डिजिटल अर्काईव्ह

साधना साप्ताहिकाने 20 डिसेंबर 2025 चा अंक "गोवा ज्ञात आणि अज्ञात" या विषयावरील विशेषांक म्हणून प्रकाशित केला. संदेश प्रभुदेसाई हे या अंकाचे अतिथी संपादक होते. या अंकाचे प्रकाशन 64 व्या गोवा मुक्ती दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 18 डिसेंबर 2025 रोजी, गोमंत विद्यानिकेतन, मडगाव (गोवा) येथे झाले. त्या अंकाचे प्रकाशन लेखक, पत्रकार, पटकथाकार आणि स्टोरी टेलर अशी चौरंगी ओळख असलेल्या नीलेश मिसरा यांच्या हस्ते झाले. तेव्हा त्यांनी वीस मिनिटे इंग्रजीतून भाषण केले. ते संपूर्ण भाषण शब्दांकन व अनुवाद करून इथे प्रसिद्ध करीत आहोत.

 

दोस्तों, मेरा नाम है नीलेश मिसरा, कहानियां सुनाता हूँ। साप्ताहिक साधनाच्या 'गोवा ज्ञात आणि अज्ञात' या विशेषांकाचं आणि धर्मानंद कोसंबी यांच्या 'निवेदन' या आत्मचरित्राच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणं ही माझ्यासाठी आनंदाची आणि सन्मानाचीही बाब आहे. मला इथे आमंत्रित केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. अगदी कालपर्यंत मी उत्तर भारताच्या कडाक्याच्या थंडीत होतो आणि आज अचानक इथे उबदार दुपार अनुभवतो आहे. इथे, गोव्यात, मी थोडा वेगळाच ठरतो - थोडा बाहेरचा. दिल्लीमधलं धकाधकीचं, पण पत्रकारितेच्या व्यवसायात स्थिरावलेलं आयुष्य सोडून, त्यानंतर मुंबईच्या चित्रपट आणि मनोरंजनाच्या विश्वात काम करून, मी अलीकडेच लखनौजवळच्या माझ्या जन्मगावी परतलो होतो. आणि अचानक तिथून थेट 1800 किलोमीटर अंतरावर गोव्याला स्थलांतरित झालो. अशा ठिकाणी येऊन स्थायिक झालो, जिथे मी याआधी फक्त पर्यटक म्हणून आलो होतो आणि जिथल्या दैनंदिन जीवनाविषयी मला फारशी माहितीसुद्धा नव्हती. 

माझ्यासाठी हा आयुष्याला कलाटणी देणारा एक महत्त्वाचा निर्णय होता. माझी मुलगी वैदेही हिच्यासाठी मी इथे आलो. ती आता दहा वर्षांची आहे. जिथे तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पंचतारांकित हॉटेलात 'जावं लागेल', महागडी रिटर्न गिफ्ट्स 'घ्यावी लागतील', आणि तिची मित्रमंडळी कोणत्या ब्रँडचे कपडे वापरतात याचं भान ठेवून तिच्यासाठीसुद्धा त्याच किंवा त्यापेक्षा भारी ब्रँड्सचेच कपडे 'घ्यावे लागतील'; अशा त्या वातावरणातून आणि पैसा, स्टेटस या गोष्टींना अतोनात महत्त्व असलेल्या शहरी स्पर्धात्मक आयुष्यातून तिला बाहेर काढायचं माझ्या मनात होतं. दिल्ली-मुंबई तर सोडाच, लखनौमध्येही हे वारं तिच्या आयुष्यात शिरणार होतं. त्या सगळ्यांपासून तिला दूर करून, आपण लहानपणी जशा मोकळ्या वातावरणात वाढलो, तशाच वातावरणात तिला वाढण्याची संधी द्यावी अशी माझी इच्छा आहे.

माझे वडील निवृत्त भूगर्भशास्त्रज्ञ आहेत. लहानपणी त्यांना शाळेत जाण्यासाठी जंगलातून जाणाऱ्या वाटेने बारा किलोमीटर चालत दुसऱ्या गावी जावं लागायचं. तेव्हापासूनच त्यांचं एक मोठं स्वप्न होतं त्यांना स्वतःच्या गावात शाळा सुरू करायची होती. ते अभ्यासात अत्यंत हुशार होते. त्यामुळे संधी मिळत गेली, ते शिक्षणासाठी आधी लखनौला आणि मग पुढे कॅनडाला गेले. तिथे त्यांनी 5.65 कोटी वर्षांपूर्वीचे जीवाश्म शोधून काढले, त्यामुळे डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धान्तातली एक महत्त्वाची उणीव भरून निघाली-एकपेशीय जीवांपासून आपल्यासारखे गुंतगुंतीची रचना असलेले बहुपेशीय जीव कसे तयार झाले, याचं एक तर्कशुद्ध स्पष्टीकरण मिळालं. या शोधामुळे त्यांचं खूप नाव झालं. ते कॅनडाच्या जिओलॉजिकल सव्र्व्हेमध्ये रुजू झाले, त्यांनी चांगला पैसा कमावला, फेरारी घेतली-म्हणजे तथाकथित 'चांगलं आयुष्य' पदरात पडलेलं होतं, तेही कॅनडासारख्या भौतिक समृद्धी असलेल्या देशात. पण त्यांना त्याचा फार मोह नव्हता. त्याआधी त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी 'क्या किया जाए?' नावाची एक फाईल केलेली होती भारतामधल्या लोकांच्या भल्यासाठी काय करता येईल, याच्या योजना त्यात होत्या. बाबांसाठी ती फक्त फाईल नव्हती, तर तेच त्यांचं ध्येय होतं. तो 1960 च्या दशकाचा काळ होता. दुष्काळ, युद्धजन्य परिस्थिती, असा तो कठीण काळ ! त्यामुळे ते गावात परतले. माझी आई निर्मला हिच्यासोबत त्यांनी तिथे शाळा सुरू केली, जेणेकरून मुलांना फक्त शाळेत पोहोचण्यासाठी लांबपर्यंत चालावं लागू नये. आज ते 86 वर्षांचे आहेत आणि अजूनही त्या शाळेसाठी सक्रियपणे काम करतात. तिथल्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता त्यांना इथे गोव्यात निवांतपणे येऊन राहायला फारसा वेळही मिळत नाही.

आपल्या मुळांशी जोडलेली अशी संवेदनशीलता आणि असं मोकळं वातावरण मला माझ्या मुलीलाही द्यायचं होतं. म्हणूनच मी दिल्ली आणि मुंबईसारख्या प्रचंड मोठ्या शहरांत राहिल्यानंतर लखनौला परतलो. त्या वेळी मला वाटलं होतं की, तिथेच माझ्या मुलीच्या सर्वांगीण वाढीसाठी योग्य असं वातावरण मिळेल. त्यामुळे तीच माझी घरवापसी आहे, असं मला वाटलं होतं. पण लखनौचं बदलतं वातावरण पाहून विचार बदलला. आतून जाणवलं की, आईवडिलांनी आमच्यावर ज्या मूल्यांचे संस्कार केले आणि जे निकोप वातावरण दिलं, ती मूल्यं आणि तसं वातावरण माझ्या मुलीलाही मिळावं असं मला वाटत असेल, तर त्यासाठी वेगळ्या जागी मुळं रोवावी लागतील. आणि म्हणून आम्ही इथे, गोव्याला येण्याचा निर्णय घेतला.

लखनौच्या माझ्या घराचं नाव मी 'Slow' ठेवलं होतं. 'Slow' म्हणजे माझ्यासाठी वेगाचा अभाव नव्हे, तर जगणं आतून अनुभवणं, आपल्या मुळांशी अधिक घट्ट जोडलं जाणं, अधिक संवेदनशील होणं, अधिक आठवणींत रमणं आणि अधिक सुखद आठवणी निर्माण करणं. आणि खऱ्या अर्थानं महत्त्वाच्या गोष्टींकडे परत येणं. घरी असताना असं निवांतपण अनुभवण्याची ओढ होती मला, त्यामुळे ते नाव ठेवलं होतं. आणि म्हणूनच जेव्हा लोक मला विचारतात, "तू, आणि गोव्यात?" तेव्हा मी फक्त थोडासा हसतो आणि एवढंच म्हणतो "काय रे! गोव्याबद्दल तुम्हाला किती कमी माहिती आहे! 'Slow' जर एखादा देश असता, तर गोवा त्याची राजधानी झाली असती!" माझी मुलगी अशाच ठिकाणी वाढावी, रुजावी अशी माझी इच्छा होती. आणि मला वाटतं, आम्हाला इथे आमची मुळं आणि आमचं असं घर सापडलं आहे.

इथे येताना मला माहीत होतं की, मी 'आउटसाइडर' असेन; पण मी मोकळ्या मनाने आणि इथलं जगणं जाणून-समजून घेण्याच्या उत्सुकतेने इथे आलो होतो आणि कोणत्याही बाहेरून आलेल्या व्यक्तीने कोणत्याही नव्या भूमीकडे ज्या नम्रतेनं पाहायला हवं, त्याच नम्रतेनं मी गोव्याकडे पाहत आलेलो आहे. मी अनेक ठिकाणी राहिलो आहे. पत्रकार म्हणून वेगवेगळ्या राज्यांत, प्रदेशांत वार्तांकनाचं काम केलेलं आहे. अनेक शहरं पाहिलेली आहेत. आणि सगळीकडे मला नेहमीच असं वाटत आलेलं आहे की, बाहेरून आलेल्या माणसाचा म्हणून जो एक धर्म असतो, जे कर्तव्य असतं, ते अगदी अनिवार्यपणे निभावलंच पाहिजे. गोव्यात आलो, तेव्हा मी एकदा काणकोणला गेलो होतो. संदेशजींनी (प्रभु देसाय) मला अगदी आवर्जून सांगितलं होतं की, काणकोणमध्ये काही अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्यासारख्या बारदेसच्या लोकांना कळणार नाहीत. आम्ही स्थलांतर, बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणं या विषयांवर बरीच चर्चा केली. मी ते सगळं अनेकदा अनुभवलं आहे, त्यामुळे खात्रीने एवढं नक्कीच सांगू शकतो की, एखादं ठिकाण आपलंसं करण्यासाठी जबाबदारीची आणि सहवेदनेची जाणीव असावीच लागते. याच जाणिवेच्या बळावर मी दिल्लीत, मुंबईत, आणि आता गोव्यात स्थिरावलो आहे, बारदेसचा झालो आहे. सहवेदना empathy हीच माझी गुप्त शक्ती आहे. तीच मला चालना देते आणि तिनंच मला गोष्टीवेल्हाळ माणूस बनवलं आहे. 

दररोज मी एखादी गोष्ट सांगतो, तेव्हा मी, मी राहत नाही 'दुसरा' होतो, कोणीतरी वेगळाच. गोव्यात आल्यापासून मी तेच करण्याचा प्रयत्न करतो आहे. 'दुसरा' होण्याचा, समोरच्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून जग पाहण्याचा मला जी अनेक चांगली माणसं भेटली, ज्यांच्याशी मी संवाद साधू शकलो, ज्यांच्याकडून मी खूप काही शिकलो त्यांच्यासारखा 'दुसरा किंवा वेगळा' होण्याचा. गंमत अशी आहे की, मला इथे 'आउटसाइडर' किंवा 'ऑड मॅन आउट' म्हणून ओळखलं जावं असं अजिबात वाटत नाही. मला ते नकोच आहे. मला, तुमच्यातलाच एक म्हणून ओळख हवी आहे. गोव्याबद्दल माझ्या मनात प्रेम, आदर आणि कृतज्ञतेची गहिरी भावना आहे. आणि जेव्हा जेव्हा संधी मिळते, तेव्हा वेगवेगळ्या मंचांवरून मी ती आवर्जून व्यक्त करत असतो. आजही, मी जिथे जिथे जातो, तिथे लोकांना आश्चर्य वाटतं की मी गोव्यासारख्या ठिकाणी येऊन स्थायिक झालो आहे. कारण वर्षानुवर्षं निर्माण झालेल्या चंगळवादी प्रतिमांच्या सापळ्यात गोवा अडकलेला आहे.

पण दुसऱ्या बाजूला खरा गोवा आहे ज्ञान, संस्कृती, कला आणि या देशात अद्वितीय असलेला विशेष जीवन-दृष्टीकोन जपणारा. त्यामुळेच गोव्याला येण्याच्या माझ्या निर्णयाबद्दल लोक थोड्या अविश्वासानं किंवा उपहासानं विचारायचे, तेव्हा ते मला वेदनादायक वाटायचं. इथे आल्यानंतर लगेचच मी एक शब्द वापरायला सुरुवात केली. माझ्या मित्रांशी बोलताना मी तो अनेकदा वापरतो. मला वाटलं होतं की, मीच तो शब्द तयार केला आहे: 'Goanness'. नंतर कळलं की तो आधीपासूनच आहे- 'गोंयकारपण'. गोव्यात असण्याची भावना ही तुम्ही कुठून आलात, तुमची मुळं कुठे आहेत किंवा गोव्याची प्रतिमा काय आहे यावर अवलंबून नाही. ती फक्त या क्षणात इथे असण्याची भावना आहे.

गोव्याविषयी गोव्याबाहेर सर्रास प्रचलित असलेले 'स्टीरिओटाइप्स' मोडून काढण्याचा मी खूप ठामपणे प्रयत्न करत असतो. समाजमाध्यमांतून आणि सिनेमांमधून गोव्याची प्रतिमा एखाद्या चित्राच्या पोस्टकार्डसारखी दाखवली जाते. पण मला वाटतं, गोव्याची खरी प्रतिमा बाहेरच्या जगापर्यंत पोहोचवणारे अधिक 'पोस्टमन' गोव्याला हवे आहेत. मी स्वतःला तसाच एक पोस्टमन समजतो आणि त्याचा मला मला अभिमान आहे. मी जेव्हा केव्हा गोव्याविषयी बाहेर बोलतो, तेव्हा समुद्रकिनाऱ्यांच्या किंवा सौंदर्याच्या नव्हे, तर इथल्या लोकांच्या, इथल्या जगण्याच्या गोष्टी सांगत असतो. मी खऱ्या अर्थानं 'पीपल्स पर्सन' म्हणजे लोकांच्यात रमणारा माणूस आहे. गोव्यातलं साधं, सुंदर आणि कसलाही गोंधळ नसलेलं जीवन मला भावतं आणि इथली जगाकडे पाहण्याची स्वच्छ दृष्टी मला रोज काहीतरी नवं शिकवते. आणि त्यामुळेच मी इथे नवखा असलो तरी खऱ्या गोव्याविषयी जगाला सांगण्यासारख्या असंख्य गोष्टी माझ्याकडे आहेत.

इथे माझ्या आयुष्याला स्थैर्य आणि एक चांगलं उद्दिष्ट लाभलं आहे. आपल्या आयुष्याला चांगलं उद्दिष्ट असलं पाहिजे, ही गोष्ट मला नेहमीच खूप महत्त्वाची वाटत आलेली आहे. त्यामुळे आज मी गोव्यात स्थायिक होण्याच्या निर्णयाने खूप समाधानी आहे. इथे माझ्या मुलीलाही एक संयत, स्थिर व्यक्तिमत्त्व लाभलं आहे. ती वॉटर बेबी आहे. पाण्यात रमते. तिला पोहायला आवडतं आणि इथली सांस्कृतिक विविधता तिला चांगलीच मानवली आहे. वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये वाढलेले मस्त मित्रमैत्रिणी तिला मिळाल्या आहेत. त्यांच्यात ती सहज मिसळून गेली आहे.

इथलं हे आयुष्य निवडता येणं ही गोष्ट नक्कीच सहज शक्य होणारी नाही, पण अशी संधी तरी किती लोकांना मिळते ? अभावानेच काही विशेष लोकांना. सगळं मागे टाकून, लखनौमधलं घर विकून, तिथली मुळं उपटून इथे येणं आणि इथे आपली मुळं नव्याने रुजवल्याचा एक क्षणभरही अजिबात पश्चात्ताप न होणं हे आमच्यासाठी खूप मोठं समाधान आहे. माझ्या मुलीलाही आता इथेच राहायला आवडतं. इतकंच काय, आता तिच्याकडून एखादं काम करून घ्यायचं असेल आणि तिच्याशी 'वाटाघाटी' कराव्या लागल्या, तर माझी सगळ्यात मोठी 'धमकी' असते, ती म्हणजे 'आपण गोवा सोडून परत लखनौच्या शाळेत जाऊ या.' आणि मग ती अगदी पटकन आमच्या मनासारखं वागते. गोवा सोडण्याची कल्पनाही आता तिला करवत नाही.

या सुंदर प्रवासात एकच खंत आहे-गोव्याला मला जितकं परत द्यायचं आहे, तितकं अजून देऊ शकलो नाही. अनेक कल्पना मनात आहेत, मार्ग शोधतो आहे, आणि काहीतरी नक्कीच साध्य करेन, अशी मला खात्री आहे. 'मी गोव्याचा पोस्टमन आहे' असं मी मघाशी म्हणालो. आणि त्यासाठी माझ्याकडे माझ्या व्यवसायाने दिलेला उत्तम दृष्टीकोन आहे. गोव्यात खऱ्या अर्थानं महत्त्वाच्या गोष्टींबद्दल आपण पुरेसं बोलत नाही, असं मला वाटतं. आणि मी स्वतःला बाहेरचा मानायला नकार देतो, त्यामुळे माझ्यासाठी भाषा ही फक्त संवादाचं साधन आहे. ती माणसांना समजून घेण्यात अडथळा ठरत नाही. आज संध्याकाळी मी इथं बसून हा सगळा कार्यक्रम ऐकला. आज इथं जे काही बोललं गेलं त्यातलं साधारण 60 टक्के समजलं आणि याचं मला बरं वाटलं. 'साधना'च्या गोवा विशेषांकाची इलेक्ट्रॉनिक प्रत पाठवताना त्यांनी 'तुम्हाला मराठी येते का' म्हणून विचारलं मी म्हणालो, "येत नाही, पण घेईन समजून." मग मी तो मजकूर ChatGPT वर टाकला आणि त्याचा इंग्रजीत सारांश करून घेतला. त्यामुळे या अंकाचा गाभा मला कळला. विमानप्रवासात अडीच तास मी या अंकात गोव्यातील शेती, युनिफॉर्म सिव्हिल कोड, महसूल अशा विविध विषयांवर काय लिहिलं आहे, ते वाचण्यात घालवले. मला वाटलं, गोव्याची प्रतिमा आणि गोव्याचं वास्तव यांतल्या या रिक्त जागा भरून काढण्याची गरज आहे आणि गोव्याची गोष्ट नव्या पद्धतीनं सांगण्याची गरज आहे.

मला सांगायला आनंद होतो की, डीडी नॅशनलवर 'गाँव से' हा कार्यक्रम मी सध्या करतो आहे. त्याच्या पहिल्या सीझनमध्ये ग्रामीण भारतातील 416 गोष्टी सांगतो आहोत. त्यातल्या अनेक कथा गोव्यातल्या आहेत. खाजन शेतीपद्धती, हिंदू आणि ख्रिश्चन समुदायांच्या एकमेकांत गुंफलेल्या सांस्कृतिक परंपरा, यांविषयी मी यात बोलतो आहे. हा गोवा जगाला दाखवणं आवश्यक आहे.

एक हिंदू म्हणून सांगायचं तर, हिंदुत्व ही अभिनिवेशरहित जीवनपद्धती म्हणून जगण्याचा अर्थ मला इथे गवसला. इथलं हिंदुत्व मला हिंस्र बनवत नाही; उलट, तो जीवनाचा सुंदर उत्सव आहे. त्यात कुठलाही अहंकार नाही, दिखाऊपणा नाही-फक्त धर्म ही जीवनपद्धती म्हणून जगण्याचं सौंदर्य आहे. गोव्यात जितकं सुंदर हिंदुत्व मी पाहिलं, तसं कुठेही पाहिलेलं नाही.

सारांश, खऱ्या गोव्याविषयी आणखी बोललं गेलं पाहिजे. गोव्यालाच गोव्याच्या या गोष्टी नव्याने सांगणारे लोक हवे आहेत. कारण समुद्रकिनारे, दारू आणि नाइटलाइफ यांपलीकडे लोक, संस्कृती आणि अंतर्भागात दडलेलं जीवन, या सगळ्या गोष्टींचा हळूहळू इथल्या काही लोकांनाही विसर पडत चालला आहे. आमच्यासारख्या पोस्टमन्सवर या गोष्टी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आहे. त्यासाठी आधी या गोष्टी आपल्याला माहीत असायला हव्यात. या मातीशी नाळ जोडलेली हवी. 'साधना'चा हा 'गोवा : ज्ञात आणि अज्ञात' विशेषांक आणि आजची सभा यांसारखे उपक्रम त्यासाठी उपयुक्त ठरतात. ते सातत्याने होत राहावेत आणि त्यांच्या निमित्ताने गोव्याचा एक निष्ठावान आणि प्रामाणिक पोस्टमन होण्याची संधी मला पुन्हा पुन्हा मिळत राहावी, अशी आशा मनापासून व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद !

शब्दांकन व अनुवादः ऋचा मुळे


 

Tags: Neelesh Misra weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नीलेश मिसरा,  गोवा ( 1 लेख )

 लेखक, पत्रकार, पटकथाकार आणि स्टोरी टेलर




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी