डिजिटल अर्काईव्ह

बारडोली तालुक्यातील वराड गावी 14 नोव्हेंबर 1928 रोजी भाऊबीजेच्या दिवशी तेथील भगिनींनी सरदार वल्लभभाईंना मानपत्र प्रदान केले. सत्याग्रहाच्या काळात येथील महिला भजने गाण्यात प्रख्यात झाल्या होत्या. सरदारांनी आपल्या रांगड्या भाषेत त्या मानपत्राला दिलेले उत्तर पुढील लेखात उद्धृत केले आहे.

(महादेवभाईनी डायरी खंड 12 मधून) 

बारडोली सत्याग्रहानंतर सरकारने 28 ऑक्टोंबर 1928 रोजी तपास-समिती नेमली. मि. ग्रूमफिल्ड आणि मि. मॅक्सवेल यांनी बारडोली तालुक्याच्या गावांची महसुली चौकशी 15 नोव्हेंबर 1928 पासून सुरू केली. गावोगावी, तपासणी करणारे अंमलदार येतील, त्यांची प्रतीक्षा लोक करीत होते. आपली हकीकत त्यांच्यापुढे मांडण्यासाठी लोक उत्सुक होते. ‘तपासणी करणारे साहेब अचानक आले तर आम्हांला कसे कळेल?’ असे लोक वल्लभभाईंना विचारीत. ‘त्यांना तपासणी करायची का गंमत करायची? तुम्हांला कळवल्याशिवाय ते कसे येतील?’ लोक त्यावर सांगत, ‘हे तर ठीक, पण आमच्याकडे अलीकडे खूप साहेब येऊ लागलेत. सत्याग्रहानंतर तर वर्तमानपत्रवाले साहेबही बरेच येतात, त्यामुळे कळायला तर हवे ना?’ वल्लभभाई हसून म्हणत, ‘बरे, कोणी कळवल्यावाचून असा साहेब आला तर विचारा त्याला की, काय गडी नांगर न्यायला आलात की काय?' सारे हसायला लागले! पण सर्वांना कळले, तपासणीस येणारा साहेब म्हणजे कोणी असाधारण असामी नाही की जिचे भय वाटावे! 

भगिनींचे सन्मानपत्र

या दरम्यान स्त्रियांनी काय करावे? त्यांच्यासाठी वल्लभभाईंनी काम तयारच ठेवले आहे! बारडोली सत्याग्रहात महिलांनी जेव्हा पुढाकार घेऊन भाग घेण्यास सुरुवात केली होती तेव्हापासून सत्याग्रहाची कळा काकणभर अधिक उमलण्यास आरंभ झाला होता. तसेच या समाजसुधारणेच्या बाबतीत आहे. महिलांनी सरदारांच्या समक्ष आपले अंतःकरण किती मोकळेपणाने मांडण्यास सुरुवात केली त्याचा नमुना पाहायचा असेल तर त्यांनी सरदारांना अर्पण केलेले वराडचे मानपत्र वाचावे. मानपत्रात त्यांनी आपल्या मुलीबाळींसाठी, स्वतःसाठी 'संस्कारी शिक्षणा'ची मागणी केली आहे. बाराव्या-तेराव्याची रडारड, काडीमोड, पाट लावणे वगैरे रिवाजांनी जनावरांसारखी होणारी त्यांची दशा टाळण्याची मागणी महिलांनी प्रस्तुत केली आहे! आणि एक व्यक्तिगत तक्रारही मांडली आहे: आमचे घरधनी व बंधुवर्ग दूर देशांतरी जातात. पाच पाच वर्षांनी परततात. शेतीत त्यांचे चित्त रमत नाही. पुन्हा देशांतरी जातात आणि आमच्या वाट्याला घरातला कोपरा सांभाळणेच येते. अशा काही व्यवस्था करा की आम्हांलाही त्यांनी परदेशी न्यावे. अथवा देशान्तरी न जाता शेतीत लक्ष घालावे.

भाऊबीजेचा दिवस. भगिनींनी ही मागणी केली. वल्लभभाईंचेही मन द्रवले. त्यांनी भावनावश उत्तर दिले: ते म्हणाले, 'तुम्ही शिक्षणासाठी मागणी केली आहे. शिक्षण दोन प्रकारचे आहे: एक शिक्षण माणसाला माणुसकीचे भान देते. दुसरे माणसातली माणुसकी हिरावून घेते. माणसाला मदोन्मत्त बनवते. पहिलेच खरे शिक्षण. जर तुम्हांला अशी हौस असेल की शहरी महिलांप्रमाणे तुम्ही बारीक मुलायम साडी आणि बूट घालायला शिकावे, स्वयंपाक करायला सोडचिठ्ठी द्यावी, फाटले सांधायचे सोडून द्यावे तर अशा प्रकारच्या शिक्षणाची व्यवस्था मी तुमच्यासाठी करू शकणार नाही. हे तर हाताबाहेर नेणारे शिक्षण. शेतांतली तुमची कामे तर कधी संपणार नाहीत. शेतांतून तुम्हांला कोणी खेचून बाहेर नेऊ शकणार नाही, असे शिक्षण तुमचे खरे शिक्षण. दुनियेत कमीअधिक प्रमाणात आपण सारेच गुन्हेगार आहोत. पण जो घाम गाळून शेतात अन्न पिकवतो, आणि दुनियेसाठी अन्न-वस्त्राची तरतूद करणारी सामग्री निर्माण करतो तो जगात कमीत कमी अपराधी. म्हणून तुम्हांला, तुम्ही जे उत्तम कार्य करीत आहात ते सोडायला लावील असे शिक्षण देण्यास मी कधी तयार होणार नाही. तुम्हांला थोडे अक्षरज्ञान जरूर मिळावे, पण तुम्हांला सुतक शोकातील रडारड, बाल विवाहाची कुप्रथा इत्यादींस साफ नकार देणे वगैरे शिक्षण देण्याची जरूरी आहे. हे शिक्षण देण्याची माझी इच्छा आहे. मुला-मुलींना लहान वयात गुलाम बनवण्यात कसला आला मोठेपणा आणि परंपरा? माझ्या मुलाचा विवाह मी विसाव्या वर्षी 11 रु. खर्च करून केला आणि मुलगी 24 वर्षांची झाली तरी अजून अविवाहितच आहे.

मी तर तुम्हांला तीन गोष्टी समजावू इच्छितो. तुम्ही आपली औलाद सुधारा- नीट संगोपन करा. आपल्या गुराढोरांची औलाद सुधारा. आपल्या पिकांची औलाद सुधारा. तिन्ही बाबतीत दिवसेंदिवस तुम्ही क्षीण होत आहात. तुम्ही मला विचारता, तुमचे पती तुम्हांला परदेशात बरोबर का नेत नाहीत? पण खरे सांगू, तेथील त्यांची स्थिती धेड-भंग्यांसारखी आहे! तेथे तुम्हांला नेऊन काय करणार? तुम्हांला तेथे नेले तर खऱ्या स्थितीचा पत्ता लागेल भांडे फुटेल! तेथे परदेशात जाऊन वाळीत टाकल्यासारखी स्थिती भोगण्यापेक्षा येथल्या गुलामीतून सुटण्याचा तुम्ही प्रयत्न करा; ते अधिक चांगले. परदेशात आपला मजूर आणि मोठे गायकवाड महाराजा यांची दशा सारखीच आहे. त्या दशेत सापडण्यापेक्षा येथेच राहिले तर काय वाईट? आणि तुम्ही येथे राहाण्यासाठी पण तुमची उन्नती करून घेणे आवश्यक आहे. सर्व उन्नतीची गुरुकिल्ली स्त्रियांच्या प्रगतीत आहे. इतके जर उमजले तर पहिला अध्याय पूर्ण झाला असे मानावे.

या उन्नतीच्या पंथावर नेल्याविना मी तुम्हांला सोडणार नाही. तुम्ही मला सोडले तरी मी सोडणार नाही. मला तर एका तालुक्याचा दाखला देऊन सर्व देशाला पाठ द्यायचा आहे. म्हणूनच मी अजूनही माझी छावणी टाकून बसलो आहे. या छावणीतले कार्यकर्ते त्यागी आहेत. या लोकांच्या सहवासात तुम्ही खूप शिकू शकाल. मला तर खेद आहे की माझ्या हिऱ्यासमान सहकाऱ्यांचा पूर्ण उपयोग होऊ शकत नाही. रत्ने धुळीत तुडवली जातात की काय अशी भीती वाटते. त्यांच्यापाशी तुम्ही तुमच्या कुप्रथांना तिलांजली देण्यास शिका; आणि तुमची औलाद सुधारा. तुमच्या जनावरांच्या औलादीची तुम्हांला काही काळजी पडलेली दिसत नाही. गोपालन तुम्हांला माहीत नाही. तुमच्या म्हशीपण धष्टपुष्ट वा मणमण दूध देणाऱ्या दिसत नाहीत. आणि पिकांच्या औलादीची, शेतीच्या औलादीची तर तुम्हांला पर्वाच नाही. शेतकरी अडाणी मानला जातो. शंभर शंभर बिघे जमीन कसूनही शेतकरी दळभद्री तो दळभद्रीच. पीक कसे घ्यावे, बियाणे कोणते लावावे, शेतीचा हिशोब कसा ठेवावा यांतल्या एकाही गोष्टीची शेतकऱ्याला माहिती नसते. आपले धान्य व्यापाऱ्यास विकून तो त्याच्याकडून ते परत विकत घेतो. आपला कापूस विकून विलायती कापड अथवा मिलचा कपडा तो विकत घेतो. आणि विक्री व खरेदीत दोन्ही बाजूंनी तो मार खातो. हे सर्व तुम्हांला जोवर समजत नाही, तोवर या तालुक्यातील माझे फेरे बिनकामी आहेत. मला तुमच्या दशेचा विचार करता झोप येत नाही. मला तर तुम्हांला तुमच्या ज्वारीची भाकरी खाऊ घालावयाची आहे व तुमच्या कापसाची खादी अंगावर चढवायची आहे. ज्या भगिनीला शेतात कपाशीच्या तोडणीचे व साठवणीचे काम करावयाचे तिला मुलायम साडी कशी चालेल? तिला तर मणभर कापूस सामावेल असे जाडे लुगडे हवे.

या साऱ्याची सुरुवातही तुम्हीच करू शकाल. तुम्ही अबला आहात असे का मानता? तुम्ही तर शक्ती आहात. आपल्या मातेविना कोणता पुरुष या पृथ्वीवर अवतरला आहे? तुम्ही तुमचे दैन्य संपवा. तुमची दीन स्थिती मला कळते. तुम्हांला जेवढी कळते तेवढीच मीही जाणतो. तथापि बारडोलीच्या बाहेर देशात तुमची कीर्ती वाढली आहे. देशविदेशांत तुमचे नाव गाजते आहे. कारण तुम्ही तुमच्या अडचणी असून देखील, तुमची दीन अवस्था असताना देखील, बहादुरी गाजवली आहे. तीच वीरता तुमच्या आंतरिक सुधारणेतही दाखवा म्हणजे तुमची दीन दशा आपोआपच नष्ट होईल. या सर्व सुधारणांचा पाया, तुम्ही पिकवलेले अन्नधान्य तुम्ही वापरावे आणि स्वतःचा कापूस पिंजून काता- विणायला लागावे, हा आहे. वाटेल ते होवो, येत्या मोसमात कित्येक गावे तर मी अशी पाहू इच्छितो की जेथे विलायती सुताचा एकही घागा नसेल, एकही केस कोर्टाची पायरी चढत नसेल, आपसांत तेढ नसेल, स्त्रियांना त्रास होत नसेल, एकही बालविवाह अथवा लग्न-मरणाच्या पंक्ती नसतील. ही स्थिती आणण्यासाठी तुम्ही आपला वाटा उचला.’ 

Tags: Socialization agriculture migration Women Empowerment British India Gandhi Vallabhabhai Patel Saradar iron man स्थलांतर विकास शिक्षण महिला शेती बालविवाह भाऊबीज संस्थान लोहपुरूष ब्रिटिश वल्लभभाई पटेल सरदार बारडोली सत्याग्रह weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी