डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

तेरेसा यांना त्यांच्या मृत्युपश्चात ‘संतपद’ देण्यासाठी व्हॅटिकनने मदरच्या नावाने काही ‘दैवी चमत्कार’ घडले आहेत का, यासंबंधात छाननी केली होती. एकविसाव्या शतकातही चमत्काराचे असे बुरसटलेले निकष पाळले जाणे, हे अविवेकीच होते. ज्या मदरने त्यांची उभी हयात मानवजातीची सेवा करण्यास घालविली, त्या कोलकत्यातील हजारो उपेक्षितांसाठी जिवंतपणीच संत होत्या. कोणा व्हॅटिकनच्या स्टॅम्पची त्याला गरज नव्हती. अर्थात ‘दैवी निकष’ वगैरे तसे फक्त निमित्तच; खरे कारण काही वेगळेच होते. असे ‘दैवी’ निकष वापरून ‘संतपद’ दिल्याने चर्चला बरेच फायदे असतात. त्या संतांच्या नावाने अधिकृतरीत्या चर्च उभारता येते, त्या संतांचे विविध सण तयार करता येतात, विविध प्रार्थना पुस्तके-तसबिरी-मूर्ती यातून मग चर्च आपल्या आर्थिक समृद्धीसाठी या ‘संतांचे’ इव्हेंटीकरण करते.

दर वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये गणपतीच्या काळात आम्ही सर्व कॉलेजमित्र रोहितच्या घरी जमायचो. किंबहुना, आम्हा कॉलेजमित्रांसाठी वर्षभरातून एकदा एकत्र भेटण्याचे ते निमित्तच झाले आहे. रोहितच्या घरी गणपतीसाठी जाण्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे सर्व मित्रांची होणारी भेट. दुसरे आकर्षण म्हणजे, त्याच्या घरी त्याच्यासोबत त्याचे क्रिकेटप्रेमी वडील- त्यांच्याशी गप्पा मारणे. तिसरे कारण म्हणजे, गणपतीनिमीत्त रोहितच्या आईने बनवलेले अतिशय रुचकर असे गाईच्या शुद्ध तुपात केलेले रव्याचे लाडू व अळूच्या पानांची वडी हे पदार्थ. त्या वर्षीही मी रोहितच्या घरी पोहोचलो. गिरीश सोडून बाकी सर्व जण- राकेश, नागेश, कार्तिक हे मित्र- तिथे जमले होते. रोहितच्या घराला लागून असलेल्या जुन्या घरी प्रतिष्ठापना केलेल्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो.

रोहितने त्या वर्षीही शाडूच्या मातीच्या मूर्तीची प्रतिस्थापना केली होती. एकदम एको-फ्रेंडली असा तो गणपती होता. जरी तो दिसण्यास खूप मोठा वाटत असला, तरी तो उचलण्यास फारच हलका होता. तिथेही आम्ही गणपती समोर ठेवलेला नैवेद्य खाल्ला आणि परत रव्याचे लाडू अन्‌ अळूवडीवर ताव मारत रोहितच्या घरी हॉलमध्ये गप्पा मारत बसलो.  असाच विषय निघता-निघता मी रोहित व त्याच्या कुटुंबीयांना अनिमेशबापूंविषयी विचारले. रोहितचे कुटुंबीय अनिमेशबापूंचे निष्ठावंत भक्त होते, हे मला माहीत होते. कॉलेजमध्ये असताना दर गुरुवारी रोहित तिथे हजेरी लावायचा- किंबहुना, त्याने नोकरीही अशी बघितली होती की, तिथून गुरुवारी त्याला दोन तास तिथे प्रार्थनेस जाण्यास परवानगी मिळेल. आम्हाला ते काहीसे अती व अविवेकी वाटले होते. आम्ही मित्रांमध्ये याविषयी चर्चा केली होती आणि रोहितलाही ‘शिक्षण, करिअर हे महत्त्वाचे आहे; बाकी सर्व गोष्टींना प्राधान्य नंतर दे’ हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्याचे बापूप्रेम खूपच अंध होते.

त्यामुळे तो इतिहास आठवून मीच त्याच्याकडे बापूंचा विषय काढला की, ‘तू अजूनही तिथे जातोस का? आणि हे बाबा तुम्हाला एवढे का आवडतात?’ असे विचारताच रोहितने अनिमेशबापूंची जी काही माहिती दिली, ती ऐकून मी अगदी अचंबितच झालो. अनिमेशबापूंचे जवळजवळ दोन लाख अनुयायी आहेत. रोहितच्या मते, ते आपल्या प्रवचनात जीवनोपयोगी अशा प्रॅक्टिकल गोष्टी सांगत असतात. अनिमेशबापूंनी बरीच अशी गावे दत्तक घेतली आहेत. ते तिथे वैद्यकीय शिबिरे भरवत असतात. तसेच त्यांचे जे प्रचंड अनुयायी आहेत, ते त्यांच्या सामर्थ्याचा सुयोग्य वापर करून घेतात. कधी एखाद्या प्रार्थनासभेत ते अनुयायांना एखादा गोड पदार्थ बनवून आणण्यास सांगतात. ज्यांना शक्य आहे असे अनुयायी तो पदार्थ बनवून आणतात. ज्यांनी तो पदार्थ बनवून आणला आहे त्या सर्वांचा पदार्थ एकत्र केला जातो आणि ज्या गावात ज्यांनी कधीही गोड खाल्लेले नाही, त्यांना तो वाटला जातो.

यासंदर्भात रोहित त्याचा अनुभव सांगत होता. एकदा बापूंनी जिलेबी बनवून आणण्यास सांगितले होते. रोहितच्या आईनेही तिला जेवढी शक्य होती तेवढी जिलेबी बनवून नेली. नंतर त्यांच्या स्वयंसेवकांनी ती सर्व जिलेबी एकत्र करून एका दुष्काळग्रस्त गावात वाटण्यास नेली. ती वाटप करण्यासाठी रोहित आणि त्याची आईही त्यांच्यासमवेत गेले होते. त्या दुष्काळग्रस्त गावातील काही मुलांनी जिलेबी हा पदार्थ त्यांच्या आयुष्यात कधीही खाल्लेला नव्हता. तो खाताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्यांना खूपच सार्थक झाल्यासारखे वाटत होते. अनिमेशबापूंनी त्यांच्या अनुयायांचा अशा बऱ्याच विधायक कार्यांत अतिशय चपखल असा वापर करून घेतला आहे. मग वाहतूक नियंत्रण समिती का असेना. ज्या-ज्या विभागात वाहतुकीची कोंडी होते व जिथे ट्रॅफिक पोलिसांची शक्ती कमी पडते, तिथे ही समिती जाऊन उत्स्फूर्तपणे ट्रॅफिक मॅनेज करते. तसेच ‘डिझास्टर मॅनेजमेंट’ म्हणून त्यांची टीम आहे, जी आपत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांना मदत करायला जात असते.

बापूंनी आणखी एक कल्पना काढली आहे. ती म्हणजे- त्यांनी त्यांच्या बऱ्याच अनुयायांना चरखा दिलेला आहे. चरख्यावर आपण जेव्हा एक तास कापूस काततो, तेव्हा सुताचे एक रीळ तयार होते. अशी 40 रिळे 20 मीटरचे कापड बनवू शकतात. त्यामुळे ते त्यांच्या अनुयायांना आवाहन करतात की, तुम्हाला प्रत्येक आठवड्याला किंवा प्रत्येक वर्षाला काही ठरावीक प्रमाणात चरख्यावर कापूस कातायचा आहे आणि त्यातून जे काही सूत तयार होईल, त्याचे कापड केल्यावर गरिबांमध्ये वाटले जाईल. बापूंविषयी रोहित भरभरून बोलत होता.

अर्थातच बापूंच्या काही गोष्टी मला बिलकुल पटलेल्या नव्हत्या. त्यातील एक म्हणजे, त्यांनी स्वतःला देवाचा अवतार जाहीर करणे. हे कोणत्याच विवेकी माणसाला पटण्यासारखे नव्हते. परंतु त्यांना देव मानून जे अनुयायी जमलेले होते, त्यांच्या शक्तीचा ते खूपच सकारात्मक रीतीने वापर करून घेत असल्याचे दिसत होते. त्या आठवड्यात जी आमची विवेकमंचाची सभा होती, त्यात मी तो विषय काढला. त्या दिवशी सभेसाठी आमच्या नेहमीच्या सदस्यांसोबतच समाज विकास मंडळाचे अध्यक्ष जॉन आल्मेडाही उपस्थित होते, तसेच पतपेढीचेही कार्यकारी अध्यक्ष शिरीष आल्मेडा हेदेखील सभेला उपस्थित होते. शिरीष आल्मेडा हे फ्लोरी व सोनल यांचे डॅडी. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा हे दोघे मंचाच्या सभेस यायचेच व प्रत्यक्ष सहभाग घ्यायचे. मंडळात इतरही पदाधिकारी होते; पण विवेकमंचात काय चालते, हे जाणून घेण्यात त्यांना काडीचाही रस नव्हता. हे दोघे मात्र चर्चेत सक्रिय सहभागीही होत असत.

मी विषय मांडून चर्चेला सुरुवात केली... ‘‘एखाद्या धर्मावर वा बापूवर विेश्वास ठेवून जर लोकांकडून अशी समाजपयोगी कामे होत असतील, तर ते चांगले नाही का?’’ आणि मग अनिमेशबापूंबद्दल जे मी सर्व  रोहितकडून ऐकले होते, ते उपस्थितांना सांगितले. सरांनी त्याला उत्तर देताना म्हटले, ‘‘महात्मा गांधींनीसुद्धा लोकांची ‘तारणहार मसीहा’ हवा असल्याची वृत्ती ओळखली होती. लोकांना कोणी तरी मसीहा हवा असतो. एकदा का असे रूप त्या व्यक्तीमध्ये दिसले की, मग ती व्यक्ती जे काही सांगेल ते करायला ते तयार असतात. त्यामुळे ते ठिकठिकाणी प्रार्थनासभेचे आयोजन करायचे, प्रार्थनासभा आहे म्हटल्यावर लोकही तिथे जमायचेच. मग त्या सभेतून देशभक्तीच्या किंवा चांगल्या गोष्टी पोहोचवण्याचे कार्य ते करायचे. त्यांनी देशकार्यसाठी सभा घेतली असती, तर कदाचित इतके लोक जमले नसते. महात्मा गांधींनी लोकांची ही नस खूपच चांगली ओळखली होती.’’

‘‘तसे पाहिले तर या धार्मिक नेत्यांकडे खूप मोठी ताकद आहे; फक्त त्यांनी ती जबाबदारीने घेणे गरजेचे आहे. किंबहुना, आपल्या चर्चमध्येसुद्धा प्रवचनात विवेकी विचार जर सातत्याने येत गेले, तर समोरच्याचे परिवर्तन होण्यास वेळ लागणार नाही.’’ आशादायी सूर आळवीत सुनीला म्हणाली. मंडळाच्या अध्यक्षांचे या बाबतीत वेगळे मत होते. ‘‘अनिमेशबापूंच्या एका कार्यक्रमात मी गेलो होतो. बापू जेव्हा स्टेजवर आले, तेव्हा त्यांच्या अनुयायांनी त्यांचे पाय दुधाने धुतले. एका पसरट भांड्यात ते दूध ठेवलेले होते, त्यामध्ये अनिमेशबापूंनी त्यांचे पाय ठेवले. नंतर त्यांचे जे स्वयंसेवक आजूबाजूला होते, त्यांना ते दूध पिण्यास दिले. ते बघून मला छी-थू करावेसे वाटले. मी त्या सभेतून उठून आलो. हे कसले बाबा; हे तर भोंदू बाबा!’’ त्यांच्या वक्तव्याला राम देशमुख यांनीही साथ दिली, ‘‘हे भोंदूबाबाच आहेत. हे म्हणजे स्वतःचे पोट भरून तृप्तीची ढेकर आल्यावर त्यांची शक्ती अशा समाजोपयोगी कार्यात ते लावत असतात. अशा बापूंच्या कार्याची तुलना उच्च प्रतीचे जे समाजसेवक आहेत, त्यांच्याशी करणे खूप चुकीचे आहे. चोर चोरी करून दान-धर्म करत असेल, तर ते चूक की बरोबर- यासारखाच हा प्रश्न आहे. आणि ते वाईटच. कारण त्यांच्यामागे प्रेरणा चुकीची आहे, अविवेकी आहे. ते लोकांची दिशाभूल करते.

 ‘‘ते स्वतःला देवाचा अवतार मानतात, मग लोकांची मेंढरं झाल्यानंतर त्यांच्याकडून आपली प्रतिमा सुधारण्यासाठी ते कार्य करवून घेतात. त्या कार्याची गुणवत्ता इतकी चांगली नाही.’’ शिरीष आल्मेडा यांनीही राम देशमुखांची री ओढत म्हटले. ‘‘मदतकार्य हा त्यांचा मूळ उद्देश नसतोच, हा फक्त वरवर केलेला दिखावाच असतो.’’ राम देशमुख आपल्या मतावर ठाम होते. विवेकमंचात बरीच मते मांडली जात होती. सरांनी आणखी एक पैलू उलगडत म्हटले, ‘‘स्वामी विवेकानंद असे म्हणायचे की, आपणाला धर्माची ताकद चांगली वापरून घेता आली पाहिजे. जे साधू आहेत किंवा जी मंदिरे आहेत, यांच्याभोवती चटकन गर्दी जमते. त्यांनी आयुष्याचे तत्त्वज्ञान जरूर सांगावे; पण उगाचच कर्मकांड करत बसण्यापेक्षा जर त्यांनी विज्ञानाचा प्रसार केला, तर किती तरी मोठा परिणाम साध्य होऊ शकतो.’’

जेव्हा कोणी एखादे चांगले काम करतो, तेव्हा त्या कामाकडे वस्तुनिष्ठपणे पाहावे का; त्या कार्यामागे असलेल्या व्यक्तीच्या उद्देशाचा आपण वेध घ्यावा का, याबाबत माझ्या मनात थोडासा गोंधळच होता. अशात अवघ्या चार महिन्यांतच माझ्या आयुष्यात ‘ती’ घटना घडली. मला माझ्या पासपोर्टचे नूतनीकरण करायचे होते, तसेच माझ्या मुलाचाही नवा पासपोर्ट काढायचा होता. वसई जरी लोहमार्गामुळे मुंबईच्या जवळ असली किंवा आता जरी ती मुंबईचा एक भागच गणली जात असली तरी शासनाच्या दरबारी तो अवाढव्य ठाणे जिल्ह्याचा (आता मागील काही वर्षांपासून पालघर जिल्ह्याचा) भाग आहे.

पासपोर्टच्या कार्यालयीन कामासाठी ठाणे शहराला पर्याय म्हणून नाशिक शहर हादेखील एक ऑप्शन मिळतो. ठाणे शहरात पासपोर्ट कार्यालयात प्रचंड गर्दी असते आणि त्यामुळेच अर्ज केल्यानंतर अपॉइंटमेंटही उशिरा मिळते.  मला माझ्या काही मित्रांकडून असे समजले की, नाशिकला जाणे सोईस्कर आहे, अपॉर्इंटमेंट लगेचच मिळेल आणि कामही लवकरच होऊन जाईल. ठाण्याच्या ट्रॅफिकमध्ये संपूर्ण दिवस घालविण्यापेक्षा, काहीसे दूर जरी असले तरी एका नव्या शहराचीही त्यानिमित्त भेट होईल. त्या हेतूने मी नाशिक येथील अपॉइंटमेंटची वेळ मुक्रर केली. माझ्या व मुलाच्या लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून मी त्या दिवसाची वाट पाहू लागलो. नाशिकला जाण्यासाठी मला अर्थातच कारची गरज होती  आणि माझी कार ऐनवेळी खराब झाली. त्यामुळे मला दुसरी कार बुक करायला लागली. मुलाला घेऊन जायचे होते, म्हणून मुलाच्या मामाकडील आजी व आजोबा यांनादेखील बरोबर घेतले आणि नाशिकच्या दिशेने निघालो.

आम्ही सकाळी दहा वाजताच पासपोर्ट कार्यालयात पोहोचलो. तेव्हा आम्हाला कळाले की, आम्हाला दुपारी तीनची अपॉइंटमेंट मिळली आहे. तोपर्यंत करायचे काय? पासपोर्ट कार्यालयाच्या थोडेसे अलीकडे बाळ येशूचे चर्च आहे. ते वसईकरांत खूप प्रसिद्ध आहे. या चर्चच्या वार्षिक सणानिमित्त वसईहून बरेच भाविक इथे येत असतात. मी हे चर्च पाहिले नव्हते. आपण इथे आलेलोच आहोत, तर हे चर्च पाहून घेऊ- या हेतूने आम्ही तिथे भेट दिली. चर्चचे आवार खूप मोठे आहे. माझा मुलगा त्याच्या आजीबरोबर- म्हणजे माझ्या सासूबरोबर तिथे बागडत होता. नंतर आम्ही नाशिकमध्येच थोडे फिरलो. द्राक्षाच्या मोठ्या मळ्यात फेरफटका मारला. तिथल्याच एका कॅफेमध्ये दुपारी जेवलो.

यथावकाश माझी व माझ्या मुलाची तीनची पासपोर्टसाठीची अपॉइंटमेंट झाली. सगळ्या कागदपत्रांची पडताळणी होऊन सगळे व्यवस्थित झाले. नंतर आम्ही परतीच्या मार्गाने निघालो. संपूर्ण दिवस फिरलो असल्याकारणाने खूप थकलेलो होतो. त्यामुळे थोड्या डुलक्या काढल्या. मी पुढे म्हणजेच ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसलो होतो, तर माझे सासूसासरे व मुलगा मागच्या सीटवर बसले होते. आम्ही असेच गप्पा मारत आहोत, तोच शहापूरजवळ अचानक जोरात असा आवाज झाला आणि आमची गाडी वेगाने फिरू लागली. जोरजोरात फाट्‌-फाट्‌ असा आवाज येत होता व गाडीचा ताबा सुटत होता. ड्रायव्हरची उडणारी तारांबळ मी बघत होतो. ड्रायव्हरच्या उजव्या बाजूला सिमेंटचा दुभाजक होता. त्याला जर गाडी धडकली असती, तर गाडीचा पूर्ण चक्काचूर झाला असता. त्यामुळे त्याला जितके शक्य होईल तितके तो गाडीचे स्टिअरिंग डाव्या दिशेने घेण्याचा प्रयत्न करत होता. काही तरी अघटित घडले होते. डाव्या बाजूला त्याने गाडी घेतली खरी; पण डाव्या बाजूला जे मातीचे डोंगर होते, त्यावर गाडी जोरात आपटली व वेगाने फिरू लागली. जवळजवळ एक मिनिटभर भोवरा जसा फिरावा तशी गाडी फिरत होती.

आम्ही सर्व किंचाळत होतो. सर्वांना कळून चुकले होते की, काही तरी झाले आहे आणि त्या एका मिनिटानंतर सर्वांची परिस्थिती खूप भयानक होणार आहे. नंतर गाडी जागीच थांबली. मी स्वतःकडे पाहिलं, तर मी व्यवस्थित होतो. मागे वळून पाहिले तर माझा मुलगाही व्यवस्थित होता, माझे सासू-सासरेही व्यवस्थित होते, ड्रायव्हरही व्यवस्थित होता... मग झाले तरी काय? तेव्हा मला समजले की, गाडीचा मागचा टायर फाटलेला होता.बाहेर लोकांची बरीच गर्दी जमली होती. माझ्या सासूबार्इंना पाठीला आणि हाताला थोडेसे खरचटले होते, त्याव्यतिरिक्त आम्ही सगळे सुखरूप होतो. फार मोठा धक्का होता तो. आम्ही अजूनही त्या धक्क्यातून सावरलो नव्हतो. हायवेवर अचानक तोबा गर्दी जमली. एका मोठ्या अपघाताचा भाग असणे म्हणजे काय, याचा अनुभव आम्ही त्या दिवशी घेत होतो. बाजूच्याच काही तरुणांनी आम्हाला कारमधून बाहेर येण्यास मदत केली. त्यांनीच गाडीतून सामान बाहेर काढले.

गाडी एका बाजूला लावण्यात आली. गाडीच्या मागील बाजूला आम्ही बघितले, तर आम्हाला विेश्वासच बसला नाही की आम्ही सुखरूप होतो. गाडीच्या मागील भागाचा पुरता चेंदामेंदा झालेला होता. हॉस्पिटल सोडाच; पण घरी परतण्यासाठी तरी काही व्यवस्था होईल अशा ठिकाणी कसे पोहोचायचे, हा मोठा प्रश्न होता. इतक्या आडवळणावर पर्यायी वाहन कसे मिळणार याच्या चिंतेत आम्ही होतो, तोच आम्हाला एक ॲम्ब्युलन्स आमच्या दिशेने येताना दिसली आली. दोन मिनिटांअगोदरच कोणी तरी फोन करून त्यांना कल्पना दिली होती. ड्रायव्हरसहित आम्ही पाचही जण घाबरलेल्या व भेदरलेल्या अवस्थेत त्या ॲम्ब्युलन्समध्ये बसून राहिलो. एका मोठ्या अपघातातून आपण सहीसलामत बाहेर पडलो होतो याच्या आनंदापेक्षा, आयुष्याची राखरांगोळी करू शकणाऱ्या भयंकर मोठ्या अपघातात आपण सापडलो होतो याची भीतीच सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होती.

ती ॲम्ब्युलन्स आम्हाला जवळच्या एका सरकारी इस्पितळात घेऊन गेली. तिथे माझ्या सासूबार्इंना मलमपट्टी करण्यात आली. ड्रायव्हरला रक्तदाबाचा त्रास होता. त्याचा रक्तदाब तपासून तोही नियंत्रणात आणला गेला. त्यानंतर त्या ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरनेच वसईकडे जाणाऱ्या एका गाडीत आम्हाला बसवून दिले. बाय द वे,  ती ॲम्ब्युलन्स होती ‘स्वामी अत्यानंद’ या साधूच्या एका ग्रुपची. स्वामी अत्यानंद- इतर दिवशी ज्यांच्यावर मी सहज ढोंगी, लबाड म्हणून हिणवत वा टीका करू शकलो असतो- त्या साधूच्याच एका सामाजिक उपक्रमाद्वारे संचालित या ॲम्ब्युलन्समुळे माझ्या कुटुंबाला आज मदत मिळाली होती. या प्रसंगाने मला खूप अस्वस्थ केले. माझ्या मनात जो गोंधळ होता, तो अजूनच गडद झाला. चांगले कार्य म्हणजे काय आणि आपण ते कसे ठरवावे? मुळात आपण जज्‌ करावे की नको? त्याचे कूळ-मूळ शोधावे का? चांगले काम हे चांगलेच आहे. भले अनिमेशबापूंचा ते करण्यामागचा हेतू चांगला नसेल; पण त्यांनी जे लोक भारावून गेले आहेत आणि त्यांचे अनुयायी जे काम करत आहेत, ते मात्र चांगलेच आहे. त्याला आपण का जज्‌ करावे?

काही महिन्यांनी दिल्लीत निर्भया बलात्कार प्रकरण घडले आणि संपूर्ण देश या निर्घृण बलात्काराच्या प्रसंगाने ढवळून निघाला. त्या काळात अनिमेशबापूंचा स्त्रियांना त्यांचे स्वरक्षण करण्यासाठी मंत्र म्हणण्याचा व गोमूत्र बाळगण्याचा उपाय पाहिला आणि मग या बाबाची कीव कराविशी वाटली. पण या बाबाच्या प्रवचनाने- मग ते कितीही पोकळ असो- प्रेरित होऊन एखाद्या रक्तदान शिबिरात स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्यांविषयीचा आदर मात्र कमी झाला नाही. अत्यानंदबाबांचे कार्य मला माहीत नाही. भले, त्यांच्या 80-90 टक्के कामांशी आपण सहमत नसू; पण त्यांचे 5 टक्के काम जरी चांगले असेल, तर त्याकडे आपण संशयाने पाहावे का? भले, त्यांचे हे सारे कार्य दिखाव्यासाठी असेल आणि त्यांचा तो मनापासून उद्देशही नसेल, 95 टक्के आऊटपुट अंधश्रद्धा असेल आणि फक्त 5 टक्के आऊटपुट चांगले मानवतावादी कार्य असेल, तर त्या 5 टक्के कामाची प्रशंसा का न व्हावी?

डेरा समाजाचे बाबा रहीम यांनी म्हणे आरोग्यविषयक चाचण्या आणि रक्तदान शिबिरांचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहे. तेव्हा त्या समाजोपयोगी कामाची प्रशंसा झालीच पाहिजे. जेव्हा त्याच्याच आश्रमातील दोन साध्वी त्याच्यावर बलात्काराचा आरोप करतात आणि कोर्ट त्याला दोषी ठरविते, तेव्हा त्या गुन्ह्याबाबत त्याने शिक्षाही भोगलीच पाहिजे.

माणसाला किती तरी बाजू असतात; फक्त काळ्या, पांढऱ्या अशा दोन रंगांत त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करणे अयोग्य वाटते. आज समाजाला चांगल्या विचारांबरोबर चांगल्या कृतीचीदेखील गरज आहे. अडचणीच्या वेळेस केलेली चांगली कृती- मग ती वाल्याने केलेली असो व वाल्मीकीने- कामी येतेच! चांगली कृती जर चांगल्या विचारांनी प्रेरित नसेल तर ती अकाली विरून जाईलच, सत्य बाहेर येईलच. आपण अगोदरच त्याच्याकडे संशयाने का पाहावे? चांगली कृती आणि चांगले विचार यामध्ये चांगल्या कृतीचे पारडे कधीही जडच. कदाचित यामुळेच असेल- मदर तेरेसा यांच्या कार्याबाबत संशय घेणारा एक अग्रलेख एका अग्रगण्य दैनिकाने छापला, तेव्हा तेच भाव माझ्या मनात होते.

जे ख्रिस्ती आपल्या वागण्यातून येशूच्या सेवेचे दर्शन घडवितात असे चर्चला वाटते, अशांना मृत्यूपश्चात चर्च ‘संतपद’ बहाल करते व त्याजोगे समकालीन भाविकांपुढे ‘आदर्श’ ठेवते. हे संतपद घोषित करण्यासाठी चर्चची बरीच मोठी प्रक्रिया असते. आणि या प्रक्रियेत जे काही बरेच निकष आहेत त्यापैकी एक महत्त्वाचा निकष म्हणजे त्या व्यक्तीशी निगडित एखादी ‘दैवी’ घटना. तेरेसा यांना त्यांच्या मृत्युपश्चात ‘संतपद’ देण्यासाठी व्हॅटिकनने मदरच्या नावाने काही ‘दैवी चमत्कार’ घडले आहेत का, यासंबंधात छाननी केली होती. एकविसाव्या शतकातही चमत्काराचे असे बुरसटलेले निकष पाळले जाणे, हे अविवेकीच होते. ज्या मदरने  त्यांची उभी हयात मानवजातीची सेवा करण्यास घालविली, त्या कोलकत्यातील हजारो उपेक्षितांसाठी जिवंतपणीच संत होत्या. कोणा व्हॅटिकनच्या स्टॅम्पची त्याला गरज नव्हती.

अर्थात ‘दैवी निकष’ वगैरे तसे फक्त निमित्तच; खरे कारण काही वेगळेच होते. असे ‘दैवी’ निकष वापरून ‘संतपद’ दिल्याने चर्चला बरेच फायदे असतात. त्या संतांच्या नावाने अधिकृतरीत्या चर्च उभारता येते, त्या संतांचे विविध सण तयार करता येतात, विविध प्रार्थना पुस्तके- तसबिरी-मूर्ती यातून मग चर्च आपल्या आर्थिक समृद्धीसाठी या ‘संतांचे’ इव्हेंटीकरण करते. ‘संतपदासाठी चमत्काराचे निकष’ हा सर्वत्र हास्यास्पदच विषय होऊन बसला. विवेकमंचामध्येही या घटनेचा निषेध केला गेला.

ॲड. अनुप यांनी तर पोपला एक पत्रच लिहिले होते. याच बातमीचे तरंग ‘त्या’ अग्रलेखातही उमटले होते.  पण त्या वृत्ताबरोबर त्या अग्रलेखात आणखी एक वादग्रस्त मुद्दा हाताळला गेला होता. मदर तेरेसा या कशा समाजसेवेच्या आवरणाखाली धर्मांतर करत होत्या, याविषयी त्या अग्रलेखात काही मुद्दे उपस्थित केले होते. ‘ख्रिस्तोफर हिचेन्स’ या कोणा अमेरिकन लेखकाने मदरच्या कार्यावर टीकात्मक लिहिलेल्या पुस्तकाच्या आधारे तो अग्रलेख लिहिला गेला होता. ते दैनिक वृत्तपत्र वसईतील मराठी भाषक कॅथॉलिक घराघरांत वाचले जाते आणि त्यात मदर तेरेसा यांविषयी बराच आदर येथील लोकांत आहे. साहजिकच त्या अग्रलेखाने वसईत बराच गदारोळ माजवला. अर्थात मी ख्रिस्ती आहे म्हणून मी त्यांना दूषणे दिली पाहिजेत, असे काही मला वाटले नाही.

बाबा आमटे यांची मानवतावादी प्रेरणा खूपच उच्च असेल आणि तेवढी उच्च पातळी गाठणे कुणाला शक्य नसेल; परंतु जर धर्माची प्रेरणा घेऊन काही लोक चांगले कार्य करत असतील, तर त्याकडे आपण संशयाने का पाहावे? उदाहरणार्थ- ख्रिस्तोफर हिचन्स आणि विजय प्रसाद या दोघांनी मदर तेरेसांवर जी एक सामाईक टीका केली आहे ती म्हणजे, ‘मदर गरिबांना भाकर बनविण्यास शिकवून स्वयंपूर्ण करण्याऐवजी त्यांना आयती भाकर खाऊ घालतात.’ हा मुद्दा चर्चा करण्याजोगा आहे. बाबा आमटेंनी जसे कुष्ठरोग्यांना स्वयंपूर्ण करून मुख्य प्रवाहात आणणारा ‘आनंदवन’ हा प्रकल्प राबविला तसे कदाचित मदर करू शकल्या असत्या किंवा त्यासाठी तशी संघटनात्मक रचना करणे न जमणे ही कदाचित मदरची वैयक्तिक मर्यादा असेल; परंतु त्यामुळे रस्त्यावर खितपत पडलेल्या कुष्ठरोग्यांवर त्यांनी केलेली मलमपट्टी ही मानवतेप्रति कळवळा असण्याचेच प्रतीक आहे, त्यात शंका का घ्यावी? काहींना यामागील प्रेरणा निस्सीम मानवजातीच्या कळवळ्यातून मिळत असेल, तर काहींना ती प्रेरणा त्यांच्या धर्मातून मिळू शकते.

अर्थात मानवतेसाठी चांगले कार्य करण्यासाठी धर्मविरहित असलेली भावना जरी उच्च असली तरी धर्माने जर काही चांगले निष्पन्न होत असेल, तर आपण त्याकडे नेहमी संशयाने पाहावे का? जगात धर्म हा जसा विविध घातपातांना कारणीभूत ठरलेला आहे, त्याचबरोबर जगभरातील विविध कलांच्या शाखा (लेखन, संगीत, स्थापत्य, चित्रकला) या केवळ विविध धर्मांच्या प्रेरणेमुळे विकसित झालेल्या आहेत, हेही आपणाला मान्य करावे लागते. एखाद्या बापूंवर विेश्वास ठेवायचा की नाही, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्याच्यावरील श्रद्धेने जर त्याचे अनुयायी सरकारच्या खिजगणतीतही नसलेल्या एखाद्या दुष्काळग्रस्त गावात समाजोपयोगी कार्य करीत असतील; तर आपण त्यांचे कार्य बघावे की त्यामागील प्रेरणेचा शोध घेत त्यांच्याकडे संशयाने पाहावे? दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर जरी वस्तुनिष्ठपणे स्पष्ट ‘हो’ असं द्यावंसं वाटलं, तरी प्रत्यक्षात समजा- आपण हायवेवर अपघातात सापडलो आणि सरकारऐवजी कोणा बापूंची किंवा मदरची ॲम्ब्युलन्स आपल्या मदतीस आली; तर आपण त्यांच्या श्रद्धेची चाचपणी करू की, लवकरात लवकर नजीकच्या इस्पितळात नेण्यासाठी त्यांना विनवणी करू? म्हणजे पुन्हा आपल्यासाठी आणि दुसऱ्यांसाठी वेगळा न्याय देण्याची दांभिकताही यामध्ये आलीच की!

त्यामुळेच त्या वादग्रस्त अग्रलेखावर मी प्रतिक्रिया लिहायला घेतली, तर दुसऱ्या दिवशी या वृत्तपत्रात एक ऐतिहासिक घटना घडली होती. अग्रलेख ज्या दिवशी छापून आला, त्याच्या दुसऱ्या दिवशी 70 वर्षांहूनही जास्त जुन्या असलेल्या या वृत्तपत्रातील ‘तो’ अग्रलेख संपादकांनी चक्क मागे घेतला होता व दिलगिरी व्यक्त केली होती. पण अग्रलेख मागे घेण्याने वाचकांत संभ्रम तर निर्माण झालाच, त्याचबरोबर धर्मातील कडवे समर्थक जास्त आक्रमक झाले; कारण त्यांना तो त्यांचा नैतिक विजय वाटला. विवेकमंचातही या अग्रलेखाविषयी चर्चा झाली. आपल्याला पटो व ना पटो- एक वेगळा विचार मांडण्याच्या वृत्तपत्राच्या स्वातंत्र्याचं व धाडसाचं मात्र सर्वांनीच समर्थन केलं. शेवटी वेगळा विचार करण्याची सवय विवेकमंचातील लोकांनाही जडलीच होती.  

Tags: विवेक डॅनिअल फ्रान्सिस मस्करणीस manch Daniel Mascarenhas weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात