डिजिटल अर्काईव्ह

अण्णा दुराई यांनी 17 सप्टेंबर 1949 रोजी चेन्नईच्या रॉबिन्सन पार्कमध्ये द्रमुक पक्षाची स्थापना केली. या घटनेस 78 वर्षे पूर्ण होत आहेत. या पक्षाच्या स्थापनेचा वैचारिक आधार होता वि.स. खांडेकरांचे तमिळमध्ये भाषांतरित साहित्य. ते भाषांतर केले होते, मुंबईत जन्म, बालपण, तारुण्याची घडण झालेल्या का. श्री. श्रीनिवासाचार्य यांनी. पुढे ते चेन्नईत स्थिर झाले. मुंबईची मराठी व मद्रासची तमिळ या भाषांवर पोसलेल्या का. श्री. श्रींनी 13 कादंबऱ्या, 150 कथा इतके विपुल साहित्य तमिळमध्ये नुसते भाषांतरित केले नाही, तर खांडेकर साहित्य विचार तमिळींचा श्वास बनवला. या विचारांनी द्रमुक पक्ष नुसता अस्तित्वात आला नाही, तर सन 1967 च्या सार्वत्रिक निवडणुकीत या पक्षास सत्ता, सरकार मिळवून दिले. त्या सर्व घडामोडींचा लेखाजोखा म्हणजे हा लेख.

भारतीय स्वातंत्र्याचा विचार सक्रियपणे सुरू झाला तो सन 1857 पासून. विसावे शतक उजाडले नि त्याला चळवळीचे रूप प्राप्त झाले, ते महात्मा गांधींच्या सन 1915 च्या दक्षिण आफ्रिकेतून झालेल्या आगमनाने. सन 1920 ची 'असहकार चळवळ' हे स्वराज्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले दमदार पाऊल होते. या आंदोलनाने सर्व भारतास जागे केले, या काळात तत्कालीन मद्रास प्रांतात 20 नोव्हेंबर, 1916 ला 'जस्टिस पार्टी' स्थापन झाली. डॉ. सी. नटेसन, डॉ. टी. एम. नायर, श्री. पित्ती थियागरया चेट्टी यांनी 'साउथ इंडियन लिबरल फेडरेशन'ची स्थापना करत, एतद्देशीय लोकांच्या स्वराज्य स्थापनेचे रणशिंग फुंकले होते. 1919 मध्ये ब्रिटिशांनी घटना सुधारणांवर विचार करत, एका अर्थाने भारतीय संघराज्याच्या पुनर्रचनेचे सूतोवाच केले होते. सन 1923 च्या सप्टेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत जस्टिस पार्टीने मद्रास प्रांतात बहुमत मिळवून सरकार स्थापन केले. या सरकारने महिलांना प्रथमच मतदानाचा अधिकार बहाल केला. 'द्रविड' स्वाभिमानाचे बीजारोपण केले. आरक्षण आणले. भेदाभेद व्यवहार प्रतिबंधित केला. देवदासी प्रथा उन्मूलन कायदा केला. याद्वारे या पक्षाने मद्रास प्रांतात समानता, समायोजित प्रशासन, आणि समाज सुधारणा यांचा पाया घातला.

थंथाई (पितृतुल्य) पेरियार यांनी या सुधारणांना पुढे गती दिली. या पेरियार ई. व्ही. रामस्वामी यांनी नावातील जातीवाचक शब्द काढून टाकण्याची मोहीम हाती घेतली. पेरियार यांनी जीवनभर स्त्री हक्क, समानता, प्रांतिक स्वायत्तता व स्वाभिमान, भाषिक अभिमान यांसाठी कार्य केले. या पार्श्वभूमीवर पत्रकार असणाऱ्या अण्णा दुराई यांनी 'द्रविड मुनेत्र कळघम' पक्ष स्थापून द्रविड स्वाभिमानी वृत्तीचे बीजारोपण केले. तो दिवस होता, 17 सप्टेंबर, 1949. रॉबिन्सन पार्कमध्ये संपन्न परिषदेत पक्षस्थापना झाली. त्या धडपडीत सी. एन. तथा कांजीवरम नटराजन, अण्णा दुराई (15 सप्टेंबर 1909 ते 3 फेब्रुवारी 1969) यांच्याशिवाय एम. करुणानिधी, एम.आर.राधा, एन. व्ही. नटराजन, ई. व्ही. के. संपत प्रभृती कार्यकर्ते सक्रिय होते. तमिळ भाषाभिमान, द्रविड संस्कृती गौरव इत्यादींद्वारे या मंडळीनी प्रांतिक अस्मिता प्रज्ज्वलित केली.

वि.स. खांडेकर साहित्याची तमिळ प्रेरणा 

वि. स. खांडेकरांच्या तेरा कादंबऱ्या व सुमारे दीडशे कथा तमिळ भाषेत अनुवादित करण्याचे महत्कार्य कांचीपुरम श्रीरंगाचार्य श्रीनिवासाचार्य (15 डिसेंबर 1913 ते 28 जुलै 1999) यांनी केले. ते तमिळ भाषेतील प्रसिद्ध लेखक व अनुवादक होत. यांचे वडील श्रीरंगाचार्य हे संस्कृत व आगमशास्त्राचे पंडित होते. ते तत्कालीन मद्रास प्रांतातून आले नि मुंबईजवळील कल्याणला राहू लागले. चिरंजीव कांचीपुरम यांचे बालपण कल्याणमध्ये गेले. विसाव्या शतकाच्या प्राथमिक दशकांत मुंबईत तमिळ शिकवणाऱ्या शाळा नव्हत्या. घरी वडिलांनीच त्यांना तमिळ शिकविले. मराठी शाळेत शिकणारे कांचीपुरम मराठीबरोबर तमिळ, इंग्रजी शिकत राहिले. पुढे साहित्याची गोडी लागली. तरुणपणात ते फडके-खांडेकरांच्या कथा-कादंबऱ्या वाचू लागले. ते आपल्या मूळ पैतृक गावी मद्रासला परतले.

इथे त्यांचा 'कलाईमगल' या नियतकालिक व प्रकाशन संस्थेशी संबंध आला. सन 1937 ला महात्मा गांधी मद्रासला आले होते. या प्रसंगी कलाईमगलचे उ.वे. स्वामिनाथ अय्यर यांच्या तमिळमधील स्वागतपर भाषणाच्या हिंदी भाषांतराची गरज होती. का. श्री. श्रीं.नी ते भाषांतर त्वरित करून देऊन सर्वांना चकित केले. हिंदीवरचे प्रभुत्व ही त्यांना मुंबईने दिलेली देणगी होती. याने प्रोत्साहित होऊन ते मराठी कथांचे तमिळ भाषांतर करू लागले.

सन 1934 ला वि. स. खांडेकरांचा 'दत्तक व इतर गोष्टी' हा कथासंग्रह नुकताच प्रसिद्ध झाला होता. त्यातील 'चकोर आणि चातक' कथा का.श्री.श्रीं.ना आवडली. त्यांनी वि.स. खांडेकरांना पत्र लिहून भाषांतराची परवानगी मागितली. हे पत्र शुद्ध मराठीत होते. याचे खांडेकरांना मोठे आश्चर्य वाटले. तमिळ मातृभाषीच्या त्या मराठीवर खांडेकर मोहित झाले नि त्यांनी कथेच्या तमिळ भाषांतराची परवानगी दिली. त्या वेळी तमिळमध्ये 'दिनमणी' दैनिक बरेच प्रसिद्ध होते. त्या दैनिकाच्या रविवार पुरवणीसाठी का.श्री.श्रीं.नी 'चकोर आणि चातक' कथेचा तमिळ अनुवाद 'सकोरमुम् साधकमुम्' या शीर्षकाने केला नि तो 1940 मध्ये प्रसिद्ध झाला. त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी आपला मोर्चा खांडेकरांच्या कादंबऱ्यांच्या भाषांतराकडे वळवला. वॅरूड कोविल (रिकामा देव्हारा) 1942, सुगम अंगे (सुखाचा शोध) 1943, कारगीय मोटु (जळलेला मोहर) 1943, पयलुम पडगुम (पहिले प्रेम) 1943 या त्यांनी तमिळमध्ये भाषांतरित केलेल्या प्रारंभिक कादंबऱ्या. याचदरम्यान यांनी काही कथासंग्रहही तमिळमध्ये भाषांतरित केले. या कथासंग्रहांचे वैशिष्ट्य म्हणजे मराठीत प्रकाशित कथांमधून आवडलेल्या श्रेष्ठ कथा निवडून त्यांनी नवे संग्रह तयार करून भाषांतरे प्रकाशित केली. कांडेकर कथैगळ (खांडेकर कथा), कोट्टकु वेळिये (पिंजऱ्या बाहेर), अरुंबु (कलिका), ओडुम रेयलिले (धावत्या रेल्वेत), कल्ला कदली (गुप्त प्रेयसी) हे याच दरम्यान प्रकाशित झालेले कथासंग्रह.

सन 1940 ते 1950 या काळात त्यांनी अलायन्स कंपनी, कलाईमगल कार्यालायम्, भारती प्रकाशन, मंगल नूलगम, अलमू नियलयम या प्रकाशन संस्थांद्वारे भाषांतरांचा सपाटा लावला, त्यातून खांडेकर साहित्याचा एक मोठा तमिळ वाचक वर्ग तयार झाला. या व्यासंगी वाचकांपैकी अण्णा दुराई एक होते. त्यांनी खांडेकरांच्या कथा, कादंबऱ्यांवर आधारित एक लेख 'द्रविड नाडु' दैनिकाच्या पुरवणीत 21 जुलै 1946 ला प्रकाशित केला. त्याचे शीर्षक होते 'इलक्कियत्तुक्कुप् पेरुमै सेर्त्त कांडेकर' (साहित्याला प्रतिष्ठा मिळवून देणारे खांडेकर). अण्णा दुराई यांच्या Aया लेखाने अख्ख्या मद्रास प्रांताचे लक्ष वेधले. या लेखात म्हटले होते की, 'मी खांडेकरांना कल्पनारम्य कथा लिहिणारा लेखक मानत नाही. त्यांच्या लेखनाच्या केंद्रस्थानी समाज, माणूस, त्याचे सुख-दुःख आणि सामाजिक विषमता आहे. खांडेकर आपल्या साहित्यातून जीवनाचा आदर्श विशद करतात. परंतु ते केवळ आदर्शात रमणारे लेखक नाहीत. आजच्या समाजाची वास्तविक अवस्था ते जाणतात. आज कोण सुख भोगत आहेत आणि ते कोणाच्या श्रमावर उपभोगत आहेत याचे सत्य चित्रण करतात.'

अण्णा दुराई यांनी त्या लेखात वि.स. खांडेकरांची तुलना तमिळ कवी भारतीदासन यांच्याशी केली आहे. ते म्हणतात की, 'भारतीदासन आपल्या कवितांमधून जे सामाजिक विचार नि चिंतन व्यक्त करतात, तेच खांडेकरांच्या कथा, कादंबऱ्यांत आपणास वाचावयास मिळते. खांडेकरांची पात्रे व्यक्तिचित्रे नसून विचारचित्रे होत.'

तमिळ भाषा व साहित्याच्या अभ्यासक म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीमती डॉ.मु. वळर्मती यांनी एक संशोधन प्रबंध इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ तमिळ स्टडीजमार्फत प्रकाशित केला आहे. त्याचे शीर्षक आहे 'कांडेकरुम् का.श्री.श्री. युम्' (खांडेकर आणि का.श्री.श्री.). या प्रबंधात खांडेकरांचे जीवन व साहित्य, विचार, सामाजिक दृष्टी, का.श्री.श्रीं.नी केलेली खांडेकर साहित्याची भाषांतरे, तमिळ व मराठी साहित्य संबंध, खांडेकरांच्या साहित्याचा तमिळ समाजावर झालेला परिणाम व असलेला प्रभाव, अण्णा दुराईंचे खांडेकरांविषयीचे लेखन व भाषणे या बाबींवर विचार करण्यात आला आहे.

तमिळ भाषेतील श्रेष्ठ कादंबरीकार आणि समीक्षक डॉ.मु. वरदराजन यांनी काही क्रांतिकारक कल्पनांवर आधारित कादंबऱ्या खांडेकर शैलीने लिहिल्या, तेव्हापासून तमिळ साहित्यात खांडेकरीय पर्वाला सुरुवात झाली, असे मानले जाते. प्रख्यात तमिळ साहित्यिक पुटुमैप्पित्तन तर म्हणत की, 'महाराष्ट्र म्हणजे शिवाजी आणि खांडेकर'. वि.स. खांडेकरांना 'रूपक निधी' मानणारा एक मोठा वाचक समुदाय तमिळनाडूमध्ये पाहावयास मिळतो. तमिळ समीक्षक रा.ना. विरप्पन यांनी केलेली 'क्रौंचवध' कादंबरीवरील समीक्षा तमिळ साहित्य विश्वात बहुचर्चित झाली होती.

'कलाईमगल' मासिकाचे संपादक व प्रसिद्ध तमिळ साहित्यिक के. व्ही. जगन्नाथन यांनी एकदा म्हटले होते की, 'मराठी आणि तमिळ वाचकांचा मतसंग्रह केला तर खांडेकरांना मराठी वाचकांपेक्षा तमिळ वाचकांची अधिक मते मिळतील.' तमिळ भाषा साहित्यात रवींद्रनाथ टागोरांपेक्षा अधिक लेखन वि. स. खांडेकरांवर झालेले दिसून येते, असे निरीक्षण दस्तुरखुद्द का. श्री.श्री. यांनी आपल्या एका लेखात नोंदवलेले आहे.

तमिळ साहित्य इतिहासावर नजर टाकताना लक्षात येते की, सन 1940 ते 1950 या काळात वि.स. खांडेकरांची विपुल भाषांतरे का. श्री.श्री. यांनी केली. खांडेकरांच्या साहित्याचा तमिळ समाजमनावर असलेल्या प्रभावाचा एक दाखला विलक्षण आहे. सन 1949 मध्ये तमिळ भाषेतील एक मासिक 'चिरंजीवी' मध्ये प्रकाशित एका रचनेवर अश्लीलतेचा आरोप करण्यात आला. त्या वेळी मद्रासच्या न्यायालयात पुराव्यादाखल 'जळलेला मोहर'चे प्रसंग नि विचार सादर करण्यात आले. ते ग्राह्य मानून 'चिरंजीवी' मासिकाची अश्लीलतेच्या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. यातून खांडेकरांचे समाज चिंतन व त्यांचे सामर्थ्य अधोरेखित होते.

वि.स. खांडेकरांचा विपुल पत्रव्यवहार प्रस्तुत लेखकाच्या संग्रही असून तो लवकरच पुस्तकरूपाने वाचकांच्या भेटीस येईल. त्यात मराठी 'वैजयंती' मासिकाच्या सन 1963 च्या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ व आतील काही मजकुरावर अश्लीलतेचा आरोप करण्यात आला होता. तेव्हा चौकशी कार्य करत असलेल्या पोलीस विभागातून वि.स. खांडेकरांचा अभिप्राय (जबाब) घेण्यात आला होता. यात वि.स. खांडेकरांनी अश्लीलतेचे निकष विशद करत नमूद केले होते की, "कोणते वाङ्गय अश्लील आहे हे ठरविण्यासाठी पुढील निकष उपयोगी पडतील कोणत्याही, व विशेषतः तरुणांच्या मनांत ज्याने विकृत, गलिच्छ किंवा अनैतिक कामुकता जागृत होते व जे दुसरा कोणताही हेतू न ठेवता, केवळ कामवासना चाळविण्याच्या हेतूने लिहिलेले असते; किंवा ज्याने व्यभिचाराची इच्छा निर्माण होईल, किंवा व्यभिचाराला किंवा कामुकतेला उत्तेजन दिले जाईल, ते वाङ्गय अश्लील ठरेल."

अर्थातच नुसत्या शिष्टाचाराच्या अभिरुचीच्या, सभ्यतेच्या, किंवा शालीनतेच्या भंगामुळे अश्लील ठरेलच असे नाही.

खांडेकर आणि का.श्री.श्री. पत्रसंवाद

पत्र हे संवादाचे सशक्त साधन असण्याचा काळ तसा 1970 पूर्वीचाच. या काळात का.श्री.श्रीं.नी वि.स. खांडेकरांना लिहिलेली काही पत्रे उपलब्ध आहेत. त्याचा अभ्यास, निरीक्षण करताना लक्षात येते की, भाषांतरकारासाठी मूळ लेखक सदैव 'श्रद्धेय 'च असतो. सन 1968 च्या एका पत्रात का.श्री.श्री. लिहितात, "आपल्या देशात अनुवादाचे महत्त्व जाणणारे फार थोडे लेखक आहेत. अनुवादात मला यश मिळाले आहे, त्याचे प्रमुख कारण आपल्या वाङ्गयावर माझे उत्कट प्रेम हे होय. मूळ लेखकाची प्रशंसा मिळविणे हे भाग्य जगात अनुवादकाला क्वचितच मिळते. जीवित लेखक तर अनुवादकाला मान देतच नाहीत, हा वाङ्गयीन इतिहासाचा अनुभव आहे. आपल्या लिखाणात आपले हृदय आहे."

सन 1970 च्या एका पत्रात ते वि.स. खांडेकरांकडे महाराष्ट्रातील एखाद्या नव्या लेखकाच्या कादंबरीची मागणी करतात. अर्थातच भाषांतरासाठी. त्यांचे निकष नोंदवत ते लिहितात, "कादंबरी नावीन्यपूर्ण असावी. चिरंतन सामाजिक सत्य तर पाहिजेच, आजच्या महाराष्ट्राचे सुंदर चित्रही त्यात असावे. मनुष्याला उन्नतीकडे नेणारे भाव त्यात असावेत, संकुचित भावना त्यात असू नये." हे निकष का.श्री. श्रीं.ची साहित्यिक जाणच प्रतिबिंबित करतात.

खांडेकर साहित्य आणि द्रमुक अनुबंध

'द्रविड कळघम' म्हणजे द्रविड महासंघ. 'द्रविड मुनेत्र कळघम' म्हणजे 'द्रविड प्रगतिशील महासंघ'. तत्कालीन (स्वातंत्र्यपूर्व) स्थितीचा विचार करताना लक्षात येते की, या पक्षाची स्थापना मद्रास प्रांतांच्या गेल्या पन्नास वर्षांतील (विसाव्या शतकाचा पूर्वार्ध) सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिवर्तनाची प्रतिक्रिया होती. जस्टिस पार्टीने समाजात न्यायास सर्वोपरी मानत सत्य हे मूल्य रुजवले. पेरियार ई.व्ही. रामस्वामी यांनी सुधारणावादी विचारांना बळ दिले. सन 1944 मध्ये त्यांनी जस्टिस पार्टी व स्वाभिमानी चळवळ एक करून 'द्रविडर कळघम' स्थापन केले. नंतरच्या काळात पेरियार आणि अण्णा दुराई यांच्यातील मतभेद विकोपाला जाऊन 'द्रविड मुनेत्र कळघम' पक्ष स्थापन झाला.

अण्णा दुराई हे द्रविड चळवळीतील प्रभावी लेखक, वक्ते आणि कुशल राजकीय संघटक होते. त्यांच्यावर वि.स. खांडेकर साहित्य विचाराचा खोल प्रभाव होता. ते नाटककार म्हणूनही प्रसिद्ध होते. राजकीय प्रचार सभांमध्ये समाजाच्या सांस्कृतिक व वैचारिक घडणीवर त्यांचा भर असे. पारंपरिक समाजमनास जागे करण्याची विलक्षण हातोटी त्यांच्या भाषणात होती. राजकारणाची भाषा उपमा नि अलंकाराने भारून टाकण्याचे कसब हे त्यांचे सामर्थ्य बनले. साहित्यिक अभिव्यक्तीला राजकारणाशी जोडत ते जनजागरण करत. ते जनसामान्यांवर गारूड करणारे ठरे. यात ते खांडेकरांचे आपणास मुखोद्गत साहित्य विचार उद्धृत करत.

यात सातत्य राखत सन 1962 नंतरच्या काळात द्रमुकने संघराज्याऐवजी द्रविड राष्ट्राची मागणी करत आक्रमक पवित्रा घेतला. राजकीय स्वायत्तता, सामाजिक न्याय, आणि निर्णयाधिकारांचे समर्थन करत स्वतंत्र 'तामिळ नाडु'ची मागणी करणारे ते पहिले नेते ठरले. हे एका अर्थाने विभाजनवादी विचार होते. पण त्यातील सामाजिक न्यायाचा आकर्षक पैलू म्हणजे वि.स. खांडेकरांच्या साहित्य विचारांचीच अभिव्यक्ती होती. सन 1967 च्या सार्वत्रिक निवडणुकीत द्रमुक बहुमत प्राप्त करून सत्तेत आला. अण्णा दुराई मुख्यमंत्री झाले. पण मुख्यमंत्री म्हणून त्यांना दोन वर्षेच कार्य करता आले. सन 1969 मध्ये काळाने त्यांना ओढून नेले. दोन वर्षांच्या अल्पावधीत त्यांनी मद्रास प्रांताचे नामकरण 'तमिळनाडु' केले. सामाजिक सुधारणांना अग्रक्रम दिला. हिंदीचा विरोध आणि तमिळ इंग्रजीचा पुरस्कार करत जनमत संघटित केले. 'स्वाभिमान विवाह पुरस्कार' करून, स्त्रियांना स्वइच्छेच्या आधारे विवाहाचे स्वातंत्र्य दिले, विवाह हा स्त्रियांचा हक्क ठरवला. पुरोहित मुक्त विवाह असे या विवाहाचे स्वरूप होते. सामाजिक विषमता निर्मूलनास अग्रभागी आणले. दुसऱ्याच्या श्रमावर पोसलेले सुख ही शोषणाची फलश्रुती ठरवली. हक्क व कर्तव्य समन्वयी जीवनाचा पुरस्कार सर्वोपरी मानला. त्याग, न्याय, नैतिकता, संघर्ष ही जीवनमूल्ये रुजवण्याचा कृतिकार्यक्रम निश्चित केला. एका अर्थाने ही रामराज्याचीच कल्पना. आदर्शाचा ध्यास ही वि.स. खांडेकर विचारांची फलश्रुती व प्रभाव. आपल्या भाषणात ते खांडेकरांची उद्धृते सर्रास वापरत. त्यांचे अनुकरण सहकारी व कार्यकर्ते करत. या सर्वातून वि.स. खांडेकर तमिळनाडूचे केव्हा झाले ते कळलेच नाही. या सर्व प्रक्रियेत का.श्री.श्री. यांनी सेतूबंधाची भूमिका निभावली : त्यांना अण्णा दुराई 'तमिळीचे खांडेकर' मानत. एम. जी. रामचंद्रन यांना अण्णा दुराई यांनी 'जळलेला मोहर' ही कादंबरी वाचण्याचा सल्ला दिला होता. "त्यातून तुम्हास 'क्रांतिकारी कल्पना सुचतील", असे सांगितले होते.

अण्णा दुराई आणि खांडेकर

अण्णा दुराई यांच्या जडणघडणीत वि.स. खांडेकर जीवन, साहित्य आणि विचारांचा मोठा प्रभाव होता. वि.स. खांडेकर जसे शिक्षक होते, तसेच अण्णा दुराईही. दोघांचा नाटक आणि सिनेमा सृष्टीशी निकटचा संबंध होता. दोघांनीही वृत्तपत्रे, नियतकालिकांचे संपादन कार्य केले होते. दोघेही नास्तिक होते. याचे लक्षणीय उदाहरण म्हणजे, सन 1967 च्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुमत प्राप्त करून द्रमुक पक्षाचं पहिलं सरकार स्थापन झालं तेव्हा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना अण्णा दुराई यांनी 'ईश्वर साक्ष' शपथ न घेता 'सदसद्विवेक बुद्धीच्या आधारे' शपथ घेतली होती. वि.स. खांडेकर ज्या सामाजिक सद्भाव नि सामंजस्याचा व्यवहार करत, त्याचा मोठा प्रभाव अण्णा दुराई यांच्यावर होता. तमिळनाडू राज्याची स्थापना केल्यानंतर अण्णा दुराई यांनी 'एक वंश, एक देव' (ओंद्रे कुलम, ओरुवने देवूम) ची घोषणा करत नवसमाज रचनेचे रणशिंग फुंकले होते, त्यामागेही खांडेकर विचार आणि साहित्याचा प्रभावच होता. खांडेकरांप्रमाणेच अण्णा दुराई यांची धर्मनिरपेक्ष समाजवादावर श्रद्धा होती. ते स्वतःचे वर्णन 'पवित्र राख नसलेला हिंदू, पवित्र क्रॉस नसलेला ख्रिश्चन आणि प्रार्थनेची टोपी नसलेला मुस्लीम' असे करत. खांडेकरही कधी कर्मकांडात अडकलेले दिसत नाहीत. अण्णा दुराई यांनी एका प्रसंगी हे स्पष्ट केले होते की, 'मी पूजेसाठी कधी नारळ फोडत नाही आणि कधी मूर्तीभंजनाचे कार्यही करणार नाही.' अंधश्रद्धा निर्मूलन कार्य हा उभयतांमधील समान धागा होता. अण्णा दुराई यांनी तमिळ भाषेत विपुल लेखन केले आहे. यांच्या भाषा, शैली, अलंकार, रूपकांची रेलचेल हा खांडेकरीय प्रभाव आणि अनुकरणाचा भाग म्हणून पाहिले जाते. त्यांचा 'आर्य मयाई' ग्रंथ समतेचा पुरस्कार करणारा होता.

वि.स. खांडेकर आणि तमिळ साहित्य

तमिळ साहित्यातील अण्णा दुराई, डॉ. मु. वरदराजन, अख़िलन यांच्या साहित्यावरील खांडेकरीय प्रभावाचा अभ्यास आणि संशोधन तमिळमध्ये झालेले दिसते. खांडेकर नवतेचे समर्थक होते. त्याचा उल्लेख करत अण्णा दुराई यांनी म्हटले आहे कीः "खांडेकरांचा नवता शब्द बाह्य चकाकीचा निदर्शक नाही तर रूढ कल्पना, व्यवस्था आणि पद्धती मोडून त्या जागी मानवी मूल्यांची श्रेष्ठता रुजवणे होय."

मु. वरदराजन हे तमिळ कादंबरीकार, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते. त्यांच्या 'अगल विलाक्कू', 'करित्तुंडू', 'सेंथमराई', इत्यादी 13 कादंबऱ्या प्रकाशित आहेत. त्यांच्या साहित्यात असलेली आदर्शवादी जीवनदृष्टी, नैतिकतेचे समर्थन, व्यक्तीच्या अंतर्मनाची उलघाल, प्रेम आणि कौटुंबिक संबंध, सामाजिक सुधारणांचा पुरस्कार, इत्यादी गोष्टी तमिळ समीक्षक खांडेकर प्रभाव म्हणून नोंदवतात. मु. वरदराजन यांनी 'क्रौंचवध' कादंबरीची तमिळमध्ये केलेली समीक्षा मान्यताप्राप्त झाली होती.

भारतीय ज्ञानपीठ (1975), साहित्य अकादमी (1963) पुरस्काराने सन्मानित तमिळ साहित्यिक अख़िलन यांच्या लेखनशैलीवर खांडेकरीय प्रभावाची चर्चा तमिळ समीक्षा विश्वात दिसून येते. समीक्षक जयमोहन यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, 'अखिलन यांची भाषाशैली हा खांडेकरीय वारसा होय.'

सन 1970 नंतरच्या कालखंडातील तमिळ कादंबऱ्यांवर 'ययाति' कादंबरीतील विचारविश्वाचा मोठा प्रभाव दिसून येतो. का.श्री.श्री.नी केलेल्या 'ययाति' कादंबरीच्या तमिळ अनुवादास साहित्य अकादमी भाषांतर पारितोषिक लाभले होते. या तमिळ भाषांतरित आवृत्तीचा पुरस्कार करणाऱ्या लेखात खांडेकरांनी का.श्री. श्री. ना 'मराठी-तमिळ भाषा व साहित्यास जोडणारा सौहार्द सेतू' संबोधले होते.


वि. स. खांडेकर

सन 1940 ते 1950 या काळात का.श्री. श्रीनिवासाचार्य यांनी अलायन्स कंपनी, कलाईमगल कार्यालायम्, भारती प्रकाशन, मंगल नूलगम, अलमू नियलयम या प्रकाशन संस्थांद्वारे भाषांतरांचा सपाटा लावला, त्यातून खांडेकर साहित्याचा एक मोठा तमिळ वाचक वर्ग तयार झाला. या व्यासंगी वाचकांपैकी अण्णा दुराई एक होते.

त्यांनी खांडेकरांच्या कथा, कादंबऱ्यांवर आधारित एक लेख 'द्रविड नाडु' दैनिकाच्या पुरवणीत 21 जुलै 1946 ला प्रकाशित केला.

त्याचे शीर्षक होते -'इलक्कियत्तुक्कुप् पेरुमै सेर्त्त कांडेकर' (साहित्याला प्रतिष्ठा मिळवून देणारे खांडेकर). त्या लेखाने अख्ख्या मद्रास प्रांताचे लक्ष वेधले.

त्यात त्यांनी स्पष्ट केले होते की, 'मी खांडेकरांना कल्पनारम्य कथा लिहिणारा लेखक मानत नाही. त्यांच्या लेखनाच्या केंद्रस्थानी समाज, माणूस, त्याचे सुख-दुःख आणि सामाजिक विषमता आहे.'

का. श्री. श्रीनिवासाचार्य

वि. स. खांडेकरांच्या तेरा कादंबऱ्या व सुमारे दीडशे कथा तमिळ भाषेत अनुवादित करण्याचे महत्कार्य कांचीपुरम श्रीरंगाचार्य श्रीनिवासाचार्य यांनी केले. ते तमिळ भाषेतील प्रसिद्ध लेखक व अनुवादक होते.

त्यांचे वडील श्रीरंगाचार्य हे संस्कृत व आगमशास्त्राचे पंडित होते. ते तत्कालीन मद्रास प्रांतातून आले नि मुंबईजवळील कल्याणला राहू लागले. चिरंजीव कांचीपुरम यांचे बालपण कल्याणमध्ये गेले.

विसाव्या शतकाच्या प्राथमिक दशकांत मुंबईत तमिळ शिकवणाऱ्या शाळा नव्हत्या. त्यामुळे वडिलांनीच त्यांना घरी तमिळ शिकविले. मराठी शाळेत शिकणारे कांचीपुरम मराठीबरोबर तमिळ, इंग्रजी शिकत राहिले. पुढे साहित्याची गोडी लागली. तरुणपणात ते फडके-खांडेकरांच्या कथा-कादंबऱ्या वाचू लागले. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर सन 1935 च्या दरम्यान ते आपल्या मूळ पैतृक गावी मद्रासला परतले.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुनीलकुमार लवटे,  कोल्हापूर, महाराष्ट्र ( 20 लेख )

माजी प्राध्यापक, प्राचार्य, लेखक, हिंदी भाषा प्रचारक, समाजसेवक 


Comments

  1. Principal Dinkar patil- 23 Sep 2026

    Congratulations Dr.lavate

    save



साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके