आजच्या तरुणाईला 'रोल मॉडेल्स' वाटू शकतील अशा काही नामवंतांना - व्यक्तिगत जडणघडण, जीवनविषयक दृष्टिकोन, आजच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य व स्वत:च्या कार्यक्षेत्रावर दृष्टिक्षेप, या अनुषंगाने तीन लेख लिहिण्यासाठी 'व्यासपीठ' सदरात आमंत्रित केलं जातं. या महिन्यात आम्ही आमंत्रित केलं आहे, 'आरोग्य सेने'चे संस्थापक अध्यक्ष हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य यांना...
लोकांच्या आनंदाला अपूर्व उधाण आलं होतं. हजारोंचा जनसमुदाय बेभान होऊन नाचत होता. त्यात सर्व थरांतील आणि सर्व जातिधर्मांची माणसं होती. 'एस.एम. जोशी झिंदाबाद'च्या घोषणांनी पुण्यात आकाश दुमदुमून गेलं होतं. या जनसागराच्या मधोमध एक अत्यंत उमदा, पांढरा शुभ्र घोडा प्रत्येक घोषणेच्या ललकारीबरोबर मागील दोन पायांवर उभं राहून पुढचे दोन पाय हवेत उंच फेकून झोकदार सलाम करत होता. एस.एम.च्या पुणे लोकसभा निवडणुकीत विजयाचा तो उत्सव होता. त्या गर्दीत जेमतेम सात-आठ वर्षांचा मी गुरुवार पेठेतल्या कार्यकर्त्यांबरोबर बेहोश होऊन नाचत होतो. या आनंदात आपल्या समाजवादी पक्षाचा उमेदवार निवडून आल्याचा आनंद होता, पण आपले 'एस.एम.' निवडून आल्याचा आनंद अधिक होता.
'समाजवाद म्हणजे काय' हे नीट कळण्याचं ते वय नव्हतं, पण तरीही आम्ही पोरं स्वत:ला कट्टर समाजवादी मानायचो. कारण समाजवादी पक्षच गोरगरिबांसाठी प्रामाणिकपणे लढतो एवढंच कळायचं. त्या वयात स्वत: समाजवादी व्हावसं वाटायला एवढं पुरेसं होतं. त्यामुळे समाजवादी पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात आम्ही गुरुवार पेठेतील पोरं जिवाच्या आकांतानं उतरायचो. चुन्याच्या फक्कीनं रस्ते आणि भिंती रंगवायचे. रात्ररात्र जागून सुतळ्यांना खळीनं पताका चिकटवायचो. खांबांवर चढून त्या टांगायचो. शिड्यांवर चढून पोस्टर्स लावायचो. 'ताई माई आक्का, झाडावर मारा शिक्का' म्हणत सायकल फेऱ्या काढायचो. समाजवादी नेत्यांच्या अमोघ वक्तृत्वानं खिळलेल्या सभा पाहून रोमांचित व्हायचो. सभा, पदयात्रा, मिरवणुकांना जमणारी ही गर्दी मतपेट्या फुटल्यावर बहुसंख्य वेळा कुठे गायब होते या विचारानं कासावीस व्हायचो. अशा वेळी क्वचित मिळालेल्या विजयानं बेभान व्हायला व्हायचं.
निवडणुकीतील विजय कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण तर आणतोच पण तो त्यांना अधिक घट्ट बांधतो. प्रचार मोहिमेच्या काठावरचे प्रेक्षकही विजय मिळताच श्रेयासाठी उडी मारतात. पराजयानं मात्र कार्यकर्त्यांत नैराश्य येऊ शकतं, पण त्याहीपेक्षा त्यांच्या तात्त्विक बैठकीलाच तडा जाऊ शकतो. पण तो काळच वेगळा होता. पराजयानं न डगमगता किंवा विजयानं न माजता, पाच पैशाची वा कपभर चहाची अपेक्षाही न करता पक्षासाठी लढणारे तळागाळातले कार्यकर्ते होते. हे कार्यकर्ते आठवले की आजही मन भरून येतं. इंदिरा गांधी नामक झंझावाताचा तो काळ होता. एकतर्फी विजयांमुळे मस्तवाल होत काँग्रेसची तात्त्विक घसरणही त्याच काळात सुरू झाली होती. बलाढ्य काँग्रेस आणि पोलादी इंदिराजींच्या विरुद्ध समाजवादी पक्ष दंड थोपटून उभा होता. इंदिराजींच्या 'गरिबी हटावच्या फसव्या घोषणेविरुद्ध हजारोंचे मोर्चे काढून 'इंदिरा तेरे राज में, बच्चे भूखे मरते हैं'च्या घोषणांनी सरकारला हादरवून सोडत होता. भाईंच्यासाठी, आजीचं आणि आईचं बोट धरून, अशा मोर्च्यांमध्ये मी सामील व्हायचो. आमच्याबरोबर गुरुवार पेठेतील बाया आणि पोरंही असायची. जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर निर्भयपणे संघर्ष करणारा समाजवादी पक्ष तळागाळातील जनतेला आधार वाटायचा. मीही याच लोकांमध्ये वाढलो होतो.
इयत्ता दहावीपर्यंतचं माझं आयुष्य पुण्यातील पूर्व भागातल्या गुरुवार पेठेमधील मेंदीवाल्यांच्या वाड्यात गेलं. या वाड्यापुढे पु.ल. देशपांड्यांची 'बटाट्याची चाळ' उच्चभ्रूंची वाटावी असा हा वाडा. दुमजली, मधोमध मोठा चौक असलेला, छत्तीस बिऱ्हाडांचा. सार्वजनिक नळ, संडास, मागे हातभट्टी आणि जुगारीचा अड्डा असलेला. वाड्यातलं सर्वांत मोठं, म्हणजे तीन खोल्या आणि स्वतंत्र गच्ची असणारं आमचं एकमेव घर होतं, तसंच सर्वात शिकलेलंही. बाकी वाड्यातली बिऱ्हाडं म्हणजे सुतार, गवंडी, सोनार, शिंपी, वाणी, रिक्षावाले, भाजीवाले, बिडीवाले, ड्रायव्हर; फारफार तर कामगार किंवा सरकारी हाफिसात शिपाई. वाड्यातल्या बाया सकाळी नळावर मनमुराद भांडत आणि दुपारी वाड्यातल्या गच्च्यांत भाज्या निवडीत, बिड्या वळत एकमेकींच्या सुखदुःखाच्या वाटेकरी बनत. पुरुष मंडळी संध्याकाळी कामावरून येताना बऱ्याच वेळा ढोसून येत. पण सहसा धिंगाणा न घालता, बायकांना मारहाण न करता तर्र होऊन निपचित पडून राहात. या साऱ्यांशी काही सोयरसुतक नसलेली आम्ही पोरं चौकात धुमाकूळ घालत खेळत असू. वाड्यातली प्रत्येक व्यक्ती तशी वल्लीच होती. वरच्या मजल्यावर घरासमोरची गच्ची झाडणाऱ्या खळदकरांच्या हातून, खाली राहणाऱ्या मटकीवाल्या मामीच्या घरासमोर कचरा पडला की, ती झाशीच्या राणीच्या थाटात चौकात उभं राहून कडाडायची,'ए मुडद्या, ढकल अजून कचरा माज्या दारात, मग येतेच वरती झाडू घेऊन तुला झाडायला.'
रोज सकाळी पी.एम.टी.ची बस हाकणारे आणि संध्याकाळी पणतीच्या उजेडात ज्ञानेश्वरी वाचणारे खळदकर या हल्ल्यानं विचलित न होता तिला म्हणायचे, 'मामी, शांत व्हा. अजाणतेपणाने प्रमाद करून संतापल्यानं, त्या रागाच्या भवसागरात तुंबलेल्या माणसाचे अध:पतन होऊन नरराक्षसात रूपांतर होतं, असं ज्ञानदेव म्हणतात. 'ज्ञानेश्वरी रोज वाचून खळदकर अत्यंत गुंतागुंतीची भाषा लिलया वापरू शकायचे. वर आपलं बोलणं अधिकृत वाटण्यासाठी 'असं ज्ञानदेव म्हणाले' हे वाक्य जोडायचे. मामीला सरळसोट शिविगाळ परवडायचा पण, हे असलं काही सुधरायचं नाही. 'मेल्या जिभेला ना हाड तुज्या. तुला तरी सुधरतं का तू काय बोलतोस ते. आरं, तुजा कचरा परवडतो पण तुजं थोबाड नाही.' सोनारांच्या शांताबाई, दारू पिऊन येणाऱ्या सासऱ्याशी भांडभांड भांडायच्या आणि शेवटी दमल्या की चूल पेटवायच्या. स्वयंपाक झाला की, सासऱ्याला प्रेमानं म्हणायच्या, 'घ्या जेवून गरम-गरम. तेवढाच घसा शेकून निघेल.'
सणसांची सोनूबाई लांब पाय पसरून, मांडीवर सुपात विड्या वळायची आणि विड्या वळताना एका लयीत पाठीला झोके देत साऱ्या जगाला शिव्या घालायची. जगनभाऊ आणि अजित या मामा-भाच्याच्या जोडीचं दर आठवड्याला एकदा तरी तुफानी भांडण जुंपायचं. जगनभाऊ हाताला लागेल ती सायकल दोन हातांनी डोक्यावर धरून वाडाभर हिंडायचे. कोणत्याही क्षणी रक्तपात होईल असं वाटायचं. पण प्रत्यक्षात काहीच घडायचं नाही. मामा-भाचे दुसर्या दिवशी एक झालेले असायचे. हे असे आणि इतर अनेक नमुने, माझी आई नानावाड्याच्या शाळेतून सायकलवर संध्याकाळी वाड्यात पोहोचली की तिच्या हातातलं जड सामान घ्यायला 'वैनी आल्या' म्हणत धावायचे. कोणाच्याही घरात खुट्ट झालं की माणसं मदतीला धावायची. भांडणं, क्वचित मारामाऱ्या असं वरकरणी दृश्य दिसणाऱ्या या वाड्यात सुखदुःखाच्या वेळी साऱ्यांची स्पंदनं एक व्हायची. सणासुदीला घराघरातून गोडाधोडाची देवाणघेवाण व्हायची, अडीअडचणीला पैशांची उसनवार व्हायची, कोणाच्याही घरात लगीन ठरू देत सारा वाडाच मंगलकार्यालय बनायचा.
भाईंची निवडणूक वाड्यातलं प्रत्येक घर इर्षेने लढायचं. त्या तुटपुंज्या संसारात बाया आनंदी असायच्या. घरं लख्ख ठेवायच्या, भांडी आरशासारखी चमकेपर्यंत घासायच्या. पोराबाळांना बामणासारखं शिकवायला जीव टाकायच्या. वरवर कमी शिकलेली, रूढार्थाने असंस्कृत अशी ही माणसं वास्तवात मात्र अस्सल, माणुसकी घट्ट जपणारी, गरिबीतही पोराबाळांवर संस्कार करायला झटणारी, पारदर्शक, प्रामाणिक, रोखठोक आणि नैतिक होती. कोणी गेलं की घराघरातल्या चुली विझायच्या आणि वाड्याचं स्मशान व्हायचं. अशा या वाड्यातल्या शिव्या ऐकत, पोरांबरोबर मनसोक्त हुंदडत वाढलो. या त्या अर्थानं अतिसामान्य माणसांच्या अकृत्रिम जगण्याची अमिट छाप मनावर कायमची पडली. आजही वाड्यातल्या अनेकांशी माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. वाड्यातली अनेक मुलं-मुली खूप शिकली आहेत. नवी पिढी संपन्न जीवन जगत आहे. या अशा वाड्यातलं आमचं पंचवीस माणसांचं विशाल कुटुंब. माझ्या आजोबांनी, म्हणजेच अण्णांनी जवळच्या नात्यांत ज्यांना कोणाला कुटुंबाच्या आधाराची गरज आहे त्यांना घरी आणायचं, माझ्या आजीनं, म्हणजेच नानींनी त्यांच्यावर मायेची पाखर घालायची आणि बाकी कुटुंबानं त्या व्यक्तीला सामावून घ्यायचं. अण्णा-नानींनी सख्खं आणि परकं असा भेदाभेद न करता या कुटुंबाला प्रेमाच्या अशा धाग्यांनी घट्ट बांधून ठेवलं की आजही आमच्यातले हे धागे अतूट आहेत.
नवीन येणाऱ्या पिढ्यांना, सुना-जावयांना एकमेकांशी जोडत आहेत. अशा या कुटुंबाचे अण्णा आधारवड होते तर नानी अन्नपूर्णा. या दोघांचं कुटुंबातील लेक-लेकी आणि सुना-नातवंडांशी अपूर्व नातं होतं. त्यामुळे घरात गप्पा, हास्यविनोद, थट्टामस्करी, नाटक-चित्रपट-संगीत- साहित्य आणि राजकारणावर चर्चा रंगायच्या. अण्णा-नानींची विनोदबुद्धी आणि मिश्किलपणा यांच्या घरात उतरला होता. भाईंमुळे सारं घर नखशिखांत राष्ट्र सेवादलाचं आणि समाजवादी विचाराचं बनलं होतं. खूप शिकल्यावरही अर्थार्जन न करता समाजकार्याला आयुष्य वाहण्याचा निर्णय घेणाऱ्या आपल्या थोरल्या मुलाच्या भाईंच्या - मागे अण्णा-नानी आयुष्यभर भक्कमपणे उभे राहिले. स्वातंत्र्यलढा, गोवामुक्ती, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि असंख्य सत्याग्रहांमधील भाईंच्या सहभागाचे समर्थक राहिले. भाईंची प्रत्येक निवडणूक त्यांच्या दृष्टीनं लग्नकार्यासारखी असायची. घरात सतत येणाऱ्या पाहुण्यारावळ्यांबरोबर भाईंच्या प्रचंड मित्रपरिवाराचाही राबता असायचा. त्यात सकाळपासून भाईंना भेटायला आलेल्यांची रीघ लागायची. आलेल्या माणसाला किमान चहा दिल्याशिवाय निरोप दिला जात नसे.
अण्णा-नानी दोघंही अतिशय धार्मिक. शाहू महाराजांसारखं धिप्पाड राजबिंडा व्यक्तिमत्त्व असणाऱ्या अण्णांच्या कपाळावर वारकरी पंथाचा उभा काळा बुक्का असायचा. त्यांचं आषाढीला पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन आणि नानीची फडगेट चौकातल्या विठ्ठल मंदिरातलं कीर्तन कधीही चुकायचं नाही. असं असूनही दोघंही कर्मठ तर नव्हतेच उलट नास्तिक भाईंच्या प्रभावाखाली आयुष्यभर बदलत राहिले, पुरोगामी बनत राहिले. अण्णांचे मित्र विविध जातींचेच नाही तर विविध धर्माचे होते. अण्णांचे मित्र, पेशंट्स, भाईंचे मित्र आणि त्यांची कुटुंबं या सर्वांचा मिळून एक विस्तारित 'वैद्य परिवार' बनला होता. फुलवाल्या चौकातला अण्णांचा 'संजीवनी दवाखाना' म्हणजे या परिवाराचा दरबारच असायचा. अण्णांशी गप्पा मारायला भाईंचे ज्येष्ठ एस.एम., प्रधान मास्तर जसे जात तसेच बापूसाहेब काळदाते, बाबा आढाव, निरफराके, कापसे, बोराटे अशी अनेक समवयस्क मंडळीही जात. या साऱ्या बरोबर अण्णांची गप्पांची मैफल सारखीच रंगे. मी अण्णांबरोबर कधी पंढरीला गेलो तर कधी आळंदीला आणि नानींबरोबर पहाटेच्या काकडआरत्यांना गेलो; तर कधी रात्रीच्या कीर्तनांना. माझ्या बालहट्टामुळे घरात गणपती बसू लागला. दरवर्षी वेगळी कलात्मक आरास करण्यासाठी मी शिकस्त करायचो. अशा या सर्व वातावरणात वावरत असताना मी पुस्तकांच्या जगात आणि राष्ट्र सेवादलाच्या बिनभिंतींच्या शाळेतही वावरत होतो. बहुतेक यातूनच मनात खोलवर कुठेतरी नास्तिक बनण्याची प्रक्रिया सुरू झाली असावी.
बारावीत असताना नास्तिकता मी मनोमन स्वीकार केला. जसा नास्तिक बनलेल्या भाईंचा अण्णा-नानींनी स्वीकार केला तसा माझाही स्वीकार त्यांनी खुल्या मनानं केला. कुटुंबातील नाती ही परस्परांबद्दलचा जिव्हाळा, प्रेम, आदर आणि विश्वासावर रचली जातात. कुटुंबाच्या पलीकडे परिवार असतो आणि हा परिवार रक्ताच्या नात्यापलीकडे अनेक जाती-धर्माच्या मित्रमंडळींचा असू शकतो हे अण्णा-नानींनी त्यांच्या सहज वागण्यातून आम्हांला दाखवून दिलं होतं. अशा या घरात माझ्या आईचं एक विशेष स्थान होतं. संगमनेरला हवेलीसारख्या घरात राहणारी, शिकलेली ही मुलगी 'मी आयुष्यभर समाजकार्य करणार, तू कुटुंब सांभाळायचं' या भाईंच्या जगावेगळ्या अटीवर त्यांना स्वीकारते; या गोष्टीचं वैद्य कुटुंबानं मनोमन कौतुक केलं. आईही या घरात अशी काही सामावून गेली की पुढे तिचं सासरच माहेर बनून गेलं. आईचं घरही समाजवादी, राष्ट्र सेवादलाचं, स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेलं. आईच्या घरी जयप्रकाश नारायण, साने गुरुजी, एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे उतरत. या अशा थोरामोठ्यांच्या गोष्टी सांगत तिनं आम्हांला घडवलं. भाईंच्या संसाराची जबाबदारी तर तिनं निष्ठेनं पार पाडलीच, पण ती वैचारिक वाटचालीतही त्यांच्याबरोबर आयुष्यभर राहिली, स्वत:ची स्वतंत्र मतं असूनही. भाईंना अनेक विषयांवर आपली परखड मतं द्यायला ती कधी कचरली नाही. ती खडतर आयुष्याला ज्या सहजतेनं सामोरी गेली तितक्याच सहजतेनं तेरा वर्ष कर्करोगाला सामोरं गेली. आणि-नानीची असं जिव्हाळ्याचं नातं आईशी राहिलं तसंच नातं भाई-आईचं गीतांजलीशी राहिलं.
आमचा मेंदीवाल्यांचा वाडा ज्या आळीत होता ती आळी एका सरळ रेषेत शितळादेवी चौकाकडून पंचहौद मिशनपर्यंत पसरलेली. मागच्या बाजूला गंजपेठ आणि फुलेवाडा, पलीकडे मामलेदार कचेरी, गुरुवर्य जगतापांचं घर, पुढे चिंचेच्या तालमीकडे दिनकरराव जवळकर यांचे घर, खालच्या टोकाला जैन मंदिराच्या अलीकडे केशवराव जेध्यांचा वाडा, वरच्या टोकाला खडकमाळ. शितळादेवी चौक ते पंचहौद मिशन या एका सरळ रेषेत अठरापगड जातींची आणि धर्मांची माणसं रहात होती. शितळादेवी चौकाच्या आसपासची गुजराथी-मारवाडी जैन कुटुंबं, अलीकडे मुस्लिम मंडळी, मध्ये हिंदू बहुजनसमाज, रामाच्या देवळाजवळचे शीख आणि पंचहौद मिशन-पाद्रीचा टॉवर इथले ख्रिश्चन. आळीत हिंदूंचे सर्व सण धडाक्यात साजरे होतच, पण ईदही उत्साहात साजरा व्हायचा. पयुषण पर्वात 'मिच्छामी दुक्कडम्' व्हायचं आणि ख्रिस्त जन्माच्या रात्री हातांत मेणबत्त्या घेऊन येशू ख्रिस्त अमुचा असं गात जाणाऱ्या पांढऱ्याशुभ्र वेषांतील ख्रिश्चन मिरवणुकीलाही सारी आळी कौतुकानं पहायची. ही सगळी मंडळी शांतताप्रिय होती, धर्मनिरपेक्षतेचा अर्थ न कळता धर्मनिरपेक्ष होती.
1967 मध्ये पुण्यात झालेल्या हिंदू मुस्लिम दंगलीत बाहेरच्या समाजकंटकांनी आळीतील मुसलमानांची घरं जाळली. पेटलेल्या घरांच्या छपरांवर शेजारच्या इमारतींवरून उतरून आळीतल्या पोरांनी मुस्लिम कुटुंबांचे प्राण वाचवले. या अशा आळीवर हातभट्ट्या आणि जुगाराच्या अड्ड्यांच्या दोन गटांत अधूनमधून सोडावॉटरच्या बाटल्या, हॉकी स्टिकस् आणि लोखंडी गजांनी होणाऱ्या मारामाऱ्यांनी एक खतरनाक आळी म्हणून पुण्याच्या पांढरपेश्यांनी शिक्का मारला होता. या धुमश्चक्र्यांमध्येही आळीतल्या लोकांना कधी असुरक्षित वाटलं नाही. भाईंची स्कूटर चौकात दिसताच या माऱ्यामाऱ्या क्षणार्धात थांबत. पण यामुळे अशा वस्त्यांमध्ये वावरण्याचे कधी भयच नाही. गुंड आणि हिंसेची भाषा वापरणारी माणसं मूलतः भ्याड असतात हे डोक्यात पक्क रूजलं. यामुळे ताडीवाला रोडची झोपडपट्टी असो, मुंबईतील डोंगरी, भेंडीबाजार, नागपाडा असो मी बेधडक हिंडू शकलो. 'आरोग्य सेने'ची पथकं घेऊन तामीळनाडूचा किनारा असो, खवळलेली कृष्णा नदी असो, केरळची जंगलं असोत किंवा काश्मीरच्या खोऱ्यात पाकिस्तानच्या सीमारेषांवर अतिरेक्यांचे अड्डे असणारी भूकंपग्रस्त गाव असोत, कुठेही घुसताना मनाला भय कधी शिवलं नाही.
या अशा कुटुंबात, वाड्यात आणि पेठेत वाढणारा मी दुसऱ्या बाजूला बामणांच्या शाळेत, नू.म.वि.त शिकत होतो. बहुसंख्य शिक्षक आणि मुलं कट्टर संघीष्ट. मी त्या अर्थानं विरोधी विचारसरणीत वाढत असलेला. महात्मा गांधींच्या थट्टेवरून वर्गमित्रांशी कडाक्याची भांडणं व्हायची. शिक्षकांशी मतभेद व्हायचं. असं असूनही शिक्षकांचे अलोट प्रेम मला मिळालं. आयुष्यभराचे मित्र मिळाले. अनेकदा वर्गाचा प्रतिनिधी म्हणून निवडून आलो, वक्तृत्व मंडळाचा अध्यक्ष झालो, नूमवियचा विद्यार्थी-संपादक झालो, वक्तृत्व स्पर्धेत बक्षिसे मिळवली, नाटकांत कामं केली, कधी खेळांत बक्षिसं मिळवली, गुणवत्ता यादीत झळकले. खूप पुस्तकं वाचायचो आणि वाचलेलं वर्गात ऑफ तासांना गोष्टीरूपात सांगायचो. काही शिक्षक तर माझी चालू असणारी गोष्ट खंडित होऊ नये म्हणून त्यांचे तास ऑफ द्यायचे. नूमवित वातावरण मोकळं होतं. विविध क्षेत्रांतील संचारासाठी स्वातंत्र्य होतं. शाळेचं ग्रंथालय, प्रयोगशाळा सुसज्ज होत्या. सुट्ट्यांत विविध छंद-वर्ग चालत. दूरवर सहली नेल्या जात. दिवाळी साबण आणि फटाकड्यांच्या विक्रीत विद्यार्थ्यांना सहभागी करून व्यवसायाचा आत्मविश्वास दिला जायचा. उत्तम चित्रपट दाखवले जायचे. व्याख्यानमाला आयोजित केल्या जायच्या. विद्यार्थ्याचं व्यक्तित्त्व सर्वांगानं फुलायला सारं काही तिथे होतं.
हिंदुत्वाच्या विचारांचा पगडा असणाऱ्या या शाळेनं माझ्यावर विचारांची कधी सक्ती केली नाही आणि या सहवासानं मीही बदललो नाही. याचं फार मोठं श्रेय भाई, आई, पुस्तकं आणि राष्ट्र सेवादलाला जातं. खूप लहानपणीच मला वाचनवेडानं झपाटून टाकलं. घरातच काही हजार पुस्तकांचा खजिना होता. सुरुवातीला राष्ट्र सेवादलाचे 'साधना वाचनालय', ते अपुरं पडायला लागल्यावर विश्रामबाग वाडा शासकीय ग्रंथालय, इंग्रजी वाचनासाठी 'ब्रिटिश कौन्सिल' ही ग्रंथालय दिमतीला होती. जगातल्या तमाम लहान मुलांप्रमाणे वाचनाची सुरुवात परिकथा, इंद्रजाल कॉमिक्स आणि टारझनपासून झाली. भा.रा. भागवतांचा 'फास्टर फेणे' आणि नाथ माधवांनी चितारलेलं अद्भुत जगही टारझन इतकंच थरारून टाकायचं. या काल्पनिक विश्वातून बाहेर काढलं ते साने गुरुजींच्या वाङ्मयानं. अर्थात 'श्यामची आई'सारखं हळुवार पुस्तक लिहिणारे गुरुजी 'भारतीय संस्कृती'सारखं विद्वत्तापूर्ण पुस्तकही लिहू शकतात हे पुढे कळलं. चौथीनंतरची काही वर्ष श्रीमान योगी, राजा शिवछत्रपती, मृत्यूंजय, झुंज, झेप, मंत्रावेगळा अशा अनेक ऐतिहासिक कादंबऱ्यांनी झपाटून टाकलं. हे झपाटलेपण एवढं असायचं की घरी ऐतिहासिक भाषेत बोलायचो. भाईंना 'आबासाहेब' आणि आईला 'माँसाहेब' म्हणायचो. यामुळे माझ्या आजोबांनी माझंच नाव 'आबासाहेब' ठेवलं आणि शेवटपर्यंत ते याच नावानं हाक मारीत राहिले.
नंतर मात्र ऐतिहासिक कादंबऱ्यांतून भरजरी भाषा आणि व्यक्तिमत्त्वांचं अनेकदा वास्तवाला सोडून केलेलं उदात्तीकरण मनाला रुचेनासं व्हायला लागलं. यातून सुटका झाली ती भाईंनी 'एक लेखक' सलग वाचण्याच्या लावलेल्या सवयीमुळे. ह.ना. आपटे, य.गो. जोशी, ग.ल. ठोकळ, श्री.म. माटे, माडखोलकर, व्यंकटेश माडगूळकर यांची मिळतील ती पुस्तकं वाचली. ह.ना. आपट्यांची 'पण लक्षात कोण घेतो' कादंबरी विधवांचा प्रश्न हाताळल्यानं क्रांतिकारी वाटली. य.गो. जोशींच्या 'वहिनीच्या बांगड्या' मधील दारिद्याच्या दर्शनानं हेलावून टाकलं, पण पुढे दलित वाङ्मयाशी ओळख झाली आणि ही दुःखं पांढरपेशी वाटायला लागली. समाजातल्या पीडितांच्या व्यथांचं हृदय पिळवटणारं दर्शन अण्णाभाऊ साठेच्या वाङ्मयानं घडवलं. त्या अर्थाने पांढरपेशा आणि मध्यमवर्गाच्या भावविश्वांभोवती फिरणाऱ्या मराठी वाङ्मयाला हादरवण्याची क्षमता त्यांच्या साहित्यात आहे. शंकरराव खरात यांचे 'तराळ अंतराळ', दया पवारांचं बलुतं', लक्ष्मण मान्यांचं 'उपरा' या दलित वाङ्मयानं समूळ हादरवलं. मी ज्या बहुजन समाजाबरोबर वाढलो ते जीवनही सुखवस्तू वाटू लागलं. या वाङ्मयामुळे नामदेव ढसाळांच्या 'गोलपीठा'चा अंगार नैसर्गिक वाटायला लागला. किशोर काळेंचं 'कोल्हाट्याचं पोर', अनिल अवचटांची 'अंधेरनगरी निपाणी' आणि नुकतंच वाचलेलं वैशाली हळदणकर यांचे 'बापाला' ही अशीच मनाच्या चिंध्या उडवणारी पुस्तकं.
मधला काही काळ चिं.वि. जोशी, श्रीपाद कोल्हटकर, द.मा. मिरासदार, शंकर पाटलांच्या निर्मळ विनोदात रंगण्यात गेला. ना.सी.फडकेंच्या बहुसंख्य कादंबऱ्या वाचल्या. पण वि.स. खांडेकरांचं 'ययाती' आणि 'क्रौंचवध' वाचल्या आणि कादंबरी किती तात्त्विक उंचीवर जाऊ शकते हे कळलं. 'रात्र काळी घागर काळी'सारख्या कादंबऱ्यांमधून चिं.त्र्य. खानोलकरांनी अस्वस्थ करून टाकणाऱ्या विषण्णतेचा अनुभव दिला. 'कुणा एकाची भ्रमणगाथा' आणि 'गाडगेबाबा'मधून गो.नी. दांडेकर यांनी कलंदर वास्तवाची ओळख करून दिली. श्री.ना. पेंडसे निसर्गसुंदर कोकणातील दारिद्याचे दर्शन घडवलं. र.वा. दिघेंच्या 'पड रं पाण्या'सारख्या कादंबऱ्यांतील शेतांच्या बांधांवर फुललेला प्रणय रोमांचित करून गेला. विश्राम बेडेकरांची दुसऱ्या महायुद्धाच्या विशाल आणि भीषण पार्श्वभूमीवरची चक्रधर या ब्राह्मण तरुणाच्या आणि हॅर्टा या ज्यू तरुणीच्या प्रेमाची शोकांतिका चितारणारी 'रणांगण' ही कादंबरी तर अभिजात साहित्याचा मानदंडच. मालतीबाई बेडेकर यांनी विभावरी शिरुरकर या नावानं लिहिलेलं 'कळ्यांचे निःश्वास' हे पुस्तक काळापुढचं पाऊल होतं. भालचंद्र नेमाड्यांनी 'कोसला' लिहून कादंबरी लेखनाला पूर्ण वास्तव जगात आणलं.
कादंबरी अध्यायानंतर गुरुनाथ नाईकांच्या रहस्यकथा, काकोडकरांच्या प्रणयकथा, नारायण धारप आणि शेतकऱ्यांच्या भयकथांचाही फडशा पाडला. यानंतर थोरामोठ्यांची चरित्र, आत्मचरित्र आणि अनेक प्रवासवर्णनं वाचली. पुढचा काही काळ काव्य जगात आणि नाट्यरंगात रंगण्यात गेला. शिरवाडकर यांचे 'नटसम्राट'; तेंडुलकरांचं 'घाशीराम कोतवाल', 'सखाराम बाईंडर'; जयवंत दळवीचे 'पुरुष' आणि गिरीश कर्नाड यांचे 'हयवदन', 'तलेदंड' ही नाटके तर मानदंडच. ललित वाङ्मयाबरोबर प्रवास करताना आपला समाज, त्यातील संघर्ष समजावून घेण्याची गरज वाटायला लागली. मग प्रवास सुरू झाला आगरकर, टिळक, गांधी, सावरकर हे टप्पे ओलांडून फुल्यांचं 'शेतकऱ्यांचा आसूड', आंबेडकरांचे 'अॅनिहिलेशन ऑफ कास्ट' असा. विविध धर्मांचे अंत:प्रवाह समजून घेण्यासाठी विविध धर्मग्रंथ वाचले, संतवाङ्मय वाचलं. आ.ह. साळुंख्यांच्या 'चार्वाक दर्शना'नं मनावर कायमचा ठसा उमटवला. पुढची काही वर्ष बंगाली, कन्नड, तामीळ, मल्याळम साहित्यातील प्रसिद्ध पुस्तकांची भाषांतरे वाचली. देवदास आजही पुन्हा पुन्हा वाचायला आवडतं. इतर भाषांमध्ये विशेषतः दाक्षिणात्य भाषांत साहित्याचे अधिक नवनवे प्रयोग केले जातात, हे जाणवत गेलं.
सी.राधाकृष्णनचं मल्याळम मधील 'शोधितो मार्ग स्वप्नांचा' ही (राजकीय परिवर्तन हिंसक क्रांतीनंच घडेल यावर ठाम विश्वास असणारी संघटना, शेवटी अहिंसक क्रांतीच्या मार्गाकडे कशी येते यावर एखाद्या रहस्यकथेसारखी लिहिलेली) कादंबरी झपाटून टाकणारी वाटली. हिंदीतून गुलशन नंदा, अमृता प्रीतम, महादेवी वर्मा सारखे लेखक वाचले. यानंतर प्रवास सुरू झाला इंग्रजी वाङ्मयातील मुशाफिरीचा. अंकल टॉम्स केबिन, रॉबिन्सन क्रूसो, अॅलिस इन वंडरलँड, ज्युलस् व्हर्नेची पुस्तके या अभिजात बालवाङ्मयाकडून थॉमस हार्डी, मार्क ट्वेन, अर्नेस्ट हेमिंग्वे, सॉमरसेट मॉम, ई.एम्. फॉस्टर, एच.जी. वेल्स, आयर्विंग स्टोन, ऑर्डर कॉलर, जेफ्री आर्चर अशा लेखकांकडे वळलो. हार्डी 'टू ऑन ए टावर', मॉमच्या 'शार्ट स्टोरीज', 'रेंजर्स एज' ही आवडती पुस्तक. पाश्चात्य तत्त्वज्ञानाची वाटचाल समजून घेण्यासाठी बौड रसेलचं 'हिस्टरी ऑफ वेस्टर्न फिलॉसफी' वाचलं. टॉलस्टॉय, इब्सेन, दोस्तोवस्की प्रधानसरांकडून आणून वाचले. एका घरंदाज स्त्रीच्या व्यभिचाराची 'अॅना कॅरेनिना'मध्ये रेखाटलेली कथा टॉलस्टॉय पेलू शकतो.
'डॉल्स हाऊस', 'अॅन एनिमी ऑफ दी पीपल'सारख्या नाटिकांतून इब्सेनसारखा नाटककार समाजाला हादरवू शकतो. पुढे या प्रवासात सलमान रश्दी, नायपॉल, विक्रम सेठ, अरुंधती रॉय, झुंपा लाहिरी आले. इटालियन लेखिका हरियाणा प्लासीचे 'मॅन', 'इंटरव्ह्यू विद हिस्ट्री', 'इफ सन डाईज्', डॉमनिक लेपीयरचं 'सिटी ऑफ जॉय', 'फ्रीडम अॅट मिडनाईट', कंबोडियन लेखिका लूंग उंगचं 'फर्स्ट दे किल्ड माय फादर', तुर्कस्तानचा लेखक उन्नाव पामुक 'माय नेम इज रेड', पाकिस्तानी लेखिका तेहसिना दुराणी 'माय फ्युडल लॉर्ड' आणि बांगला देशी तस्लिमा नसरीनची 'लज्जा', 'फ्रेन्च लव्हर अशी पुस्तकंही येत राहिली, नव्या नव्या अनुभूतींचा अनुभव देत राहिली. सध्या 'अलकेमिस्ट' लिहिणारा ब्राझिलियन लेखक पावलो कोहेलोच्या प्रेमाचा अध्याय सुरू आहे.
(आणखी दोन लेख १९ जुलै व २६ जुलैच्या अंकात.)
Tags: भाई वैद्य नानासाहेब गोरे एस.एम. जोशी साने गुरुजी Bhai Vaidyaजयप्रकाश नारायण Nanasaheb Gore S.M. Joshi Sane Guruji Jayaprakash Narayan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या