डिजिटल अर्काईव्ह

उपशास्त्रीय संगीतावर चांगली पकड आली पाहिजे...

पुण्याच्या सनई-सुंद्री वादक गायकवाड घराण्यातली पाचव्या पिढीची वादक, बनारसी आणि मराठी दोन्ही शैली शिकलेली, आणि भारतातल्या मोजक्या सनईवादक स्त्रियांपैकी एक आणि जगातली पाहिली सुंद्रीवादक स्त्री असलेली नम्रता गायकवाड ही परंपरागत वारसा जपणारी, पुढे नेणारी आणि नवे प्रयोगही करून पाहणारी गुणी कलाकार आहे. तिच्याशी साधलेला संवाद....

प्रश्न : नम्रता, तुझ्या कुटुंबात अनेक पिढ्या सनई आहे. तुझी जडणघडण ज्या वातावरणात झाली, त्याविषयी थोडं सांग.

- पुण्यातले प्रसिद्ध पारंपरिक सनईवादक, सनईसम्राट शंकरराव गायकवाड माझे पणजोबा. त्यांचे वडील श्यामराव, तेही सनई वाजवायचे. पं. प्रभाशंकर गायकवाड हे माझे आजोबा, आणि पं. प्रमोद गायकवाड वडील. हे सर्वजण सनई सुंद्री वादक. ते मंगलकार्यात सनई वाजवायचे, आणि कार्यक्रमसुद्धा करायचे.

माझे नानाजी, म्हणजे माझ्या आईचे वडील पं. अनंतलालजी हे बनारसी शैलीचे पारंपरिक सनईवादक. त्यांचा एकदा पुण्यात कार्यक्रम होता, आणि आजोबांनी त्यांना घरी बोलावलं होतं. तेव्हा त्यांना बाबा आवडले आणि त्यांनी माझ्या आई-बाबांचं लग्न ठरवलं. आई बाबांनी एकमेकांना पाहिलेलंसुद्धा नव्हतं, पण बाबांनी बनारसी बाज शहनाईसाठी लग्नाला होकार दिला. बाबा नानाजींचे शिष्यही झाले. माझे मामा, चुलत मामा, मामेभाऊ हेदेखील सर्वजण वादक आहेत. माझी आई सीमा आणि मी सनई-सुंद्री वाजवते. माझी बहीण प्रेरणा सतार वाजवते.

माझा नवरा मार्क श्रीलंकन तमिळ कुटुंबातला आहे. तो गिटार वाजवतो. त्याचा मुख्य प्रांत पाश्चात्य संगीताचा आहे. दक्षिण भारतीय संगीत आणि श्रीलंकन लोकसंगीत याचीही त्याला आवड आहे. त्याच्या घरात संगीताचं शिक्षण घेतलेले तसे फार कोणी नाहीत, पण आवड सगळ्यांना आहे, त्यांच्या सिंहली परंपरेतलं लोकसंगीत त्यांच्या रक्तातच आहे. माउथ ऑर्गन, युकुलेले, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रम्स असं वाजवणारे कलाकार आमच्या कुटुंबात अनेक आहेत. आता माझी मुलगी ध्वनिसुद्धा सुंद्री आणि युकुलेले वाजवते.

प्रश्न : शहनाई, सनई आणि सुंद्री ही तीन वाद्यं म्हटलं तर दिसायला सारखीही असतात, मात्र ऐकू फार वेगवेगळी येतात. त्याविषयी सांग...

- शहनाई, सनई आणि सुंद्री ही तीन वाद्यं एकाच प्रकारची आहेत. सुषिर म्हणजे पोकळ नळीत फुंकर मारून वाजवण्याची वाद्यं. तीन्ही वाद्यांची रचना साधारण सारखी असते, पण आकार लहान-मोठा असतो आणि रचनेचे काही तपशील वेगवेगळे असतात. मध्यभागी लाकडाची नळी असते. ती एका बाजूला रुंद असते आणि दुसरीकडे निमुळती होत जाते. रुंद बाजूला खाली धातूचा प्याला असतो, त्याचा आकार घंटेसारखा असतो. अरुंद बाजूला धातूची नळी (नरी) असते. त्याला पत्री / पत्तूर बसवलेली असते. बनारसी शहनाई नरकटपासून बनवलेल्या पत्तूरने वाजवतात, तर मराठी सनईला ताडाची बनवलेली पत्तूर असते. लाकडी नळीवर सहा किंवा नऊ छिद्रं असतात. वाजवताना वेगवेगळ्या छिद्रांवर बोट ठेवले की वेगवेगळे स्वर ऐकू येतात.

शहनाई हे बनारसी वाद्य आहे. महाराष्ट्रातली सनई आकाराने शहनाईपेक्षा मोठी असते. तिचा प्याला जास्त पसरट असतो. कर्नाटक शास्त्रीय संगीतातही नादस्वरम् नावाचं याच प्रकारचं एक वाद्य आहे. आणि सुंद्री बरीच लहान आणि दिसायला फार सुंदर असते. तिचा आवाजही जास्त कर्णमाधुर असतो. त्यामुळे तिला सुंद्री असं नाव पडलं असावं. बनारसी पद्धतीत सुंद्रीला पत्तूर लावत नाहीत. मात्र पुण्यात आमच्या घराण्यात पत्तूरने सुंद्री वाजवतात. ही एक नवनिर्मिती आहे. यामुळे सुंद्री आणखी गोड वाजते आणि वाजवताना विविध कामगत करता येते.

प्रश्न : शंकरराव साधारणपणे ग्वाल्हेर घराण्याची गायकी मराठी वाजवत असत. पुढच्या चार पिढ्यांत तुमचं वाजवणं किती वेगळं झालं आहे?

- आजही आमची वाजवण्याची शैली गायकीच आहे, पण बाबांनी नानाजींचं शिष्यत्व स्वीकारल्यावर त्यांच्या वाजवण्यात बदल झाले. ते बनारसी शैलीत वाजवायला लागले. पूर्वी सगळे गायकवाड कुटुंबीय संबळाच्या साथीने सनई वाजवायचे, बाबासुद्धा संबळ-चौघड्याच्या साथीने उत्तम वाजवतात. पण मी मात्र साथीला तबलाच घेते. मी लहानपणापासून मुख्यतः बनारसी पारंपरिक पद्धतीने सनई वाजवायला शिकले आहे, त्यामुळे मला तबला अधिक सवयीचा आणि सोयीचा वाटतो.

प्रश्न : सनईला साथ म्हणून चौघडा, संबळ ही वाद्यं पूर्वी असायची. त्या वेळी तालवाद्यं सनईला वरचढ ठरायची नाहीत. आणि मोठ्या चौघड्याचा घुमारा ऐकायलाही छान वाटायचा. पण बिस्मिल्ला खाँसाहेबांचा मुलगा तबला शिकला, तो त्यांच्यासोबत कार्यक्रमात वाजवायला लागला आणि मग पुढे आता तबलाच अधिक लोकप्रिय झाला. तुला याविषयी काय वाटतं ?

- याचं नेमकं उत्तर मी देऊ शकत नाही. तुम्ही म्हणता तेही एक कारण असू शकेल. आणि चौघडा, संबळ ही वाद्यं साथीला वाजवणारे कलाकारही कमी झाले आहेत. त्या तुलनेत तबलजी सहज उपलब्ध होतात.

मी माझ्यापुरतं सांगू शकते की लहानपणापासून मी तबल्याच्या साथीनेच वाजवायला शिकले, त्यामुळे मला तबलाच सोयीचा वाटतो. तबल्याच्या साथीने ताना, आलाप वाजवणं मला अधिक चांगल्या पद्धतीने जमतं. कधी चौघड्याच्या साथीने वाजवायचा प्रयत्न केला तर मी विचलित होते वाजवताना.

प्रश्न : बिस्मिल्ला खाँही बनारसी शैलीचेच वादक. तुझ्या नानाजींचीही वाजवण्याची पद्धत त्यांच्यासारखीच आहे का ?

- मुळात घराण्याचं साम्य तर आहेच. पण बिस्मिल्लाजी मीण्ड घेऊन जास्त वाजवतात. वाजवताना जिभेचा वापर विशिष्ट पद्धतीने करतात. त्यांच्या वादनात गायकीसोबत वाद्य अंगही आहे. अगदी सतारीचं अंगसुद्धा ऐकू येतं. माझ्या नानाजींच्या वाजवण्यात पूर्णपणे गायकी अंगच असतं. दोघांच्या शैलीत थोडा फरक आहे. नानाजी जिभेचा वापर विशिष्ट पद्धतीने करून 'त्र' (एक विशिष्ट स्वर) वाजवतात. बंदिशीत आलेली कृष्णसारखी जोडाक्षरं ही जशीच्या तशी दाखवण्याची लकब त्यामुळे त्यांना जमते. माझे नानाजी मुख्यतः विलंबित एकतालात वाजवतात. बिस्मिल्लाजींनी मात्र मध्य आणि द्रुतलयीतही भरपूर काम केलं आहे.

प्रश्न : तुझ्या सनई शिक्षणाची सुरुवात कशी झाली ?

- मी बनारसी पद्धतीने शहनाई वाजवायला शिकले, माझ्या आजोळी, दिल्लीला. आमच्याकडे एक पद्धत आहे, बाळ रडत असेल तर त्याला लगेच उचलून घेत नाहीत, तर तानपुरा, तबला किंवा वाद्य वाजत असेल तिथे जवळ नेऊन ठेवतात, त्या आवाजाच्या सान्निध्यातच ते बाळ शांत होतं, त्याला खाऊ-पिऊ घातलं जातं, ते तिथेच खेळतं, झोपतं. आमच्या घरी बाळांना अंगाई म्हणूनसुद्धा बंदिशीच ऐकवतात. प्रभा अत्रेची कलावती रागातली एक बंदिश अशीच माझ्या हृदयाच्या खूप जवळची आहे, मी ती ऐकतच मोठी झाले आहे. आणि आजही ती की दिवसभराचा शीण, त्रागा सगळं नाहीसं होतं आणि शांत झोप लागते. माझी आजी तिच्या मनाला येईल तेव्हा कजरी, ठुमरी वगैरे गायची. मला ते खूप आवडायचं. त्यामुळे मी सतत तिच्याभोवती घुटमळत असायची. ती अंगाई म्हणून मला तेच ऐकवायची. तिच्याच शेजारी झोपायला मला आवडायचं. आई पण स्वयंपाक करताना सतत गुणगुणत असायची. मला रात्री झोपवताना मामा, मामेभाऊ वगैरे तबल्याचे बोल वाजवायचे किंवा म्हणायचे.

तर, असं जन्मापासूनच माझ्या कानावर संगीत पडत होतं. आम्हाला खेळायलाही हातात वयाप्रमाणे पत्तूर (सनई ओठात धरण्यासाठीचा छोटा स्वतंत्र लाकडी / फायबरचा तुकडा) किंवा एखादी जुनी सनईच मिळायची. लहान मूल आहे, हाताळता येईल का? सनई तुटेल का ? अशी कोणतीही शंका न घेता आमच्या हातात सनई दिली जाई. मलाही माझ्या आईची सनई दिली होती. 'फुकू बेटा फुकू' म्हणून सनईत फुंकर मारून वाजवायला लावायचे. घरात सतत सराव सुरूच असायचा. मग मी नानाजींच्या मांडीवर बसून त्यांची सनई ओढून घेऊन वाजवायचा प्रयत्न करायचे. आणि या कारणासाठी कधी कोणी मला ओरडलं नाही, किंवा मला असं करण्यापासून कोणी थांबवलंही नाही. तीच शिक्षणाची सुरुवात होती.

मी सहा वर्षांची असताना नानाजींच्या, मामांच्या समोर बसून वाजवायला सुरुवात झाली. पहिले काही महिने मी नुसता सा घोटवत होते. आधी मी गाऊन दाखवायचे, मग वाजवून दाखवायला लागले. तू छान वाजवलंस तर बक्षीस मिळेल असं आमिष दाखवून अगदी हसत खेळत मला त्यांनी शिकवलं. आठ वर्षांची झाले तोपर्यंत मी बंदिशी, गत, आलाप, तान वाजवायला लागले होते.

प्रश्न : त्यांची शिकवण्याची पद्धत कशी होती ?

- माझे मामा माझ्या स्वरांकडे जास्त काटेकोरपणे लक्ष द्यायचे, आणि नानाजी माझ्या वाजवण्यातल्या भावाकडे लक्ष द्यायचे. मनात जो भाव असेल तो वाजवण्यात उतरवता आला पाहिजे, आनंद असो, दुःख असो, राग असो, समाधान असो, शांतता असो, जो काही भाव असेल तो वाजवण्यात असला पाहिजे. संगीत हा भावनांचा आणि आध्यात्मिक अनुभवाचा विषय आहे, ही गोष्ट ते तेव्हापासूनच त्यांच्या परीने मला शिकवत होते, आणि मी माझ्या परीने समजून घेण्याचा प्रयत्न करत होते.

ते मला डोळे बंद करून वेगवेगळ्या कल्पना करायला सांगायचे. उदाहरणार्थ, समोर एक हरीण बसलं आहे, आणि तू जे काही वाजवतेस ते त्याला आवडलं तर ते मुग्ध होऊन ऐकत राहील आणि नाही आवडलं तर निघून जाईल. त्या हरणाला बरं वाटेल असं वाजव. ते दृश्य डोळ्यापुढे आणून मी वाजवायचे. मलाही पुढे अशा कल्पनाचित्रांशी जोडून वाजवण्याची सवय लागली. आजही मी कधीकधी अशा पद्धतीने विचार करून रियाज करते. कार्यक्रमाच्या वेळी तर कायमच माझ्या डोळ्यांपुढे एक चित्र असतं. सुंदर वस्त्रालंकारांनी नटलेली तेजस्वी सरस्वती मत बसली आहे, तिच्या अगदी पायाशी बसून मी सनई वाजवते आहे, आणि ती शांत हसऱ्या चेहऱ्याने ऐकते आहे, मला आशीर्वाद देते आहे.

वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी मला पहिल्यांदा त्यांच्यासोबत स्टेजवर वाजवायला बसवलं. नानाजी आणि मामांच्या कार्यक्रमांत थोडंसं दोन-पाच मिनिटं वाजवत-वाजवत माझा प्रवास सुरू राहिला. त्यांनी माझ्या वाजवण्याचं कौतुक तर केलंच पण समजा एखादी गोष्ट मला जमत नसेल तर त्यावरही कधी ते चिडले नाहीत. सगळ्यावर एकच उत्तर होतं, परत परत वाजव. स्वतः वारंवार प्रयत्न केल्यावरच नीट जमतं.

खूप वेगवेगळ्या प्रकारे मला त्यांनी शिकवलं. शिकवताना माझे मामा मला एसीच्या पुढे बसवायचे आणि त्या आवाजाशी जुळवून घेऊन ते वाजवायला लावायचे. किंवा दिल्लीच्या थंडीत अंगावरची रजई काढून, थंडीने कुडकुडत दात वाजत असले तरी वाजवायला लावायचे. दिल्लीच्या प्रचंड उन्हाळ्यात एसी किंवा पंखा न लावता घामाच्या धारा निथळत असताना वाजवायला लावायचे. नानाजींकडे एक टेबल फॅन होता, त्याच्या समोर बसून वाजवायला लावायचे. ते खूप अवघड आहे, कारण वरून खालून संगळीकडून हवा जात असते आणि त्यामुळे सनईचा व्याज बदलतो. मग तो मधुर यावा यासाठी काय अॅडजस्ट करून वाजवायला लागेल याचा अंदाज आला. त्याचा फायदा मोकळ्या मैदानात वारा असताना वाजवण्यासाठी होतो हे मला मोठेपणी कळलं.

मामांकडे कुत्रा होता, प्रिन्स. ते त्याला उगाच भुंकायला लावायचे, आणि मला त्याच्या स्वरात स्वर मिसळून वाजवायला लावायचे. कावळा काव काव करतोय, त्याच्या साथीने, पंख्याचा आवाज, मिक्सरचा आवाज, ड्रिलिंग मशीन, घरात काही सुतारकाम, ठोक-ठाक चालू असेल तर त्याचा आवाज अशा आवाजांशी सूर जुळवून वाजवायला लावायचे. माझे मोठे मामा पं. दयाशंकर यांच्यासोबत मी चालायला जायचे. चालतानाही ना धिन धिन ना धिन धिन अशी तालावर पावलं टाकत, लयीनुसार चालण्याचा वेग कमी-जास्त करत आमचा तालाचा धडाच चालायचा. माझ्या अंगात आणि विचारात लय, ताल कायमस्वरूपी भिनले त्यामुळे.

अशा गोष्टींनी मला खूप फायदा झाला. कार्यक्रम केव्हाही, कुठेही, कोणत्याही ऋतूत, दिवसाच्या कोणत्याही वेळी, कसल्याही वातावरणात, एसी हॉलमध्ये किंवा मोकळ्या मैदानात, असला तरी न चुकता, काहीही त्रास न होता मी वाजवू शकते.

प्रश्न : सनई वाजवण्यासाठी फुप्फुसांत शक्ती हवी. दमसास सशक्त हवा. त्यासाठी तुम्ही श्वासाचे काही व्यायाम, काही तंत्रं पण शिकता का ?

 - हो श्वासासाठी मेहनत घ्यावीच लागते. कपालभाती, अनुलोम-विलोम, यांसारखे प्राणायाम करतो आम्ही. चालणं, धावणं असे व्यायामही उपयोगी पडतात. पण याचा परिणाम असाही होतो की वजन कमी होतं. लहानपणी मी शिकत असताना मुळातच माझं वजन खूप कमी होतं, त्यामुळे मला कोणी सक्ती केली नाही, मात्र मी योग्य ते खावं प्यावं, नियमितपणे काही ना काही व्यायाम करावा, आणि रियाज करावा याकडे त्यांचं लक्ष असायचं.

प्रश्न : सनई वाजवणारे पुरुषच अधिक आहेत. असं का?

- सनई वाजवताना श्वासाचा जेवढा जोर लावावा लागतो, त्याची मुलींना सवय नसते. वाद्य शिकत असताना दमसास टिकवणं, स्टॅमिना वाढवणं याचा विचार सगळे आवर्जून करतातच असं नाही. ते वाद्य पेलवणं, त्यात दमदार फुंकर घालणं, आणि संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत स्टॅमिना टिकवणं हे मुलींना अवघड जातं. सनई वाजवणाऱ्या मुलींना श्वासाचा, खोकल्याचा त्रास होऊ शकतो, बरेचदा होतोच. त्रास झाला की त्या घाबरून शिकणं सोडून देतात. त्यामुळेच सनई वाजवणाऱ्या मुलींची संख्या खूप कमी आहे.

प्रश्न : तुमच्या घरात आणखी स्त्रिया आहेत सनई वाजवणाऱ्या?

माझी आई आहे. मी आहे. माझी बहीण व्यावसायिकस्तरावर सतार वाजवत असली तरी तीही वाजवू शकते. आता माझी मुलगी ध्वनी आहे. घरातल्या बहुतेक सगळ्या स्त्रिया घरात पाहून पाहून थोडं थोडं का होईना, वाजवतात, पण कार्यक्रम करणाऱ्या कमी आहेत. आता माझ्याकडे शिकणाऱ्या काही मुली आहेत. त्यांची तयारी करून घेते आहे.

प्रश्न : सनईच्या सुरांतून निघणारा भाव श्रोत्यांपर्यंत कसा पोहोचतो ?

- मुळात तो वाजवण्याऱ्या व्यक्तीच्या मनात असतो, आणि तो स्वरांत आणणं ही जादू फुंकरीत आणि बोटांत आहे. कुठे जोर लावायचा, कुठे मृदुपणा आणायचा, किती दाब द्यायचा, याचं गणित जमलं की सूर आणि त्यांतला भाव ऐकणाऱ्यांपर्यंत पोहोचतो. मग ते शास्त्रीय रागसंगीत असो की ठुमरी कजरी. स्वरप्रधान गाणं असो की चालबद्ध केलेलं गीत असो.

मी आणि माझी मामेभावंडं आम्ही तर सनई वाजवत एकमेकांशी गप्पा मारायचो. उदाहरणार्थ "कुठे निघालास?" "फिरायला." "कुठे जाणार आहेस? मी पण येऊ?" " हो चल, चक्कर मारून येऊ असे संवाद आम्ही सनई वाजवत करू शकतो.

प्रश्न : तू पूर्णपणे दिल्लीला राहूनच शिकत होतीस, की पुण्यात वाडिलांकडूनही धडे घेतलेस ?

संपूर्ण उन्हाळी सुट्टी आणि नाताळ सुट्टी मी दिल्लीला असायचे, साधारण वर्षातले चार महिने. तेव्हा नानाजी आणि मामा यांच्याकडून शिकायचे. बाकीचे दिवस पुण्याला बाबांकडे. पुण्यात शाळा, परीक्षा वगैरे असल्यामुळे आणि बाबांचे कार्यक्रम सुरू असल्यामुळे मर्यादा पडायच्या. सुट्टीत पूर्ण वेळ सनईवर लक्ष केंद्रित करता यायचं.

बाबांची शिकवण्याची पद्धत कडक शिस्तीची होती. ते जे शिकवतील ते लगेच जमलं पाहिजे, आणि त्याचा नियमित रियाज केला पाहिजे याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. अर्थात, प्रेम होतंच, पण त्यांचा धाक वाटायचा. मला वाटतं बाबा म्हणून जवळीक होती तशी गुरू म्हणून अदबही होती. आणि बाबा आणि गुरू यांत नेहमीच त्यांच्या गुरू असण्याचं पारडं जड होतं. आजही त्यांच्यासमोर मी कमी बोलते. नजर खाली वळवून, नम्रतेने, खालच्या आवाजातच बोलते. मैफिलीला ते समोर बसलेले असतील तर मला आपण उत्तम, बिनचूक वाजवलं पाहिजे या जबाबदारीची जाणीव खूप प्रकर्षाने व्हायची. अजूनही होते.

मी कायम घरातल्या मोठ्यांकडून हेच ऐकलं आहे की माझे आजोबा आणि बाबा यांना मी बनारसी शैलीत वाजवायला शिकावं असंच वाटायचं. आजोबा नानाजींना नेहमी सांगायचे की हिला तुमच्या पद्धतीने शिकवा, त्यात खूप गोडवा आहे, तो हिच्या वाजवण्यात येऊदेत. बाबांची पण तीच इच्छा होती. त्यामुळे मी बनारसी पद्धतीने वाजवते, मराठी पद्धतीने नाही, याने कधी त्यांना काहीच फरक पडला नाही.

सुट्टीत आमच्यासोबत बाबाही थोडे दिवस दिल्लीला यायचे, पण त्यांच्याशिवायही मी बऱ्याच वेळा आजोळी राहिले आहे. बाबांच्या कार्यक्रमांचे दौरे असायचे, त्यामुळे खूप लहानपणापासून त्यांच्याशिवाय घरात राहण्याची सवय होती. अगदी लहानपणी नातेवाईकांकडे राहायचो, पण मी साधारण 10-11 वर्षांची असल्यापासून आम्ही दोघी बहिणीच एकत्र राहिलेल्या आहोत. त्यामुळे आम्ही खूप लवकर स्वावलंबी झालो, स्वतःचं स्वतः खायला करून घेणं, स्वतःचं आवरणं, शाळेत एकटं जाणं हे आम्ही खूप लवकर शिकलो. एकदा तर आई-बाबा गोव्यात अभिषेकी महोत्सवासाठी गेले होते, तेव्हा बहिणीला ताप आला, मग डॉक्टर, औषधं, तिचं खाणं-पिणं सगळं मी पाहिलं होतं. ध्वनी, म्हणजे माझी मुलगी तीन-साडेतीन वर्षांची असताना तिला आईकडे ठेवून मी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले तिलाही त्याचा त्रास असा झाला नाही, आजीकडे लाड जास्त होतात ना. आणि आई ज्या गोष्टींसाठी आमच्यावर चिडायची त्याच गोष्टी ती नातीच्या समजून घेते. आता सवय झाली आहे.

प्रश्न : तुझा पहिला स्वतंत्र कार्यक्रम कधी झाला ?

मी सुमारे साडेबारा वर्षांची होते. माझ्या पणजोबांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही पुण्यात एक कॉन्सर्ट करायचो. तिथे मी पहिल्यांदा स्वतंत्रपणे वाजवलं. बालगंधर्व रंगमंदिरात तो कार्यक्रम झाला होता. मी सनईवर मधुवंती राग वाजवला होता.

प्रश्न : हा राग तुम्हा गायकवाडांचा फार आवडता दिसतो. माझ्या साठीच्या कार्यक्रमात तुम्ही तिघांनी मिळून तोच वाजवला होतात...

- हो, असं म्हणता येईल कदाचित. काही राग सनईवर फार सुंदर ऐकू येतात, त्यातल्या बंदिशी, आलाप ताना सनईवर कानाला फार गोड वाटतात. त्यामुळे अगदी सुरुवातीपासूनच मधुवंती, मारुबिहाग, यमन, भैरव, नटभैरव, मुलतानी, सूरमल्हार, शुद्ध सारंग, वृंदावनी सारंग असे काही राग आवर्जून शिकवले जातात. सनईमध्ये विशिष्ट सूर लावण्यासाठी विशिष्ट बोटं विशिष्ट ठिकाणी ठेवणं पुरेसं नसतं. अर्धस्वर वगैरे लावता येत नाहीत. वाजवताना तीव्र मध्यम दाखवायला लागतो, तो अचूक आणि नेमका लागणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. गुरूसुद्धा शिकवताना त्यावर विशेष भर देतात. तीव्र मध्यम लावताना बोटं वेगळ्या ठिकाणी फिरवावी लागतात, त्यामुळे ते वाजवणं अवघड असतं. शिकताना विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो. खूप रियाजानेच ते जमतं.

प्रश्न : व्यावसायिक कलाकार होण्याचा निर्णय तू जाणीवपूर्वक घेतलास, की घरातल्या परंपरागत वारश्यामुळे आपोआप तसं घडलं?

- वारसा होताच, आणि त्याचा प्रभाव सगळ्यात मोठा आहे. पण मी कॉलेजमध्येही शहनाई विषय घेऊन शिकले, मध्यंतरी काही काळ मी नोकरीही केली, पण तेव्हा मला सनईचा रियाज करायला, कार्यक्रम करायला वेळच मिळेनासा झाला. ते मला झेपलं नाही, माझी घुसमट व्हायला लागली. मग नोकरी सोडून पूर्णवेळ व्यावसायिक पद्धतीने सनई सुंद्री वाजवण्याचा निर्णय घेतला.

प्रश्न : कलाकार आणि समाजमाध्यमांचं नातं तुझ्या दृष्टीने कसं आहे? तुझा अनुभव काय ?

मला वाटतं हे नातं मैत्रीचं आहे. बहुतेक कलाकारांना ओळख मिळवून देणारं, दर्दी जाणकार लोकांपर्यंत पोहोचवणारंही आहे. पण हे नातं पुरेसं विश्वासाचं नाही. ते सहजपणे धोकाही देऊन जातं. जितकी तुम्हाला प्रसिद्धी मिळते, तितकीच तुमची तारेवरची कसरत वाढते. माझंच एक उदाहरण सांगते.

काही वर्षांपूर्वी माझी एक मुलाखत झाली होती. त्यात 'मी रोज किती वेळ रियाज करते?', या प्रश्नावर आम्ही बोलत होतो. मुलाखत झाली तेव्हा मी नोकरीही करत होते, माझी मुलगीही लहान होती. तर त्यामुळे मी त्या प्रश्नाच्या उत्तरात असं सांगितलं की, "आजच्या काळामध्ये नोकरी, घर, लहान मुलगी हे सगळं सांभाळताना आणि माझ्या वैयक्तिक काही अडचणी असल्यामुळे मला रियाजाला वेळ कमी मिळतो. पूर्वीच्या लोकांनी त्यांच्या काळात बाकीच्या जबाबदाऱ्या सांभाळत रोज सात-आठ तास रियाज करणं कसं जमवलं असेल कोणास ठाऊक !"

मी खरं तर मागच्या पिढ्यांतल्या कलाकारांच्या डेडिकेशनचं कौतुक करत होते. पण माझ्या या बोलण्याचा अगदी चुकीचा अर्थ लोकांनी लावला. "मोठमोठे वरिष्ठ कलाकार, माझे स्वतःचेच पूर्वज, यांनी दिवसाला सात-आठ तास रियाज केलाच नसेल", असं माझं मत असल्यासारखं चित्र निर्माण करण्यात आलं. त्यांच्या त्या गैरसमजामुळे माझ्या बोलण्याचा अगदी विपर्यास झाला, अनेक कलाकारांना वाईट वाटलं. मी खूप ट्रोलही झाले. म्हणून म्हणते, की कलाकाराचं सोशल मीडियाशी नातं हे विश्वासाचं नसतं. Social media is unforgiving! आज या निमित्ताने माझी बाजू स्पष्ट करण्याची संधी मला मिळाली, याचं मला बरं वाटतं आहे.

प्रश्न : पुण्यात तुमच्यासारखी पिढ्या न् पिढ्या सनई वाजवणारी आणखी काही कुटुंबं आहेत. त्यांच्याशी सांगीतिक देवाणघेवाण होते का ?

- पूर्वी सनई वाजवणाऱ्यांची घराणीच होती. सनईचे धडे लोक घरातूनच घ्यायचे, आणि घरात जे, जसं आणि जेवढं शिकवलं जाईल, तेच वाजवायचे. मात्र आता गेल्या काही वर्षांत गुरूकडे जाऊन शिकण्याचं महत्त्व लोकांना पटायला लागलं आहे. पुण्यातल्या आणखी काही घराण्यातले काही जण आता माझ्या बाबांकडे शिकायला येतात. बाबांनी स्वतः नानाजींकडे तालीम घेतली आणि शहनाई विषयात पीएचडी पण केली आहे.

देवाण घेवाण म्हणजे आम्ही एकमेकांचे कार्यक्रम ऐकतो, भेटीगाठी होतात तेव्हा मैफिलींविषयी, वादकांविषयी बोलतो, पण वाजवण्याच्या पद्धती किंवा बंदिश, गत वगैरे शेअर करत नाही.

उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 2016 मध्ये बाबांनी सुनील महाजन यांच्या मदतीने सनई महोत्सव आयोजित केला होता. बिस्मिल्लाजींचे पुतणे फतेह आली खाँ, पं. बालेशजी, पं. शैलेश भागवत, आणि आम्ही त्यात वाजवलं होतं. पुणे, कोल्हापूर, बेळगाव, गोवा आणि मुंबई अशा तीन राज्यांतल्या पाच ठिकाणी आम्ही तो कार्यक्रम केला. पुन्हा असा शहनाई महोत्सव आयोजित करण्याचा आमचा मानस आहे.

प्रश्न : आपल्याला आता सनई वाजवता येते आणि लोकांच्यापर्यंतही ती पोहोचते असं नेमकं केव्हा वाटलं ?

2015 मध्ये मुंबईला एनसीपीए मध्ये माझा एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात मला जाणवलं की मला जे मांडायचं आहे, ते मी चांगलं मांडू शकते आहे, आणि लोक खूप रस घेऊन, दाद देत ते ऐकत आहेत. माझा विचार, माझी मांडणी त्यांना आवडते आहे.

प्रश्न : सनईच्या संपूर्ण तीन-तीन तासांच्या मैफिली बिस्मिल्ला खाँसाहेबांच्या होत असत, पण आणखी कोणाच्या होत नसत. सतार किंवा अन्य वाद्यासोबत एखादं अर्ध्या पाऊण तासाचं सत्र सनईला वाजवायला मिळायचं. आजही फारशा पूर्ण मैफिली होत नाहीत. मात्र जवळ जवळ सर्व महोत्सवांच्या सुरुवातीला सनई असते, तर थोड्या वेळात स्वतःची कला पूर्णपणे मांडता येते का ? कशी ?

सनईकडे स्वतंत्र मैफिलीचं वाद्य म्हणून आता लोक पाहायला लागले आहेत, सनई / सुंद्री वाजवायला शिकणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. पण अजून संपूर्ण 2-3 तासांच्या मैफिली होत नाहीत. माझे गुरू मला म्हणायचे की आपल्याला बंगला बंधायचा असेल तर त्याची रचना कशी असेल याचा काहीतरी आराखडा डोक्यात असतो ना, तसाच मैफिलीत राग मांडायचा पण एक आराखडा असतो. काही नियम पाळावे लागतात. काही रचना ठरवावी लागते. मी सुरुवातीला आलाप वाजवते, त्यानंतर विलंबित एकताल, मग शेवटचा थोडा वेळ मध्य किंवा द्रुत लयीत वाजवते. वेळ जास्त असेल तर एखादी कजरी, ठुमरी, भजन, असं वाजवते. वेळ 45 मिनिटांचा असो की पूर्ण मैफिलीचा, साधारण रचना तशीच राहते. पण त्या त्या प्रकारचं वाजवण्याचा वेळ कमी-जास्त होतो.

प्रश्न : सनई लोकप्रिय करण्याचं श्रेय जसं बिस्मिल्ला खाँ यांना जातं तसं सनईवादनात गिमिक्स (तांत्रिक चमत्कृती) आणण्याचा दोषही त्यांना जातो. त्याबाबत तुझा काय विचार आहे? तुझी वाजवण्याची पद्धत कशी आहे ?

- मला फार गिमिक्स करत वाजवायला आवडत नाही, माझं वाजवणं थेट असतं. राग, स्वर आणि गायकी यांना धरून असतं. आणि लोकांना अशी सरळ, साधी पण सुरेल मांडणी आवडते.

वसंतरावजी मराठे यांनी मला फुंकेवरती नियंत्रण मिळवण्याचं प्रशिक्षण दिलं. त्यामुळे मी सनईत मृदुपणे फुंक घालून आवाजाच्या तीव्रतेवर नियंत्रण मिळवायला शिकले. माइकपुढे वाजवताना त्याचा खूप उपयोग होतो. असं नियंत्रण नसेल तर सनईचा आवाज माइकमधून कर्कश येतो.

मी शिकायला सुरुवात केली तेव्हा मला सनई पेलवायची नाही. त्यामुळे सनईचा प्याला जमिनीवर ठेवून मी वाजवायला शिकले. अजूनही मी तशीच वाजवते. आणि प्याल्याच्या अगदी खाली माइक ठेवायला लागतो, त्यामुळे ही काळजी मला विशेष घ्यावी लागते.

प्रश्न : तू सनई शिकवायला सुरुवात कधी केलीस ?

मी स्वतः शिकत असल्यापासून शिकवते आहे. आपल्यानंतर शिकायला सुरुवात केलेल्यांची तयारी आपण करून घ्यायची, अशी नानाजींकडे पद्धतच होती. आणि शिकवलं की पक्कं होतं, हा तर मुद्दा होताच. आज समाज माध्यमं आणि व्हिडिओ यामुळे सनई लोकांपर्यंत अधिक पोहोचते आहे, त्यामुळे देश-विदेशांतले अनेक विद्यार्थी आवर्जून सनई शिकायला लागले आहेत. आम्ही प्रत्यक्ष भेटून आणि ऑनलाइन अशा दोन्ही

पद्धतींनी क्लास घेतो. तंत्र शिकवण्यासाठी व्हिडिओचा वापर करतो. शिकवताना आम्ही विद्यार्थ्यांना आमच्या कार्यक्रमांत नेतो. काहींना स्टेजवर नुसते पूर्ण वेळ बसायला लावतो, माइक, लाइट, प्रेक्षक, वातावरण यांचं निरीक्षण करायला लावतो. काहींना प्रेक्षकांत बसायला लावतो. गुरू आणि शिष्य चारचौघांत एकमेकांशी आणि अन्य मान्यवरांशी, प्रेक्षक श्रोत्यांशी कसे 'पेश येतात' (वागतात) याचंही शिक्षण त्यांना आपसूक मिळतं.

मैफिलीनंतर मी माझ्याकडच्या मुलांना मैफिलीविषयी सविस्तर लिहायला सांगते. त्यांच्या नोंदी, निरीक्षणं, प्रश्न, सूचना यांवर त्यांच्यासई चर्चा करते, त्यामुळे सैद्धांतिक माहितीसुद्धा ठोकळेबाज पुस्तकी पद्धतीने शिकवावी लागत नाही, तर आपल्या स्वतःच्या अनुभवांच्या आधारे विद्यार्थ्यांना ती नीट समजून घेता येते. माझ्या मुलीला तर चौथ्या वर्षी मी माझ्यासोबत पूर्ण दोन तास स्टेजवर बसवलं होतं. आता मी तिची माझ्यासोबत वाजवण्याची तयारी करून घेते आहे.

माझ्या विद्यार्थ्यांनाही मी योगासनं, प्राणायाम, श्वासाचे व्यायाम शिकवते. त्यांना घरातल्या कुकरची शिट्टी, मिक्सर, एसी, फॅन, घरातले वेगवेगळे आवाज, प्राण्यांचे आवाज यांच्याशी सूर जुळवायला लावते.

प्रश्न : पारंपरिक सनईवादनाव्यतिरिक्त तू काय वेगळे प्रयोग केले आहेस ?

- थॉमस म्हणून एक स्कॉटिश बॅगपाईपर आहेत. त्यांच्याबरोबर मी जुगलबंदी केली होती. बॅगपाईप हे स्कॉटलंडमधलं पारंपरिक वाद्य आहे, तेही फुंकर आणि बोटांच्या साहाय्याने वाजवतात. त्याची रचना गुंतागुंतीची असते, एकाच वेळी वेगवेगळे स्वर त्यात वाजवता येतात. त्यांनी त्या वाद्यावर राग वाजवला आणि मी त्या रागाशी मिळतीजुळती स्कॉटिश पारंपरिक रचना वाजवली.

मी मार्कसोबत काही बनारसी आणि कर्नाटक संगीताच्या फ्यूजनचे किंवा त्याच्या फ्लेमको स्टाइलचे प्रयोग करते आहे, एक हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत आम्ही कर्नाटक संगीतातला तिल्लाना वाजवला. त्याला लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला, वेगळा प्रयोग आवडला आणि असं आणखी वेगवेगलं काही ऐकायला आवडेल असंही सांगितलं.

प्रश्न : मार्कच्या सिंहली संस्कृतीत सनईसारखं एखादं वाद्य आहे का? तू ते कधी वाजवलं आहेस का? किंवा त्याच्या सोबत काही प्रयोग केले आहेस का ?

झुर्ना किंवा सुरनाई नावाचं दुहेरी-रीड असलेलं लाकडी वाद्य आहे. ते आशिया खंडातल्या अनेक देशांत वाजवलं जातं. ते श्रीलंकेत आहे. होरानावा (टेम्पल क्लॅरिनेट) नावाचंही एक दुहेरी रीड असलेलं सुषिर वाद्य आहे. श्रीलंकेत त्याला धार्मिक / आध्यात्मिक महत्त्व आहे. बौद्ध मंदिर समारंभ, मिरवणुका आणि लोकनाट्य यासारख्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ते वाजवतात. मी ही दोन्ही वाद्यं कुतूहल म्हणून वाजवून पाहिली आहेत. पुढे संधी मिळाली तर त्यांच्यासोबत जुगलबंदीसारखे कार्यक्रम करायलाही आवडेल.

प्रश्न : पुढे काय करायची इच्छा आहे ?

उपशास्त्रीय संगीत वाजवण्यावर अधिक चांगली पकड आली पाहिजे असं मला वाटतं. शास्त्रीय रागसंगीतात स्वरप्रधान वाजवलं जातं. बंदिशीचे शब्द, अर्थ यांना थोडं कमी महत्त्व असतं. रागाचा विस्तार करून दाखवण्याला महत्त्व असतं. पण उपशास्त्रीय संगीत तुलनेने जास्त शब्दप्रधान आहे, तिथे बांधलेल्या चाली असतात, आणि त्या चालींच्या चौकटी राहूनच थोडासा राग खुलवून दाखवता येतो. माझा पिंड संपूर्ण शास्त्रीय पद्धतीने रागसंगीत वाजवण्याचा असल्यामुळे एखादी ओळ वाजवून झाल्यावर मी रागविस्ताराकडे आपसूक वळते. ते त्या ठिकाणी अपेक्षित नसतं. हे कौशल्य मला वाढवायचं आहे.

मार्कसोबत फ्यूजनसंगीताचा अल्बम करावा असा विचार आहे. कार्यक्रम सुरू आहेत. ध्वनिला आणि विद्यार्थ्यांना मी शिकवण्यातही मी रमते आहे. थोडक्यात मी जे करते आहे ते अधिक चांगलं करत राहणं, आणि काही नवे प्रयोग करून परंपरेचा प्रवाह पुढे नेणं हीच इच्छा आहे.

आम्हालाही तुझ्याकडून उत्तरोत्तर आणखी चांगलं ऐकायला आवडेल ! शुभेच्छा !

संवादक : विनय हर्डीकर, पुणे
शब्दांकन : ऋचा मुळे, पुणे 

 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी