डिजिटल अर्काईव्ह

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला नऊ परकीय देशांनी थिएनचिनवर कब्जा केला होता, आता एकविसाव्या शतकामधे चिनी मित्र-मैत्रिणी कौतुकाने नऊ देशांतल्या फॉरेनर मित्र-मैत्रिणींना थिएनचिनमधे फिरायला घेऊन आले होते, मैत्रीचा उत्सव साजरा करण्यासाठी. देशांच्या आकड्यांतलं साधर्म्य म्हणजे निव्वळ योगायोग. एकविसाव्या शतकातलं थिएनचिन जगभरातल्या पाहुण्यांचं खुलेपणाने स्वागत करते. पूर्वीच्या वसाहती आता स्थापत्यशैलींचा नमुना आणि प्रेक्षणीय स्थळं म्हणून दाखवत होते. मैत्रीच्या सहलीसाठी केलेली या शहराची निवड अर्थपूर्ण मला वाटली.

चीनची चार आयडी कार्ड्स आणि नऊ देशांचे दहा पासपोर्टस! हॉटेलच्या रिसेप्शन डेस्कवरची मुलगी चक्रावूनच गेली. आमचा 'बीजिंग लँग्वेज अँड कल्चर युनिव्हर्सिटी'च्या मित्र-मैत्रिणींचा भलामोठा ग्रुप थिएनचिन शहराच्या हॉटेलवर येऊन थडकला होता. चीनचे शिए काओरान, लि यांग, हु युनलॉग, हु वेईछिंग, फ्रान्सच्या ल्युसी आणि शार्लोत, स्पेनची कारमेन, स्वित्झर्लंडची लाना, जर्मनीची सिम, थायलंडची फेरी, इंडोनेशियाचा मार्वल, इटलीची बेनी, न्यूझीलंडचा मॅक्स आणि भारताची मी, असा आमचा चौदा जणांचा गट सहलीला निघाला होता. थिएनचिन म्हणजे वीकेंडच्या सहलीसाठी बीजिंगकरांचं अगदी हक्काचं डेस्टिनेशन.

थिएनचिन हे उत्तर चीनमधील महत्त्वाचं शहर. उत्तरेला असणाऱ्या 'यानशान' पर्वतरांगा आणि पूर्वेला असणाऱ्या 'पोहाय' समुद्राच्या काठावर ते वसलं आहे. समुद्रकिनारी वसल्याने थिएनचिन बंदर उत्तर चीनच्या आर्थिक आणि औद्योगिक भरभराटीचं केंद्र आहे. बीजिंग, थिएनचिन, शांघाय आणि छोंगछिंग ह्या चीनमधल्या चार डायरेक्टली केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येणाऱ्या म्युनिसिपल सिटीज, त्या कोणत्याही प्रोविन्सचा भाग नाहीत. काहीसा भारतातल्या केंद्रशासित प्रदेशासारखा प्रकार. बीजिंग आणि 'हपेई' प्रोविन्स हे थिएनचिनचे शेजारी. बीजिंगपासून केवळ 130 किलोमीटर अंतरावर असल्याने हाय स्पीड ट्रेनने थिएनचिनला पोहोचायला फक्त अर्धा तास लागतो. बी.एल.सी.यु. वरून निघालेली आमची पलटण सकाळी साडेदहा वाजता थिएनचिन स्टेशनला उतरलीदेखील. डिसेंबर महिन्यातली थंडी असल्याने ट्रेनमधून उतरल्यावर सगळ्यांनी लगेच जाड फेदर जॅकेट अंगावर चढवले.

स्टेशनमधून बाहेर पडताच समोर 'हाय' नदीचं सुंदर पात्र आणि नदीच्या पलीकडच्या किनाऱ्यावर असलेला युरोपियन शैलीच्या इमारतींचा समूह नजरेस पडला. 'हा चिन वान प्लाझा' रान कने आम्हाला माहिती पुरवली (चीनच्या शिए काओरानला मी 'रान क' म्हणजे रान दादा म्हणते. इथे मित्र-मैत्रिणींमध्येसुद्धा अगदी एखाद-दोन वर्षांचं अंतर असेल, तरी दादा ताई म्हणायची पद्धत आहे). थिएनचिनमधे पाऊल ठेवल्या ठेवल्याच साइट सीइंग सुरू झालं होतं म्हणायचं आमचं. लाल छपरांच्या बुटक्या दुमजली इमारतींमागे उंचच उंच काचेच्या टोलेजंगी इमारती होत्या. थिएनचिनचा युरोपियन वसाहतवादी इतिहास आणि आर्थिक भरभराटीचं केंद्र, बिझनेस सेंटर असा वर्तमान असं चित्र अगदी एका फ्रेममध्ये आमच्यासमोर उभं दिसत होतं.

नदीकिनाऱ्याच्या विविध प्रकारच्या आधुनिक स्थापत्यशैलीच्या इमारती बघत पुढे जात असताना रान कने उजव्या बाजूच्या इमारतींच्या घोळक्यामध्ये असलेल्या वास्तूकडे आमचं लक्ष वेधलं. 'हे सेन्चुरी क्लॉक - थिएनचिनच्या सिम्बॉलिक आर्किटेक्चरपैकी एक.' सेन्चुरी क्लॉकमधे पुरातन आणि आधुनिक शैलीचा मिलाफ दिसत होता. घड्याळातल्या रोमन आकड्यांभोवती बारा झोडियाक साइन्सची चित्रं होती. घड्याळाला दोन हात फुटले होते, एका हातात सूर्य तर दुसऱ्या हातात चंद्र सेन्चुरी क्लॉक का बरं नाव दिलं असावं? मी लगेच पायतु (Baidu म्हणजे चीनमधलं Google) करून पाहिलं. '2000 मध्ये 1 जानेवारीच्या मध्यरात्री हाय नदीच्या काठी चिएफांग ब्रिजसमोर घड्याळाचा टोला पडला, सेन्चुरी क्लॉकच्या सुमधुर आवाजाने एकविसाव्या शतकाचं स्वागत केलं.' पायतुने माझ्या प्रश्नाचं उत्तर पुरवलं.

'हा बघा, चिएफांग ब्रिज, आणि आता आपण चाललोय इटालियन स्टाइल एरियामधे.' रान क टुअर गाइड असल्याच्या थाटात माहिती पुरवत होता. त्याचा जन्म हनान प्रोविन्समधला असला, तरी तो लहान असताना त्याचं कुटुंब थिएनचिनमधे शिफ्ट झालं होतं. शालेय शिक्षण आणि कॉलेजसुद्धा इथे झाल्याने त्याचं 'हु खोऊ' (चीनमधलं रेसिडन्स परमिट) देखील थिएनचिनचंच. त्यामुळे या वेळच्या ट्रीपची सगळी जबाबदारी अर्थातच त्याने उचलली होती. हाय स्पीड ट्रेनची तिकिटं काढणं, हॉटेल बुक करणं, साइट सीइंगचा आराखडा तयार करणं, सगळं काही आमच्या चिनी मित्रांनीच केलेलं. त्यामुळे आम्ही अगदी निश्चिंत होतो. वीकेंडला थिएनचिनला चाललोय एवढंच आम्हाला माहीत होतं, बाकी तिथे जाऊन काय करणार, काय काय बघणार कशाचाच आम्हाला थांगपत्ता नव्हता.

इटालियन स्टाइल एरिया म्हणजे, थिएनचिनमधे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला बांधलेली इटलीची वसाहत. इथे इटालियन शैलीच्या शंभराहून अधिक छोट्या-मोठ्या इमारती, घरं, बंगले आहेत. थिएनचिनमधे अशा युरोपियन शैलीच्या वास्तू जागोजागी दिसतात. थिएनचिन हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं शहर आहे. चीनच्या इतिहासातील सुई डायनेस्टी (इ.स. 581- 618) आणि थांग डायनेस्टी (इ.स. 618-907) यांच्या काळामध्ये दक्षिणेतली कृषिसंपन्न प्रदेशातून उत्तरेकडे अन्नधान्याची वाहतूक करण्यासाठी यांगत्झे नदी आणि यलो रिवर ह्या दोन प्रमुख नद्यांना उत्तर-दक्षिण जोडणारा कालवा खोदण्याचा भव्य प्रकल्प हाती घेण्यात आला. 1700 किमी लांब असलेला 'ता युनह' द ग्रेट कॅनल, 'जगातील सर्वांत लांब मानवनिर्मित कालवा' म्हणून ओळखला जातो. कालव्यामधून होणाऱ्या धान्याच्या वाहतुकीवर देखरेख करण्यात थिएनचिन शहराने वर्षानुवर्ष महत्त्वाची भूमिका बजावली आणि ह्या शहराचा आर्थिक विकास होत गेला. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला मात्र संपूर्ण चीनसोबतच थिएनचिनलाही पाश्चिमात्य वसाहतवादाचा सामना करावा लागला. 1860 मध्ये अफूच्या दुसऱ्या युद्धात चीनचा पुन्हा एकदा दारूण पराभव झाला आणि 'थिएनचिन करारावर' सह्या करून इंग्लंड आणि फ्रान्सने थिएनचिनवर कब्जा केला. थिएनचिन बंदर बळजबरीने पाश्चिमात्य देशांसोबतच्या व्यापारासाठी खुलं करून, तिथे वसाहती स्थापन केल्या. 1900 मध्ये 'एट नेशन्स अलायन्स'कडून पुन्हा एकदा थिएनचिनवर हल्ला करण्यात आला आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका, जर्मनी, जपान, सोवियेत रशिया, इटली, ऑस्ट्रिया आणि बेल्जियम या नऊ देशांच्या सेटलमेंट्स उभारल्या गेल्या. 'सर्वाधिक देशांच्या वसाहती असलेलं शहर' म्हणून थिएनचिन ओळखलं जाऊ लागलं.

इटालियन स्टाइल एरियाच्या मध्यभागी 'मार्को पोलो स्क्वेअर' होता. ह्या जागेला त्याचं नाव द्यायचं कारण म्हणजे त्याचं इतिहासातलं योगदान. हा इटालियन प्रवासी तेराव्या शतकात सागरी रेशीम मार्गाने चीनमध्ये जाऊन, तिथे 17 वर्षं वास्तव्य करून, मग युरोपमध्ये परतला होता. परत आल्यावर त्याने चीनच्या कागदी नोटा, छपाईचं तंत्र, रेशीम ह्यांची युरोपला ओळख करून दिली. 'मार्को पोलो स्क्वेअर' जवळ खोटा बर्फ बनवण्यात आला होता आणि तिथे बच्चेकंपनीचं मनसोक्त आइसस्केटिंग चालू होतं. 'इथे काही खाऊ नका हा, फार महाग आहे.' आम्हाला सूचना मिळाली. हाय नदीच्या काठावरून आम्ही हॉटेलच्या दिशेने चालू लागलो. नदीच्या पात्रामध्ये काही आजोबा गळ टाकून मासे पकडायला बसले होते. स्वच्छ ऊन पडलं होतं, निळ्या आकाशाचं प्रतिबिंब नदीच्या लाटांवर तरंगत होतं. काठावरती लाना, बेनी आणि लि यांगने एकदम सिंकमधे कार्टव्हील्स मारल्या. किती छान निवांत वाटत होतं इथे. बीजिंगऐवजी थिएनचिनच्याच युनिव्हर्सिटीमधे अॅडमिशन घ्यायला हवं होतं, असं वाटून गेलं.

थिएनचिनच्या हॉटेलबाहेर लोकं आमच्याकडे टकामकाबघत होती, एवढे सारे फॉरेनर्स ! रिसेप्शनिस्टचीही पासपोर्टची माहिती नोंदवून घेण्यात आणि झेरॉक्स काढण्यात धावपळ होत होती. तिलाही एकाच वेळी इतक्या वेगवेगळ्या देशांचे फॉरेनर्स बघण्याची सवय नसावी असं वाटलं. चेक इनसाठी वाट बघताना रान कने आम्हाला गंमत सांगितली. हॉटेलच्या खोल्यांचं बुकिंग करताना किमतीचा भाव करण्यासाठी त्याने एका कॉन्फरन्समधे भाग घेण्यासाठी विविध देशांचे प्रतिनिधी येणार आहेत, अशी बिनधास्त थाप मारली होती! दहा देशांतून आलेल्या 14 लोकांचं भलंमोठंच पॅनेल होतं म्हणायचं आमचं.

हॉटेलमधे बॅगा ठेवून आम्ही जवळच्याच 'कुवनह्वा चिए' म्हणजे एन्शन्ट कल्चर स्ट्रीटला फेरफटका मारायला आणि जेवायला गेलो. एन्शन्ट कल्चर स्ट्रीट म्हणजे दोन्ही बाजूला टिपिकल पारंपरिक चिनी शैलीच्या छोट्या इमारती असलेला रस्ता. मी बघितलेलं टिपिकल चायनीज बांधकाम म्हणजे राखाडी-काळ्या विटांच्या भिंती, हिरवट-राखाडी कौलांची टोकाला वरच्या दिशेनं उचलली गेलेली छपरं, खिडक्यांभोवती लाल चौकटी, चौकटींवर गडद निळ्या, हिरव्या, सोनेरी रंगांतली नक्षी, नक्षीमध्ये पानं, फुलं आणि उडणारे ड्रॅगन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळेकडे लटकवलेले लालेलाल चायनीज लॅन्टर्न, बांधकामातून एन्शन्ट कल्चर दिसत होतं खरं, पण तरीदेखील तो मला मुद्दाम टुरिस्टसाठी बनवलेला रस्ता वाटला.

इथे खाण्या-पिण्याची दुकानंच दुकानं होती. मी आणि कारमेन एका छोट्या स्टॉलवरती विकणारे 'इनर मंगोलियन यांगरोउ ष्ट्रान' म्हणजे मटणाचे कबाब खायला गेलो. स्टॉलवरच्या काकांनी 'हालो' म्हणत आमचं स्वागत केलं. चीनमधे फिरताना बऱ्याच ठिकाणी नुसतं रस्त्यावरून चालत असू, तरी चायनीज लोकं स्वतःहून येऊन चायनीज अॅक्सेंटमधे 'हालो' म्हणतात, आणि बऱ्याचदा तेवढ्यावरच त्यांचं इंग्लिश संपतं.

"मला दोन कबाब द्या."
"अरे, तुला चायनीज बोलता येतंय ? आणि बोलताना जराही फॉरेनरचा अॅक्सेंट नाहीये." कबाबवाले काका एकदम चकित झाले. "कुठून आलात तुम्ही ?"
"तुम्हीच गेस करा."
"इंडिया?"
काकांनी पहिल्याच प्रयत्नात ओळखलं. "ओ. इंडिया ! मला माहितीये शाहरूख खान, सलमान खान. मला इंडियन डान्स करून दाखव."
मी त्यावर त्यांना नुसतंच हसून दाखवलं.
काकांनी मग शाहरूख खानच्या 'मोहब्बते' सिनेमातलं गाणं गायला सुरुवात केली. "तुला हे गाणंपण येत नाही ?"

काकांची फारच निराशा झाली. कबाबवरती एक्स्ट्रा मिरची पावडर टाकून घेऊन आम्ही काकांचा निरोप घेतला आणि पुढे निघालो.

एन्शन्ट कल्चर स्ट्रीटच्या गल्लल्यांमधून फिरताना सारखा मजेशीर आवाजातला गाण्याचा आवाज कानावर पडत होता. 'टी हाउस कॉमिक शो'च्या पाट्या दिसल्या तसं एकदम आठवलं, अरे, ही तर 'शियांगशंग'ची चाल. शियांगशंगचा अर्थ होतो 'क्रॉस टॉक'. हा चीनच्या उत्तरेकडच्या भागातला पारंपरिक विनोदी नाट्यप्रकार. विनोदी एकपात्री स्वगतं किंवा खवचट प्रश्नोत्तरांचे संवाद सादर करून प्रेक्षकांना खो खो हसवणे असं ह्याचं स्वरूप. शियांगशंग मला एकदा प्रत्यक्ष ऐकून बघायची खूप उत्सुकता होती, पण प्रचंड फास्ट चायनीजमधे असलेला तो टॉक शो मला समजेल की नाही अशी शंकापण वाटत होती. वाटलं, जेव्हा शियांगशंगचे सगळे विनोद, टोमणे मला समजतील आणि त्यावर परफेक्ट वेळी हसून दाद देता येईल, त्या वेळी 'मला खरोखर चायनीज भाषा येते' असं कॉन्फिडंटली म्हणता येईल.

माझ्या युरोपियन मित्र-मैत्रिणींसोबत फिरणं म्हणजे नुसती खायची-प्यायची चंगळ. संध्याकाळी रान क आम्हाला थिएनचिनच्या फेमस 'कुई युॲन' रेस्टॉरंटमधे घेऊन गेला आणि आमच्यासाठी खास थिएनचिनच्या डिशेस ऑर्डर केल्या 'पा चन तोउफु', 'लाओ पाओ सान', 'सोंगशू यु' आणि अजून बरंच काही. 'सोंगशू यु' म्हणजे 'स्क्किरल फिश'. 'खारूताईचं मटण माझ्यासमोर ठेवू नका हा' मी मनात म्हटलं. पण 'स्क्विरल फिश' म्हणजे मासाच होता, त्याचं डोकं आणि शेपटी तशीच ठेवून मधल्या मांसाचे चौकोनी काप केले होते, त्यामुळे त्याचा आकार खारीच्या शेपटीसारखा दिसत होता म्हणे. थिएनचिनला समुद्रकिनारा असल्याने जेवणात बरंच सीफूड दिसत होतं. सीफूडची चाहती असल्याने मी खूश होते. पण इथल्या सगळ्याच पदार्थांची चव गोडसर होती, अगदी मच्छीचीसुद्धा. थोडी निराशाच झाली. माझ्या मैत्रिणींनापण फारसं आवडलं नाही जेवण.

जेवून हॉटेलला येताना आम्ही 'थिएनचिन आय'चा मोठा आकाशपाळणा बघितला. निळे, गुलाबी दिवे लावलेल्या आकाशपाळण्याचं नदीत छान प्रतिबिंब दिसत होतं. पण ह्या आकाशपाळण्यात बसलं की ब्रेकअप होतो, असं म्हणतात. फारच मजेशीर वाटली मला ही माहिती. 'म्हणजे तर आपण आकाशपाळण्यात बसून बघितलंच पाहिजे. काय माहीत कदाचित आजूबाजूला असे बिछडलेले लोकं फिरत असतील, त्यातून एखादा हँडसम बॉयफ्रेंड आपल्याला मिळून जाईल. आम्ही उगाच थट्टामस्करी केली. मग आम्ही 'थिएनचिन आय'च्या झगमगत्या प्रकाशाला कंपनी द्यायला फुलबाज्या पेटवल्या. शून्य डिग्री तापमान होतं त्या वेळी. फुलबाज्यांच्या प्रकाशाने छान ऊब आली. आणखी ऊब यावी म्हणून मग उड्या मारून झाल्या, पळापळी करून झाली आणि नदीच्या किनारी गाणी लावून नाचणाऱ्या आजी-आजोबांसोबत 'रॉक अँड रोल' नाचूनही झालं. हॉटेलवर परत येऊन फेरी आणि सिमच्या खोलीमध्ये 'उनो'चा डाव रंगला. पत्त्यांचे नियम चायनीज भाषेमध्ये समजावून सांगणे हे फारच मोठं चॅलेंज आहे, असं माझ्या लक्षात आल्याने, एरवी फारच बोरिंग आणि बालिश वाटणारा उनोचा खेळ जागतिक असल्याने सगळ्यांनाच एन्जॉय करता आला.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पुन्हा सगळी खादाड टीम थिएनचिन स्पेशल नाश्ता करायला निघाली. आम्ही गटागटांमधे टॅक्सीत बसलो. टॅक्सीत बसल्या बसल्या आमच्या ड्रायव्हर काकांनी 'कोन्निचिवा' म्हणत आमचं स्वागत केलं.

"इथे कोणी जपानी नाहीये" मी हसत हसत म्हणाले. लाना, फेरी, सिम सगळ्या चायनीज वंशाच्या असल्याने, ड्रायव्हर काकांनी हे इंग्लिशमधे गप्पा मारणारे चिनी तोंडावळ्याचे फॉरेनर्स जपानी असावेत असा अंदाज लावला होता. ह्या जपानी नाहीत, तर स्वित्झर्लंड, जर्मनी, थायलंडच्या मुली आहेत म्हणल्यावर त्यांनी लगेच 'सवाद्दिकाS, गुटन मॉर्गन' म्हणून दाखवलं.
"आणि भारताच्या भाषेत कसं म्हणायचं ?"
"नमस्ते !"
"अरे, हे सोपंय. नमस्ते!" ड्रायव्हर काका उत्साही होते एकदम.
“थिएनचिनचा कॉमिक टॉक शो खूप फेमस आहे ना ? शियांगशंगचा एखादा डायलॉग म्हणून दाखवा न आम्हाला" मी डिमांड केली.
"हे असलं काही येत असतं, तर मी टॅक्सी कशाला चालवली असती?" ड्रायव्हर काकांनी गमतीत उत्तर दिलं.

नाश्त्यासाठीच्या खाऊगल्लीमधे विकायला असणारे सगळे पदार्थ 'हलाल' आहेत असं लिहिलं होतं. गल्लीमधे एक चिनी शैलीची वास्तू होती, ज्यावर मोठ्या सोनेरी अक्षरांमधे लिहिलं होतं, 'छिंगचन स' म्हणजे मशीद. कुठल्याही चायनीज टेम्पलसारखीच होती ती दिसायला. चीनमधल्या 'हुई' ह्या मुस्लीम एथनिक मायनॉरिटी ग्रुपची लोकसंख्या थिएनचिनमधे बऱ्याच मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांची मशीद असावी, असा मी अंदाज बांधला. ती आतमधून कशी दिसत असेल याची खूप उत्सुकता होती, पण आत जायला परवानगी नव्हती. खाऊगल्लीमधल्या दुकानासमोर रांगेत उभं राहून 'कुओ पा त्साय', 'कोउ पु लि पावचं' वगैरे स्पेशालिटी ट्राय केल्या. 'कुओ पा त्साय' म्हणजे ग्रेवीमधे बुडवलेले मुगाचं आणि तांदळाचं पीठ मिक्स करून बनवलेले चपटे रुंद न्यूडल्स, त्याच्यावर भरपूर सेसमी पेस्ट आणि कोथिंबीर घातलेली. थंडीत हा गरमागरम पदार्थ खायला मजा आली.

पेटपूजा करून झाल्यावर आम्ही पुन्हा थिएनचिन दर्शन करायला निघालो. रस्त्याबाजूच्या दुकानांमध्ये सगळीकडे ख्रिसमसचं डेकोरेशन दिसत होतं. चालत चालत आम्ही 'पोर्सेलिन हाउस' नावाच्या प्रेक्षणीय स्थळापाशी आलो. ह्या बंगल्यामधे कुंपण, भिंती, छप्पर, बाल्कनीचे कठडे सगळ्यांवर चिनी मातीची भांडी आणि पोर्सेलिनचे निळ्या-पांढऱ्या रंगांचे तुकडे लावले होते. 'आत जायला 50 युआन तिकीट आहे, त्यापेक्षा आपण बाहेरूनच फोटो काढून घेऊ या' चायनीज मित्र म्हणाले.

पुढचं ठिकाण होतं 'फाइव्ह ग्रेट अॅव्हेन्यूज'. हे आम्ही थिएनचिनमधे बघितलेलं शेवटचं प्रेक्षणीय स्थळ. हे ठिकाण म्हणजे ब्रिटन, फ्रान्स, इटली, जर्मनी आणि स्पेन ह्या पाच देशांच्या दोनशेहून अधिक इमारतींचा समूह. इथे ग्रीक, गॉथिक, रेनेसांस, रोमँटिक, एक्लेक्टिक अशा विविध स्थापत्यशैली बघायला मिळाल्या. ही सगळी माहिती अर्थात मला तिथे असलेल्या माहिती फलकावर वाचून समजली. त्या माहितीचं चायनीजच्या खाली लिहिलेलं इंग्लिश भाषांतर काही काही ठिकाणी फारच विचित्र आणि गमतीशीर वाटत होतं. रान क आणि लि यांगनेही स्वतःचं इंग्लिश सुधारण्यासाठी त्या माहिती फलकाचं गंभीर वाचन केलं. थोडसं फिरून झाल्यावर पुन्हा सगळ्यांना भुका लागल्या आणि फेरी, मॅक्स, बेनी, सिम, लाना, कारमेन, मार्वल सगळे एका हायफाय स्पॅनिश रेस्टॉरंटमधे शिरले. 'हे लोकं फार महागाचं जेवण खातात' ल्युसी अगदी माझ्या मनातलं बोलली. जोडीदार मिळाल्याने मला जरा हायसं वाटलं. आम्ही दोघी मग जवळच्याच एका छोट्याशा लोकल चायनीज दुकानात गेलो. तिथे चिकन सूप न्यूडल्स आणि 'चिएन पिंग' म्हणजे डोशासारखं आवरण असलेली फ्रैंकी असा मोजकाच मेन्यू उपलब्ध होता. आम्ही प्रत्येकी 20 युआनमधे स्वस्त आणि मस्त असं गरमागरम भरपेट जेवण केलं.

जेवून झाल्यावर मी आणि ल्युसी दोघीच 'फाइव्ह ग्रेट अॅव्हेन्यूज'च्या गल्ल्या फिरायला निघालो. इथले रस्ते म्हणजे भूलभुलैय्याच होता. रस्ते फारच सामसूम, ओसाड होते, पानं झडलेल्या झाडांवरती मॅगपाय पक्षी केशरी पर्सिमनच्या फळांवर टोची मारत होते. 'फार उदास वाटतंय नाही?' ल्युसी म्हणाली. युरोपियन शैलीचे टोलेजंग बंगले बघून खरंच फार काही मजा येत नव्हती. बीजिंगमधल्या शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या चिनी वास्तू बघून त्यांच्या रंगसंगतीत आणि स्थापत्यशैलीत तोचतोचपणा आहे असं वाटलं होतं, पण तरी त्यांचे पुन्हा पुन्हा फोटो काढावेसे वाटायचे. पण फाइव्ह ग्रेट अॅव्हेन्यूजमधे उदास वाटण्याचं कारण स्थापत्यशैली नव्हतंच मुळी. कदाचित इथे आम्ही लोकांची वर्दळ आणि गाड्यांचे आवाज मिस करत होतो.

चालत असताना आम्हाला रस्त्यात रान क आणि शार्लोत भेटले. शार्लोतचं थंडीने डोकं प्रचंड दुखत होतं. तिला आराम करता यावा म्हणून आम्ही एका कॅफेमधे शिरलो. कॅफेच्या बाहेर भलीमोठा ख्रिसमस ट्री सजवून ठेवला होता. रान कने सगळ्यांनाच इथे बोलवून घेतलं. सगळे कॅफेमधे जमा झाले. गरमागरम चायनीज टी आणि हॉट चॉकलेटचे घोट घेत गप्पा रंगल्या. 'इंडियन अॅक्सेंटमधलं इंग्लिश बोलून दाखव ना!' मित्र-मैत्रिणींनी आग्रह धरला. मीपण मग मुद्दाम 'ड' 'ट' 'र' च्या उच्चारांवर जोर देत चिनी भाषेत गमतीत म्हणतात, तसं 'करी प्क्लेवर 'चं इंग्लिश बोलून सगळ्यांची करमणूक केली. मग पुन्हा 'उनो' बाहेर काढला गेला. हसताना, खेळताना सगळ्यांनाच जाणवत होतं की, पुन्हा अशी एकत्र मजा, मस्ती करण्यासाठी दिवस फार उरले नव्हते. महिनाभरातच जवळपास सगळे जण बी. एल.सी.यु. मधला कोर्स संपवून आपापल्या देशात परत जाणार होते. आणि म्हणूनच ही थिएनचिनची सहल आम्हाला मेमरेबल करायची होती. थिएनचिनवरून दमून परत आलो, त्या रात्री बीजिंगमधे त्या हिवाळ्यातला पहिला हिमवर्षाव झाला. हवेत भुरभुरणाऱ्या पांढऱ्या हिमाने थिएनचिनची सहल आणखीनच अविस्मरणीय करून टाकली.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला नऊ परकीय देशांनी थिएनचिनवर कब्जा केला होता, आणि आता एकविसाव्या शतकामधे चिनी मित्र-मैत्रिणी कौतुकाने आपल्या नऊ देशांतल्या फॉरेनर मित्र-मैत्रिणींना थिएनचिनमधे फिरायला घेऊन आले होते, मैत्रीचा उत्सव साजरा करण्यासाठी. देशांच्या आकड्यांतलं साधर्म्य म्हणजे निव्वळ योगायोग. एकविसाव्या शतकातलं थिएनचिन जगभरातल्या पाहुण्यांचं खुलेपणाने स्वागत करत होतं. पूर्वीच्या वसाहती आता स्थापत्यशैलींचा नमुना आणि प्रेक्षणीय स्थळं म्हणून दाखवत होते. मैत्रीच्या सहलीसाठी केलेली ह्या शहराची निवड अर्थपूर्ण वाटली मला.

 

(बीजिंग लैंग्वेज अॅन्ड कल्चर युनिव्हर्सिटीत मागील वर्षभरापासून पद्व्युत्तर पदवीचे शिक्षण घेत असलेल्या सानियाने लिहिलेले दोन लेख साधनाच्या 'युवा दिवाळी अंका'त व 'मुख्य दिवाळी अंका'त प्रसिद्ध केले आहेत. त्या दोन लेखांच्या पुढचे म्हणावेत असे तीन भाग तिने लिहिले आहेत. त्यातील हा एक लेख. उर्वरित दोन लेख फेब्रुवारी व मार्चमध्ये प्रसिद्ध होतील.)
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके