमिळ, पंजाबी, तेलुगू भाषांचे भाषांतर- लिप्यंतरण एका कळीवर (क्लिक) करते. त्यात आज दर्जा, शुद्धलेखन, आशय इत्यादीच्या मर्यादा व दोष असले तरी रोज त्यात सुधारणा घडून येत आहेत. 

रामचंद्र गुहांचे विचार 2009चे आहेत. 2019 पर्यंतच्या दशकात भाषिक व्यवहार-साधनांचा विकास झपाट्याने होत राहिल्याने, बौद्धिकता व भाषिक संपदा वा सामर्थ्य यातील पूर्वीची दरी अरुंद होत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर माणूस ‘अशक्य ते शक्य, करिता सायास’चा अनुभव घेत असून, कृत्रिम बुद्धिमत्ता वापराचे क्षितिज रोज रुंदावते आहे. संगणकीय साधने माणसाचा महाजालावरचा वाढता वावर व वापर लक्षात घेऊन, त्याची मानसिकता बदलवत आहेत. इतकेच नव्हे, तर त्याची विचारधारा, जीवनशैलीही ही साधने नियंत्रित करू लागली आहेत. ‘दिल माँगे मोर’ची मानसिकता विचार कमी करते, कृती अधिक! याचाही परिणाम भाषिक व्यवहारावर होताना दिसतो. न बोलणे वा कमी संवाद, संपर्क, जे सूचित वा व्यक्त करायचे ते शब्दांपेक्षा चित्र-चिन्हांतून (इमेजेस), पसंत, नापसंत, मत इत्यादी सारे व्यवहार लिपीपेक्षा सजीव फितीतून सांगितले जात असल्याने, बुद्धिजीवी मनुष्य साधनजीवी झालाय खरा! 
 

Tags: सुनीलकुमार लवटे Sunilkumar Lawate weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुनीलकुमार लवटे,  कोल्हापूर, महाराष्ट्र

माजी प्राध्यापक, प्राचार्य, लेखक, हिंदी भाषा प्रचारक, समाजसेवक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके