मी त्या लहानग्याला तपासलं. त्याच्या हृदयाला जन्मजात व्यंगाचा आजार असण्याची शक्यता वाटली. त्याचक्षणी हेही लक्षात आलं की आपलं पदवीचं ज्ञान अपुरं आहे. इथे तर तज्ज्ञाचीच गरज आहे. ज्या खेड्यांत साध्या प्राथमिक आरोग्याच्या सुविधाही धड उपलब्ध नाहीत, तिथे तज्ज्ञ कसे उपलब्ध होणार? आरोग्याच्या प्रश्नांचे अनेक गुंते सोडवायला प्राथमिक आरोग्याच्या सुविधांबरोबर तज्ज्ञ सेवांचीही खेड्यापाड्यांत गरज आहे. पदव्युत्तर शिक्षण घेण्याचा आणि त्यानंतर खेड्यांतही तज्ज्ञ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काहीतरी करण्याचा निर्णय त्याचवेळी अंतर्मनात कुठेतरी झाला होता...
अक्षर वाङ्मयाच्या विश्वाच्या बरोबर माझं आणखीन एक विश्व होतं आणि ते म्हणजे 'राष्ट्र सेवा दल' नावाचं मुक्त विद्यापीठ. या विद्यापीठात घडलेल्यांचा पिंड वेगळा. सेवादलाच्या शिवाजी मराठा विद्यालय समोरील मैदानात भरणाऱ्या शाखेत रोज संध्याकाळी मी नियमितपणे जात असे. सुट्ट्यांमध्ये भरणारी निवासी शिबिरं मनापासून आवडायची. कलापथकाचे कार्यक्रम पाहून हरखून जात असे. भाई-आईमुळे सेवादलाशी आणि एस.एम., नानासाहेब, दंडवते, प्रधानसर, वर्देसर, बापू, बाबा अशा दिग्गजांशी संबंध आला. एस.एम.शी भाईंचं मानसपुत्रासारखं आणि आम्हा बहिणभावंडांचं नातवंडासारखं नातं होतं. एस.एम.शी सहज संवाद साधता यायचा. या संवादांच्या आड त्यांचं मोठेपण यायचं नाही. एस.एम.ची भाषण तशीच. श्रोत्यांच्या हृदयाला हात घालीत त्यांना विचारप्रवण करणारी.
संगमनेरचे थोर समाजवादी स्वातंत्र्यसेनानी भास्करराव दुर्वे हे माझे मामा. त्यांच्या एका स्मृतिदिनी एस.एम. प्रमुख वक्ते होते. मला सुट्टी असल्यानं त्यांच्याबरोबर संगमनेरला मी जायचं ठरवलं. त्या दिवशीचं त्यांचं भाषण ही एक अविस्मरणीय मेजवानी आणि परतीच्या प्रवासातील त्यांच्याबरोबरच्या गप्पा ही एक मैफलच होती. गप्पांत अण्णांनी मला एकदम विचारलं, 'उमराव जान पाहिलास? त्यातली ती आशाची सुंदर गझल...' मी म्हटलं, 'दिल चीज क्या है आप मेरी च ना? 'हो, हो. तीच. म्हण बघू. आप शब्दावर आशानं काय तान घेतली आहे! रात्रीच्या अंधाराला कापत धावणारी गाडी आणि अण्णांच्या फर्माईशीसाठी माझ्या गळ्याला न झेपणारी ती गझल गाणारा मी! त्या रात्रीचं सोनं झालं होतं माझ्या दृष्टीनं. पुढे मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयातील हृदयरोग विभागात काम करीत असताना, एक दिवस अण्णा भाईंबरोबर थडकले. निरोप द्यायला गाडीपर्यंत गेलो तर गाडीत बसताना अण्णांनी मला मिस्कीलपणे विचारलं, 'काय? मृगया कुठपर्यंत आली आहे?' इतक्या सहजपणे ते मला 'कोणी मुलगी जाळ्यात सापडली की नाही?' असं विचारतील हे स्वप्नातही नसल्यानं माझा चेहरा मृगयेसाठी साधं धनुष्यही न उचलता उगीचच कावराबावरा झाला.
पुढे एस.एम. जेव्हा परळच्या टाटा कॅन्सर रुग्णालयात उपचारांसाठी अँडमिट होते, तेव्हा मी जवळच्याच गांधी रुग्णालयात काम करीत असल्यानं संध्याकाळी त्यांच्याशी गप्पा मारायला जायचो. इथेही एस.एम. प्रसन्नच. स्वत:चा कर्करोग आणि त्यावरच्या उपचारांची 'कौरव पांडवांचे युद्ध' म्हणून खिल्ली उडवायचे. एकदा माझ्या दोन मित्रांना एस.एम.ना पहायचं होतं म्हणून घेऊन गेलो. एस.एम.कडे महाराष्ट्रातील एक केन्द्रीय मंत्री भेटायला आले होते. मंडल आयोगावर चर्चा चालली होती. आम्ही थोडे संकोचून शांतपणे बाजूला बसून ती चर्चा ऐकत होतो. एस.एम. अचानक माझ्याकडे बघून म्हणाले, 'या तरुण मंडळींना विचारूयात ना, त्यांचं काय मत आहे?' क्षणभर मी गडबडलोच. केन्द्रीय मंत्र्यांच्या डोळ्यांत, एवढ्या मोठ्यांच्या चर्चेत लहानांना ओढल्याबद्दल नाराजीचा भाव स्पष्ट दिसत होता. मी मंडल आयोगाचा मूळ अहवाल वाचला होता. पूर्वी त्यावर एक चित्रप्रदर्शनही भरवलेलं होतं. मी शांतपणे माझे मुद्दे मांडले. एस.एम. मंत्री महोदयांना म्हणाले, 'पाहिलंत, तरुणांचं मानस समजावून घेणं किती महत्त्वाचं आहे! आयुष्यभर एस.एम. दलितांच्या मागे भक्कमपणे उभे राहिले. आयुष्यात याची किंमतही त्यांनी मोजली. मराठवाडा विद्यापीठ नामांतरविरोधी दंगलीत एका तरुणानं त्यांच्या गळ्यात चपलांचा हार घातला, या घटनेनं माझ्या मनावर कायमची जखम केली, भले पुढे त्याच युवकानं त्यांना भेटून, केलेल्या कृत्याबद्दल माफी मागितली असली तरीही! तळागाळातला माणूस सामील करून घेतला तरच राष्ट्राची उभारणी समर्थपणे होऊ शकते.
या ठाम विचारानं एस.एम. आयुष्यभर लढत राहिले. एस.एम.च्या व्यक्तिमत्त्वाची उंची एवढी उत्तुंग होती की कर्करोगानं शरपंजरी पडलेल्या एस.एम.चं नुसतं असणंही प्रचंड नैतिक ताकद देऊन जायचं. नानासाहेब गोरेंचा आमच्या कुटुंबाशी जुना संबंध असला, तरी त्यांच्याशी माझा निकटचा संबंध त्यांच्या आयुष्याच्या उत्तरकाळात डॉक्टर म्हणून आला. त्यांची डौलदार लेखणी आणि शैलीदार भाषण परिचित होती. त्यांचं संस्कृतवरील प्रभुत्व प्रत्यक्ष ऐकलं होतं. नानासाहेब साहित्य संमेलनाचे अध्यक्षच व्हायला हवे होते, राजकारणानं त्यांच्यातील साहित्यिकाला फार कमी अवधी दिला असं असूनही! त्यांची विद्वत्ता ही समाजवादी आंदोलनाची ताकद होती. संघवाल्यांच्या भेकड हल्ल्यांची तमा न बाळगता सदाशिव पेठेत राहून नानासाहेब त्यांची मांडणी आयुष्यभर करीत राहिले. नानासाहेबांच्या राजस व्यक्तिमत्त्वानं जरा दबकायला व्हायचं. पुढे त्यांच्या निकट आलो आणि त्यांच्या अंतरंगाचं एक वेगळंच दर्शन घडलं. ड्रायव्हरच्या मुलाचा अभ्यास घेणारे, घरी काम करणाऱ्या मुलीला समाजवादी चळवळीत ओढणारे नानासाहेब पहायला मिळाले. परंदवडीच्या भारतयात्रा केंद्रा'त मी चालवलेल्या आरोग्य केंद्राची जिव्हाळ्यानं चौकशी करीत. त्यासाठी एकदा दहा हजार रुपयांची देणगीही त्यांनी दिली. 'समाजवादी राजकीय चळवळीची पुनर्मांडणी व्हायला हवी, समाजवाद्यांनी पुन्हा स्वतंत्र राजकीय संघटन केलं पाहिजे' असं त्यांना मनापासून वाटायचं. त्यांनी शेवटच्या अमेरिका प्रस्थानापूर्वी भाईंना 'समाजवादी जन परिषदे'च्या स्थापनेसाठी लिहिलेलं शुभेच्छा पत्र मी आजही जपून ठेवलंय्.
मधु दंडवते - नानांशी, माझा व्यक्तिगत निकटचा संबंध आला तो अगदी अलीकडे. संघर्षशील आयुष्य जगायला समाजवादी नेता मंत्री झाल्यावर इतरांपेक्षा किती वेगळा ठसा उमटवू शकतो, हे त्यांनी दाखवून दिल्यानं त्यांच्याबद्दल एक वेगळंच आकर्षण होतं. 'आरोग्य सेने'च्या एका वर्धापनदिनाला ते पुण्यात होते आणि त्यांचा आपणहून निरोप आला की 'मी कार्यक्रमाला येतोय म्हणून. मग काय, आरोग्य सैनिकांच्या उत्साहाला सीमाच राहिली नाही. आरोग्य सेनेत प्रामुख्यानं तरुण मंडळी सामील आहेत याचं त्यांना विशेष कौतुक होतं. आरोग्य सेनेच्या तात्त्विक मांडणीबद्दलही ते माझ्याशी आवर्जून संवाद साधत. संघटनेच्या तात्त्विक बैठकीची क्षितिजं विस्तारणारी ती एक प्रेरणा होती. प्रधान मास्तरांशी असलेल्या संबंधांबद्दल किती लिहू? मात्र मास्तरांच्या लेखणीशी नातं आधी जुळलं होतं. 'कांजरकोट', 'सोनार बांगला' ही त्यांची पुस्तक लहानपणी आवडलेले. 'साता उत्तराची कहाणी' हे तर सात राजकीय विचारधारांच्या मित्रांच्या आयुष्याची वाटचाल मोठ्या ताकदीनं रेखाटणारं भारतीय साहित्यातील एकमेव पुस्तक असावं. मास्तरांच्या घरी लहानपणापासूनच वहिनींशी गप्पा मारायला जात असे. टॉलस्टॉय, इब्सेन, डोस्टोव्हस्की मास्तरांच्या ग्रंथसंग्रहातूनच वाचले. भारतयात्रा केंद्रावर आरोग्य चिकित्सा केंद्राचा प्रयोग असो, आरोग्य सेनेची वाटचाल असो मास्तरांनी दिलेली पाठीवरची थाप सतत प्रेरणा देत राहिली. 'शलोम इस्रायल' लिहून छापून झाल्यावर त्याची पहिली प्रत मास्तरांना दिली ती दुपारी १२च्या सुमारास. रात्री ९च्या सुमाराला कळलं की ते मला शोधतायत. मी रस्त्यातूनच त्यांना फोन केला. त्यांचं पहिलंच वाक्य, 'अभिजित, आत्ताच शलोम अखंड वाचून संपवलं. खरं तर, एवढी पावती पुरेशी होती.
'शलोम'च्या प्रकाशन समारंभातलं त्यांचं ज्यूंवरील जागतिक साहित्याचा आढावा घेणारं भाषण अविस्मरणीय होतं. पुढे या 'शालोम इस्रायल'ला महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट ललित गद्याचा पुरस्कार मिळाला. त्याचं वाचन आकाशवाणीवरही झालं. मास्तरांनी लिहिलेलं खूपसं लिखाण त्यांच्या तोंडून ऐकायचं भाग्य मला मिळत राहिलं. 'टॉलस्टॉयला पत्र' असोत किंवा एका तरुण पत्रकारानं डॉ.आंबेडकरांच्या घेतलेल्या काल्पनिक मुलाखत असोत किंवा लोकमान्यांवरील नाटिका असो. वयाच्या 80 नंतर मास्तरांनी केलेले हे साहित्यिक प्रयोग आहेत. आपलं लिखाण वाचून दाखवल्यावर त्यांचं निरागस विचारणं तर बेमिसाल! काय, कसं वाटलं? टॉलस्टॉय पुन्हा वाचून काढला. मग वाटलं की, अरे हा माणूस सध्याच्या तरुणपिढीला कळायला हवा. पण लेख स्वरूपात लिहिलं असतं तर कदाचित तरुणांना कंटाळवाणं वाटलं असतं. मी विचार केला, की आपण त्यांना सरळ पत्र लिहून संवादच करू. आहे की नाही वेगळा फॉर्म?' या वयातही ही सर्जनशीलता आणि समाजातील संघर्षांची धग शिकविणाऱ्या मास्तरांची नोबेल पारितोषिक विजेती ब्रिटिश लेखिका लेसिंगशीच तुलना होऊ शकते. बाबा आढावांच्या तर आख्ख्या घराशी आमच्या आख्ख्या घराचं सख्खं नातं. बाबांच्या आई - बाई - म्हणजे तर बहिणाबाई चौधरींचं आगळं रूप. तेच ग्रामीण शहाणपण. अनुभव विश्वाची तीच संपन्नता. कोणत्याही विषयावर गप्पा मारताना त्यांच्या पोतडीतील एखादी अशी चपखल म्हण त्या फेकीत की पुढे काही बोलण्याची गरजच नसायची. आर.के. लक्ष्मणचं एक व्यंगचित्र जसं खूप काही बोलतं, तशी त्यांची एक म्हण एका लेखाचं काम करायची. कष्टकऱ्यांच्या जीवनाशी बाबांचं नातं बाईंमुळंच जुळलं असावं.
भाई बाबांच्या राजकीय-सामाजिक प्रवासाच्या पायवाटा सुरुवातीला व्यक्तिगत स्नेहाबरोबर एकमेकांमध्ये मिसळलेल्या राहिल्या. भाई-बाबांच्या पुणे महानगरपालिकेतील नगरसेवक म्हणून कारकिर्दीच्या आठवणी सांगताना आजही अनेक जुने राजकीय कार्यकर्ते आणि म.न.पा. सेवक गहिवरतात. आणीबाणीनंतर दोघांच्या वाटा भिन्न झाल्या. अर्थात त्या तशा वरकरणीच भिन्न होत्या. त्यांचा व्यक्तिगत स्नेह तर अभंगच राहिला. राजकीय परिवर्तन आणि समाजवादी विचारांच्या पुनर्बाधणीच्या प्रवासात भाई अनेक सामाजिक आंदोलनं उभी करीत राहिले आणि सामाजिक परिवर्तनासाठीच्या संघर्षात बाबा समाजवादीच राहिले. या दोघांच्या वाटांना हे फाटेच फुटले नसते तर? गेल्या काही दशकांमध्ये संपूर्ण राजकारणाचीच नैतिक घसरण होत आहे. इंडिया शायनिंगच्या नावाखाली जीवनाच्या जवळपास सर्वच क्षेत्रात व्यापारीकरण होतंय, अगदी शिक्षण आणि आरोग्य ही मूलभूत क्षेत्र त्याला अपवाद नाहीत. कधी नव्हे एवढी विषमता वाढतेय. जग संगणकीय महाजालामुळे घराच्या चार भिंतींच्या आत मूषकाच्या कळीत सामावलंय आणि विज्ञानाची नवी नवी क्षितिजं धुंडाळणे जगात मात्र जागोजागी धर्म, भाषा, प्रांत व जमातवादाच्या नव्या भिंती निर्माण होत आहेत. नरेंद्र मोदींचा भगवा धार्मिक वंशच्छेदाची तलवार बनतोय आणि ठाकरेंचा भगवा 'हिंदू बाँबची हाकाटी देतोय.' संपूर्ण राष्ट्राला बांधण्याची क्षमता असणारी राजकीय विचारधारा जेव्हा क्षीण होते तेव्हा दुसरं काय घडणार?
सामाजिक समता आणि न्यायासाठीचे कितीही लढे लढलो तरी जोपर्यंत राजकीय परिवर्तन घडत नाही तोपर्यंत हेच घडणार. उलट देशाची सत्ता भोगणारा राजकीय नेत्यांना जबरदस्त नैतिक उंची असणाऱ्या नेत्यांची ताकद देशभर विखुरलेल्या आंदोलनांमधून विरत रहावी असंच वाटत राहणार; आणि राजकीय परिवर्तनाची ताकद असणारी देशभर विखुरलेली माणसं कधी एकत्रच येऊ नयेत असंही वाटत राहणार. भाई-बाबांच्या भिन्न वाटा ही या देशाच्या राजकीय अध:पतनाला कारणीभूत अशी प्रतिकात्मक प्रक्रिया आहे, असं मला नेहमीच वाटत राहिलं आहे. सत्ता काबीज करण्याची स्वप्नं ही सत्तेचा उपभोग घेण्यासाठी नाही, तर देशात आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन आणण्यासाठी पाहता येऊ शकत नाहीत? देशाची चुकलेली राजकीय दिशा सामाजिक परिवर्तनाचे कालचक्र उलट्या दिशेनं फिरवू शकते! महात्मा फुल्यांच्या सामाजिक समतेच्या लढ्याला राजकीय धारही होती आणि महात्मा गांधींच्या ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या लढ्याला अनेक सामाजिक संघर्षांचं परिमाण होतं. शाहू महाराजांनी तर सत्तेतून सामाजिक परिवर्तन कसं घडवता येतं हे दाखवून दिलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी समतेची लढाई लढताना राजकीय परिवर्तनाचे युद्ध लढता येतं हे जसं दाखवून दिलं; तसंच राजकीय सत्ता येताच समतेच्या लढ्यामागे घटनेची ताकद उभी करता येते हेही दाखवून दिलं. भाई-बाबांची ताकद एकत्र राहिली असती तर राजकीय चित्र निश्चितच बदललं असतं. अर्थात, मी माझ्या परीनं बाबांबरोबरही ते म्हणतील तेव्हा जमेल ते करीत राहिलो. पुण्यातल्या रिक्षा चालकांसाठी एक आरोग्य योजना आम्ही वर्षभर यशस्वीरित्या चालवली होती.
पुण्याचे महापौर म्हणून भाईंच्या गाजणाऱ्या कारकिर्दीचा शेवट इंदिरा गांधींनी आणीबाणी पुकारल्यामुळे पुण्याच्या येरवडा कारागृहात झाला. आणीबाणीची घोषणा होताच भाईंनी आणीबाणीच्या विरुद्ध शनिवार वाड्यावर या प्रचंड सभेत 'शुरू हुई है जंग हमारी' असा ऐलान केला. त्याच दिवशी मध्यरात्री भाईंना अटक झाली. भाईंचा कारावास आम्हांला नवा नव्हता. फरक इतकाच होता की या कारावासाचा कालावधी अनिश्चित होता आणि यावेळी देशातील दहशतीच्या वातावरणामुळे माणसांनी ओसंडून वाहणारं घर अस्पृश्यतेचा अनुभव घेत होतं. आईनं मात्र अत्यंत खंबीरपणे हा काळ काढला. माझ्या दहावीच्या यशाचं श्रेय संपूर्ण तिचंच. एस.एम., नानासाहेब, अण्णा-नानी आणि मुंदडाशेठजींसारखी काही मोजकीच माणसं या काळात भक्कमपणे मागं उभी राहिली. महिन्यातून एकदा मिळणाऱ्या भाईंच्या भेटीसाठीही येरवडा कारागृहाबाहेर उन्हात तिष्ठत बसावं लागे. तुरुंगातील इतर कैदी मात्र राजबंद्यांना प्रचंड सन्मानानं वागवीत. या काळात भाईंशी पत्रव्यवहार हाच काय तो आधार होता. पुढे यातील काही पत्रांचा डॉ.अरुण लिमयेंनी त्यांच्या 'आणीबाणीतील पत्रे'मध्ये समावेश केला. या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत नानासाहेब गोरेंनी या पत्रांचा खास उल्लेखही केला. कधीच संपणार नाही असं वाटणारी आणीबाणी १९ महिन्यांनी अचानक उठवण्यात आली. आणि मग राजबंदी बाहेर आले ते जननायक बनूनच.
जयप्रकाशजींच्या प्रेरणेनं स्थापन झालेल्या 'जनता पक्षा'नं निवडणुकांत झंझावाती यश मिळवलं. भवानी पेठ विधानसभा मतदार संघातून भाई प्रचंड मताधिक्क्याने निवडून आले आणि पुढे पुलोदच्या मंत्रिमंडळात गृहराज्य आणि सामान्य प्रशासनासहित काही महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री झाले. या काळातही आई, माझी बहिण प्राची आणि मी सर्वसामान्यांसारखंच जीवन जगत राहिलो, दोन-दोन बस बदलत मुंबईच्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनाला सामोरं जात राहिलो. भाईंची मंत्रिपदाची कारकीर्द ही त्या पदाला एका आगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारी होती. एका मोठ्या स्मगलरच्या अटकेचं वॉरंट रद्द करण्यासाठी लाच देऊ करणाऱ्या त्याच्या हस्तकांना भाईंनी जाळं रचून आमच्या निवासस्थानी पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. भ्रष्टाचारानं पोखरलेल्या आपल्या देशाच्या इतिहासातील ही एक देदीप्यमान, भ्रष्टाचाराच्या विरुद्ध निर्भयपणे लढण्याची स्फूर्ती देणारी घटना होती. पुढे या स्मगलर्सनी राम जेठमलानीना वकीलपत्र दिलं, तरीही ते न्यायालयीन लढाई हरले आणि सश्रम कारावासासाठी त्यांची रवानगी झाली. याच जेठमलानींना स्वच्छ राजकारणाच्या बाता करणाऱ्या रामकृष्ण हेगडेनी जनता पक्षाकडून राज्यसभेवर पाठवलं आणि नंतर भाजपानं देशाचं कायदे मंत्री केलं.
जनता पक्षाचं केंद्र सरकार गडगडलं, निवडणुकांत पराभव झाला आणि अनेक राज्यांतील जनता मंत्रिमंडळ बरखास्त करण्यात आली. महाराष्ट्रात मंत्रिमंडळ बरखास्त होताच दुसऱ्या दिवशी मलबार हिलवरचं निवासस्थान सोडून आम्ही हाजी अलीला भाईंच्या स्नेह्यांच्या निवासिकेत रहायला गेलो. इकडे स्टोव्हवर स्वयंपाकासाठी लागणाऱ्या रॉकेलच्या रांगेत आई उभी राहिली आणि तिकडे पुण्यात भाई स्कुटरवरून निवडणुकीच्या प्रचाराला लागले. सत्तेच्या क्षणभंगूरतेचं हे दर्शन मनाला एक वेगळीच स्थिरता देणारं ठरलं. मी शांतपणे माझं चंबुगबाळं उचललं आणि जे.जे. हॉस्पिटलमधील वसतिगृहावर मुक्काम हलवला. वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहावरील तीन वर्षे, एंटर्नशिपच्या काळातील ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रातील वास्तव्य आणि पदव्युत्तर शिक्षण काळात अनेक रुग्णालयांच्या निवासातील वास्तव्य हा एक भन्नाट अनुभव होता. या वास्तव्यानं अनेक मित्र दिले. नितीन केतकरांसारखा आयुष्यभर माझ्या चळवळींच्या मागे उभा रहाणारा मित्र दिला. मकरंद कांबळे, दिनेश पाटील, अस्लम शिवानी, गिरीश पेंढारकर, अनिल धारप हे मित्र आरोग्य सेनेच्या मोहिमांमध्ये आजही सामील होत असतात. आम्ही पंधरा मित्र आर.एम. भट वसतिगृहाच्या 'बी' विंगमध्ये रांगेने खोल्या घेऊन रहाणारे म्हणून 'बी लॉबी' या नावाने ओळखले जायचो. सर्वजण मध्यमवर्गीय. राजकीय आणि सामाजिक जाणीवा असणारे. त्यामुळे विविध प्रश्नांवर रात्ररात्र चर्चांच्या फैरी झडत. कडाक्याचे वाद होत. सर्वजण तुटपुंज्या पैशावर काटकसरीने रहायचो. ग्रँट मेडिकल महाविद्यालयात दाखल होताच रॅगिंग करणाऱ्या मुलांना मी भक्कमपणे सामोरा गेलो. आम्ही 'बी लॉबी'कडून पुढे रॅगिंगला प्रखर विरोध केला. या वास्तव्यात मुंबईतील जे.जे., सेंट जॉर्जेस, जी.टी., गांधी आणि हिंदुजा हॉस्पिटलसारख्या नामवंत रुग्णालयांत सपाटून काम करून जमेल तेवढा अनुभव गाठीशी बांधला, मुंबईत मनमुराद भटकलो. अनेक चित्रपट पाहिले आणि भरपूर वाचनही केलं.
1983 मध्ये भाई, चंद्रशेखरजींच्या कन्याकुमारी ते दिल्ली या ऐतिहासिक पदयात्रेत सामील झाले. त्या काळात मी इंटर्नशिप करत होतो. मीही रजा घेऊन मध्यप्रदेशात पदयात्रिकांचा डॉक्टर म्हणून सहभागी व्हायचं ठरवलं. पुण्याहून इंदूरला पोहोचून पुढे गुन्याच्या दिशेला जाणारी बस पकडली. पदयात्रा याच मार्गावरून चालली होती. पदयात्रा दिसली की उतरायचं ठरवलं. दुपारी ३च्या सुमाराला पदयात्रा दिसली. वैशाखाच्या रणरणत्या उन्हात आरशासारखा चकाकणारा डांबरी रस्ता, त्यावरून झपाझप चालणारे उंचेपुरे चंद्रशेखरजी, शेजारी भाई, शे-दोनशे पदयात्रा, दुतर्फा भक्तिभावाने नमस्कार करणारे हजारो स्थानिक. सायंकाळी पदयात्रा गावात शिरली तर पदयात्रेचं रूपांतर हजारोंच्या संख्येत झालं होतं. पदयात्रींचे गाण्याचे स्वर आसमंतात निनादत होता:
'साथियो सलाम है, सलाम है सलाम।।
इस देशकी आजादीयाँ है तुम्हे बुला रही
जातीवादी बेडियाँ झनझनाके आ रही
पूंजीवादी बेडियाँ झनझनाके आ रही
कबूल हो आझादिया तोड दो ये बेड़ियाँ
प्रण करो यहाँ सभी प्रण करो यहा अभी
तुम्हारे ही हाथ मे देश की लगाम है
साथीयो सलाम है...॥
त्यानंतर लालित्यपूर्ण हिंदीतील विचारांची अपूर्व उंची गाठणारं चंद्रशेखर यांचे भाषण. केवळ माणसांनाच नाही तर मातीच्या कणाकणाला भारून टाकणारं वातावरण होतं ते. त्यानंतरचा एक महिन्याचा काळ मंतरलेला तर होताच, पण आपल्या देशातील खेड्यापाड्यांत राहणाऱ्या 'खऱ्या भारताच्या' जीवनाचं वास्तव दर्शन घडवणारा होता. भल्या पहाटे सर्व पदयात्रा उठून आवरत. प्रात:विधी 'व्होल वावर इज युवर्स' असंच होतं. आंघोळी कधी नदी, तलाव, विहिरींवर किंवा बरोबरच्या टैँकरखाली होत. पहिले दोन दिवस मी कोणीतरी दिलेल्या पोत्यावर झोपत होतो. बाकी पदयात्रींना बेडिंग्ज देण्यात आली होती. तिसऱ्याच दिवशी चंद्रशेखरजींचा पुतण्या माझ्या रुग्णवाहिकेत एक बेडिंग घेऊन आला आणि म्हणाला, 'अध्यक्षजीने आपके लिए भेजा है।' मी थक्कच झालो. या धामधुमीतही त्यांनी मी पोत्यावर झोपतोय हे पाहिलं होतं. चंद्रशेखरजींच्या व्यक्तिगत जिव्हाळ्याचा तो पहिला अनुभव. त्यापुढे आयुष्यात त्यांच्या व्यक्तिगत प्रेमाचे अनेक अनुभव वाट्याला आले.
पदयात्रेत सामील होताच मी रुग्णवाहिकेचा ताबा घेतला आणि त्या रुग्णवाहिकेचं रूपांतर पुढील काही दिवसांतच एका छोट्या सुसज रुग्णालयात केलं. छोट्या शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या उपकरणांपासून सलाईनपर्यंत असं सारं उपलब्ध केलं. मदतीला राधेश्याम शर्मा आणि अँड.सुधीर निरफराके असत. पदयात्रा रोज सुमारे 20-25 कि.मी. अंतर पार करीत असे. मी पदयात्रिकांबरोबर संपूर्ण चालायचं. सकाळी, दुपारी आणि रात्री या रुग्णवाहिकेत दवाखाना चालवायचो. एक दिवशी पदयात्रा एका गावात दुपारच्या विश्रांतीसाठी थांबली होती. माझा झाडाखालचा दवाखाना सुरू झाला. रणरणत्या उन्हात एक वृद्ध खेडूत लहान मूल हातात घेऊन झाडाखाली उभा होता. माझ्याकडची गर्दी संपल्यावर त्यानं मला नमस्कार करून त्या मुलाला तपासायची विनंती केली. मी हात जोडून त्या वृद्धाला एवढंच म्हणालो, ''चाचा, मै पदयात्रियोंका डाक्टर हूँ। आप इसे सरकारी अस्पताल मे क्यों नही लेके जाते? ''त्या वृद्धाच्या डोळ्यांत टचकन पाणी आलं. तो म्हणाला, 'बेटा, ना मत कह । पंद्रह मैल की दूरींसे इसे लेकर पैदल आया हूँ, यही सुनकर की कोई बंबई का डाक्टर आया हैं। सरकारी अस्पताल कुछ काम के नहीं।
मी त्या लहानग्याला तपासलं. त्याच्या हृदयाला जन्मजात व्यंगाचा आजार असण्याची शक्यता वाटली. त्याचक्षणी हेही लक्षात आलं की आपलं पदवीचं ज्ञान अपुरं आहे. इथे तर तज्ज्ञाचीच गरज आहे. ज्या खेड्यांत साध्या प्राथमिक आरोग्याच्या सुविधाही धड उपलब्ध नाहीत, तिथे तज्ज्ञ कसे उपलब्ध होणार? आरोग्याच्या प्रश्नांचे अनेक गुंते सोडवायला प्राथमिक आरोग्याच्या सुविधांबरोबर तज्ज्ञ सेवांचीही खेड्यापाड्यांत गरज आहे. पदव्युत्तर शिक्षण घेण्याचा आणि त्यानंतर खेड्यांतही तज्ज्ञ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काहीतरी करण्याचा निर्णय त्याचवेळी अंतर्मनात कुठेतरी झाला होता. मध्यप्रदेशातल्या संपूर्ण आरोग्य व्यवस्थेची अवस्था मी उघड्या डोळ्यांनी पहात होतो. एका बाजूला साधा डॉक्टरही उपलब्ध नसणारे सरकारी दवाखाने आणि दुसऱ्या बाजूला सलाईनची दुकानं थाटलेले खाजगी दवाखाने. भारताच्या आरोग्य व्यवस्थेच्या दैनावस्थेचंच हे प्रातिनिधिक चित्र होतं. आजोबांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे मी परतलो. त्यांच्या मृत्यूची बातमी कुठेतरी चंबळेच्या खोऱ्यात पोलिसांकरवी आम्हांला मिळाली. प्रदीर्घ प्रवास करून भाई आणि मी पुण्यात पोहोचलो ते तिसऱ्या दिवशी. एस.एम.नी अण्णांचा अंत्यविधी आमची वाट न पहाता करण्याचा निर्णय घेतला आणि आमच्या सर्व कुटुंबीयांनी तो शिरोधार्य मानला. पुण्याला येऊन नानींना भेटून भाई दुसऱ्याच दिवशी पुन्हा पदयात्रेसाठी परतले. मी मात्र पुण्यात थांबलो. पदयात्रेतील एक महिना संपूर्ण आयुष्याला मात्र कलाटणी देणारा ठरला.
(आणखी एक लेख २६ जुलैच्या अंकात.)
Tags: सामाजिक परिवर्तन सामाजिक समता बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी महात्मा फुले Social Transformation शाहू महाराज Social Equality Babasaheb Ambedkar Mahatma Gandhi Mahatma Phule - Shahu Maharaj weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या