आंबेडकरांच्या भाषणाच्या शीर्षकात रानडे, गांधी आणि जीना यांचा उल्लेख असला, तरी प्रत्यक्षात हे भाषण खुद्द आंबेडकरांच्याच विचारव्यवहारावर अधिक प्रकाश टाकणारं आहे. त्यांनी गांधी आणि जीना यांच्यावर इथे केलेली टीका कठोर असली तरी अगदीच थोडक्यात आहे. तर, रानड्यांची त्यांनी केलेली स्तुती तुलनेने सविस्तर असली तरी ती खुद्द रानड्यांच्या विचार-व्यवहाराशी जुळणारी असेलच असं नाही. त्यामुळे रानड्यांच्या व्यवहाराबद्दल आंबेडकरांनी नोंदवलेले काही मुद्देही मुळात आंबेडकरांच्या कल्पनाविश्वाचाच निर्देश करणारे आहेत.
मी जिथे जाईन तिथे काट्यासारखा बोचत राहीन.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भाषणाची पार्श्वभूमी
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (1891-1956) यांनी महादेव गोविंद रानडे (1842-1901) यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त 18 जानेवारी 1943 रोजी पुण्यामध्ये इंग्रजीतून व्याख्यान दिलं. डेक्कन सभेने गोखले मेमोरियल हॉलमध्ये संध्याकाळी साडेसहा वाजता या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या व्याख्यानावेळी तत्कालीन मुंबई कायदेमंडळाचे सदस्य राहिलेले बाळकृष्ण सीताराम कामत हे अध्यक्षस्थानी होते, तर उदारमतवादी पुढारी प्राध्यापक रघुनाथ परांजपे यांनी आभारप्रदर्शन केलं ("पुण्यांतील रानडे स्मृतिदिन", 20 जानेवारी 1943).
हे भाषण देण्याआधी दुपारी तीन वाजता आंबेडकरांना पुणे जिल्हा लोकल बोर्डातर्फे मानपत्र देण्यात आलं. या वेळी 'भारत छोडो' आंदोलनाकडे निर्देश करत आंबेडकर म्हणाले, "सध्याच्या राजकीय चळवळीचा हेतू काँग्रेसला वाटतो आहे, त्यापेक्षा इतरांना निराळा वाटतो असे नाही. स्वराज्य हे सर्वांनाच पाहिजे. वरच्या वर्गाला स्वराज्य हवे असेल तर खालच्या वर्गालाही स्वराज्याची गरज हजारो पटीने आहे. श्रीमंतांना स्वराज्याशिवाय चालेल पण खालच्या वर्गाचं स्वराज्याशिवाय चालणार नाही. स्वराज्य पाहिजे याबद्दल कोणाचंही दुमत होणार नाही. पम स्वराज्य मिळवण्याच्या पद्धतीचा व मार्गाचा विचार केल्यास आश्चर्य वाटतं." असं म्हणून त्यांनी जाळपोळीच्या प्रकारांबद्दल नाराजी व्यक्त केली. या वेळी लोकल बोर्डाच्या सदस्यांनी आंबेडकरांचं लक्ष धान्यटंचाईकडे वेधलं, त्याबद्दल आंबेडकर म्हणाले की, या खात्याचे अधिकारी काळजीत असून ते योग्य उपाय योजतीलच, पण यामागची खरी कारणंही लक्षात घ्यायला हवीत. एकतर, धान्याचा साठा कमी असेल, पण व्यापारीवर्गाची धान्याचा साठा करून नफेबाजी करण्याची प्रवृत्ती हे मुख्य कारण आहे ("व्यापाऱ्यांनी धान्याचा पुरवठा कमी पाडला", 20 जानेवारी 1945).
चार वाजता आंबेडकर 'अहिल्याश्रम' या वसतिगृहात गेले. तिथे अस्पृश्य विद्यार्थ्यांतर्फे त्यांना अल्पोपहार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. "या प्रसंगी डॉ. आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना उपदेशपर चार शब्द सांगून सैन्यांत शिरण्याचा संदेश दिला," असं 'ज्ञानप्रकाश' वृत्तपत्रात आलेल्या बातमीत म्हटलं होतं ("डॉ. आंबेडकरांचा विद्यार्थ्यांना संदेश", 20 जानेवारी 1943). विठ्ठल रामजी शिंदे (1873-1944) यांच्या निराश्रित साह्यकारी मंडळी, अर्थात डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेच्या वतीने 1923 साली अहिल्याश्रमाची सुरुवात झाली.
आंबेडकरांचं भाषण झालं तेव्हा एकीकडे युरोपात दुसऱ्या महायुद्धाची धामधूम टोकाला पोचली होती. तर, भारतात ऑगस्ट 1942 पासून मोहनदास करमचंद गांधी (1869-1948) यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने 'भारत छोडो' आंदोलनाची हाक दिली. त्यावर सरकारने केलेल्या कारवाईचा भाग म्हणून बहुतांश काँग्रेस नेते तुरुंगात होते. काही नेते भूमिगत राहून ब्रिटिशांविरोधात आंदोलनाचा प्रयत्न करत होते. विनायक दामोदर सावरकर (1883-1966) यांच्या नेतृत्वाखालील हिंदू महासभा, मोहम्मद अली जीना (1876-1948) यांच्या नेतृत्वाखालील मुस्लीम लीग, आंबेडकरांचा शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन, तसंच भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अशा काही संघटनांनी आणि तत्कालीन मद्रास इलाख्यातले काँग्रेसचे पुढारी सी. राजगोपालाचारी (1878-1972) यांच्यासारख्या काही नेत्यांनी निरनिराळ्या कारणांमुळे भारत छोडो आंदोलनात सहभागी न होण्याची भूमिका घेतली होती. त्या-त्या संघटनेची आणि त्या-त्या नेत्यांची भारत छोडो आंदोलनात सहभागी न होण्याची निरनिराळी कारणं होती. या इतिहासात जाण्याचं इथे कारण नाही. याशिवाय, बंगालमध्ये लाखो लोकांच्या जीवितहानीला कारणीभूत ठरणारा दुष्काळ पडला होता.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान भारताचा मित्र राष्ट्रांना पाठिंबा मिळावा, यासाठी इंग्लंडमधील सरकार प्रयत्नशील होतं. त्या संदर्भात वाटाघाटी करण्याकरता ब्रिटिश सरकारमधील मंत्री स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या अध्यक्षतेखालील एक आयोग मार्च 1942 मध्ये भारतात येऊन गेला. भारतात निवडणुका घेतल्या जातील आणि स्वराज्य दिलं जाईल, असा प्रस्ताव मांडून काँग्रेसचा इंग्लंडच्या युद्धप्रयत्नांना पाठिंबा मिळवण्याचा यामागचा उद्देश होता. पण क्रिप्स आयोगाच्या वाटाघाटी निष्फळ ठरल्या.
त्या काळच्या काही मराठी व इंग्रजी वृत्तपत्रांचा धांडोळा घेतला तर मुख्यत्वे दुसऱ्या महायुद्धाच्या आणि भारत छोडो आंदोलनाच्या बातम्यांनी पानं भरल्याचं दिसतं. दरम्यान, मुस्लीम लीगने 1940 साली स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली, त्यासंबंधी गांधी-जीना वाद-संवादाच्या आणि विधानांच्या बातम्याही दिसतात. अशा वातावरणात व्हाइसरॉयच्या कार्यकारी मंडळात मजूर मंत्रीपद (जुलै 1942 ते ऑक्टोबर 1946) सांभाळणाऱ्या आंबेडकरांचं हे भाषण झालं. एकंदर वातावरणात 'बातमीमूल्य' असलेल्या इतर बऱ्याच घडामोडी घडत असतानासुद्धा आंबेडकरांच्या या भाषणाची दखल बहुतांश प्रमुख वृत्तपत्रांनी बातम्यांमधून आणि काहींनी संपादकीय लेखांमधूनसुद्धा घेतली, असं दिसतं. या भाषणाचं पुस्तक दोनच महिन्यांनी, मार्च 1943 मध्ये थंकर अँड कंपनी या प्रकाशनसंस्थेकडून प्रकाशित झालं (हीच आवृत्ती प्रस्तुत मराठी भाषांतरासाठी आधारभूत मानली आहे).
भाषणाचा आशय
आंबेडकरांच्या भाषणाच्या शीर्षकात रानडे, गांधी आणि जीना यांचा उल्लेख असला, तरी प्रत्यक्षात हे भाषण खुद्द आंबेडकरांच्याच विचारव्यवहारावर अधिक प्रकाश टाकणारं आहे. त्यांनी गांधी आणि जीना यांच्यावर इथे केलेली टीका कठोर असली तरी अगदीच थोडक्यात आहे. तर, रानड्यांची त्यांनी केलेली स्तुती तुलनेने सविस्तर असली तरी ती खुद्द रानड्यांच्या विचार-व्यवहाराशी जुळणारी असेलच असं नाही. त्यामुळे रानड्यांच्या व्यवहाराबद्दल आंबेडकरांनी नोंदवलेले काही मुद्देही मुळात आंबेडकरांच्या कल्पनाविश्वाचाच निर्देश करणारे आहेत. याचं इथे एकच उदाहरण देऊन पुरेल असं वाटतं. "रानड्यांनी हक्कांची निर्मिती केली", असं आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात. ते आधुनिक सामाजिक व्यवहारांच्या संदर्भात बोलत होते. यात रानड्यांची भूमिका हक्क निर्माण करण्याची होती, असं म्हणता येणार नाही. यात काही नकारात्मक मूल्यमापनाचा मुद्दा नाही. पण उदारमतवादी परंपरेनुसार काही स्वाभाविक हक्कांचा पाठपुरावा इतर काही पुढाऱ्यांप्रमाणे रानड्यांनी केला असला तरी त्याला 'हक्कांची निर्मिती' म्हणता येणार नाही. याउलट, आंबेडकर विशिष्ट तत्त्वांनुसार काही हक्क प्रत्येक व्यक्तीला असायला हवेत, असं स्पष्टपणे सांगत होते आणि ते हक्क सर्व व्यक्तींना समानपणे नसल्यामुळे मग काय करावं लागेल, इत्यादी चर्चा हा त्यांच्या विचारव्यूहाचा एक महत्त्वाचा भाग होता. रानड्यांच्या तत्त्वज्ञानाची तीन तत्त्वं म्हणून आंबेडकरांनी नोंदवलेले मुद्देही रानड्यांऐवजी त्यांनाच लागू होणारे आहेत. (या दोन्ही मुद्द्यांना धरून विवरणात्मक टिपा जोडल्या आहेत).
भाषणाच्या शीर्षकात रानडे-गांधी जीना अशी नावं येण्याला तत्कालीन राजकीय-सामाजिक संदर्भ आहेत. पण खुद्द भाषण मात्र त्या संदर्भापलीकडे जाणारे मुद्देही हाताळतं. त्यामुळे इतिहास, इतिहासातलं नेतृत्वाचं स्थान, इतिहासाला आकार देणारे संभाव्य घटक, राजकीय लोकशाही आणि सामाजिक लोकशाही यांमधल्या कमी-अधिक तफावतीमुळे उद्भवणारे धोके, परंपरा आणि आधुनिकता, नीतिव्यवहाराच्या रूपातील धर्माचं स्थान, धर्मातील सुधारणांच्या शक्यता, व्यक्ती आणि समाज यांच्यातल्या परस्परसंबंधांचं नियमन करण्यासाठीच्या कसोट्या, प्रसारमाध्यमांचं आधुनिक लोकशाहीमधलं स्थान इत्यादींसारख्या आंबेडकरांच्या दृष्टीने कळीच्या असणाऱ्या विचारांविषयीचं हे भाषण असल्याचं जाणवतं. शिवाय, मार्क्सवाद, समाजवाद, उदारमतवाद, हिंदुत्ववाद, अशा विचारसरण्यांबद्दलची त्यांची मतंही यातून कमी-अधिक स्पष्ट होतात. काही वेळा याबद्दलचे विचार त्यांनी स्पष्टच नोंदवले आहेत, तर काही विचारांकडे ते ओझरता निर्देश करून पुढे जातात. अनेकदा ते आपल्या परिसरात होऊन गेलेल्या किंवा त्या वेळी कार्यरत असलेल्या इतर मंडळींच्या विचारांना प्रतिसाद म्हणून मांडणी करतात. त्यामुळे एकीकडे तत्कालीन विचारव्यवहारावरची टिप्पणी म्हणून मुद्दे मांडले जातात, तर दुसरीकडे तात्कालिक व्यवहारापलीकडे जाणाऱ्या तत्त्वांविषयीची मांडणी केली जाते. या सगळ्यातून आंबेडकरांच्या व्यापक विचारव्यवहाराचं सार आपल्यापुढे आणणारं हे भाषण आहे.
आंबेडकरांनी या भाषणाच्या पुस्तकाला लिहिलेल्या प्रास्ताविकात म्हटलं होतं की, "थोर माणसांच्या जन्मदिनानिमित्त दिलेली भाषणं सर्वसाधारणपणे अगदीच प्रासंगिक स्वरूपाची असतात. त्यांना फारसं शाश्वत मूल्य नसतं. या नियमाला माझं भाषण अपवाद होतं, असं मला वाटत नाही." पण प्रत्यक्षात त्यांचं हे भाषण प्रासंगिकतेचे स्वरूप ओलांडणारं ठरलं. आपल्या राजकीय-सामाजिक व्यवहाराकडे बघण्याचा आंबेडकरांचा दृष्टिकोन समजून घेण्यासाठी एक कळीची संहिता म्हणून या भाषणाकडे पाहता येतं. त्यांनी जातिव्यवस्थेविषयी किंवा हिंदू धर्माविषयी केलेलं टीकात्मक लिखाण, हीच त्यांच्या विचारविश्वातली मध्यवर्ती गोष्ट मानण्याकडे अधिक कल असला तरी, त्यांची ही टीका मूळ कोणत्या आस्थाविषयांमधून आलेय हे पाहणं आवश्यक वाटतं. ते आस्थाविषय मध्यवर्ती असायला हवेत. प्रस्तुत भाषणाच्या आशयातून हे आस्थाविषय साररूपात उलगडतात.
प्रत्यक्ष दिलेलं भाषण आणि ही छापील आवृत्ती यातले दोन फरक आंबेडकरांनीच प्रास्ताविकात नोंदवले आहेत. छापील आवृत्तीमधला दहावा विभाग प्रत्यक्ष दिलेल्या भाषणात नव्हता, तर आठव्या विभागात रानडे आणि जोतीराव फुले यांची थोडी तुलना होती, ती छापील आवृत्तीतून गाळण्यात आली (त्याची कारणं प्रास्ताविकात आहेत). शिवाय, या छापील आवृत्तीत सातवा विभाग दर्शवणारा आकडाही आलेला नाही. त्यामुळे '6' या आकड्यानंतर थेट '8' आकडा दिसतो. हा छोटासा मुद्रणदोष या भाषणाच्या निरनिराळ्या आवृत्त्यांमध्ये एकतर तसाच ठेवलेला आहे किंवा काही आवृत्त्यांमध्ये गळलेला आकडा लक्षात न घेता '6'नंतर '7' टाकून शेवटी सगळं भाषण नऊ विभागांचं झालेलं आहे. या आवृत्तीत इतर विभागांच्या अंकांचं स्थान न बदलता सहाव्या नि आठव्या विभागाच्या मधे योग्य वाटलं त्या ठिकाणी '7' हा आकडा टाकला आहे.
'थंकर अँड कंपनी'मध्ये संपादकीय व्यवस्थापक म्हणून काम पाहिलेल्या यू. आर. राव यांनी लिहिलेल्या आठवणीनुसार, आंबेडकर हाती घेतलेलं प्रत्येक काम सर्वतोपरी निर्दोष असावं यावर कटाक्ष ठेवत असत. त्यामुळे ते छापखान्यात सतत मजकुरात सापडलेले दोष दूर करून सुधारणा सुचवत राहात. त्यामुळे "थेंकरांच्या छापखान्यात पेजप्रुफांवर आणि मशिनवर चढवलेल्या पानांवर ओणव्याने पाहणाऱ्या आंबेडकरांची परिचित आकृती, आणि त्यांच्या शेजारी दुःखी चेहऱ्यांनी उभे असणारे चिंताक्रांत जुळारी नि हताश झालेला मुद्रक, असं चित्र वारंवार दिसत असे" (रत्तू, 2015: पान 163). तर, आंबेडकरांच्या या सवयीची आठवण ठेवत इतपत दुरुस्ती केली
नवीन भाषांतराची गरज
या भाषणाचं मा. फ. गांजरे (1930-1986) यांनी केलेलं भाषांतर निरनिराळ्या प्रकाशनांनी काढलेल्या पुस्तिकांच्या रूपात उपलब्ध आहे. गांजरे यांनी 1960-70च्या दशकांमध्ये आंबेडकरांच्या कित्येक भाषणांचं आणि इंग्रजी लेखनाचं मराठी भाषांतर मोठ्या प्रमाणात केलं, ते स्वतः प्रकाशित करून वितरित केलं. आंबेडकरांच्या साहित्यासंबंधीचा महाराष्ट्रातला हा अग्रगण्य प्रयत्न होता. आंबेडकरांच्या लेखनाचा प्रसार प्रताधिकारासंबंधीच्या कायदेशीर नियमांना ओलांडून होत गेल्याचं अगदी सहजच पाहायला मिळतं. आंबेडकरांचे कौटुंबिक वारसदार किंवा त्यांच्याशी संबंधित एखादी विशिष्ट संस्था वा संघटना, यांनी या साहित्यावर हक्क गाजवला नाही, हेसुद्धा महत्त्वाचंच आहे. महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे'च्या वीसहून अधिक खंडांमधून आलेलं इंग्रजी नि मराठी साहित्य इतर अनेक प्रकाशकांनी आपापल्या स्तरावर स्वतंत्रपणेही प्रकाशित केलं (त्यातही गांजरे यांनी केलेल्या भाषांतरांचा उपयोग झालेला आहे). शिवाय, शासनाने हा प्रकल्प हाती घेण्याच्या कितीतरी आधीच अनेक व्यक्तींनी स्वतःच्या बळावर आंबेडकरांचं मराठी साहित्य (पत्रं, वृत्तपत्रीय लेख, भाषणं, इत्यादी) संकलित केलं, इंग्रजीतलं काही ना काही साहित्य भाषांतरित केलं, आणि हे आपापल्या स्तरावर प्रकाशित करून लोकांपर्यंत नेलं, त्यासाठी या मंडळींनी बरेच कष्ट घेतले. गांजरे यांचे प्रयत्न याच धर्तीचे होते.
दरम्यानच्या काळात असे स्वतंत्र प्रयत्न न करता आधीच्या मंडळींनी केलेल्या कामाचं फक्त नवीन आवृत्तीच्या रूपात उत्पादनासाठी उत्पादन करणारे लोकही पुढे आलेले आहेत. नवीन आवृत्त्या निघायलाच हव्यात, पण मूळ काम कोणी केलं याचा श्रेयनिर्देशही न करणं, आधीच्या आवृत्तीत काही कमी-अधिक चुका राहून गेल्या असतील तर त्यासकटच आवृत्त्या निघत राहणं, आंबेडकरांच्या नावामुळे असलेला खप तेवढा डोळ्यांसमोर ठेवणं आणि त्यानुसार केवळ किंमत वाढवणं, असेही प्रकार होताना दिसतात. आंबेडकरी साहित्य संस्था-शासन यांच्या चौकटी ओलांडून जवळपास सामुदायिक स्फूर्तीनेच व्यापक प्रमाणात लोकांपर्यंत पोचत असताना कदाचित या गोष्टीही आनुषंगिक दुष्परिणाम म्हणून होत असाव्यात. पण मूळ प्रयत्न कोणी केले, याची जाणीव ठेवलेली बरी.
तर, गांजरे यांनी केलेल्या भाषांतरांचं वरच्या प्रक्रियेतलं महत्त्व निर्विवाद आहे. तरी, त्यांच्या भाषांतरात काही उणिवा जाणवतात, हे लक्षात घेतलं तर नवीन भाषांतराची गरज स्पष्ट होईल असं वाटतं.
आंबेडकरांनी थॉमस कार्लाइलच्या इतिहासलेखनासंदर्भातील 'थोर माणसां'च्या सिद्धान्ताचा वापर या भाषणामध्ये केला. पण या 'ग्रेट मेन'चं भाषांतर गांजरे यांनी कधी 'महापुरुष', तर कधी 'थोर पुरुष', असं केल्यामुळे त्यात अस्पष्टता येत जाते. तसंच, पुढे आंबेडकर नीत्शेच्या 'सुपरमॅन'चा उल्लेख टीकेसाठी करतात, तिथे गांजरे यांनी एकदा 'श्रेष्ठ' असं केलंय, तर पुढे 'उच्च पुरुष' असं केलंय. अशा वेळी भाषणामधला हा मुद्दा धडपणे समोरच येत नाही.
काही चुका मूळ वाक्य वेगळ्या त-हेने वाचलं गेल्यामुळे झालेल्या दिसतात. उदाहरणार्थ, एका ठिकाणी आंबेडकर म्हणतात, "That Hindu philosophy that everything is Brahma remained only a matter of intellect. It never became a social philosophy. The Hindu philosophers had both their philosophy and their Manu held apart in two hands, the right not knowing what the left had." याचं गांजरे यांनी असं केलंय : " 'सर्व वस्तू ब्रह्मरूप आहेत' हे हिंदू तत्त्वज्ञान केवळ बुद्धिगम्य विषय होऊन राहिले. एका सामाजिक तत्त्वज्ञानाचे रूप त्याला कधीही प्राप्त झाले नाही. हिंदू धर्माजवळ अशा प्रकारचे दुहेरी तत्त्वज्ञान होते. त्यांच्या मनूनेच हे दोन प्रकारचे तत्त्वज्ञान प्रसृत करून आपल्या दोन हातात वेगवेगळे धारण केले होते. उजव्या हातात काय आहे याचा डाव्या हाताला पत्ता नाही." प्रस्तुत मराठी भाषांतरात हे वाक्य असं येतं : "सर्व काही ब्रह्म आहे, हे हिंदू तत्त्वज्ञान केवळ बौद्धिक पातळीवरच राहिलं. ते कधीही सामाजिक तत्त्वज्ञान झालं नाही. हिंदू तत्त्वज्ञांनी एका हातात मनूला ठेवलं, दुसऱ्या हातात स्वतःचं तत्त्वज्ञान ठेवलं, आणि दोन्ही हात परस्परांपासून दूर ठेवले. त्यामुळे उजव्या हाताला डाव्या हातात काय आहे याचा पत्ता लागत नाही."
तसंच, एका ठिकाणी आंबेडकर संमती वयाच्या विधेयकावरून झालेल्या वादासंदर्भात म्हणतात, "It is impossible to read the writing of those who supported orthodoxy in their opposition to the Age of Consent Bill without realizing the depth of the degradation to which the so-called leaders of the peoples had fallen." याचं गांजऱ्यांनी असं केलंय "संमती वयाच्या बिलाला विरोध करताना धर्मांध गटाच्या पुढाऱ्यांनी जे लेख लिहिले त्यावरून हे तथाकथित पुढारी अधोगतीच्या किती नीच पातळीला उतरले होते याची कल्पना येते." इथे मूळ भाषणात 'the so-called leaders of the peoples' हा उल्लेख 'लोकमान्य' टिळकांकडे निर्देश करणारा आहे, हे साधारण तेव्हाच्या वादविवादांच्या पार्श्वभूमीवर स्पष्टच आहे. त्यामुळे प्रस्तुत मराठी भाषांतरात हे वाक्य असं आलंय "संमती वयाच्या विधेयकाला विरोध करणाऱ्या सनातन्यांना पाठिंबा देणाऱ्यांचं लेखन वाचलं तर हे तथाकथित लोकमान्य नेते किती खालच्या थराला गेले होते, हे लक्षात येतं."
याशिवाय, एका ठिकाणी त्यांनी 'chosen race'चं भाषांतर 'निवडक वंश' असं केलं आहे, तर प्रस्तुत भाषांतरात ते 'ईश्वरी कृपादृष्टी असणारा वंश' असं आलंय.
अशी आणखी उदाहरणं इथे देण्याची गरज नाही. पण या अशा गोष्टी लक्षात घेतल्यावर सदर भाषणाचं नवीन मराठी भाषांतर करणं आवश्यक वाटलं. याचा अर्थ, हे भाषांतर पूर्ण निर्दोष आहे, असा दावा नाही. कितीही सावध प्रयत्न केला तरी भाषांतराच्या प्रक्रियेत काही गफलती होत जाण्याची शक्यता असते. तर, हाही एक छोटा प्रयत्न आहे, इतकंच.
विवरणात्मक टिपांची गरज
या पुस्तकात भाषणाच्या मूळ मजकुराला विवरणात्मक टिपा जोडण्याची गरज पुढील कारणांसाठी वाटली :
एक, आंबेडकरांनी इथे मांडलेल्या मुद्द्यांचे धागेदोरे त्यांच्या मांडणीतल्या प्रमुख आस्थाविषयांपर्यंत जाणारे आहेत. हे धागेदोरे लक्षात घेतले तर त्यांच्या एकंदर विचारव्यूहाचा नकाशा उभा राहतो, म्हणून धागेदोरे शोधून नोंदवण्याचा प्रयत्न वितरणात्मक टिपांमधून केला.
दोन, काही ठिकाणी आंबेडकर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्या वेळच्या चर्चाविश्वाशी वाद-संवाद साधत होते, हे अधोरेखित करणंही आवश्यक वाटलं. याचं वर उल्लेख आलेलंच उदाहरण पुढे न्यायचं तर, 'the so called leaders of the peoples' याचं 'तथाकथित लोकमान्य पुढारी' असं भाषांतर करणं, ही एक पायरी झाली. त्यापुढे या संदर्भातल्या वाद-संवादाचा थोडा गोषवारा दिला, तर मुद्याची संगती लागायला मदत होते. त्यामुळे असे काही संगती लावण्यासाठीचे संदर्भ टिपांमधून दिले आहेत.
तीन, या भाषणात कित्येक विचारवंतांची उद्धृतं आलेली आहेत. त्यामुळे काही टिपा फक्त संबंधित अवतरणांचा स्त्रोत (लेखक कोण, पुस्तकं कोणतं, इत्यादी) नोंदवणाऱ्या आहेत; तर काही वेळा आंबेडकर स्त्रोताचा उल्लेख न करता एखाद्या लेखकाचं वाक्य वापरतायंत असं दिसत असेल तर तेही टिपेमध्ये नोंदवलं आहे. शेक्सपिअरच्या नाटकापासून ते एखाद्या सरकारी कायद्यापर्यंत, लोकशाहीसंदर्भातल्या पाश्चात्त्य विद्वानांच्या पुस्तकांपासून ते इंग्लंडमधील पत्रकारितेविषयीच्या एखाद्या लेखापर्यंत, किंवा एखाद्या धार्मिक पंथाविषयीच्या कायदेशीर निकालापासून ते चरित्रग्रंथांपर्यंत कित्येक स्त्रोतांचे संदर्भ ते देतात. यातून त्यांच्या वाचनाचा आवाका लक्षात येतो.
चार, यात उल्लेख आलेल्या काही संस्था आणि व्यक्ती आता विविध कारणांमुळे विस्मृतीत गेल्या आहेत. त्यामुळे त्यांचे संदर्भ स्पष्ट करणाऱ्या टिपा इथे आल्या आहेत. काही वेळा त्या संस्थेच्या वा व्यक्तीच्या माहितीसोबतच एकंदर भाषणाची पार्श्वभूमी स्पष्ट करणारे काही संदर्भ दिले आहेत.
पाच, काही वेळा एखाद्या मुद्द्यात तथ्याची चूक राहून गेलेली असते, ती दुरुस्त करणं; किंवा कधी वाद-संवादाची शक्यता पडताळून पाहणं, असाही एक उद्देश काही टिपांमागे आहे.
आंबेडकरांच्या या आणि इतरही संहितांबाबतीत असा प्रयत्न करणं हा आंतरविद्याशाखीय उपक्रम ठरू शकतो. पण मी कोणत्याही विद्याशाखेचा अभ्यासक नाही. तसंच, इथल्या प्रयत्नामागचा उद्देशही अकादमिक स्वरूपाचा नाही. यामागचा उद्देश असा आहे : एकंदरच विचारवंतांविषयीचं किंवा कोणत्याही विचारांविषयीचं बोलणं, चर्चा, गप्पा, संवाद यात धोकादायक विखंडितपणा येत असल्याचं आजूबाजूच्या वातावरणातून जाणवतं. आपापल्या सोयीने गोष्टी निवडणं, तथ्यांपेक्षा आपापल्या अभिनिवेशी मतांवरच जास्त विसंबून राहणं, काही तथ्यं आता स्पष्ट झालेली असतील तरी मग त्यावर केवळ तर्क लढवून आपली मतं मान्य असणाऱ्यांशीच बोलत राहणं, यातून काहीच खोलात जाणं होत नाही, आपापले बडबडीचे बुडबुडे तयार होतात, असं वाटतं. अशा परिस्थितीत सुमारे आठ दशकांपूर्वीचं हे भाषण नुसतंच भाषांतरित न करता त्यातून वाद-संवादाचा छोटासा प्रातिनिधिक दाखला उभा करता येईल का, हे तपासण्याचा हा प्रयत्न आहे.
आंबेडकरांनी 1935 साली हिंदू धर्म सोडण्याची घोषणा केली, त्यानंतर एका भाषणात ते म्हणाले की, धर्मांतराने लगेच स्वर्ग अवतरणार आहे असं नाही. इतर कुठल्याही धर्मात गेल्यावरही भवितव्याकरता झगडा करावा लागेल. इथे मग ते मुसलमान, ख्रिस्ती, शीख झाल्यावर काय होऊ शकतं, यावर विधानं करतात. दुसऱ्या धर्मात प्रवेश केल्यावर तिथेही आपल्याला निराळ्या प्रार्थनामंदिरात जाण्यास सांगितलं, तर तसल्या प्रार्थनामंदिराला आपण आग लावू, असं स्पष्ट करून ते म्हणाले, "मी काही साधाभोळा नाही. जिथे जाईन तिथे काट्यासारखा बोचत राहीन !" (आंबेडकर, 2002क: पान 445). हा 'काटा' कसला आहे आणि त्याची 'बोच' कसली आहे, या प्रश्नाचं साररूपातलं उत्तर प्रस्तुत भाषणातून मिळतं.
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या 101 व्या जयंतीदिनी, 18 जानेवारी 1943 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'रानडे, गांधी अँड जीना' या विषयावर पुणे येथे डेक्कन सभेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्याख्यान दिले. त्यानंतर दोनच महिन्यांनी ते प्रकाशितही झाले. त्या व्याख्यानाचे नव्याने भाषांतर करून, त्यातील व्यक्ती, संस्था, घटना, प्रसंग, संज्ञा, संकल्पना यांच्या संदर्भातील नेमक्या व वाचनीय टिपा असे पुस्तक अवधूत डोंगरे यांनी तयार केले आहे. पन्नास पानांचे व्याख्यान आणि त्याला दीडशे पानांच्या टिपा असे हे वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक 14 एप्रिल 2026 रोजी, साधना प्रकाशनाकडून येत आहे. त्या पुस्तकाला अवधूत डोंगरे यांनी लिहिलेले हे मनोगत आहे.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या