डिजिटल अर्काईव्ह

'देवराई'त अशा पुष्कळ कथा आहेत. काळजाचे काप काढणाऱ्या नि हृदयद्रावक. पण, पुस्तकाचा मूळ सूर विधायक आहे. संकटाशी दोन हात करायला स्त्री, मग ती शहरातली असो वा ग्रामीण भागातली, सायलेंट डिग्निटीनं नि निर्धारानं उभी राहते. अशी पुष्कळ उदाहरणं पुस्तकात आहेत. शाळा सुरू झाली; पण जागा पुरेशी नव्हती. काही वर्ग एका ठिकाणी तर काही दुसऱ्या जागी. मुख्याध्यापिकेला बसायला खुर्ची मिळे, टेबल नाही. फळा खुर्चीवर ठेवायचा. सगळा काटकसरीचा संसार. अनेक मुलं महिन्याच्या महिन्याला फी भरतीलच असं नाही; परंतु प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचं साहित्य तर द्यावं लागायचंच.

मला गाव नाही. मी अट्टल मुंबईकर. बातमीदारीच्या निमित्तानं महाराष्ट्रात ठिकठिकाणी जाणं होत असतं; परंतु माझ्या अनुभूती मुळात शहरी, हा आरोप मला मान्य आहे.

मागे एकदा काँग्रेसचे एक ज्येष्ठ मंत्री वीजप्रश्नावर माहिती देत असताना म्हणाले, "मुंबईत सलग आठ तास वीज नसली तर दुसऱ्या दिवशी पान नंबर एकवर मोठा मथळा असतो; गावात तर लोड शेडिंग रोजचंच असतं. तुम्हा मुंबईकरांना त्याचं काहीही वाटत नाही".

मुंबईला अवास्तव मोठेपण राजकीय पुढाऱ्यांनीच दिलं नि गावांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केलं, असं म्हणावंसं वाटलं; परंतु मंत्रिमहाशयांचा मूळ मुद्दा बिनतोड होता. सोयीसुविधांना सोकावलेल्या शहरी लोकांना गावांचा विचार सुचत नाही. मीही त्यांतला एक, हा आरोप मात्र मला मान्य नाही.

एकेकदा खूप वाटतं की, मुंबईला रामराम ठोकून आडगावी राहायला जावं; पण वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी मायग्रेशनचा प्रयोग करण्याचा धीर होत नाहीए. ग्रामीण जीवनाची लय नाहीच सापडली तर काय ? मुंबईच्या अक्राळविक्राळ गर्दीत एकट्या विनापाश माणसानं स्वतःची स्पेस कशीबशी शोधून काढली. गावात ते शक्य होईल काय ?

तर मग एकच उपाय उरतो. गाव कल्पनेत उभं करायचं. ते सत्यजित राय यांनी केलं.

सत्यजितबाबू पक्के कलकत्तावाले. विचार, संस्कार आणि अनुभूती आधुनिक आणि महानगरीय. ते पियानोवर मोइझार्ट, बीथोवनच्या रचना वाजवायचे. कलकत्त्याच्या (आता कोलकाता) एका विख्यात जाहिरात कंपनीत काम करायचे.

पण सत्यजितबाबूंनी 'पथेर पांचाली'त ग्रामीण बंगालचं आणि गावातल्या साध्या, अनलंकृत जीवनाचं मनोरम, हृद्य चित्र रुपेरी पडद्यावर सजीव केलं. बिभूतीभूषण बंद्योपाध्याय यांची कादंबरी वाचताना सत्यजितबाबूंच्या डोळ्यांसमोर बंगालातलं ते खेडं, तिथली मातीची घरं, भातशेती, तळं सगळं आस्ते आस्ते आकार घेत होतं. He could imagine rural Bengal. प्रश्न कल्पनाशक्तीचा आहे.

गेल्या पंचवीसेक वर्षांत मुंबईकरांची कल्पनाशक्ती लोप पावलीये. मुंबईकर ना गाव इमॅजिन करू शकत, ना मुंबई. हल्ली दिसणं बघणं दाखवणं हीच मुंबईची जीवनवृत्ती झालीये. 'चक्षुर्वेसत्यम्' ते हेच की काय.

डोक्यात हा सगळा गुंताडा झाला याला कारण श्रीमती राजमुग्धा (मुग्धा फडके) यांचं 'देवराई' पुस्तक नुकतंच वाचलं आणि मी सांगोला गावाची कल्पना करू लागलो. सोलापूरजवळच्या सांगोल्यात डॉ. संजीवनी केळकरांनी 1979 मध्ये 'माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठाण'ची पायाभरणी केली. गेली सेहेचाळीस वर्षं संजीवनीताई प्रतिष्ठाणमार्फत शोषित, दुर्बल वर्गासाठी खास करून महिलांसाठी सचोटी आणि चिकाटीनं काम करताहेत.

'देवराई' हे मुलाखतींवर आधारित पुस्तक आहे. लेखिका-निवेदिका आणि पटकथाकार मुग्धा फडके यांनी डॉ. संजीवनी केळकर प्रतिष्ठानच्या असंख्य कार्यकर्त्या आणि सांगोल्यातल्या आम स्त्रियांना बोलतं केलं. साध्या, रसाळ भाषेतलं हे शब्दांकन (प्रकाशक : देशमुख आणि कंपनी, प्रा. लि., पुणे) वाचनीय आहे. स्टोरी टेलिंगच्या अंगानं जाणारं आहे.

संजीवनीताई गोडबोले मूळच्या पुणेकर. हुजूरपागेत शिकल्या. बी. जे. मेडिकलमधून एमबीबीएस केलं नि 1973 मध्ये लग्न करून सांगोल्याला आल्या. सासरे वैद्यकीय अधिकारी, पती सतीश केळकर हे डॉक्टर. माहेर-सासर विद्याप्रेमी आणि सधन.

1970च्या दशकात सांगोल्याला एकही महिला डॉक्टर नव्हती. एकतीस वर्षं संजीवनीताई या एकमेव स्त्रीडॉक्टर. त्यामुळे गावातल्या महिलांना हायसं वाटलं. ताईंनी आस्ते आस्ते महिलांची मनं जिंकली. सांगोल्यासाठी काहीतरी ठोस केलं पाहिजे असं मनाशी म्हणत म्हणत त्या गावाशी, तिथल्या मातीशी नि लोकांशी तादात्म्य पावत होत्या.

सांगोल्यात पाण्याचं दुर्भिक्ष. 1972च्या दुष्काळात तर गाव होरपळून निघालं. शोषित, गोरगरिबांचं जिणं धारेस लागलं. गरिबी आणि अज्ञानाचा मोठा फटका स्त्रियांना बसत होता.

दुसरीकडे, आम प्रजा कर्मकांड आणि बुरसटलेल्या रीतिरिवाजांच्या जबड्यात सापडलेली. आर्थिक सुस्थिती नसल्यामुळे गावात विषमता पुष्कळ. पुरुषांना दारू, तंबाखूचं व्यसन; शिवीगाळ नि भाऊबंदकीची पुष्कळ प्रकरणं; आधुनिक जगाशी गावाची अजिबात ओळख नाही.

सांगोल्याचे एकूण बरेच वांधे झाले होते.

पारू नावाची मुलगी संजीवनीताईंकडे कामाला होती. हुशार आणि कष्टाळू. तिचा नवरा संशयी. बायकोला मारहाण करायचा. एके दिवशी त्यानं पारूच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिलं.

संजीवनीताई सुन्न झाल्या. पारू जळून मेली; पण संजीवनीताईंच्या मनात एक ठिणगी पडली. पारूची नीट माहिती आपल्याकडे असती तर आपण तिला कदाचित वाचवू शकलो असतो अशी खंत वाटली.

संकटं आणि अभावग्रस्त जिण्यामुळे सांगोल्याचे लोक कणखर. स्त्रिया काय नि पुरुष काय. बायाबापड्या म्हणायच्या, 'चिंचेच्या पानाच्या पत्रावळ्याही आम्ही करू'.

संजीवनीताईंनी पाच-सहा समविचारी, सुशिक्षित स्त्रियांचा एक गट तयार केला आणि आम महिलांच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरू झाला. दुसरीकडे, महिला आणि बालकांसाठी नेमकं काय करता येईल याचा विचारही सुरू झाला. अशा विचारमंथनातून 1978 मध्ये माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठाणची सुरुवात झाली. 1981 मध्ये ट्रस्टची रीतसर नोंदणी झाली. त्याला जोड म्हणून महिला सहविचार केंद्र सुरू झालं. हे संजीवनीताई आणि सांगोल्यातल्या स्त्रिया नि कार्यकर्त्यांचं think tank.

शिवाय, संजीवनीताईंनी जिजामाता बाल संस्कार केंद्र सुरू केलं. लहानग्यांच्या मनाला आणि बुद्धीला शिस्त लागली. पाच ते पंधरा वयोगटातल्या मुला-मुलींना शिक्षणाची गोडी लागली. तोंडातल्या शिव्या गेल्या. जातीचा उल्लेख करणं कमी-कमी होत गेलं.

मुलांचं गार्ड छान चालतंय, म्हणताना स्त्रियांनी संजीवनीताईंकडे शाळेचा लकडा लावला. आपल्या मुलांना इतर शाळा नकोत; गावात आपलीच एक छान बालवाडी असायला हवी हा विचार बळावला.

पण 'दामाजीपंता'चं काय करायचं? पैशाचं सोंग रचणं महाकठीण. दुसरं, बालवाडीतल्या मुलांना शिकवणार कोण? स्त्रिया म्हणाल्या, "ताई, तुम्ही आम्हाला शिकवा आणि आम्ही मुलांना शिकवू". स्त्रियांनी पोस्टल कोर्सची माहिती मिळवली.

शाळेसाठी निधी उभा करणं गरजेचं होतं. व्याख्यानमाला, नाटक, शास्त्रीय संगीताची मैफील वगैरे पांढरपेशी कार्यक्रम सांगोल्याला चालले नसते. संजीवनीताईंनी गावात विजय रघुवीर यांच्या जादूच्या प्रयोगाचा खेळ लावला. सगळा खर्च वजा जाता वीस हजार रुपयांचा निधी उभा राहिला. पुढे शाळेचा पसारा वाढला. 'वनस्थळी'च्या निर्मलाताई पुरंदरे तसंच हेमा होनवाड वगैरे ज्येष्ठांचं मार्गदर्शन मिळालं.

मंगलाबाई लाटणे आणि पार्वती दौंडे यांचा निर्धार वाखाणण्यासारखा. आपण शाळेत शिक्षिका म्हणून काम करायचं असं दोघींनी ठरवलं. जेमतेम सातवीपर्यंत शिकलेल्या दोघी पुन्हा शिकू लागल्या आणि दहावीच्या परीक्षेला बसल्या. स्वयंपाक, मुलांची उस्तवार काढणं; शिवाय, स्वतःचा अभ्यास नि मुलांना शिकवणं यांत अख्खा दिवस जायचा; पण रात्री भुईवर पाठ टेकताना थकलेल्या मनाला समाधान लाभायचं.

महिलांनी किती छळ सोसायचा? सुमनताई कांबळेंचे पती अकाली गेले. मुलगा लहान. खरं तर विम्याची 65,000ची रक्कम मुलाला मिळायची; पण तो सज्ञान नव्हता. सुमनताई सासऱ्याला म्हणाल्या, "विम्याची रक्कम मुलाच्या नावानं असू दे. पालनकर्ता म्हणून तुम्ही रहा".

एकदा सासऱ्यानं सुमनताईंची एका चेकवर सही मागितली. संजीवनीताईंना हे कळलं. 'कुठल्याही कागदावर सह्या करू नकोस', असा निरोप सुमनला पाठवला.

त्यातून बखेडा उत्पन्न झाला. सासऱ्यानं सुमनताईंना बेदखल केलं. संजीवनीताईंनी त्यांना पुण्याला पाठवलं. संजीवनीताईंच्या आई पुणे महिला मंडळातर्फे बालवाडी चालवत असत.

संजीवनीताईंच्या माहेरी राहून बालवाडीचं व्यवस्थापनतंत्र, कामकाजाची आणि हिशोब ठेवण्याची पद्धत असं सगळं सुमनताईंनी तीन महिन्यांत शिकून घेतलं. सांगोल्याला परत आल्या आणि बाल-मंदिराच्या मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या.

दुसरं उदाहरण शारदा रणदिवें यांचं. जेमतेम शिक्षण नि तीन रुपये रोजच्या मजुरीवर काम करणाऱ्या शारदाताई तेहतीस टक्के आरक्षणाचा कायदा आल्यावर गावच्या सरपंच झाल्या नि प्रतिष्ठाणच्या प्रशिक्षण वर्गात बसून आठवडभराचा अभ्यासक्रम पुरा केला.

सांगोला आणि आजूबाजूच्या परिसरात सुमनताईंसारख्या असंख्य स्त्रिया. त्यांना न्याय मिळावा म्हणून महिला अन्याय निवारण समितीची स्थापना झाली. त्याच सुमारास सांगोला सिव्हिल कोर्टानं महिलांसाठी विनामूल्य कायदेविषयक सल्ला केंद्र सुरू केलं होतं.

पीडित, गरजू महिलांना विनामूल्य सल्ला देणं गरजेचं आहे; परंतु भीती आणि संकोचापायी गरजू महिला पुढं येत नाहीत असा अनुभव. पीडित महिलांना विनामूल्य कायदा सेवा केंद्रात पाठवा, अशी कोर्टानं समितीला विनंती केली. सांगोल्याच्या स्त्रियांचं धैर्य या भांडवलावर संजीवनीताईंनी संस्थेचा संसार उभा केला नि भरभराटीस आणला.

लक्ष्मीची केस वाचून मनाला चरे पडले. 

नेहमीचीच गोष्ट. लक्ष्मीनं संसारासाठी कष्ट उपसायचे. दगडू तिचा नवरा. एक नंबरचा दारुडा. दारूसाठी लक्ष्मी पैसे देत नाही म्हणताना दगडूनं एके दिवशी घरभर धुमाकूळ घातला; घरातलं असेल नसेल ते किडूकमिडूक बाहेर फेकून दिलं; चुलीवर घडाभर पाणी ओतलं नि कहर म्हणजे लहान बाळाला उचललं नि भिरकावून दिलं. सुदैवानं, कापडाच्या ढिगाऱ्यावर अलगद पडलं म्हणून बाळ बचावलं.

लक्ष्मी धावत पळत प्रफुल्लता देशपांडे यांच्या घरी गेली. प्रफुल्लताताई माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या धडाडीच्या कार्यकर्त्या. लक्ष्मीनं घडलेला प्रसंग प्रफुल्लताताईंना डोळे पुसत पुसत सांगितला. त्यांनी तिला दोन दिवस आपल्या घरी आसरा दिला.

लक्ष्मीच्या नवऱ्याला सुगावा लागला. नवऱ्याचा छळ नको म्हणून प्रफुल्लताताईंनी लक्ष्मी नि तिच्या मुलांना गुपचूप आपल्या शेतमळ्यात पाठवून दिलं. तर दगडूनं प्रफुल्लताबाईंच्या नवऱ्याची यथेच्छ बदनामी सुरू केली. एक बायको घरी नि एक शेतावर, वगैरे.

'देवराई'त अशा पुष्कळ कथा आहेत. काळजाचे काप काढणाऱ्या नि हृदयद्रावक. पण, पुस्तकाचा मूळ सूर विधायक आहे. संकटाशी दोन हात करायला स्त्री, मग ती शहरातली असो वा ग्रामीण भागातली, सायलेंट डिग्निटीनं नि निर्धारानं उभी राहते. अशी पुष्कळ उदाहरणं पुस्तकात आहेत.

शाळा सुरू झाली; पण जागा पुरेशी नव्हती. काही वर्ग एका ठिकाणी तर काही दुसऱ्या जागी. मुख्याध्यापिकेला बसायला खुर्ची मिळे, टेबल नाही. फळा खुर्चीवर ठेवायचा. सगळा काटकसरीचा संसार. अनेक मुलं महिन्याच्या महिन्याला फी भरतीलच असं नाही; परंतु प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचं साहित्य तर द्यावं लागायचंच.

शाळेत वरच्या वर्गातली त्याचप्रमाणे आजूबाजूच्या खेडेगावांतून धनगर, शेतकरी, कासार, कुंभार वगैरे समाजांतली मुलं यायची. वाढदिवस असला की, आर्थिक तफावत लक्षात यायची. संपन्न घरांतले विद्यार्थी वर्गात महाग खाऊ वाटत. शाळेनं ही पद्धत बंद केली. ऐपत असेल तर भेटवस्तू म्हणून पेन्सिल खोडरबर वगैरे वर्गात वाटायला हरकत नाही; खाऊ नाही. तो शाळेतर्फे दिला जाईल.

ज्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस असेल त्याच्या घरी जाऊन त्याचं औक्षण करण्याची नि त्याला खाऊ देण्याची प्रथा सुरू झाली. हे काम शिक्षिका करायच्या. विद्यार्थी सधन कुटुंबातला असो वा आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाजातला असो; औक्षणाचा मान सगळ्या विद्यार्थ्यांना सारखाच मिळे.

अँड्र्यू लेडरर या भारतप्रेमी, दानशूर अमेरिकन गृहस्थामुळे शाळेला एक टुमदार एकमजली इमारत मिळाली. नि मधोमध खेळाचं मैदान !

लेडरर आणि त्यांचा मित्र रॉबर्ट कॉर्नवेल यांच्या 'बिल्ड अ स्कूल इन इण्डिया' या सामाजिक संस्थेमार्फत हा प्रकल्प सिद्ध झाला. भारतात जिथं जिथं गरज असेल नि संस्थेचा आर्थिक कारभार स्वच्छ असेल तिथं तिथं निधी देऊन शाळेचं बांधकाम करायचं हा संस्थेचा मुख्य उद्देश होता.

शाळेच्या पटांगणातली झाडं आस्ते आस्ते वाढू लागली. आकाशाला मिठीत घेऊ म्हणू लागली.

1983 मध्ये सुरू झालेलं बालक मंदिर आता 36 अध्ययन कक्ष असलेल्या उच्च माध्यमिक शाळेपर्यंत पोहोचलंय. दुसरीकडे, प्रतिष्ठाणनं 2005 मध्ये जलसंधारणाचं काम सुरू केलं. पहिला प्रकल्प सांगोला तालुक्याच्या संगेवाडी खेड्यात सुरू झाला.

छोटा बंधारा बांधला नि गावाच्या विहिरी आणि सभोवतालच्या 22 विहिरी पाण्यानं तुडुंब भरल्या. शिवाय, बचत गट, महिला सबलीकरण वगैरे कामं सुरू होतीच. महिला सभागृह बांधलं. तिथं संगणकवर्ग, शिवणवर्ग, संगीत-नृत्य वगैरे उपक्रम सुरू झाले.

माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या कामाचा व्याप पाहून मन थक्क होतं. स्त्री शक्तीचा हा एल्गार गौरवशाली आणि प्रेरक आहे. 'देवराई' वाचून हातावेगळं कधी झालं कळलं नाही. वाटलं की, सुविद्य, सुशिक्षित स्त्रिया आणि ग्रामीण भागातल्या महिला यांच्यातली दरी कमी झाली तर परिवर्तनाचा प्रवास निर्वेध होईल.

सह-वेदना हा माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानचा कणा आहे, असं संजीवनीताई म्हणतात नि हीच 'देवराई'ची धडकन आहे.

समाजाकडे काळीज हवं.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

  1. gMqXLtSUMbeIINxTNZhpx- 11 May 2026

    fsxErQMfvxZkbsuzWE

    save

  1. gMqXLtSUMbeIINxTNZhpx- 11 May 2026

    fsxErQMfvxZkbsuzWE

    save



साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके