डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

विकास योजनेच्या नावे भारतामध्ये अनुदान- सबसिडी संस्कृती रूजवण्यात  आली व त्यामुळे सार्वभौम जनता याचक बनली तर राज्यकर्ते व नोकरशहा दाते बनले.ही लोकशाहीच्या घटनात्मक मूल्यांची पायमल्ली आहे. अनुदान संस्कृतीचे मानवी दौर्बल्य लक्षात घेता भ्रष्टाचार, मनमानी आणि अरेरावी हे व्यवच्छेदक लक्षण ठरते. त्यामुळेच अध्यायाच्या सुरुवातीला रिगनचे जे कोटेशन दिले आहे, ते सर्वसामान्य नागरिकांना एकदम अपील होईल. शासनाची मदत मिळताना जो त्रास होतो, तो खरे तर संवेदनक्षम रीतीने कारभार केल्यास नोकरशाही टाळू शकते. पण लक्षात कोण घेते?

‘The Most terrifying  words  in the English language are: I am from the Government and I And here to help‘

इंडियन एक्स्प्रेस या प्रसिद्ध दैनिकात संपादकीय लेखाच्या खाली 'Worldly Wise' या शीर्षकाखाली एक विचारप्रवर्तक व चिंतनीय असे एक कोटेशन असते. वरील कोटेशन दिनांक 13 नोव्हेंबरच्या अंकात प्रसिद्ध झाले आहे. ते वाचून मी काही क्षण विचारमग्न झालो.

मला वाटले, हे रोनॉल्ड रिगनचे कोटेशन भारतीय प्रशासनाला अतिशय चपखल बसते. शब्दश: आणि उपरोधिक अर्थानेही. शासकीय मदत म्हणजे अनेकांना ‘भीक नको पण कुत्रं आवर' असे वाटते. त्याचे अतिशयोक्ती उदाहरण म्हणजे विहिरीच्या चोरीची कथा.

आणखी जरा खोलात जाऊन मी विचार करू लागलो, तेव्हा जाणवले की, हा परिणाम भारतानं स्वीकारलेल्या लोककल्याण विकासनीतीचा तर नाही? आज मला भारतीय प्रशासनाच्या घटनात्मक पर्यावरणाचा म्हणजेच चौकटीचा परिचय करून द्यायचा आहे, त्या संदर्भात रिगनचे हे वाक्य सकारात्मक म्हणून स्वीकारायला काय हरकत आहे? त्याचे उत्तर मी लेखाच्या शेवटी देणार आहे.

मागील दोन अध्यायात आपण भारतीय प्रशासनाच्या सांस्कृतिक, आर्थिक व सामाजिक पर्यावरणाची माहिती घेतली. आज सरतेशेवटी घटनात्मक पर्यावरणाचा वेध घ्यायचा आहे. प्रशासकाला ज्या चौकटीत काम करायचे असते, ती चौकट या विविध प्रकारच्या पर्यावरणाने सिद्ध होत असते. त्याचे भान ठेवीत जो काम करतो,तो आदर्श प्रशासक मानला जातो.

भारतीय घटनेचा उद्देश काय आहे?

पंडित नेहरूंनी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये एका भाषणात म्हटले होते,‘The First task of the Assembly is to free India through a new constitution to feed the starving people and to cloth the naked masses and to give every Indian the fullest opportunity to develop himself / herself according to his/her capacity ‘

म. गांधींनी तरी स्वतंत्र भारताच्या विकासाच्या संदर्भात वेगळी काम अपेक्षा केली होती? तळागाळातील शेवटच्या माणसाचा शेवटचा अश्रूबिंदू टिपण्याचे काम भारत सरकारने करावे, हे त्यांचे स्वप्न होते.

भारतीय घटनेमध्ये पं. नेहरू व म.गांधींच्या या विचाराचे पूर्ण प्रतिबिंब पडलेले आहे. पुन्हा मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे उपेक्षितांचे भाष्यकार प्रतिनिधी म्हणून होते. त्यांच्या द्वारे भारतीय घटना सिद्ध झाली आणि आम्ही भारतीयांनी ती स्वीकारली.

देशाच्या व राज्याच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर निवडून आलेल्या खासदार व आमदारांचा सर्वांत ज्येष्ठ सदस्याच्या द्वारे शपथविधी संपन्न होतो. तसेच मंत्रिमंडळास राष्ट्रपती वा राज्यपाल शपथ देतात. हे शपथविधी समारंभ टीव्हीवर पहायला मला भारी आवडते (जरी ते एकसुरी व काहीसे कंटाळवाणे असले तरी). त्याचे एक कारण आहे, ते म्हणजे भारतीय राज्यघटनेचे त्याद्वारे अधोरेखित होणारे महत्त्व. कारण त्यांनी शपथ घेताना देशाची एकात्मता व अखंडता राखण्याचे अभिवचन द्यायचे असते. लोकप्रतिनिधी व मंत्रिपरिषदेस जे लोककल्याण व विकासाचे काम करायचे आहे ते ‘घटनाधिष्ठित व तिच्या चौकटीत', हे याद्वारे नागरिकांपुढे पुन्हा प्रकर्षाने येते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ‘आम आदमी'- या देशाचा नागरिक हा घटनेचा केंद्रबिंदू आहे. सारनाम्याप्रमाणे ‘आम्ही, या भारताचे लोक (We, the people of India)' यांनी ही घटना स्वत:प्रती समर्पित केली आहे. त्यामुळे आमदार-खासदार आणि मंत्री हे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांची सत्ता ही सामान्य नागरिकांच्या मताद्वारे त्यांना प्राप्त झाली आहे. खऱ्या अर्थाने आपण सार्वभौम असून ते लोकसेवक आहेत, ही भावना मला एक भारतीय नागरिक म्हणून रोमांचित करते.

26 नोव्हेंबर हा दिवस आपण काही वर्षांपासून ‘संविधानदिन' म्हणून पाळत आहेत. तो केवळ एक पाळायचा दिवस नाही, एक कोरडा शासकीय कर्मकांडाचा उपचार नाही; तर भारतीय जीवनशैली प्रभावित करणाऱ्या घटनेप्रति कृतज्ञता दिन आहे.

मागच्या एका 26 नोव्हेंबर या संविधानिक दिनाच्या वेळी मी भावुक होत जाहीर भाषणात म्हणालो होतो, ‘‘धर्माच्या संदर्भात वैयक्तिकरीत्या मी नास्तिक आहे. पण घटनेच्या सिद्धांताप्रमाणे सर्व धर्मांचा व धर्मवासियांचा मी आदर करतो. आणि जर घटनेला आपण देव मानणार असू, आपली गीता, आपले कुराण, आपले बायबल व आपला ग्रंथसाहिब मानणार असू, तर मी आस्तिक आहे, धर्मवादी आहे!"

मी भाषणात पुढे असेही प्रतिपादन केले होते की, मला शीख धर्माचे विशेष आकर्षण आहे. त्याचे कारण, शिखांचे दहावे धर्मगुरू गोविंदसिंगांनी त्यांच्या नंतर धर्मगुरूंची परंपरा खंडित करून ‘ग्रंथसाहिब' या ग्रंथालाच गुरू केले. भारतीय घटना हा भारताचा आधुनिक धर्मग्रंथ मानून भारतीयांनी त्यानुसार आचरण करावे असे मला वाटते. जसे मुस्लिम बांधव कोणत्याही पेचप्रसंगात कुराणाचे कोणतेही एक पान उघडतात, त्यात जो दिव्य संदेश असतो त्या आधारे समोरच्या पेचप्रसंगाला निष्ठेने सामोरे जातात; तसेच भारतात प्रशासन करताना प्रशासकांना कोणताही पेचप्रसंग उद्‌भवला तर त्याचे उत्तर भारतीय घटनेत निश्चित मिळते, अशी माझी केवळ श्रद्धाच नाही, तर ठाम विश्वास आहे. एक प्रशासक म्हणून मी याचे निष्ठेने पालन केले आहे, असे मी अभिमानपूर्वक म्हणू शकतो.

घटनात्मक पर्यावरणाचं स्वरूप

कोणत्याही देशाचे प्रशासन हे त्या देशाची घटना व त्याद्वारे निर्माण होणाऱ्या कायद्याच्या चौकटीत चालते व चालले पाहिजे. आधुनिक प्रशासनाची ती आद्य अट आहे. सर्वच देशांच्या घटनानिर्मितीमागे त्या त्या देशाचे लोककल्याणाचे विशिष्ट असे तत्त्वज्ञान असते, काही खास मूल्ये, संस्कार व जीवनश्रद्धा असतात. त्या साऱ्यांचे प्रतिबिंब देशाच्या घटनेत पडणे अपरिहार्य असते, नव्हे तसे पडले नसेल तर ती घटना अप्रस्तुत ठरते.

भारतीय घटना याला अपवाद नाही. उलटपक्षी ती भारतीय संस्कृती, सामाजिक स्थिती, इतिहास आणि समाजजीवनाचा विचार करून येथील नागरिकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रचंड विचारमंथनाद्वारे बनविण्यात आली आहे. आपल्या घटनेची दोन मूलभूत तत्त्वं आहेत, ती म्हणजे लोककल्याण (Public Welfare) आणि कुणाबाबतचा भेदभाव नसणे (Non-discrimination against any community). भारतीय घटनेची तत्त्वं ही केवळ पुस्तकी नियमांनी बद्ध नाहीत, तर ती प्रत्यक्ष अंमलबजावणीची आहेत.

भारतीय घटनेची प्रधान वैशिष्ट्यं एका वाक्यात सांगायची झाली तर अशा रीतीने सांगता येतील.

सर्वंकष (comprehensive) लिखित स्वरूप, एक नागरिकत्व, सार्वभौम व लोकशाही प्रजासत्ताक (Sovereign and democratic republic), सेक्युलर समाजवादी व कल्याणकारी राज्य, कर्मठता व लवचिकतेचं अपूर्व मिश्रण (A happy mixture of rigidity and flexibility), संसदीय पद्धतीचे सरकार (Parliamentary form of Government), केंद्रीभूत पद्धतीचे संघराज्य (Federation with unitary features), मूलभूत हक्क व कर्तव्याचे वर्णन, राज्य धोरणासाठी मार्गदर्शक तत्त्वे, निष्पक्ष व स्वतंत्र न्यायव्यवस्था, मागासवर्ग व अल्पसंख्यांकांसाठी विशेष प्रावधाने आणि जागतिक शांतता व सहकार्यावर विश्वास.

थोडक्यात, भारतीय प्रशासनाचे घटनात्मक पर्यावरण हे त्याच्या कामाची चौकट सिद्ध करते, त्या चौकटीत घटनेचे शब्दश: व भावार्थाने (Letters and spirit) पालन करणे हे प्रशासकाचे कर्तव्य आहे, तो त्याचा घटनात्मक धर्म आहे!

भारतीय प्रशासनाचे घटनात्मक पर्यावरण समजून घेताना दोन बाबी महत्त्वाच्या आहेत. एक घटनात्मक चौकट(Constitutional Framework) आणि घटनेची मूल्ये(Value of constitution).

घटनात्मक चौकट (Constitutional Framework)

प्रत्येक  देशाच्या घटनेचे एक स्वत:चे एतद्देशीय तत्त्वज्ञान असते, काही मूल्ये व तत्त्वे असतात. त्या आधारे सरकारची-शासनाची रचना व कार्यपद्धती ठरली जाते. भारतीय घटना त्याला अपवाद नाही.

भारतीय घटनेची चौकट ही सारनाम्याने- preamble ने सिद्ध झाली आहे. तिची शब्दरचना अत्यंत समर्पक व अभिजात कवितेसारखी आहे. मूळ इंग्रजी वाक्यरचना एवढी आखीव-रेखीव आहे की त्यातला एकही शब्द कमी जास्त करता येत नाही. 1976 च्या 42व्या घटनादुरुस्तीनंतर आज अस्तित्वात असलेला हा सारनामा मूळ इंग्रजीत पुढील विवेचनासाठी उद्‌धृत करणे आवश्यक आहे.

‘We the people of India, having solemnly resolved to constitute India in to a sovereign socialist, secular Democratic Republic, and to secure all its citizens: justice, social, economic and political liberty of thoughts, expression, belief, faith and worship; Equality of status and opportunity and to promote among them all, Fraternity assuring  the dignity of the individual and unity and integrity of the nation; IN OUR CONSTITUTION ASSEMBLY this twenty sixth day of November 1949 to HEREBY ADOPT, ENACT AND GIVE TO OURSELVES THIS CONSTITUTION..‘

या सारनाम्याद्वारे भारतीय जनतेचे सार्वभौमत्व अधोरेखित होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दांत सांगायचे झाले तर ‘I say that the preamble embodies what is the desire of every member of the House, that this constitution should have its roots, its sovereignty, its authority from the people. That it has.‘

सारनाम्याचे व त्याद्वारे भारतीय घटनेचे महत्त्व विशद करताना कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे हे निरीक्षण मार्मिक व महत्त्वाचे आहे.

‘The preamble emphasis the ultimate authority of the people from whose will the constitution emerges. Thus in the affairs of the state, it is the will of the people that prevails, ultimately and not the will of few selfish individuals. This is the principle of popular sovereignty.‘

या घटनेप्रमाणे भारत हा सार्वभौम, समाजवादी, सेक्युलर प्रजासत्ताक देश आहे. या देशाची मूल्ये आहेत- न्याय,स्वातंत्र्य, समता व बंधुभाव.

भारताच्या घटनेचा हा सारनामा एक सर्वोत्तम असा लिखित मसुदा मानला जातो. त्यात भारतीय घटनेचे प्राणतत्त्व आहे,भारतीय नागरिकांची मनीषा व निर्धार आहे: एक नवा स्वतंत्र व सार्वभौम जनतेची सत्ता असणारा देश घडविण्याचा.

भारतीय प्रशासकांनी व ब्युरोक्रसीने भारतीय सारनामा राष्ट्रगीताप्रमाणे तोंडपाठ केला पाहिजे व त्याचे नित्य स्मरण व भान ठेवले पाहिजे, तरच ते जबाबदार प्रशासन देऊ शकतील. त्यांची प्रत्येक  कृती, काम व आदेश हा याच्याशी सुसंगतच असला पाहिजे.

भारतीय घटनेची मूल्ये (Values of constitution)

भारतीय प्रशासन व्यवस्थेचे स्पष्ट आकलन होण्यासाठी, भारतीय घटनेची मूलभूत तत्त्वे समजून घेणे आवश्यक आहे. तीखा ली थोडक्यात नमूद केली आहेत.

शासनाचे ध्येयधोरण : भारतीय घटनेचा सारनामा भारतीय प्रजासत्ताक व अर्थातच शासनाचे ध्येयधोरण ठरवतो. या ध्येयधोरणाचे खालील महत्त्वाचे घटक आहेत-

1) चार मूल्ये: न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव हे प्रत्येक  भारतीय नागरिकास मिळवून देण्याचे ध्येय सारनामा उद्‌घोषित करतो. फ्रेंच राज्यक्रांतीच्या त्रिसूत्रीमध्ये ‘न्याय' मिळवून ही चार मूल्ये भारतीय घटनेच्या सारनाम्यात समाविष्ट केली आहेत. ही मूल्ये भारतीय घटनेचे चार स्तंभ आहेत.

अ) न्याय (Justice) : याची शास्त्रशुद्ध व्याख्या करायची झाली तर ती ‘व्यक्तिगत आचरणाचे समाजाच्या सर्वसाधारण कल्याणाशी सुसंवादित्व' अशी करता येईल. (A harmonious reconcilement of individual conduct with the general welfare of society.) न्यायाचे मूलतत्त्व हे सर्वांचे कल्याण साधणे होय. त्याची व्याप्ती सामाजिक,आर्थिक व राजकीम घटकांपर्यंत सारनाम्याने वाढवत नेली आहे.

ब) स्वातंत्र्य (Liberty) : हे एक सकारात्मक मूल्य आहे. तसेच ते कोणत्याही पद्धतीच्या व्यक्तिगत कृतीच्यास्वातंत्र्याचा संकोच या नकारार्थी अर्थाचे मूल्य नाही. प्रत्येक नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी निर्माण करावयाची परिस्थिती म्हणून घटना स्वातंत्र्याकडे पहाते.

स्वातंत्र्यामध्ये विचार, उच्चार, विश्वास, श्रद्धा आणि धर्मउपासनेचे स्वातंत्र्य अंतर्भूत आहे. थोडक्यात, प्रत्येक माणसाच्या विकासासाठी सर्वांगीण स्वातंत्र्य हवे असते, तेदेण्याचे अभिवचन सारनाम्यात आहे.

क) समता (Equality): हजारो वर्षे जातिव्यवस्थेने भरडल्या गेलेल्या पददलितांसाठी तसेच मुख्य समाजप्रवाहापासून आजही दूर असणाऱ्या आदिवासी समाजासाठी समता हे अत्यंत महत्त्वाचे मूल्य व तेवढाच मौलिक अधिकार आहे. दर्जा व संधीची समता घटनेने भारतीयांना बहाल केली आहे.

ड) बंधुता (Fraternity) : ही एक व्यापक संकल्पना आहे. जी व्यक्तिगत आत्मसन्मान देते व भारताच्या एकता व अखंडतेप्रती प्रतिबद्धता अधोरेखित करते.

2) मूलभूत सप्त अधिकार : भारतीय घटनेने नागरिकांना काही मूलभूत अधिकार दिले आहेत. ते घटनेच्या तिसऱ्या भागात वर्णिले आहेत. खालीलप्रमाणे सात अधिकार प्रत्येक  नागरिकास प्राप्त आहेत.

1) समतेचा अधिकार (Right to equality), 2)स्वातंत्र्याचा अधिकार (Right to Freedom),3)शोषणाविरुद्धचा अधिकार (Right against Exploration), 4)भाषण स्वातंत्र्याचा अधिकार (Right to Freedom of speech), 5)सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार (Culture and Educational right ),6)मालमत्तेचा अधिकार (Right to property) (हा अधिकार1978 च्या चव्वेचाळिसाव्या घटनादुरुस्तीने रद्द केला आहे.), 7)घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार (Right to Constitutional Remedies).

3) मार्गदर्शक तत्त्वे (Directives Principles of state policy) : भारतीय घटनेच्या चवथ्या भागात एकूण 16 कलमांद्वारे मार्गदर्शक तत्त्वे नमूद केली आहेत. ती मूलभूत अधिकाराप्रमाणे कायद्याद्वारे कृतिप्रवण नसली तरी देशाचे विकासधोरण व कार्यक्रम आखताना विचारात घेतली जातात. मार्गदर्शक तत्त्वाबद्दलचे एक मार्मिक निरीक्षण असे आहे, 'The directive principles are positive obligations on the part of the government toward its citizens'

घटनेचे कलम 39 महत्त्वाचे आहे. त्याद्वारे राज्यास त्याची धोरणे आखताना खालील मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करणे क्रमप्राप्त आहे.

1) सर्व नागरिकांना जगण्याचा (Livelihood) अधिकार मिळवून देणे.

2) समाजाची सार्वजनिक संपत्ती व मालमत्ता सर्वांच्या हितासाठी वापरणे.

3) आर्थिक व्यवस्थेच्या चलनाने मूठभरांकडेच संपत्तीसंचय व उत्पादन साधनांची मक्तेदारी होऊ न देणे.

4) समान कामासाठी स्त्री व पुरुष दोघांना समान पगार.

5) स्त्री, पुरुष व बालकांचे आरोग्य आर्थिक शोषणाद्वारे बाधित न होऊ देणे.

6) बाल व युवकांचे शोषणाविरुद्ध संरक्षण करणे इ.

मार्गदर्शक तत्त्वामध्ये सर्वांना कामाचा अधिकार, प्राथमिक शिक्षणाचा अधिकार, वृद्धापकाळी अर्थसाहाय्य, सर्वांना चांगल्या दर्जाचे जीवन जगण्याचा अधिकार, मनोरंजन व आरामाचा तसेच सामाजिक वसांस्कृतिक संधीचा अधिकार आहे असे नमूद केले आहे.

या खेरीज घटनेच्या मूल्यांमध्ये समाजवादी व सेक्युलर प्रजासत्ताक, संसदीय लोकशाही, फेडरल राज्य व्यवस्था आणि न्यायपालिकेचे राज्य व्यवस्थेपासूनचे अलगत्व यांचा समावेश आहे.

हे संक्षेपाने भारतीय प्रशासनाचे घटनात्मक पर्यावरण आहे. ते ब्युरोक्रसीने नीट समजून घेतले पाहिजे, त्याचा सखोल अभ्यास केला पाहिजे. आपले काम, आपला आदेश व धोरणांची करावयाची अंमलबजावणी ही घटनेच्या या पर्यावरणाशी सुसंगत ठेवली पाहिजे.

साठ वर्षांची घटनात्मक वाटचाल

मागील साठ वर्षांत राज्य व केंद्रात निवडणुकीद्वारे वेळोवेळी सत्ताबदल होत गेला तरी सर्व लोकप्रतिनिधींचे घटनेच्या एकूण स्वरूपाबद्दल बहुतांश एकमत आहे. आपल्या आजवरच्या विकासाचा पाया लोककल्याण राहिला असून केंद्र व राज्य शासनाने त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अक्षरश: शेकडो योजना आखल्या आहेत. परंतु अजूनही त्याची शंभर टक्के सोडा पण अर्धीही अंमलबजावणी होत नाही, हे जसे राज्यकर्त्यांचे तसेच ब्युरोक्रसीचे मोठे अपयश आहे.

परंतु विकास योजनेच्या नावे भारतामध्ये अनुदान-सबसिडी संस्कृती रूजवण्यात  आली व त्यामुळे सार्वभौम जनता याचक बनली तर राज्यकर्ते व नोकरशहा दाते बनले. ही लोकशाहीच्या घटनात्मक मूल्यांची पायमल्ली आहे. अनुदान संस्कृतीचे मानवी दौर्बल्य लक्षात घेता भ्रष्टाचार, मनमानी आणि अरेरावी हे व्यवच्छेदक लक्षण ठरते. त्यामुळेच अध्यायाच्या सुरुवातीला रिगनचे जे कोटेशन दिले आहे, ते सर्वसामान्य नागरिकांना एकदम अपील होईल. शासनाची मदत मिळताना जो त्रास होतो, तो खरे तर संवेदनक्षम रीतीने कारभार केल्यास नोकरशाही टाळू शकते. पण लक्षात कोण घेते?

जरा वेगळा विचार केला तर रिगनचे कोटेशन ब्युरोक्रसी सकारात्मकतेने घेऊ शकते. घटनेच्या उदात्त मूल्यांप्रमाणे लोककल्याण व विकासाच्या योजना आखणे, अनुदान-कर्ज वइतर साहाय्य देणे हे शासनाचे आद्य कर्तव्य आहे. नोकरशाही अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे, त्यामुळे 'I am from Government and I am here to help'  ही भूमिका प्रशासकाची असली पाहिजे व तीही सकारात्मक. आपण जनतेला मदत करतो म्हणजे उपकार करीत नाही, तर ते आपले कर्तव्य या भावनेने केले तर रिगनचे हे कोटेशन ‘टेरिबल' न वाटता, आम नागरिकास ‘प्लेझरेबल' वाटेल. अनेकजण आपापल्या जागी हे करीत आहेतच, पण त्याचे प्रमाण वाढून नागरिकांना व समाजाला त्याचा प्रभाव जाणवेल तो सुदिन!

(लेखक गेली 25 वर्षे प्रशासकीय सेवेत असून, सध्या कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आहेत.)

Tags: भारतीय प्रशासन लक्ष्मीकांत देशमुख घटनात्मक पर्यावरण नोकरशाही अधिकारी भारतीय व्यवस्थापन Fraternity Equality Liberty Justice Value of constitution Preamble constitutional Framework Non Discrimination Public welfare constitutional environment Bureaucracy Bakhar Bhartiya Prashasanachi laxmikant Deshmukh weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

लक्ष्मीकांत देशमुख
laxmikant05@yahoo.co.in

 भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी, लेखक व बडोदा येथे २०१७ सालच्या डिसेंबरमध्ये झालेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात