डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

ब्रिटिश प्रशासनातला डामडौल व जनतेपासून राखला जाणारा दुरावा भारतीय प्रशासन सेवेत का ठेवला गेला? त्यात जनतेच्या हिताचा विचार करून गरीब लोकांविषयी कळवळा, नम्रता व तळागाळाची लोकशाही रूजविण्यासाठी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विकास प्रशासनासाठी योग्य ते बदल का करता आले नाहीत? प्रसिद्ध इतिहासकार प्रा.रवींद्रकुमार याचं कारण देताना लिहितात की...

"India to me, it was primitive interesting and I am like Kipling :

'East is East and West is West, and ne'er the twain will meet.' And I lived there twenty-eight years."

केट गॅरोड ही ब्रिटीश स्त्री इतिहासात उल्लेख यावा एवढी महत्त्वाची नाही, ती एक सामान्य गृहिणी होती. तिचा नवरा ब्रिटिश अमदानीत निर्माण झालेल्या पी.डब्ल्यू.डी.मध्ये इंजिनीअर होता. नवऱ्यासोबत केट भारतात अठ्ठावीस वर्षे राहिली. पण भारताशी, भारतीयांशी कणभरही समरस होऊ शकली नाही. तिची ही प्रतिक्रिया ब्रिटिश भारतातील ब्यूरोक्रसी कुटुंबीयांची प्रातिनिधिक मानता येईल!

ब्रिटनने जेव्हा भारतीयांना आय.सी.एस. परीक्षेची व नोकरीची कवाडे खुली केली तेव्हा त्याचा फायदा घेऊन ज्या अनेक कर्तबगार भारतीय प्रशासकाची परंपरा सुरू झाली, त्यातील एल. के. झा हे एक अव्वल दर्जाचे आय.सी.एस. ऑफिसर. त्यांनी ब्रिटिश आय.सी.एस. ऑफिसरच्या हाताखाली व सोबत काम केलं होतं. त्यांनी टिपिकल ब्रिटिश आय.सी.एस.बद्दल एक छान किस्सा (अर्थातच खरा) सांगितला आहे. तो प्रथम मी टीकेविना उद्‌धृत करून व मग भाष्य करतो.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर मायदेशी परतलेल्या ब्रिटिश आय.सी.एस. अधिकाऱ्यांचा इंग्लंडमध्ये 1958 साली (त्यांनी केलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल) सत्कार करण्यात आला व त्यांच्या सेवेची इंग्लिश लोकांना कायमची आठवण राहावी म्हणून वेस्ट मिन्स्टर ॲबे या प्रतिष्ठित चर्चमध्ये एक कोनशिला राणीच्या हस्ते बसवण्यात आली. त्या कोनशिलेवर आय.सी.एस. अधिकाऱ्यांच्या गौरवार्थ खालीलप्रमाणे मजकूर कोरण्यात आला. ‘Let them not be forgotten for they served India well.’ त्याखाली बायबलमधील एक कोटेशन होतं, त्यात  'They walk humbly among the people.' असं एक वाक्य होतं. त्याला आय.सी.एस. असोसिएशनने तीव्र आक्षेप घेतला व ते कोनशिलेवर उद्‌धृत करू नये असं निवेदन राणीला दिलं. राणीनं पंतप्रधान लॉर्ड ॲटलीशी विचारविनिमय केला व वरील बायबलचं कोटेशन (ज्यात नम्रतादर्शक विशेषणं आय.सी.एस. अधिकाऱ्यांना लावलं होतं) कोनशिलेतून काढावं अशी आज्ञा दिली, व ते तसं काढण्यातही आलं!

दीडशे वर्षे ब्रिटिशांनी भारतावर राज्य करताना बऱ्याच चांगल्या दर्जाचं प्रशासन दिलं, हे ऐतिहासिक सत्य नाकारण्यात अर्थ नाही. त्यात मोठा वाटा ‘स्टिल फ्रेम’ ब्युरोक्रसीचा व त्याचेच प्रमुख अंग असलेल्या ‘इंडियन सिव्हिल सर्व्हिस’ अधिकाऱ्यांचा आहे. पण जन्मजात श्रेष्ठतेचा अहंकार, नसानसात भिनलेला वंशवाद आणि ‘वुई आर बॉर्न टु रूल प्रिमिटिव्ह इंडिया’ ही रक्तात भिनलेली वृत्ती यामुळे नम्रता या मानवी गुणाचा त्यांना विसर पडला होता. म्हणून त्यांच्या सेवेच्या गौरवार्थ बसवलेल्या कोनशिलेवर बायबलमधील कोटेशन ‘They walk humbly among the people.’ त्यांना रुचले नाही. एका अर्थाने ते प्रामाणिक होते व प्रांजळपणे त्यांनी हेच अधोरेखित केलं होतं की, त्याचं भारतीयाशी वर्तन हे शासकाचं व मालकाचं म्हणून अहंकारांनी भरलेलं होतं!

ब्रिटिशांनी त्यांच्या दीडशे वर्षाच्या शासनकाळात प्रशासनाची आधुनिक यंत्रणा कशी विकसित केली हे आपण मागील दोन अध्यायात विस्तारानं पाहिलं आहे. आज ब्रिटिश प्रशासकाची वृत्ती, जीवनशैली व त्यांच्या प्रशासनाचे काही वेगळे पैलू पाहणार आहोत. त्यासाठी मी डेव्हिड गिलमर यांच्या ‘दि रूलिंग कास्ट’ व वायबेन ब्रेंडन यांच्या ‘चिल्ड्रन ऑफ राज’ आणि काही इंटरनेट वेबसाईटवरून मिळालेल्या लेखांचा आधार घेतला आहे. याखेरीज ब्रिटिश काळात आय.सी.एस. झालेले व स्वतंत्र भारतातही सेवा देणाऱ्या प्रशासकांच्या आठवणी व टीकाटिपणीच्या आधारे ब्रिटिश प्रशासकांच्या मानवी पैलूचा परामर्श घेण्याचा अल्पसा प्रयत्न करणार आहे.

भारतातील ब्रिटिश साम्राज्यशाही हा प्रदीर्घ कालखंडाचा व महत्त्वाचा अनुभव आहे. भारत ब्रिटिशांसाठी काय होता? याचं नेमकं वर्णन एका आय.सी.एस. अधिकाऱ्याने केलं, ते याप्रमाणे आहे. "India has always retained an exotic, fareway and seductively oriental appeal in the British imagination. Above all, India Symbolised Imperial grandeur, and seemed to underwrite Britain's Superpower status for the most of the nineteenth century and some of the twentieth- as the Viceroy Lord Curzon expressed it, a touch dramatically, in 1901. "As long as we rule India, we are the greatest power in the world. If we lose it we shall drop straight way to a third rate power."

ब्रिटिश साम्राज्यावर कधीही सूर्य मावळायचा नाही असं एके काळी म्हटलं जायचं, कारण पंचखंडात त्यांच्या साम्राज्याचा विस्तार होता आणि या साम्राज्यामध्ये भारत हा ‘ज्वेल इन क्राऊन’ होता. त्यामुळे त्यांची महासत्ता होती. भारत स्वतंत्र होताच त्यांची महासत्ता लयास गेली. आज साठ वर्षानंतर इंग्लंड जागतिक सत्तास्पर्धेत कुठे आहे? तो अमेरिकेचे बोट धरून त्यांच्या धोरणाची री ओढणारा एक नगण्य देश बनला आहे. ते असो.

पण वरील निरीक्षण अत्यंत मार्मिक व ब्रिटिश राज्यकर्ते आणि प्रशासकांच्या वृत्तीवर नेमका प्रकाशझोत टाकणारं आहे, यात शंका नाही. आय.सी.एस. व अन्य प्रशासकांना भारतात येऊन विविध पदावर काम करताना अक्षरश: ‘अहम्‌ ब्रह्मास्मी’असंच वाटायचं. त्यांचा साम्राज्यशाही दर्प, भारतीयांना कस्पटासमान लेखायची वृत्ती आणि तुच्छता यातूनच भारतीयांचा स्वाभिमान जागृत झाला हे ऐतिहासिक वास्तव आहे.

ब्रिटिश प्रशासकांचा भारतात काम करताना तोल जाणं आणि स्वत:ला मोठं व श्रेष्ठ समजणं साहजिक होतं. वयाच्या पंचविशीच्या आत आय.सी.एस. परीक्षा पास होऊन भारतात आलेला ब्रिटनचा मध्यम वर्गातला तरुण एखाद्या जिल्ह्याच्या राजाप्रमाणे कारभार करू लागायचा. आख्खा ब्रिटन एवढे मोठे भूभाग असलेले तत्कालीन काही भारतीय जिल्हे होते. त्यांचे ब्रिटिश आय.सी.एस. कलेक्टर हे अक्षरश: राजे असायचे. अमर्याद सत्ता, भारतीयांप्रती वागणुकीची अत्यंत कमी असलेली जवाबदेही-अकौंटेबिलिटी आणि नोकर-चाकरांचा प्रचंड ताफा, उच्चपदस्थ भारतीयांची त्यांच्या पुढे कृपादृष्टीसाठी असणारी लाचारी व लाळघोटेपणा, छोट्या-मोठ्या राजे-महाराजांनीही त्यांच्या पुढे पुढे करणे या व अशा कारणांनी त्यांचा तोल सुटणे व स्वत:ला श्रेष्ठ समजणे साहजिक होते. पुन्हा मध्ययुगातील भारतीय राजांचं प्रशासन व्यवस्थेकडे झालेले दुर्लक्ष, जुलूम व अन्याय आणि असुरक्षिततेची भावना या पार्श्वभूमीवर गुलामीचं असलं तरी चांगली कायदा व व्यवस्था, न्यायाचं राज्य, नवं इंग्रजी शिक्षण आणि जानमालाची सुरक्षितता यामुळे ब्रिटिश कलेक्टरांबद्दल आम भारतीयात भीतीसोबत आदरभावना मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती. त्यामुळे जनतेच्या लाचारीवजा अदबीमुळे व वाटणाऱ्या भीतीमुळे ब्रिटिश कलेक्टर हे अहंकारी, जुलमी व तुसडे बनले होते. त्यांची ज्ञानसाधना, भाषा-कला-संस्कृतीचा अभ्यास या ब्रिटिश अधिकारी व राज्यकर्त्यांच्या जमेच्या बाजू. (ज्यामुळे भारताचा इतिहास व कलासंस्कृतीची परंपरा जगापुढे बऱ्याच वस्तुनिष्ठ प्रमाणात आली.) असल्या तरी त्याचं भारतीयाशी नातं जेतेजित व मालक-गुलाम असंच राहिलं. नव्हे त्याचं त्यांनी जाणीवपूर्वक पालन केलं.

त्यासाठी ब्रिटिशांनी राज्य करताना कायदा व सुव्यवस्था राखणे, कर गोळा करणे आणि 1857 च्या स्वातंत्र्य समरचा धसका घेतल्यामुळे पूर्वीची भूमिका बदलून सामाजिक व धार्मिक बाबीत जैसे थे स्थिती ठेवत त्याला हस्तक्षेप न करणे या त्रिसूत्रीचा अवलंब केला. त्यासाठी त्यांनी ‘Classical Model of Colonial Administration’ विकसित केली, त्यामागची मूळ प्रेरणा होती भारताच्या संपत्तीची जास्तीत जास्त लूट. अगदी सुरुवातीच्या काळापासून त्यांची ही मूळ प्रेरणा होती. 1511 साली पाचवा हेन्री या ब्रिटिश राजाला भारतात आल्यावर परिस्थिती पाहून जे निवेदन दिलं होतं, त्यावरून ही बाब स्पष्ट होते. सदर निवेदनात असं म्हटलं होतं,

'The Indies are discovered and vast treasure brought from thence every day. Let us, therefore, bend our endeavors thi ther wards and if Spaniards and Portuguese suffer us not to join them, there will be yet region enough for all to enjoy."

ब्रिटिश हे भारतावर राज्य करताना कमालीचे जागरूक होते. त्यांना हे माहीत होतं की, आपण एका दुसऱ्या देशावर राज्य करीत आहोत. तेथील लोक हे अनोळखी व फार वेगळ्या धर्म-संस्कृतीचे आहेत. परिणामी त्यांनी भारतातील ब्रिटिश प्रशासनासाठी दोन महत्त्वाची तत्त्वे प्रमाण मानून विकसित केली. एक साम्राज्याशी एकनिष्ठा भारतीयांसाठी महत्त्वाची आहे हे त्यांच्या मनावर बिंबवणे. दुसरी बाब म्हणजे ऐतद्देशीयात एक उच्चभ्रू वर्ग जाणीवपूर्वक निर्माण केला, जो इंग्रजी भाषा बोलणारा व इंग्रजी संस्कार, एटिकेट्‌स अंगिकारण्यात धन्यता मानणारा होता. त्यासाठी त्यांनी एतद्देशीयांच्या मनात भीती निर्माण होईल असा प्रोटोकॉल व मॅनेरिझमची जाणीवपूर्वक निर्मिती करीत ती दृढमूल केली. ती कशी? सी.पी.भंडारी यांनी ‘ॲडमिनिस्ट्रेशन इन ए चेंजींग सोसायटी’ या पुस्तकात ब्रिटिश कलेक्टरांच्या दौऱ्याबाबत खालीलप्रमाणे निरीक्षण नोंदवलं आहे.

‘ब्रिटिश कलेक्टरांचे जिल्ह्यातील दौरे, विविध भागात न्यायालये भरवणे, त्यांचा रूबाब, ऐश्वर्य, दरारा आणि दूर-दराज भागात मुक्काम केला तरी सामान्य नागरिकांपासून अंतर राखणे आणि न्यायदान करताना जबरी शिक्षा करणे याद्वारे जनतेच्या मनात भीती निर्माण करण्यात ब्रिटिश प्रशासक विशेषत: कलेक्टर, पोलिस अधिकारी व भारतीय राजांच्या दरबारातील पोलिटिकल एजंट निष्णात बनले होते.’

‘द रूलींग क्लास’मध्ये डेव्हिड गिलमोर यांनी आय.सी.एस. अधिकाऱ्यांचे काम व भारतातले त्यांचे जीवन याची समीक्षा करण्याचा प्रयत्न केला आहे, पण बराचसा एकतर्फी व ब्रिटिश श्रेष्ठत्वाचे गोडवे गाणारा आहे. तरी त्यातून बरीच उपयुक्त माहिती मिळते. त्यांनी एका महत्त्वाच्या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे, तो म्हणजे अवघे हजारभर ब्रिटिश आय.सी.एस. अधिकारी तीस कोटी भारतीय माणसांवर दीडशे वर्षे कसे राज्य करू शकते? हा प्रश्न रशियाच्या स्टॅलिनलाही पडला होता. या प्रश्नातच या अधिकाऱ्यांच्या कार्यकुशलतेचे अधोरेखन होते. त्यांच्यामुळे भारतीय नागरिक हे आधुनिक होत आहेत, सुधारत आहेत असंच त्या वेळच्या पाश्चात्त्य विचारवंतांना वाटायचं. हिटलरचं असं मत होतं म्हणे की, भारतात सुधारणा होण्यासाठी आणखी शंभर वर्षे तरी ब्रिटिशांचं राज्य हवं. सारांश रूपाने गिलमोरपुढे पुस्तक लिहिताना हा प्रश्न होता की, कशा पद्धतीने ब्रिटिश प्रशासक व राज्यकर्त्यांनी भारतासारख्या मोठ्या देशाच्या कारभाराचा गाडा हाकताना कार्मक्षमता, मिशनरी झिल, निष्पक्षता आणि कमालीची क्षमता दाखवली? विषमता, जुनाट अन्यायी चालीरिती व परंपरा बंद करणाऱ्या बहुतेक भारतीय सुधारकांना राजाराममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर ते लोकहितवादी- आगरकरांपर्यंत सर्वांनाच ब्रिटिश राज्यकारभार हा हितकारी वाटला होता. सतीची चाल बंद होणे, विवाहाचे वय ठरविणारा कायदा यांसारखे पुरोगामी निर्णय ब्रिटिश राज्यकर्त्यांनी घेतले होते हे लक्षात ठेवले पाहिजे. आज स्वतंत्र भारतात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा किंवा महिलांना लोकसभा, विधानसभेत आरक्षण देण्याच्या विरोधात ज्या प्रतिगामी शक्ती जोरकसपणे विरोध करीत आहेत व त्यामुळे अजूनही त्याबाबत निर्णय होत नाही, या पार्श्वभूमीवर ब्रिटिशांची वरील कृती नक्कीच उठून दिसणारी होती!

डेव्हिड गिलमोर यांनी ब्रिटिश जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कामात ठग व दरोडेखोरांचा बंदोबस्त करणे व जंगली जनावरांपासून रयतेचे रक्षण करणे या कामाचाही समावेश असल्याची रंजक माहिती दिली आहे. पंजाबमध्ये जलसिंचनाचे कालवे खोदणे तर बंगालच्या जमिनीतील जादा पाण्याचा निचरा करणे अशा कामाकडेही कलेक्टरांना पाहावं लागायचं. अनेक जिल्ह्यात हिंदू-मुस्लिम, शिखधर्मीय तर काही जिल्ह्यात आदिवासी असायचे. आय.सी.एस. ऑफिसर्सना जातीय संघर्षाचाही सामना करावा लागायचा. धार्मिक व आदिवासी संस्कृतीची सर्वांनाच सखोल जाण असणं शक्य नव्हतं, त्यामुळे त्यांच्या हातून दडपशाही व्हायची व संघर्ष पेटला जायचा. पण सर जॉर्ज युलेसारखे अभ्यासू प्रशासक पण होते. ते संथाल परगण्यात कलेक्टर असताना संथालांनी ब्रिटिश कोर्ट व कायदेकानून विरुद्ध 1855 साली उठाव केला व धनुष्य बाणांनी लढाई केली. त्याची उग्रता ध्यानात घेऊन व संथालांची संस्कृती-चालीरीती व रूढींचा अभ्यास करून युले यांनी सदर जिल्ह्यातून ब्रिटिश कायदे मागे घेतले व पोलिसही माघारी बोलावले आणि संथाल परगणा शांत झाला. ही उदाहरणे ब्रिटिश आय.सी.एस. अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेची द्योतक होती.

1857 च्या अयशस्वी झालेल्या स्वातंत्र्यसमरानंतर भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता ब्रिटनच्या राणीकडे गेली.आणि अवघड परीक्षा व खडतर प्रशिक्षणातून तावून सुलाखून निघालेले व नियुक्त झालेले आय.सी.एस. अधिकारी बहुतांशी स्वच्छ व चोख काम करणारे होते. पण जसजशी ब्रिटिश सत्ता रूजत गेली व संस्थानिकांच्या राज्यात त्यांच्यातील काही पोलिटिकल एजंट किंवा रेसिडंट कमिशनर म्हणून नियुक्त होऊ लागले तसतसे त्यांच्या अंगात व मनातही सत्ता भिनू लागली. त्यांच्यातील सेवाभाव कमी होत गेला आणि ठळकपणे साम्राज्यशाहीचे एजंट व हितकर्ते आणि त्यासाठी निर्घृण दडपशाहीचा वापर वाढत गेला. त्यातूनच काही नवी साम्राज्यशाहीची प्रतीके निर्माण झाली.

पहिलं प्रतीक म्हणजे त्यांची आलिशान चारप्रसंगी सहा व आठ घोड्यांची गाडी. मी कोल्हापूरचा जिल्हाधिकारी म्हणून ज्या बंगल्यात राहतो, त्या बंगल्यात पूर्वी ब्रिटिश रेसिडंट कमिशनर राहायचे. त्यांच्या घोडागाडीचा एक मोठा फोटो फ्रेम केलेला भिंतीवर आहे. हा कलेक्टर व ब्रिटिश अधिकाऱ्यांचा त्याकाळचा स्टेटस सिम्बॉल होता. (जसा आज होंडा सिटी वा अन्य आलिशान कार लाल दिव्यासह आहे) दुसरं त्यांच्या आलिशान जीवनाचं प्रतीक म्हणजे त्यांचे मोठाले बंगले. आजही सातारा, कोल्हापूर येथील जिल्हाधिकाऱ्यांचे बंगले किती प्रशस्त आहेत. त्यातील मोठाले दिवाणखाने पार्ट्यांसाठी व बॉलडान्ससाठी वापरले जायचे. ब्रिटनमध्ये घोड्याचा शौक महागडा व नपरवडणारा होता. इथे अनेक ब्रिटिश सेनाधिकारी व कलेक्टर घोडे पाळायचे. सकाळच्या प्रहरी घोड्यावरून रपेट करणारे गोरे टोपीकर अधिकारी व त्यांची घोडदौड त्यांचा रूबाब प्रस्थापित करायची.

कलेक्टरांचे दौरे व त्यांचे कॅम्पस्‌ हाही असाच अनुभव असायचा. ते दौऱ्यावर असतात, गावांमध्ये तंबूत निवास करायचे. त्याकाळी ब्रिटिशांचा दरारा दूर दूर ग्रामीण भागात पसरण्यासाठी ब्रिटिश कलेक्टर वर्षातून बराच काळ दौरे करायचे. दौऱ्यात शेतसारा वसुली, महसुली व दिवाणी दावे ऐकून निकाली काढणे व तपासणी ही कामे करायचे. रात्री उभारलेल्या तंबूत ते मुक्काम करायचे. त्यांचे तंबू चांगले प्रशस्त असायचे. त्यात पोर्टेबल मेटलचे बाथटबही असायचे. त्यांच्या दौऱ्यात यासाठी अनेक नोकर-चाकर राबायचे. त्यांचे ग्रामीण दौरे, तंबूतला मुक्काम व न्यायदान व शिक्षा या प्रक्रियेमुळे जनतेत दरारा व भीती निर्माण व्हायची.

उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी जाणे ही त्यांची खास परंपरा. त्यामुळे अनेक हिलस्टेशन्स विकसित झाली. मसुरीला तर भारताचे व्हॉईसरॉय उन्हाळ्यात दोन महिने मुक्काम करायचे. त्याकाळात भारताची राजधानी दिल्लीहून मसुरीला जणू स्थलांतरित व्हायची. त्याचप्रमाणे देशभर अनेक हिलस्टेशन्स पर्यटनासाठी योग्य बनले.

कुसुमाग्रजांनाही आवडणारे डाकबंगले व डाकबंगलासंस्कृती. अगदी लहान गावातही खूप उंची असलेले प्रशस्त डाकबंगले आपणास आजही वेगळ्या दुनियेत घेऊन जातात. मी प्रोबेशनर असताना साताऱ्याच्या पुसेसावळी या गावातील डाकबंगल्यात पंधरा दिवस राहिलो होतो. उंचच उंच हॉल्स, आरामदायी पण मजबूत ब्रिटिश छापाचे फर्निचर. पण गावाबाहेर असल्यामुळे विजेचे दिवे नव्हते. त्यामुळे मोठाल्या काचांचे कंदिलवजा दिवे. रात्री अंगणातील उंच वाढलेल्या वृक्षांचीस ळसळ, नीरव शांतता व पौर्णिमेला चंदेरी बनलेलं आकाश आरामखुर्चीवर निवांत बसून न्याहाळणे यातून डाकबंगला संस्कृतीची न्यारी लज्जत मी मनसोक्त अनुभवली.

याखेरीज जिमखाना व सिटी क्लब, तेथील बिलियर्ड टेबल्स, कार्ड रूम व निवांतपणे ड्रिंक्स घेत बसणे हे ब्रिटिशकाळाचे एक ठळक वैशिष्ट्य. दुसरं अनेक ठिकाणची गोल्फची मैदाने आणि प्रमुख शहरातील कॅन्टोनमेंटस्‌.

हे सारे आम भारतीय दूरवरून पाहायचा. ब्रिटिशाबाबतचा दबदबा त्याच्या मनावरचे ओझे अधिकच वाढवायचा. जेव्हा दिल्ली ही ब्रिटिश इंडियाची राजधानी बनली, तेव्हा तेथे प्रचंड देखण्या इमारती बांधण्यात आल्या. आजचे राष्ट्रपती भवन तेव्हा ‘व्हाईस रॉय पॅलेस’ होतं. तसंच मुंबई महानगरपालिकेची इमारत, तेव्हाचे व्ही.टी. व चर्चगेट ही रेल्वेस्टेशन्स याची काही ठळक उदाहरणे. ब्रिटिशांनी केवळ सत्ताच राबवली नाही तर ती मनसोक्त उपभोगली. त्यांचे अनुकरण करणाऱ्या काळ्या इंग्रजांनी(भारतीयांनी) त्याचं अनुकरण करीत साहेबी जीवनशैली अंगिकारली. स्वातंत्र्य मिळाल्यावर देशकारभारासाठी सरदार पटेलांनी आय.सी.एस. सेवा आय.ए.एस.मध्ये रूपांतरित करून कायम ठेवली, पण भारतीय प्रशासक व नेत्यांनी हां हां म्हणता ब्रिटिशांची उपभोगवादी चंगळयुक्त जीवनशैली सहजतेनं स्वीकारली.

त्याबाबत महात्मा गांधी तीव्र असमाधानी होते. 3 जून1947 रोजी त्यांनी इशारा दिला होता, “Democracy cannot be run if you leave your thinking to be done by those who live in palaces, whether they be the British or our own countrymen” पण नेहरूंना त्याची जाणीव फार उशिरा म्हणजे मृत्युसमयी झाली. लाल बहादूर शास्त्रींनाही डामडौल पसंत नव्हता. पण भारतातून ब्रिटिश सत्ता गेली तरी त्यांची सरंजामी प्रशासकीय शैली तशीच कायम राहिली, उलट अधिक दृढमूल होत गेली. आज तर त्यात बदल हे दिवास्वप्न वाटावं, एवढा डामडौल राज्यकर्ते व प्रशासकांच्या राहणीमानात व शासकीय खर्चाने सुखसोयी उपभोगण्यात वाढला आहे.

ब्रिटिश प्रशासनातला डामडौल व जनतेपासून राखला जाणारा दुरावा भारतीय प्रशासन सेवेत का ठेवला गेला? त्यात जनतेच्या हिताचा विचार करून गरीब लोकांविषयी कळवळा, नम्रता व तळागाळाची लोकशाही रूजविण्यासाठी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विकास प्रशासनासाठी योग्य ते बदल का करता आले नाहीत? प्रसिद्ध इतिहासकार प्रा. रवींद्रकुमार याचं कारण देताना लिहितात की...

"Nehru and his associate could not but help adopting the colonial bureaucratic system because unlike, say as in Russia and China, where complete socio-economic transformation took place; in India, the Congress- the ruling party under Nehru did not have the political cadres to implement socio-economic changes."

काही भाष्य करण्याची गरज नाही, एवढं हे निरीक्षण मार्मिक आहे.

(लेखक गेली 25 वर्षे प्रशासकीय सेवेत असून सध्या कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आहेत.)

Tags: भारतीय प्रशासन ब्रिटिश साम्राज्य ब्रिटिश प्रशासन लक्ष्मीकांत देशमुख beurocracy The British Empire British administration Laxmikant Deshmukh weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

लक्ष्मीकांत देशमुख
laxmikant05@yahoo.co.in

 भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी, लेखक व बडोदा येथे २०१७ सालच्या डिसेंबरमध्ये झालेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात