डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाची पायाभरणी होणार?

या सर्वांच्या नावांवरून नजर टाकली तर लक्षात येते की, यांनी मंत्रीपदे व खासदारकी भूषवली आहे, हे पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी राहिले आहेत. यातील बहुतेक सर्वजण सुरुवातीपासून काँग्रेस पक्षातच आहेत. यापैकी अपवाद वगळता कोणीही मासलीडर नाहीत. त्यामुळे पक्ष बळकट व्हावा हाच एकमेव हेतू यांचा हे पत्र लिहिण्यामागे असावा, असे मानायला बराच वाव आहे. आणि समजा यांचा अन्य काही हेतू असेल तरी, त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे तर रास्त आहेत. म्हणून काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाची पायाभरणी करण्यासाठी हे पत्र उपयुक्त ठरेल असे म्हणता येईल.

गेल्या आठवड्यात दिल्ली येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली आणि तिच्यामध्ये सोनिया गांधी यांची निवड हंगामी अध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा झाली. मे 2019 मध्ये झालेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला आलेल्या दारुण अपयशाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर एक-दीड महिना बराच घोळ घालूनही नवा अध्यक्ष काँग्रेसला निवडता आला नाही. ‘आता नेहरू-गांधी घराण्याच्या बाहेरचा अध्यक्ष निवडा’ असे आवाहन त्यांनी केले. पण तरीही काँग्रेसजनांनी तो निर्णय पुढे ढकलला आणि सोनिया गांधी यांना काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष केले. त्यानंतर आता पुन्हा एकदा हंगामी अध्यक्ष केले आहे.

सोनियांची प्रकृती साथ देत नाही, राहुल इच्छुक नाहीत आणि प्रियांका फार पुढे येताना दिसत नाहीत. म्हणजे खरोखरच काँग्रेसच्या बाहेरचा अध्यक्ष असावा, अशी त्या तिघांची इच्छा आहे का? की ‘धरले तर चावते आणि सोडले तर पळते’, अशी त्यांची मन:स्थिती आहे? काँग्रेसच्या अंतर्गत गोटातूनही असेच कळते की, ते तिघेही संभ्रमात आहेत. 

काँग्रेस पक्षाला नेहरू-गांधी घराण्याचे नेतृत्त्व आहे त्याला आता 53 वर्षे झाली आहेत. नरसिंहराव व सीताराम केसरी अध्यक्ष झाले तो मधला सात वर्षांचा (1991-98) अपवाद. या 45 वर्षांपैकी सुरुवातीची 18 वर्षे इंदिरा गांधींची (आणि त्यातली संजय गांधींची गुंतवणूक) सत्ता मिळवणे व राबवणे या आकांक्षेचीच होती हे खरे. पण उर्वरित चौघांना (राजीव, सोनिया, राहुल, प्रियांका) फार मनापासून काँग्रेसचे नेतृत्त्व करायची इच्छा होती किंवा आहे का,  याबाबत कायम शंका राहिली आहे. संजय यांच्या अकाली मृत्यूनंतर राजीव अनिच्छेने राजकारणात आले आणि इंदिराजींच्या हत्येनंतर अनिच्छेनेच पंतप्रधानही झाले. राजीव यांच्या हत्येनंतर तब्बल सात वर्षे सोनिया सक्रिय राजकारणापासून दूर राहिल्या; नंतर राजकारणात आल्या, अध्यक्ष झाल्या, पण पंतप्रधान झाल्या नाहीत. त्यानंतर राहुल उपाध्यक्ष व अध्यक्ष झाले, पण पंतप्रधान होण्याची आकांक्षा त्यांच्यात कधीच दिसली नाही. आणि प्रियांकाही आता वयाच्या पन्नाशीच्या जवळ आहेत, तरीही खासदार व्हायला तयार नाहीत. या चौघांच्या अशा वर्तनाचा अर्थ काय? शक्यता एक- तिघांनाही आपल्या मर्यादांची जाणीव आहे आणि पक्षाचे नेतृत्त्व स्वत:कडे ठेवून त्यांची सत्ताकांक्षा शमत असावी. दुसरी शक्यता- त्यांची अवस्था महाभारतातल्या भीष्माचार्यासारखी झालेली असावी, म्हणजे हस्तिनापूरची गादी टिकून राहिली पाहिजे, यासाठी पांडवांच्या बाजूने राहावे लागणे ही नियती. तिसरी शक्यता- काँग्रेसजन त्यांना सोडायला तयार नाहीत.

कदाचित वरील तिन्ही शक्यता कमी-अधिक प्रमाणात खऱ्या असाव्यात. आणि म्हणून सोनिया, राहुल, प्रियांका यांची कोंडी आजच्या काळात जास्त झालेली दिसते. या कोंडीतून मार्ग कसा काढायचा हे त्यांना कळत नसावे. त्यामुळे ‘बुडत्याचा पाय खोलात’ या म्हणीप्रमाणे काँग्रेस पक्ष अधिकाधिक गाळात चालला असावा.

या पार्श्वभूमीवर 23 काँग्रेस नेत्यांनी पाठवलेले आणि आताच्या काँग्रेस कार्यकारिणीत वादाचा विषय बनलेले पत्र महत्त्वाचे ठरणार आहे. आताची कोंडी फोडण्याचा मार्ग दाखवणारे ते पत्र आहे. राहुल, मनमोहन व अन्य काही काँग्रेस नेत्यांनी त्या पत्राबद्दल नाराजी व्यक्त केली आहे, आणि सोनियाही दुखावल्या गेल्या आहेत. ‘पण त्या 23 नेत्यांच्या बाबतीत माझ्या मनात राग नाही’ असे म्हणून लवकरच काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन भरवून नव्या अध्यक्षाची निवड केली जाईल, असे सोनिया गांधी यांनी जाहीर केले आहे.

काय आहे या पत्रात? 
अतिशय सभ्य व सौम्य भाषेतील या पत्रात काँग्रेसच्या सद्य:स्थितीचे नेमके वर्णन आहे, ही स्थिती का आली याची योग्य कारणमीमांसा आहे, यातून बाहेर पडण्यासाठी काय करायला हवे याचा समर्पक आराखडा आहे, आणि प्राप्त परिस्थितीतून पक्षाने नवी भरारी का घेणे आवश्यक आहे, याबाबत देशहिताचे प्रतिपादन आहे. या पत्रात महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांचा वारसा आणि राजीव, सोनिया व राहुल यांचे योगदान अधोरेखित करून विस्तृत मांडणी केली आहे. कोणत्याही विशिष्ट व्यक्तीवर किंवा घटकांवर दोषारोप करणारे हे पत्र नाही. त्यातील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे सांगता येतील.

1.    सध्या आपला देश स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वांत मोठ्या राजकीय, सामाजिक व आर्थिक संकटातून जात आहे. संविधानातील मूल्यांची मोडतोड केली जात आहे. भारतीय जनता पक्ष त्यांचा सांप्रदायिकतेचा व विभाजनवादी  अजेंडा राबवण्यात यशस्वी होत आहे.
2.    संपूर्ण देशात भीतीची व असुरक्षिततेची भावना बळावत चालली आहे. अशा वेळी काँग्रेसने स्वस्थ बसून चालणार नाही. परिस्थितीचे आव्हान स्वीकारले पाहिजे. त्यासाठी काँग्रेस पक्षसंघटनेचे पुनरुज्जीवन केले पाहिजे. तरच पुरोगामी व लोकशाहीवादी शक्ती बळकट होऊ शकतील.
3.    देशातील तरुण वर्ग बेरोजगारीमुळे अशांत आहे, शेतकरीवर्ग अस्वस्थ आहे, गरीब लोक व कामगार मजूर परिघाबाहेर फेकले जात आहेत. त्यातच कोरोना संकटाने परिस्थिती आणखी बिकट केली आहे. स्थलांतरित लोकांची अवस्था आणखी वाईट होत चालली आहे.
4.    भारताच्या सीमेवर खदखदणारी परिस्थिती आहे. शेजारी देशांबरोबरचे संबंध अधिक बिघडलेले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा, संरक्षणविषय धोरण आणि परराष्ट्र नीती यांच्यासंदर्भात काँग्रेसमध्ये पूर्वीपासून स्पष्टता आहे, त्यामुळे आताची खराब होत चाललेली परिस्थिती पाहता ठोस भूमिका घेण्याची गरज आहे.
5.    राष्ट्रीय पातळीवर आणि राज्याराज्यांत काँग्रेसची घसरण अधिकाधिक होत चालली आहे. मागील दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षाची स्थिती आणखी खालावली आहे. अनेक राज्यांमध्ये निवडणुकांनंतर पक्ष परिघावर गेला आहे. अशी अवस्था येण्याला अनेक कारणे आहेत, ती शोधली पाहिजेत आणि आवश्यक पावले उचलली पाहिजेत. 
6.    काँग्रेसचा जनाधार झपाट्याने कमी होत गेला आहे आणि तरुणाईचा विश्वास आपण गमावलेला आहे. मागील दोन लोकसभा निवडणुकीच्या काळात 18.7 कोटी तरुण मतदारांची भर पडली आहे. 2014 मध्ये 10.15 कोटी आणि  2019 मध्ये 8.55 कोटी तरुणांनी पहिल्यांदा मतदान केले. यातील बहुतांश तरुणांनी मोदी व भाजप यांना मतदान केले. मागील तीन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेली मते अनुक्रमे 7.84 कोटी, 17.66 कोटी आणि 22.9 कोटी इतकीआहेत. याउलट काँग्रेसची स्थिती 2009 मध्ये होती त्याच्या खालीच राहिली आहे.
7.    मागील लोकसभा निवडणूक होऊन 14 महिने झाले आहेत, तरीही पराभवाची कारणमीमांसा व पक्षाची ढासळती स्थिती यावर आत्मपरीक्षण झालेले नाही. ही स्थिती आणखी खराब होऊ नये, अशी आमची इच्छा आहे आणि म्हणून आम्ही त्यावर काही उपाययोजना सुचवीत आहोत.
8.    काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा तिढा सुटलेला नाही, त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचे नीतिधैर्य खचले आहे. भाजपचा विभाजनवादी अजेंडा व केंद्र सरकारची चुकीचे धोरणे, याबाबत काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी पक्षाला दिशा देण्यासाठी उपयुक्त ठरताना दिसत नाही. प्रादेशिक स्तरांवरील अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत.
9.    काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठका औपचारिकता म्हणून होतात आणि त्यामधून आदरांजली वाहण्याचे वा तत्सम उपचार केले जातात. पूर्वीप्रमाणे गहन व गंभीर चर्चा होत नाहीत. काँग्रेस पक्ष विरोधी पक्षात असताना तरी हे मोठ्या प्रमाणात व्हायला हवे. 
10.    प्रदेश काँग्रेस समित्यांचे व जिल्हा काँग्रेस समित्यांचे अध्यक्ष निवडले जात नाहीत, तर नियुक्त केले जातात. ज्या नेत्यांना जनाधार आहे व जनतेच्या मनात आदर आहे, त्यांच्या नियुक्त्या होत नाहीत आणि झाल्याच तरी त्यांना पुरेसे स्वातंत्र्य मिळत नाही.

वरील मुद्यांचा परामर्श घेऊन प्रत्यक्षात काय करायला हवे सांगताना, या पत्रात आणखी बरेच तपशील आले आहेत. त्याचा सारांश तीन वाक्यांत सांगता येईल. स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय स्तरापर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष व पदाधिकारी निवडण्यासाठी संघटना बळकट करा आणि निवडणुका घ्या. युवक काँग्रेसची पुनर्रचना करून तरुण वर्गाला जोडून घ्या. समविचारी पक्षांशी युत्या व आघाड्या करा.

हे पत्र लिहिणारे 23 नेते पुढीलप्रमाणे- गुलाम नबी आझाद (राज्यसभेतील विरोधी पक्षनेते), आनंद शर्मा (लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते), पृथ्वीराज चव्हाण (महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री), कपिल सिब्बल, मनीष तिवारी, शशी थरूर, मुकुल वासनिक, भूपिंदरसिंग हुडा, राजिंदर कौर भट्टल, वीरप्पा मोईली, विवेक तनखा, जितीन प्रसाद, मिलिंद देवरा, पी.जे.कुरियन, अजय सिंग, रेणुका चौधरी, अरविंदर सिंग, कौलसिंग ठाकूर, राज बब्बर, अखिलेश प्रसाद सिंग, कुलदीप शर्मा, योगानंद शास्त्री, संदीप दीक्षित. 

या सर्वांच्या नावांवरून नजर टाकली तर लक्षात येते की, यांनी मंत्रीपदे व खासदारकी भूषवली आहे, हे पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी राहिले आहेत. यातील बहुतेक सर्वजण सुरुवातीपासून काँग्रेस पक्षातच आहेत. यापैकी अपवाद वगळता कोणीही मासलीडर नाहीत. त्यामुळे पक्ष बळकट व्हावा हाच एकमेव हेतू यांचा हे पत्र लिहिण्यामागे असावा, असे मानायला बराच वाव आहे. आणि समजा यांचा अन्य काही हेतू असेल तरी, त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे तर रास्त आहेत. म्हणून काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाची पायाभरणी करण्यासाठी हे पत्र उपयुक्त ठरेल असे म्हणता येईल. अर्थात, सोनिया व राहुल यांनी स्वतःभोवती असलेले सल्लागारांचे व खुशमस्कऱ्यांचे कडे भेदून पुढे जायचे ठरवले तरच काँग्रेसचे पुनरुज्जीवन होणार! पण त्यांना ते कितपत जमेल, कितपत करू दिले जाईल?

विशेष नोंद : 23 काँग्रेस नेत्यांनी अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहिलेल्या इंग्रजी पत्राचा मराठी अनुवाद वाचायचा असेल तर  https://kartavyasadhana.in/  वर चला.

Tags: राष्ट्रीय अध्यक्ष मनमोहन सिंग सोनिया गांधी कॉंग्रेस sonia gandhi congress weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात