डिजिटल अर्काईव्ह

समाजवादी राजकीय विचारधारेवरचा माझा विश्वास अढळ राहिला...

“या देशाचं चित्र पालटण्याचं सामर्थ्य समाजवादी विचारधारेत निश्चित आहे. अर्थात याच विश्वासावर देशभर शेकडो कार्यकर्ते असंख्य आंदोलनं चालवीत आहेत. पण वास्तव हे आहे की, समाजवादावर विश्वास असणाऱ्या या विखुरलेल्या ताकदींचं रूपांतर एकजिनसी समाजवादी राजकीय पक्षात झाल्याशिवाय राजकीय परिवर्तन होणार नाही. ही नवी राजकीय शक्ती प्रखर राष्ट्रवादावर निष्ठा असणारी हवी. दलित, आदिवासी, महिला, कष्टकऱ्यांना आपली वाटणारी हवी; तशीच विज्ञानाच्या क्षेत्रातील नव्या बदलांशी नातं जोडत संगणक-युवकांनाही आपली वाटायला हवी. यासाठीच 'आरोग्य सेने'नं फक्त सामाजिक परिवर्तनाच्या तुरुंगाचंच बंदी होऊ नये, असं मला वाटतं." 

पदयात्रेनंतर चंद्रशेखर यांनी देशभर ग्रामीण विकासासाठी 'भारत यात्रा केंद्र' स्थापन करण्याचं ठरवलं. महाराष्ट्रातील भारत यात्रा केंद्राची जबाबदारी भाईंनी घेतली. मावळ तालुक्यातील परंदवडी येथे 'भुताचा माळ' म्हणून कुप्रसिद्ध अशा उजाड माळरानाची पंचवीस एकर जमीन खरेदी करण्यात आली. बघता बघता भुताचा भाळ हिरवाईनं बहरला, माणसांत आला. मुक्त शेतकी विद्यालयाच्या अनुषंगानं शेतीला पूरक असे अनेक उपक्रम तिथे राबवले जाऊ लागले. मधल्या काळात मी मुंबईला एम.डी. आणि हृदयरोग विषयातील प्रशिक्षण पूर्ण करून पुण्याला परतलो. अनेक राजकीय उलथापालथ नंतर चंद्रशेखरजी भारताचे पंतप्रधान झाले, तेव्हा मला वैद्यकीय व्यवसाय सुरू करून दोनएक वर्षे झाली होती. पदयात्रेत आपल्या ग्रामीण भागातील सार्वजनिक आरोग्याच्या दाहक वास्तवाचा जो अनुभव घेतला होता त्यातून सतत यावर काहीतरी उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं वाटत राहिलं होतं. ग्रामीण भागातील जनतेसाठी फक्त प्राथमिक आरोग्य सेवांचं जाळे पुरवण्याची संकल्पना अपुरी वाटायला लागली. 

याबरोबर तज्ज्ञ सेवांचंही जाळंही उभारलं पाहिजे. पण खेड्यात जाण्यासाठी एवढे तज्ज्ञ कसे उपलब्ध करायचे? तज्ज्ञ तर शहरं सोडायला तयार होणं अवघड. पण शहरातील तज्ज्ञांनी जवळच्या खेड्यांतील एखाद्या सेवाभावी केंद्रावर महिन्यातील एका रविवारी सकाळचे तीन तास विनामूल्य देण्याचं ठरवलं तर हे चित्र पालटता येऊ शकतं. असं एक केंद्र परिसरातील शंभर खेड्यांतील जनतेचा आधार बनू शकतं. ही केंद्र खेड्यापाड्यांतील वैद्यकीय व्यावसायिकांनाही आधार वाटतील आणि रूरल मेडिकल रेफरल सेंटर्स (आरएमआरसी) बनतील असा विश्वास मला वाटू लागला. याच विचारमंथनातून सरळ निर्णय घेतला की, परंदवडीच्या भारत यात्रा केंद्रावर प्रत्येक रविवारी तज्ज्ञ सेवा देणारं 'भारत यात्रा आरोग्य चिकित्सा केंद्र' सुरू करायचं. माझा धाकटा चुलतभाऊ सत्यजितनं या केंद्राच्या व्यवस्थापन जबाबदारी घेतली. पुढील काळात माझ्या सर्वच कामांचा तो खंबीर आधार बनला. अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या माझ्या पत्नीनं - गीतांजलीनं माझ्या सर्वच कामांना खंबीर साथ दिली. (गीतांजली मुळची गुजराथी. आमचा ठरवून केलेला आंतरजातीय आणि आंतरराज्यीय विवाह. जातिअंताच्या लढ्यातील एक हत्यार म्हणून प्रत्येक सेवादल सैनिकाने आंतरजातीय विवाह करायला हवा, असं माझं ठाम मत विद्यार्थिदशेपासूनच होतं. आमच्या घरात अनेकांनी पुढे या पावलावर पाऊल ठेवलं.) 

पुण्यात वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून व्यवसाय करणाऱ्या माझ्या पंचवीस मित्रांनी महिन्यातून एक-एक रविवार देण्याचं कबूल केलं. तिथल्या स्थानिक व्यवस्थापनाची जबाबदारी कमलेश हजारे, गौतम ओव्हाळ आणि नाना घोणेंनी उचलली. प्रत्येक रविवारी किमान चार विषयाच्या तज्ज्ञांना नेण्याचे ठरवले. त्यासाठी एक जुनी पद्मिनी कार खरेदी केली. अशा रितीनं परंदवडीच्या भारत यात्रा केंद्रातील आचार्य नरेंद्र देव भवनाच्या वास्तूत हे आरोग्य चिकित्सा केंद्र काम करू लागलं. खेड्यांतील लोकांना कोणत्या तज्ज्ञाला काय आजार दाखवायचा हेही कळायचं नाही. यासाठी सोप्या मराठीत कोणत्या तज्ज्ञाला काय दाखवाल?' याची माहिती देणारी पत्रकं गावोगाव वाटली. 'हा नेहमीसारखा दवाखाना नाही, इथं ना गोळ्या मिळतात, ना टोचलं जातं, ना सलाईनची बाटली लावतात, नुसतेच मोठे डाक्टर चिठ्या फाडाया येतात.' या भावनेमुळे सुरुवातीचे कित्येक रविवार, एखाद-दुसरा रुग्ण बघून परतावं लागे. हे चित्र पालटलं दोन रूग्णांमुळे. एक दिवशी गावकरी एका मध्यमवयीन रुग्णाला घेऊन आले. “काय सांगायचं. एकदम ठीक असतो. पण मधंच काय व्हतं, देवालाच ठाऊक. ह्याला काय बी समजत नाय. डोके चक्कर झाल्यागतच करतो. छाती काय बडवितो, धापा काय टाकतो. सगळे इलाज करून झाले, पार मांत्रिक बी झाले. कळलं, इथं लय मोठे शिकल्याले डाक्टर येतात. म्हणलं बघावं त्यांचं तरी डोकं चालतं का!"

मी त्या रुग्णाशी बोललो, त्याला तपासलं आणि मी तपासत असतानाच त्याला तो 'यडाचा झटका' आला. क्षणार्धात माझ्या डोक्यात प्रकाश पडला. कार्डिओग्रामच्या यंत्रावर हृदयाचा आलेख काढला आणि उत्तर मिळालं. त्याला हृदय स्पंदन दोषाचे झटके येत होते. अचानक घडणाऱ्या या धडधडीनं त्याच्या धमन्यांमधील रक्त उसळून डोक्यात घणाचे घाव पडल्यासारखं होत होतं. मी थोडा धोका पत्करून त्याच्या मानेच्या रक्तवाहिनीला मसाज दिला (कॅरोटिड मसाज) आणि स्पंदनं नियमित झाली. क्षणार्धात तो पूर्ववत झाला. गावकरी श्वास रोखून सारं पहात होते. त्यांच्या दृष्टीनं हा चमत्कार होता. मांत्रिकाच्या मिरचीच्या धुरीनं जे झालं नाही ते या 'डाकटर'नं हाताच्या अंगठ्यानं हळुवारपणे केलं. त्याच्या आजाराचं स्वरूप आणि त्या मागचं विज्ञान त्यांना समजावून सांगितलं. औषधं लिहून दिली. महिन्यानं तो परतला तो पायावर लोटांगण घालत 'मला माणसांत आणलं' म्हणत. अनेक वेळा आरोग्याच्या प्रश्नांची उकल केवळ अपुऱ्या ज्ञानामुळे होत नसते आणि त्यामुळे सामान्य माणसं मात्र विज्ञानावरचा विश्वास उडून अंधश्रद्धांचे बळी ठरतात. दुसरा रुग्ण, एक म्हातारी आजी. पायाची वर्षभर चिघळलेली, बरी न होणारी जखम घेऊन आली. ग्लुकोमीटरवर रक्तातील साखर तपासली तर मधुमेहाचे निदान झालं. औषधांनी मधुमेह आटोक्यात येताच पंधरा दिवसांत जखम भरली. या दोन रुग्णांमुळे केंद्राची प्रसिद्धी गावोगाव पसरली. रुग्णांचा ओघ वाढू लागला. पुढे मग लॅबोरेटरी, डिस्पेंसरी अशा सुविधांची भर घातली. बघता बघता या केंद्रावर 240 खेड्यांमधून रुग्ण येऊ लागले.

30 सप्टेंबर 1992. गणपती विसर्जनाचा दिवस. मध्यरात्रीनंतर भूकंपाच्या जोरदार धक्क्यानं सारं पुणं जागं झालं आणि काही मिनिटांतच विशेष काही नाही म्हणून पुन्हा निद्रेच्या आधीन झालं. सकाळी उठल्यावर कळलं की लातूर आणि उमरगा जिल्ह्यांत या भूकंपानं वीस हजार लोकांचे प्राण घेतले. डॉ.नितीन केतकर, डॉ.विजय सेटिया, प्रकाश देशपांडे, साताऱ्याचे मित्र डॉ.गिरीश पेंढारकर यांच्याशी बोललो आणि तातडीनं वैद्यकीय पथक घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. युद्धपातळीवर धावपळ करून प्रचंड वैद्यकीय सामग्री दिवसभरात जमवली आणि माझ्या मारुती व्हॅनच्या टपावर मोटू सारखं सामान रचून, रात्रभर प्रवास करून भल्या पहाटे लातूरला पोहोचलो. पुढचे काही दिवस शेकडो रुग्णांवर उपचार केले. परतीच्या वाटेवर रात्रभर सुन्न होऊन विचार करत होतो. सरकारी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा किती अपुरी पडते आणि तरीही सरकार खोटे दावे करत रहातं, हे तर प्रत्यक्ष पाहिलं; पण वाचलेली धडधाकट माणसं इतरांना मरताना पाहूनही वैद्यकीय ज्ञानाअभावी काहीच करू शकत नाहीत, हे वास्तव समोर आलं. विविध आपत्तींत त्या जागी कोणत्याही सरकारी यंत्रणेच्या आधी पोहोचतो तो सर्वसामान्य स्थानिक माणूस. ज्याला 'फर्स्ट रिस्पाँडर' असं म्हणतात. मग याच माणसांना आपत्ती व्यवस्थापन आणि वैद्यकीय मदतकार्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देऊन एका संघटनेच्या भक्कम धाग्यात बांधलं तर? आपल्या देशातीलच नाही तर जगातल्या सर्व गरीब देशांतील आपत्ती व्यवस्थापनाचं चित्र पालटून जाईल.प्रचंड श्रमानं थकलेल्या माझ्या पथकाला घेऊन गाडी पुण्याजवळ पोहोचत होती. उजाडायला सुरुवात झाली होती. 

सूर्याच्या प्रकाशानं उजळलेलं आकाश पाहिलं आणि मनावरचा खिन्न झाकोळ सरला. मी मनोमन निर्णय घेतला की अशीच संघटना उभी करायची आणि तिचं नाव 'आरोग्य सेना' ठेवायचं. मनात हा विचार आला त्यावेळी सूर्याची पहिली किरण, थकून निद्राधीन झालेल्या माझ्या सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर पडत होती. कोणाला तरी जाग येऊन त्यानं मला विचारलं, 'झोपला नाहीस?' लातूरच्या वेदनांचं मनावरचं मळभ पूर्ण दूर झालं होतं. 'आरोग्य सेने'ची कल्पना आशेचा नवा किरण घेऊन आली होती. स्मितहास्य करीत मी म्हणालो, 'आत्ताच तर जाग आली!' पुण्याला परतताच झपाट्यानं कामाला लागलो. पुढचं दीड वर्ष आपत्ती व्यवस्थापन आणि वैद्यकीय मदतकार्यावर प्रचंड माहितीचं संकलन केलं. अमीर शेखांच्या मदतीनं सिद्धार्थ रुग्णालयात अनेक उपचार पद्धतींचं चित्रण केलं आणि पहिल्या अभ्यासक्रमाच्या शंभर स्लाईडस् तयार केल्या. भारत यात्रा आरोग्य चिकित्सा केंद्राच्या कार्यकर्त्यांनी पहिल्या रविवारी 3 ते 4 गावांत जाऊन 'आरोग्य सेना' नावाची संघटना स्थापण्याची माझी कल्पना सांगायची. त्याच्या पुढच्या रविवारी मी प्रत्यक्ष स्वतः त्या गावांना जायचं आणि गावकऱ्यांना हे प्रशिक्षण काय असणार आहे, ते सांगायचं आणि त्यानंतरच्या रविवारी केंद्रावर दिवसभराचं प्रशिक्षण ठेवायचं, असा कार्यक्रम ठरला. 12 मार्च 1995 रोजी बेडसे गावातील सरपंचांच्या पडवीत मी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत आरोग्यसेनेची स्थापना केली. त्यानंतर सुरू झाली खेड्यांची पायपीट. गावांतील मंदिर किंवा पारांवरच्या बैठका. अनेकदा गाडी बाजूला लावून चिखल तुडवत जावे लागे. डोंगरगावसारख्या गावाला जाण्यासाठी दमछाक करणारी चढाव चढाव लागे. पण या सर्व प्रयत्नातून प्रत्येक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी किमान पंचवीसएक गावकरी येत. विशेष म्हणजे ही मंडळी दिवसभराचं हे प्रशिक्षण उत्साहानं पूर्ण करीत आणि त्यानंतर सुशिक्षितांनाही लाजवतील असे प्रश्न विचारीत. 

सत्तावीस गावांमधील अडीचशे लोकांनी हे प्रशिक्षण पूर्ण केलं. प्रशिक्षणाच्या आधारे माणसं जागोजागी आरोग्य सैनिकाचा बॅच लावून मदतीला उभे राहायला लागली. पण माझे स्वप्न ही संघटना राष्ट्रव्यापी करण्याचं होतं, संघटनेला व्यापक वैचारिक पाया देण्याचं होतं. मावळातील पायपीट हे स्वप्न साकार करायला पुरी पडणार नव्हती. संघटनेच्या कामाचं केंद्र पुण्यासारख्या मोठ्या शहरात हलवण्याची गरज होती. याच सुमारास काही अनपेक्षित घडामोडींमुळे तब्बल आठ वर्षांच्या सेवेनंतर हे केंद्र बंद करण्याचा दुःखद निर्णय मला घ्यावा लागला आणि आरोग्य सेनेच्या कार्याचं केंद्र आपोआपच पुणे झालं. यानंतर आरोग्य सेनेची घोडदौड अधिकच जोमानं सुरू झाली. आरोग्य सेनेचं प्रशिक्षण विविध स्तरांतील युवक-युवतींना आकर्षित करू लागलं. प्रशिक्षणांसाठी कालानुरूप बदल होत राहिले. अणु, रासायनिक, जैविक युद्धांसारख्या नव्यानव्या विषयांचा समावेश होत राहिला. प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक तंत्रांचा वापर आम्ही करायला लागलो. बघता-बघता आरोग्य सेना महाराष्ट्राच्या दहा जिल्ह्यांत पसरली. कधी शाखा स्थापन होऊन प्रशिक्षण झालं, जवळपास आपत्ती कोसळली आणि आरोग्य सैनिकांनी तातडीनं धावून भरीव वैद्यकीय मदत केली. तर कधी आरोग्य सेनेच्या मदतकार्यानं प्रभावीत होऊन त्या-त्या भागांतील लोकांनी आरोग्य सेनेच्या शाखेची स्थापना केली. बाहेरच्या राज्यातील बहुसंख्य शाखा याच पद्धतीनं स्थापन झाल्या. त्सुनामीतील मदतकार्यानंतर तामीळनाडू राज्यात, भूकंपातील कामानंतर काश्मीरमध्ये, चिकनगुनियातील कामानंतर केरळमध्ये. आज आरोग्य सेनेचे चौदा हजार सैनिक देशभर पसरलेले आहेत. या सैनिकांत तरुण मोठ्या संख्येनं आहेत. आपत्ती व्यवस्थापनाला जनचळवळीचं स्वरूप देण्यासाठी झटत आहेत. मी स्वतः माझ्या निष्ठावान सहकाऱ्यांसह देशभर भ्रमंती करतो आहे. देशात आपत्ती व्यवस्थापन या विषयाची चर्चाही होत नव्हती त्या काळात आरोग्य सेनेनं हा विषय खेड्यापाड्यांत पोहोचला हे लक्षात घ्यायला हवे. सरकारी मदत काय, इतर कोणीही पोहोचण्यापूर्वी आरोग्य सेनेची पथकं अनेक आपत्तींमध्ये जिवाची पर्वा न करता पाहोचली आहेत आणि यापुढेही पोहोचत राहतील. आरोग्य सेनेच्या सर्वच मोहिमांत कधी चित्तथरारक तर कधी हृदय हेलावणारे अनुभव आले.

खवळलेल्या कृष्णेच्या पात्रातून सांगली जिल्ह्यातील हरिपूरला आणि कोसळलेल्या कड्यांवरून खोल वाहणाऱ्या झेलमच्या पात्राकडे पहात भारत-पाक सीमेजवळील ईशम या गावाला पोहोचवलेली वैद्यकीय मदत जशी कायम स्मरणात राहील; तशीच ईशम गावात पोहोचल्यावर मी नको नको म्हणत असताना उद्ध्वस्त घराच्या ढिगाऱ्याखालून कपबशा शोधून भारतीय लष्करानं नुकत्याच दिलेल्या दुधाचा चहा देत 'आप तो फरिश्ते हो। मेरा बच्चा दूध बगैर मरेगा नही, लेकिन दवाँ के बिना जरूर मर जाता।' असं म्हणणारी काश्मिरी बाई स्मृतिपटलावरून कधीच पुसली जाणार नाही. निधडेपणानं आपत्तींची आव्हानं पेलणारे हे आमचे सैनिक आपत्ती येण्याची प्रतिक्षा न करता सार्वजनिक आणि सामाजिक आरोग्यांची आव्हानंही समर्थपणे पेलत आहेत, हे मला अधिक महत्त्वाचं वाटतं. आरोग्य सेनेनं आपल्या कामानं 'आरोग्य' या शब्दाच्या व्याख्येचा परीघच विस्तारून टाकला आहे. आज स्वातंत्र्य मिळून सहा दशकांनंतरही 83 कोटी 60 लाख लोकांचं रोजचं दरडोई उत्पन्न 20 रुपये आहे. 39 कोटी 49 लाख कामगार असंघटित क्षेत्रांत काम करीत आहेत. आणि या एवढ्या प्रचंड जनतेच्या आरोग्यासाठी देशाच्या अर्थसंकल्पात तरतूद आहे जी.डी.पी.च्या 0. 9% एवढीच. पाकिस्तान (1%), नेपाळ (1.5%), बांगलादेश (1.6%), श्रीलंका (1.8%), चीन (2%) आणि ब्राझील (3.2%) हे देशही आपल्या पुढे आहेत ही खेदाची बाब आहे. सार्वजनिक आरोग्यावरील खर्चात जगातील 175 देशांत भारताचा क्रमांक 171वा लागतो, पण खाजगी खर्चात मात्र 18वा लागतो. आधीच भ्रष्टाचारानं पोखरलेल्या, राजकीय दूरदृष्टीचा अभाव असलेल्या, गोरगरीबांच्या हिताची जाणीव मेलेल्या आपल्या देशात यामुळे सार्वजनिक आरोग्याची यंत्रणा दयनीय अवस्थेत असल्यास आश्चर्य वाटायला नको. 

आपल्या देशात शासकीय आरोग्य व्यवस्थेत फक्त पाच लाख डॉक्टर्स, साडेसात लाख परिचारिका आहेत. 15 हजार शासकीय रुग्णालयं, 23 हजार प्राथमिक आरोग्य केंद्र, सव्वालाख उपकेंद्र आहेत. 30% प्राथमिक उपचार या केंद्रांत होतात, बाकी सर्व खाजगी वैद्यकीय यंत्रणेच्या हातांत. अनेक केंद्रांत जीवनावश्यक उपचार साधने आणि औषधे नसतात. अनेकांत डॉक्टर्स उपलब्ध नाहीत. शासकीय आणि खाजगी डॉक्टर्स मिळून 10 हजार लोकसंख्येमागे आपल्या देशात फक्त 43 डॉक्टर्स आहेत, जी संख्या किमान 100 हवी. एक लाख लोकसंख्येमागे शासकीय रुग्णालयांत 94 पलंग आहेत, जी संख्या किमान 333 हवी. अशा पार्श्वभूमीवर सरकार सार्वजनिक आरोग्याच्या यंत्रणेतून पाय बाहेर घेत चाललं आहे. ही यंत्रणा खाजगी उद्योगांच्या घशात घालत आहे. वैद्यकीय पदव्या तर कोट्यवधी रुपयांना बाजारात विक्रीला आहेत. वैद्यकीय व्यवसाय एक धंदा बनत चालला आहे. मला वाटतं हे थांबवलं पाहिजे आणि यासाठी आरोग्य सेनेनं लढलं पाहिजे. अर्थात प्रश्न अनेक आहेत, लढणारे हात कमी आहेत. आजही कोट्यवधींना पिण्याचं शुद्ध पाणी मिळत नाही, कोट्यवधींना साधे संडास नाहीत, सार्वजनिक स्वच्छतेच्या अभावानं होणाऱ्या संसर्गजन्य आजारांच्या साथीचा हजारो लोक मरतात, हजारो गरोदर स्त्रिया आणि अर्भकं प्राण गमावतात, लाखो बालकं कुपोषणानं बळी पडतात. एड्स, कर्करोग, क्षयरोग, हृदयरोग हे पुन्हा नवी आव्हानं घेऊन उभे आहेत. प्रदूषणाचा राक्षस आटोक्याबाहेर जाऊ लागला आहे. जागतिक तापमानवाढीमुळे होणारे पर्यावरणातील बदल तर नवी संकटं घेऊन येणार आहेत. अधिक नैसर्गिक आपत्तींना, अतिवृष्टी आणि अवर्षणाच्या चक्रांना सामोरं जायला लागणार आहे. देशाचं संरक्षण या शत्रूंपासून करण्याची गरज आहे. यासाठी देशाची सार्वजनिक आरोग्य यंत्रणा आमूलाग्र सुधारण्याची गरज आहे. 

सर्वसामान्य जनतेला सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नांवर कैफियत मांडण्यासाठी आणि सामाजिक आरोग्याला धक्का देणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी आम्ही 'आरोग्य अदालत' या अभिनव व्यासपीठाची सुरुवात 13 फेब्रुवारी 2005 रोजी केली. ही अदालत प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी सकाळी 10 वाजता पुण्यातील एस.एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन येथे भरते. अदालत सुरू केल्यापासून जनतेनं अनेक महत्त्वाचे प्रश्न अदालतीपुढे दाखल केले आणि योग्य प्रश्नांसाठी आरोग्य सेना वेळप्रसंगी रस्त्यांवरही उतरली. अदालत सुरू करण्यापूर्वीही आरोग्य सेनेनं सर्वेक्षणांच्या अभिनव माध्यमांतून कॅडबरीतील आळ्या, शीतपेयांतील घाण, जैविक कचऱ्याची विल्हेवाट, तरण-तलावांची सुरक्षितता असे अनेक प्रश्न धसास लावले. अदालतीच्या स्थापनेनंतर आरोग्य सेना अनेक मोठ्या प्रश्नांत उतरली. मरकळ येथील टंडन मेटल या शिसे प्रदूषण करणाऱ्या कारखान्याच्या आणि उरळी येथील प्रदूषणाचे सर्व नियम पायदळी तुडवणाऱ्या पुणे मनपाच्या कचरा डेपोच्या विरोधात प्रचंड मोर्चे काढले, पुणे मनपाच्या रुग्णालयांच्या खाजगीकरणाच्या विरोधात आंदोलनं केली, राष्ट्रीय एकात्मतेला धक्का देणाऱ्या राज ठाकरे-अबू आझमी यांच्याविरोधात दंड थोपटले. अशा असंख्य प्रश्नांना आरोग्य सेना निर्भयपणे भिडते आहे. देशापुढील जातीयवाद, धर्मांधता, प्रांतवाद, दहशतवाद, भ्रष्टाचार ही आव्हानंही आरोग्य सेनेला महत्त्वाची वाटतात. 

संघटनेचा आवाज जनतेपर्यंत अधिक परिणामकारकरित्या पोहोचवण्यासाठी आरोग्य सेनेनं 'जनगर्जना' नावाचं साप्ताहिकही 1 एप्रिल 2008 : एस.एम. जोशी यांच्या स्मृतिदिनी सुरू केलंय. सध्या हे साप्ताहिक आरोग्य सेनेच्या www.arogyasena.org या वेबसाईटवर दर गुरुवारी प्रसिद्ध केलं जातं. सध्यातरी आर्थिकदृष्ट्या ते छापणं परवडणारं नाही. आरोग्य सेना सरकारकडून वा आंतरराष्ट्रीय स्रोतांकडून आर्थिक मदत घेत नाही. ती हितचिंतकांच्या पाठबळावर चालत आली आहे. या हितचिंतकांतील बहुसंख्य माझे पेशंटस् आहेत, हे मला आवर्जून सांगितलं पाहिजे. माझं क्लिनिक हेच आरोग्य सेनेचे राष्ट्रीय मुख्यालय आहे आणि तिथली आरोग्य सेनेच्या कामाची सर्व धामधूम सहन करीत माझे पेशंटस आमच्या कामावर प्रेम करीत वर आर्थिक पाठबळ देतात ह्याचं मला अप्रूप वाटतं. सार्वजनिक आरोग्य यंत्रणेबद्दल टीका करीत असताना, एक गोष्ट माझ्या लक्षात आली की, गरिबांचा बहुसंख्य पैसा हा वैद्यकीय चाचण्या आणि औषधांवर खर्च होतो. हे पहाता प्रकर्षानं वाटायला लागलं की गोरगरिबांना अल्प दरांत सेवा पुरविणाऱ्या डायग्नॉस्टिक सेंटर्सचं जाळं उभारलं तर त्यांचा भार हलका होईल. याच विचारानं आम्ही आरोग्य सेनेचं पहिलं चॅरिटेबल डायग्नोस्टिक सेंटर पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील धायरी येथे दहा महिन्यांपूर्वी सुरू केलं. या केंद्रात पॅथॉलॉजी, एक्स-रे आणि ईसीजी या सुविधा 50% पेक्षा कमी दरांत उपलब्ध करून दिल्या आहेत. नजिकच्या भविष्यात तिथे सोनोग्राफी, टू-डी एको अशा सुविधा उपलब्ध करण्याचा मानस आहे. अशा केंद्रांचं जाळं उभारण्याचं स्वप्न आम्ही पहात आहोत. 

या केंद्रांचा आरोग्य सेनेच्या स्थानिक शाखांचं कार्यालय म्हणून दुहेरी वापरही होऊ शकतो. कारण आरोग्य सेनेला कार्यालयांवर स्वतंत्र खर्च करणं परवडणारं नाही. संघटनेकडे येणाऱ्या पैशांचा जास्तीत जास्त वापर हा सेवाकार्यावर व्हायला हवा, यंत्रणेवर नाही असं मला वाटतं. हृदयरोग हा माझा विषय. मुंबईतील शिक्षणानंतर काही वर्षांनी मी इस्रायल सरकारची शिष्यवृत्ती घेऊन तेल अविव जवळील 'बेलिंसन रुग्णालयाच्या हृदयरोग विभागात उच्च प्रशिक्षण घेऊन आलो. पाश्चात्त्य देशांत हृदयरोगाचं प्रमाण घटत आहे आणि दुसरीकडे भारतासारख्या गरीब देशात ते वेगानं वाढत आहे. पुढील दशकात हृदयरोगामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्येत शंभर टक्के वाढ होणार आहे. हृदयरोगावरील उपचारांचे खर्च गरीबांच्याच नाही तर मध्यमवर्गीयांच्याही आवाक्याबाहेरील आहेत. यासाठी हृदयरोग प्रतिबंध हाच उपाय आहे. हृदयरोग प्रतिबंध ही देशव्यापी चळवळ म्हणून राबवली तरच हे शक्य आहे. या विषयावर मी गेली 20 वर्षे काम करीत आलोय. अनेक संघटनांना मदत केली, लेख लिहिले, व्याख्यानं दिली. शेवटी वाटायला लागलं की हृदयरोग प्रतिबंधाचा झालेल्या स्वतंत्र व्यासपीठाची गरज आहे. यातूनच आम्ही 'सहृदय' या आरोग्य सेनेच्या धाकट्या भावंडाची स्थापना केली. दोन वर्षांतच सहृदयनं दमदार वाटचाल केली आहे. हृदयरोग प्रतिबंधावर व्याख्यानं आयोजन, पुस्तिका, सीडी प्रकाशन, वर्षाला किमान हजार रुपये देणाऱ्या देणगीदारांच्या मदतीनं उभारलेल्या 'सहृदय निधी'तून आर्थिकदृष्ट्या गरजूंना हृदयशस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत आणि गरिबांसाठी मोफत हृदय रोग निदान शिबिरं अशा विविध पद्धतीनं सहृदय कार्यरत आहे. हृदयरोगतज्ज्ञ म्हणून विविध वैद्यकीय परिषदांच्या निमित्तानं मला आजवर 21 देशांना भेट देण्याची संधी मिळाली. 

नुकतीच माझी अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स रुग्णालयातील हृदय रोग प्रतिबंधक विभागाचे अध्यक्ष डॉ.रॉजर ब्ल्यूमेंथॉल आणि ग्लोबल  टोबॅको कंट्रोल इंन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ.जोनाथन समेट यांच्याशी बाल्टिमोर येथे आणि 'कँपेन फॉर टोबॅको फ्री कीडस्'च्या कायदा सल्लागार श्रीमती पॅट्रिशिया लँबार्ट यांची वॉशिंग्टन येथे भेट झाली. मलाही हृदयरोग प्रतिबंधासाठी स्वतंत्र संस्था उभारायला हवी असं वाटतं. माझी ओळख हृदयरोगतज्ज्ञ या बिरुदाऐवजी हृदयरोग प्रतिबंध तज्ज्ञ (प्रिव्हेंटिव्ह कार्डिऑलॉजिस्ट) अशी झालेली मला अधिक आवडेल. आपल्या देशाला हृदय रोग प्रतिबंधक शाखेची अधिक गरज आहे. कारण, हृदयरोगावरील उपचारांचा खर्च गरीबच नाही तर मध्यमवर्गीयांच्याही आवाक्याबाहेरचा आहे. आयुष्याच्या प्रवासात आपल्या देशापुढील, समाजापुढील अनेक प्रश्न मला महत्त्वाचे वाटले आणि त्या प्रश्नांवरची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न मी माझ्यापरीनं करीत राहिलो. हे करीत असताना समाजवादी राजकीय विचारधारेवरचा माझा विश्वास अढळ राहिला. आरोग्य सेनेच्या सैनिकांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा वैचारिक गाभा समाजवादच आहे. समाजवादी विचाराची वेगळ्या पद्धतीनं मांडणी करण्याचा तो प्रयत्न आहे. केरळमधील आरोग्य सेनेचं प्रशिक्षण संपल्यावर तेथील समाजवादी नेते जोशी जेकब मला म्हणाले, 'अरे, हे तर समाजवादी कार्यकर्ता प्रशिक्षणच आहे.' अगदी खरं आहे त्यांचं म्हणणं. कारण या देशाचे चित्र पालटण्याचं सामर्थ्य समाजवादी विचारधारा निश्चित आहे, असा माझा विश्वास आहे. अर्थात याच विश्वासावर देशभर शेकडो कार्यकर्ते असंख्य आंदोलनं चालवीत आहेत. पण वास्तव हे आहे की, समाजवादावर विश्वास असणाऱ्या या विखुरलेल्या ताकदींचं रूपांतर एकजिनसी समाजवादी राज्य पक्षात झाल्याशिवाय राजकीय परिवर्तन होणार नाही. ही नवी राजकीय शक्ती प्रखर राष्ट्रवादावर निष्ठा असणारी हवी. दलित, आदिवासी, महिला, कष्टकऱ्यांना आपली वाटणारी हवी, तशी विज्ञानाच्या क्षेत्रातील नव्या बदलांशी नातं जोडत संगणक युवकांनाही आपली वाटायला हवी. यासाठीच 'आरोग्य सेने'नं फक्त सामाजिक परिवर्तनाच्या तुरुंगात बंदी होऊ नये, असं मला वाटतं.

(समाप्त)
 

Tags: सार्वजनिक आरोग्य यंत्रणा समाजवाद हृदयरोग सहृदय public health system आरोग्य सेना socialism heart disease benevolence health forces weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. अभिजित वैद्य ( 14 लेख )

प्रसिद्ध हृदय रोग विशेषज्ञ, 'पुरोगामी जनगर्जना' या मासिकाचे संपादक 




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके