'मुळात ती सुंदर असली तरी परिस्थितीमुळे कृश, नाजूक व अशक्त होती. तेवढ्यात गोरे फिरंगी आले. आपल्या गोऱ्यापान जुबानीचा त्यांना भारी अभिमान होता. पण, इथं तिची काळी सावळी पोरं तिच्या संगतीत लोकनाट्य, लोकगीत आणि संगीतात रमताना पाहून चिडलेल्या गोऱ्यांनी पोरांना तिच्यापासून तोडायचा प्रयत्न केला. तिच्या अभिव्यक्तीवर नियंत्रण आणलं. तिला नजरकैदेत ठेवून आपल्या जुबानीला येथील राज्ञीपद दिलं. हा जुलूम तब्बल चारशे वर्षे अव्याहत चालू राहिला. मग इतिहासाची चाके फिरली. गोवामुक्तीने तिचा उद्धार झाला.' मित्रहो, ही गोष्ट आहे माझ्या कोंकणीची.
1684 मध्ये 'कोंकणीच्या मरणाचे फर्मान' ह्या नावाने ओळखला जाणारा हुकूमनामा जारी झाल्यापासून कोंकणीची हर प्रकारे मुस्कटदाबी व गळचेपी चालू होती. पोर्तुगीज शिकायची बळजबरी होती. अशा परिस्थितीत उर्वरीत भारताशी असलेली नाळ तुटू नये व देवाधर्माचं रक्षण, पालन व्हावं ह्या जबर इच्छेपोटी येथील हिंदूंनी मराठीशी संधान बळकट केले. तेव्हापासून गोमंतकीय लेखकांनी अगदी मनोभावे मराठी साहित्याची सेवा केली. गोवामुक्तीनंतर मात्र प्रथमच कोंकणी मुक्त कंठाने गाऊ लागली. तेव्हापासून आजपर्यंतच्या अवघ्या सहा दशकांत कोंकणी साहित्याने जी मजल गाठली आहे ती तृप्तीचे ढेकर देण्याएवढी नसली तरी समाधान मानण्याएवढी स्पृहणीय नक्कीच आहे. ह्याचा अर्थ सहा दशकांमागे सृजनशील साहित्याची निर्मिती होत नव्हती असं निखालस नव्हे. कोंकणीतील पहिली सामाजिक कादंबरी प्रसिद्ध झाली ती 1905 मध्ये. ही कादंबरी पुण्यातून प्रकाशित झाली होती. शीर्षक होते 'क्रिस्तांव घराबो' जी रोमन लिपीतून लिहिलेली होती. लेखक होते एदुआर्दु जुझे ब्रूनु द सौझ. ह्या लेखकाला युरोपिअन कादंबरीची दिशा माहीत होती तसेच भारतीय साहित्यिक प्रवाह कुठल्या दिशेने वाहतो आहे ह्याचीही जाणीव होती. बाबा पदमनजींची 'यमुना पर्यटन' ही जशी धार्मिक संकल्पना मांडण्यासाठी लिहिली गेली तशीच ही कादंबरीदेखील धर्मसंगत ख्रिस्ती श्रद्धेला बळकटी देण्याच्या भावनेतून लिहिलेली दिसते. विशेष म्हणजे दीडशे वर्षांमागील गोव्यातील ख्रिस्ती लोकांची समाजव्यवस्था व मानसिकता कशी होती ह्याचे वास्तव दर्शन घडते.
ह्याउलट 1925 च्या दरम्यान शणै गोंयबाब ह्यांनी लिहिलेल्या 'सवंसारबुट्टी' कादंबरीत आज वापरातून बाहेर पडलेल्या अनेक कोंकणी शब्दांची सहज पेरणी झालेली दिसते. आधुनिक कोंकणी साहित्याचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शणै गोंयबाबांची ही कादंबरी भारतीय कादंबरीसाहित्यातील अप्रूप अशी साहित्यकृती आहे.
'इतिहासाने कोंकणीचा भूगोल घडवला व आज तोच भूगोल कोंकणीचा इतिहास घडवत आहे' असे एक विधान कविराज डॉ. मनोहरराय सरदेसाई ह्यांनी केले होते. एके काळी कोंकणी माणसाने परचक्र, धर्मांतर व धर्मच्छळ ह्या कारणाने आंकांतून मंगळूर-कोचींसारख्या दूरच्या स्थानी स्थायिक होऊन त्कोंकणीचा भूगोल घडवला. शेकडो वर्षे उलटल्यावर गोवामुक्तीने एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. मंगळूर-कोचीपर्यंत गेलेल्या ह्या समुदायाने त्या त्या भूमीची भाषा आत्मसात केली; पण स्वभाषेची साथ सोडली नाही. आपल्या शैलीतून लिहीत त्यांनी स्वभाषेतून साहित्यरचना केली. 1912 मध्ये मंगळूर शहरात 'दिवें' नावाचे नियतकालिक सुरू झाले, त्यातून शेकडो लोकांचे साहित्य प्रकाशित होऊ लागल.
आजसुद्धा कन्नड भाषा शिकून आत्मसात केलेल्या कन्नड लिपीतून ते कोंकणी साहित्य लिहितात. त्यातील उल्लेखनीय ग्रंथ म्हणजे 1936 मध्ये मंगळूर शहरातील लुवीस मास्कारेन्यश ह्यांनी रचलेले 'आब्रांवाचें यज्ञदान' हे महाकाव्य. नंतरच्या काळात इथे अनेक कथा-कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. 'पंचपांडव' ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या सालढाना, आल्वारीस, लोबो, श्रीगब्बू, चाफ्रा डिकॉश्ता ह्या पंचकूटाने कादंबरीसाहित्यात मोलाची भर घातली. केरळातही लेखन होत राहिले. विशेषतः भक्तीपर काव्यरचना मोठ्या प्रमाणावर झाली. कथा-कादंबऱ्यांचं प्रमाण त्या मानाने कमीच म्हणावे लागेल. आजच्या घडीला के. गोकुळदास प्रभू हे लेखक सातत्य राखून दर्जेदार कथा-कादंबऱ्यांचं लेखन करताना दिसतात.
गोवामुक्तिपूर्व काळात ज्यांनी कोंकणी साहित्य साधना केली त्यांत शणै गोंयबाबांच्या मागोमाग नाव घ्यावे लागते ते रवीन्द्रबाब केळेकार ह्यांचे. महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावित झालेल्या रवीन्द्र केळेकार ह्यांना आचार्य काकासाहेब कालेलकरांचे सान्निध्य लाभले. जे जे सत्य, शिव व सुंदर त्याचा ध्यास त्यांनी घेतला. प्रगाढ वाचनामुळे त्यांच्या तत्त्वचिंतनाला सुरुवात झाली. रवीन्द्र केळेकार स्वतः विचारक व तत्त्वचिंतक. त्यांनी सुरुवात वैचारिक निबंधलेखनाने केली. चौफेर लेखणी चालवत त्यांनी 'तुळशी' ही नवलिका लिहिली, रूपांतरित नाटके लिहिली. 'हिमालयात' हे प्रवासवर्णन लिहिले. 'ब्रह्मांडातील तांडव' सारखे नक्षत्रविद्येवरील शास्त्रोक्त पुस्तक सोप्या भाषेत लिहिले. रवीन्द्र केळेकार हे पिंडाने भाष्यकार असल्याने त्यांनी 'बहुभाषिक भारतातील भाषेचे समाजशास्त्र'सारखा प्रबंध लिहिला. 'उजवाडाचे सूर', 'सांगाती', 'पांथस्थ', 'समिधा', 'ओथांबे', 'घुसपल्लें जानवे' 'सर्जकाची आत्मकथा', 'आमोरेर', 'तीन पावलां प्रज्ञावादाची', 'अघळ पघळ', 'कषायमधुर', 'तथागत' असे एकाहून एक अर्थगर्भ गंथ लिहिले. त्यांची भाषा प्रवाही व लेखन लालित्यपूर्ण असल्याने विषय कितीही क्लिष्ट वा गंभीर असला तरी वाचनीयतेच्या कसोटीवर तो अव्वल असतो. केळेकार हे आंतरभारती तत्त्वाचे पुरस्कर्ते असल्यामुळे व स्वतः बहुभाषिक असल्याने त्यांच्या कोंकणी लेखनात अनेक मराठी, गुजराती, हिन्दी, उर्दू शब्द सहज डोकावतात व ते कोंकणीमय होऊन जातात.
कोंकणीच नव्हे, तर भारतीय साहित्याला रवीन्द्रबाब यांनी दिलेले सर्वाधिक मोलाचे योगदान म्हणजे 'महाभारत : एक अनुसर्जन'. दोन खंडांत लिहिलेले 874 पृष्ठांनी व्यापलेले हे अनुसर्जन म्हणजे नुसते महाभारताचे कथानक नव्हे; ते एका विद्वानाचे अभ्यासपूर्ण विवेचन आहे.
कोंकणी साहित्यंत निबंध ह्या प्रकाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शणै गोंयबाब, लुसिओ रोद्रिगिश, लक्ष्मणराव सरदेसाई, चंद्रकांत केणी, अ.ना. म्हांबरो, सुधा आमोणकार, तानाजी हळर्णकार, ह्यांच्यानंतर उल्लेखनीय निबंधसाहित्य रचले गेले ते दत्ता नायक ह्या बहुश्रुत लेखकाकडून. त्यांची विविध अलंकार ल्यालेली संस्कृतप्रचुर असूनही सोपी व लालित्यपूर्ण भाषा व तेवढेच प्रगल्भ व पुरोगामी विचारपरिप्लुत लेखन ह्यांमुळे त्यांचे साहित्य उठून दिसते. आजही सातत्याने निबंधलेखन करणारे अनेक लेखक कार्यरत आहेत.
कोंकणी कवितेला शिखरावर पोहोचवणारे अनेक कवी आहेत. त्यांतील तीन ज्येष्ठ 'म्हालगडे' म्हणजे बाकीबाब, मनोहरराय व पंडित. जीवनावर नितांत प्रेम करणारे चिरतरुण भावकवी अशी बोरकरांची ख्याती आहे. बोरकरांची 'त्या दिसा वडाकडेन...' ही मराठी रसिकांनी डोक्यावर घेतलेली कविता. 'प्राणांक क्षय, बुद्दीक भंय, फाल्यांक जंय, कालचीच वंय, आयलां तें स्वातंत्र्य न्हय.' ही गुरुवर्य टागोरांची आठवण देणारी त्यांची कविता. प्रेमकविता असोत, भावकविता असोत किंवा 'तुज्या पांयांर हांवें घाली उडी; बुडय नाजाल्यार पाय रे तडी'सारख्या अभंगमय असोत बोरकरांसारखी छंदमय कविता होणे नाही, हे सत्य.
बोरकरांच्याच तोडीचे दुसरे कवी म्हणजे डॉ. मनोहरराय सरदेसाई. ध्येयवाद, आदर्शवाद व आशावाद ह्यांची सांगड घालून येणारी त्यांची कविता लहानमोठ्यांना स्पर्श करणारी लोकप्रिय ठरली. 'फायच्या गोंयांत येद्दे नाल्ल, आनी शेतांत तीन पिकां; फायचें गोंय म्हणटलें गा तुमची भीक आमकां नाकां.' कवी र.वि. पंडित हे वेगळ्या धाटणीचे कवी. बहुजन समाजातील पीडितांच्या वेदनेला वाचा फोडणारे. 'कितलोय कांड; म्हजो पिठो मात जायना...' असं खडसावून बजावणारे. पंडितांपासून प्रेरणा घेऊन पुढे प्रसिद्धी पावलेले तरुण कवी म्हणजे रमेश वेळुस्कार.
कविवर्य शंकर रामाणी हे सरदेसाईंचे समकालीन. आकाशात कडाडणाऱ्या विजांचे झाड पाहणारा हा कवी स्वतःच्या कवितेवरही अप्रतिम कविता रचणारा. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन स्वतंत्र प्रतिभेचा आविष्कार घडवणारा आजही जोमाने लिहिता असलेला कवी म्हणजे माधव बोरकार. अद्भुत प्रतिमांचे दर्शन त्यांच्या कवितांत घडते. 'प्रकाशाला वाहण्यासाठी वाटेत दाटलेला काळोख गोळा करीत' फिरणारा हा कवी. रामाणींची वाट चोखाळणारे अजून एक कवी, त्यांचेच समकालीन पांडुरंग भांगी. हे आत्मनिष्ठ कवी. आपल्या कवितेत गुंतून स्वतःचाच शोध घेणारे. अजून अनेक असे कवी होऊन गेलेत ज्यांनी कवितेला सर्वांगाने सक्षम बनवलें. क्रांतीचा संदेश देणारे नागेश करमली, नियतीचा वेध घेणरे प्रकाश पाडगांवकार, गेय कविता प्रसवणारे गजानन रायकर आणि यशवंत केळेकार... इत्यादी. आजचे ताकदीचे कवी परेश कामत, नुतन साखरदांडे, निलबा खांडेकार, प्रकाश द. नायक, राजय पवार, ह्यांच्यासोबत आहेत. मंगळूरकडील मेलवीन रोद्रिगिस, एच.एम. पेर्नाल, एडवर्ड नोरोन्या, इत्यादी कवीही आहेत.
पुंडलीक नायक या ताकदीच्या लेखकाने कवितेने सुरुवात करून कथेला जवळ केलं. कथेवरील पकड घट्ट होताच त्यांनी कादंबरी लिहिली व काही वर्षांतच नाट्यसंहितेकडे वळले. नायकांमुळे पहिल्यांदाच बहुजन समाजाच्या कथा-व्यथांना मंच मिळाला.
कोंकणीतील पहिली आधुनिक कथा लिहिण्याचा मान जातो तो शणै गोंयबाबना. त्यांच्या 'म्हजी बा खंय गेली' ह्या मातृशोकावरील भावनाप्रधान कथेने अनेकांना कोंकणीत कथारचना करायला प्रवृत्त केले. 1935 मध्ये मुंबईहून प्रकाशित झालेला 'वोंवळां' हा कारवार-मंगळूर-मुंबईकडील लेखकांचा प्रातिनिधिक संग्रह त्याचेच फलित असावे. कोंकणी साहित्यात भर पडावी ह्या एकमेव भावनेने भारतीय साहित्यातले दिग्गज कन्नड कवी दिनकर देसाई व मराठीतील बोरकर, रामाणी ह्यांनीसुद्धा कथा लिहिल्या होत्या. गोवामुक्तीपर्यंत गुरुनाथ केळेकार, कायतानु मेंदीश, शेषगिरी केशव प्रभू अशा मुंबईस्थित लेखकांनी यज्ञात समिधा घालाव्यात तशा कथाकविता लिहिल्या. पण खऱ्या अर्थाने साहित्यनिर्मितीला प्रारंभ झाला तो गोवामुक्तीनंतर. मुक्तिपूर्व काळात ज्यांनी कथालेखनाला सुरुवात केली व पुढील चार दशके कथासाधना केली ते म्हणजे चंद्रकांत केणी. 'धर्तरी अजून जियेताली' हा त्यांचा संग्रह मुक्तीअगोदरचा. पहिली कथा शणै गोंयबाब यांनी लिहिली तरी केणी हेच खरे आद्य कथाकार. बहुश्रुत, बहुप्रसव व चतुरस्र वाचक असल्यामुळे त्यांचे लेखन-मग ते कथा असो की कादंबरी, ललित निबंध असो की मनोगत वाचनीयतेच्या कसोटीवर अत्यंत चोख. संक्षिप्ततेवर भर देणाऱ्या केणींनी 'कथिका' हा कथांतर्गत प्रकार स्वतः वागवला, रुजवला व प्रस्थापितही केला. कथिका म्हणजे लघुनिबंध व लघुकथा ह्या दोन्ही साहित्यप्रकारांना कवेत घेणारा, काहीसा स्वतंत्र व सृजनाला चालना देणारा प्रकार. एरवी संक्षिप्ततेला जवळ करणाऱ्या ह्या लेखकाने मुबलक कादंबऱ्या लिहून तेही दालन समृद्ध केले.
सत्तरच्या दशकात 'जाग' मासिकाचा जन्म झाल्यापासून कथेला चांगले दिवस आले. झेप घेताच उंच भरारी मारावी तसं कथेचं झालं. दामोदर मावजो, पुंडलीक नायक, शीला नायक व मीना काकोडकार ह्या चौकडीने कथासाहित्याला राष्ट्रीय पातळीवर नेऊन पोहोचवलं. त्याहीअगोदर केणींचे समकालीन अ. ना. म्हांबरो ह्यांनी उत्तराधुनिक आयाम देत वाचकाला चक्रावून टाकणारी आगळी कथा दिली. त्यानंतर कथेने मागे वळून पाहिले नाही. कथा-कादंबरीला दामोदर मावजोंचे जे योगदान आहे त्याविषयी लिहिणे मला जिकिरीचं वाटतंय. गोव्यातील लोकजीवनाच वैशिष्ट्ये अभिव्यक्त करत त्यांच्या शंभराहून अधिक कथा व चार कादंबऱ्या आजपर्यंत प्रकाशित झालेल्या आहेत. इंग्रजीसह अनेक भाषांतून अनुवादित झाल्या असल्या तरी मराठीत त्यांचे साहित्य फार थोडे प्रसिद्ध झाले आहे; तेही फार उशिरा व अगदी अलीकडे. नवनवे प्रयोग करत वास्तव, अतिवास्तव, अस्तित्ववाद व जादुई वास्तव इत्यादी साहित्यिक प्रवाहांना स्पर्शन जाणारे त्यांचे साहित्य नेहमीच चर्चेमध्ये असते.
आजदरम्यान, कोंकणीतील अत्युत्तम कादंबरीकार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते म्हणजे महाबळेश्वर सैल. उशिरा पदार्पण करूनही स्वतःची छाप पाडणारा हा लेखकही बहुप्रसव आहे. सैलांच्या आधी पुंडलीक नायक ह्यांच्या 'अच्छेव' कादंबरीने सर्वांना हादरवून सोडलं होतं. खाणउद्योग सुरू झाल्यापासून ग्रामीण जीवन कसं ढवळून निघालं व समाजजीवनाच्या अधःपतनाला कारणीभूत ठरलं ह्याचं विदारक चित्रण करणारी ही कादंबरी आजही कालोचित मानली जाते. नायकांनी अजून एकदोन नवलिकांची भर घातली; पण नंतर आपला रोख नाट्यसंहिता लिहिण्याकडे वळवला. 'शबै शबै बहुजनसमाज', 'सुरिंग', 'श्रीविचित्राची जात्रा', 'पिंपळ पेटला', अशा उत्तम नाट्यकृतींमुळे आज त्यांचं नाव देशातील उत्तम नाटककारांमध्ये घेतले जाते.
महाबळेश्वर सैल ह्यांच्या कथा-कादंबऱ्या नेहमी तत्कालीन विषयावर भाष्य करतात. कथालेखक म्हणून आपली कारकिर्द सुरू करून ते कादंबरीलेखनाकडे वळले. 'काळी गंगा' कादंबरी ही गोवा-कारवार सीमेवरील ग्रामीण जीवनाचा विस्तीर्ण पट. त्यांची 'युगसांवार' ही गाजलेली साहित्यकृती, अतिशय संवेदनशील अशा ऐतिहासिक विषयावर आहे. 'तांडव' हा तिचा मराठी अनुवाद. सोळाव्या शतकात धर्मांतर व धर्मच्छळासारखी भीषण स्थित्यंतरे गोमंतकात उद्भवली त्या काळाचा धांडोळा घेत संमिश्र भावभावनांचे संतुलन तटस्थपणे जपल्याने ह्या साहित्यकृतीने फार मोठी उंची गाठलेली आहे. त्यांच्या अनेक कादंबऱ्या इंग्रजी व मराठीत गेलेल्या आहेत. सैल यांचा कित्ता गिरवत देविदास कदम हेही जमीन विक्री प्रकरणे, अमली पदार्थसेवन, अंधश्रद्धा, वगैरे विषयांवर स्वतंत्र लेखन करत आहेत. चांगल्या कादंबऱ्यांची यादी मोठी आहे. मीना काकोडकरांची 'वास्तु', अशोक कामतांची 'घणाघाय...' माया खरंगटेंची 'अमृतवेल', इ. अगदी अलीकडील काळात विशेष भर पडली आहे ती ज्येष्ठ लेखक उदय भेंब्रे ह्यांनी लिहिलेल्या दोन ऐतिहासिक कादंबऱ्या व तरुण लेखक प्रकाश पर्यंकार ह्यांची 'पुरण' ही काळाच्या उदरात लोप पावू पाहणाऱ्या शेतपद्धतीवरील कादंबरी. आश्वस्त करणारी बाब म्हणजे तरुणाईपाशी विषयांना तोटा नाही.
अजून आमच्याकडे परखड समीक्षा होत नाही; शास्त्रीय, वैज्ञानिक व संशोधनात्मक साहित्याची वानवा आहे; काही दालने अभ्यासकांची वाट पाहत रिक्त आहेत. पण, कोंकणी समाज जिद्दी व पुरुषार्थी आहे. दमदार पावले टाकत पुढची वाट चालत आहे. एकूण साहित्यिक वातावरण प्रोत्साहक असलं तरी पुढे एआयच्या युगात काय वाढून ठेवलंय हे कळायला मार्ग नाही. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांनी म्हणून ठेवलंय-'अनेक भाषांतून लिहिले जात असले तरी आपले साहित्य एक आहे.' जे इतर भाषासाहित्याचे भविष्य तेच कोंकणीचं. मग काय, आपण एक साथ कदम बढायेंगे-जीत आपलीच आहे.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या