Diwali_4 'स्लमडॉग'ला ऑस्कर का मिळाले असावे?
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

'स्लमडॉग'ला ऑस्कर का मिळाले असावे?

वास्तवापासून दूर पळण्यासाठीच जुगार, व्यसन, सिनेमा, क्रिकेट यात ही माणसं स्वत:ला बुडवून घेतात. भारतीय जनमानसाच्या हे अतिपरिचयाचे असल्याने, संवेदनशीलता बोथट झालेली आहे. पण 'भौतिक समृद्धीच्या या जगात आपल्यातलाच फार मोठा मानवी समुह कसा जगतो आहे ते पाहा' असेच जणू या सिनेमातून दाखवायचे आहे. हा सिनेमा युरोपियन युनियन, ब्रिटिश दिग्दर्शक व तंत्रज्ञ यांनी तयार केला आहे; तो इंग्रजीत आणि युरोप-अमेरिकेचा प्रेक्षक डोळ्यासमोर ठेवून. त्यामुळे 'भारतीय पार्श्वभूमीवरचा पाश्चात्य सिनेमा' असे त्याचे स्वरूप झाले आहे.

23 फेब्रुवारी 2009 रोजी अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे झालेल्या 81व्या ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळ्यात 'स्लमडॉग मिलिओनेर' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक व सर्वोत्कृष्ट पटकथा या तीन मुख्य पुरस्कारांसह एकूण आठ पुरस्कार मिळाले. 'ऑस्कर' हा जागतिक स्तरावरील चित्रपटाच्या क्षेत्रात सर्वोत्तम पुरस्कार मानला जातो, तरीही 'स्लमडॉग'ला मिळालेल्या पुरस्काराबाबत भारतीय जनमानसात प्रचंड मतभिन्नता आहे. 'या चित्रपटाने भारताच्या दारिद्रयाचे प्रदर्शन जगभर मांडले आहे' हा कलाक्षेत्राशी संबंधित नसलेला आक्षेप बाजूला ठेवला तरी इतर अनेक आक्षेप पुढे केले जात आहेत.

'हा चित्रपट चांगला आहे, पण 'ऑस्कर' मिळावे या लायकीचा नाही...'

'यात गल्लाभरू-मसाला हिंदी चित्रपटापेक्षा फार काही वेगळे नाही...'

'ए. आर. रेहमान व गुलजार यांच्या कितीतरी श्रेष्ठ रचना यापूर्वी आल्या आहेत, त्या मानाने त्यांची या चित्रपटातील कायगिरी अतिसामान्य आहे...'

'हा चित्रपट भारतीय आहे असे म्हणताच येत नाही, कारण निर्माते, दिग्दर्शक व तंत्रज्ञ तर परदेशी आहेत.'प्रत्यक्षातील परिस्थितीही या प्रतिक्रियांना पूरकच आहे. कारण चित्रपट क्षेत्रातील अनेक जाणकारांनी व समीक्षकांनी 'हा चित्रपट सामान्य दर्जाचा आहे' असे प्रतिक्रिया देऊन वा न देता सूचित केले आहे. (उदा.अमिताभ बच्चन, अमीर खान, व्ही.एस. नायपॉल इ.) शिवाय, हा चित्रपट पाहून भारावून गेलेले लोक फार कमी आहेत. (ऑस्कर मिळाल्याने भारावून गेलेल्यांची संख्या मात्र तुलनेने अधिक आहे; त्यात चित्रपट न पाहता भारावून गेलेलेही आहेत.) प्रसारमाध्ययांनी प्रचंड उदो-उदो केल्यानंतर व ऑस्कर मिळाल्यानंतरही या चित्रपटाच्या प्रेक्षकांत फार मोठी वाढ झालेली नाही आणि 'चित्रपट आवडला म्हणून दोनदा, चारदा, सहा वेळापाहिला' असे म्हणणारे तर जवळपास नाहीतच!

म्हणूनच मुख्य प्रश्न निर्माण होतोय: ऑस्करचे इतके पुरस्कार या चित्रपटाला का मिळाले असावेत? 'यावर्षी स्पर्धेत चांगले चित्रपटच आले नाहीत' असे म्हणावे तर मग 'इतर चित्रपटांपेक्षा हा चित्रपट सरस होता' असे म्हणावे लागते. आणि 'लॉबिइंग करून किंवा भारतीय बाजारपेठा समोर ठेवून या चित्रपटाला ऑस्कर दिले गेले' असे म्हणावे तर मग 'ऑस्कर समितीने 80 वर्षांची प्रदीर्घ परंपरा व विश्वासार्हता पणाला लावली' असे म्हणावे लागेल. या सर्व शक्यता नाकारता येत नसतील तर मग आणखी एक शक्यता नाकारता येणार नाही; ती म्हणजे:हा सिनेमा 'ऑस्कर'च्या निवड समितीला खरोखरच आवडला असावा. म्हणजे ही शेवटची शक्यता ध्यानात घेऊन या चित्रपटातील 'सौंदर्यस्थळे' शोधली; ती पुरेशी सापडताहेत असे वाटले तर मग 'स्लमडॉग'ला ऑस्कर का मिळाले असावे या प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल.

या चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना काय आहे? इ.स.2006 हे वर्ष. 'कौन बनेगा करोडपती?' या टी.व्ही.वरील कार्यक्रमात जमाल मलिक नावाचा 18 वर्षांचा तरुण एक कोटी रुपये जिंकलेला आहे; पण आणखी एक प्रश्न बाकी राहिलेला आहे (दोन कोटी रुपये देणारा) आणि तो दुसऱ्या दिवशी विचारला जाणार आहे. पण जेमतेम प्राथमिक शिक्षण झालेला, झोपडपट्टीत राहणारा, चहाच्या हॉटेलात काय करणारा जमाल मलिक या स्पर्धेत एक कोटी रुपये जिंकतोय म्हणजे काहीतरी 'फ्रॉड' झालेला आहे, असे समजून त्याची चौकशी करण्यासाठी पोलिस रात्रभर जमालचा छळ करतात; हा प्रारंभ असलेल्या या चित्रपटाच्या सुरुवातीला, जमाल ही उत्तरं का देऊ शकला या प्रश्नाचे चार पर्याय दिग्दर्शक प्रेक्षकांसमोर ठेवतो...

1)जमालने फसवणूक केली. 2) जमाल लकी आहे. 3) जमाल जिनिमस आहे. 4) ही नियती आहे.

त्यानंतर हा चित्रपट सुरू फ्लॅशबॅक तंत्राने उलगडत जातो. जमाल त्याला विचारल्या गेलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्याच्या बालपणापासूनच्या आयुष्यातील घटना-घडामोडींच्या अनुषंगाने देतो... 1973 साली गाजलेल्या 'जंजीर' या हिंदी सिनेमाचा प्रमुख अभिनेता कोण? (अमिताभ!) तीन सिंहांची भारतीय राजयुद्रा आहे तिच्या खाली कोणते वचन आहे? (सत्यमेव जमते!),रामाच्या मूर्तीच्या डाव्या हातात काय आहे? (त्रिशूल!), 'दर्शन दो घनश्माम' हे भजन कोणी लिहिले? (सूरदास!), 100 अमेरिकन डॉलरच्या नोटेवर कोणाचे चित्र आहे? (बेंजामिन फ्रँकलिन!), 'रिव्हॉल्व्हरचा शोध कोणी लावला? (सॅम्युअल कॉल्ट!), 'इंग्लंडमधील कोणत्या शहरात केंब्रीज सर्कस आहे? (लंडन!), प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके कोणी झळकवली? (जॅक हॉब्ज!)

या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जमाल का देऊ शकला त्याची पार्श्वभूमी तो चौकशी करणाऱ्या पोलिसांना सांगतो, ती संपूर्ण पार्श्वभूमी म्हणजे हा सिनेमा आहे. ही पार्श्वभूमी म्हणजे झोपडपट्टी, बेवारशी युलं, टोकाचे दारिद्र्य, युलांना भीक मागायला लावण्याचा व्यवसाय करणारी आणि युलींना डान्स बार व वेश्या व्यवसायाला लावणाऱ्या टोळ्या, गर्दीतील रेल्वे स्थानकावर पळवली जाणारी मुलगी, जुगाराचे अड्डे, व्यसनं,रोगराई, चोऱ्या, खून, माफिया, हिंदू-मुस्लिम दंगली, जाळपोळ इ. या सर्व पार्श्वभूमीवर माणसं जगतात, बेवारशी युलं वाढतात, टोकाचा संघर्ष करतात, क्रिकेट खेळाने बेभान होतात, चित्रपटाने वेडे होतात, उत्सवात सहभागी होऊन जोष करतात, मोठी स्वप्ने पाहतात, प्रेमकहाणी फुलवतात हे आणि असे बरेच काही 'स्लमडॉग'मध्ये आहे. ते पाहताना काहींना अतिशयोक्ती वाटेल, पण काहीजण म्हणतील 'वास्तव यापेक्षा कितीतरी भयानक आहे.'

'सब लोग ये प्रोग्राम क्यु देखते है?' या प्रश्नावर लतिका सांगते, 'क्यु के अपनी असलीयत से भाग सकूँ.' हा संवाद या चित्रपटाचा उत्कर्षबिंदू आहे. वास्तवापासून दूर पळण्यासाठीच जुगार, व्यसन, सिनेमा, क्रिकेट यात ही माणसं स्वत:ला बुडवून घेतात.

भारतीय जनमानसाच्या हे अतिपरिचयाचे असल्याने, संवेदनशीलता बोथट झालेली आहे. पण 'भौतिक समृद्धीच्या या जगात आपल्यातलाच फार मोठा मानवी समुह कसा जगतो आहे ते पाहा' असेच जणू या सिनेमातून दाखवायचे आहे. हा सिनेमा युरोपियन युनियन, ब्रिटिश दिग्दर्शक व तंत्रज्ञ यांनी तयार केला आहे; तो इंग्रजीत आणि युरोप-अमेरिकेचा प्रेक्षक डोळ्यासमोर ठेवून. त्यामुळे 'भारतीय पार्श्वभूमीवरचा पाश्चात्य सिनेमा' असे त्याचे स्वरूप झाले आहे.

कोणत्याही व्यक्ती, संस्था वा कलाकृतीला एखादा पुरस्कार दिला जातो तेव्हा त्याचा मूळ उद्देश त्या व्यक्ती, संस्थेचे कार्य वा कलाकृतीतून मांडलेला प्रश्न- विचार याकडे लक्ष वेधण्याची गरज आहे अशी शिफारस करणे हाच असतो. गेल्या वर्षी ऑस्करने अल गोर यांच्या 'ॲनइनकन्‌व्हिनियंट ट्रूथ' या माहितीपटाला पुरस्कार दिला होता, तेव्हा त्याच्या दर्जाविषयी ही असेच प्रश्न उपस्थित केले होते. निसर्गातील घटनांचे अतिरंजित चित्र आणि अल गोर यांचे नको तितके एकसूरी निवेदन त्यात आहे अशी टीका झाली. पण त्या माहितीपटाने 'ग्लोबल वॉर्मिंग'चा विषय ऐरणीवर आणला (त्यात अमेरिकेला अधिक दोषी धरले आहे) म्हणून त्याला ऑस्करने पुरस्कार दिला. (पुढे त्याच माहितीपटासाठी अल गोर यांना नोबेल पुरस्कार मिळाला.) आणि आता, महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या देशातील 'स्लम एरिया'चा प्रश्न कलात्यक पद्धतीने ऐरणीवर आणला म्हणून ऑस्कर समितीने 'स्लमडॉग मिलिओनेर'ची निवड केली असावी!

Tags: चित्रपट फिल्म ऑस्कर स्लमडॉग मिलिओनेर संपादकीय cinema film slumdog millionaire oscar editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात