डिजिटल अर्काईव्ह

विजया मेहता - मराठी रंगभूमीचे ध्यासपर्व

नाटक या संकल्पनेला विजयाबाईंनी असे कवेत घेतले होते की, त्यातील भाषा, संवाद, विराम, देहबोली, नेपथ्य, संगीत, वेशभूषा, केशभूषा यांचा अतिशय तपशिलात त्यांनी विचार केलेला असे. उदाहरण द्यायचे झाले तर 'बॅरिस्टर' या नाटकात बॅरिस्टर हे एका डुलणाऱ्या आरामखुर्चीत बसलेले दाखवलेले आहेत. ते खुर्चीचे डुलणे, एका संथ लयीत तिचे पुढे-मागे होणे हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला, त्यांच्या भूतकाळातील आठवणींना एक देखणे आणि अर्थपूर्ण आयाम प्राप्त करून देते.

विजया मेहता यांचे 30 जून 2026 रोजी वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. (जन्म 4 नोव्हेंबर 1934) गेली अनेक वर्षे वृद्धापकाळामुळे त्या नाट्यविश्वापासून दूर होत्या. पण तरीही मराठी नाटक म्हटले की डोळ्यासमोर जी मोजकी नावे येतात, त्यात त्यांचे नाव अग्रक्रमावर असते. नाटक या कलाप्रकाराकडे अतिशय गांभीर्याने पाहणाऱ्या आणि या माध्यमाच्या ताकदीच्या सर्व शक्यता उलगडवून दाखवणाऱ्या विजयाबाई हे आपल्या मराठी रंगभूमीचे एक दुर्मीळ वैभव होते, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होऊ नये.

विजया मेहता गेल्या ही बातमी ऐकली आणि माझ्या डोळ्यासमोर दूरदर्शनच्या कॉरिडॉरमधून 16 एमेम फिल्मचे डबे हातात घेऊन संकलन कक्षाकडे संथपणे चालत जाणाऱ्या विजयाबाई उभ्या राहिल्या. तेव्हा मी तेथेच शब्दांच्या पलीकडले, नाट्यसंगीत, आरोही या विभागांत काम करत होतो. 'स्मृतिचित्रे' ही टेलिफिल्म त्यांनी दूरदर्शनसाठी केली, त्यात त्यांनी कामही केले आणि या माध्यमातून लक्ष्मीबाई टिळक यांच्या स्मृतीला कलात्मक अभिवादन केले. दूरदर्शनच्या इतिहासातील ते एक मानाचे पान आहे. त्या वेळी पन्नाशीत असलेल्या विजयाबाई यांची नाट्य क्षेत्रातील सळसळती कारकिर्द म्हणजे मराठी नाट्यसृष्टीच्या इतिहासातील एक महत्त्वाचे पर्व म्हणावे लागेल.

1843 मध्ये विष्णूदास भावे यांच्या 'सीतास्वयंवर' या नाटकापासून सुरू झालेली आपली नाट्य परंपरा आज पावणे दोनशे वर्षे उलटली तरी लखलखीत आहे. यात ज्या महान लेखक, दिग्दर्शक, कलावंतांचा वाटा आहे, त्यात विजया मेहता हे नाव ओलांडून आपल्याला पुढे जाता येणार नाही.

त्यांची कारकिर्द सुरू झाली तीही अशा वळणावर, जेव्हा संगीत रंगभूमी आपल्या अंगभूत मर्यादांमुळे लोप पावू लागली होती. रात्र रात्र चालणारी नाटके, गाण्यांभोवती पिंगा घालणारे कथानक, बालगंधर्व, केशवराव भोसले यांच्या स्मरणरंजनातून बाहेर पडू पाहणारी तरुण पिढी, अशा वातावरणात विजया या मुलीला नाटक नावाच्या अद्भुत रसायनाने असे पछाडले की, त्यातून मराठी रंगभूमीला एक कायमस्वरूपी नवा विचार व आयाम मिळाला.

950 च्या दशकात कॉलेजच्या स्पर्धांमधून अभिनेत्री म्हणून विजया जयवंत पुढे आली. गिरगावसारख्या कलासा वातावरणात तिची नाट्यजाणीव समृद्ध होण्यास तिच्या संपर्कात आलेली तेवढीच तोलामोलाची मंडळी कारणीभूत ठरली. खुद्द मास्टर दत्ताराम, केशवराव दाते, मामा पेंडसे अशा दिग्गज मंडळींबरोबर विजया जयवंत हिला रंगमंचावर उभे राहण्याची संधीही मिळाली.

श्री. पु. भागवत, विजया मेहता, विजय तेंडुलकर, माधव वाटवे, वसंत सरवटे आणि वृंदावन दंडवते हे रंगायनचे संस्थापक. या चळवळीत अरविंद देशपांडे, दामू केंकरे, डॉ. श्रीराम लागू, पु.ल. देशपांडे, दत्ता भट, अरुण काकडे अशी ख्यातनाम मंडळीही पुढे सामील झाली. 'काहीतरी नवे करायचे' अशा विचाराने भारलेली ही प्रभावळ त्यांच्या नाट्य जाणिवांना पुष्टी देणारी असल्यामुळे, आपण करत असलेला नाट्य व्यवहार आणि निवडलेला मार्ग योग्य आहे हा त्यांचा आत्मविश्वास दुणावला. नाटकाकडे 'प्रयोग' म्हणून पाहणाऱ्या व्यक्तीला असा दिलासा गरजेचा असतो. 'रंगायन' नावाची चळवळ हीच त्यांच्या संपूर्ण वाटचालीला बळ देणारी आणि रंगभूमीविषयीच्या दृष्टीकोनाला सशक्त करणारी ठरली.

1960 मध्ये ही संस्था सुरू झाली तेव्हा संयुक्त महाराष्ट्राची धामधूम सुरू होती. अनेक मोर्चे आंदोलने यांत सहभागी झालेला सर्जनशील तरुणांचा गट या संस्थेच्या माध्यमातून एकत्र आला. या संस्थेचे भाग्य बघा, खुद्द पु. शि. रेगे यांनी 'रंगायन' हे बारसे केले. मंगेश पाडगावकर, श्री. ना. पेंडसे, विंदा करंदीकर, ज्ञानेश्वर नाडकर्णी, वा.ल.कुलकर्णी यांच्यासारखे मार्गदर्शक लाभले. 1960 चे दशक यामुळे खऱ्या अर्थाने नाटक या संकल्पनेकडे एक नवा विचार आणि नवा अध्याय म्हणून पाहणारे ठरले. रंगभूमीवरच्या भरजरी वस्त्राला आधुनिक साज चढवणारी, रोजच्या जगण्यातल्या वास्तवाला नाटक नावाच्या परिसाने जगण्याचे सोने करणारी, सफल गाथा या निमित्ताने आकार घेत होती.

सुरुवातीला अभिनेत्री म्हणून विजयाबाई यांची कारकिर्द बहरली. विजय तेंडुलकर यांच्या 'मादी' नाटकात डॉ. लागू यांच्याबरोबर त्यांनी स्त्री-पुरुष संबंधासारख्या तरल विषयावर एक अविस्मरणीय भूमिका करून आपल्या अभिनय सामर्थ्याचे दर्शन घडवले. 'अजगर आणि गंधर्व' मधील त्यांनी रंगवलेली रखेली नावाजली गेली. त्यांच्या एकूण जडणघडणीत त्यांना मार्गदर्शन करणारे इब्राहीम अल्काझी आणि मर्झबान यांचा महत्त्वाचा वाटा आहे. थिएटर युनिट या माध्यमातून त्यांनी घेतलेले नाट्य प्रशिक्षण ही त्यांची न संपणारी शिदोरी ठरली.

त्या करत असलेल्या नाटकांचे विषय पठडीतले नसले, मध्यवर्ती कल्पना परंपरेच्या वाटेने जाणारी नसली, तरी ते सादर करण्याची प्रक्रिया अतिशय शिस्तबद्ध आणि काटेकोर नियमांनी बांधलेली असे. ही कडवी शिस्त हेच त्यांच्या एकूण यशाचे शक्तिस्थान म्हणावे लागेल.

नाटक सुरू होण्यापूर्वी अर्धा तास नीरव वातावरण ठेवण्याकडे या मंडळींचा कटाक्ष होता. एकाग्रता आणि घडवू पाहत असलेल्या गोष्टीकडे पूर्ण लक्ष देण्यात याची मदत होत असे. त्यामुळे या मंडळींची नाटके रंगली नाहीत असे क्वचितच झाले. सुविहित, प्रभाव टाकणारा प्रयोग हीच रंगायनची ओळख झाली आणि त्यामुळे विजयाबाई यांचीही. 'शांतता कोर्ट चालू आहे' ही नाट्य निर्मिती रंगायनचा हुकुमाचा एक्का ठरली. केवळ नाट्य निर्मिती एवढ्यापुरता रंगायनचा पैस मर्यादित नव्हता, तर सुजाण प्रेक्षक घडवण्याचे कामही या संस्थेने केले. एक हजार प्रेक्षक-सभासद हा हा म्हणता रंगायन चळवळीचा भाग झाले. वार्षिक वर्गणी केवळ 10 रुपये आणि प्रयोग प्रवेश शुल्क रुपये 2 एवढ्या अल्प दरात रसिकांना उत्तम नाटकांची मेजवानी मिळू लागली. संहितेचा प्रवास प्रयोग आणि कलावंतांच्या माध्यमातून जाणकार प्रेक्षकांनी भरलेल्या रंगमंदिरापर्यंत मोठ्या दिमाखदारपणे होत असे. कळायला अवघड, क्लिष्ट, दुर्बोध नाटक केले की ते ग्रेट, अशी भंपक कल्पना रंगायनची नसल्यामुळे नाटक समजावून सांगणे, रसग्रहणाच्या कार्यशाळा आयोजित करणे अशा उपक्रमांमधून प्रेक्षकांची प्रगल्भता वाढवण्याचे मोठे काम या संस्थेने केले आणि त्यात विजयाबाईंचा सिंहाचा वाटा होता.

दृश्यवाचन या माध्यमातून नेपथ्य न उभारता मोजक्या हालचाली आणि कमीतकमी साहित्य यांचा वापर करून रंगायनने नाटक या कलाप्रकाराच्या व्यापकतेचा अनुभव प्रेक्षकांना दिला. पिटर ब्रूक या जागतिक दर्जाच्या दिग्दर्शकाबरोबर नाट्य निर्मितीच्या कार्यशाळा ही रंगायनची वेगळी ओळख ठरली.

'भुलाभाई' या संस्थेत 'रंगायन' सारख्या अनेक संस्थांना आश्रय होता. त्यामुळे नामवंत कलाकारांचा तिथे वावर असे. किशोरी अमोणकर, जितेंद्र अभिषेकी, कुमार गंधर्व, शिवकुमार शर्मा यांपासून ते नृत्य निपुण सचिन शंकर, चित्रकार बाबुराव सडवेलकर यांचे कला आविष्कार, श्री. ना. पेंडसे यांच्या 'रथचक्र'चे आणि विंदा करंदीकर यांच्या 'फौउस्टचे वाचन' असे बहुविध उपक्रम आपल्या प्रेक्षक सभासदांसाठी रंगायन आयोजित करत असे. प्रेक्षकांच्या सर्व कला प्रकारांच्या जाणिवा समृद्ध करणारे हे प्रयोग संस्थेचे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य ठरले. रंगायनच्या प्रयोगानंतर विजयाबाईंनी जर्मन दिग्दर्शकांबरोबर केलेलं काम त्यांना जागतिक व्यासपीठावर घेऊन गेलं. जर्मन दिग्दर्शक फ्रिट्झ बेनेवित्झ याच्या वायमार थिएटरबरोबर त्यांनी संयुक्तपणे 'मुद्राराक्षस', 'हयवदन' या नाटकांची निर्मिती केली. 'नागमंडल' आणि 'शाकुंतल' ही नाटके लाइप झिग सोबत करून जर्मनीमधील प्रेक्षकांची वाहवा मिळवली. पौराणिक, लोककला या धाटणीची ही नाटके मुंबईत वाढलेल्या विजयाबाईंनी योग्य माणसांना सामील करून दिग्दर्शित केली. ही नाटके उभी करण्यासाठी काय करायला हवे याचे अचूक भान त्यांना असल्यामुळे भारतीय बाज साकार करण्यात त्या कुठेच कमी पडल्या नाहीत.

बर्टोल्ट ब्रेख्त यांच्या 'द कॉकेशियन चॉक सर्कल' या मूळ नाटकाचे 'अजब न्याय वर्तुळाचा' हे नाटक चिं. त्र्यं. खानोलकर यांच्याकडून करून घेण्यात त्यांची दृष्टी दिसते. हे नाटक विजयाबाईंनी थेट जर्मनीला नेले. या नाटकात त्या इतक्या बुडून गेल्या होत्या की, तालमीच्या वेळी संपूर्ण नाटक सर्व पात्रांच्या एक्झिट आणि एंट्रीसह त्या करून दाखवत असत. त्याची रंगसंहिता, त्यातील दृश्यात्मकता तेथील प्रेक्षकांना इतकी आवडली की, बर्लिन महोत्सवात या प्रयोगाला 28 मिनिटे कर्टन कॉल मिळाला. एका परदेशी भाषेतील नाटकाला भारतीय साज चढवून बाईंनी हे यश मिळवलं, याचं विशेष कौतुक केलं पाहिजे.

नाटक या संकल्पनेला विजयाबाईंनी असे कवेत घेतले होते की, त्यातील भाषा, संवाद, विराम, देहबोली, नेपथ्य, संगीत, वेशभूषा, केशभूषा यांचा अतिशय तपशिलात त्यांनी विचार केलेला असे. उदाहरण द्यायचे झाले तर 'बॅरिस्टर' या नाटकात बॅरिस्टर हे एका डुलणाऱ्या आरामखुर्चीत बसलेले दाखवलेले आहेत. ते खुर्चीचे डुलणे, एका संथ लयीत तिचे पुढे-मागे होणे हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला, त्यांच्या भूतकाळातील आठवणींना एक देखणे आणि अर्थपूर्ण आयाम प्राप्त करून देत.

'सुलतान', 'होळी', 'यातनाघर' या महेश एलकुंचवार यांच्या एकांकिका रंगायनच्या माध्यमातून त्यांनी केल्या आणि एलकुंचवार नावाचा धडाडीचा नाट्यलेखक मराठी रंगभूमीला लाभला. विजय
तेंडुलकर, संगीतकार भास्कर चंदावरकर, नेपथ्यकार द.ग. गोडसे यांच्या बरोबरच्या सहप्रवासात त्यांना प्रत्येक वळणावर नाटक सापडत गेले. भूमिका करताना आजूबाजूच्या वातावरणात व्यक्तिरेखा शोधण्याची त्यांची सवय त्यांना एक नवे अवकाश देत गेली. नाटकामध्ये अवकाश आणि अवधी (स्पेस अंड टाईम) याचा गांभीर्याने विचार करणारी दिग्दर्शिका म्हणून त्यांची असलेली ओळख न पुसली जाणारी आहे. एखादा सिद्धान्त मग तो सौंदर्यशास्त्राचा असो किंवा माध्यम शास्त्राचा, तो प्रात्यक्षिकातून नटतो आणि समजतोही अशी त्यांची धारणा होती. त्यांच्या नाटकाच्या तालमी कलावंतांना आपापल्या भूमिका प्रभावीपणे करण्यासाठी उपयुक्त ठरतच. शिवाय त्या संपूर्ण नाट्यकृतीचे समग्र आकलनही होत असे.

व्यावसायिक नाटकांमध्येही अभिनेत्री म्हणून त्यांनी उत्तम ठसा उमटवला. विशेषतः 'हमिदाबाईची कोठी', 'बॅरिस्टर', 'वाडा चिरेबंदी', 'संध्या छाया' या नाटकांमधील वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखा त्यांनी कमालीच्या सहजतेने पेलल्या.

'अंधाराच्या पारंब्या' या कादंबरीवर आधारित बॅरिस्टर हे नाटक, 'महासागर' याच नावाच्या कादंबरीवर आधारित महासागर हे नाटक दिग्दर्शित करणे हे विजयाबाईंसमोर मोठे आव्हान होते. आव्हान यासाठी की, मूळ कादंबऱ्या रसिक वाचकांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत आधीच पोहोचल्या होत्या. मूळ पुस्तकावर आधारित कलाकृती ही कायमच दुय्यम मानली जाते, पण असे असूनही या दोन्ही कलाकृती प्रेक्षकांच्या पसंतीस पुरेपूर उतरल्या.

मूळ लेखनाची निगुतीने तयार केलेली रंगसंहिता, दृश्य-प्रवेश बांधणी, व्यक्तिरेखांचा सूक्ष्म अभ्यास यांमुळे नाटककारांपेक्षा दिग्दर्शकाच्या कलाकृती म्हणून त्या ओळखल्या गेल्या. हे श्रेय विजयाबाईंना द्यायला हवे. जयवंत दळवी यांचे 'पुरुष' हे नाटक त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेले. नाना पाटेकर, रिमा लागू यांच्या कारकिर्दीतील ते उत्कृष्ट आविष्कार म्हणता येतील.

विजयाबाई या नाटकाच्या केवळ दिग्दर्शक नव्हत्या तर त्या एक गुरुकुल होत्या. त्यांच्या संस्थेत आलेला कलाकार खूप काही शिकून जात असे. नेमकेपणा, सूक्ष्म तपशील समजून घेण्याची दृष्टी, वेळेचे व्यवस्थापन, प्रत्येक हालचाल, भावमुद्रा यांचा कार्यकारणभाव आणि बरेच काही.

नाना पाटेकर, नीना कुलकर्णी, सुहास जोशी, विक्रम गोखले, भक्ती बर्वे, भारती आचरेकर, दिलीप कोल्हटकर, विजय केंकरे, रिमा लागू, स्वाती चिटणीस यांना घडवण्यात बाईंचा सिंहाचा वाटा होता. हे मी म्हणत नाही तर या मंडळींनी खुलेपणाने आणि कृतज्ञतेने हे वेळोवेळी सांगितलेले आहे.

कलावंत म्हणून इतर माध्यमेही त्यांनी तेवढ्याच सफाईने हाताळली. 'रावसाहेब', 'पेस्तनजी' सारखे सुंदर चित्रपट दिग्दर्शित केले. 'पेस्तनजी' मध्ये नसिरुद्दीन, शबाना आणि अनुपम खेर या कलावंतांना विजयाबाई यांच्या दिग्दर्शनाचा झालेला स्पर्श कधीही न विसरता येणारा आहे.

त्यांनी 'शाकुंतल', 'हवेली बुलंद थी' या टेलिफिल्म्स बनवल्या. 'लाईफ लाईन' ही वैद्यकीय क्षेत्रावरील टीव्ही मालिका तयार केली. तसेच एनसीपीए (नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्टस्) च्या संचालक म्हणून त्यांनी कला क्षेत्रात भरीव योगदान दिले.

विजयाबाईंनी विनोदी नाटके केली नाहीत, केवळ शहरी मध्यमवर्गीय प्रेक्षक हा त्यांचा केंद्रबिंदू होता, अशी टीका त्यांच्यावर केली जाते. त्याचा प्रतिवाद न करता एवढेच म्हणता येईल की, जी संहिता त्यांनी हाती घेतली तिचे सोने केले. नाटक परिपूर्ण व्हावे यासाठी फोरास रोड पासून विदर्भ, कोकण अशा फिरत त्यांनी संशोधन सिद्ध कलाकृती सादर केल्या. त्यांनी विनोदी नाटक केले नसले तरी संहितेतले विनोद, प्रसन्न क्षण त्यांनी सफाईदारपणे हाताळले आहेत. नाटक हाच केंद्रबिंदू ठेवून त्यांनी वाटचाल केली. 1986 मध्ये इचलकरंजी इथे झालेल्या 67 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. संगीत नाटक अकादमी, पद्मश्री अशा पुरस्कारांनी सन्मानित विजया मेहता हे मराठी नाट्यसृष्टीला लाभलेले एक समृद्धीपर्व. आपल्या शिस्तबद्ध कारकिर्दीतून, नाट्य विचारांतून मराठी रंगभूमीला त्यांनी बहाल केलेला हा वारसा पुढील अनेक पिढ्या जिवापाड जतन करावा असाच आहे.

 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

  1. Mahavir Shah- 31 Jul 2026

    उल्हास, नेहमी प्रमाणेच तुझा अतिशय सखोल , अभ्यासपुर्ण, माझ्या सारख्या नाट्य चित्र सृष्टी चा अत्यल्प जाण असणाऱ्या उत्सुक व्यक्ती ला तुझ्या शब्दचित्राने भारावून टाकणारा लेख!!!

    save

  1. Swati vartak- 31 Jul 2026

    नेहमीप्रमाणेच तुमचा हा लेख ही अभ्यासपूर्ण आहे..मी त्यांचे पुस्तक, त्यांच्यावर आलेले लेख वाचले होते तरी तुमची वैशिष्ट्य पूर्ण लेखन शैली भावते ..आणि वाचत राहावेसे वाटते

    save

  1. rajendra sahasrabudhe- 31 Jul 2026

    मराठी नाट्य सृष्टीतील एक ठळक नांव म्हणजे विजया मेहता. मराठी नाटक त्यांनी अनेक प्रकारे समृद्ध केले. वरील लेखात त्यांच्या कार्याचा धावता आढावा घेऊन, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सुंदर परीचय करून दिला आहे.

    save

  1. Prabhakar Khole- 31 Jul 2026

    वा, अतिशय सुंदर, केशव! विजयाबाईंच अफाट कर्तृत्व, अनेक विषय व भाषांत चतुरस्त्र संचार आणि प्रयोगशीलता अन् विचारांचा आवाका व झपाटा हे सर्व समर्थपणे तथा ओघवत्या भाषेत साकारलं आहे!

    save



साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके