डिजिटल अर्काईव्ह

शिक्षकांच्या अस्तित्वाची खरी कसोटी

खूप दिवस झाले तरी विद्यार्थी आले नाहीत, तेव्हा शहाजहान यांनी औरंगजेबाला त्याचे कारण विचारले. औरंगजेब म्हणाला, "ती मुले कधीच येणार नाहीत. कारण तुमची बादशाही गेली, तरी सार्वभौम होण्याची इच्छा संपलेली नाही. तुम्ही याच विद्यार्थ्यांना उद्या बंडखोर बनवून माझ्यासमोर उभे कराल आणि माझ्या सत्तेला आव्हान द्याल." ही दंतकथा ऐकल्यावर मला शिक्षकाच्या सामर्थ्याची कल्पना आली आणि शिक्षक व्हावेसे वाटले.

 

 

एक शिक्षक म्हणून मी आयुष्यभर जो आनंद घेतला, त्याबद्दल लिहिणे मला आवश्यक वाटते. प्रस्तुत विषयावर माझे विचार चौकटीबाहेरचे असले, तरी ते या लेखात मोकळेपणाने मांडण्याचे स्वातंत्र्य मी घेत आहे.

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुप्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ प्रा. अशोक केळकर (1929-2014) यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा करण्याचे भाग्य मला लाभले. केळकर सर प्रत्येक विषयावर मूलभूत आणि टीकात्मक विचार करत असत. कोणताही क्लिष्ट विषय सोपा करून सांगण्याची त्यांची हातोटी अगदी वाखाणण्यासारखी होती. त्यामुळे सारेच विद्यार्थी त्यांना एक उत्तम शिक्षक मानत असत. अनेक दशके उत्कृष्ट शिकवल्यामुळे आणि तितक्याच सहजतेने संशोधनपूर्ण लिखाण केल्यामुळे भारत सरकारने त्यांना सन 2002 मध्ये 'पद्मश्री' हा किताब दिला होता. तो प्राप्त झाल्यावर त्यांचे अभिनंदन करण्यास मला थोडा उशीर झाला. मी पत्राद्वारे तशी दिलगिरी व्यक्त केली असता, माझ्या पत्राचे उत्तर देताना त्यांनी लिहिले की, "आनंदाला कोणताही 'काळ' नसतो आणि तो कधीही व्यक्त केला तरी आनंदच होतो." हे उत्तर खरोखर सुंदर होते.

एकदा केळकर सर आणि मी कवितेच्या संदर्भात चर्चा करत असताना, त्यांनी आपल्या एका गाजलेल्या लेखाचा उल्लेख केला. तो लेख प्रथम 'सत्यकथा' या प्रतिष्ठित मराठी मासिकात 'कवितेचे अस्तित्व' या शीर्षकाखाली प्रकाशित झाला होता. पुढे तोच लेख त्यांनी 'The Being of a Poem' या शीर्षकाखाली 'Foundations of Language International Journal of Language and Philosophy' या नेदरलँडमधील त्रैमासिकामध्ये 1969 मध्ये प्रकाशित केला. त्यांनी त्या लेखात 'कविता कशी स्वायत्त असते आणि त्यात कवितेचे स्वरूप व संकल्पना यांच्या परस्परसंबंध' यांवर विचार मांडले होते. का कुणास ठाऊक, परंतु त्या दिवसापासून त्यांनी मला शिक्षकांच्या अस्तित्वावर अनेक वर्षे विचार करायला प्रवृत्त केले.

कविता आणि वाचक हे जसे एकमेकांचा अविभाज्य भाग असतात, तसेच शिक्षक आणि विद्यार्थीसुद्धा असतात. जशी कविता वाचता वाचता ती अनेक अर्थाने मनाच्या परिपक्वतेनुसार समजत जाते, त्याचप्रमाणे शिक्षक आणि विद्यार्थी आपला विषय सहचिंतनातून एकमेकांना सुबोध करत जातात. शिक्षकांचे अस्तित्व विद्यार्थ्यांमुळे असते आणि विद्यार्थी शिक्षकांशिवाय अपूर्ण असतात.

1976 पासून ते जवळजवळ आजपर्यंत म्हणजे सुमारे अर्धशतकाचा काळ मी एक शिक्षक म्हणून व्यतीत केला आहे. अर्थात 2017 पर्यंत मी अनेक विद्यापीठांशी जोडला गेलो होतो. परंतु त्यानंतरही अनौपचारिकरीत्या मी वरचेवर शिकवतच राहिलो आहे. मी एक उत्तम किंवा आदर्श शिक्षक होतो असा दावा माझा नाही. परंतु, शिकवताना आपल्या चुका वारंवार दुरुस्त करून आयष्यभर एक उत्तम शिक्षक होण्याचा प्रयत्न मी नक्की केला. अशा प्रयत्नात मला किती यश मिळाले हे फक्त माझे विद्यार्थी सांगू शकतील.

मी स्वतः विद्यार्थिदशेत होतो तेव्हा वर्गाच्या त्या चार भिंती मला अक्षरशः खायला उठत असत आणि एखाद्या अभेद्य तुरुंगासारख्या भासत असत. लहानपणापासून मी आपल्याच कल्पनाविश्वात लीलया भटकणारा एक 'जिप्सी' आहे एक भटकणारा मुसाफिर ! (मला विल्यम ब्लेकची 'How sweet I roam'd from field to field' ही कवितासुद्धा आवडते; कारण ती प्रथम प्रेमात मिळणारा मुक्त आनंद आणि नंतर प्रेमात हरवलेले स्वातंत्र्य, म्हणजेच प्रेमामुळे वाढणाऱ्या बंधनांचे सुंदर वर्णन करते. अर्थात, प्रथम मुक्त भासणारा तो आनंद पुढे प्रेमाच्या पाशांमुळे एखाद्या 'सोनेरी तुरुंगासारखाच' वाटू लागतो.) म्हणूनच, जिप्सी प्रवृत्तीचा माझ्यासारखा माणूस शिक्षक झाला, या घटनेतच मोठा विरोधाभास आहे.

मी शिक्षक बनण्याचे एक कारण बालपणी ऐकलेली एक दंतकथासुद्धा असू शकते. तो किस्सा थोडक्यात सांगतो. बादशहा औरंगजेबाने आपले वडील शहाजहान यांना कैदेत ठेवले होते. त्याबद्दल औरंगजेबाला थोडी खंत वाटत होती. त्यामुळे शहाजहान यांचे दुःख कमी करण्यासाठी औरंजेबाने विचारले, "मी तुमच्यासाठी काय करू म्हणजे तुम्ही थोडे आनंदी व्हाल?" शहाजहान म्हणाले, "मला शिकवायला आवडते, त्यामुळे पंधरा-सोळा वर्षांची वीस-बावीस मुले माझ्याकडे पाठव. मी त्यांना रोज शिकवेन."

खूप दिवस झाले तरी विद्यार्थी आले नाहीत, तेव्हा शहाजहान यांनी औरंगजेबाला त्याचे कारण विचारले. औरंगजेब म्हणाला, "ती मुले कधीच येणार नाहीत. कारण तुमची बादशाही गेली, तरी सार्वभौम होण्याची इच्छा संपलेली नाही. तुम्ही याच विद्यार्थ्यांना उद्या बंडखोर बनवून माझ्यासमोर उभे कराल आणि माझ्या सत्तेला आव्हान द्याल." ही दंतकथा ऐकल्यावर मला शिक्षकाच्या सामर्थ्याची कल्पना आली आणि शिक्षक व्हावेसे वाटले.

शिकवणे ही प्रक्रिया नेहमी 'काम चालू आहे' या रस्त्यावरील सुपरिचित पाटीसारखी बघितली पाहिजे. शिकवणे म्हणजे विचार करायला शिकणे. याचा अर्थ अव्याहत होणारा संवाद, सहचिंतन, स्नेहपूर्ण मतभेद, वादविवाद आणि जगाकडे बघण्याच्या वेगवेगळ्या दृष्टीकोनांशी होत जाणारा परिचय ! विचारांच्या अशा आदान-प्रदानात नेहमी दुतर्फा वाहतूक होत असते. त्यामुळे या प्रक्रियेत गुरूही विद्यार्थी होतो आणि विद्यार्थीही शिक्षक बनतात; किंबहुना शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील कृत्रिम रेषा शिथिल होत जातात. प्राचीन ग्रीसमध्ये सॉक्रेटीस आणि प्लेटो यांच्यात असाच संवाद होत असे. ही 'सॉक्रेटीक पद्धत' शिकवण्यासाठी नेहमीच उपयुक्त ठरत आली आहे. मात्र, काळानुसार शिक्षकाला कायम बदलावे लागते; कारण आपले विचार पुढच्या पिढीसमोर मांडताना त्यांना स्वतःमध्ये अनेक बदल करावे लागतात. असा बदल सततचे वाचन, चिंतन आणि मनन यांमुळे होतो आणि त्या अनुषंगाने शिक्षक आपली अभिव्यक्त होण्याची पद्धतसुद्धा बदलत जातात. हे साध्य करताना स्वतःला पुन्हा शोधून नवे रूप द्यावे लागते. जसे महात्मा गांधींनी स्वतःला 'असहकार', 'सविनय कायदेभंग' आणि 'चले जाव' या तीन प्रमुख चळवळींच्या काळात बदलले आणि नंतर आपल्या अनुयायांनाही नवा मार्ग दाखवला; तसेच काहीसे शिक्षकाला आपल्या मर्यादित क्षेत्रात करावे लागते.

मी माझा विषय शीतयुद्धाच्या आणि जागतिकीकरणाच्या काळामध्ये शिकवला आहे. याचा अर्थ अनेक पिढ्यांमध्ये माझे विद्यार्थी आहेत. शिक्षकाच्या दृष्टीने प्रत्येक नवी पिढी, नवी बॅच आणि नवे विद्यार्थी - विद्यार्थिनी एखाद्या नव्या आव्हानासारखे उभे असतात आणि त्यांची शिकवण्याची क्षमता आजमावत असतात. त्यामुळे प्रत्येक दिवस एखाद्या परीक्षेसारखा वाटतो.

मला प्रकर्षाने सांगावेसे वाटते की, एकूणच विद्यापीठाच्या वातावरणात उत्तम शिकवणारे प्राध्यापक दुर्मीळ होत चालले आहेत. अनेक अकार्यक्षम शिक्षकांना शिकवण्याची किंवा संवाद साधण्याची कला अवगत नसते. कारण त्यांना आपल्या विषयाचे प्रेम नसते म्हणून तो तितकासा समजलेला नसतो. त्यांच्या तासाला तो तास कधी एकदा संपेल हे जाणून घेण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनी वरचेवर घड्याळाकडे बघत असतात. कधी कधी घड्याळ चालू आहे का ते हलवूनही बघतात. परिणामी, शिकवता येत नाही म्हणून असले शिक्षक नियमांवर बोट ठेवतात. वर्गात विद्यार्थ्यांसमोर अटेंडन्स रजिस्टर फडफडून अनुपस्थितीचे गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली जाते. एखाद्या जेलरने कैद्यांना कोंडावे तसे विद्यार्थ्यांना सक्तीने वर्गात आणले जाते.

खरे म्हणजे आपण कसे शिकवितो यावर प्रत्येक शिक्षकाला अभिप्राय (फीडबॅक) उपलब्ध आहे. परंतु, आपले शिकविणे रटाळ आणि कंटाळवाणे होत असेल अशी त्यांना कल्पना करणेही अशक्य वाटते. अनेकदा शिक्षकांना अभिप्रायाची कल्पना रुचत नाही. यातला विरोधाभास असा की, परीक्षेत किंवा प्रश्नपत्रिकेत जॉन स्टुअर्ट मिल किंवा कार्ल मार्क्स यांच्या विचारांचे 'टीकात्मक विश्लेषण' करायला सांगणाऱ्या शिक्षकांना स्वतःच्या व्याख्यानाच्या मूल्यमापनाची कल्पनाच मुळी रुचत नाही. अभिप्राय / फीडबॅकमुळे आपल्यात काय सुधारणा होऊ शकते, याकडे ते पूर्णपणे कानाडोळा करतात.

अर्थात, वर्गातील आणि वर्गाबाहेरच्या संवादातूनच खऱ्या अर्थाने शिक्षकांची जडणघडण होत असते. मनापासून शिकवणाऱ्या शिक्षकाला आपल्यातील कमतरता हळूहळू उमजू लागतात, हे मी स्वानुभवाने सांगू शकतो. सुरुवातीच्या काळात मला शहरात वाढलेल्या, उच्चवर्णीय आणि इंग्रजी सहज बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणे खूप सोपे वाटायचे. अशा विद्यार्थ्यांच्या पसंतीमुळे सुरुवातीला माझ्या स्वतःच्या कमतरतांकडे माझे दुर्लक्ष झाले. परंतु, ग्रामीण भागातून येणाऱ्या किंवा दलित आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचू शकत नाही, याची खंत माझ्या मनात कुठेतरी डाचत होती. सामाजिक विषमतेने ग्रासलेल्या भारतासारख्या देशात आपण एक 'सर्वसमावेशक शिक्षक' व्हावे, अशी माझी तीव्र इच्छा होती. सुमारे पाच वर्षांच्या अनुभवानंतर, मला माझ्यातील मर्यादांची स्पष्ट जाणीव झाली. त्यानंतर मी स्वतःला प्रयत्नपूर्वक बदलण्याचा निश्चय केला आणि हळूहळू आपल्या उणिवांवर मात करण्यात काही अंशी यशस्वीही होऊ लागलो. आपण शिक्षक म्हणून काय शिकवतो हे महत्त्वाचे असते, तितकेच आपण विद्यार्थ्यांशी कसे वागतो हेही महत्त्वाचे असते. आपल्याला भेटून त्यांना कसे वाटते हेसुद्धा समजून घ्यावे लागते.

स्वतःमध्ये हा बदल घडवून आणताना माझ्या लक्षात आले की, कोणत्याही उत्तम शिक्षकाला आधी विद्यार्थ्यांचा मानसशास्त्रीय अभ्यास करावा लागतो. प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये वैविध्यपूर्ण गुण असतात. काही जण उत्तम टीकात्मक लेखन करू शकतात, तर काहींकडे प्रतिभाशाली वर्णनशैली असते; तर काही विद्यार्थ्यांमध्ये उपजतच मूलभूत विचार करण्याची विलक्षण क्षमता असते. काही तर वादविवादपटू असतात.

शिक्षकाचे नेमके कार्य काय, हे सांगताना मला एका चौकाची आठवण होते. आपण एखाद्या मोठ्या चौकात गेलो की तिथे विविध दिशा दाखवणाऱ्या पाट्य दिसतात - एक रस्ता मुंबईकडे जाणारा, तर दुसरा दिल्ली किंवा चेन्नईला जाणारा. शिक्षक हा नेमका असाच मार्गदर्शक असतो. तो विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी योग्य दिशा दाखवतो; त्यांच्यातील प्रतिभेचा एका गुणग्राहक रसिकाप्रमाणे आदर करतो.

म्हणूनच हळूहळू शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमधील विविध गुणांना प्रोत्साहन देण्याचा मनस्वी आनंद मी घेऊ लागलो. माझ्या डोळ्यांदेखत त्यांची प्रतिभा बहरू लागली आणि त्यातून मिळणाऱ्या स्वर्गीय आनंदात मीही मोहरून गेलो. बघता बघता वयाची तिशी, चाळिशी, पन्नाशी आणि साठी कधी ओलांडली गेली, हे मला समजलेच नाही; कारण कवी अनिल यांच्या 'चिरयौवन' या कवितेतील काही ओळी माझ्या जगण्याचा कायमचा हिस्सा बनल्या होत्या. त्या ओळी मी मुद्दाम उद्धृत करत आहे :

"अजून यौवनात मी, मुले फुले सभोवती 
विकासती विलासती हसून हासवीत ती 
प्रलोभनात प्रीतीच्या कुणी हसे झुरे जिथे 
तिथे सखे नि सोबती कुणी इथे कुणी तिथे 
प्रसन्न चित्त हासते बघुनिया मजेत त्यां 
मुलांत मूल होत मी, फुलांत भंग होत त्या 
भरीत रंग बैठकीत, स्नेहसोबत्यांत मी 
प्रियेस प्रेम होत मी, अजून यौवनात मी"

या ओळी वाचल्यावर सहज लक्षात येईल की, मी माझ्या कामाच्या अनामिक प्रेमात पडूनच त्या धुंदीत जगत गेलो. मुलांत मूल होणे, फुलात भंग होणे आणि स्नेहसोबत्यांच्या बैठकीत रंग भरणे मला कोणताही अट्टाहास किंवा प्रयास न करता सहज जमत गेले; कारण मी केवळ एका उच्च ध्येयवादाने प्रेरित होऊन प्रेमाचा हा निखळ झरा अनुभवत होतो.

कोणत्याही शिकवण्याला एक पद्धत असते. मी शाळेत असताना आमचे ब. का. विप्रदास नावाचे हिंदी भाषेचे शिक्षक होते. त्यांच्या अध्यापनाला एक निश्चित पद्धत होती. तास सुरू करतानाच ते, 'आज के काम की रूपरेखा इस प्रकार होगी' असे म्हणत. त्यामुळे पुढची 45 मिनिटे काय होणार आहे, याची आम्हाला पूर्वकल्पना यायची. त्यांच्या या पद्धतीमुळे मी प्रभावित झालो होतो. पुढे मी स्वतः तास सुरू करत असे, तेव्हा वर्गात माझ्या भाषणाची मध्यवर्ती कल्पना आणि तिच्याशी जोडलेले महत्त्वाचे प्रश्न यांची थोडक्यात मांडणी करत असे; आणि मगच विषयाचा विस्तार करत असे.

समजा, एखाद्या तासाला फक्त आंब्यांवर चर्चा होणार असेल, तर महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, कर्नाटक इत्यादी प्रांतांमधील विविध प्रकारच्या आंब्यांवरच बोलणे योग्य ठरत असे. अशा वेळी जर कोणी आंब्याऐवजी केळावर बोलायला सुरुवात केली, तर त्या व्यक्तीला लगेच थांबवले जात असे. याचाच अर्थ, वर्गात प्रत्येकाने पाल्हाळ न लावता मुद्देसूद बोलण्याची शिस्त स्वतःला लावणे फार महत्त्वाचे होते. माझे व्याख्यान अथवा लिखाण विद्यार्थ्यांना आवडले नाही किंवा कमी दर्जाचे वाटले, तर ते माझ्यासमोर स्पष्टपणे सांगण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मी कायम दिले. तसेच, प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तम जर्नल्सच्या आधारे वाचनाची सूची (Reading List) तयार करायला मी प्रवृत्त करत असे. अर्थात अशा गोष्टी माझ्यासारखे अनेक करत असतील आणि माझ्याहून उत्तम करत असतील याची मला कल्पना आहे.

आपला विषय विद्यार्थ्यांना किती आणि कसा समजला आहे, हे तपासून घेण्यासाठी मी विद्यार्थ्यांच्या तीन तहेच्या चाचण्या घेत असे. पहिल्या चाचणीत विद्यार्थ्यांना एखाद्या मध्यवर्ती कल्पनेवर एक महिन्याच्या मुदतीत एक हजार शब्दांचा निबंध किंवा शोधनिबंध लिहायला सांगत असे. हा निबंध लिहिताना त्यांना कोणतीही पुस्तके अथवा लेख संदर्भ म्हणून वापरण्याची पूर्ण मुभा असे; मात्र, निबंध एक हजार शब्दांपेक्षा मोठा झाला, तर त्यांचे गुण कमी केले जात. मला वाटते की, आपले विचार कमी आणि मोजक्या शब्दांत मांडणे फार कठीण असते; कारण त्यासाठी प्रगल्भ वैचारिक शिस्तीची गरज असते.

दुसरी चाचणी म्हणजे, मी प्रत्येक विद्यार्थ्याला त्या विषयातील त्याच्या आवडीच्या एखाद्या पुस्तकाचे परीक्षण (Book Review) करायला लावत असे. त्यापूर्वी पुस्तक परीक्षण कसे करावे, याबद्दल मी सर्वांना सविस्तर मार्गदशक सूचना देत असे.

तर तिसरी चाचणी म्हणजे, एखाद्या महत्त्वाच्या विषयावर वर्गासमोर 15 ते 20 मिनिटे सादरीकरण करण्याची किंवा बोलण्याची असे. पुढे त्याच विषयावर आम्ही संपूर्ण तास परिसंवाद (seminar) घेत असू.

शिकवण्यात वर्षानुवर्षे तल्लीन झाल्यामुळे माझ्यातही एक प्रकारची उत्क्रांती होत गेली. सुरुवातीच्या काही वर्षांत माझे व्याख्यान एखाद्या संशोधन निबंधासारखे (Research Paper) गंभीर होत असे. परंतु कालांतराने, माझ्या काही आवडत्या प्रश्नांबद्दलच्या नव्या कल्पना मी थेट वर्गातच पडताळून पाहू लागलो. याचाच अर्थ असा की, मी शिकवतानाच संशोधन करू लागलो; आणि लिहिताना मी ते इतके सुबोध व सोपे लिहिण्याचा प्रयत्न करत असे की, जणू काही मी वर्गात शिकवतच आहे. शिवाय विनोदबुद्धीच्या साथीमुळे, अगदी हसत-खेळत गंभीर विषयांवरही आम्ही सहज सहचिंतन करू शकलो.

शिक्षकांची खरी क्षमता ओळखणे विद्यार्थ्यांसाठी बरेचदा गरजेचे असते. काही वेळा अतिशय दुर्बोध बोलणारे शिक्षक विद्यार्थ्यांना महान वाटतात; त्यांच्याबद्दल अनेक गैरसमज पसरवले जातात किंवा ते स्वतःच एका आभासी वलयात जगू लागतात. तर कधी आशय नसला, तरी केवळ ऑक्सफर्ड दर्जाचे अस्खलित इंग्रजी बोलून शिक्षक मुलांना प्रभावित करून जातात. बरेचदा शिक्षकांच्या सतत होणाऱ्या परदेशगमनामुळेही विद्यार्थी थक्क होतात. पण खरे सांगायचे तर, हवाई सुंदऱ्या रोज परदेशात प्रवास करतात म्हणून काही त्यांना त्या-त्या विषयातील तज्ज्ञ मानले जात नाही! आपण किती 'बोर्डिंग पास' गोळा करतो, त्यावर आपली विद्वत्ता कधीच अवलंबून नसते.

याचा अर्थ असा की, खरा शिक्षक अशा बाह्य झगमगाटाने कोणाला प्रभावित करत नाही; कारण शिक्षकांचे आत्मतत्त्व त्यांच्या स्वतःच्या जगण्यात सामावलेले असते. जी व्यक्ती आपल्या उक्ती आणि कृतीमध्ये जास्त अंतर ठेवत नाही, आणि कायम तळमळीने व निष्ठेने ज्ञानदान करते, अशा शिक्षकांचा विद्यार्थ्यांवर पिढ्यान्पिढ्या खोल प्रभाव पडतो. म्हणूनच, केवळ दुर्बोध बोलणाऱ्या किंवा वरवरचा प्रभाव पाडणाऱ्यांपेक्षा वर्षानुवर्षे मनावर सकारात्मक संस्कार करणारे शिक्षक नेहमीच श्रेष्ठ ठरतात. कारण खरे शिक्षक उदात्त मूल्ये स्वतःच्या कृतीतून विद्यार्थ्यांमध्ये रुजवत असतात. अशा शिक्षकांसाठी शिकवणे म्हणजे केवळ उपजीविकेचे साधन किंवा नोकरी नसते, तर त्यांचे 'अस्तित्व' असते.

शिकवणे हा अनेक अर्थांनी वक्ता आणि श्रोते यांच्यातील एक जिवंत संवाद असतो. आपल्या सर्जनशीलतेला दाद मिळू लागली, तर शिक्षकांचे तास अधिक रंगत जातात. सभोवतालच्या वातावरणाचासुद्धा शिकण्यावर खोल परिणाम होतो. या संदर्भात मला हैदराबाद विद्यापीठातील मान्सूनचे दिवस विशेष आठवतात. मान्सूनच्या तासात एक लय, ताल आणि संगीत असते. विद्यापीठाच्या विशाल परिसरातील हिरवीगार झाडे, खडक संपूर्ण परिसर अतिरम्य करून सोडतात. त्या प्रसन्न वातावरणात मी वर्षानुवर्षे अतिशय रंगून शिकविल्याचे मला नेहमीच आठवते. मला काही उत्तम विद्यार्थ्यांनी माझ्यावर केलेली टीकाही आठवते. एका परीक्षेत मी आंतरराष्ट्रीय संबंधांच्या एका सिद्धान्तांवर प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाचे उत्तर देताना 1982 मधील एका एम.ए.च्या विद्यार्थ्याने, असा प्रश्न विचारणे 'हे तर्कास सोडून आहे' असे प्रतिपादन आपल्या पहिल्याच पॅराग्राफमध्ये केले होते. मला ते उत्तर इतके उत्कृष्ट वाटले की, त्या प्रश्नाला मी सर्वात अधिक गुण दिले होते.

हैदराबाद विद्यापीठात शिकवणे हा एका उत्तम राष्ट्रीय विद्यापीठातील अनुभव होता; परंतु दिल्लीच्या 'साऊथ एशियन युनिव्हर्सिटी' (SAU) मध्ये शिकवणे म्हणजे खऱ्या अर्थाने एका आंतरराष्ट्रीय विद्यापीठात काम करणे होते. तिथे मला अगदी वेगळेच अनुभव आले. या विद्यापीठात भारताच्या शेजारील आठ देशांतून विद्यार्थी शिकायला येतात. भारत ही दक्षिण आशियातील एक प्रभावी सत्ता असल्यामुळे, परदेशी विद्यार्थ्यांना भारताविषयी थोडा हेवा आणि काही प्रमाणात तिरस्कारही वाटतो. या पार्श्वभूमीवर, मी एम.ए.च्या वर्गाला 'इंडिया इन वर्ल्ड अफेअर्स' (India in World Affairs) हा विषय शिकवत होतो, तेव्हा भारत-पाकिस्तानमधील काश्मीर प्रश्न, भारताचा श्रीलंकेतील लष्करी हस्तक्षेप, बांगलादेशात वाढत जाणारा भारतविरोध आणि नेपाळच्या अंतर्गत राजकारणातील भारताची भूमिका यांसारख्या वादग्रस्त विषयांवर आम्ही खूप मोकळेपणाने सहचिंतन केले. विशेष म्हणजे, सर्वांनीच आपला राष्ट्रवाद वर्गाच्या बाहेर ठेवला होता. अशा निष्पक्ष आणि खुल्या चर्चेतून आम्ही सर्वच जण खूप काही शिकून गेलो.

शिकवण्याची व्याख्या करताना मी नेहमीच असे प्रतिपादन केले आहे की, शिकवणे म्हणजे सहचिंतनातून विचार करायला शिकवणे. या सहचिंतनाच्या विशाल वृक्षाखाली ज्ञानाच्या फांद्या अधिक सुदृढ होत जातात; कारण सहचिंतनात सामूहिक विवेक सामावलेला असतो. ठोकळेबाज विचार करणे म्हणजे स्वतःच्या पूर्वग्रहांच्या चौकटीत जगण्यासारखे आहे, ज्यामुळे बदलत्या जगाचे आकलन होत नाही. बरेचदा सोयीच्या वाटणाऱ्या सामाजिक वास्तवता आपण वैचारिक चौकटीमध्ये कोंबून टाकतो आणि समाधानाने जगतो. मला वाटते, खरे शिक्षण आणि विचार आपल्याला या संकुचितपणातून मुक्त करतात. बरेच वेळा प्रस्थापित संकल्पनांना आव्हान देण्यास प्रवृत्त करतात. 'शिक्षक' या संकल्पनेकडे थोड्या व्यापक अर्थाने बघितले तर असेही म्हणता येईल की, जी व्यक्ती आपल्या मनातील जुनाट आणि बुरसटलेल्या विचारांची जळमटे स्वच्छ करते ती शिक्षक.

शिकत असताना आपल्या लक्षात येते की, एखाद्या कवितेप्रमाणे एक महान शिक्षक ही एक स्वतंत्र शक्ती असते. शिक्षक म्हणजे यंत्र नाही. यंत्र फक्त माहिती किंवा तथ्ये देऊ शकते. परंतु, शिक्षकांजवळ असणारी सहानुभूती, आपुलकी, आवाजातील चढ-उतार, शांतता आणि नजरेचा जिवंत संपर्क यंत्रात कधीच असू शकत नाही. या सर्व गोष्टीच वर्गातील संवादाला अर्थ प्राप्त करून देतात. काळ बदलत असला, तरी या मानवी मूल्यांना जपण्याच्या बाबतीत मी कदाचित आजही एक पारंपरिक शिक्षकच असेन.

खरे ज्ञान म्हणजे घोकंपट्टी नव्हे, तर आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी केलेली धडपड आहे. जगात वावरताना आपण आजूबाजूच्या प्रत्येकाकडून काही तरी शिकत असतो. कारण प्रत्येकाकडे गुण आणि दुर्गुण दोनही असतात. दुसऱ्याचे गुणग्रहण करणे आणि त्याच्यातल्या दोषांकडे दुर्लक्ष करणे हेसुद्धा एक प्रकारे शिक्षण घेण्यासारखेच आहे. अभ्यास करताना, वाचताना, लिहिताना आणि शिकवताना कोणी आपली चूक निदर्शनास आणून दिली, तर ती पुढच्या खेपेला पटकन दुरुस्त करणे आणि त्या चुकीची पुनरावृत्ती न करणे हे उत्तम विद्यार्थ्यांचे किंवा शिक्षकांचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. ज्ञानसाधनेच्या मार्गाने जाणाऱ्यांनी नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की, विनय हीच खरी संपत्ती असते. अर्थात, अहंकार हे मूर्खपणाचे लक्षण आहे.

सरतेशेवटी असे म्हणता येईल की, वाचकाने एखादी कविता वाचल्यावर तिचा अर्थ नव्याने तयार होतो, अगदी त्याचप्रमाणे विद्यार्थ्याचे प्रबोधन झाले की शिक्षकाचे अस्तित्व पूर्ण होते. शिक्षक आणि विद्यार्थी एका न संपणाऱ्या साखळीसारखे एकमेकांना सतत घडवत राहतात. शिक्षक 'उत्प्रेरका'सारखे (Catalyst) असतात. शेवटी स्वतः अदृश्य होणे हेच त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट असते.

मागे वळून पाहताना दिसते की, मी सुमारे पन्नास वर्षे शिकवले. या काळात खडू-फळ्यापासून ते डिजिटलायझेशनपर्यंत सर्व काही बदलले. एक शिक्षक म्हणून मी आता अदृश्य झालो आहे, पण माझे विद्यार्थी विचारपूर्वक आणि विवेकाने निर्णय घेतात तेव्हा माझे अस्तित्व माझ्या अनुपस्थितीमध्येही ठळकपणे दिसून येते. शिक्षकाच्या अस्तित्वाची हीच खरी कसोटी आहे. सहचिंतनातून मिळालेल्या ज्ञानावर कोणाचीही वैयक्तिक किंवा सामूहिक मक्तेदारी नसते. विवेकी प्रक्रियेतून निर्माण झालेले ज्ञान हे संपूर्ण मानवतेसाठी एक अमूल्य वरदान आहे.

 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

राजन हर्षे,  दिल्ली ( 31 लेख )
rharshe163@gmail.com

अलाहाबाद विद्यापीठाचे निवृत्त कुलगुरू




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके