डिजिटल अर्काईव्ह

आदिवासी सहज शिक्षण परिवार (24 जानेवारी 2026)

आदिवासी भागातील मुले व महिलांचे आरोग्य व शिक्षणातील समस्या सोडविण्यासाठी सुरू झालेले संस्थेचे काम त्यांच्या स्वयंपूर्ण विकासाच्या दिशेने सुरू आहे. सातत्यपूर्ण सुरू असलेल्या या कामाला मागील चाळीस वर्षांचा वारसा लाभला आहे. या चार दशकांच्या काळात लोकांमध्ये कुटुंबाच्या आर्थिक, शैक्षणिक विकासासोबतच सामाजिक जाणिवांचा विकास करण्यात संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. आणि हे सातत्यपूर्ण काम अजूनही सुरू असून समोर येणाऱ्या प्रत्येक आव्हानाचा सामना करत ते सुरूच राहणार असल्याचा विश्वास प्रत्येक कार्यकर्त्याच्या कामातून दिसून येतो आहे. या सर्व उपक्रमांना संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे सहकार्य व मार्गदर्शन अतिशय मोलाचे ठरते.

पालघर जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे दोन भागांत विभागलेले लवरे नावाचे आदिवासी गाव. चहूबाजूंनी उंच डोंगरदऱ्या आणि जंगलांनी वेढलेला निसर्गसंपन्न परिसर. मुख्य रस्त्यापासून दोन-तीन किलोमीटर आतमध्ये. ओस पडलेला आणि उखडलेला डांबरी रस्ता, या रस्त्यावरून सायंकाळी सातच्या दरम्यान हेलकावे घेत गावातील जाधवपाड्याच्या दिशेने निघालेली आमची गाडी. वाडीची वेस येताच कुडाचे कुंपण घातलेल्या कौलारू घरांना पास करत करत एका घराच्या अंगणामध्ये जाऊन गाडी थांबली. लहान मुलांच्या गोष्टी, कथा, कवितांच्या पुस्तकाने भरलेली ही पुस्तकगाडी. अघळ पघळ बांधलेल्या घराच्या व्हरांड्यामध्ये भरलेल्या खेळघरात कोऱ्या कागदांवर चित्र रेखाटत बसलेल्या पंधरा ते वीस मुलांची नजर या गाडीवर खिळली. नवीन पुस्तकं आली म्हणून मुलांचे चेहरे खुलले. आज कुठली नवीन पुस्तकं आणली म्हणून मुलं गाडीतील ताई-दादांना विचारू लागली. ताई-दादा गाडीतील पुस्तकांनी भरलेले बॉक्स घराच्या व्हरांड्यावर नेऊन ठेवतात. तत्पूर्वी, मुलांनी याआधी घेतलेली पुस्तकं वाचली का? याची चौकशी करून जुनी पुस्तकं जमा करून घेतात. आणि त्यानंतर तुम्हाला जे आवडेल ते आणखी एक नवीन पुस्तक वाचायला घरी घेऊन जा, असे सांगताच मुलांची पुस्तकं चाळून आवडीचे पुस्तक

घेण्याची घाई सुरू झाली. 'ताई, मी हे पुस्तक घेणार, मी ते घेणार, मला हे हवे आहे. असा गोंधळ सुरू होतो आणि सर्वांनी पुस्तक घेऊन झाल्यावर त्यांची नोंदणी करून मुलं ती पुस्तके आपापल्या बॅगेत घालून ठेवतात. शाळकरी मुलं मोबाइल, टीव्ही आणि विविध डिजिटल गॅझेट्सच्या आहारी गेलेल्या काळात पालघरच्या आदिवासी पाड्यावर हे वेगळंच चित्र पाहायला मिळालं. पालघरमधील 'आदिवासी सहज शिक्षण परिवार' संस्थेच्या वतीने सुरू असलेले हे अतिशय प्रभावशाली उपक्रम. यांतील पहिला खेळघर आणि दुसरा पुस्तकगाडी.

खेळघर

कोरोना महामारीच्या काळात विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागांतील मुलांच्या प्राथमिक शिक्षणावर प्रतिकूल परिणाम झाला. ऑनलाइन शिक्षण घेण्यास अडचण, दुर्गम भाग असल्याने नेटवर्कची समस्या, अद्ययावत मोबाइल फोन नाही. त्यामुळे शिक्षणाची हेळसांड सुरू होती. अशा परिस्थितीत संस्थेच्या कार्यकर्त्यांनी गावागावांत जाऊन पालकांशी बोलून सर्व काळजी घेत ग्रामपंचायतीच्या परवानगीने 10 खेळघर सुरू केले. शिक्षण मार्गदर्शक कविता भागवत यांच्या मदतीने संपूर्ण वर्षभराचा अभ्यासक्रम तयार केला. हा अभ्याक्रम पहिली ते चौथीपर्यंतच्या मुलांना शिकविण्यासाठी त्याच गावातील 10वीच्या पुढे शिक्षण घेतलेल्या तरुण मुला-मुलींना अल्पसे मानधन देऊन तयार केले. कविता भागवत यांच्या मदतीने यासाठी त्यांना पुणे, मुंबई येथे नेऊन प्रत्यक्ष, तर अनेकदा ऑनलाइन माध्यमातून टप्प्याटप्प्याने वर्षभर प्रशिक्षण देण्यात आले आणि खेळघरे सुरू झाली. सध्या अतिशय चांगल्या प्रकारे 15 ठिकाणी ही खेळघरे सुरू आहेत. खेळघरांमध्ये प्राथमिक शिक्षणासोबतच विविध अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून मुलांचा बौद्धिक विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो. उदा., 'कुतूहल कोपऱ्या'च्या माध्यमातून मुलांच्या समोर कुठलीही एक वस्तू ठेवून त्यावर चर्चा घडवून आणली जाते. हे काय आहे, कसे दिसते, याच्याविषयी लोकांचे समज काय आहेत आदी. कधी राग येतो तर कधी वाईट वाटते, असे का होते? गावातील माणूस ओरडल्यावर राग येतो; मात्र आई ओरडल्यावर वाईट वाटते असे का होते. अशा प्रकारे मुलांशी चर्चा केली जाते. विविध सण अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. रक्षाबंधनाला गावातील सरपंच, आशा ताई, अंगणवाडी ताई, मुलांची आई यांना बोलावून राख्या बांधल्या जातात. सप्टेंबरच्या शेवटच्या रविवारी 'नदी दिवस' साजरा केला जातो. दोन वर्षांपासून मुलं 'दुकान जत्रा' भरवतात. या जत्रेत स्वतःच्या शेतात उगवलेली भाजी, फळे विक्रीसाठी आणली जातात. सोबतच, मुलांनी बनविलेल्या कागदाच्या वस्तू इथे विक्रीसाठी ठेवल्या जातात. गावातील लोक आवर्जून इथे येऊन मुलांच्या वस्तू विकत घेतात. मुलं याचा हिशोब ठेवतात. अशा अतिशय वेगळ्या पद्धतीच्या उपक्रमांद्वारे मुलांचा विकास साधण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे. लवरे गावच्या जाधवपाड्यावरील रुपाली तांडेल ही ताई खेळघर चालविते. रुपाली सध्या बीएच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. रुपाली म्हणते, "खेळघरच्या माध्यमातून मला अधिक शिकायला मिळत आहे. माझा आत्मविश्वास वाढला, भविष्यात काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली. खेळघर ही माझ्या आयुष्यातील सर्वांत चांगली गोष्ट आहे. माझ्या खेळघरात एकूण 17 मुलांची नोंद आहे. त्यांपैकी 13 ते 14 मुलं नियमित हजर असतात. पूर्वी मुलं हट्ट करायची, पण आता करत नाहीत. पालकांनाही मुलांमधील होणारा बदल दिसत असल्याने पालकही याला उत्सहाने पाठिंबा देतात".

तांडेल पाड्यावरील खेळघर चालविणारी प्रियंका जाधव ही ताई सांगते, "मुलांकडूनच मला अधिक शिकायला मिळते. त्यामुळेच त्यांना शिकवायला, त्यांच्यासोबत काम करायला आवडते. मुलांची संख्या जास्त असल्याने शाळेत प्रत्येक मुलाकडे पाहिजे तेवढं लक्ष देता येत नाही. त्यामुळेच मुलं मागे पडतात. पण ती कसर आम्ही इथे भरून काढतो. माझ्या खेळघरात एकूण 20 मुलांची नोंद आहे त्यांपैकी 17 ते 18 मुलं नियमित हजर असतात".

पुस्तकगाडी

आदिवासी सहज शिक्षण संस्थेचा हा आणखी आगळावेगळा उपक्रम. सुरुवातीलाच उल्लेख केल्याप्रमाणे मुलांच्या आवडीची पुस्तके घेऊन पुस्तकगाडी (फिरते वाचनालय) मुलांपर्यंत जाते. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी हा यामागील हेतू आहे. हा उपक्रम सध्या 16 गावांमध्ये सुरू आहे. खेळघरातील मुलांसोबतच गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुले, गावकरी असे सगळेच यामध्ये सहभागी होतात. संस्थेमध्ये मागील वीस वर्षांपासून काम करणारे खेळघर उपक्रमाचे समन्वयक प्रमोद गोवारी दादा आणि मागील दहा वर्षांपासून संस्थेशी जोडलेल्या मृणाल राऊत ताई हा उपक्रम यशस्वीपणे राबवत आहेत. खेळघराच्या काही महिन्यांनंतर हा उपक्रम सुरू करण्यात आला. कविता भागवत यांनी यासंदर्भातील प्रशिक्षण देण्यास मदत केली. याविषयी प्रमोद गोवारी म्हणतात, "पालघरमधील 90 टक्के आदिवासी समाजातील ही पहिली किंवा फारतर दुसरी पिढी शिक्षण घेत आहे. कोरोनाच्या काळात याचा अधिकच फटका येथील मुलांना बसत होता. त्यावर पर्याय म्हणून हे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. यामुळे अनेक मुलं वाचायला शिकली. त्यांच्या आवडीच्या गोष्टी, कविता पाठ करायला लागली. वाचण्याची आवड त्यांच्यामध्ये निर्माण झाली. आम्ही मुलांशी थेट संवाद साधतो, गाणी, छोट्या छोट्या नाटिका शिकवतो. पुस्तके वाचून घेतो. सातत्यपूर्ण सुरू असलेल्या या उपक्रमामुळे मुलांमधील बदल आता आम्हाला दिसू लागले आहेत. संस्थेने पुस्तकांसोबत तीन गावांमधील लोकांना पेपर वाचता यावा म्हणून पेपर वाचनालयदेखील सुरू केले आहे. मृणालताई सांगतात, "येथील कातकरी समाजातील पाचवीच्या वर्गात गेलेल्या मुलांना स्वतःचे नावदेखील लिहिता येत नव्हते; पण आता बदल होतो आहे. पुस्तकं फाटली, खराब झाली तरी चालतील; पण पुस्तकं घ्या. चित्रांची पुस्तकं घेऊन चित्र रंगवा, पण पुस्तक घेऊन जा, असे आम्ही सतत मुलांना सांगत गेलो. या उपक्रमाला जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. आज 16 शाखांमधून जवळपास 400 मुलांपर्यंत आम्ही पोहोचतो आहोत". मासवण येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत आठवीत शिकणाऱ्या मोहित गोवारी या मुलाने आतापर्यंत 500 हून अधिक छोटी-छोटी पुस्तकं वाचली आहेत. मोहित म्हणतो, "खेळघरात जायचो तेव्हापासून पुस्तक वाचण्याची सवय लागली; पण चौथीच्या पुढील मुलांना खेळघरात घेत नाहीत. त्यामुळे आता मासवणला शाळेत येताना जाताना संस्थेच्या ऑफिसमध्ये जाऊन पुस्तक घेतो आणि वाचून झाल्यावर पुन्हा जमा करतो. पुस्तक वाचून मला छान वाटतं. बाहेरच्या जगाची माहिती मिळते. नवीन नवीन गोष्टी समजतात". मोहितला विचारले, "कुठली पुस्तक वाचली? तर त्याने 'चिकू-पिकू, अकबर बिरबल, बोध मिळणाऱ्या गोष्टींची पुस्तकं, शेतीची माहिती देणारी पुस्तक' असा पाढाच त्याने वाचून दाखविला. मोहित आता स्वतः कविताही लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे. पुढे जाऊन मला शिक्षक व्हायचे असल्याचे सांगतो. मोहितच्या गावात पोहोचलो तेव्हा रात्र झाली होती. घरांमध्ये सोडल्यास रस्त्यावर कुठेही लाइट दिसत नव्हती. त्याचे घर मुख्य रस्त्यापासून बरेच आतमध्ये होते. रात्रीच्या वेळी तिथपर्यंत जाऊन येण्याएवढा वेळही नव्हता म्हणून त्यालाच निरोप पाठवून गावातील एका नातेवाइकांच्या इथे बोलावले होते. सडपातळ देहाचा, शाळेचा पांढा शर्ट आणि खाकी पॅन्ट, पायांत स्लिपर घालून तो आम्हाला भेटण्यासाठी आला होता. पुस्तकगाडीच्या उपक्रमाचा फायदा आता पालकही घेत आहेत. लवरे गावातील प्रिया जाधव, वय 34 वर्षे यांनी आतापर्यंत 105 पुस्तकं वाचली असल्याचे सांगितले. प्रिया जाधव म्हणतात, "पुस्तक वाचल्यामुळे जगभरातील माहिती आपल्याला समजते. मला वनस्पतींची माहिती देणारी पुस्तकं वाचायला आवडतात. वाचनामुळे
मनावरील ताण कमी होतो आणि एकटेपणाही जाणवत नाही. त्यामुळेच जेव्हा पुस्तकगाडी वस्तीवर येते तेव्हा मी आवर्जून वाचण्यासाठी पुस्तकं घेते."

पालघर जिल्हा पूर्वी ठाणे जिल्ह्याचाच एक भाग होता. परंतु, 2014मध्ये याला स्वतंत्र्य जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले. इथे आदिवासी समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. मल्हार कोळी, वारली, कातकरी या प्रमुख आदिवासी जमातींसह कुणबी, वंजारी, आग्री, भंडारी, हरिजन आदी समाजांचे लोक राहतात.

'आदिवासी सहज शिक्षण परिवार' संस्थेची पार्श्वभूमी

महिलांच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी पुण्यात 'समाजवादी महिला सभा' महाराष्ट्र ही संस्था ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्त्या अनुसया लिमये यांनी स्थापन केली. शहरांसोबतच आदिवासी आणि ग्रामीण भागातदेखील महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी काम करावे, अशी अनुसया लिमये यांची इच्छा होती. यासाठी त्यांची सहकारी मैत्रीण डॉ. चित्राताई नाईक यांच्या मदतीने पालघर जिल्ह्यातील मासवण गावाचा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात अपुऱ्या शिक्षणाच्या सोयी, आरोग्य सुविधांचा अभाव, बुवाबाजी, अंधश्रद्धांचा अधिक पगडा, या गोष्टी प्रकर्षाने समोर आल्या. त्यामुळेच इथे काम करण्याची त्यांना गरज वाटली. यासाठी त्यांचे सहकारी मित्र नवनीतभाई शहा, काळूरामकाका दोधडे, यमुताई साने, दत्ता ताम्हाणे यांनीही मोलाचे सहकार्य केले. सर्वांसोबत चर्चा करून महिला व मुलांच्या शिक्षण व आरोग्य विषयातील काम आंतरराष्ट्रीय बालक वर्षाच्या निमित्ताने सन 1978 मध्ये मासवण व आजूबाजूच्या 40 गावांतून सुरू झाले. त्यांत 13 गावांत 3 महिने ते 6 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी सहज शिक्षण केंद्राची सुरुवात केली. या केंद्रात प्रत्येकी 2 शिक्षिका व 2 आया या सर्वांना प्रशिक्षण दिले व कामास सुरुवात केली. यामध्ये मुलांचे शिक्षण व आरोग्य यांकडे अधिक लक्ष देण्यात आले. व्यवस्थापनाच्या दृष्टीने 'आदिवासी सहज शिक्षण परिवार' या नावाने स्वतंत्र संस्थेची नोंदणी करण्यात आली. संस्थेच्या माध्यमातून आदिवासी पाड्यांवरील मुलं, महिलांचे शिक्षण व आरोग्यविषयक काम सुरू झाले. पुण्यातील डॉ. सुधा रणदिवे व सुमन देशपांडे यांनी 22 वर्षे तिथेच राहून संस्थेचे काम निष्ठेने केले. 3 ठिकाणी प्रथमिक उपचार केंद्र, विशेषतः लहान मुलांसाठी प्रत्येक केंद्रात जाऊन तपासणी, 10 गावांत फिरता दवाखाना, महिला बचत गट, बेकरी, वारली चित्रकला विभाग, आदिवासी मुलींचे वसतिगृह अशा वेगवेगळ्या उपक्रमांतून काम उभे केले. वरील मान्यवरांसोबतच इंदूताई नवले, माई केदारी, पुष्पाताई मायदेव, शुभांगी जोशी, पुष्पाताई परुळेकर, सुधा तांबे, लक्ष्मी तंबाकू या सर्वांनी संस्थेच्या उभारणीत खूप मोलाचे सहकार्य केले. पालघर शहरापासून 11 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मासवण गावात संस्थेचे मुख्य कार्यालय असून, तिथूनच संस्थेचा संपूर्ण कारभार चालविला जातो.

संस्थेचे इतर महत्त्वपूर्ण उपक्रम

आदिवासी मुलींचे वसतिगृह आदिवासी भागातील विशेषतः मुलींना चौथीच्या पुढील शिक्षण घेणे अवघड जात होते. घरापासून शाळेचे अंतर लांब, पालकांची गरीब परिस्थिती, मुलींच्या सुरक्षितेतचा प्रश्न. यामुळे चौथीनंतर मुलींना पुढचे शिक्षण घेता येत नव्हते. यावर पर्याय म्हणून मुलींनी शिकावे, पुढे यावे यासाठी सन 1991 मध्ये मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यात आले. इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतच्या वसतिगृहासाठी समाज कल्याण विभागाकडून मान्यता मिळवली. त्यामुळेच आतापर्यंत 1000 मुलींना शिक्षण घेता आले आहे. वसतिगृहात राहून शिकून गेलेल्या 5 मुलींनी पुढे जाऊन नर्सिंगचा कोर्स केला आणि सरकारी नोकरीत गेल्या. शिक्षणामुळे आलेले आत्मभान, यामुळे अनेक मुली नोकरी करतात, 2 जणी शिक्षिका झाल्या, 2 जणी स्वंयसेवी संस्थेत काम करत आहेत. 6-7 मुलींनी शिवण क्लास शिकून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. अशी अनेक उदाहरणे आहेत मुलींची की, ज्या शिकून स्वतःच्या पायांवर आज उभ्या आहेत. आज रोजी 35 मुली वसतिगृहात आहेत. रोटरी क्लबच्या मदतीने त्यांच्यासाठी स्वतंत्र इमारत उभी करण्यात आली आहे. चारुशिला राऊत या सन 2004 पासून वसतिगृहाच्या रेक्टर म्हणून काम पाहतात. याविषयी चारूशिला राऊत सांगतात, "सुरुवातीला मुली बोलतच नाहीत. त्यांना बोलते करणे हेच आमच्यासमोरील प्रमुख काम असते. अनेकींना स्वतःचे नाव, गावाचे नाव लिहिता येत नाही. परंतु, हळूहळू त्यांच्यामध्ये बदल होत जातो. त्यांना स्वच्छतेची सवय लागते. शिक्षण घेत असल्यामुळे दहावीनंतर लगेच मुलींचे लग्न होण्याचे प्रमाणदेखील कमी झाले आहे. मुलींमधील झालेले बदल पाहून पालकही समाधान व्यक्त करतात. यातच आम्हाला आनंद मिळतो. वसतिगृहाला समाज कल्याण विभागाची मान्यता असली तरी शासनाकडून प्रतिविद्यार्थी महिन्याला केवळ 1500 रुपये मिळात. तेही वर्षातील केवळ दहा महिने. त्यामुळे इमारतीची डागडुजी, दवाखाना, मुलींचे आरोग्य यांसाठी अनेक हितचिंतक देणगीदार हे मुलींच्या शिक्षणासाठी मदत करतात.

विशेष दत्तक पालक

आदिवासी मुलींच्या शिक्षणाला मदत करण्यासाठी 150 पालक संस्थेशी जोडले गेले आहेत. 10वीनंतरच्या पुढील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलींना या उपक्रमाच्या माध्यमातून मदत केली जाते. आत्तापर्यंत 40 मुलींना मदत करण्यात आली आहे. यामध्ये संस्थेचे हितचिंतक या मुलींचे पालकत्व स्वीकारून त्यांना पुढील शिक्षणासाठी मदत करतात. विजय फातरपेकर नियमितपणे येऊन आठवी-नववीमधील मुलींना गणित, इंग्रजी, विज्ञान विषय शिकवितात. दर शनिवारी अमेरिकास्थित रूपा लुकतुके या 5वी ते 7वीच्या मुलींना ऑनलाइन माध्यमातून इंग्रजी शिकवितात. यासोबत अनेक मान्यवर, कार्यकर्ते वेळोवेळी मुलींना येऊन शिकविण्यास मदत करतात. दर दोन वर्षांनी दत्तक पालक मेळावा घेतला जातो. त्यामध्ये मुलींच्या शिक्षणासाठी मदत करणाऱ्या सर्व हितचिंतकांना बोलावले जाते. या मुलींसोबत त्यांचा एक आनंदाचा संवाद घडवला जातो. तसेच त्यांनी शिक्षणासाठी मदत केलेल्या मुलामुलींच्या सद्यःस्थितीबद्दल माहिती दिली जाते. या दत्तक पालक मेळाव्याला आलेल्या सर्व देणगीदार, हितचिंतकांना सध्या सुरू असलेल्या सर्व उपक्रमांची सविस्तर माहिती दिली जाते. यातून संस्थेचा सुरू असलेला कारभार व व्यवस्थापन याची माहिती होऊन त्यातील कामाची पारदर्शकता समजते. ही माहिती मिळाल्यामुळे व संस्थेचे काम जाणून घेतल्याने येणारे हितचिंतक व देणगीदार कामाबद्दल समाधान व्यक्त करतात.

स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत मिळून केलेली कामे

संस्थेच्या मागील चाळीस वर्षांच्या काळात काम करणारे अनेक कार्यकते तयार झाले. त्यांच्या मदतीने ग्रामपंचायत व त्यातील शाळा व्यवस्थापन, जैव विविधता, स्वच्छता, पाणीपुरवठा आदी समित्यांच्या नेमक्या जबाबदाऱ्या काय असतात, त्यांचे कार्य कसे चालते, अधिकार काय असतात याविषयी प्रशिक्षण शिबिरे घेऊन गावपातळीवरील लोकांचा सहभाग वाढवला. गावात असणाऱ्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग गावाला कसा होईल याविषयी प्रशिक्षण शिबिरे घेतली. दोन गावांच्या मदतीने त्या गावांचे रजिस्टर बनवले. या रजिस्टरमध्ये संपूर्ण गावात असणारी झाडे, प्राणी, पक्षी, नदी, पिके, डोंगर, मासे आदी माहितीची नोंद करून लिहून ठेवली. विविध स्वरूपांच्या रानभाज्यांची माहिती होण्यासाठी महिलांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. पावसाळी भाज्यांची नावे, त्या कधी उगवतात, त्या कशा बनवतात याची माहिती महिलांकडून गोळा करून त्याचे एक रेसिपी बुक तयार केले. माहिती व सल्ला केंद्राच्या माध्यमातून विविध सरकारी योजनांची माहिती, त्याचे फायदे-तोटे उदा., निराधार योजना, श्रावण बाळ योजना, कुटुंब अर्थसाहाय्य योजना आदींची माहिती देऊन यासाठी अर्ज कसे करयाचे याचे प्रशिक्षणदेखील देण्यात आले. या सगळ्याचा 10 गावांतील 1500 हून अधिक लोकांना फायदा झाला. कोरोना काळातील लॉकडाउनच्या काळात हातावर पोट असलेल्या वंचित, आदिवासी, कातकरी समाजांतील तब्बल 560 कुटुंबांना अन्नधान्याची मदत संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली.

सन 1989 मध्ये महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक संस्थेच्या पुरस्काराने संस्थेच्या उल्लेखनीय कामाला गौरविण्यात आले. यासोबतच, इतरही प्रतिष्ठित संस्थांतर्फे दिले जाणारे 13 पुरस्कार संस्थेला मिळाले आहेत. स्थापनेपासून काळानुरूप संस्थेच्या कामात बदल करण्यात आले. संस्थेच्या सेक्रेटरी वर्षा फातरपेकर सांगतात, "सन 1980 च्या दरम्यान सुरुवातीला संस्थेच्या कामाला स्थानिक लोकांनी विरोध दर्शविला होता. लोक संस्थेसोबत जोडून घ्यायला घाबरत होते. हे मिशनरीचे लोक असून आपले धर्मांतर वगैरे करतील अशी त्यांना भीती वाटायची; परंतु त्या वेळच्या संस्थेच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी त्यांना विश्वासात घेऊन काम उभे केले. सन 1990 मध्ये 140 महिला बचत गटांची बांधणी केली. त्यातून अनेक महिलांना याचा आर्थिक लाभ घेता आला. पुढे, सन 2008 मध्ये महिला बचट गटांचे काम सुरुळीत सुरू असल्याचे पाहून हे गट त्या त्या गावातील ग्रामपंचायतींशी जोडून देऊन संस्था बाहेर पडली. त्याचप्रमाणे, तीन महिने ते 6 वर्षांपर्यंतच्या बाळांसाठी पाळणाघरे संस्थेने सुरू केली. ज्यामुळे महिलांना मोकळीक मिळून त्यादेखील कामधंद्याला बाहेर पडू शकल्या. पुढे 1998 ते 2000च्या दरम्यान सरकारी अंगणवाड्या गावागावांत सुरू झाल्या. सरकार आता या मुलांची जबाबदारी घेण्यास पुढे आल्याने सन 2012 मध्ये संस्थेने आपला पाळणाघराचा उपक्रम बंद केला. संस्थेने बेकरीदेखील सुरू केली होती. त्यामध्ये पाव, बिस्कीट, टोस्ट बनविण्याचे प्रशिक्षण दिले जायचे. यातून घेण्यात येणारे उत्पादन संस्थेच्या पाळणाघरातील मुलांसाठी देण्यात यायचे. संस्थेने पालघरमधील वारली आदिवासींची वारली चित्रकला जोपासण्यासाठीदेखील प्रयत्न केले. विविध स्वरूपाच्या वस्तूंवर पेंटिंग करून ते विकण्यास सुरुवात केली. या उपक्रमात 8 ते 10 कलाकार काम करत होते. वसंत इप्टे यांनी या वस्तू लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि वारली चित्रकलेचे प्रशिक्षण देण्यासाठी मोलाची मदत केली".

पुढे, आर्थिक व व्यवस्थापनातील अडचणींमुळे बेकरी व वारली पेंटिंगचा उपक्रम संस्थेला बंद करावा लागला. त्यामुळे सध्या खेळघर, पुस्तकगाडी, दत्तक पालकत्व, वसतिगृह हे उपक्रम व्यवस्थित सुरू आहेत. सोबत ग्रामपंचायतींसोबत मिळून स्थानिक पातळीवरील महिला व मुलांच्या समस्यांवर संस्था काम करत आहे.

आदिवासी भागातील मुले व महिलांचे आरोग्य व शिक्षणातील समस्या सोडविण्यासाठी सुरू झालेले संस्थेचे काम त्यांच्या स्वयंपूर्ण विकासाच्या दिशेने सुरू आहे. सातत्यपूर्ण सुरू असलेल्या या कामाला मागील चाळीस वर्षांचा वारसा लाभला आहे. या चार दशकांच्या काळात लोकांमध्ये कुटुंबाच्या आर्थिक, शैक्षणिक विकासासोबतच सामाजिक जाणिवांचा विकास करण्यात संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. आणि हे सातत्यपूर्ण काम अजूनही सुरू असून समोर येणाऱ्या प्रत्येक आव्हानाचा सामना करत ते सुरूच राहणार असल्याचा विश्वास प्रत्येक कार्यकर्त्याच्या कामातून दिसून येतो आहे. या सर्व उपक्रमांना संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे सहकार्य व मार्गदर्शन अतिशय मोलाचे ठरते.

अधिक माहितीसाठी संपर्क
वर्षा फातरपेकर, सेक्रेटरी,
आदिवासी सहज शिक्षण परिवार,
मु. पो. मासवण, ता. जि. पालघर 401403.
Mob. 9823943072
assp1978@gmail.com

 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी