डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कालांतराने या नालीत घुसून बसलेल्या या असाहाय्य कोंबड्याची दिनचर्या-अगदी त्याच्या मृत्यूपर्यंतची-माझ्या नजरेसमोर तरळू लागली. हे जणू एखादं दुःस्वप्नच होतं. हेच दुःस्वप्न फँटसीचा आकार घेऊन हळूहळू ‘दंतकथा’ नामक कादंबरीच्या स्वरूपात उतरू लागलं. ‘दंतकथा’ याच फँटसीतून निघालेलं पुस्तक आहे. कोण्या महान लेखकाने असं म्हटल्याचं मी वाचलं होतं की, माणसांवर लिहिण्यापेक्षा पशु-पक्ष्यांवर लिहिणं जास्त अवघड आहे. मी सहमत आहे या विधानाशी, निःसंशय. माणसाची मनोवस्था समजणं एकापरीने सोपं आहे. भाषेतूनसुद्धा माणसाचं चरित्र समजू शकतं. पण पशुपक्ष्यांच्या बाबतीत हे समजणं अवघड, कदाचित असंभवच. म्हणून जेव्हा मी ‘दंतकथा’ लिहिण्याचं ठरवित होतो तेव्हा या कोंबड्याची कथा मांडणं माझ्यासाठी एक आव्हान होतं.

तो धावत होता. तो उडत होता धडपडत आणि इकडे तिकडे लपायचा प्रयत्न करीत होता. तो भयग्रस्त होता, आतंकित दिसत होता. आपला जीव वाचविण्यासाठी तो कोणती तरी सुरक्षित जागा शोधत असावा. पण का? कदाचित त्याने एखादा धोका हेरला असावा? त्याला कशाबद्दल एवढी भीती वाटते आहे? तेवढ्यात, त्याला गटारीचं भोक दिसलं आणि तो त्या गटारीत घुसून बसला. घराचं सांडपाणी, घाण पाणी वाहून नेण्याची ती नाली होती. नालीच्या भोकावर लोखंडी जाळी असते लावलेली खरंतर. पण इथे ती नव्हती. तुटली असेल. काढून ठेवली असेल.

असं दृश्य मी पाहिलं. या दृश्यात मी माझ्या कथा-नायकाला ‘अभिनय’ करताना पाहिलं. नायक म्हणजे एक कोंबडा. देशी कोंबडा. देशी कोंबडा पोल्ट्रीफार्मच्या कोंबड्यांपेक्षा वेगळा असतो. पोल्ट्रीफार्मच्या कोंबड्याला लहान मुलगासुद्धा सहज पकडू शकतो. पण देशी मुर्गा? तो चपळ असतो. तेज असतो. त्याला भलेभलेही सहज पकडू शकत नाहीत. होऽ, तर हा माझा कथा-नायक होता-देशी कोंबडा!

उपरोक्त घटना जेव्हा मी पाहिली तेव्हा मला वाटलं नव्हतं की मी काही लिहीन यावर, म्हणून. खरं तर त्या कोंबड्याला मी नायकरूपात पाहिलंच नव्हतं. त्या वेळेस तो एक सामान्य कोंबडाच होता. पण हळूहळू त्या कोंबड्याशी संबंधित अशा काही गोष्टी मला समजत गेल्या; आठवत गेल्या. त्याला त्या गटारीतून बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले होते. म्हणजे, लोखंडी गज आत घुसवणे, कोंबड्याला हुसकावण्यासाठी आवाज करणे इत्यादी. पण काही उपयोग झाला नाही. मग नालीच्या दुसऱ्या बाजूला जाऊन तिथल्या भोकातसुद्धा गज घुसवून कोंबड्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला. ही सगळी खटपट दोन-तीन दिवस चालली होती. पण कोंबडा काही हाती आला नाही. कोंबडा इकडूनही निघाला नाही आणि तिकडूनही. मग तो गेला तरी कुठे?

हा प्रश्न मला भेडसावत राहिला. कोंबडा गेला तरी कुठे? आणि मग या प्रश्नाशी संबंधित असे अनेक मुद्दे, अनेक प्रश्न माझ्या मनात निर्माण होऊ लागले. गटारीत घुसल्यानंतर त्याला काय वाटलं असेल? तिथे तर अंधार असणार. अंधारात तो कोंबडा काय करीत राहिला असेल? त्याला भूक लागली तर त्याने काय केलं असेल? काय विचार केला असेल? भूक किती सहन केली असेल? त्याला भीती वाटत होती. आणि म्हणून तर तो धावत इथे येऊन लपला होता. मग या भीतीतून तो मुक्त झाला असेल का? भयमुक्त झाला असेल तर त्याने बाहेर येण्याचा प्रयत्न का केला नाही? तो पुढे किंवा मागे, कुठे तरी निघालाच पाहिजे होता. पण तसं झालेलं नव्हतं. मग तो गेला कुठे? तो एखाद्या जादूगाराचा कोंबडा होता का? जादूगार रूमालातून कबूतर बाहेर काढतात. आणि कबूतरातून नाणं बाहेर काढतात. पण हा तर कोंबडा होता, कबूतर नाही.

 हे सगळे विचार माझ्या मनात फेर धरून नाचू लागले. कालांतराने या नालीत घुसून बसलेल्या या असाहाय्य कोंबड्याची दिनचर्या-अगदी त्याच्या मृत्यूपर्यंतची-माझ्या नजरेसमोर तरळू लागली. हे जणू एखादं दुःस्वप्नच होतं. हेच दुःस्वप्न फँटसीचा आकार घेऊन हळूहळू ‘दंतकथा’ नामक कादंबरीच्या स्वरूपात उतरू लागलं. ‘दंतकथा’ याच फँटसीतून निघालेलं पुस्तक आहे.

कोण्या महान लेखकाने असं म्हटल्याचं मी वाचलं होतं की, माणसांवर लिहिण्यापेक्षा पशु-पक्ष्यांवर लिहिणं जास्त अवघड आहे. मी सहमत आहे या विधानाशी, निःसंशय. माणसाची मनोवस्था समजणं एकापरीने सोपं आहे. भाषेतूनसुद्धा माणसाचं चरित्र समजू शकतं. पण पशुपक्ष्यांच्या बाबतीत हे समजणं अवघड, कदाचित असंभवच. म्हणून जेव्हा मी ‘दंतकथा’ लिहिण्याचं ठरवित होतो तेव्हा या कोंबड्याची कथा मांडणं माझ्यासाठी एक आव्हान होतं. पण तरीही, हताश न होता या विषयावर मी विचार करू लागलो.

मला माझ्या बालपणीच्या आठवणींचा खूप उपयोग झालेला आहे. माझं बालपण मध्य प्रदेशच्या जंगलात, पहाड-पर्वतात, आणि लहान-मोठ्या नद्यांनी घेरलेल्या गावात गेलेलं आहे. तिथे पशु-पक्षी जणू मनुष्यांच्या बरोबरीनेच राहत असत. पाळलेलेसुद्धा आणि जंगलीसुद्धा. पक्ष्यांच्या कलकलाटाने पहाटे जाग यायची. पशु-पक्ष्यांचे व्यवहार पाहत दिवस मावळायचा. आणि संध्याकाळी पुन्हा पक्ष्यांच्या कोलाहालात रात्र व्हायची. पहाटे कोंबड्याचं आरवणं कानावर पडायचं. कोंबडा आरवला म्हणजे पहाट झाली हे समीकरण त्यावेळेस मनावर ठसलं होतं. आमच्या घरी कोंबड्या पाळलेल्या असायच्या. माझी आई त्यांची काळजी घेई, त्यांना सांभाळी. मी कोंबडीच्या पिल्लांसोबत खेळत असे. एखादं पिल्लू हरवलं, मांजरीने किंवा घारीने पळवलं तर मी व्याकूळ होत असे, रडत असे. आमच्या घरी त्यावेळेला एक सुंदर कोंबडा होता. मी त्याच्या बरोबरीने फिरत असे. त्याला फेरफटका मारण्याची सवय असावी. म्हणून मीदेखील त्याच्या सोबतीने फिरत असे. तो नेहमीच कोंबड्यांच्या मागे धावत राहायचा. मीसुद्धा त्याच्या बरोबरीने धावत राही. हाच कोंबडा माझ्या नजरेसमोर तरळत राहिला, दृश्यमान होत राहिला. नालीत घुसलेला कोंबडा असाच होता. मग तर सगळी कोंबड्यांची दुनिया माझ्या नजरेसमोर दृग्गोचर झाली. अगदी पिल्लू असण्यापासूनचा त्याचा प्रवास, त्याचं तारुण्यात पदार्पण, त्याचं चालणं आणि वागणं, सवयी, त्याचा आनंद आणि दुःख, आजारपण हे सगळं माझ्या नजरेसमोर स्पष्ट होत गेलं. म्हणजे कोंबड्यांच्या मृत्यूपर्यंतची कथा. आणि नंतर जीवनाचं एक नवं रूपच साकार होऊन माझ्या समोर उपस्थित झालं. त्यानंतर मी खग-कुळाच्या एकूण व्यवहाराबद्दल समजून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. 

माणसाप्रमाणे पक्षी मागच्या दिशेने उलटपावली चालू शकत नाहीत. हे तथ्य समजल्यानंतर नालीत घुसलेला कोंबडा उलट्या गतीने मागे मागे सरकत बाहेर का निघाला नाही, हे समजून आलं. पुढे तर नाली अरूंदच असणार. पण तरीही जोपर्यंत तो जिवंत राहिला तोपर्यंत कसा राहिला असेल हा विचार माझ्या मनाला टोचत राहिला. याच विलक्षण अनुभूतीतून मी ‘दंतकथा’ लिहून टाकली. या सगळ्या लेखनप्रक्रियेत बालपणीच्या त्या पशु-पक्ष्यांच्या आठवणी आणि अनुभव उपयोगी सिद्ध झाले आहेत.

पहिल्यांदा मला वाटलं की, ही एक कोंबड्याची आत्मकथा होईल. पण लिहिता लिहिता पुढे मनुष्यत्व आणि अमनुष्यत्व यांचं द्वंद्व लेखनातून स्पष्ट व्हायला लागलं. माणसाच्या मनात, त्याच्या आतमध्ये पशुता तर विद्यमान असतेच. म्हणून तर ही पशुता कधी कधी बाहेर प्रकटते आणि माणूस हिंस्र बनतो. हत्या करतो. खून करतो. प्राणहरण करतो. भय आणि आतंक या अमूर्त भावनेचा अविष्कार करून माणूस स्वतःला सृष्टीमधला सर्वश्रेष्ठ प्राणी समजतो. हा विचार मला उत्तेजित करीत आला. आणि मग हे लिखाण कुठच्या कुठे पोहोचलं आहे असं मला वाटत राहिलं. माणूस माणसाच्या विरोधात आहे हेही स्पष्ट होत गेलं. जेव्हा मी लिहीत होतो तेव्हा आतंकवाद समाजामध्ये तितकासा पसरला नव्हता पण सांप्रदायिकता अनेक रूपाने समाजामध्ये अस्तित्त्वात असल्याचं दिसत होतं. या सांप्रदायिकतेमध्ये हिंसा दडलेली मला दिसत होती. समाजातली ही हिंसा भयानक रूप घेताना मला दिसली. हीच हिंसा आणि हिंसेतून प्रकट होणारा आतंक आणि भीती ‘दंतकथे’च्या लेखनाच्या केंद्रस्थानी जाऊन बसली आहे. शाकाहार की मांसाहार हा प्रश्न इथे व्यर्थ आहे. या कथेमध्ये या प्रश्नाला विशेष असं स्थान नाही. 

मनुष्याच्या अंतर्मनात दडलेली हिंसा आणि अमनुष्यता किंवा अमानुषता या लेखनाचा केंद्रबिंदू झाला. ही अमानुषता संपूर्ण मानवजातीवर कलंक आहे. माणूस बलवान आहे आणि निर्बल पशु-पक्ष्यांवर मात्र अन्याय आणि अत्याचार करतो आहे. पशुपक्ष्यांना पीडा देतो, त्रास देतो आणि हिंस्रपणे त्यांना ठार मारतो. निर्बल पशु-पक्ष्यांना कोंदट वातावरणात ठेवताना त्याला खंत वाटत नाही. मनामध्ये करूणा उत्पन्न होत नाही. कदाचित असं करताना माणसाला परपीडनाचा आनंद मिळत असणार.

आज सर्वत्र, चारी दिशांना भय आणि आतंकाचा वावर वाढलेला आहे. हा वावर विचित्र आहे आणि भयभीत वातावरण त्यामुळे निर्माण होतं आहे. ही कथा लिहिताना एक विचित्र अशी भयाची भावनादेखील मला जाणवत राहिली. आज सर्वत्र, खून-खराबा आहे. इंच इंच जमिनीसाठी खून पडतायत. स्वार्थ आणि लोलुपता वाढते आहे. शारीरिकच नाही तर मानसिक अत्याचारदेखील वाढले आहेत. आणि ही दुर्दशा सगळ्या समाजाची झालेली आहे. जणू आतंक एखादं श्वापद आहे आणि हे श्वापद आपल्या विशाल पावलांखाली माणुसकीला आणि मानवजातीला पायदळी तुडवतं आहे. हे सगळं चित्र विदारक आहे. हे चित्र आपल्याला पुढे कोणत्या दिशेने नेणार आहे असा सवाल आहे. खरं तर हा प्रश्न सामान्य प्रश्न नाही. ही सामान्य समस्या नाही. या समस्येत चिंतेचे अनेक पदर लपलेले आहेत. हे पदर विस्कटले, ओढले, मोकळे केले तर त्यातून बरंच काही भयावह असं प्रकट होणार आहे.

परंतु, चिंता किंवा निराशा यातून कोणत्याही समस्येचं निराकरण होऊ शकत नाही. जिजीविषा-जीवनेच्छा ही दुर्दम्य आहे. याच जिजीविषेला माझ्यातल्या लेखकाने कदाचित स्वप्नात पाहिलं असणार. हेच स्वप्न ‘दंतकथे’च्या रूपाने प्रकटलेलं आहे. कदाचित असं स्वप्न म्हणजे जीवनाची सार्थकता असावी. या रचनेत अशाच सार्थकतेचा शोध मी घेतला. माणसाला आणि मनुष्यत्वाला जिवंत ठेवण्याच्या प्रयत्नात ही कादंबरी थोडीशी साहय्यभूत ठरू शकेल असा मला विश्वास वाटतो.

‘दंतकथा’ पहिल्यांदा ‘हिंदी इंडिया टुडे’मध्ये क्रमशः छापली गेली. नंतर तिचा उर्दू अनुवाद ‘आजकल’मध्ये प्रकाशित झाला. ‘दंतकथे’चा मराठी आणि बंगालीमध्येदेखील अनुवाद झालेला आहे. मित्र श्री.भारत सासणे यांनी ‘दंतकथे’चा केलेला अनुवाद मराठीमध्ये पुस्तकरूपाने प्रकाशित झाला आणि आता नवी आवृत्ती प्रकाशित होते आहे. अनुवादक आणि प्रकाशक यांचा मी अतिशय आभारी आहे.

अनुवाद : भारत सासणे

(2002 च्या साधना दिवाळी अंकात ‘दंतकथा’ या लघुकादंबरीचा अनुवाद प्रसिद्ध झाला होता. तो अनुवाद आता नव्या आवृत्तीच्याद्वारे पुस्तकरूपात साधना प्रकाशनाकडून आले आहे. या आवृत्तीसाठी लिहिलेले हे मनोगत.)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अब्दुल बिस्मिल्लाह

हिंदी भाषेतील ज्येष्ठ कथालेखक कादंबरीकार


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके