डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

मुस्लिम सत्यशोधक चळवळीची अर्धशतकी वाटचाल (भाग : 2)

हमीद दलवाईंनी 1960 च्या दशकात भारतीय मुसलमानांच्या प्रश्नावर प्रथम लिहावयास व नंतर व्याख्यानांद्वारे बोलावयास सुरुवात केली. तीच त्यांच्या क्रांतिकार्याची मुहूर्तमेढ होती. तत्पूर्वी या प्रश्नावर कुणी बोलत नव्हते. हमीदभाईंच्या लिहिण्या-बोलण्याची शैली काहीशी आक्रमकच, शिवाय विषयही अतिशय संवेदनशील. त्यामुळे अल्प काळातच त्यांचे नाव सर्वत्र गाजू लागले. वर उल्लेखित त्यांचे हितचिंतक आणि गुरुजन त्यांना पाठिंबा देण्याच्या उद्देशाने त्यांच्या अवती-भवती गोळा झाले. पण हमीदभाईंचे व्यक्तिमत्त्व प्रगल्भ करण्याइतके गुरू-शिष्यासारखे नाते काही त्यांच्यात निर्माण झाले नाही. त्यामुळे हमीद हा विषय त्यांच्यासाठी कौतुकापुरताच राहिला. एक तर हमीदभाईंचा स्वभाव काहीसा आत्मकेंद्री, त्यात अल्प काळातच अफाट लोकप्रियता मिळालेली. अशा परिस्थितीत कुणाही व्यक्तीच्या मनात अहंगंडाची भावना निर्माण न होती, तरच नवल!  

भारतीय मुस्लिमांच्या आधुनिकीकरणाची प्रक्रिया 

समाजप्रबोधनाची व परिवर्तनाची चळवळ संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसारखी व्यापक असू शकत नाही. सर्वच पारंपरिक समाजाच्या स्थितिप्रिय प्रवृत्तीमुळे तिला काही अंगभूत मर्यादा असतात. पण हे मान्य केले तरी, अशा मर्यादित वर्तुळातसुद्धा या चळवळीला जितके यश अपेक्षित होते तितके मिळाले नाही, हे नाकारता न येणारे वास्तव आहे. परंतु हे नाकारता न येणारे वास्तव असले तरी ते न समजणारे आहे, असेही समजण्याचे कारण नाही. फक्त इतर सर्व पारंपरिक धर्म आणि इस्लाम यामध्ये सूक्ष्म पण महत्त्वाचा गुणात्मक एक फरक आहे. इतर सर्व पारंपरिक धर्मांमध्ये समाजाचे आध्यात्मिक आणि भौतिक जीवन हे समाजव्यवहाराचे अविभाज्य घटक मानले जातात; पर्यायाने ते ईश्वरीय असल्याची श्रद्धा मनात रुजते. त्यामुळे त्या-त्या समाजाच्या कायद्यांमध्ये परिवर्तन अशक्य होऊन बसते. 

इस्लाममध्ये आध्यात्मिक आणि भौतिक बाबी एकमेकांपासून वेगळ्या ठेवण्यात आल्या आहेत. यातील आध्यात्मिक भाग (दीन किंवा अंतिम सत्य) अपरिवर्तनीय, तर भौतिक बाबी (मामलात) परिवर्तनीय मानल्या आहेत. तशी तरतूद कुराणात आहे. मौलाना अबुल कलाम आझाद यांनी त्यांच्या ‘तर्जुमन अल्‌ कुराण’ या कुराण भाष्याच्या पहिल्या खंडात त्याविषयी सविस्तर विवेचन केले आहे (पृष्ठ 158) इस्लाम सर्वार्थाने परिपूर्ण आहे. त्यात काही परिवर्तन करण्याची गरज नाही असा याचा अर्थ नाही. त्याचा अर्थ एवढाच आहे की- माणूस ज्या परिस्थितीत जगत असतो, ती परिस्थिती सतत बदलत असते त्यामुळे या बदलत्या परिस्थितीत सुसंगत असे परिवर्तन करण्याची तरतूद इस्लामी धर्मशास्त्रात करण्यात आली आहे. भारतीय मुसलमान समाजाच्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत या तरतुदीची दखल घ्यायची की नाही, हा लाख मोलाचा प्रश्न आहे. 

वरील वैचारिक मांडणी हे इस्लामी धर्मशास्त्राचे खास वैशिष्ट्य आहे, कारण त्यामुळेच भौतिक जीवनाशी संबंधित सर्वच बाबींमध्ये स्थल-कालानुरूप बदल घडवून आणण्याचे एक प्रभावी साधन आणि हक्क सामान्य मुसलमानांना उपलब्ध झाले होते. पण सनातनी उलेमांनी तो मार्गच कायमचा बंद करून टाकला. पण उलेमांच्या या भूमिकेचा धर्मश्रद्धेशी काहीही संबंध नाही; याचा संबंध उलेमांच्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या आग्रहाशी आहे. उलेमांच्या या भूमिकेमुळे इस्लामची अंगभूत गतिशीलता (Inherent Dynamism of Islam) मात्र नष्ट झाली आणि इस्लामी संस्कृतीला कुंठितावस्था प्राप्त झाली. 

सारांश : 

1) सर्व सनातनी उलेमा (धर्मपंडित) आणि दारुल उलुम देवबंद, जमाते इस्लामी, जमाते उलेमा-ए-हिंद यांसारख्या धर्मपीठांची मुस्लिम व्यक्तिगत कायद्यासंबंधी सुरुवातीपासूनच एक ठाम भूमिका आहे. मुस्लिम व्यक्तिगत कायदा हा ईश्वरीय (Devine) व म्हणून अपरिवर्तनीय आहे. इतर सर्व धर्मपंडितांची आणि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची ही सुरुवातीपासूनची भूमिका आहे. 

2) इतर धार्मिक/किंवा सामाजिक व्यवहारांबाबतही त्यांची तीच भूमिका असते. 

3)मात्र इस्लामी न्यायशास्त्र आणि शरियत यांच्या इतिहासाचा शोध घेतला, तर उलेमांच्या वरील भूमिकेत काहीच तथ्य नसल्याचे आढळून येते. इस्लामी न्यायशास्त्राचा किंवा कायद्याचा जन्म झाला, तेव्हापासून आजपर्यंत या कायद्यात सतत बदल होत आले आहेत. तेव्हा शरियत, इस्लामी न्यायशास्त्र किंवा सामाजिक व्यवहाराशी संबंधित असलेल्या सर्वच बाबी अपरिवर्तनीय असल्याचा सनातनी उलेमांचा दावा केवळ भ्रामकच नव्हे, तर सामान्य मुसलमानांची दिशाभूल करणारा आहे. ही पार्श्वभूमी विचारात घेऊनच मुस्लिम सत्यशोधक मंडळाने शरियतच्या कायद्यातील परिवर्तनाचा कार्यक्रम आणि दिशा निश्चित करायला हवी होती, पण तसे झाले नाही. उलेमांना टार्गेट करण्याऐवजी प्रत्यक्ष इस्लाम आणि त्याच्या संस्थापकाला लक्ष्य (टार्गेट) करण्याची भूमिका मंडळाने स्वीकारली. त्यामुळे आधीच शरियत आणि इतर धार्मिक बाबींविषयी अतिशय संवेदनशील असलेला सामान्य मुसलमान उलेमांच्या चिथावणीला बळी पडून मुस्लिम सत्यशोधक चळवळीचा कट्टर विरोधक बनला. 

व्यक्तिमत्त्वाची जडण-घडण 

हमीदभाई नास्तिक होते आणि त्यांची ही भूमिका ते जाहीरपणे मांडत असत. हा अर्थात त्यांचा प्रामाणिकपणा झाला. शिवाय नास्तिक असणे हा त्यांचा अधिकार आहे व तो इतरांनी मान्य केला पाहिजे. पण या नाण्याची दुसरीही बाजू आहे. समाजात नास्तिक असतात त्याबरोबर आस्तिकही असतात आणि आस्तिक असणे हा त्यांचा अधिकार असतो. तेव्हा त्यांचा हा अधिकार सर्वांनी मान्य करणे, हेही तितकेच आवश्यक असते. पण वरवर दिसते तितके हे सोपे नसते, कारण नास्तिक किंवा आस्तिक असण्या-नसण्याच्या अधिकारात एकमेकांविषयीच्या भावनांचा आदर अनुस्यूत असतो. 

हमीदभाईंच्या आचार- विचारात विरोधकांविषयी उदारतेचा अनुभव क्वचितच आढळत असे. या बाबतीत त्यांनी प्रेषितांचाही अपवाद केला नाही. पैगंबरांनी आपले जीवितकार्य निश्चित केले होते आणि ते बावीस वर्षांच्या काळात पूर्णही केले. या त्यांच्या कार्याबद्दल कुणाचे मतभेद असले व कुणी त्यांच्यावर टीका केली, तर ते समजण्यासारखे आहे. त्यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर कुणी टीका केली आणि त्यांच्यावर श्रद्धा असणाऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या, तर त्याबद्दल त्यांना दोष देता येईल का- हाही विचार करण्यासारखा प्रश्न आहे. व्यक्तिमत्तेच्या विषयाकडे आणखी एका दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक वाटते. नास्तिकता म्हणजे निरीश्वरवाद किंवा कुठल्याही स्वरूपातील ईश्वर किंवा देवाचे अस्तित्व नाकारणे असा होतो. 

सर्वमान्य ईश्वराचे अस्तित्व नाकारणे म्हणजे धर्मग्रंथाचे अपौरुषत्व नाकारणे ही त्याची पुढची पायरी आहे, हेही ओघानेच आले. तेव्हा त्याबद्दलही कुणाला आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण धर्मग्रंथाचे अपौरुषत्व किंवा दैवत्व अमान्य करणे ही नास्तिकतेची परिणती असली तरी त्याचा अभ्यास करू नये, असा त्याचा अर्थ होऊ शकत नाही. जगातील सर्व धर्मांच्या सर्व धर्मग्रंथांचा विवेकवादी अभ्यास होतच असतो. कुराणही याला अपवाद नाही. जगातील सर्वच मुसलमान कुराणाला सर्वांत पवित्र ग्रंथ मानतात. साहजिकच कुराणातील विचार, नैतिक मूल्ये, भौतिक व आधिभौतिक तत्त्वज्ञान या सर्वांचा त्यांच्या आचार-विचारांवर प्रभाव पडत असतो. परिणामतः अशा परंपरेने बंदिस्त झालेल्या मुस्लिम समाजात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याचे असिधारा व्रत ज्यांनी स्वीकारले आहे, त्यांच्यासाठी कुराणाचा विवेकवादी अभ्यास अनिवार्य असतो. 

हमीदभाईंनी कुराणाचा असा अभ्यास कधीच केला नाही. साहजिकच  त्यांच्या सहकाऱ्यांनाही तसा अभ्यास करण्याची गरज वाटली नाही. मुस्लिम सत्यशोधक चळवळीची हीच खरी शोकांतिका. पण मुस्लिम व्यक्तिगत कायद्यातील कालबाह्य तरतुदींमुळे मुस्लिम महिलांवर होणारे अन्याय-अत्याचार याविषयीची त्यांची खंतसुद्धा प्रामाणिक होती. मुस्लिम समाजातील प्रबोधन व परिवर्तनवादी चळवळ सुरू करण्याविषयीच्या त्यांच्या धडपडीत जाणिवेचा आविष्कार होता. म्हणूनच सत्यशोधक चळवळ हेच त्यांनी आपले जीवितकार्य म्हणून निश्चित केले. त्यासाठी त्यांनी आपली नोकरी सोडली व त्या कार्याला संपूर्णपणे वाहून घेतले. 

पण अशा चळवळीच्या नेत्यापाशी केवळ इच्छाशक्ती असून चालत नाही; त्याबरोबर चळवळीचे स्वरूप, त्यातील चढ-उतार, त्यासाठी आवश्यक असलेले कृतिशील कार्यक्रम तर दुसरीकडे अशा चळवळीची बौद्धिक गरज विचारात घेऊन त्यासाठी बौद्धिक व सैद्धांतिक पायाभरणी करणेही तितकेच आवश्यक असते. त्यासाठी अशा चळवळीच्या नेत्याचे व्यक्तिमत्त्व सर्वार्थाने प्रगल्भ असावे लागते आणि वृत्ती सर्वस्व समर्पणाची असावी लागते. हमीदभाईंच्या व्यक्तिमत्त्वात याचा पूर्णपणे अभाव होता. 

हमीदभाईंनी चळवळीच्या सुरुवातीच्या काळात कृतिशील कार्यक्रमाच्या क्षेत्रात बऱ्यापैकी मजल मारली होती. चळवळीची स्थापना झाल्यानंतर वर्षभरातच पुणे येथे 27-28 डिसेंबर 1971 रोजी आयोजित करण्यात आलेली पहिली मुस्लिम महिला परिषद, 1973 ची मुंबईची सामाजिक परिषद, 1974 ची कोल्हापूरची शिक्षण परिषद, 1975 ची घटस्फोटित महिला परिषद- अशा काही घटनांचा उल्लेख करता येईल. त्याशिवाय काही इतर छोटे-मोठे कार्यक्रमही हाती घेण्यात आले होते. दुसऱ्या म्हणजे बौद्धिक आघाडीवर मात्र फारसे काही घडले नाही. अपरिहार्य कारणास्तव त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही, हा काही त्यांचा दोष म्हणता येणार नाही. पण त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीवर व चळवळीच्या सर्वव्यापकतेवर परिणाम झाला, हे नाकारता येणार नाही. 

स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात मुस्लिम प्रश्न या ना त्या स्वरूपात अस्तित्वात होताच. काही वेळा या प्रश्नाने उग्र रूपही धारण केले होते. पण स्वातंत्र्योत्तर काळात सुरुवातीच्या काही वर्षांपर्यंत हा प्रश्न सुप्तावस्थेत गेला होता. हमीद दलवाईंनी त्याला 1960 च्या दशकात प्रथम वाचा फोडली. महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. त्या वेळेस मुस्लिम समाजाला अशी शॉक ट्रीटमेंट आवश्यक होती, असे म्हटले जात होते. पण शॉक ट्रीटमेंट सतत परिणामकारक होत नसते, याचे भान कुणीच ठेवले नाही. दलवाईंच्या घणाघाती टीकेमुळे साऱ्या देशाचे लक्ष त्यांच्याकडे लागले, हे मात्र खरे. 

दलवाई हे विचाराने तसे समाजवादीच. त्यामुळे पुण्यातील त्यांचे जुने समाजवादी सहकारी त्यांच्याजवळ असणे साहजिक होते. त्यांच्या सहकार्याने आणि पाठिंब्याने मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना झाली, त्याचा उल्लेख वर आलाच आहे. या मंडळींमध्ये नानासाहेब गोरे, एस. एम.जोशी, भाई वैद्य, ग.प्र.प्रधान, यदुनाथ थत्ते, बाबा आढाव यांचा उल्लेख अगत्यपूर्वक करावा लागेल. ही सर्वच मंडळी स्वातंत्र्यसंग्रामातून तावून-सुलाखून बाहेर आलेली होती. शिवाय स्वातंत्र्योत्तर काळातही नवमहाराष्ट्राच्या जडण-घडणीत त्यांचे योगदान महत्त्वाचे होते. साहजिकच हमीद दलवाईंच्या क्रांतिकार्यात त्यांना मार्गदर्शन करण्याचा त्यांना नैतिक अधिकार निश्चितच होता, पण तो त्यांनी वापरला नाही. 

हमीद दलवाईंनी 1960 च्या दशकात भारतीय मुसलमानांच्या प्रश्नावर प्रथम लिहावयास व नंतर व्याख्यानांद्वारे बोलावयास सुरुवात केली. तीच त्यांच्या क्रांतिकार्याची मुहूर्तमेढ होती. तत्पूर्वी या प्रश्नावर कुणी बोलत नव्हते. हमीदभाईंच्या लिहिण्या-बोलण्याची शैली काहीशी आक्रमकच, शिवाय विषयही अतिशय संवेदनशील. त्यामुळे अल्प काळातच त्यांचे नाव सर्वत्र गाजू लागले. वर उल्लेखित त्यांचे हितचिंतक आणि गुरुजन त्यांना पाठिंबा देण्याच्या उद्देशाने त्यांच्या अवती-भवती गोळा झाले. पण हमीदभाईंचे व्यक्तिमत्त्व प्रगल्भ करण्याइतके गुरू-शिष्यासारखे नाते काही त्यांच्यात निर्माण झाले नाही. त्यामुळे हमीद हा विषय त्यांच्यासाठी कौतुकापुरताच राहिला. 

एक तर हमीदभाईंचा स्वभाव काहीसा आत्मकेंद्री, त्यात अल्प काळातच अफाट लोकप्रियता मिळालेली. अशा परिस्थितीत कुणाही व्यक्तीच्या मनात अहंगंडाची भावना निर्माण न होती, तरच नवल! हमीदभाईंच्या बाबतीत नेमके हेच घडले होते. कुठल्याही परिवर्तनवादी चळवळीचा संबंध धर्म, धर्मपरंपरा किंवा धर्मग्रंथाशी येत असल्यामुळे त्यांचा विवेकवादी अभ्यास अपरिहार्य असतो. कारण असा अभ्यास केल्याशिवाय चळवळीची दिशा व स्वरूप निश्चित करता येत नाही. अशा तऱ्हेचा अभ्यास हमीद दलवाईंनी किंवा त्यांच्याभोवती असलेल्या त्यांच्या हितचिंतकांनीही केलेला नव्हता. 

अपवाद करायचाच झाला तर अ.भि.शहा व नरहर कुरुंदकर या दोघांचा करता येईल. परंतु या उभयतांची इस्लामविषयीची भूमिका पूर्णतः नकारात्मक व म्हणून पूर्वग्रहदूषित होती. त्यांच्याकडून विवेकवादी दृष्टिकोनाची अपेक्षा करता येत नाही. इस्लाम व भारतीय मुसलमानांविषयीचा कुरुंदकरांचा दृष्टिकोन असाच सदोष होता. त्यांच्याकडून विवेकवादी भूमिकेची अपेक्षा करता येत नाही. वसंत पळशीकर यांनी त्यांच्या अशा राजकीय विचारांची विपुल समीक्षा केली आहे. शिवाय सोलापूरचे तरुण संशोधक-अभ्यासक सर्फराज अहमद हे त्यांच्या समग्र राजकीय साहित्याचे संशोधन करत आहेत. या विषयावरच त्यांचा प्रदीर्घ लेख नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यांच्याही इस्लामविषयी भूमिकेचा अभ्यास करण्याचे एक साधन आता अभ्यासकांना उपलब्ध झाले आहे. 

अ.भि.शहांच्या बाबतीत थोडा वेगळा विचार करावा लागत आहे. कारण ते मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे सर्वेसर्वा होते, तिची सर्व सूत्रे अप्रत्यक्षपणे त्यांच्या हाती होती. आणि महत्त्वाचे म्हणजे, हमीदभाईंवर त्यांच्या आचार-विचारांचा खूपच प्रभाव होता. इस्लामचा अभ्यास करण्याबाबतचा त्यांचा दृष्टिकोन कसा होता, याचा उल्लेख वर आलेलाच आहे; परंतु त्यांच्या भूमिकेला आणखी एक पैलू होता. इस्लामच्या इतिहासात चुकून काही चांगले घडले असल्याचे आढळल्यास, ते मान्य करण्याची त्यांची तयारी नसायची. उलट तेसुद्धा कसे नाकारता येईल, हेच दाखवून देण्याच्या त्यांचा सतत प्रयत्न असे. Muslim Politics in Secular India या हमीदभाईंच्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत इब्न सीना आणि अल गझाली या इस्लामी दोन तत्त्वचिंतकांविषयी त्यांनी व्यक्त केलेल्या त्यांच्या मतांवरून त्यांच्या दूषित पूर्वग्रहांची कल्पना येऊ शकते. अकराव्या शतकात होऊन गेलेल्या या दोन मान्यवर तत्त्वचिंतकांचा उल्लेख त्यांनी त्यांच्या उपरोक्त प्रस्तावनेत केला आहे. त्यापैकी एक म्हणजे- इब्न सीना (980- 1037 इसवी) आणि दुसरे म्हणजे- अल गझाली (1058-1111 इसवी). 

इस्लामच्या तत्त्वज्ञानाच्या इतिहासात त्यांना अग्रक्रमाचे स्थान दिले जाते. इतकेच नव्हे, तर या परंपरेतील ज्या 6-7 तत्त्वचिंतकांना पाश्चात्त्य देशांत मान्यता मिळालेली आहे, त्यांच्या यादीतही ही दोन नावे अग्रस्थानी आहेत. शहा यांनी या दोन्ही तत्त्वचिंतकांच्या तत्त्वज्ञानावर कठोर आणि अविवेकी टीका केली आहे. इब्न सीना यांच्या विषयी त्यांनी असे उद्‌गार काढले आहेत की- Indeed it comes as something of a shock to be confronted with the thickning web of irrational elements in the writings of such a personality (एरवी सीनासारख्या तत्त्ववेत्त्याच्या लिखाणात गुंतागुंत झालेल्या जाळ्यासारखे तर्कशून्य घटक आढळावेत, ही अतिशय धक्कादायक बाब समजली पाहिजे) अल गझालीच्या बाबतीत शहा खूपच कठोर झालेले दिसतात. सदर प्रस्तावनेचे पृष्ठ क्र.15 वर त्यांनी असे म्हटले आहे की, Muslim Scholars look upon Al A Ghajali as the greatest thinker that Islam culture has produced. I am inclined to believe that he was the greatest desaster that befell it, since the death of the Prophet. (इस्लामी संस्कृतीने अल्‌ गझालीसारखा महान विचारवंत निर्माण केला, असे मुस्लिम विचारवंतांना वाटते. मला मात्र प्रेषितांच्या निधनानंतर इस्लामी संस्कृतीवर याच रूपाने एक मोठे संकट कोसळले होते, असे मला खात्रीपूर्वक वाटते.) 

आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात ॲरिस्टॉटलनंतर अल्‌-फराबीला दुसऱ्या क्रमांकाचे स्थान देण्यात आले आहे. यावरून त्याच्या तत्त्वज्ञानाचा कस काय होता याची कल्पना येऊ शकते. अध्यात्मशास्त्र, मानसशास्त्र, तर्कशास्त्र, पदार्थविज्ञान, वैद्यक, धर्मशास्त्र अशा अनेक शास्त्रांमध्ये त्याला गती होती. अशा या जगमान्य तत्त्वचिंतकांची परंपरा इब्न सीना याने त्याच वैचारिक बांधिलकीने पुढे चालू ठेवली. एका अर्थाने इब्न सीनाला (Avi Sina) इब्न फराबीच्या वारसा मिळाला, असेही म्हणता येईल. अशा हा जगन्मान्य तत्त्वचिंतक शहांना इस्लामी संस्कृतीवरचे महासंकट वाटावे, हा शहांच्या इस्लामी संस्कृतीविषयीच्या दूषित पूर्वग्रहाचा पुरावा आहे. परंतु इब्न सीना किंवा अल्‌ गझालीसारख्या जगन्मान्य तत्त्वचिंतकाबाबत अविवेकी किंवा तर्कदृष्टतेचे संदिग्ध  आरोप केल्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल, असे समजण्याचे कारण नाही; पण त्यामुळे प्रा.शहांच्या संकुचित दृष्टिकोनाचे मात्र दर्शन घडते. 

अ.भि.शहांनी इस्लामी परंपरेतील दहाव्या-अकराव्या शतकातील इब्न सीना आणि अल्‌ गझाली या दोन तत्त्वचिंतकांची दखल घेऊन त्यांच्यावर काही पुरावे, तपशील किंवा स्पष्टीकरण न देता गंभीर आरोप केले आहेत. मात्र, त्याच काळात तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातच नव्हे तर विज्ञान, गणित, वैद्यक, रसायनशास्त्र अशा अनेक ज्ञानक्षेत्रांत ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे, त्यांची दखल मात्र त्यांना घ्यावीशी वाटली नाही. वास्तविक सातव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंतचा कालखंड इस्लामच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाचा होता, असे त्या काळच्या इतिहासावरून दिसते. या ज्ञानक्षेत्रांबरोबरच आणखी एका क्षेत्रात अशी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अरब विचारवंत, संशोधकांनी ग्रीक भाषेतील प्रचंड ज्ञानभांडार अरबी भाषेत आणले. पण याचीही दखल शहांनी वा इतर कोणीही घेतली नाही. इस्लाममध्ये असहिष्णुतेच्या आणि हिंसाचाराच्या परंपरा आहेत, त्यांची दखल घेतली पाहिजे याबद्दल शंकाच नाही; पण त्याचबरोबर ज्ञानाच्या अनेक क्षेत्रांत अरब संशोधक- अभ्यासकांनी जागतिक पातळीवर दिलेले योगदान मात्र पूर्णपणे दुर्लक्षित राहावे, ही अजाणता घडलेली घटना आहे असे म्हणता येणार नाही. ग्रीक भाषेतील ज्ञानभांडार अरब अभ्यासक/ संशोधकांनी अरबी भाषेत अनुवादित केले व त्यामार्गाने ते युरोपमध्ये गेले. यावर रॉम लँडो या पाश्चात्त्य अभ्यासकाने फार मार्मिक टिप्पणी केली आहे. 

त्याने म्हटले आहे की, The Story of Philosophy was discovered by the Muslims and then transmitted to the west, provides one of the most fascinating chapters in the book of mankind's progress from ignorance to enlightenment (Islam the Arabs, Page 165-195). आज शहा आणि हमीदभाई दोघेही हयात नाहीत, मात्र सत्यशोधक चळवळीवरचा त्यांच्या विचारांचा प्रभाव अजूनही शिल्लक आहे. प्रश्न इतकाच आहे की, हा प्रभाव चळवळीच्या प्रगतीच्या दृष्टीने योग्य होता का- या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी द्यावे लागते. प्रा.शहा विचारवंत होते. शिक्षणक्षेत्राचाही त्यांना अनुभव होता. परंतु इस्लामचा अभ्यास करताना ते नकारात्मक दृष्टिकोन का स्वीकारतात, या प्रश्नाचे उत्तर मला तेव्हाही मिळाले नाही आणि आजही मिळत नाही. पण तरीही ते धर्मवादी (Communal) होते, असे म्हणता येणार नाही. 

आधुनिक मूल्यांवरील त्यांची निष्ठा, वैज्ञानिक दृष्टिकोन, मुस्लिम समाजविषयीची त्यांची आस्था याविषयी कुणालाही शंका घेता येणार नाही. माझा विरोध त्यांच्या इस्लामविषयक नकारात्मक दृष्टिकोनाला आहे, कारण तो दृष्टिकोन वस्तुदर्शी नाही. प्रा.शहांपासून सुरू झालेला मुस्लिम सत्यशोधक चळवळीचा हा वैचारिक वारसा हमीदभार्इंना मिळाला आणि त्याच मार्गाने तो संपूर्ण चळवळीच्या आचार- विचारांत भिनला. त्यामुळे कुठल्याही विषयावर मुक्त चर्चा करणे ही या चळवळीची परंपरा कधीच झालेली नाही. ज्यांनी या प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न केला, त्यांना प्रत्यक्षाप्रत्यक्ष बाहेरचा मार्ग दाखविण्यात आला. त्यामुळे चळवळ गतिशील झाली नाही. हमीदभार्इंचे पुण्यातील समाजवादी हितचिंतक याबाबतीत काही मार्गदर्शन करू शकले असते, परंतु त्यांना इस्लामी परंपरा आणि इतिहास याविषयी काहीच माहिती नव्हती. हमीदभाई व त्यांची चळवळ याविषयी आस्था असूनही ते त्यांच्याशी चर्चाही करू शकत नव्हते. अशा परिस्थितीत मुस्लिम समाजातील पुरोगामी चळवळीचे आद्य प्रवर्तक म्हणून त्यांचे कौतुक करण्याचा मार्गच त्यांना अधिक योग्य वाटला. 

(क्रमश:) 

हमीद दलवाई यांचे ‘विचार व कार्य’ यांची कालसुसंगतता अधोरेखित करून त्यांना नव्याने उजाळा देण्याचे काम साधना ने मागील पाच वर्षांत सातत्याने केले आहे. मात्र हमीदभाईंच्या विचारकार्याची चिकित्सा करून वेगळी बाजू मांडू पाहणारा दीर्घ लेख, त्यांचे एके काळचे सहकारी अब्दुल कादर मुकादम यांनी लिहिला आहे. त्या लेखाचा पहिला भाग मागील अंकात प्रसिद्ध केला आहे, तिसरा व अखेरचा भाग पुढील अंकात प्रसिद्ध होणार आहे.

...संपादक 

हेही वाचा :

मुस्लिम सत्यशोधक चळवळीची अर्धशतकी वाटचाल (भाग 3) : अब्दुल कादर मुकादम 

Tags: अ भि शहा नरहर कुरुंदकर हमीद दलवाई भारतीय मुस्लिम अब्दुल कादर मुकादम मुस्लिम सत्यशोधक चळवळ narhar kurundkar a b shaha muslim reforms dalwai and abdul kadar mukadam abdul kadar mukadam on muslims 50 years of muslim satyashodhak samaj muslim satyashodhak samaj hamid dalwai weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अब्दुल कादर मुकादम,  मुंबई
arumukadam@gmail.com

मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे माजी सचिव व ज्येष्ठ कार्यकर्ते 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात