वि.स. खांडेकर यांचा पन्नासावा स्मृतिदिन 2 सप्टेंबर 2026 रोजी येतोय. वि.स. खांडेकरांना साधारणतः 78 वर्षांचं आयुष्य मिळालं. त्यांच्या हयातीमध्ये शंभराहून अधिक पुस्तके आली. आणि त्यांच्या मृत्यूनंतर विशेषतः अलीकडच्या पंचवीस वर्षांत त्यांच्या विखुरलेल्या असंग्रहित लेखनाची जवळपास 40 पुस्तके आली. या पुस्तकांचे संपादन सुनीलकुमार लवटे यांनी केलेले आहे. त्यामुळे मुलाखतीच्या पहिल्या भागात वि.स. खांडेकर होते तरी कोण हे समजून घेणार आहोत आणि दुसऱ्या भागात वि.स. खांडेकरांच्या साहित्याचे वाचन आणि त्याचं संपादन करताना…
प्रश्न : वि.स. खांडेकरांना 1897 ते 1976 असं 78 वर्षांचं आयुष्य मिळालं. त्यांचा मृत्यू झाला कोल्हापूरमध्ये, तेव्हा तुम्ही वयाच्या पंचविशीत होता. आणि चांगली गोष्ट अशी की, खांडेकरांच्या आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षांत त्यांचा प्रत्यक्ष सहवास तुम्हाला लाभला. तो सहवास किती जवळचा असावा, तर खांडेकरांच्या अंत्ययात्रेत त्या ट्रकमध्ये किंवा जुन्या पद्धतीच्या लॉरीमध्ये पुढच्या केबिनमध्ये अंत्येष्टीचे चंदन, कापूर, अमृतकुंभ घेऊन बसलेले दिसता. म्हणजे 50 वर्षे तुम्हाला खांडेकरांची साथसंगत (त्यांच्या मृत्यूनंतरही) आहे. खांडेकरांच्या प्रत्यक्ष सहवासात तुम्ही कुठल्या टप्प्यावर आलात आणि कसे ? त्या काळात खांडेकरांनी तुम्हाला काय दिलं ?
- राष्ट्रसेवा दल, सानेगुरुजी कथामाला, समाजवादी पक्ष अशा संघटनांमध्ये कार्यरत असलेल्या कोल्हापूर येथील काही कार्यकर्त्यांनी 1963 ला आंतरभारती शिक्षण संस्था स्थापन केली. त्या शाळेच्या पहिल्या 13 विद्यार्थ्यांपैकी मी एक होतो. ती संस्था स्थापन करणाऱ्यांमध्ये वि.स. खांडेकरसुद्धा होते. त्या संस्थेतर्फे आंतरभारती विद्यालय सुरू केलेलं होतं. तेव्हाही जूनमध्ये शाळा सुरू व्हायच्या. पण शाळेला परवानगी उशिरा मिळाल्यामुळे ती एक ऑगस्टला सुरू झालेली होती. सगळी मुलं इतरत्र प्रवेश घेती झाली होती आणि त्या शाळेपुढे प्रश्न होता की, 'आता मुलं कुठून आणायची?' आंतरभारती शिक्षण संस्था स्थापन करणाऱ्या मंडळींमध्ये डी. एम. चव्हाण नावाचे राजाराम महाविद्यालयाचे प्राध्यापक होते. मी ज्या कोल्हापूरच्या रिमांड होममध्ये होतो, त्याचे ते सेक्रेटरी होते. मुलांचा प्रश्न निर्माण झाल्यावर ते म्हटले, 'आमच्या रिमांड होममध्ये आठवीची 13 मुलं आणि नववीची 3 मुलं आहेत. ती या शाळेच्या उद्घाटनाला आणू शकतो.' आणि मग आमच्या 13 मुलांसह आंतरभारती विद्यालय सुरू झाल्याचं मला आठवतं. त्या दिवशी भाषण करताना खांडेकरांनी, 'कोल्हापुरात 51 शाळा असताना ही 52 वी शाळा आम्ही का सुरू केली?' असा प्रश्न विचारत शाळा स्थापनेमागची भूमिका मांडल्याचं मला आठवतं. "आम्हाला हा देश घडवणारे जबाबदार नागरिक हवे आहेत. ही शाळा स्थापन करणारे लोक देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढलेले आहेत आणि आता आम्ही या शाळेतून स्वराज्याचे शिलेदार घडवणार आहोत. या देशाचे भविष्य हे नागरिक घडवतील." त्यामुळे आमची शाळा इतर शाळांपेक्षा वेगळी असेल हे उघड होते. पुढे चार वर्षे खांडेकरांचा आमच्याशी नियमित संवाद होत राहिला.
1963 ते 67 हा काळ. मी आंतरभारती विद्यालयातील आठवी ते अकरावीचा विद्यार्थी. त्या चार वर्षांचा माझा अनुभव असा की, खांडेकर शाळेमध्ये आले नाहीत आणि महिना उलटला असं कधी झालं नाही. आधीमधी ते कुठल्यातरी साहित्यिकाला, कुठल्यातरी राजकीय नेत्यांना आमच्या वर्गांमध्ये घेऊन यायचे. 'आज मी ना.ग. गोरे यांना घेऊन आलेलो आहे, त्यांची एक कथा तुम्हाला आहे, 'सोनेरी मुंगूस'. आज तेच तुम्हाला त्यांची कथा शिकवतील' असं खांडेकर म्हणायचे. आणि मग आमचा संवाद ना.ग. गोऱ्यांशी व्हायचा. कधीतरी यायचे आणि म्हणायचे की, हे मराठीतले मोठे कवी आहेत कुसुमाग्रज, त्यांचं 'कोलंबसाचं गर्वगीत' तुम्हाला आहे. ते तुम्हाला शिकवतील. पुढे एस.एम. जोशींना घेऊन आले आणि म्हणाले, 'यांचा धडा तुम्हाला नाही, पण पुढे ह्यांचे धडे तुम्ही गिरवाल, म्हणून मी तुमच्यासमोर यांना आणलेलं आहे.' खांडेकरांनी अख्ख्या महाराष्ट्रातील तत्कालीन साहित्यिक, नेते, विचारवंत यांना आमच्यापुढे उभे केले. खांडेकरांचं मोठेपण त्यांच्या या ध्येयवादी शिक्षकात आहे. ते शिक्षक म्हणून निवृत्त झाले. पण आयुष्यभर समाज शिक्षक होते. त्यांनी दिलेल्या मूल्यांचा प्रभाव व्यक्तीशः माझ्या जीवनावर राहिलेला आहे. आणि ती पाठराखण त्यांचा मृत्यू झाल्यानंतर 50 वर्षे सुटलेली नाही.
खांडेकरांचा आणि माझा प्रत्यक्ष संपर्क साधारणपणे एक तपाचा, 1963 ते 1976. पहिली चार वर्षे मी त्यांच्या शाळेचा विद्यार्थी होतो, त्या चार वर्षांच्या काळात त्यांनी माझी घडण विद्यार्थी म्हणून केलेली आहे. त्या काळात मी साने गुरुजी वाचले, नरहर कुरुंदकर ऐकले. राष्ट्र सेवा दलाचे सगळे दलप्रमुख ऐकले. राष्ट्र सेवा दलाची अनेक शिबिरं मी केली. त्याच काळामध्ये बाबा आमटेंकडे मी गेल्याचं आठवतं. म्हणजे शाळेतलं घडणं आणि शाळेच्या बाहेरचं घडणं असं दुहेरी चालू होतं. आंतरभारती विद्यालयाने मला पाठ्यपुस्तकांच्या पलीकडचं जग जास्त प्रमाणात दाखवलं. कारण ते सगळे शिक्षक ध्येयवादी म्हणूनच निवडलेले होते. त्या प्रत्येकाचं स्वतःचं असं वैशिष्ट्य होतं. एक शिक्षक नृत्यात प्रवीण होते, दुसरे गाण्यात प्रवीण होते, तिसरे चांगले व्याख्याते होते, चौथे कविता चांगली शिकवायचे. खांडेकर असा प्रयत्न करत होते की, 'आपल्या शाळेतून घडणारा विद्यार्थी पुस्तकी किडा होता कामा नये. तर त्याचं आकलन समाजशील झालं पाहिजे.' त्यामुळे, त्या चार वर्षांत माझी घडण एका ध्येयवादी स्वप्नांच्या पेरणीने झालेली आहे.
प्रश्न : तुम्ही आंतरभारती शाळेतून अकरावीनंतर बाहेर पडलात आणि चार वर्षांनी तिथे शिक्षक म्हणून आलात. हा प्रवास कसा होता ?
- आंतरभारती शाळेत अकरावीला असताना माझ्या मनामध्ये शिक्षक होण्याची स्वप्नं खुणावायला लागलेली होती. त्याचं श्रेय साने गुरुजींच्या साहित्याचे वाचन आणि वि.स.खांडेकरांचा सहवास याला द्यावे लागेल. तिथून अकरावी झाल्यावर 1967 ते 1971 मी गारगोटीच्या श्री मौनी विद्यापीठात गेलो. जे.पी. नाईक यांनी स्थापन केलेलं ते आदर्श ग्रामीण विद्यापीठ होतं. तिथले सगळे प्राध्यापक आंतरभारतीतल्या सारखेच ध्येयवादी होते. म्हणजे डॉ.डी.व्ही. चिक्करमाने हे युनेस्कोचे तत्कालीन शिक्षण सल्लागार होते. प्रा. स्नेहलता दसनूरकर या मराठीतल्या मोठ्या साहित्यिक होत्या. प्रा. अरविंद गोखले होते, ते मराठीचे श्रेष्ठ कथाकार होते. प्राचार्य दसनूरकर हे महाभारताचे मोठे प्रकांड पंडित होते. श्री.अ. दाभोळकर आम्हाला विज्ञानाचे आणि गणिताचे प्राध्यापक होते. प्रत्येक शिक्षक एक ध्येयवाद उराशी बाळगून त्या श्री मौनी विद्यापीठात आलेला होता.
माझं पदवी शिक्षण हिंदी आणि जनरल सायन्स मधले आहे. तुम्ही म्हणाल, हे कसलं कॉम्बिनेशन ? 1960 नंतरच्या महाराष्ट्रामध्ये शिक्षकच मिळायचे नाहीत. मिळाले तर ते भाषेचे, विज्ञानाचे किंवा समाजशास्त्राचे असायचे. आणि खेड्यामध्ये दोन-तीन शिक्षकांवर शाळा चालायच्या. त्यामुळे सर्व विषय शिकवणारे शिक्षक ही खेड्याची गरज होती. म्हणून जे. पी. नाईकांनी विज्ञान आणि भाषा, विज्ञान आणि समाजशास्त्र, भाषा आणि सहकार अशा कॉम्बिनेशनचे पदवी कोर्सेस विकसित केले होते. आणि प्रिपरेटरी वर्ष संपल्यानंतर वेगवेगळ्या स्ट्रीममध्ये प्रवेश दिले जायचे (म्हणजे आता आर्ट, सायन्स, कॉमर्स आहे तसं), कोऑपरेशन, सोशल वर्क एज्युकेशन अशा स्ट्रीम असायच्या. एज्युकेशन मध्ये जे प्रवेश घ्यायचे ते शिक्षक व्हायचे, कोऑपरेशन मध्ये आहेत ते बँक मॅनेजर व्हायचे, समाजशास्त्रामध्ये पदवीधर होणारे सोशल वर्क विभागात ऑफिसर म्हणून जायचे. हुशार मुलं सगळी कोऑपरेशन मध्ये जायची. आणि एज्युकेशन फॅकल्टीला फार कमी मुलं जायची. हुशार मुलं तर जायचीच नाहीत. तेव्हा एक म्हण होती, 'मागून मिळत नाही भीक तर मग मास्तरकी शिक'. त्यामुळे, आपण चूक तर केली नाही ना असे मला वाटायचे. पण डी.व्ही. चिक्करमाने यांना मी पाहिलं ऐकलं, दसनूरकरांना पाहिलं-ऐकलं. तेव्हा लक्षात आलं की, आपण योग्य वाट धरलेली आहे.
शाळेमध्ये मी काही हुशार विद्यार्थी नव्हतो. पण कॉलेजमध्ये परिस्थितीच्या जाणिवेने हुशार विद्यार्थी झालो. मला एस.एस.सी.ला 49 टक्के आणि कॉलेजच्या पहिल्या वर्षाला 61 टक्के मार्क मिळाले. इतका कायाकल्प माझ्यामध्ये का झाला? तेव्हा माझ्या लक्षात आलं होतं की, अभ्यास केला तरच स्कॉलरशिप मिळणार आहे आणि स्कॉलरशिप मिळाली तरच माझं शिक्षण होणार आहे. त्यामुळे चार वर्षंमी झपाटल्यासारखा अभ्यास करत होतो. आणि त्या वेळी आमच्यासारख्या 17 इन्स्टिट्यूट्स भारतामध्ये होत्या, मी भारतामध्ये पहिला आलो होतो. 1971 मध्ये भारत सरकारचा 'रोल ऑफ ऑनर' मी कमावला, 'बेस्ट सोशल वर्कर अवॉर्ड' मी कमावलं आणि 'मेरिट अवॉर्ड' ही मिळवलं. हॅटट्रिक करणारा विद्यार्थी झाल्यामुळे त्या काळामध्ये अर्ज न करता आंतरभारतीतून मला निमंत्रण आलं. 'तू आमचा पहिला विद्यार्थी आहेस, तुझ्यावर आमचा पहिला हक्क आहे, तू आमच्याकडे येशील का?' अशी विचारणा शाळेकडून झाली. आणि मी आंतरभारतीमध्ये दाखल झालो. आता खांडेकर माझ्या संस्थेचे अध्यक्ष आणि मी त्या संस्थेतील शिक्षक होतो. तो 1971 ते 76 हा साधारणपणे पाच वर्षांचा कालखंड होता.
आंतरभारतीमध्ये शिक्षक म्हणून आलो तेव्हा मी 21 वर्षांचा होतो, माझ्यावर प्रखर ध्येयवादाचा प्रभाव होता, व्यवहारी ध्येयवाद मला मान्य नव्हता. त्यामुळे, त्या पाच वर्षांतल माझं आणि खांडेकरांचं सान्निध्य एका अर्थाने मतभेदांचं होतं. त्या शाळेत आम्हाला पूर्ण पगार मिळायचा नाही (त्या काळच्या सर्वच शिक्षण संस्था गरीब होत्या) आणि मी पूर्ण पगाराची मागणी करत होतो. तेव्हा खांडेकर म्हणत होते, 'अरे गड्या, मी शिक्षक झालो तेव्हा मलाही 80 रुपये पगार होता, पण प्रत्यक्षात 40 च रुपये मिळायचे. तुझी मागणी योग्य आहे, पण हे विसरू नको की, भारत अजून तितका श्रीमंत झालेला नाही...' तेव्हा मी तरुण असल्यामुळेच कदाचित माझ्या हातून हा उद्धटपणा झाला असावा. पण आज मला त्या सगळ्या संघर्षाची लाजही वाटते. त्या काळामध्ये आम्ही शिक्षक वेगवेगळ्या मागण्या करत होतो, मी शिक्षकांची संघटना बांधली होती. खांडेकरांचे निधन झाल्यावर, श्रद्धांजलीच्या भाषणासाठी मी माझं नाव शाळेला दिलेलं होतं. पण माझं नाव पुकारण्यात आलं नाही. कारण मी बोलेल ते खांडेकरांच्या श्रद्धांजली सभेला संयुक्तिक असणार नाही, असं संयोजकांना वाटलं असावं. दुसऱ्या दिवशी मी खांडेकरांच्या आठवणीचं एक श्रद्धांजली पत्र संस्थेच्या संचालकांना पाठवलं. त्यात एक वाक्य अधोरेखित करून लिहिलेलं होतं एका प्रसंगाला खांडेकर मला असं म्हटले होते की, 'तू जो ध्येयवाद मांडतो आहेस तो मी दिलेल्या ध्येयवादाचं उदात्तीकरण आहे, हे मला माहीत आहे; पण तू मागत असलेला ध्येयवाद देण्याचे सामर्थ्य भारतामध्ये नाही.' आणि पुढे ते असंही म्हटले होते की, 'साने गुरुजी आणि खांडेकर ही डबल बारी बंदूक आहे, ज्याच्यावर नेम धरला जाईल त्याला तिची गोळी लागते. त्यामुळे, बंदूक ज्याच्या हातात आहे त्यानेच ठरवायचं की, बंदूक कुणावर डागायची.' खांडेकरांचं ते वाक्य अजूनही माझ्या हृदयात कोरलेलं आहे. नंतरच्या काळामध्ये खांडेकरांच्या त्या वाक्याने माझ्यावर झालेला प्रभाव असा की, मी ध्येयवाद सोडला नाही, पण व्यवहारी ध्येयवादाकडे माझं मार्गक्रमण झालं. याचा अर्थ मी कॉम्प्रोमाईज केलं असा नाही. ध्येयवाद आणि मूल्यवादाशी समझोता न करता, नैतिकतेशी प्रतारणा न करता, वर्तमान क्षणापर्यंत मी उभा आहे, तो केवळ आणि केवळ खांडेकरांमुळे.
प्रश्न : खांडेकरांचा मृत्यू झाला त्याच्या आधीचे दिवस आणि तो दिवस कसा होता कोल्हापुराचा ?
- कोल्हापूरची दोन दैवतं आजही मानली जातात -राजर्षी शाहू महाराज आणिवि. स. खांडेकर. खांडेकरांच्या अंत्ययात्रेचं वर्णन तत्कालीन वर्तमानपत्रांनी असं केलेलं आहे की, छत्रपती शाहू महाराजांनंतर इतकी मोठी अंत्ययात्रा कोल्हापूरने पाहिलेली नाही. त्या अंत्ययात्रेच्या सहा महिने आधी अशीच गर्दी खांडेकरांसाठी कोल्हापूरने अनुभवलेली होती. तो प्रसंग होता खांडेकरांना ज्ञानपीठ मिळाल्यानंतर झालेल्या भव्य नागरी सत्काराचा. तो नागरी सत्कार श्री. शाहू कुस्तीच्या मैदानात झाला होता. कोल्हापुरात कुस्तीचं मैदान भरणं ही काही आश्चर्याची गोष्ट नव्हती. पण एका व्यक्तीच्या सत्काराला पूर्ण कुस्तीचं मैदान भरतं, हे मात्र पहिल्यांदाच कोल्हापूरकरांनी पाहिलेलं होतं. खांडेकरांचं त्या सत्काराला उत्तर देतानाचं भाषण आहे. त्यातलं पहिलं वाक्य असं आहे, 'कोल्हापूरकरांनी पंचगंगेला आलेला महापूर पाहिला, मात्र लोकगंगेला आलेला महापूर बहुधा पहिल्यांदाच लोक अनुभवत असावेत.'
खांडेकरांच्या मृत्यूनंतर आमच्या त्या शाळेला 'वि.स. खांडेकर प्रशाला' असं नाव दिलं गेलं. मी आंतरभारतीचा संचालक असताना आम्ही एकमताने दिलेलं हे नाव आहे.
प्रश्न : खांडेकरांनी स्थापन केलेल्या आंतरभारती शाळेमध्ये तुम्ही आठवीपासून पुढील चार वर्षे विद्यार्थी म्हणून राहिलात, त्यानंतरची चार वर्षे श्री मौनी विद्यापीठात महाविद्यालयीन शिक्षण घेऊन आंतरभारती शाळेमध्ये शिक्षक म्हणून आलात. त्यानंतर चार-पाच वर्षांनी म्हणजे 1976 मध्ये खांडेकरांचा मृत्यू झाला, तेव्हा तुम्ही वयाच्या पंचविशीत होता. 2001 पासून आतापर्यंत तुम्ही खांडेकरांचं अप्रकाशित वा असंग्रहित लेखन संपादित करत पुस्तकरूपाने आणण्याचे काम करत आहात. मधल्या 25 वर्षांत तुम्ही खूप मुशाफिरी केली. प्राध्यापक झालात, कार्यकर्ते झालात, लेखक आणि साहित्यिक झालात, अनुवादाच्या क्षेत्रात काम केलं. तर त्या 25 वर्षांच्या काळात खांडेकर तुम्हाला कुठे कुठे आणि कसे कसे भेटत राहिले ?
- खांडेकरांच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी मी आंतरभारती शिक्षण संस्था सोडली. पण 1979 ते 2001 या काळामध्ये खांडेकरांच्या अनेक रचनांची मी हिंदी भाषांतरं केली. खांडेकरांच्या श्रेष्ठ सोळा कथा मी निवडल्या, अनुवादित केल्या आणि 'खांडेकर की श्रेष्ठ कहानियाँ' या नावाचं पुस्तक 1983 मध्ये दिल्लीच्या विद्या प्रकाशनातर्फे प्रकाशित केलं. त्या पुस्तकासाठी त्या वर्षी भारत सरकारचं उत्कृष्ट अनुवादाचं पारितोषिक मला मिळालं. नंतर खांडेकरांची अपूर्ण राहिलेली 'सोनेरी स्वप्नं भंगलेली' ही कादंबरी पूर्ण करून हिंदीमध्ये प्रकाशित केली. ती उद्धटपणाचीच गोष्ट होती, याची मला आजही जाणीव आहे. पण त्या काळामध्ये मी खांडेकर कुटुंबाच्या जवळ आलेलो होतो, त्यांची कन्या मंदाकिनी आमच्या कॉलेजमध्ये प्राध्यापिका होत्या. खांडेकरांनी त्यांचे शेवटच्या काळातले लेखनिक राम देशपांडे यांच्याशी त्या कादंबरीच्या शेवटाबद्दल चर्चा केलेली होती. त्या आधारे मी त्या कादंबरीचा उर्वरित भाग थेट हिंदीत लिहिला. त्यामुळे मराठीत जरी ती कादंबरी अपूर्ण असली तरी हिंदीमध्ये ती पूर्ण स्वरूपामध्ये दिसेल. खांडेकरांच्या रूपक कथांचं हिंदी भाषांतर मी केलंय, 'शांती' या नावाने ते पुस्तक आलं. त्या रूपककथा खांडेकरांनी स्वातंत्र्योत्तर काळात लिहिलेल्या होत्या. दिल्लीच्या राजकमल प्रकाशनकडून ते पुस्तक आले. म्हणजे, आंतरभारती शिक्षण संस्था सुटली तरी खांडेकरांशी माझा संपर्क तुटला नाही. आंतरभारतीने मला जे दिलं त्याची सावली आणि सहवास आजही माझ्या जीवनातून अलग झालेला नाही, हे मला नम्रपणे आणि अभिमानाने सांगितलं पाहिजे.
प्रश्न : 2001 पासून 2026 पर्यंत तुम्ही खांडेकरांचं असंग्रहित व अप्रकाशित लेखन पुस्तकरूपाने आणण्याचं काम करताय. आणि त्यातली सर्वच पुस्तके मेहता प्रकाशनाकडून आलीत. त्याबद्दल आणि तुम्ही खांडेकरांचं जे वाचन केलं त्याबद्दलही या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात आपण बोलणार आहोत. त्यामुळे तो विषय बाजूला ठेवून, याच काळात तुम्ही केलेल्या वेगळ्या कामाकडे वळतो. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठामध्ये खांडेकरांची स्मृती जागवणारं एक संग्रहालय आहे. त्याची संकल्पना मनात येणं आणि ते अस्तित्वात येणं, या प्रक्रियेत तुम्ही खांडेकरांना वेगळ्या प्रकारे समजून घेतलं असणार, त्यांच्या अप्रकाशित बाजू समजून घेण्याची संधी तुम्हाला मिळाली असणार. तर त्या स्मृती संग्रहालयाविषयी थोडेसे...
- 1980 ला मी पीएच.डी. झालो आणि त्यानंतर वीस वर्षे महाराष्ट्रातल्या अनाथ आश्रम रिमांड होम या संस्थांच्या विकासाचं काम केलं. तिथे काही मतभेद झाले, म्हणून इ.स. 2001 मध्ये मी त्या संस्थात्मक कामापासून स्वतःला वेगळं केलं. त्याच दरम्यान माझ्या हातामध्ये जया दडकरांनी लिहिलेले 'वि.स. खांडेकर वाङ्मय सूची' हे पुस्तक आले. ते खांडेकरांचे विद्यार्थी होते. त्यांनी अविश्रांत परिश्रम करून खांडेकरांच्या प्रकाशित आणि अप्रकाशित साहित्याची सूची केली होती. ते खांडेकरांचे 25 वे स्मृती वर्ष होते. तेव्हा माझ्या मनात विचार आला की, हे राहिलेलं लेखन एकत्र करून प्रकाशित केलं तर खांडेकरांचं समग्र साहित्य पुढे येईल.
म्हणून मी मंदाताई खांडेकर यांच्यासमोर तसा प्रस्ताव मांडला, त्यांनी तो आनंदाने मान्य केला. मेहता पब्लिकेशनचे सुनील मेहता आणि अनिल मेहता यांनी मला आश्वासन दिलं की, तुम्ही खांडेकरांची जी कोणती पुस्तके संपादित कराल ती सर्व आम्ही प्रकाशित करू. मला सांगायला मोठा आनंद वाटतो की, मेहतांच्या तिसऱ्या पिढीसोबतही (अखिल मेहता) ते काम मी पूर्ण करतो आहे. आतापर्यंत 32 पुस्तके प्रकाशित केलेली आहेत, उरलेली 8 पुस्तके लवकरच प्रकाशित होतील.
2002 ते 2004 या काळामध्ये मी विखुरलेला खांडेकर अविश्रांत कष्ट करून मिळवलेला होता. केवळ दडकरांची सूची प्रमाण मानून सगळं संकलित करत नव्हतो. खांडेकर नावाने जे जे छापलं गेलं, ते मी संकलित करत गेलो. त्यातून खांडेकरांची अनेक दुर्मीळ छायाचित्रं, पत्रं हाती लागली. खांडेकरांनी वाचलेली वर्तमानपत्रं, मासिकं हाती लागली. त्या काळातला माझा छंद म्हणजे, रद्दीच्या दुकानातून खांडेकर मोहर असलेले जे मिळेल ते जमवायचे.
त्याच काळात माझे मित्र 'दैनिक सकाळ'चे तत्कालीन संपादक मल्हार अरणकल्ले माझ्याकडे गप्पा मारायला आले होते. त्यांनी मला सहज विचारलं, "सध्या काय करताय?" तर म्हटलं, "खांडेकरांचा असा एक उद्योग मी सुरू केलेला आहे." आणि खांडेकरांची जमवलेली सामग्री त्यांना दाखवली. तेव्हा ते म्हणाले, "अहो, हा तर महाराष्ट्राचा वारसा आहे, तो तुम्ही घरात काय घेऊन बसलात ! हे विद्यापीठात का मांडत नाही?"
"विद्यापीठांनी मांडायला जागा दिली पाहिजे", असं मी म्हटलं आणि तो प्रश्न सोडून दिला. पण ते माझ्याकडून उठले आणि विद्यापीठात गेले. कुलगुरूंना भेटले आणि असे संग्रहालय विद्यापीठाने उभारणे का आवश्यक आहे हे त्यांना सांगितले. त्यानंतर अनेक भेटीगाठी, मीटिंग, बैठका झाल्या. आणि मग 2004 मध्ये विद्यापीठात ते संग्रहालय उभे राहिले. माझ्याकडे जमा झालेली साधने आणि खांडेकर कुटुंबाने दिलेली साधने यातून ते स्मृती संग्रहालय साकारलेले आहे. त्या स्मृती संग्रहालयाचं वैशिष्ट्य असं आहे की, खांडेकरांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा सगळा प्रवास तिथे पाहायला मिळतो.
वि.स. खांडेकर स्मृती संग्रहालयाची मुहूर्तमेढ रोवली तो प्रसंग इथे सांगितला पाहिजे. ते संग्रहालय निर्माण करण्याचा निर्णय तत्कालीन कुलगुरू डॉ.एम.जी. ताकवले यांच्या काळात झाला. तो निर्णय झाला आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी राजीनामा दिला. ते कळल्यावर मी पळत विद्यापीठात गेलो. ते म्हणाले, "काळजी करू नका. आज संग्रहालय स्थापन करण्याची घोषणा करतो आणि मग कार्यभार सोपवतो." सकाळी अकरा वाजता त्यांनी वि.स. खांडेकर संग्रहालयाच्या स्थापनेचं परिपत्रक काढलं, माझी संचालक म्हणून नियुक्ती केली आणि त्याच दिवशी आम्ही विद्यापीठाला प्रतीकात्मक दोन-तीन वस्तू दिल्या खांडेकरांचं पद्मभूषण प्रमाणपत्र व पदक आणि खांडेकरांच्या हस्ताक्षरातील 'अश्रू' कादंबरी. त्याच दिवशी संग्रहालयाची विधिवत स्थापना केली. त्यानंतर आलेले कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी आम्हाला कोरा चेक दिलेला होता. त्यामुळे इतके उत्कृष्ट संग्रहालय उभे राहू शकले. त्या संग्रहालयाची निर्मिती करताना काही तात्त्विक मतभेद खांडेकर कुटुंब आणि विद्यापीठ यांच्यामध्ये निर्माण झाले होते. त्यामुळे हे संग्रहालय होईल की नाही असा प्रश्न काही काळ निर्माण झाला होता. पण आजही मला कृतज्ञतेने हे सांगितलं पाहिजे की, जया दडकरांच्या उदारतेमुळे आम्ही ते संग्रहालय पूर्ण केलं. 'वि.स. खांडेकर सचित्र चरित्रपट' नावाचं त्यांचं पुस्तक त्याच काळात आलं होतं. त्या आधारे आम्ही खांडेकरांचं संग्रहालय प्रतिकृतीच्या रूपात आणलं. नंतरच्या काळामध्ये खांडेकरांच्या कुटुंबाशी असलेले मतभेद दूर झाले आणि मग खांडेकर कुटुंबाने अत्यंत उदारपणे सगळ्या मूळ वस्तू व साहित्यकृती दिल्या. त्यामुळे, आत्ताचे संग्रहालय ही मूळ संग्रहालयाची दुसरी आवृत्ती आहे.
प्रश्न : गेल्या वीस वर्षांत, जे लोक कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामध्ये जातात आणि 'या विद्यापीठात बघण्यासारखं काय आहे' असा प्रश्न विद्यार्थी किंवा प्राध्यापकांना विचारतात, तेव्हा या संग्रहालयाचा उल्लेख होतोच. मी पण ते खूप उशिरा म्हणजे सहा महिन्यांपूर्वी बघितलं. तेव्हा अशा प्रकारची संग्रहालयं महाराष्ट्रातल्या किमान 100 लेखकांची तरी व्हायला हवीत, अशी भावना माझ्या मनात आली. आज तो आकडा दहापर्यंतसुद्धा नाहीये, हे दुर्दैव आहे. इथे त्यात जायला नको. हे संग्रहालय उभा करीत असताना तुमच्या मनात खांडेकरांचे जीवन, कार्य, विचार, ध्येयवाद हे सर्व मूर्त रूपामध्ये आकाराला येत गेले असेल. तर या सगळ्या प्रक्रियेत खांडेकरांनी वयाच्या विशीनंतरची 18 वर्षे कोकणातील शिरोडा नावाच्या गावामध्ये वास्तव्य केले. खांडेकरांनी त्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकून जाणाऱ्या चार ग्रंथांचा उल्लेख केलाय. त्यामध्ये तीन कागदावर छापलेले ग्रंथ आहेत, मात्र चौथा ग्रंथ त्यांनी शिरोडा गावाला संबोधले आहे. तर शिरोडा गाव आणि खांडेकर यांच्यातील नाते तुम्हाला कसे दिसले ?
- शिवाजी विद्यापीठातील संग्रहालयानंतर मी वि.स. खांडेकरांचं स्मृती संग्रहालय शिरोड्याला उभारून दाखवलेलं आहे. खांडेकरांची शिरोड्यातली 18 वर्षे जिवंत करणारे ते संग्रहालय 2016 ला उभारलेले आहे. त्याविषयी सांगतो. पण त्याआधी, शिवाजी विद्यापीठातील संग्रहालयाविषयी आणखी थोडे सांगतो.
2004 मधील उद्घाटनाचा दिवस होता. त्या दिवशी आम्ही पहिले प्रेक्षक म्हणून आंतरभारती शिक्षण संस्थेच्या वि.स. खांडेकर शाळेच्या विद्यार्थ्यांना आणलं. कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे आणि त्या दिवशी व्याख्यानासाठी आलेले साहित्यिक अरुण साधू यांच्यासह मी जिना उतरत होतो. तेव्हा काही मुलंही संग्रहालय पाहून उतरत होती. त्यातल्या एका मुलीला कुलगुरूंनी सहज विचारलं, "बाळ, तुला संग्रहालय बघून काय वाटलं ?" तर एका क्षणाचा श्वास न घेता ती म्हणाली, "मला खांडेकर व्हावंसं वाटलं." एका विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला वस्तुसंग्रहालय पाहून आपण खांडेकर व्हावसं वाटणं ही माझ्या दृष्टीने त्या संग्रहालय निर्मितीची खरी पावती आहे. एकदा कवी ग्रेस आलेले होते. सगळं वस्तुसंग्रहालय पाहून आल्यावर ते अर्धा तास निःशब्द बसलेले होते. मला क्षणभर कळेना की, काय झालं? त्यांची समाधी लागायची. अर्ध्या तासानंतर मी ग्रेसना विचारलं, "भाईसाब, कुछ गलती हो गई हमारी?" ते हिंदी बोलायचे छान. ते म्हणाले, "ऐसा क्यों कहते हो ! बस एक सवाल मेरे मन में आया, जो आपको साझा करू. हमारा भी ऐसा म्युझियम कोई बनायेगा?" मला वाटतं, त्या मुझियमची ही पण खरी पोच पावती. आणखी एक प्रसंग सांगतो. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर असं मानतात की, त्यांना खांडेकरांनी घडवलं. एकदा ते शिवाजी विद्यापीठात आलेले असताना, व्याख्यानाला जाण्यापूर्वी संग्रहालय पाहायला आले. त्या संग्रहालयामध्ये एका ठिकाणी आम्ही खांडेकरांचा आवाज - व्याख्यान ऐकवतो. सगळं संग्रहालय पाहात मुणगेकर खांडेकरांच्या त्या पॅनलजवळ आले आणि खांडेकरांचा आवाज ऐकून ढसाढसा रडायला लागले. मग म्हटले, "इथून पुढे एक तास तरी मी व्याख्यान देऊ शकेन असं मला वाटत नाही." हा होता त्या संग्रहालयाचा प्रभाव. वस्तुसंग्रहालयं इतकी जिवंत असली पाहिजेत की तिथे भूतकाळातील माणसे जिवंत झाली पाहिजेत. ते सामर्थ्य या संग्रहालयामध्ये आहे.
पुढे आम्ही शिरोडा येथील संग्रहालयाच्या उद्घाटनाला भालचंद्र मुणगेकरांना बोलवलं. ते स्वतः मुणगे या कोकणातल्या गावातून आलेले. कोकणातला लेखक वाचायचा म्हणून त्यांनी खांडेकर वाचला आणि त्यांचं आयुष्य बदलून गेलं. शिरोड्याचं संग्रहालय बघून ते म्हणाले, "कोल्हापूरचं संग्रहालय खांडेकर नावाच्या व्यक्तीला जिवंत करतं, शिरोड्याचं संग्रहालय खांडेकरांवर कोकणचा प्रभाव काय आहे ते जिवंत करतं."
शिरोड्यात झालेल्या मिठाच्या सत्याग्रहात खांडेकर सहभागी होऊ शकले नव्हते, कारण ते सरकारी शाळेमध्ये शिक्षक होते. त्यांनीच असं लिहिलंय की, "मेघश्याम शिरोडकर हे माझे मित्र 'वैनतेय' साप्ताहिक चालवायचे, त्यांनी मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला, पण मी भाग घेऊ शकलो नाही. पण मी त्याचं उन्नयन कसं केलं तर, वैनतेयमध्ये शिरोड्याच्या मिठाच्या सत्याग्रहातली सगळी बातमीपत्रं छापून मी माझ्या अपराधीपणाचं उदात्तीकरण केलेलं आहे." वैनतेयचा सगळा काळ आम्ही कोल्हापूरच्या संग्रहालयामध्ये जसा जिवंत केलाय, तसा शिरोड्यामध्ये जिवंत केला मिठाचा सत्याग्रह. खांडेकरांच्या आरंभिक पटकथा शिरोड्यात निर्माण झाल्या, म्हणून जी चित्रपट सृष्टी आम्ही कोल्हापुरात उभी करू शकलो नाही, ती आम्ही शिरोड्याच्या संग्रहालयामध्ये निर्माण करू शकलो. खांडेकरांचा जो पत्र व्यवहार कोल्हापूरचे संग्रहालय उभारताना मिळालेला नव्हता, तो आम्ही शिरोड्यामध्ये ठेवलाय. ही दोन्ही संग्रहालयं मिळून खांडेकर पूर्णपणे जिवंत होताना दिसतात.
प्रश्न : खांडेकरांनी त्यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या आणखी तीन ग्रंथांचा उल्लेख केलाय. 'रामायण', 'अरेबियन नाईट्स' आणि 'सुदाम्याचे पोहे'. काय स्वरूपाचा तो प्रभाव होता ?
- खरं म्हणजे 'रामायण' व 'महाभारत' हे दोन्ही ग्रंथ ते कोळून पिलेले होते. पण ते महाभारताचा उल्लेख प्रभाव म्हणून करत नाहीत. रामायण आणि महाभारतामध्ये व्यवच्छेदक फरक असा आहे की, रामायण आदर्शवाद सांगतं, महाभारत व्यवहारवाद सांगतं. खांडेकरांमध्ये उपजतच आदर्शाचं आकर्षण असल्यामुळे ते रामायणाचा प्रभाव सांगतात. 'सुदाम्याचे पोहे' हे पुस्तक श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचं, त्यातला कोटीबाजपणा खांडेकरांच्या भाषेवर आलेला आहे. 'अरेबियन नाईट्स' हे काल्पनिक आहे. कल्पनाप्रचुर खांडेकर तुम्हाला अरेबियन नाईट्स मध्ये दिसतात. चौथ्या पुस्तकाने म्हणजे 'शिरोडा नावाच्या गावाने काय दिलं' हे खांडेकरांनीच लिहून ठेवलेलं आहे- अज्ञानाचं, अंधश्रद्धेचं, दारिद्र्याचं महाभयंकर रूप मला कोकणाने दाखवलं. अज्ञान, अंधश्रद्धा आणि दारिद्र्य निर्मूलनाचा वस्तुपाठ खांडेकरांच्या साहित्यामध्ये दिसतो, त्याची पायाभरणी शिरोडा पुस्तकाने केली.
प्रश्न : खांडेकरांवर सखोल प्रभाव राहिला असे काही लेखक किंवा सुधारक साहित्यिक अशी चार-पाच तरी नावं ठळकपणे सांगता येतात. गोपाळ गणेश आगरकर, वामन मल्हार जोशी, हरि नारायण आपटे, राम गणेश गडकरी, केशवसुत. या सर्वांमध्ये काही कॉमन थ्रेड तुम्हाला दिसतात का? किंवा खांडेकरांनी कोणाकडून काय घेतलं ?
- खांडेकरांनी आपलं दत्तक घर 1920 मध्ये सोडलं आणि ते शिरोड्याला शिक्षक म्हणून आले. घरातलं काही घ्यायचं नाही असं ठरवून ते अंगावरच्या कपड्यानिशी निघाले, तेव्हा फक्त एक पुस्तक सोबत घेतलं : केशवसुतांची कविता. केशवसुतांच्या कवितेने खांडेकरांना काय दिलं हे समजून घ्यायचं असेल तर, 'केशवसुत काव्य आणि कला' या दीडशे पानांच्या पुस्तकाला लिहिलेली 70 पानांची प्रस्तावना वाचायला हवी. 'तुतारी' कवितेने क्रांतीची स्वप्ने दाखवली. 'नवा शिपाई' मधील "जिकडे जातो तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत" हा केशवसुतांचा वारसा खांडेकर पुढे घेऊन जाताहेत. माणूस म्हणून ते विकसित झाले. खांडेकरांच्या घरामध्ये कितीतरी हरिजन विद्यार्थी राहिले. अनेक लोक खांडेकरांच्या घरी लेखनिक म्हणून आले आणि कुटुंबीय म्हणून राहिले, हे खांडेकरांचं आणखी मोठेपण आहे. खांडेकर प्रखर विवेकवादी होते, ही आगरकरांनी त्यांना दिलेली देणगी आहे असे मला वाटते. खांडेकरांमध्ये जो माणूस होता तो वा. म. जोशींनी दिलेला आहे. महर्षी कर्वे यांचा जेवढा प्रभाव वा.म. जोशींवर दिसतो तितकाच खांडेकरांवर दिसेल. खांडेकरांनी लिहिलेला 'हरिभाऊ' नावाचा लेख हरिभाऊ आपटेंचा प्रभाव सांगणारा आहे.
प्रश्न : खांडेकर जवळपास 55 वर्षे लिहित होते. त्या काळामध्ये मोठे मोठे ललित साहित्यिक महाराष्ट्रामध्ये होते. आचार्य अत्रे, ना. सी. फडके, ग.त्र्यं. माडखोलकर होते. आणि त्यांच्या नंतरची एक पिढी होती. तर समकालीन साहित्यिकांनी खांडेकरांकडे कसं पाहिलं, कसं मूल्यमापन केलं? आणि आज मागे वळून बघताना, समकालीन साहित्यिक खांडेकरांना समजून घेण्यात कुठे कमी पडले असं वाटतं का ?
- समकालीन साहित्यिकांमध्ये फार कमी लोकांनी खांडेकरांना समजून घेण्याचा प्रयत्न केला, अशी माझी धारणा आहे. म्हणजे खांडेकरांच्या साहित्यातील ध्येयवाद, कल्पनाप्रचुरता, भाबडेपण यांची चर्चा त्यांनी केली. साने गुरुजींचा उपहास एकेकाळी लोकांनी 'रडवे साहित्यिक' म्हणून केला, तसाच 'स्वप्नाळू आदर्शवाद बाळगणारा साहित्यिक' म्हणून खांडेकरांची उपेक्षा केली. त्या वेळी नवसाहित्याचे अध्वर्यू गंगाधर गाडगीळ यांनी म्हटलं होतं, 'खांडेकर हे सामान्य लेखक आहेत.' खांडेकरांचे त्या वेळचे प्रकाशक रा.ज. देशमुखांना ते वाक्य इतकं जिव्हारी लागलं की, त्यांनी आपल्या प्रकाशनाची एक जाहिरातच केली होती, "आम्ही सामान्य लेखकांची अशी सामान्य पुस्तके छापतो, ज्यामुळे महाराष्ट्र असामान्य होतो." मला असं वाटतं की, खांडेकरांचं असामान्यत्व त्या जाहिरातीच्या वाक्यामध्ये आहे. ते त्यांच्या समग्र साहित्यामध्ये प्रतिबिंबित झालेलं दिसतं.
मी खांडेकरांच्या असंग्रहित लेखनाची 32 पुस्तकं संपादित केली आहेत, त्यामधील असं एकही पुस्तक नाही ज्याच्या अनेक आवृत्त्या निघालेल्या नाहीत. जेन झी पिढीमधील मुले-मुलीसुद्धा खांडेकर वाचतात. खांडेकरांच्या हयातीतली 110 पुस्तकं आणि नंतर आलेली 32 पुस्तकं उपलब्ध आहेत, त्यांच्या पुन्हा पुन्हा आवृत्त्या येताहेत. यातून हेच सिद्ध होते की, ते कालजयी, अमर्त्य लेखक आहेत. ते भारतीय साहित्यावर प्रभाव टाकणारे लेखक आहेत. मी खांडेकरांचा अंधभक्त नाही, त्यांचा डोळस वाचक आहे. खांडेकर गेल्यानंतरच्या 50 वर्षांमध्ये आणि खांडेकरांच्या हयातीत 50 वर्षे, त्यांची पुस्तके महाराष्ट्र आणि मराठी माणूस वाचतो आहे. साहित्यिक श्रेष्ठतेचे व अभिजाततेचे आणखी एक परिमाण असते भाषांतराचे. भारतीय आणि जागतिक भाषांमध्ये खांडेकरांइतके अन्य कोणत्याही मराठी साहित्यिकांचे साहित्य गेलेले नाही.
एक-दोन उदाहरणं सांगतो. 1936 मध्ये मुन्शी प्रेमचंद यांनी भारतीय साहित्याला वाहिलेलं 'हंस' नावाचं मासिक सुरू केलं. (आता त्यात फक्त हिंदी साहित्य असतं). प्रेमचंद यांनी हंसमध्ये सहा भाषांचे संपादक नेमले होते, त्यात मराठी विभागाचे संपादक वि.स. खांडेकर होते. समग्र खांडेकर गुजरातीमध्ये, तमिळमध्ये आहे. तमिळनाडूमध्ये द्रवीड मुन्नेत्र कळघम (डीएमके) नावाचा पक्ष खांडेकरांच्या साहित्याने प्रभावित होऊन स्थापन झालेला आहे. त्या पक्षाचे संस्थापक सी.एन. अण्णा दुराई त्या काळामध्ये सत्तेवर आले, ते खांडेकरांना उद्धृत (कोट) करत असत. त्या काळात असं बोललं गेलं की, द्रविड मुन्नेत्र कळघमला सत्ता अण्णादुराईनी नाही दिली, खांडेकरांनी दिली. (किमान याचा भावार्थ लक्षात घ्यायला हवा.) त्या काळात त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची प्रशिक्षण शिबिरं व्हायची, त्यात एक सत्र खांडेकर साहित्यावर होत असे. किंवा आजही गुजराती साहित्याच्या समीक्षेमध्ये खांडेकर युग पाहायला मिळेल. असं असूनही समकालीन मराठी साहित्यिकांनी खांडेकरांना अखिल भारतीय पातळीवरचा साहित्यिक हे स्थान द्यायला संकुचितपणाच दाखवला.
प्रश्न : मृत्यूनंतर 50 वर्षांतही खांडेकरांच्या लेखनाची समीक्षा झालेली नाही, महाराष्ट्राच्या समाज जीवनातील त्यांच्या प्रभावाबद्दल पुरेसा अभ्यास संशोधन झालेलं नाही, असं तुम्हाला वाटतं का? आणि नसेल झालं तर का नाही?
- साकल्याने समीक्षा होणं असा शब्द वापरला तर ती झालेली नाही, हे वास्तव आहे. खांडेकरांचे समीक्षक दोन प्रकारचे आहेत. एक त्यांच्या उदात्तपणाची आणि दुसरे वैगुण्याची समीक्षा करणारे. खांडेकर या दोहोंपेक्षा वरच्या दर्जाचे साहित्यिक आहेत. खांडेकरांच्या साहित्याचं मोठेपण त्यांच्या हयातीत सांगितलं आणि त्यांच्या मृत्यूनंतरही सांगितलं असे काही लेखक आहेत. उदाहरणार्थ, नरहर कुरुंदकर. खांडेकर भिडायला तुमचा मानवी संवेदना सूचकांक वरचा असावा लागतो.
प्रश्न : खांडेकरांच्या हयातीमध्ये आलेल्या 110 पुस्तकांपैकी नॉन फिक्शन म्हणावीत अशी 10 च्या आसपास असावीत, म्हणजे 100 पुस्तकं फिक्शन स्वरूपाची आहेत. आणि खांडेकरांच्या मृत्यूनंतर (अलीकडच्या 25 वर्षांत) ज्या 40 पुस्तकांचं तुम्ही संपादन केलंय, त्यातली आठ-दहा पुस्तकं फिक्शन आहेत, तीस पुस्तकं नॉन फिक्शन आहेत. तर ह्या नॉन फिक्शन पुस्तकांमधून म्हणजे त्यातल्या भाषणांमधून, मुलाखतींमधून, लेखांमधून, आत्मपरलेखनामधून, समीक्षेमधून खांडेकरांच्यातील (मी अतिशय गांभीर्याने शब्द वापरतोय) 'विचारवंत' दिसतो. हे नॉन फिक्शन स्वरूपातील सगळं लेखन त्यांच्या हयातीत संग्रहित झालं असतं आणि लोकांच्या समोर आलं असतं, तर खांडेकरांविषयीचं आकलन बदललं असतं का ?
- खांडेकर आणि तर्कतीर्थ हे असे लेखक होते, ज्यांनी अत्यंत उदारतेने समकालीनांचं स्वागत केलंय आणि अत्यंत चोखंदळपणे समीक्षा केली. खांडेकरांनी लिहिलेल्या प्रस्तावनांचे पाच खंड नजीकच्या काळामध्ये येत आहेत. त्यातून लक्षात येईल की, खांडेकरांइतके उदारमतवादी प्रस्तावक / प्रस्तावना लिहिणारे आज दिसणार नाहीत.
खांडेकरांना साहित्यिक पारख किती मोठी होती, त्याची दोनच उदाहरणं सांगतो. एक प्रसिद्ध उदाहरण आहे कुसुमाग्रजांचं, त्यांच्या कविता त्या काळात लोक छापत नव्हते. तेव्हा खांडेकरांनी पदरमोड करून 'विशाखा' हा काव्यसंग्रह छापला. आणि एक महान कवी मराठीला मिळाला. एवढेच नाही तर, 1976 मध्ये खांडेकरांना 'ज्ञानपीठ' मिळाल्यानंतर एका पत्रकाराने असा खोचक प्रश्न विचारला होता की, 'तुमच्यानंतर ज्ञानपीठ द्यायचं झालं तर मराठीतल्या लेखकाचं नाव सांगा.' तेव्हा त्यांनी क्षणाची उसंत न देता कुसुमाग्रजांचं नाव सांगितलं. खांडेकरांच्या मृत्यूनंतर दहा वर्षांनी कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळालं. खांडेकरांची दूरदृष्टी यातून दिसते.
आणखी एक सांगतो. बाबा आमटेंच्या 'ज्वाला आणि फुले' या चिंतन काव्याला त्यांनी दीर्घ प्रस्तावना लिहिली. आमटे हे व्यक्ती, समाजसेवक आणि साहित्यिक म्हणून किती मोठे होते याचं मूल्यमापन खांडेकर जसे करू शकले, तसे समकालीन साहित्यिक करू शकले नाहीत. विंदा करंदीकरांच्या 'ध्रुपद' या कवितासंग्रहाची पहिली समीक्षा खांडेकर लिहितात. 'धारानृत्य' या मंगेश पाडगांवकरांच्या काव्याची पहिली समीक्षा खांडेकर लिहितात. आणि त्यात असंही लिहितात की, 'हा पुढील काळातला मराठीतला महाकवी असेल.' व्यक्ती आणि साहित्याची ही पारख समकालीनांमध्ये फारशी दिसत नाही. मी कुणाचा अनादर करत नाही, पण खांडेकरांची उदारता मला इथे रेखांकित करायची आहे.
प्रश्न : खांडेकरांनी इतर साहित्यिकांचं, समकालीनांचं मूल्यमापन कसं केलं ?
- खांडेकरांनी व्यक्तीविषयी केलेल्या असंग्रहित लेखांची तीन पुस्तके मी संपादित केलेली आहेत: जीवन शिल्पी, साहित्य शिल्पी आणि समाज शिल्पी. इतक्या मोठ्या प्रमाणात समकालीन लेखकांनी इतरांबद्दल लिहिलेलं तुम्हाला दिसणार नाही. त्यामध्ये जवळपास पाऊणशे व्यक्तींबद्दलचे लेख आहेत.
प्रश्न : खांडेकरांनी स्वतःचं मूल्यमापन कसं केलं, असा प्रश्न आपल्या मनात असतो. त्याबद्दल आपण मुलाखतीच्या दुसऱ्या भागामध्ये बोलणारच आहोत. परंतु या मुलाखतीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून, मी काल संध्याकाळी खांडेकर आणि ना. सी. फडके या दोघांच्याही (1975 दरम्यान) आकाशवाणीवर झालेल्या छोट्या छोट्या मुलाखती ऐकत होतो. दोघांचेही भिन्न दृष्टीकोन त्यातून खूपच चांगले प्रतिबिंबित होतात. आणि जवळपास एकाच प्रश्नाला उत्तर देताना त्या दोघांच्या मनोभूमिका किंवा त्यांचं मानस लक्षात येतं. तर एक प्रश्न खांडेकरांना असा विचारला गेलाय की, 'तुमचं कोणतं साहित्य दीर्घ काळ टिकून राहील?' त्यावर खांडेकर म्हणतात, "काही लेखन दहा वर्षे, काही वीस वर्षे, काही पंचवीस वर्षे टिकून राहतं. पन्नास वर्षांनंतरही टिकून राहील असं साहित्य फार कमी असतं. मी माझ्या स्वतःच्या साहित्याकडे बघतो आणि त्यातील कोणते साहित्य आजपासून पन्नास वर्षांनंतर टिकून राहील असा विचार करतो, तेव्हा माझी मान शरमेने खाली जात नाही, पण खंत वाटते. म्हणजे खूप अल्प असेल, कदाचित नसेल." त्यांच्या त्या मुलाखतीला आता पन्नास वर्षे उलटली आहेत. त्यामुळे स्वतःचं मूल्यमापन करताना खांडेकर चुकलेले तरी आहेत किंवा त्यांनी जरा जास्तच नम्रतेची भूमिका घेतलेली होती, असं म्हणावं लागतं. बरोबर ?
- खांडेकर व्यक्ती म्हणून अत्यंत ऋजू स्वभावाचे होते, त्यांनी कधीही ना.सी. फडकेंचा अनादर केला नाही. त्यांनी फडकेंवर छान लेख लिहिला आहे. खांडेकर विरुद्ध फडके हे समीक्षकांनी रंगवलेलं नाटक आहे. खांडेकर आणि फडके किती आत्मीय होते हे त्यांच्या लवकरच प्रसिद्ध होणाऱ्या पत्रव्यवहारातून कळेल.
(एक माणूस, लेखक, समाजशिक्षक या नात्यांनी वि.स. खांडेकर यांना समजून घ्यायचा प्रयत्न आपण केला. या मुलाखतीच्या पूर्वार्धात निर्माण झालेल्या अनेक रिकाम्या जागा भरण्याचे आणि निर्माण झालेले कुतूहल शमवण्याचे प्रयत्न आपण या मुलाखतीच्या उत्तरार्धात करू या...!)
संवादक : विनोद शिरसाठ
85 मिनिटांची ही व्हिडिओ मुलाखत साधना साप्ताहिकाच्या यू-ट्यूब चॅनेलवर पाहता येईल.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या