डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

जीवनासाठी शिक्षण कसे निर्माण करावे?

मित्रांनो, याहून प्रत्ययकारी वाक्य मी शिक्षणाबाबत वाचलेले नाही. जीवन हेच शिक्षण! बाकी सगळे कृत्रिम! जीवन हेच शिक्षण असेल, तर गाव किंवा शहर हीच शाळा! गावामधील जो समाज आहे, त्या समाजामध्ये जी जी कर्तव्ये आहेत, कामे चालतात, ते शेती करणे असो, की गायी सांभाळणे असो, की स्वयंपाक करणे असो, सुतारकाम करणे असो, मोबाइल फोन व कॉम्प्युटर दुरुस्ती असो- ही सगळे कर्तव्यकर्मे करता करता आपोआपच शिक्षण होते. गाव हीच शाळा, जीवन हेच शिक्षण. जीवन आणि शिक्षण यांना वेगवेगळे करणे अयोग्य आहे. आज शिक्षण म्हणजे जणू काही जीवनाची चाललेली केवळ पूर्वतयारी. वस्तुत: शिक्षक, शिक्षणसंस्था व शाळा यांच्या सोयीसाठी बनविलेले हे विभाजन आहे. म्हणून इवान इलीच  यांनी 1970 च्या दशकात ‘डी-स्कूलिंग सोसायटी’ अशी कल्पना मांडली.
 

शिक्षणाचे रोगनिदान

आजचे शिक्षण माणूस घडविणारे आहे का? डॉक्टर असल्यामुळे मला सवय अशी, की कोणत्याही प्रश्नाचा विचार रोगनिदानाने करायचा. रोगनिदान करायचे असले तर आम्ही डॉक्टर रोग्याला आधी काही प्रश्न विचारतो. डोके दुखते का? किती दिवसापासून दुखते? उलट्या होतात का, ताप येतो का? शिक्षणाच्या बाबतीतही काही अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांनी मी सुरुवात करतो.

महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावी जा, गावाच्या बाहेर सगळ्यांत जास्त पाट्या कसल्या दिसतात? तर गावामध्ये चाललेल्या कोचिंग क्लासेसच्या आणि वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांच्या! त्यांच्या विद्यार्थ्यांच्या यशाचे मोठे मोठे फलक झळकलेले दिसतात. त्यांच्या यशस्वी विद्यार्थ्यांची भली मोठी छायाचित्रे, अमुक हा आयआयटीत गेला, हा वैद्यकीय शिक्षण घेणार आहे, हा गुणवत्ता यादीत झळकला इत्यादी. गावामध्ये प्रवेश करताना शिक्षणसंस्थांच्या यशाच्या पाट्यांनी स्वागत होते, पण गावात गेल्यावर रस्त्यांवर, चौकांमध्ये, पानठेल्यावर बेरोजगार तरुण मुलांचे रिकामटेकडे जथ्थे दिसतात. हा मोठा विरोधाभास आहे.

शिक्षण हा आज भारतातील सगळ्यांत मोठा उद्योग झाला असावा! शेती सोडली तर सगळ्यांत जास्त तरुण मुले आणि माणसे व्यग्र आहेत, गुंतलेली आहेत; असा भारतातील सगळ्यांत मोठा उद्योग बहुधा शिक्षण हाच असेल. एमपीएससी-यूपीएससीच्या परीक्षांची तयारी करून घेणारे वर्ग जागोजागी चालताना दिसतात. सहज चौकशी केली, तर महाराष्ट्रात पाच ते सहा लक्ष युवक-युवती या परीक्षांची तयारी वर्षानुवर्षे करतच असतात असे कळाले. आई-वडील खेड्यात राहतात. मुलगा जिल्हाधिकारी होण्याचे शिक्षण घेतो आहे, असे त्यांना सांगण्यात येते. हाही बिचारा श्रम करत असतो, अभ्यास करत असतो. कोचिंग क्लासेस लावतो. वर्षानुवर्षे उत्तीर्ण होत नाही. आणि समजा झाला उत्तीर्ण तरी एमपीएससीची पदे किती भरण्यात येतात? मिळालेल्या माहितीनुसार वर्षाला सर्व मिळून दोनशे-तीनशे पदे भरण्यात येतात. सहा लक्ष मुले तयारी करतात आणि दोनशे-तीनशे मुले नोकरीला लागतात, म्हणजे 0.05 टक्का! उरलेल्या 99.95 टक्के तरुणांचे काय होणार? हजारामध्ये एक या प्रमाणातदेखील संधी नसलेल्या या शिक्षणामध्ये महाराष्ट्रातील पाच लक्ष युवा वर्षानुवर्षे व्यग्र आणि व्यस्त राहावेत?

मध्यंतरी उत्तर प्रदेशच्या पोलीस विभागामध्ये कॅरिअर- निरोप कॅरी करणारा- पोलीस विभागातला पोस्टमन असे समजा, या पदाची जाहिरात निघाली. एकशे शहाऐंशी पदांसाठी चार लक्ष अर्ज आले! त्या चार लक्ष अर्जांमध्ये दोनशे पीएच.डी. होते. हे पाहता, आजच्या शिक्षणामध्ये काहीतरी गंभीर गफलत होते आहे असे वाटत नाही का?

विद्यापीठांनी उत्तीर्ण होण्यासाठी किमान पस्तीस टक्के गुणांची अट ठेवली आहे. (आता कोरोनाकाळात तर सर्वच उत्तीर्ण मानले जातात.) एखादा विद्यार्थी पस्तीस टक्क्यांवर कसा काय उत्तीर्ण होतो? समजा, मी डॉक्टर म्हणून उपचार करतो आहे. माझे फक्त पस्तीस टक्के रुग्ण जगले म्हणजे पासष्ट टक्के मेले, तर तुम्ही माझे काय कराल? तुम्ही मला फाशी द्याल. पण शिक्षणाने, विद्यापीठाने आणि शिक्षण मंडळाने अतिशय सोईस्कररीत्या स्वत:लाच मुळी पस्तीस टक्क्यांवर उत्तीर्ण करून घेतले आहे. ‘गोल’- पोस्ट इतकी खाली ठेवलेली आहे, की वस्तुत:, अख्खी शिक्षणव्यवस्था ही पासष्ट टक्के नापास होते आहे. परिणाम काय होतो? जेव्हा अशी आपण ‘गोल’- पोस्ट कमी उंचीवर ठेवतो, तेव्हा शिक्षणाचा दर्जा घसरतो. तुम्ही वर्तमानपत्रांत कदाचित आकडेवारी वाचली असेल. भारतीय विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेले फक्त तेरा टक्के इंजिनिअर हे नोकरी-व्यवसाय करण्यासाठी पात्र आहेत. आवश्यक कौशल्ये फक्त तेरा टक्के इंजिनिअर्सना येतात. म्हणजे सत्याऐंशी टक्क्यांना येत नाहीत. मग अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये काय घडते? तरीही ही महाविद्यालये कशी चालतात? ती विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क कसे काय घेतात? विद्यापीठाची परीक्षा असो की बारावीची परीक्षा. त्यांचे प्रमाणपत्र घेऊन मुले बाहेर येतात, तेव्हा त्यांना पुढे कुठल्याही चांगल्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांना त्यासाठी परत दुसऱ्या प्रवेश परीक्षेची तयारी करावी लागते. हे कशाचे लक्षण आहे?

शिक्षण व्यवस्था - एक फसवणूक?

भारतात डॉक्टर कमी आहेत. खेडोपाडी डॉक्टर नाहीत. आणि तरी या देशातील जेवढे डॉक्टर एमबीबीएसची परीक्षा देऊन बाहेर पडतात त्यातील अर्ध्याहून जास्त तरुण डॉक्टर्स पुढे वर्ष-दोन वर्षे फक्त पुढच्या शिक्षणासाठीच्या प्रवेश परीक्षेची तयारी करत राहतात! त्यासाठी कोचिंग क्लासेस निघालेले आहेत. गंमत बघा, तो डॉक्टर एमबीबीएस उत्तीर्ण झाला म्हणजे त्याला अक्षरश: रुग्णाच्या जगण्यामरण्याचा निर्णय घेण्याचा, औषधे देण्याचा आणि उपचार करण्याचा अधिकार मिळाला. कायदेशीर आणि शास्त्रीय अधिकार मिळाला. पण, त्याला पदव्युत्तर प्रवेश परीक्षेसाठी कोचिंग क्लास लागतो! म्हणजे त्याला स्वतःला अभ्यास करता येत नाही, आणि म्हणे तो रुग्णांना वाचवणार आहे! इथे समाजात काम करायला डॉक्टर नाहीत आणि देशातील पन्नास हजार तरुण डॉक्टर फक्त पदव्युत्तर प्रवेश परीक्षेची तयारी करत आहेत!

‘द इकॉनॉमिस्ट’ हे जगातले अतिशय प्रतिष्ठित असे नियतकालिक! त्यामध्ये मुखपृष्ठ कथा आली. जगभर सध्या असा प्रवाह आहे की, पदवी-पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर इंटर्नशिप किंवा ॲप्रेंटिसशिप करावी लागते. हे जगभरच आहे. माझ्या मनात प्रश्न असा आला, की चार वर्षे व्यावसायिक प्रशिक्षण घेतल्यानंतर जर तुम्हांला अजूनही उमेदवारी (ॲप्रेंटिसशिप) करावी लागत असेल, तर मग चार वर्षे विद्यापीठात काय करीत होता? तसेच पुढचे शिक्षण असो की नोकरी, सगळ्यांसाठी आपण स्पर्धा परीक्षा घेतो. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की आपल्या मुलांच्या हातांत असलेली पदवी, मग ती विद्यापीठाने दिलेली असो की परीक्षा मंडळाने दिलेली; तिच्यावर आमचा अविश्वास आहे. उच्च शिक्षणाच्या सर्वोच्च संस्था या विद्यापीठांनी दिलेल्या पदवी प्रमाणपत्रांवर विश्वास ठेवत नाहीत. अशा वेळी माझ्या मनात अतिशय कठोर प्रश्न येतो, की एखाद्या पालकाने किंवा विद्यार्थ्याने ती पदवी देणाऱ्या विद्यापीठावर कलम चारशे वीसची (फसवणुकीची) केस का करू नये? की, तुम्ही मला एक प्रमाणपत्र दिले, पण त्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाशी संलग्न संस्थाही या प्रमाणपत्रावर विश्वास ठेवत नाहीत. याचा अर्थ असा, की विद्यापीठाने मला फसवले!  

शिक्षण हा एक प्रचंड मोठा फसवणुकीचा कारभार सुरू आहे का, अशी मला शंका येते. शिक्षणाचा हक्क (राइट टु एज्युकेशन) आहे, पण योग्य शिक्षण (राइट एज्युकेशन) आहे का? जीवनाच्या गरजेनुसार, विद्यार्थ्याच्या कुवती किंवा क्षमतेनुसार आणि आजूबाजूच्या परिसरानुसार शिक्षण आहे का? की कुणातरी अभ्यासक्रम समितीने काल्पनिक अभ्यासक्रम ठरवून त्यानुसार शिक्षण दिले जात आहे?

जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांपैकी एक हार्वर्ड विद्यापीठ आहे. तसेच वॉशिंग्टनजवळ बाल्टीमोरला मेडिसिन व पब्लिक हेल्थच्या क्षेत्रामध्ये जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी आहे. एके काळी मी या विद्यापीठात शिकलो आहे. नुकतेच, लागोपाठ दोन वर्षांत मला महात्मा गांधीजींवर व्याख्यान देण्यासाठी या विद्यापीठांकडून निमंत्रणे आली. दोन्ही ठिकाणी भाषणापूर्वी मी जवळपास शंभर विद्यार्थ्यांबरोबर तासभर बसलो. ते सगळे मास्टर्स किंवा पीएच.डी. झालेले किंवा होऊ घातलेले विद्यार्थी होते. त्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला मी विचारले, ‘‘पीएच.डी.चे प्रमाणपत्र घेऊन निघाल्यानंतर काय करणार आहेस?’’ तुम्हांला सांगतो, त्या दोनशे विद्यार्थ्यांपैकी फक्त एक अपवाद वगळता, इतर एकशे नव्याण्णव जण म्हणाले, ‘‘आम्हांला माहीत नाही!’’ या दोन शिक्षणसंस्था जगातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक जागा आहेत. पण तिथे उच्च शिक्षण घेऊन निघणारे म्हणत होते, की या मिळालेल्या शिक्षणाचे काय करणार हे आम्हांला माहीत नाही. ते सगळे अंधारात चाचपडत होते. या शिक्षणाचे करायचे काय हेच त्यांना कळत नव्हते! माझ्या लक्षात आले, शिक्षणसंस्था बरीच माहिती ज्ञान म्हणून देतात, काही कौशल्येही देतात, पण या शिक्षणाचे काय करू याचा हेतू, उद्दिष्ट व ध्येय त्या देऊ शकत नाहीत.

अशा प्रकारच्या एका व्यापक शिक्षण व्यवस्थेत आज आपण आहोत.

ऑक्सफर्ड विद्यापीठाने एक अभ्यास केलेला आहे. वर्ष 2050 मध्ये कामाचे काय होणार? जॉब किंवा काम ही जी संकल्पना आहे, 2050 मध्ये त्याची काय स्थिती राहील? त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांनी दाखविलेले आहे की, विज्ञानाची जशी प्रगती होते, तसा समाज बदलतो आहे. यंत्रे येत आहेत, कॉम्प्युटर्स येत आहेत, कृत्रिम बुद्धिमत्ता येते आहे. त्यामुळे 2050 पर्यंत काही कामे, नोकऱ्या नामशेष होतील किंवा अतिशय कमी होतील. तर काही कामे वाढतील. टंकलेखकाचे (टायपिस्टचे) काम संपले आहे. प्रत्येक जण स्वत: वर्ड प्रोसेसिंग करेल. यापुढे वाहनचालकांच्या नोकऱ्या जातील, ड्रायव्हरलेस कार येत आहेत. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सकडून रोगनिदान सुरू झाल्यावर डॉक्टर कमी होणार. शिक्षकांच्याही नोकऱ्या संपणार. जो शिक्षक वर्गामध्ये निव्वळ माहिती देतो, त्याची गरजच काय? त्यापेक्षा गुगल अधिक चांगले काम करेल. ‘खान ॲकॅडमी’ नावाची एक व्हर्च्युअल ॲकॅडमी आहे. हिचा संस्थापक हा सलमान खानच, पण अमेरिकेत असलेला भारतीय इंजिनिअर. अमेरिकेत त्याच्या पुतण्यांना गंमत म्हणून घरी फिजिक्स शिकवत होता. पुतण्या म्हणाला, ‘‘चाचा आप बहुत अच्छा सिखाते हो.’’ पण त्याची बदली झाली दुसऱ्या गावात, तरी पुतणे त्याच्या मागे लागले की, तुम्हीच शिकवायचे. म्हणून तो त्यांना ई-मेलने किंवा इंटरनेटवर आपले टेप केलेले लेसन्स पाठवायला लागला. हळूहळू त्याची ती शैक्षणिक सत्रे विकसित झाली. त्याची ‘खान ॲकॅडमी’ झाली. यूट्यूबवर ‘टेडेक्स’ कार्यक्रमात बिल गेट्‌सने या सलमान खानची मुलाखत घेतली आहे. सुरुवातीलाच बिल गेट्‌स जाहीरपणे सांगतो की, माझी दोन्ही मुले खान ॲकॅडमीत शिकतात! आता कल्पना करा, की गुगलवर, यूट्यूबवर अशी सत्रे उपलब्ध होऊ लागली आणि त्यावरून मुले शिकू लागली तर शिक्षक कुठे असणार?

जेथे फक्त तेरा टक्के इंजिनिअर व्यावसायिक कौशल्ये असलेले निघतात, जेथे डॉक्टरांना स्वत: अभ्यास करण्याचा आत्मविश्वास नाही, जेथे पीएच.डी.नंतरही कळत नाही की पुढे आपण काय करणार, जेथे जवळपास कुणीच अनुत्तीर्ण होऊ नये यासाठी किमान गुणांची पातळी अगदी खाली ठेवली जाते, तेथे कुणीही विचारेल, की शिक्षणसंस्था चालतात कोणासाठी? शिक्षणासाठी चालतात, विद्यार्थ्यांसाठी चालतात, की या सर्व शिक्षक-प्राध्यापकांसाठी चालणाऱ्या रोजगार  हमी योजना आहेत?

विद्यापीठे कशासाठी?

‘द इकॉनॉमिस्ट’ची दुसरी मुखपृष्ठ कथा ही आहे, विद्यापीठे चालतात कोणासाठी? त्यांनी अनेक मुलाखती घेऊन निष्कर्ष काढला, की पालकांसाठी विद्यापीठे चालत नाहीत, किंबहुना पालकांना आपल्या मुलांना शिक्षणात काय मिळते- यात स्वारस्य नाही, तर त्यांना मुलांची कटकट घरात नको आहे! पौगंडावस्थेतील मुले फार त्रासदायक असतात. घरात त्रास देण्यापेक्षा विद्यापीठात जा, असे पालकांना वाटते. विद्यार्थ्यांना विद्यापीठातील शिक्षणात स्वारस्य नाही. त्यांना रोमान्स करणे, कँटीनमध्ये जाणे, चित्रपट बघणे यामध्येच स्वारस्य आहे. ते आपले ‘गुड अँड हॅपी टाइम’साठी विद्यापीठात जातात. शिक्षकांनाही शिकवण्यात स्वारस्य नाही. त्यांना प्रायव्हेट कोचिंग किंवा संशोधन प्रकल्प यांत रस आहे. शिक्षण पूर्ण केल्याची प्रमाणपत्रे घेऊन जेव्हा तरुण नोकरी मागायला जातो, तेव्हा नोकरी देणाऱ्या कंपन्यांचे काय म्हणणे असते? ते म्हणतात, ‘‘विद्यापीठांनी त्याला काय शिकवले याच्याशी आम्हांला काहीही देणेघेणे नाही. आम्ही एवढेच बघतो की, तो कोणत्या विद्यापीठातून आला. कारण प्रतिष्ठित विद्यापीठात हुशार मुले निवडली जातात हे आम्हांला माहीत आहे. आमचे आयते काम ते करतात. फक्त हुशार मुलांची निवड करण्यासाठी म्हणून आम्ही विद्यापीठाचे प्रमाणपत्र वापरतो.’’ असे असल्याने प्रश्न पडतो की विद्यापीठे चालतात कोणासाठी? पूर्ण शिक्षणव्यवस्था चालते कशासाठी, असा प्रश्न आजची अर्थव्यवस्था गंभीरपणे विचारायला लागलेली आहे. म्हणूनच कदाचित शिक्षकांच्या नोकऱ्या संपतील- असा अंदाज ऑक्सफर्डच्या अभ्यासाद्वारे बांधला जात आहे.

एका नावाड्याची गोष्ट,  लहानपणी चांदोबामध्ये प्रत्येकाने वाचली असेल. एक मोठा पंडित होता. पंडिताला नदी पार करायची होती. नावाडी त्याला घेऊन निघतो. पंडित त्याला विचारतो, ‘‘का रे, तू तत्त्वज्ञान शिकलास का?’’ नावाडी म्हणतो, ‘‘नाही साहेब, तत्त्वज्ञान नाही शिकलो?’’ विद्वान म्हणाला, ‘‘म्हणजे तुझे पंचवीस टक्के आयुष्य वाया गेले! गणित तरी शिकलास का?’’ ‘‘नाही?’’ ‘‘मग अजून पंचवीस टक्के आयुष्य वाया गेले.’’ अशी प्रश्नोत्तरे सुरू होती. नावाड्याचे नव्वद टक्के आयुष्य वाया ठरले होते. होडी नदीच्या मध्यावर पोहोचली होती. तेवढ्यात जोराचा वारा वाहू लागला. नदीच्या पात्रात खळबळ वाढली. नाव डोलायला लागली. पंडित म्हणाला, ‘‘आता कसे रे?’’ नावाडी म्हणाला, ‘‘तुम्हांला पोहता येते का?’’ पंडित उत्तरला, ‘‘नाही, पोहता येत नाही.’’ नावाडी म्हणाला, ‘‘मग तुमचे तर शंभर टक्के आयुष्य वाया गेले!’’

शिक्षणाच्या बाबतीत आजची अवस्था ही अशी गंभीर आहे. जीवनाच्या वादळामध्ये आपण शिक्षण दिलेले विद्यार्थी टिकू शकत आहेत का, आपण दिलेले शिक्षण कसोटीला पारीत होते आहे का, आणि ते जर होत नसेल तर आपले शिक्षण तर शंभर टक्के वायाच गेले!

विनोबांचे ‘शिक्षण विचार’ हे पुस्तक वाचले आहे? या पुस्तकासारखे शिक्षणावरील अद्भुत पुस्तक मी वाचलेले नाही. ‘शिक्षण विचार’ या पुस्तकामध्ये विनोबांनी साठ-सत्तर वर्षांपूर्वी शिक्षणाचे रोगनिदान केलेले आहे. दुर्दैवाने ते आजही लागू आहे, कदाचित जास्तच लागू आहे- ही आपली शोकांतिका आहे. विनोबाजी म्हणतात, ‘‘आपण जीवनाची विभागणी अशी करून टाकली आहे, की आयुष्याची पहिली पंधरा-वीस वर्षे फक्त शिक्षण, शालेय शिक्षण, कॉलेजचे शिक्षण, पण फक्त शिक्षण! त्यात जीवनाला काही संधीच नाही. एकदा ते शिक्षण घेऊन बाहेर पडला आणि जर काही कुठे काम मिळाले तर मग फक्त कमाई आणि कमाईच. तेथेही शिक्षणाचे कामच नाही.’’ विनोबा म्हणतात, ‘‘निर्जीव शिक्षण आणि निर्बुद्ध जीवन अशी आपण जीवनाची विभागणी करून टाकली आहे.’’

मन, मेंदू, व मनगटाचे शिक्षण

मग पर्याय काय? उपाय काय? काही पर्यायी शिक्षण-विचार आहे का? प्रयोग आहेत काय? अनुभव काय आहे?

गांधीजी आणि विनोबा यांनी सुरू केलेल्या शिक्षणपद्धतीला ‘नयी तालीम’ म्हणतात. मी त्याच शाळेत शिकलो. शिक्षण केवळ शाळेच्या चार वर्गांमध्ये दिलेले पुस्तकी शिक्षण किंवा नुसती माहिती नाही तर ‘हेड, हार्ट, अँड हँड्‌स’- बुद्धी, हृदय आणि हात यांचा विकास करणारे शिक्षण मिळाले पाहिजे. या तिन्हींचा विकास झाला पाहिजे, ही ‘नई तालीम’ची एक वैचारिक मान्यता. दुसरे- शिक्षण हे देता येत नाही किंवा घेताही येत नाही, तर शिक्षण हे घडते. विनोबा म्हणतात की, शिक्षण ही काय वस्तू आहे, की जी एकाने दिली आणि दुसऱ्याने ती घेतली? उदाहरणार्थ, जेवण देता येते, पण पोषण देता येते का? स्वयंपाक करणारा जेवण वाढू शकतो, जेवणारा आपल्या हाताने तोंडातही घालू शकतो, पण तोंडात घातलेले पोटात जाते, आतडीत पचते, ते रक्तामध्ये शोषले जाते, ते शरीराला लागते, तेव्हा त्याला आपण पोषण म्हणतो. पोषण देता येत नाही, ते घडते! तसेच शिक्षण देता येत नाही, ते घडते. सभोवतालचा समाज, निसर्ग आणि मी, यांच्या बाबतीत जे प्रत्यक्ष अनुभवजन्य ज्ञान मिळते, त्यातून हे शिक्षण घडते. यातील पुढचे तत्त्व असे की, शिक्षण केवळ अभिजन वर्ग, उच्च वर्ग, बुद्धिजीवी वर्ग यांची मक्तेदारी नाही. गांधींचे तत्त्व असे, की शिक्षण हे सार्वत्रिक व्हायला पाहिजे. खेड्यातील गरिबांतील गरीब आणि वंचितांतील वंचित अशा सर्व मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे. केवळ मुलांनाच नव्हे, तर प्रौढांनाही आणि तेही आयुष्यभर शिक्षण मिळायला पाहिजे. युनिव्हर्सल एज्युकेशन थ्रुआउट लाइफ!

दक्षिण आफ्रिकेतील फिनिक्स व टॉलस्टॉयवाडी आश्रमामध्ये सत्याग्रहींच्या मुलांना शिकवण्याची जबाबदारी अचानक गांधीजींवर आली. तिथे त्यांचे शिक्षणाविषयीचे विचार आकार घ्यायला लागले. पुढे त्यांनी अहमदाबादला ‘गुजरात विद्यापीठ’ स्थापन केले. नंतर वर्ध्याला पहिली ‘नयी तालीम शिक्षण परिषद’ घेतली. त्या प्रसंगी भारतासाठी शिक्षणव्यवस्था कशी असावी या विषयी गांधींजींनी आपले विचार मांडले. त्या विचारांवर आधारित शिक्षणव्यवस्थेला म्हणतात ‘नयी तालीम’. मी अनुभवलेले हे नयी तालीमचे शिक्षण कसे होते?

गांधींजींची मान्यता अशी, की ‘नयी तालीम’ शिक्षणामधून विद्यार्थी आणि शिक्षक दोन्ही स्वावलंबी व्हायला पाहिजेत. अन्यथा ते कायमच सरकारी अनुदानावर अवलंबून राहतील आणि सरकार बदलेल तसे धडे बदलतील. इतिहासातील नायक-खलनायक बदलतील. तसे व्हायला नको असेल तर शिक्षण शासकीय हस्तक्षेपापासून मुक्त व म्हणून स्वावलंबी हवे. त्यासाठी या शाळेमध्ये दररोज तीन तास उत्पादक काम करायला लागायचे. उत्पादक कामामधून शिक्षण मिळायला हवे, हा आग्रह होता. ते कसे घडायचे?

मी आठवीत असताना मला एक शेतीचा तुकडा दिला गेला. या शेतीमध्ये काय पेरायचे, कशी शेती करायची, हे मी ठरवायचे होते. मी माझ्या शेतीत वांगी लावली. पण वांग्याची रोपे काही वाढेनात. मी एका प्रगत शेतकऱ्याकडे गेलो. त्यांना विचारलं. ते म्हणाले, ‘‘झाड वाढायला नायट्रोजन लागते.’’ आता नायट्रोजन कुठे मिळते? शिक्षक म्हणाले, ‘‘रसायनशास्त्र वाच.’’ नायट्रोजन हे युरियामध्ये असते हे कळले. युरिया कुठे मिळेल? शेजारी गोशाळा होती. मी गोशाळेतून बादल्या भरून गोमूत्र घेऊन येत असे आणि माझ्या वांग्यांच्या झाडांना टाकत असे. माझे शरीरश्रमही झाले, शरीर बळकट झाले. वनस्पतिशास्त्र व रसायनशास्त्र शिकलो. शेती शिकलो. आपल्याला पडलेला प्रश्न सोडवायला वाचन करणे किंवा तज्ञांचा सल्ला घेणेही शिकलो. शेवटी माझी वांग्यांची झाडे सहा-सात फूट उंचीची झाली! एक वांगे पावणेदोन किलोचे निघाले. शिक्षक म्हणाले, ‘‘बाजारात जाऊन वीक.’’ मी बाजारात गेलो विकायला तर कोणीच घेईना. सगळे म्हणाले, ‘‘अहो, पावणेदोन किलोचे वांगे म्हणजे घरी आठवडाभर नुसतीच वांग्याचीच भाजी खावी लागणार!’’ शेवटी ते वांगे शाळेच्या मेसमध्ये वापरले. तर माझे शेतीशास्त्र, वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र, मार्केटिंग आणि शेतकऱ्याची अवस्था हे सगळे अनुभवजन्य शिक्षण हे वांग्याची शेती करताना, आठवीमध्ये झाले.

समाजामध्ये जी जी आवश्यक कामे असतात ती तुम्ही करायची. ती करता करता तुमचे शिक्षण घडणार- अशी या मागची मान्यता. जीवनामध्ये, समाजामध्ये जी आवश्यक कामे आहेत, कर्तव्ये आहेत, गरजा आहेत, त्या कुणालातरी पूर्ण कराव्या लागतात. आपल्या समाजाने सोईस्कररीत्या ते काम खालच्या वर्गाच्या लोकांना देऊन टाकले किंवा ते काम करणाऱ्यांना खालच्या दर्जाचे म्हटले. गांधीजींनी आपल्या शिक्षणव्यवस्थेत एका फटक्यात, श्रम करणारा आणि बुद्धिवंत यांच्यातील अंतरच मिटवून टाकले. कर्म आणि शिक्षण यांच्यातील अंतर मिटवून टाकले. ते करताना भारतीय समाजरचनेतील कामानुसार उच्च-नीच श्रेणी हा वर्णभेद, जातिभेद मिटवून टाकण्याची किल्ली त्यांनी आपल्या हाती दिली. समता ही प्रत्यक्ष जगण्यात आणली. आणि हे करताना शिक्षणही मिळाले. ते शिक्षण ‘हेड, हार्ट अँड हँड्‌स’ तिन्हींमधून प्राप्त झाले.

जीवनहेतू उमगला

समाज म्हणजे काय, हे विद्यार्थ्यांना कळावे म्हणून त्या शाळेचे आम्ही सर्व विद्यार्थी दरवर्षी दहा दिवस भूदान पदयात्रेवर जात असू. खेड्यापाड्यांमध्ये पायी फिरायचे. डोक्यावरती ओझे, थंडीचे दिवस, घोंगडे घेऊन फिरावे लागायचे. रोज पाच-सहा मैल चालत एका नव्या गावात जायचे. दवंडी द्यायची, गावकऱ्यांची सभा घ्यायची. शेतमजुराची गरिबी कशी आहे, म्हणून मग शेतकऱ्याने शेतमजुराला भूमिदान द्यावे, असे आवाहन करायचे. यामागचा क्रांतीचा विचार, सामाजिक समतेचा विचार, शेतकऱ्याचा प्रश्न, भूमिहीन मजुराचा प्रश्न, खेड्यात शेतकरी कसा राहतो, हे सर्व समजण्याची संधी मिळायची. शेवटी आम्हांला कोणा शेतकऱ्याच्या घरी राहावे लागायचे. त्याच्या घरचे अतिशय तिखट जेवण शेतकऱ्याची बायको आम्हांला स्वयंपाक करून खाऊ घालायची. त्याची सवय नसलेले आम्ही तोंड ‘सूंसूं’ करत पुढच्या गावाला, पुढची पदयात्रा! भारतातील खेडी कशी जगतात याचे कविकल्पित वर्णन नाही, तर ते स्वत:च प्रत्यक्ष जगण्याचा अनुभव, समाजाचा अनुभव देखील या शाळेत मिळायचा!

परिणाम काय झाला? थोडेसे व्यक्तिगत सांगतो. वर्ष 1963-64 होते. वयाच्या चौदाव्या वर्षी मी आणि माझा भाऊ अशोक सायकलने चाललो होतो. वर्ध्याजवळच्या पिपरी नावाच्या एका खेड्याजवळून जात होतो. दम घ्यायला थांबलो. माझा भाऊ मला म्हणाला, ‘‘अभय, आपण आता मोठे झालो. आपण जीवनात काय करायचे ते ठरवून टाकू.’’ मी म्हणालो, ‘‘हो ठरवून टाकू.’’ बाजूला खेडे होते. आम्ही भूदान पदयात्रेतून नुकतेच आलो होतो. आमचे एकमत झाले की, भारताच्या खेड्यांमध्ये शेतकऱ्याची अवस्था फार वाईट आहे. त्या वेळी भारतामध्ये अन्नधान्याची फार कमतरता होती. शेती सुधारली पाहिजे आणि मुले-माणसे आजारी दिसत आहेत. बारकी, रोगीष्ट आहेत. आरोग्य सुधारले पाहिजे. माझा भाऊ मला म्हणाला, ‘‘मी शेती सुधारतो.’’ मी म्हटले, ‘‘ठीक आहे, मी भारताचे आरोग्य सुधारतो.’’ आता तेरा वर्षांच्या मुलाला समज काय असेल याची कल्पना तुम्ही करू शकता. पण आम्ही दोन्ही भावांनी त्या दिवशी जे ठरवले, आयुष्यभर नेमके तेच केले. माझा भाऊ शेती शिकला. प्रा. स्वामिनाथन यांचा विद्यार्थी झाला. शेती शिकून तो गेली चाळीस वर्षे वर्धा जिल्ह्यामध्ये ज्यांच्याकडे ओलीत नाही अशी शेती कशी करता येईल, याचे प्रयोग करतो आहे. मी डॉक्टर बनून आयुष्यभर खेड्यातल्या आरोग्याचे काम करत राहिलो.

बघा, हार्वर्ड-हॉपकिन्स विद्यापीठांतल्या पीएच.डी. झालेल्यांना अजूनही कळत नाही की, मिळालेल्या शिक्षणाचे काय करू, या जीवनाचे काय करू. पण ‘नयी तालीम’मध्ये शिकल्यामुळे मला चौदाव्या वर्षीच माझे लाइफ मिशन सापडून गेले. ....अँड दॅट मेड ऑल द डिफरन्स!

गडचिरोली

आपण शोधत होतो, की सध्याच्या शिक्षणाला पर्याय काय असू शकतो? म्हणून ‘नयी तालीम’ची शाळा कशी होती याचे थोडेसे वर्णन केले. याचा पुढे काही उपयोग झाला का?

त्यानंतर चाळीस वर्षांनंतरचा प्रसंग. गडचिरोलीतील बालमृत्यूचे प्रमाण कसे कमी करायचे, हे आव्हान आढळले. त्या वेळी भारतामध्ये दरवर्षी 25 लाख बालमृत्यू होत होते. आम्ही दोन उपाय शोधले. प्रथम- न्युमोनियामुळे होणारे बालमृत्यू कसे कमी करता येतील हे शोधले. आता उर्वरित- सगळ्यांत जास्त म्हणजे निम्मे बालमृत्यू जन्मानंतरच्या पहिल्या एका महिन्यात होत होते. हे नवजात बालमृत्यू कमी करण्यासाठी एक शास्त्रीय पद्धत मी आखली. पुढचा प्रश्न होता की, ही खेड्यांमध्ये अमलात कशी आणायची?

एकोणचाळीस खेड्यांतील एकोणचाळीस बाया निवडल्या. त्या गावागावांतील अर्धसाक्षर बाया होत्या. त्यांना प्रशिक्षण देऊन गावाची बालरोगतज्ज्ञ बनवायचे होते. आता या शिक्षणाचे उद्दिष्ट अगदी स्पष्ट होते, गावातील बालमृत्यू कमी करणे. त्या बाईला काय काय करावे लागणार आहे आणि समाजाची गरज काय आहे, हे अगदी स्पष्ट होते. यावरून तिचा अभ्यासक्रम ठरवला. दुसरे असे, की गावाचा वास्तविक संदर्भ होता. ती ज्या गावात राहते, त्याच गावामध्ये तिला काम करायचे होते. या बायांना शिकवण्यासाठी मी ‘नयी तालीम’ची प्रत्यक्ष कर्म करून ‘अनुभवातून शिका’ ही पद्धती अवलंबिली. दर महिन्याला तीन दिवस ती बाई (तिला आम्ही ‘आरोग्यदूत’ असे नाव दिले) आमच्याकडे येणार. तिला आम्ही नवजात बाळाच्या काळजी याविषयी एक पायरी सांगणार. आता तिने ते आपल्या गावात जाऊन ते प्रत्यक्ष करायचे. महिनाभर ते केले, की परत पुढचे तीन दिवस ती आमच्याकडे येणार, अजून एक पायरी शिकणार. पायरीपायरीने तिला गावामध्ये गृहभेटी कशा करायच्या, गरोदर बाईला कसे तपासायचे- इथपासून ते नवजात बाळाचे वजन कसे करायचे, आजारपण कसे ओळखायचे, न्युमोनियाचा उपचार कसा करायचा, नवजात बाळाला इंजेक्शन कसे द्यायचे, बाळ जन्माला आले पण श्वासच घेतला नाही, रडलेच नाही तर त्याच्यावर उपचार कसे करायचे- हे सगळे वैद्यकशास्त्र तिला आम्ही तीन-तीन दिवस करत एकूण तीस दिवसांत शिकवले. ते तिने आपल्या गावात खरेखुरे कामात आणले. त्यानंतर भारतातील सगळ्यांत वरिष्ठ दहा नवजात बालरोग तज्ज्ञांकडून आम्ही या बायकांचे मूल्यांकन करून घेतले. त्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष, डॉ. मेहरबान सिंग, जे त्यावेळी एम्स (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस) दिल्लीमध्ये बालरोग विभागप्रमुख होते, ते म्हणाले- ‘‘गडचिरोलीतील या अर्धसाक्षर पण प्रशिक्षित ‘आरोग्यदूत’, यांची नवजात बाळांचा उपचार करण्याची क्षमता ही ‘एम्स’मधून निघणाऱ्या एमबीबीएस डॉक्टरांपेक्षा जास्त चांगली आहे!’’

आम्ही हा जो शिक्षण-प्रयोग केला ते शिक्षण ‘नयी तालीम’च होते. कर्म आणि ज्ञान दोन्ही सोबत होते. वीस वर्षे वर्गामध्ये बसून कागदावर शिक्षण व नंतर समाजाची गरज भागवेन, असे विभाजन नाही. कर्म करता करता ज्ञान मिळते, कर्म करण्यातून ज्ञान मिळते, ज्ञानाचे रूपांतर तत्काळ कर्मात होते आणि समाजाची एक गरजही भागते.

पुढे भारत सरकारने एक निर्णय घेतला. गडचिरोलीमध्ये यशस्वी झालेल्या या पद्धतीने बाल आरोग्य सेवा देशातील सर्व गावांमध्ये द्यायची. आम्ही या एकोणचाळीस आरोग्यदूतांना घेऊन जी पद्धत विकसित केली, तीच पद्धत आम्ही भारतातील नऊ लाख ‘आशां’साठी वापरून, त्यांनाही माता आणि नवजात बालकाची काळजी कशी घ्यायची हे प्रशिक्षण दिले. गेल्या वर्षी या प्रशिक्षित ‘आशां’नी एक कोटी नवजात बालकांना घरोघरी सेवा दिली.  ‘नयी तालीम’ काय चमत्कार करू शकते ते पाहा. हे शिक्षण नुसते एका माणसापुरते नाही, एकोणचाळीस आरोग्यदूतांपुरते नाही, तर त्याचा देशव्यापी प्रयोग होऊ शकला!

मॅकमास्टरचा प्रयोग

कॅनडामध्ये एक विद्यापीठ आहे, मॅकमास्टर विद्यापीठ. तेथे एक शैक्षणिक प्रयोग जवळपास गेली तीस वर्षे केला जात आहे. दोन हजार वर्षांपूर्वी युरोपमधे होऊन गेलेल्या हिप्पोक्रेटिस, गेलनच्या काळापासून अगदी सन 1900 पर्यंत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांना मृतदेहांची चिरफाड करून शिक्षण घ्यावे लागत होते. 1900च्या दरम्यान विल्सन ऑस्लर या डॉक्टरने जॉन्स हॉपकिन्समधे वैद्यकीय विद्यार्थ्यांना मृतदेहाऐवजी प्रत्यक्ष रुग्ण तपासून वैद्यकीय शिक्षण द्यायला सुरुवात केली. तरीही अजून पहिली दीड वर्षे फक्त मृतदेहावरच शिकवतात. त्याला प्री-क्लिनिकल ट्रेनिंग किंवा पूर्वतयारी म्हणतात. हे मृतदेहावर मिळणारे शिक्षण अतिशय मृत असतं. वस्तुत: जिवंत रुग्णांचा उपचार करण्याचं शिक्षण मृतदेहावरून का सुरू करायचं? मॅकमास्टर विद्यापीठाने ही पद्धत बदलली. वैद्यकीय शिक्षणाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना सरळ रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये पाठवले जाते. वॉर्डमध्ये जो रुग्ण असेल, त्याचा आजार पाहून त्या संबंधी वाचायचे आणि शिकायचे. त्या रुग्णावर तज्ज्ञ डॉक्टरांसोबत प्रत्यक्ष उपचार करताना अनुभव घेत शिकायचे. त्यानंतर दुसरा रुग्ण, दुसरा आजार. गंमत अशी, की त्यांचे एमबीबीएस तीन वर्षांत पूर्ण होते आणि आपल्याला साडेचार वर्षे लागतात. मी अस्वस्थ होऊन त्यांना विचारले, की तुम्ही सुरुवातीस पूर्ण शरीराची रचना (ॲनाटामी) शिकवत नाही. समजा असे झाले, की डाव्या पायाच्या करंगळीच्या टोकाचे हाड, टर्मिनल फॅलिंग्ज, त्याचा रोगी त्याने न बघितल्यास त्या हाडाची रचना कशी असते हे कदाचित तो कधी शिकणारच नाही, मग त्याचे वैद्यकीय शिक्षण अपुरे राहिले ना?  तर त्यांनी मला गमतीशीर उत्तर दिले. म्हणाले, ‘‘या सातशे बेडच्या रुग्णालयामध्ये तीन वर्षे काम केल्यानंतर, त्याला जर डाव्या पायाच्या करंगळीच्या टर्मिनल फॅलिंग्जची एकही केस मिळाली नाही, तर ते शिकण्याची गरजच नाही!’’ मी हेका सोडला नाही. म्हटले, ‘‘तरीपण, डॉक्टरच्या आयुष्यात अचानक अशी एखादी केस आलीच तर?’’ ते म्हणाले, ‘‘हो. असे घडू शकते. पण आम्ही प्रत्येकाला स्वशिक्षणाचे धडे दिले आहेत. तो गरज पडेल तेव्हा वाचू शकतोच की!’’

दुर्दैवाने आपल्या शिक्षणपद्धतीत जे शिकण्याची गरज नाही असे खूप काही अभ्यासक्रमामध्ये असते. आपण दहा-बारा वर्षे जे शालेय शिक्षण देतो, त्यात जीवनात गरज नाही असे बरेच शिक्षण देत असतो. यापेक्षा वेगळे, पर्यायी शिक्षण संभव आहे. ते शिक्षण कसे देता येते, हे मी काही उदाहरणांनी सांगितले. विनोबांनी त्यांच्या ‘शिक्षण विचार’ या पुस्तकामध्ये ‘नयी तालीम’ची तत्त्वे अतिशय उत्कृष्टपणे मांडली आहेत. त्यांचाच माझ्या बुद्धीनुसार विस्तार करून ती आपल्यापुढे मांडतो.

‘नयी तालीम’चे आधार

पहिला आधार - शिक्षण कोणाचे? तर हे शिक्षण ‘स्व’चे आहे. हा ‘स्व’ कोण? आपल्या आजच्या शिक्षणपद्धतीमध्ये अशी कल्पना आहे, की हा ‘स्व’ एक रिकामा डबा आहे. त्या रिकाम्या डब्यामध्ये म्हणजे डोक्यामध्ये माहितीचा माल टाकायचा. काही उपयोगी, काही निरुपयोगी. तो माल नीट भरला की नाही याची परीक्षा घ्यायची. ‘नयी तालीम’मधील ‘स्व’ची अशी कल्पना आहे की, हा साक्षात आत्मा आहे! तो स्वयंप्रकाशी आहे. त्यावरचं फक्त झाकण तेवढं शिक्षणाने काढायचं आहे. मायकेल अँजेलो म्हणायचा की, मी मूर्ती घडवत नाही, ती त्या दगडात आधीपासून असते. मी फक्त त्या दगडाचा अनावश्यक भाग काढतो, उरते ती मूर्ती. विद्यार्थ्यांमध्ये भविष्यातील माणूस आजही आहेच. निरुपद्रवी सालपटे बाजूला केली पाहिजेत. शिक्षकाने माळ्याची भूमिका घेतली पाहिजे. माळी बीजामधून झाड काढतो का? मग झाड कुठून येते? ते बीजात असतेच! माळी फक्त त्या झाडाला आवश्यक अशी परिस्थिती निर्माण करतो. झाड स्वत:च वाढते.

नयी तालीमचा दुसरा आधार - स्वत:ला ओळखणे म्हणजे शिक्षण. हे स्वत:ला ओळखणे कसे व्हावे? भारतीय परंपरेत अजून एक शब्द आहे, ‘स्वधर्म’. स्वधर्म म्हणजे समाजामध्ये माझे इतरांच्या प्रति असलेले कर्तव्य. समाजामध्ये स्वधर्म करता करता मला जे शिक्षण मिळते, ते नयी तालीमचे शिक्षण. विद्यार्थ्याला स्वधर्म करण्याची संधी दिली जाते. या शिक्षणप्रक्रियेत कृतिहीन ज्ञान नाही, कृतीसोबत ज्ञान जोडले आहे. स्वधर्माचे कर्तव्यकर्म ज्ञानमय होऊन जाते. येथे ज्ञानही मिळते आणि कौशल्येही. वांगेही वाढते आणि विद्यार्थ्याचे ज्ञानही!

शिक्षणाविषयी एक अतिशय सुंदर वाक्य वाचले. ‘सेल्फ इज लाइक अ रे ऑफ लाइट...!’ ‘स्व’ म्हणजे प्रकाशाचा किरण. भौतिकशास्त्र आपल्याला सांगतं की प्रकाशाचा किरण दिसत नाही. तो कोणत्यातरी अडथळ्यावर पडला, की दृग्गोचर होतो. मी कोण आहे? हा ‘मी’ आपल्याला दिसत नाही. आपण केवळ कल्पना करतो की मी असा आहे, तसा आहे. शिक्षणाद्वारे तो ‘स्व’ मला कळायला पाहिजे. - सेल्फ इज लाइक अ रे ऑफ लाइट. इट इज इन्व्हिजिबल, अन्टिल इट मीट्‌स अ चॅलेंज, ॲन ऑब्स्टॅकल. देन द सेल्फ बिकम्स व्हिजिबल टु युवरसेल्फ- शिक्षणामध्ये नेमके असेच घडते. एका सामाजिक आव्हानाला मी सामोरा जातो तेव्हा माझ्यातील क्षमता, माझ्यातील गुण, माझ्या मर्यादा, मला काय करायला आवडते, मला काय करायला जमते, माझा कल काय, माझी ॲटिट्यूड्‌स काय, माझी कुवत काय- हे सगळे मला दिसू लागते. म्हणून स्वधर्म करता करता, जे ‘स्व’विषयी ज्ञान प्राप्त होते ते शिक्षण.

तिसरा आधार - स्वधर्म करायचा कुठे? मी जिथे आहे तिथे! मी जिथे राहतो त्याला गांधींच्या परिभाषेत ‘स्वदेश’ म्हणतात. हा स्वदेश म्हणजे भारतमाता नाही. तुम्ही ज्या जागेशी बांधलेले आहात, तो समाज, ती जागा, तो निसर्ग, ते गाव, ती भूमी, त्याला स्वदेश म्हणतात. तर, स्वधर्म स्वदेशात करायला पाहिजे. ज्या समाजाचा मी भाग आहे, ज्याचे मी देणे लागतो, तिथे मी माझे कर्तव्यकर्म, म्हणजे स्वधर्म करता करता जे मला स्वत:विषयी ज्ञान प्राप्त होते, ते शिक्षण.

नयी तालीमचा चौथा आधार- या पद्धतीने शिक्षणासोबतच आर्थिक दृष्ट्या स्वावलंबन झाले पाहिजे. कारण स्वावलंबन नसेल तर जीवनामध्ये स्वातंत्र्य टिकू शकत नाही. आर्थिक परावलंबी शेवटी परतंत्रच राहणार. नयी तालीम जेव्हा स्वावलंबन देते, तेव्हा ती स्वातंत्र्यही देते. नयी तालीमद्वारा विद्यार्थ्याला काय शिकायला मिळावे? विनोबांच्या शब्दांत : योग (आत्म-अनुशासन), उद्योग (कर्म कौशल्य) व सहयोग करण्याची सामूहिक वृती मिळावी.

गांधींजींनी ही जी शाळा सुरू केली होती, या शाळेमधील पहिले शिक्षक रवींद्रनाथ टागोरांनी पाठवलेले होते. न्यूयॉर्कमध्ये पीएच.डी. झालेले व रवींद्रनाथांचे दहा वर्षे वैयक्तिक सचिव असलेले आर्यनायकम व संस्कृतमध्ये पदव्युत्तर शिक्षण झालेल्या त्यांच्या पत्नी आशादेवी येथे शिक्षक म्हणून आले होते. अशी ही शाळा गांधींजींच्या प्रत्यक्ष नजरेखाली, त्यांच्या आश्रमाच्या बाजूलाच विकसित झाली. माझी आई त्या शाळेची पुढे मुख्याध्यापिका होती. शोकांतिका अशी, की स्वातंत्र्यानंतर त्या क्रांतिकारी प्रयोग असलेल्या शाळेला महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाची मान्यता नव्हती. नयी तालीम ही शिक्षकांना परवडण्यासारखी पद्धत नव्हती. त्यांचे स्वत:चे शिक्षण झाले होते औपचारिक व्यवस्थेमध्ये. त्यात कर्मातून शिक्षण कुठे होते? त्यामुळे नयी तालीम शिक्षकांना पेलवली नाही. ती स्वतंत्र होती. म्हणून सरकारलाही पेलवली नाही. शिक्षण विभाग म्हणायचा, ही असेल गांधीजी, टागोर यांची शाळा; पण आमच्या अभ्यासक्रमाच्या चौकटीत ती नाही, म्हणून मान्यता देता येणार नाही. एके दिवशी ती शाळा बंद झाली.

अनेक वर्षांनंतर ‘आनंद निकेतन विद्यालय’ म्हणून सेवाग्राम येथे ती शाळा पुनरुज्जीवित करण्यात आलेली आहे. पण तोपर्यंत त्या शिक्षणपद्धतीचा जनक खूप पुढे गेला होता.

जीवन हेच शिक्षण

पाच-सहा वर्षांपूर्वी सेवाग्रामला एका बैठकीसाठी गेलो होतो. सकाळी नारायणभाई देसाई यांच्याबरोबर आश्रमाच्या बाजूच्या रस्त्याने फिरायला निघालो. नारायण देसाई हे गांधीजींचे पुत्रतुल्य सचिव महादेव देसाई यांचे पुत्र. गांधीजींच्या आश्रमात त्यांच्या अंगाखांद्यांवर वाढलेले. पुढे ते ‘नयी तालीम’चे मोठे आचार्य झाले. गांधीविचारांचे प्रमुख व्याख्याते झाले. ते माझे गुरू होते. त्या दिवशी त्यांनी मला एक आठवण सांगितली. म्हणाले, ‘‘मी अठरा-वीस वर्षांचा होतो. मला वाटले की, आता सेवाग्राम सोडावे. गांधींच्या छायेत मी वाढतो आहे. वाढ होणार नाही. म्हणून मी बापूंना म्हटले की, बापू मुझे सेवाग्राम छोडना है। - तर बापू म्हणाले, बहोत अच्छा! जरूर छोडो! तो फिर क्या करोगे? कल सुबह मेरे साथ घूमने चलो.’’ नारायणभाई दुसऱ्या दिवशी सकाळी गांधीजींबरोबर फिरायला निघाले. गांधींनी विचारले, ‘‘नारायण, तुम्हें क्या करना है?’’ नारायणभाई म्हणाले, ‘‘मुझे नयी तालीम का काम करना है।’’ गांधी म्हणाले, ‘‘बहुत अच्छे!! लेकिन ये जो मेरी नयी तालीम स्कूल है, ऐसा नहीं करना!’’ नारायणभाईंना काही समजले नाही! गांधींनी निर्माण केलेली नयी तालीम शाळा आणि स्वत: म्हणत आहेत की, अशी नयी तालीम शाळा करू नकोस. चकित होऊन त्यांनी विचारले, ‘‘बापू आप क्या कह रहे हैं?’’ गांधीजींचे पुढचे वाक्य अजूनच चकित करणारे होते, म्हणाले, ‘‘मेरा बस चले तो इस स्कूल को जला के राख कर दूँ।’’

नारायणभाईंनी ही घटना सांगितली त्या रात्री मला झोप आली नाही. माझ्यासाठी हा भूकंपाचा अनुभव होता. दुसऱ्या दिवशी मी नारायणभाईंना पुन्हा भेटलो. विचारले, ‘‘मला काही कळले नाही, गांधीजी असे का म्हणाले?’’ स्वत:च निर्माण केलेली शाळा आणि स्वत:च म्हणतात की, ‘इसको जलाके राख कर दूँ।’ नारायणभाईंनी स्पष्टीकरण दिले, की गांधी हा इतक्या झपाट्याने विकास करणारा डायनॅमिक माणूस होता. 1937 मध्ये त्यांनी या शाळेची कल्पना मांडली. पण पुढे नऊ वर्षांत ती शाळा विकसित होत असताना गांधींची कल्पना त्या शाळेच्या किती तरी पुढे गेली होती. ती शाळा त्या गतीने पुढे जात नव्हती म्हणून गांधींना ती शाळादेखील मागासलेली वाटायला लागली. जी शाळा त्या वेळच्या शिक्षणप्रक्रियेमध्ये किती तरी पुढे होती आणि आजही पुढे राहील, पण गांधीजी त्यापुढे निघून गेले होते.

मग गांधीना काय हवे होते?

नारायणभाईंनी मला सांगितले- गांधींचे म्हणणे होते, की गाव हीच शाळा व्हायला पाहिजे. वेगळी कोणती शाळा नावाची कुंपणभिंतीतील वास्तूच अस्तित्वात राहायला नको! हा क्रांतिकारी विचार होता. त्या काळामध्ये ‘नयी तालीम’ची व्याख्या अशी केली जायची की जीवनासाठी, जीवनाद्वारे शिक्षण म्हणजे नयी तालीम. विनोबा ‘शिक्षण विचार’मध्ये लिहितात, की ही व्याख्यादेखील मला मंजूर नाही. कारण जीवनाचे शिक्षण, जीवनाद्वारे शिक्षण यामध्ये अजूनही द्वैत आहे. जीवन वेगळे व शिक्षण वेगळे आहे. माझी व्याख्या आहे, ‘जीवन हेच शिक्षण!’

मित्रांनो, याहून प्रत्ययकारी वाक्य मी शिक्षणाबाबत वाचलेले नाही. जीवन हेच शिक्षण! बाकी सगळे कृत्रिम! जीवन हेच शिक्षण असेल, तर गाव किंवा शहर हीच शाळा! गावामधील जो समाज आहे, त्या समाजामध्ये जी जी कर्तव्ये आहेत, कामे चालतात, ते शेती करणे असो, गायी सांभाळणे असो, स्वयंपाक करणे असो, सुतारकाम करणे असो, मोबाइल फोन व कॉम्प्युटर दुरुस्ती असो- ही सगळे कर्तव्यकर्मे करता करता आपोआपच शिक्षण होते. गाव हीच शाळा, जीवन हेच शिक्षण. जीवन आणि शिक्षण यांना वेगवेगळे करणे अयोग्य आहे.

आज शिक्षण म्हणजे जणू काही जीवनाची चाललेली केवळ पूर्वतयारी. वस्तुत: शिक्षक, शिक्षणसंस्था व शाळा यांच्या सोयीसाठी बनविलेले हे विभाजन आहे. म्हणून इवान इलीच  यांनी 1970 च्या दशकात ‘डी-स्कूलिंग सोसायटी’ अशी कल्पना मांडली. ‘शाळामुक्त समाज’. समाजातून शाळा रद्द केल्या पाहिजेत. एव्हरेट राइमर तर त्याही पुढे गेला. सत्तरच्या दशकात त्याने पुस्तक लिहिले, ‘स्कूल इज डेड!’- शाळा मेली आहे. पण ती काही मेली नाही! या शिक्षणव्यवस्थेची मुळे पक्की रुतलेली आहेत.

माझ्या शिक्षक मित्रांनो! आजची ही शिक्षणपद्धती शिक्षणापासून असलेली किमान अपेक्षाही पूर्ण करीत नाही असे निष्कर्ष असलेले पाहणी अहवाल आपण अधूनमधून वाचतो. जर किमानदेखील घडत नसेल, तर या शिक्षणव्यवस्थेत गतीने परिवर्तन करण्याची, अगदी क्रांती करण्याची गरज आहे. ते क्रांतिकारी चिंतन गांधीजींनी या देशासाठी करून ठेवले आहे. त्यांनी त्याचे प्रयोगही केले. त्याचे मॉडेल्सही निर्माण केले. स्वतः गांधीजी त्याही पलीकडे जाऊ इच्छित होते.

आता आपल्याला इंटरनेट, गुगल, ॲप्स आणि मोबाइलमुळे निव्वळ माहितीसाठी शिक्षण घेण्याची गरजच उरलेली नाही. माहिती कशी शोधायची याचे शिक्षण पाहिजे. माहिती नको, माहिती हे ओेझे आहे. म्हणून शिक्षणामध्ये नव्या क्रांतीची गरज आहे किंवा ती येऊ घातली आहे. ती क्रांती जर आली नाही तर विद्यार्थी बरबाद होतीलच; पण शिक्षकही बरबाद होतील. कारण ते लवकरच आउटडेटेड होणार आहेत. तुम्ही विद्यार्थ्यांना वर्गात बसण्याची जबरदस्ती करणार असाल तर ती त्यांच्यासाठी कारावासाची शिक्षा ठरेल. ते विद्रोह करतील. करत नसतील तर त्यांनी करावा.

कोरोना विषाणूने एक उपकार केला. शाळा न भरता शिक्षण द्यायला भाग पाडले. आपण ते रडतरडत, मजबुरी म्हणून केले. वस्तुत: शालाविरहित शिक्षणाचे प्रयोग करण्याची, नवीन शिक्षणव्यवस्था निर्माण करण्याची ती एक संधी आहे. एवीतेवी शाळा भरू शकत नव्हत्या. मोबाइल फोनचा वापर करून शाळेचा तोच अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या माथी मारायच्या ऐवजी भारतातील दहा कोटी विद्यार्थ्यांना जीवन जगता जगता शिक्षण आपल्याला आखता येईल.

आपल्याला शिक्षणात एका क्रांतीची गरज आहे. जीवन हेच शिक्षण, गाव ही शाळा आणि विश्व ही प्रयोगशाळा व्हायला हवी. त्याहीपुढे जात मी म्हणेन, ‘‘विश्व ही शाळा आणि ‘स्व’ही प्रयोगशाळा व्हायला हवी.’’

(‘मन:शक्ती केंद्र’, लोणावळा येथे झालेल्या शिक्षण परिषदेत केलेल्या बीजभाषणाचा विस्तार करून हा लेख लिहिला आहे.)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. अभय बंग
search.gad@gmail.com

 'सर्च' या संस्थेमार्फत गडचिरोलीतील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा आणि संशोधन (बालमृत्यू नियंत्रणावरील संशोधन). 
 स्वतःच्या हृदयरोगावरील अनुभवकथनाचे माझा साक्षात्कारी हृदयरोग हे पुस्तक प्रसिद्ध आहे. 


Comments

 1. Bapu- 09 Sep 2021

  I have realized society behavior about Education. Best post . I like it, great work sir.

  save

 1. SIKANDAR CHANDULAL MULANI- 10 Sep 2021

  Best post sir. Go ahead

  save

 1. Medha Patkar- 22 Sep 2021

  Bahut khub.... Karmakari shiksha hi jeevandayi hoti hai.... Lekin Online shikshame karmaadhaar nahi hota, online se shikshasehi offline yane vanchit ho rahe hai samajme ajtak shoshit rahe samuday!

  save

 1. Vilas Appasaheb Bhagade- 02 Oct 2021

  खूपच छान

  save

 1. Shubham Khot- 10 Jan 2022

  खूप छान लेख आहे सर. पण सद्य परिस्थिती बघता शिक्षणाविषयी अनास्था आणखी वाढताना दिसत आहे. शिक्षणाकडे सर्वांगीण प्रगतीचा मार्ग म्हणून न बघता संपत्ती मिळवण्याचा जिना म्हणून बघितलं जात आहे. आपण यासंदर्भात आणखी मार्गदर्शन करावे अशी विनंती आहे.

  saveसाधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके